Friday, February 22, 2013

मारुती लबाड आहे !

             स. १८४८ मधील सांगलीच्या चिंतामणराव आप्पा पटवर्धन यांच्या दिनचर्येतील एक चमत्कारी अशी नोंद नुकतीच माझ्या वाचनात आली. ती नोंद कशाबद्दल आहे हे सांगण्याआधी हे चिंतामणराव पटवर्धन कोण याची आधी वाचकांना थोडक्यात ओळख करून देतो. थो. माधवराव पेशव्याच्या काळात पटवर्धनांचे घराणे खऱ्या अर्थाने उदयास आले. नानासाहेब पेशव्याच्या काळात पटवर्धन सरदारकी करत होतेच पण माधवरावाच्या कारकिर्दीत त्यांच्या पराक्रमास जसा वाव मिळाला तसा नानासाहेब पेशव्याच्या काळात मिळाला नव्हता. पटवर्धन सरदार घराण्याच्या आद्य पुरुष वा संस्थापक म्हणून हरभट बाबा पटवर्धनाचा उल्लेख मिळतो. या हरभटाला सात मुले. त्यापैकी चार मुले पेशव्यांच्या चाकरीत कारकुनी व शिपाईगिरीच्या पेशात शिरली. त्यापैकी गोविंदपंत पटवर्धनास चार मुले असून त्यापिकी पांडुरंगराव पटवर्धन हा एक होय. याच पांडुरंगरावाचे दुसरे अपत्य म्हणजे चिंतामणराव पटवर्धन. चिंतामणराव पटवर्धन हा उत्तर पेशवाईत बाजीरावाचा विरोधक आणि नाना फडणीसाचा समर्थक म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांशी तैनाती फौजेचा तह केल्यावर पटवर्धन प्रभूती सरदार इंग्रजांच्या कलाने वागू लागले. बाजीरावास हे सहन झाले नाही. इंग्रजधार्जिण्या आपल्या सरदारांना या ना त्या निमित्ताने त्याने त्रास देण्यास आरंभ केला. तेव्हा इंग्रजांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील भांडण मिटवले पण सोबतीला बाजीरावाच्या सरदारांवरील आपला प्रभाव देखील वाढवला. तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धात आरंभी चिंतामणराव आप्पा बाजीरावाच्या सोबत होता पण नंतर लवकरच त्याने इंग्रजांचा पक्ष घेऊन युद्धातून अंग काढून घेतले. परिणामी पेशवाई संपुष्टात आल्यावर आप्पाला सांगलीचे संस्थान मिळाले. संस्थानिक म्हणून त्यास इंग्रज सरकारने मान्यता दिली. स. १८१८ मध्ये पेशवाई नष्ट झाल्यामुळे या सरदारांना / संस्थानिकांना आता फारसे काही स्वातंत्र्य शिल्लक राहिले नव्हते व मोहिमा – स्वाऱ्याची दगदग देखील राहिली नाही. त्यामुळे चिंतामणरावच्या या रोजनिशीमध्ये फारशी काही महत्त्वाची माहिती मिळतच नाही. मात्र एक चमत्कारी नोंद वाचनात आली ती सर्वसामान्य वाचकांना माहिती असावी यासाठी या ठिकाणी प्रसिद्ध करीत आहे.
                  
     छ. १७ जमादिलावल चैत्र व|| शनिवार सांगली
खाशास आज बराच ज्वर आला. प्रकृत हल्लक झाली आहे.
ब्रह्मनाळास श्री. स्वामी आनंदमूर्ती यांचे वृंदावनाचा डोल होतो म्हणून काल समजले त्याजवरून स्वार पाठविला तो आज उत्तर आले त्यांत डोल आज पांच दिवस पौर्णिमापासून होत आहे म्हणोन लिहून आले.
ऐकीव वर्तमान, मेहरबा अंडरसनसाहेब जमखिंडीस होते तेव्हा जमखिंडीजवळ कलहळी म्हणोन गांव आहे तेथे श्री. मारुती जागृत आहे त्याजवळ एक विहीर आहे त्या विहिरीस गांवातील ब्राह्मणाची बायको पाण्यास आली तिने नाकातील नथ काढून चूळ भरली नंतर माघारी जाताना नथ विसरली. कोणी पळविली. साहेब रपोर्टास गेले होते ते त्या विहीरीपाशी गेले होते त्यास ती नथ दृष्टीस पडली त्यानीं उचलून चपराशाजवळ दिली इकडे नथ हरवल्या बाईने दुसऱ्या बाईने नथ चोरल्याचे किटाळ घेऊन मारुतीस कौल लावला कौल चार वेळा लावला त्यांत दुसऱ्या बायकोने नथ उचलली असा आला म्हणोन ती बाई तिच्या गळ्यांत पडली अखेर फिर्याद साहेबाकडे गेली साहेब म्हणाला मारुती लबाड आहे मी नथ उचलली असतां या गरीब बाईवर तुफान घेऊन कौल देतो म्हणून रागास येऊन श्रीची पूजा वगैरे बंद करून कवाडसा कुलूप घालून त्या कुलपास बेडी लोखंडी घातली आणि श्रीस नैवद्याबद्दल तीन पैसे देऊन त्याकडिल जमीन वगैरे नेमणूकीची जप्ती केली !  

संदर्भ ग्रंथ :-     ऐतिहासिक संकीर्ण साहित्य
१२ वा खंड
श्रीमंत चिंतामणराव आप्पा पटवर्धन यांची दिनचर्या
संपादक :- श्री. यशवंत नरसिंह केळकर

Monday, February 18, 2013

आगऱ्याहून सुटका भाग - २

जु. ९ सफर २९                                   श. १५८८ श्रावण वद्य ३०
( २८ ) सोम.                                     इ. १६६६ ऑगस्ट २०
फौलादखानाने अर्ज केला कीं, ‘ सीवाच्या सोबत्यांपैकी राघोजी वगैरे पाच लोक कैदेत आहेत ; ते सांगतात कीं, , मिर्झा राजा जयसिंगाने कुंवर रामसिंगास लिहिले होते कीं, “ समजेल त्या मार्गाने सीवाला तेथून काढावे व हरसतराय हरकारा यास देखील याबद्दल माहिती आहे.” हरकाऱ्याच्या दारुग्यावर अअतमादखानास नेमिले व केसोजी वगैरेंना त्याच्या हवाला केले.’ मिर्झाराजाच्या वकिलास घुसलखाना मना केला. बादशाहाने मुहम्मद अमीनखानास हुकूम केला कीं, ‘ कुंवरसिंगास लिहावे कीं, दरबारांतून जाऊ नये.’ फौलादखानास हुकूम केला कीं, ‘ रामसिंगाच्या तंबूजवळ व हरसतरायापाशीं पाहारा बसवून सावध राहावे.’ खालील लोकांची मनसब बडतर्फ केली. कुंवर रामसिंग चार हजार स्वार बडतर्फ, हरसतराय असल ४०० व ५० अनुक्रमे १०० व २० कमी, हरसताचा नातलग किसनराय ३०० बडतर्फ.
=============================================================
जु. ९ सफर २९                                श. १५८८ श्रावण वद्य ३०
( २८ ) सोम.                                   इ. १६६६ ऑगस्ट २०
  मिर्झा राजा जयसिंग याच्या नांवे बादशाही फर्मान सादर झाला कीं, ‘ तू हर प्रयत्नाने सीवा मजकुरास ताब्यांत आणून हुजूर पाठविलेस व बादशाहाने कुंवर रामसिंगास अत्यंत विश्वासू व भले चिंतणारा समजून सीवा मजकुरास त्याच्या हवाली केले होते. पण कुंवरने कल्याणेच्छा व सेवा यांजकडे दुर्लक्ष करून त्याची तरफदारी करून त्यास कपटाने येथून पळून जाऊ दिले. म्हणून मला वाटते कीं, रामसिंगास त्याच्या अपराधाबद्दल योग्य ती शिक्षा करावी. त्यास दृष्टीआड करून शहरांत फिरवणार होतो. परंतु तुझी एकनिष्ठ सेवा आड आली. मुलाच्या अपराधाबद्दल तुला शिक्षा थोडीच मिळाली ? याबद्दल परमेश्वराचे आभार मानावे.’ नंतर हा फर्मान अअतमादखानाच्या हवाला करून चौकीच्या डाकेने पाठविण्यास सांगितले.
===========================================================
जु. ९ सफर ३०                                        श. १५८८ भाद्रपद शुद्ध २
( २९ ) मंगळ.                                          इ. १६६६ ऑगस्ट २१
जुम्दतुल्मुल्कास हुकूम केला कीं, ‘ सीवाच्या पाहऱ्यावर मनसबदार, बर्कंदाज, बंदूकची व खासखेल कोणकोण होते त्यांची नांवे कळवावी.’
==============================================================
जु. ९ रवल २                                श. १५८८ भाद्रपद शुद्ध ४
गुरु.                                        इ. १६६६ ऑगस्ट २३
नरवरचा ( बरोरचा ) फौजदार इबादुल्लाहखान याची अर्जदाश्त आली. तींत लिहिले होते कीं, ‘ संध्याकाळच्या नमाजाच्या वेळी सीवा पाच स्वारांसह या वाटेने गेला. विचारले तेव्हां त्याने सांगितले कीं, “ आम्ही सीवाचे लोक आहों.” त्यांनी मुहम्मद अमीनखानाच्या शिक्क्याचा दस्तक दाखविला. त्यानंतर त्याने जाहीर केले कीं, ‘ आम्ही सीवाच आहों.’ परंतु समजले नाही. हुकुम केला कीं, ‘ इबादुल्लाहखानाने अत्यंत गैर गोष्ट केली ; त्यांचा पाठलाग केला नाही व दस्तकही नीट तपासले नाहीं.’
 ===============================================================
जु. ९ रवल                                          श. १५८८ भाद्रपद शुद्ध ४
गुरु.                                                इ. १६६६ ऑगस्ट २३
( १ ) बादशहाकडे अर्ज आला कीं, ‘ उदीतसिंग भदूरियाने सीवाच्या चाकरांना पकडून पाठविले आहे.’ हुकूम झाला कीं, ‘ त्यांना अअतमादखानाच्या ताब्यांत द्यावे म्हणजे तो त्यांना हुजुरांसमोर आणील.’
( २ ) मुहम्मद अमीनखानास हुकूम केला कीं, ‘ या पूर्वी तू सीवा मकहूर अतिशय विश्वास दाखविणारा पण हरामजादा आहे असा अर्ज केला होतास. त्यावेळी बादशाहांनी त्यावर विश्वास ठेविला नव्हता ; परंतु ते आतां खरे झाले.’
================================================================
जु. ९ रवल ४                                  श. १५८८ भाद्रपद शुद्ध ६
शनि.                                         इ. १६६६ ऑगस्ट २५
मिर्झा राजा जयसिंगाच्या मरातिबाविषयी विचारले असतां त्यावर जाफरखानाने अर्ज केला कीं, ‘ आपण मिर्झा राजाच्या मरातिबाबद्दल विचारले ; पण तो बेकसूर आहे. तेव्हां त्याची मनस्थिती द्विधा होईल हेंही आपण जाणता.’ तेव्हा बादशाहने मिर्झा राजा जयसिंगाच्या नावाने पुढील आशयाचे फर्मान लिहावे असें सांगितले – ‘ सीवा येथून पळाला तो जाणून बुजून रामसिंगाच्या इशाऱ्याने पाळला आहे. या फितुरांत रामसिंगाचा हात आहे. तरीही तुझ्यासाठी दुर्लक्ष केले आहे. तुझे वतन तुजकडे ठेवतो. तू सीवाच्या बाबतीत खबरदार असावे. तो असेल तेथून त्यास कैद करावे. तेथील बंदोबस्ताविषयी अत्यंत तत्पर राहावे.’
=================================================================
जु. ९ रवल ५                                         श. १५८८ भाद्रपद शुद्ध ७
रवि.                                                इ. १६६६ ऑगस्ट २६
फौलादखानास हुकूम झाला होता कीं, ‘ सीवाच्या जवळपासच्या चौक्यांचे नकाशे काढून नजरेखालून घालावे.’ त्याने हुकूमाप्रमाणे नकाशे काढून बादशाहच्या नजरेखालून घातले. [ व म्हटले ] ‘ आंतील चौकीत रामसिंगाचे व बाहेरील ( चौकीत ) माझे लोक होते, यावर बादशाह गप्प बसला.
 ==================================================================
जु. ९ रवल ५                                        श. १५८८ भाद्रपद शुद्ध ७
रवि.                                                इ. १६६६ ऑगस्ट २६
बादशाहाने हाफिज रहीमुद्दिन यास हुकूम केला कीं, ‘ घुसलखान्याचा मुश्रीफ राय ब्रिंदाबन व कुंवर रामसिंग यांस समोर आणावे.’ [ ते आले ] व त्यांनी पाच मोहरा नजर केल्या. ‘ सीवाची हकीकत सांगा ‘ असा हुकूम झाला. तेव्हां त्याने अर्ज केला कीं, ‘ राय मजकूर विनंती करीत आहे कीं, ‘ ह्या बंद्यास माहिती असती तर ती याने अगोदरच जाहीर केली असती.’ हुकूम झाला कीं, ‘ अशा प्रकारची बातमी त्या बिचाऱ्याशी कशाला बोलेल ?’
======================================================================
जु. ९ रवल ७                                    श. १५८८ भाद्रपद शुद्ध ९
मंगळ.                                          इ. १६६६ ऑगस्ट २८
( २ ) सलीमबेग गुर्जबर्दार याने मिर्झा राजा जयसिंगाकडून येऊन भेट घेतली. पाच रुपये नजर व मिर्झा राजाची अर्जदाश्त नजरेस आणली. बादशाहाने स्वतः ती पाहिली. शाहजादा सुलतान मुअज्जम यासही अर्जी दाखविली. त्यावर हुकूम झाला कीं, ‘ बख्तावरखानाच्या हवाला करावी. मुहम्मद अमीनखानास गुर्जबर्दारांना तोंडी विचारण्यास सांगितले. त्याप्रमाणे विचारून अर्ज केला कीं, ‘ नेकनामखान वगैरे विजापुरी लोकांनी तहाची बोलणी केली आहेत, परंतु बादशाही हुकूम नसल्याने तह केला गेला नाही. सेवक ( मिर्झा राजा ) नर्मदेच्या ( भिंवरेच्या ) कांठी आला ( तेव्हां ) सीवा मकहूराच्या पलायनाची बातमी आली. ठिकठिकाणी वाटेवर सीवाच्या लोकांना कैद करीत आहे.’ हे ऐकून बादशाह गप्प बसला.
=================================================================

जु. ९ रवल ७                                  श. १५८८ भाद्रपद शुद्ध ९
मंगळ.                                        इ. १६६६ ऑगस्ट २८
सलीमबेग याने मिर्झा राजाची अर्जदाश्त आणली ती आजूर ( महिन्याच्या ) १२ तारखेस बादशाहाच्या नजरेखाली घातली. त्यांत लिहिले होते कीं, ‘ विजापूरच्या वकिलांनी तहाचे बोलणे केले कीं, ‘ मंगळवेढ्याच्या हद्दीतील एक परगणा देऊ ; पण रोख रकमेच्या ऐवजी दुसरा परगणा देणार नाही. पावसाळयानंतर लढाई करू इच्छितात.’ त्यावर हुकूम झाला कीं, ‘ मिर्झा राजास हुकूम गेला आहे कीं, ज्याने चांगले होईल तें करावे.’ व सलीमबेगास हुकूम केला कीं, ‘ सीवाबद्दल कांही बातमी आणलीस का ?’ तो म्हणाला ‘ सीवा अलीकडे नर्मदेवर आल्याची खबर समजली होती. परंतु तो दिसला नाही. त्याच्या लोकांना वाटेत कैद केले जात आहे.’ अर्ज शाहजाद्यासही दाखविला.
========================================================================
जु. ९ रवल ८                                      श. १५८८ भाद्रपद शुद्ध १०
रवि.                                             स. १६६६ ऑगस्ट २९
फिदाईखान याने अर्ज केला कीं, ‘ धोलपूर परगण्याच्या जागीरीतून महाबतखानाच्या गुमास्त्याने मला पत्र लिहिले कीं, “ अली आदिल विजापुरी याचे दोन वकील जुम्दतुल – मुल्काचा निरोप घेऊन इकडे आले होते. तसेच सीवाचे तीन नोकर होते.” [ दोन पांढऱ्या पोषाखांतील व एक संन्यासी ] व त्यांच्याबरोबर पाच घोडे होते.” वकिलांनी जाहीर केले कीं, ‘ प्रतीतराय याने पाच घोडे व हे लोक यांस विजापुरास पोचवावे असे सांगितले. म्हणून त्या लोकांना कैद केले. ‘ कुंवर रामसिंगाची इच्छा आहे कीं, ‘ चंबळ नदी ओलांडून त्या लोकांस कैद करावे. परंतु हुकूम नसल्यामुळे त्यास नदी पलीकडे जाऊ दिले नाही. हुकूम व्हावा.’ यावर हुकूम झाला कीं, ‘ त्यास हस्बुलहुकूम लिहावा कीं, त्यांना दरबारकडे पाठवावे.’
=======================================================================
जु. ९ रवल ९                                      श. १५८८ भाद्रपद शुद्ध ११
गुरु. ( सोम )                                      इ. १६६६ ऑगस्ट ३०
( १ ) मुहम्मद आकिल व मीर रुस्तुम गुर्जबर्दार यांनी माळव्याचा सुभेदार तू ( लो ) दीखान यास हस्बुलहुकूम आणला कीं, ‘ सीवा येथून पळून गेला आहे त्याने सावध रहावे व त्यास कैद करावे.’ आतां खान मजकूर याच्या हस्बुलहुकुमाप्रमाणे अर्ज आला व तो नजरेखालून गेला. त्यांत लिहिले आहे कीं, ‘ बादशाही हुकुमाप्रमाणे दिसेल तेथे सीवा मकहूरास पकडावे म्हणून ताकीद देऊन माझ्या लोकांना मी धाडले आहे. आतापर्यंत तो कोठेंही दिसला नाही. ते त्याच्या लोकांना वाटेत ठिकठिकाणी कैद करीत आहेत. ऐकून बादशाह गप्प बसला.
( २ ) मुहम्मद आकिल व रुस्तुमबेग गुर्जबर्दार यांस हुकूम झाला होता कीं, ‘ तुम्ही सीवाला ओळखता. नर्मदेपर्यंत जाऊन ठिकठीकाणी चौकशी करावी.’ कांही दिवसांनी पात येऊन त्यांनी अर्ज केला कीं, ‘ नर्मदेच्या जमुल्याच्या गुजरपट्टीपर्यंत त्याचे काहींच चिन्ह दिसले नाहीं. त्याचे लोक ठिकठिकाणी कैद होत आहेत.’ उज्जैनचा सुभेदार वझीरखान याची अर्जदाश्त नजरेखालून गेली. तींत लिहिले आहे कीं, ‘ आम्हास सीवा मकहूराची खबर मिळाली. आम्ही ठिकठिकाणी बातमीदार ठेविले आहेत.’
( ३ ) धोलपुरांतील महाबतखानाच्या लोकानी सीवाचे दोन नोकर व पाच अरबी घोडे पकडले आहेत. हुकूम झाला कीं, ‘ त्यांस हुजूर पाठवावे.’
===========================================================================
जु. ९ रवल ११                                    श. १५८८ भाद्रपद शुद्ध १३
शनि.                                                  इ. १६६६ सप्टेंबर १
फिदाईखानाने अर्ज केला कीं, ‘ धोलपूर परगण्यांतील महाबतखानाच्या गुमास्त्यांनी हस्बुलहुकुमाप्रमाणे विजापुरी वकील व सीवाचे नोकर यांना कैद करून पाठविले आहे. हुकूम व्हावा.’ हुकूम झाला कीं, ‘ सीदी फौलादखानाच्या हवाला करावे.’
=====================================================================
जु. ९ रवल २३                                     श. १५८८ भाद्रपद वद्य १०
गुरु.                                                     इ. १६६६ सप्टेंबर १३
दक्षिणच्या वाक्यावरून समजले कीं, सीवा मकहूराचे कांही लोक लूटमार करण्याची इच्छा करतात. तेव्हां जुम्दतुल्मुल्कास हुकूम झाला कीं, ‘ मिर्झा राजास हस्बुलहुकूम लिहावा कीं, ‘ “ तिकडील अखत्यार तुजवर आहे. तिकडील बंदोबस्ताबद्दल सावध असावे.” ‘
===========================================================================
जु. ९ रखर ७                                    श. १५८८ आश्विन शुद्ध ९
इ. १६६६ सप्टेंबर २६
( १ ) दिलेरखानाने अर्ज केला होता कीं, हुजूर येण्याचा हुकूम मिळाला. मिर्झा राजा निरोप देईल तेव्हां हुजुरास रवाना होईन.
( २ ) मिर्झा राजाने अर्ज केला होता कीं, सीवा [ अजून ] आपल्या मुलखांत पोचलेला नाही. नेतोजीस कैद केले. [ बादशाह ] आनंदी झाला. रामसिंगाचे मानमरातब बादशाहाने मागवले.
=========================================================================
जु. ९ रखर १५                                       श. १५८८ आश्विन वद्य १
गुरु.                                                इ. १६६६ ऑक्टोबर ४
सुरतेचा फौजदार गियासुद्दीनखान याने अर्ज केला होता कीं, सीवा इकडे दिसला [ नाही ].
===========================================================================
जु. ९ रखर १८                                     श. १५८८ आश्विन वद्य ४
रवि.                                                   इ. १६६६ ऑक्टोबर ७
फौलादखानाने अर्ज केला कीं, सीवाचे घोडे, हत्ती, नकद व जिन्नस जप्त केले आहेत. हुकूम झाला कीं, बैतुलमालामध्ये दाखल करावे.
===========================================================================
जु. ९ जवल १६                                      श. १५८८ कार्तिक वद्य ३
रवि.                                                      इ. १६६६ नोव्हेंबर ४
  दख्खनकडील वाक्यावरून समजले कीं, ‘ सीवा राजगडास आपल्या मुलासह पोहचला. त्याचा मुलगा ……… आजारी होता तो मेला. त्याने ( सीवाने ) मिर्झा राजस लिहिले कीं, तुमच्या शब्दावरून मी हुजुरास गेलों होतो. परंतू स्वतःचे भले न दिसल्यामुळे उठून निघून आलो. मिर्झा राजाने कांहीही उत्तर दिले नाही.
===================================================================
जु. ९ जवल २७                                      श. १५८८ कार्तिक वद्य १४
गुरु.                                                    इ. १६६६ नोव्हेंबर १५
औरंगाबादेच्या वाक्यावरून समजले कीं, सीवाच्या घरी मुलगा जन्मला व तो स्वतः आजारी आहे.
========================================================================
जु. ९ जखर ३०                                       श. १५८८ पौष शुद्ध २
सोम.                                                     इ. १६६६ डिसेंबर १७
  मुहम्मद अमीनखानास हुकूम झाला कीं, मिर्झा राजा जयसिंगास इतराजीचा हस्बुलहुकूम लिहावा कीं, ‘ सीवा पोचल्याची बातमी भागानगरच्या वाक्यावरून समजली. तुम्ही व वाकेनवीस यांनी मात्र कांहीच लिहिले नाही. आतां तिकडील हकीकत तपशीलवार लिहित जावी.’
=========================================================================
जु. ९ रज्जब २४                                   श. १५८८ पौष वद्य ११
गुरु.                                                    इ. १६६७ जानेवारी १०
    बेगमसाहेबास हुकूम झाला कीं, ‘ मीर्झा राजा जयसिंगाच्या मामाने लिहिले आहे कीं, सीवा स्वतःच्या मुलखांत पोंचला. तो राजाच्या इशारतीवरून गेला आहे. [ त्याचा ] एकनिष्ठपणा उघड झाला.’
========================================================================
जु. ९ शाबान ५                                     श. १५८८ माघ शुद्ध ६
सोम.                                                  इ. १६६७ जानेवारी २०
शाही फेरफटक्याच्या शेवटी ताहिरखानाने अर्ज केला कीं, ‘ मिर्झा राजा जयसिंग हा चांगला सरदार आहे. त्याने दक्षिणेत कामगिरी केली आहे. कुंवर रामसिंगाबाबत बादशाहानी मेहेरबानगी करावी.’ हुकूम झाला ‘ आम्ही त्याजवर विश्वास टाकला व सीवास त्याच्या हवाली केले.’ त्यावर त्याने पुन्हा अर्ज केला कीं, ‘ हा घरचा आनुवांशिक चाकर आहे.’ हुकूम झाला कीं, कांही दिवसांनंतर विचार करून सांगूं.
=======================================================================
जु. ९ शाबान १४                                      श. १५८९ माघ शुद्ध १५
सोम. ( मंगळ )                                       इ. १६६७ जानेवारी २९
    दख्खनच्या वाक्यावरून समजले कीं, सीवाचा नातेवाईक महादजी हा किल्ले चमारगोंदा वगैरेच्या आसपासचा प्रदेश लुटून घेऊन गेला. हुकूम झाला कीं, ‘ इराणच्या मोहिमेनंतर त्याकडे लक्ष देऊं. हे सर्व बंड मिर्झा राजाच्या माहितीने चालले आहे.’ बादशाहाने इतराजी जाहीर केली. 

Sunday, February 17, 2013

आगऱ्याहून सुटका भाग - १

                                      
                  प्रस्तुत उतारे औरंगजेबाच्या दरबारातील अखबारांत मधून घेतले आहेत. या ग्रंथाच्या संपादकांनी ज्या प्रकारे हे उतारे प्रसिद्ध केले आहेत जवळपास त्याच पद्धतीने ते येथे उतरून घेतले आहेत. फरक फक्त इतकाच आहे कि, काही वर्षांमागे मराठी भाषेच्या लेखनात प्रचलित असलेले अनुस्वार या ठिकाणी मी गाळले आहेत. आवश्यक त्याच ठिकाणी फक्त ते ठेवले असून अनावश्यक अनुस्वारांना कात्री लावली आहे. कारण, जुन्या नियमांनुसार शब्द टाईप करणे अतिशय वेळखाऊ आणि काहीसे किचकट असे काम असल्याने व प्रस्तुत विषय शक्य तितक्या लवकर इतिहास वाचकांच्या समोर मांडण्याचा उताविळपणा असल्यामुळे मला असे करावे लागले. अर्थात, त्यामुळे मूळ मजकूरास अथवा त्याच्या अर्थास कसलाही धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी मी घेतली आहे.
छ. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक थरारक प्रसंगांपैकी एक म्हणजे आगऱ्याचे प्रकरण ! शिवाजी महाराजांनी त्या प्रसंगातून कशा प्रकारे आपली सुटका करून घेतली याविषयी आजही संशोधन चालू आहे. कारण, महाराज वेषांतर करून बाहेर पडले कि पेटाऱ्यातून हे आजही एक न उलगडलेलं कोडं आहे. औरंगजेबाच्या दरबारातील नोंदींवरून या घटनेवर बराचसा प्रकाश पडू शकतो हे लक्षात घेऊन या प्रकरणाशी संबंधित जवळपास सर्व नोंदी या ठिकाणी प्रसिद्ध करण्याचे मी ठरवले आहे. शिवकालीन इतिहासाचा मी अभ्यासक नसल्यामुळे या विषयावर मी माझे मत या ठिकाणी प्रसिद्ध करणार नाही.

संदर्भ ग्रंथ :- ऐतिहासिक फारसी साहित्य खंड सहावा
औरंगजेबाच्या दरबारचे अखबार
संपादक :- प्रा . गणेश हरी खरे
सहसंपादक :- गोविंद त्र्यंबक  कुळकर्णी


सितामऊ संग्रह                                           श. १५८८ ज्येष्ठ शुद्ध ८
जु. ९ जिल्हेज                                           इ. १६६६ मे ३१
६ गुरु.
फौलादखानाने अर्ज केला कीं, सीवाकडील सर्व दख्खनी लोक तक्रार करीत आहेत व सीवाही याचना करून सांगत आहे कीं, ‘ माझ्याकडून कांहीं एवढी मोठी चूक झाली नाहीं कीं, बादशाहानीं माझ्यावर एवढी अवकृपा करावी. ‘ ऐकून बादशाह गप्प बसला. मुहम्मद अमीनखानास हुकूम झाला कीं, गाझीबेग गुर्जबर्दारास विचारावें कीं, सीवाने इमामविर्दीखानाकडून किती हत्ती विकत घेतले ? उपर्युक्ताने चौकशी करून ‘ त्याने पंधरा हजार रुपयांचे घेतले आहेत व ते पैसे अजून वसूल झाले नाहींत ‘ असे कळविले.
——————————————————————————————————
ज. ९ सफर २५                                   श. १५८८ श्रावण वद्य ११
( २४ ) गुरु.                                      इ. १६६६ ऑगस्ट १६
कुंवर रामसिंगास हुकूम झाला कीं, ‘ सीवा मनसब कबूल करील अशा तऱ्हेने  त्याचें मन वळवावे. त्याचे नातेवाईक व इतर लोक यांस हुजूर बोलवावे. त्याने स्वतःचे किल्ले देऊन टाकावे. त्याची येथून काबूल येथें नेमणूक करीन.’ रामसिंगाने अर्ज केला कीं, ‘ सीवा विनंती करीत आहे कीं, ‘ बंद्यास वतनावर असूं  द्यावे. मग हुकूम होईल तो मान्य आहे.”
———————————————————————————————————
जु. ९ सफर २७                                      श. १५८८ श्रावण वद्य १३
( २६ ) शनि.                                       इ. १६६६ ऑगस्ट १८
(१)   बख्तावरखानाने अर्ज केला कीं, ‘ कुंवर रामसिंग म्हणतो “ सीवा पळून गेला.” फौलादखानाने अर्ज केला कीं, ‘ मलाही कळले नाहीं. त्याच्या पलायनाचे रहस्य कोणासही उमगले नाहीं.’ हुकूम केला ‘ तूं जा व बातमी काढ.’ फौलादखान सीवाच्या डेऱ्यापाशी गेला तेव्हां त्याने ऐकले ( पाहिले ) कीं, एक बांधलेली पगडी व एक आरसा पलंगावर आहेत व त्याचे जोडे खाली पडले आहेत. तीन घोडे, दोन पालख्या व एक नोकर पाठीमागें सोडून तो गेला. इतर कांहीही सामान नाहीं. तेव्हां उपर्युक्त खानाने येऊन तसा अर्ज केला. यावर हुकूम केला, ‘ त्याचा तपास करा.’ या बाबतींत राय ब्रिंदाबनने अर्ज केला कीं, ‘ कुंवर रामसिंग घुसलखान्यांत  बसला आहे.’ यावर हुकूम केला कीं, ‘ त्याला म्हणावे “ तू त्याचा ( सीवाचा ) जामीन आहेस. तू त्यास हजर केले पाहिजेस. नाहींतर तो गेला आहे तेथें तूही जा.” कुंवर रामसिंगास खास, आम व घुसलखाना यांत येऊं देऊं नये.” कुंवरचे चार ब्राम्हण सीवाच्या पलंगापाशीं पहाऱ्यास होते त्यांस कैद करावे व फौलादखानास हुकूम केला कीं, शहरांतही ताकीद करावी.
(२)    जुम्दतुल्मुल्कास हुकूम केला कीं, देशांतील सुभेदार, फौजदार मार्गाधिकारी ( गुजर पाथानच ) व जमीदार यांस लिहा ‘ सीवा हुजुराकडून पळाला आहे. प्रत्येकाने आपापल्या सरहद्दीबाबत जागरूक असावे. प्रत्येकाच्या हद्दींत जो कोणी येईल त्याचा तपास करावा. सीवा ज्याच्या हद्दीतून निसटेल त्यास काढून टाकण्यात येईल.
(३)    महाराजास हुकूम केला कीं, ‘ बघितलेस, कुंवर रामसिंगाने काय केलें. सीवास हातांतून निसटूं दिले.’ त्याने अर्ज केला कीं, ‘ तो आपल्या घरचा आहे. त्याची काय छाती आहे कीं, तो असें करील आणि तो ( सीवा ) तरी कुठे जाऊं शकेल. त्यास बांधून आणीन.’
(४)    हाजी अब्दुल वहहाब व आबिदखान यांनी अंतस्थ अर्ज केला कीं, ‘ सीवा पळून गेला आहे. ‘ हुकूम केला कीं, ‘ सीवा कुठे जाईल ? त्याने मातबर जामीन दिला आहे.’
  

Wednesday, February 6, 2013

उत्तर पेशवाईतील जातीय व्यवस्था


         मुतालिक ह्यांचे रोजनिशीपैकी
९५६ ( ३ )                  खमस सबैन मया व अलफ रमजान २२
श्रीसिद्धेश्वर महादेव, वास्तव्य कसबे पैठण, येथे देवालयांत श्रीचे पुजेची उपकरणे, व वस्त्रे, व पूजेचे साहित्य नेहमी असते, व देवालयांत रात्री गरीब वाटसरू वगैरे राहतात ; याजकरितां देवालयाजवळ रात्रीस चौकी पाहारा नेहमी ठेवावयाचा करार करून हे सनद तुम्हांस सादर केली असे, तरी परगणे मजकूरचे नेमणूकचे प्याद्यांपैकी दोन मराठे व दोन महार एकूण चार असामी श्रीचे देवालयाजवळ चौकीस रात्री दररोज देऊन चौकी पाहारा करवीत जाणे म्हणोन, कमावीसदार वर्तमान, व भावी परगणे पैठण यांस.             सनद १.
रसानगी यादी.
————————————————————————————————

हरी बल्लाळ यांच्या कीर्दीपैकी
११२९ ( ८४१ )                  अर्बा समानीन मया व अलफ जमादिलावल ५
श्री पांडुरंग क्षेत्र पंढरपूर येथे श्रीच्या देवालयांत मर्यादा येणेप्रमाणे कलम. बीतपशील.
श्रीदेवाचे दर्शनास येतात त्यांणी त्यांणी देवास भेटो नये. पूजने करून सिंहासनावर मस्तक ठेऊन नमस्कार मात्र करावा.            कलम १
देवापुढील तृतीय मंडपांत दक्षणेकडे द्वार आहे. परंतु यात्रेचे दाटीमुळे अंधःकार पडतो, त्यास उत्तरेकडे प्राचीन द्वार होते ते बुजवोन, तेथे हणमंताची मुहूर्त { मूर्ती } ठेविली आहे ते काढून देवालयांत ठेऊन द्वार मोकळे करून, तेथे जाळी मातबर थोर भोकाची देवालयांत उजेड पडोन वाराही पुष्कळ येईल अशी नवी दगडाची करून लावावी.                                             कलम १
आषाढी कार्तिकेचे यात्रेंत दाटी बहुत माणसांची होते. एकाच द्वाराने जाण्या – येण्याचे दाटीमुळे माणसे दुखावतात, व मरतात. यास्तव यात्रेचे दिवसांत पूर्व द्वाराने दर्शनास जाणाराने जावे, देवदर्शन करून दक्षण द्वाराने बाहेर निघावे ; पूर्व द्वाराने बाहेर जाऊ नये येणेप्रमाणे.                      कलम १
 देवालयाचे बाहेर चोखामेळ्याचा दगड उत्तरेचे आंगे आहे, तेथे अतिशूद्र दर्शनास येतात. जागासंकोच गलीची आहे. तेथे जाणारां येणारांस स्पर्शास्पर्श होतो. हे ब्राम्हणांस विरुद्ध. यास्तव अतिशूद्रांनी चोखामेळ्याचे दीपमाळेजवळ अथवा महारवाड्यांत असेल तेथे पुजा करीत जावी. देवालयाजवळ अतिशूद्रांनी येऊ नये. कोणी आला तरी पारिपत्य करावे.                        कलम १
गर्भागारापुढील दुसरे मंडपाचे द्वार आहे, तेथे बाहेरचे फरसापेक्षां उंबऱ्यातील फरस नीच आहे, त्यास यात्रेचे दाटीमुळे अंधकार पडतो, याजमुळे बाहेरून आंत येणारास हिसका बसोन माणसे पडतात. यास्तव बाहेरील फरसाबरोबर आंतील फरस उंच, हिसका माणसास न बसे असा, करावा.                कलम १
देवाचे पुढील दुसऱ्या मंडपांत अंधःकार विशेष पडतो, याजमुळे यात्रेकराची वस्तभाव उचलोन नेतात, याजकरतां मंडपाचे वरील छतास हमचौरस अदगजाचे गवाक्षे पाडून, पर्जन्यकाळी गवाक्षाने पावसाचे पाणी आंत न पडे असा बच्याव करून उजेड मंडपांत पडे असे करावे.                           कलम १
 देवदर्शनास मातबर येतात त्यांजबरोबर यवन येतात ते प्राकारांत { प्राकार – हद्दीची भिंत } जातात, याजमुळे अनाचार होतो तो अयोग्य. याजकरितां मुसलमानाने नामदेवाचे पायरीस स्पर्श करू नये, व दुसऱ्याही प्रकाराने मुसलमान आंत जाऊ नये. कोणी गेला तर पारिपत्य करून गुन्हेगारी घ्यावी. येणेप्रमाणे.
कलम १
येणेप्रमाणे सात कलमे करार करून पाठविली आहेत, याप्रमाणे बंदोबस्त करावयास चिंतो रामचंद्र कमावीसदार क्षेत्र मजकूर, दिंमत परशराम रामचंद्र, यांस आज्ञा केली आहे, तरी सरकारचे खास बारदार पाठविले आहेत, त्यांचे गुजारतीने सदरहू लिहिल्याप्रमाणे बंदोबस्त करणे म्हणोन.               जाबता १
सदरहू अन्वये कमावीसदार मजकूर यांस                सनद १
                                                                                                                                             ———–
                                                                                                                                                    २
                                                                                                                                            रसानगी यादी.


विश्लेषण :- सवाई माधवराव पेशव्याच्या रोजनिशीमधील या दोन नोंदी या ठिकाणी प्रसिद्ध केल्या आहेत. या दोन्ही नोंदींवरून तत्कालीन समाजस्थिती, विशेषतः जातीव्यवस्थेविषयी म्हटले तर बऱ्यापैकी माहिती मिळते आणि म्हटले तर माहितीचा गोंधळ होतो. पहिल्या नोंदीनुसार, पैठण येथील शिवमंदिराच्या संरक्षणास्तव सराकरने चार पहारेकरी नेमण्याची सूचना केली आहे. या ठिकाणी निव्वळ ४ पहारेकरी नेमा असे न सांगता २ मराठा जातीचे व २ महार जातीचे रक्षक नेमावे अशी तपशीलवार आज्ञा दिलेली आहे.
दुसरी नोंद पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराशी संबंधित अशी आहे. या नोंदीनुसार, पांडुरंगाच्या दर्शनास येणारे अतिशूद्र भाविक मंदिराच्या बाहेर असलेल्या चोखामेळ्याच्या दगडापर्यंत ( पायरीपर्यंत ?) येतात. या ठिकाणी जागा अरुंद असल्यामुळे अतिशूद्रांचा ब्राम्हणांस स्पर्श होतो. तेव्हा हे टाळण्यासाठी अतिशूद्रांनी चोखामेळ्याच्या दीपमाळेजवळ किंवा पंढरपुरातील महारवाड्यातील स्थळ ( एखादे विविक्षित ठिकाण ) असेल तेथूनच विठोबाची पूजा करावी असा पेशवे दरबाराचा आदेश आहे. तसेच या आदेशाविरुद्ध देवालयाजवळ कोणी अतिशूद्र गेल्यास त्याचे पारिपत्य करण्याचीही आज्ञा आहे. याच ठिकाणी दाखल घेण्यासारखी दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, विठ्ठलाच्या दर्शनासाठी जे हिंदू मातबर असामी जातात त्यांच्यासोबत मुस्लीम लोकं असतात. हे मुसलमान देवालयाच्या हद्दीच्या भिंतीपर्यंत जातात तर कित्येकदा देवालयानजीक म्हणजे जवळपास नामदेवाच्या पायरीच्या आसपास असे जातात. यामुळे अनाचार होतो तो थांबवण्याच्या दृष्टीने देखील दरबारने आज्ञा दिलेली आहे.
उपरोक्त दोन्ही नोंदींच्या तारखा या ठिकाणी स्पष्ट करणे मला शक्य नाही तरीही, या नोंदी सवाई माधवराव पेशव्याच्या काळातील असल्याने यांचा काल स्वाभाविकपणे स. १७७४ ते १७९५ हा वीस – एकवीस वर्षांचा असल्याचे इतिहास अभ्यासकांना माहिती आहेच. या दोन्ही नोंदींचा अधिक बारकाईने विचार केला असता त्यावेळच्या सामाजिक स्थितीवर थोडा बहुत प्रकाश तर पडतोच पण अनेक शंका निर्माण होऊन गोंधळ देखील उडतो.
१)    पैठण येथील शिवमंदिराच्या रक्षणासाठी जे ४ शिपाई नेमले, त्यातील २ महार आहेत.
२)    पंढरपूरची नोंद लक्षात घेतली तर महारांना मंदिरापर्यंत एका विविक्षित ठिकाणापर्यंतच येण्याची मुभा आहे. अशा परिस्थितीत, पैठण येथील शिवमंदिराचे रक्षण २ महार कसे करणार होते ?
३)    पंढरपूरच्या नोंदीनुसार चोखामेळ्याची पायरी असे ज्यास म्हटले जाते, त्याचा उल्लेख तत्कालीन पद्धतीनुसार ‘ चोखामेळ्याचा दगड ‘ असा केला आहे. समाधीला पेशवेकालीन मुत्सद्दी दगड कधी म्हणू लागले हा एक संशोधनाचा विषय आहे.
४)    पंढरपूरविषयक नोंदीमधील अतिशूद्र कलमाचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास केल्यास असेही लक्षात येते कि, अतिशूद्रांना विठ्ठल मंदिराच्या बाहेरच्या भागात का होईना येण्याची जी मोकळीक होती, ती या आज्ञेने साफ बंद झाली. म्हणजे, पेशवे सरकारच्या या आज्ञेने आता अतिशूद्र लोकांनी विठ्ठल मंदिराजवळ न येता चोखामेळ्याच्या दीपमाळेपासून किंवा तत्कालीन पंढरपुरातील महारवाड्यातील एका विशिष्ट ठिकाणाहूनच आता विठोबाचे दर्शन घ्यावे लागणार होते. याचाच अर्थ असा होतो कि, यापुढे कधीही  अतिशूद्रांना देवदर्शनासाठी चोखोबाच्या पायरीपर्यंत येण्याचा हक्क सांगता येणार नाही !
५)    पंढरपूरविषयी कमालीचे जागरूक असलेले पेशवे सरकार मुस्लिमांच्या विषयी मात्र काहीसे बोटचेपेपणाचे धोरण स्वीकारताना दिसतात. विठ्ठलाच्या दर्शनास येणाऱ्या मातबर हिंदू लोकांसोबत कित्येकदा मुस्लीम लोक देखील येत. त्यापैकी काहीजण मंदिराच्या आवाराची भिंत लागल्यावर त्या भिंतीच्या बाहेर ( सध्याच्या भाषेनुसार ‘ गेटच्या बाहेर ‘ ) थांबत तर काही थेट नामदेवाच्या पायरीपर्यंत येत. तेव्हा याविषयी पेशव्यांनी खूपच जहाल अशी आज्ञा काढली कि, मुसलमानाने नामदेवाचे पायरीस स्पर्श करू नये तसेच दुसऱ्या कोणत्याही प्रकारे / मार्गाने मंदिरात जाऊ नये. मुसलमान आत गेल्यास त्याचा बंदोबस्त करून गुन्हेगारी – अर्थात शिक्षा / दंडाची रक्कम  –– घ्यावी. म्हणजे, विधार्मीय मुसलमानांनी देवालयाजवळ यावे पण नामदेवाच्या पायरीस हात लावू नये आणि स्वधर्मीय अतिशूद्रांनी मात्र देवालयाजवळ येऊ नये ! वाह रे पेशवेकालीन न्याय !!

संदर्भ ग्रंथ :-  सवाई माधवराव पेशवे यांची रोजनिशी ( निवडक उतारे, अंक – ३ )

Monday, February 4, 2013

तीन परस्पर विरोधी आज्ञा.


                           

              सवाई माधवराव पेशव्याच्या काळातील जवळपास एकाच गुन्ह्यासाठी तीन विविध जातीतील गुन्हेगारांना वेगवेगळ्या शिक्षा देणाऱ्या तीन परस्पर विरोधी आज्ञा.

९३१ ( १०८७ )                         अर्बा तिसैन मया व अलफ रविलावल
कसबे खेड, तर्फ मजकूर, प्रांत जुन्नर, येथील महारांनी गोवध केला, व गुरे मारली, म्हणोन विदित जाले; त्याजवरून महाराचे हाडोळ्याची जमीन आहे, तिची जफ्ती सरकारांत करून कमावीस तुम्हांकडे सांगितली असे, तरी हाडोळ्याचे जमीनीची जफ्ती करून उत्पन्नाचा आकार होईल तो सरकार हिशेबी जमा करणे म्हणोन, महिपत कृष्ण कमाविसदार कसबे मजकूर यांचे नावे.                                           सनद १
रसानागी, त्रिंबक नारायण परचुरे कारकून निसबत दफ्तर.
      विश्लेषण :- खेड येथील महारांनी गोवध केल्याचे समजल्यावर गुन्हेगार महारांची हाडोळ्याची जमीन जप्त केल्याची आज्ञा पेशवे दरबाराने काढली. याव्यतिरिक्त गुन्हेगारांना कसलेही शासन करण्याची आज्ञा पेशवे दरबारने दिलेली नाही.
=================================================      ९३२ ( १०९३ )                   अर्बा तिसैन मया व अलफ जमादिलावल १७
केशवराव जगन्नाथ यांचे नावे की, तुम्ही विनंतीपत्र पाठविले ते प्रविष्ट जाहले. केदारी मांग, वस्ती मौजे कल्याण, घेरा किल्ला सिंहीगड, याचे घरी येश्या व अंबऱ्या मांग, वस्ती मौजे किकवी, तर्फ खेडेबारे हे चार महिने येऊन राहिले होते, त्यास तिघां मांगांनी छ १० रविलावली धोंडजी करजवणा, याची गाय मोगरवाडीचे रानांतून गुरांतील धरून आणून कल्याणचे रानांत दिवसास बांधोन ठेऊन, सायंकाळी तिघां जणांनी सुरा व कुराड विळे वस्त्र्याने जिवे मारली. त्याचे चौकशीस किल्ले मजकुरीहून शिपाई, व कल्याणकर पाटील व बेरड पाठविले. जाग्याचा थांग मोघमदऱ्यात लागला, सबब कल्याणकर महाराचे घरातील झाडे घेऊन, मांगाचे घरांत गेले तो केदाऱ्या मांग याचे घरांत मुद्दा सांपडला, सबब घर जफ्त करून तिघे मांग किल्यास आणून चौकशी करितां कबूल जाहले. त्यांची जबानी लिहोन घेतली. तिची नक्कल पाठविली आहे. मांगांचा अपराध थोर आहे. पारपत्याची आज्ञा जाहली म्हणोन, तपसीले लिहिले ते कळले. त्यास मांगांनी गाईचा वध केला, सबब सदरील तीन असामींचे उजवे हात तोडून सोडून देणे म्हणोन छ. ९ रबिलाखर                                                                                    सनद १
रसानागी, त्रिंबक नारायण
विश्लेषण :-  सिंहगड किल्ल्यानजीक एका वस्तीवरील मांग जातीच्या लोकांनी गाईची हत्या केली. याविषयीचे वृत्त समजताच स्थानिक अधिकाऱ्यांनी चौकशी करून गुन्हेगार मांगांना अटक केली व त्यांच्यावर काय कारवाई करायची याविषयी पेशवे दरबारकडे आज्ञा मागितली. दरबाराने, मांगांचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचे आहे असे सांगून गुन्हेगार व्यक्तींचे उजवे हात तोडून त्यांना सोडून देण्याची आज्ञा फर्मावली.
=======================================================
१११७ ( ५१६ )                        समान सबैन मया व अलफ सवाल ३०
रामा कानडा जातीचा ब्राम्हण म्हणवितो, परंतु पुण्यात गाईंची पुच्छे तोडली वगैर उपद्रव केले, प्रायश्चित्त योग्य नव्हे, सबब किल्ले कोहज येथे अटकेस ठेवावयासी बेडीसुद्धां पाठविला आहे, तरी पायांत बेडी घालून पोटास कोरडा शेर देऊन पक्क्या बंदोबस्ताने अटकेत ठेवणे म्हणोन, भिकाजी गोविंद यांस छ. १२ रमजान         सनद १
रसानागी यादी
विश्लेषण :- पुण्यातील रामा नामक ब्राम्हणाने गाईंच्या शेपट्या कापणे वगैरे कृत्ये केली. त्यास, या गुन्ह्याबद्दल प्रायश्चित्त देणे योग्य न वाटून पेशवे दरबारने कोहज किल्ल्यावर पायांत बेडी घालून त्यास कैदेत ठेवण्याची आज्ञा दिली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
     सवाई माधवराव पेशव्याच्या काळातील न्यायविषयक ३ प्रकरणे या ठिकाणी दिलेली आहेत. तिसरे प्रकरण वजा करता पहिल्या दोन प्रकरणातील गुन्ह्याचे स्वरूप सारखेच आहे. दोन्ही ठिकाणी गाईंचा वध करण्यात आलेला आहे हे उघड आहे. परंतु पहिल्या प्रकरणातील महार गुन्हेगारांची जमीन जप्त करण्यापलीकडे त्यांना कसलीही शिक्षा ठोठावण्यात आली नाही तर दुसऱ्या प्रकरणातील मांग गुन्हेगारांचे उजवे हात तोडण्याची शिक्षा फर्मावली आहे. दोन्ही ठिकाणी गुन्हा एकच आहे. गायींची हत्या झाली हे उघड. पण हि कशासाठी झाली याची स्पष्टता केलेली नाही. एखाद्याचे आर्थिक नुकसान करण्याच्या हेतुस्त्व वरील कृत्ये घडली आहेत का ? किंवा निव्वळ उदरभरणास्तव हे कार्य करण्यात आले आहे का ? याची उकल होत नाही. पण एक आहे कि, एकाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी दोन वेगवेगळ्या जातीतील लोकांना वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा करण्यात आली. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, दुसऱ्या प्रकरणात — सिंहगड जवळील वस्तीवरील मांग गुन्हेगारांच्या प्रकरणात — प्रथम संशय महार लोकांवर घेण्यात आला होता. महार वस्तीची झडती घेतल्यावर मगच मांग वस्तीवर धाड टाकण्यात आली होती. याचा अर्थ काय घ्यायचा हेच या ठिकाणी स्पष्ट होत नाही.
तिसरे प्रकरण पहिल्या दोन प्रकरणांपेक्षा बरेचसे वेगळे आहे. रामा कानडा नामक ब्राम्हण गाईंच्या शेपट्या कापत असल्याचा उल्लेख आहे, त्याशिवाय “ … गाईंच्या शेपट्या कापणे वगैरे कृत्ये ….” हि वाक्ये महत्त्वाची आहेत. याचा अर्थ असा होतो कि, रामाने केवळ गाईंच्या शेपट्या न कापता त्यांना इतर प्रकारेही उपद्रव दिला होता. आता तो उपद्रव कोणत्या स्वरूपाचा होता किंवा त्याने काय केले याची स्पष्टता या ठिकाणी केलेली नाही. त्याच्या या गुन्ह्याबद्दल त्याला पायात बेडी घालून कोहज किल्ल्यावर त्याची रवानगी केली. कदाचित, रामा हा मानसिक रुग्ण आहे या कारणास्तव त्याला काहीशी सौम्य शिक्षा देण्यात आली असावी.

     संदर्भ ग्रंथ :-     सवाई माधवराव पेशवे यांची रोजनिशी ( निवडक उतारे, अंक – ३ )

Saturday, February 2, 2013

अतिशूद्रांची लग्ने आम्ही लावीत नाही

  सवाई माधवराव पेशवे यांची रोजनिशी ( निवडक उतारे , अंक – ३ )
                          
                      सवाई माधवराव पेशव्याच्या दरबारात एक विचित्र प्रकरण ( आजच्या समाज मान्यतेनुसार ) निवाड्याकरीता आले होते. ज्योतिषाचा व्यवसाय करणाऱ्या ब्राम्हणाने आपला विवाहविधी पार पाडवा अशी कोरीगडाच्या आसपास राहणाऱ्या काही महारांनी मागणी केली. त्यावेळच्या नियमानुसार त्यांनी हि मागणी त्या भागातील कमावीसदाराकडे केली असता त्याने महारांच्या वतीने निकाल दिला. परंतु, ज्योतिष्याचा व्यवसाय करणाऱ्या ब्राम्हण व्यक्तीस हा निकाल न आवडल्याने त्याने या निर्णयाविरोधात पेशवे दरबारात दाद मागितली. त्याविषयीचा तत्कालीन लेखांतील वृत्तांत व त्यावरील विश्लेषण खालीलप्रमाणे :-
११३२ ( ८९० )                      सीत समानीन मया व अलफ साबान ६
रघुनाथ जोतिषी बिन त्रिंबक जोतिषी, व कृष्ण जोतिषी बिन दामोदर जोतिषी, मामले पाल पंचमहाल यांणी हुजूर विदित केले की, तर्फ कोरबरशे उर्फ पौडखोरे येथील जोतिष, उपाध्यपण, व धर्माधिकाऱ्याची वृत्ति पुरातन आमची आम्हांकडे चालत आहे, त्यांत महारांची लग्ने तर्फ मजकुरी जोतिष्यांनी लावण्याची चाल पुरातन नाही ; व आजपर्यंत लाविली नसतां सन अर्बा समानीनांत आपाजी कृष्ण कमावीसदार, तर्फ मजकूर दिंमत आनंदराव भिकाजी, यांजकडे तर्फ मजकूरचे महार फिर्याद होऊन आपली लग्ने जोतिषी यांणी लावावी ते लावीत नाहीत म्हणोन सांगितल्यावरून, पुर्ती चौकशी न करितां, पेशजी रखमाजी वाकडे हवालदार कोरीगडास होते त्यांचे वेळेस किल्ल्याचे चाकरमान्या महाराचे लग्न लावण्याचे होते, ते समयी लग्न लावणार मेढ्या महार हा हजर नव्हता, सबब किल्ले मजकूरचे हवालदार व सबनीस यांणी आमचा बाप भाऊ विनायक जोतिषी दहा पंधरा वर्षांचा अज्ञान होता, त्याजवर निग्रह करून महाराचे लग्न लावविले. त्यास अजमासे पंचावन वर्षे जाहली. तेवढ्याच दाखल्यावरून महारांची लग्ने जोतिषांनी लावीत जावी म्हणोन कमावीसदारांनी महारास भोगवटियास पत्र करून दिल्हे ; त्याजवरून लग्न लावण्यास अतिशूद्र आम्हांजवळ ब्राम्हण मागों लागले तो न दिल्हा, याजकरितां कमावीसदारांनी आम्हांस दहा रुपये मसाला करून महाली नेऊन महारांची लग्ने करावायाविशी निग्रह केला, त्यास अतिशूद्रांचे लग्नास आम्ही मुहूर्त मात्र सांगत असतो, पूर्वापार लग्ने लाविली नसतां नवीन चाल होणार नाही, ऐसे आम्ही उत्तर केले. त्याचा कमावीसदारांनी विषाद मानून पूर्वी या प्रांतांत धनगर नव्हते, अलीकडे नवे वस्तीस आले आहेत त्यांची व इतर जात परदेशी व गुजराथी वगैरे नूतन येतील त्यांचीही लग्ने तुम्ही लाऊ नयेत म्हणोन कमावीसदारांनी आक्षेप ( आक्षेप – मागणे, तक्रार, आशंका ) करून, जबरदस्ती आमचे वतनाची जफ्ती करून, वृत्तीचे कामकाजास नवा गुमास्त ठेविला आहे. येविशी कमावीसदारांस ताकीद होऊन महारांस भोगवटियास पत्रे करून दिल्ही आहेत, ती माघारी घेऊन आमच्या वृत्ती आम्हांकडे चालवावयाविशी आज्ञा होऊन, जफ्तीमुळे वृत्तीचा ऐवज व मसाला महाली घेतला आहे, तो माघारा देविला पाहिजे म्हणोन ; त्याजवरून येविशीची चौकशी करून दाखले मनास आणतां महारांची लग्ने जोतिष्यांनी लावावयाची चाल फार करून नाही, कोठे कोठे लावीतही असतील, परंतु कोकण प्रांती महारांची लग्ने जोतिषी लावीत नाही, त्यांचे जातीमध्ये मेढे महार आहेत तेच लावितात, याप्रमाणे तळकोकणचे जमीदार व जोतिषी हुजर आहेत त्यांणी विदित केले ; व वेदमूर्ती रंग जोशी जुन्नरकर यांणीही लिहून दिल्हे की, शहर जुन्नर बरहुकूम पेठा सुद्धां व तर्फेचे गांव पाऊणशे व शिवनेर वगैरे किल्ले पांच या ठिकाणी जोतिषपणाची वृत्ति परंपरागत आपली आहे, परंतु आपले वृत्तींत अतिशूद्रांची लग्ने आम्ही लावीत नाही , अतिशूद्रांचे जातीत ढेगोमेगो ( महारांचे गुरु ) आहेत तेच त्यांची लग्ने लावीत असतां, पूर्वी एक वेळ किल्ल्याचे चाकरमाने व प्रांतांतील दोन चार हजारपर्यंत महार मिळोन गवगवा करोन जोतिष्यांनी आपली लग्ने लावावी म्हणोन, आवरंगजेब पादशाहा याजवळ फिर्याद केली, तेव्हां त्यांणी पुरातन चाल मनास आणून, जोतिषीयांणी महारांची लग्ने लाऊ नयेत असा ठराव केला, त्याप्रमाणे हा कालवर चालते. म्हणोन याप्रमाणे दो प्रांतीचे दाखले गुजरलेल्याप्रमाणे तर्फ मजकुरींही जोतिष्यांनी महारांची लग्ने लावावयाची चाल पुरातन नसतां, मागे कोरीगडचे हवालदाराने जोतिष्याचे मुलापासून बलात्कारे एक वेळ महाराचे लग्न लाविले असल्यास तेव्हढ्याच दाखल्यावरून महारांची लग्ने जोतिष्यांनी लावीत जावी म्हणोन तुम्ही महारांस नवीं पत्रे करून देऊन जोतिषी यांजवर लग्ने लावावयाविशी निग्रह करून त्यांजपासून मसाला घेऊन त्यांच्या वृत्ती जप्त केल्या, हे ठीक न केले. मागे मोगलाई अमलांत ही पुरातन चाल मोडून नवे केले नसतां स्वराज्यांत तुम्ही आग्रह करून नवीन चाल करणे अनुचित. यास्तव तर्फ मजकुरी महारांची लग्ने पुरातन जोतिषी लावीत नाही, त्याप्रमाणे पुढेही लाऊ नयेत, याप्रमाणे ठराव करून हे पत्र तुम्हांस सादर केले असे. तरी तुम्ही महारांस नूतन पत्रे करून दिल्ही असतील ती माघारी घेऊन जोतिषीयांजवळ देणे, आणि जोतिषी यांचे वतन जप्त केले आहे ते मोकळे करून जफ्तीमुळे ऐवज जमा जाहला असेल तो, व यांजपासून मसाला घेतला आहे तो माघार देणे. अतिशूद्र खेरीज करून सर्व जातींची लग्ने पुरातन जोतिषी लावीत आल्याप्रमाणे लावितील. तुम्ही नवीन आक्षेप न करणे. या पत्राची नक्कल घेऊन हे अस्सल पत्र दाखल्यास जोतिषी यांजवळ परतोन देणे म्हणोन, आपाजी कृष्ण कमावीसदार, तर्फ पौडखोरे दिंमत आनंदराव भिकाजी  यांचे नावे चिटणीसी.        पत्र १
सदरहूअन्वये समस्त महार तर्फ कोरबारसे उर्फ पौडखोरे यांस आपाजी कृष्ण यांजपासून पत्र करून घेतले आहे, ते जोतिषी यांजवळ माघारां देणे. तुमचे जातीमध्ये मेढे महार लग्ने लावीत आल्याप्रमाणे लावितील. याउपरी जोतिषी यांशी खटला केल्यास मुलाहिजा होणार नाही म्हणोन.       पत्र १
               विश्लेषण :- वरील उतारा सवाई माधवराव पेशव्याच्या रोजनिशीमधील असून त्या उताऱ्याची तारीख मुस्लीम कालगणनेनुसार दिलेली आहे. प्रस्तुत ठिकाणी या उताऱ्याची नेमकी तारीख शोधणे तितकेसे महत्त्वाचे नसल्यामुळे स. माधवराव पेशव्याचा काल हा स. १७७४ ते १७९५ असा २० – २१ वर्षांचा आहे व या उताऱ्यात आलेला प्रसंग याच २० – २१ वर्षांच्या काळातील आहे एवढे लक्षात घेतले तरी पुरेसे आहे. या उताऱ्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यापूर्वी याचा थोडक्यात सारांश आधी आपण पाहू.
१)    कोरीगडाच्या आसपासच्या गावातील महारांनी आपल्या जातीतील व्यक्तींचे लग्न ज्योतिष व्यवसाय करणाऱ्या ब्राह्मणाने लावावे असा आग्रह धरला.
२)    यासाठी त्यांनी सुमारे ५० – ५५ वर्षांपूर्वीचा एक दाखला दिला. त्यानुसार ५० – ५५ वर्षांमागे कोरीगडावर काम करणाऱ्या महाराचे लग्न लावण्यास महार जातीतील उपाध्याय हजर नव्हता. तेव्हा गडाचा हवालदार रखमाजी वाकडे याने, उपरोक्त उताऱ्यातील तक्रारदार रघुनाथ जोतिषीच्या वडील ( भाऊ ? ) यास जबरदस्तीने महाराचा लग्नविधी करण्यास भाग पाडले होते.
३)    कोरीगडावरील या प्रसंगाचा दाखला प्रस्तुत प्रसंगी महारांनी पौड खोऱ्याचा कमावीसदार आपाजी कृष्ण यास देऊन आपले लग्नविधी ज्योतिष व्यवसाय करणाऱ्या ब्राम्हणाने, म्हणजेच या निवाड्यातील मुख्य तक्रारदार रघुनाथ जोतिषी याने करावेत अशी मागणी केली. तेव्हा आपाजी कृष्ण याने महारांच्या बाजूने निकाल दिला.
४)    रघुनाथ जोतिषीला आपाजी कृष्णाचा निकाल पसंत पडला नाही व त्याने आपली तक्रार पेशवे दरबारात मांडली. तसेच आपली बाजू मांडताना त्याने असेही सांगितले कि, अतिशूद्रांच्या लग्नाचे मुहूर्त मात्र आम्ही सांगतो पण त्यांची लागणे लावत नाही. कारण अशी पूर्वपरंपरा नाही.
५)    या निवाड्यात पेशवे दरबाराने रघुनाथ जोतिषीची बाजू उचलून धरली. मात्र रघुनाथ जोतिषीच्या बाजूने निकाल देताना दरबाराने ज्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे, त्या गोष्टींचा / मुद्द्यांचा अतिशय काळजीपूवर्क अभ्यास करणे आवश्यक आहे.
(१)  ज्योतिष्याचा व्यवसाय करणाऱ्या ब्राम्हणांनी महारांची लागणे लावण्याची चाल फारशी प्रचलित नाही व काही ठिकाणी ती असूही शकते अशा आशयाचे मोघम विधान केले आहे. महार समाजातील लग्नविधी लावण्याचे कार्य त्यांच्याच जातीतील मेढे, ढेगोमेगो नामक पुरोहित पार पाडतात.
(२)  प्रस्तुत खटला कोकण भागातील असल्याने त्या प्रांतातील पेशवे दरबारी हजर असलेल्या जमीनदार, ज्योतिषी यांचीही या बाबतीत साक्ष घेण्यात आली. त्यांचेही मत रघुनाथ जोतिषी प्रमाणेच असल्याचे दिसून येते. याशिवाय तत्कालीन वेदमूर्ती रंग जोशी जुन्नरकर यानेही नमूद केले कि, जुन्नर प्रांतातील सुमारे ७५ गावे व शिवनेरी धरून ५ किल्ल्यांची ज्योतिष सांगण्याची परंपरागत वृत्ति  आपल्या घराण्यात आहे व अतिशूद्रांची लग्ने लावण्याचे कार्य आपल्या किंवा आपल्या पूर्वजांच्या हातून घडलेले नाही.
(३)  औरंगजेबाच्या काळात देखील महारांनी याच आशयाचा त्याच्याकडे अर्ज केला होता. परंतु पूर्वपरंपरा लक्षात घेऊन औरंगजेबाने महारांच्या विरोधात निकाल दिला.
(४)  या ठिकाणी असाही एक प्रश्न उद्भवतो कि, ब्राम्हणांनी आपले लग्नविधी पार पाडावेत यासाठी औरंगजेबाच्या काळापासून महार का प्रयत्न करत होते ? ( हे विधान या उताऱ्यातील माहितीच्या आधारावर केले आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.) त्यांच्या जातीतही लग्नविधी पार पाडणारे पुरोहित हजर असताना ब्राम्हणांनीच आपले लग्नविधी पार पाडावेत हा आग्रह कशासाठी ? त्या काळात कोणकोणत्या जातींची लग्नविधी लावण्याचे कार्य ब्राम्हण करत होते ? कारण, केवळ अनुकरणातून जर महारांनी हा आग्रह केला असेल तर तत्कालीन जातींमधील विवाहपद्धती व त्यांचे विवाह लावणारे पुरोहित — मग ते सजातीय असोत कि ब्राम्हण अथवा इतर जातीय —- त्यांचीही माहिती मिळवून प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.
(५)  या ठिकाणी औरंगजेबाच्या काळातील उदाहरणाचा उल्लेख आहे. त्या उल्लेखावरून असे दिसून येते कि, केवळ महारांची लग्ने ब्राम्हणांनी लावावीत अशी पूर्वपरंपरा नसल्याने महारांचा अर्ज औरंगजेबाने फेटाळून लावला. परंतु, अशी पूर्वपरंपरा — मग भलेही ती खंडित झालेली का असेना — असल्याखेरीज महार जातीचे लोक अशा प्रकारची मागणी औरंगजेबाकडे करतील का ?
(६)  रघुनाथ जोतिषीच्या बाप ( भाऊ ? ) याजकडून कोरीगडाच्या हवालदाराने महाराचे लग्न जबरदस्तीने लावून घेतले. प्रस्तुत उताऱ्याची तारीख निश्चित करणे मला शकत नसले तरी हि घटना ५० – ५५ वर्षे इतकी जुनी म्हणजे शाहू छत्रपतीच्या काळात घडलेली आहे हे निश्चित ! महाराचे लग्न लावण्याचे कार्य पार पाडल्याबद्दल — ते देखील अशी पूर्वपरंपरा नसताना — रघुनाथ जोतिषीच्या वडिलांवर ( भावावर ? ) बहिष्कार पडल्याचा किंवा या कृत्याबद्दल त्यांनी प्रायश्चित्त घेतल्याचा उल्लेख या ठिकाणी येत नाही हे विशेष. दुसरे म्हणजे, गडाचा हवालदार हे कृत्य घडवून आणण्यात पुढाकार घेत आहे याचा अर्थ प्रचलित लोकरुढींच्या विरोधात आपण कार्य करत आहोत अशी त्याची भावना असल्याचे दिसून येत नाही. जरी तो सरकारी नोकर असला व गडाचा हवालदार असला तरी लोकभावनेला दुखावणे किंवा रुढींच्या विरोधात जाऊन कार्य करणे अथवा घडवून आणणे तितकेसे सोपे नसते. याचे प्रत्यंतर आजच्या काळात देखील आपल्याला दिसून येते.
(७)  अतिशूद्रांच्या जातीतील लग्ने लावण्याचे कार्य त्यांच्याच जातीतील पुरोहित पार पाडतात असा उल्लेख या उताऱ्यात आला आहे. याचा अर्थ असा होतो कि, त्यावेळी प्रत्येक जातीचा स्वतंत्र असा एक पुरोहित वर्ग अस्तित्वात होता. याची कितीतरी उदाहरणे तत्कालीन कागदपत्रांमध्ये आढळून येतात कि, तत्कालीन कित्येक उच्च समजल्या जाणाऱ्या जातींमध्ये लग्न लावण्याचे कार्य त्या त्या जातीतील पुरोहितच पार पाडत. त्यासाठी ब्राम्हणांची गरज पडत नसे. आणि महत्त्वाचे म्हणजे, लग्न लावण्यात ब्राम्हण हजर असलाच पाहिजे असा काही दंडक नव्हता व ब्राम्हणाशिवाय इतरांनी लावलेले लग्न देखील अधिकृतच समजले जात होते.