रविवार, १७ फेब्रुवारी, २०१३

आगऱ्याहून सुटका भाग - १

                                      
                  प्रस्तुत उतारे औरंगजेबाच्या दरबारातील अखबारांत मधून घेतले आहेत. या ग्रंथाच्या संपादकांनी ज्या प्रकारे हे उतारे प्रसिद्ध केले आहेत जवळपास त्याच पद्धतीने ते येथे उतरून घेतले आहेत. फरक फक्त इतकाच आहे कि, काही वर्षांमागे मराठी भाषेच्या लेखनात प्रचलित असलेले अनुस्वार या ठिकाणी मी गाळले आहेत. आवश्यक त्याच ठिकाणी फक्त ते ठेवले असून अनावश्यक अनुस्वारांना कात्री लावली आहे. कारण, जुन्या नियमांनुसार शब्द टाईप करणे अतिशय वेळखाऊ आणि काहीसे किचकट असे काम असल्याने व प्रस्तुत विषय शक्य तितक्या लवकर इतिहास वाचकांच्या समोर मांडण्याचा उताविळपणा असल्यामुळे मला असे करावे लागले. अर्थात, त्यामुळे मूळ मजकूरास अथवा त्याच्या अर्थास कसलाही धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी मी घेतली आहे.
छ. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक थरारक प्रसंगांपैकी एक म्हणजे आगऱ्याचे प्रकरण ! शिवाजी महाराजांनी त्या प्रसंगातून कशा प्रकारे आपली सुटका करून घेतली याविषयी आजही संशोधन चालू आहे. कारण, महाराज वेषांतर करून बाहेर पडले कि पेटाऱ्यातून हे आजही एक न उलगडलेलं कोडं आहे. औरंगजेबाच्या दरबारातील नोंदींवरून या घटनेवर बराचसा प्रकाश पडू शकतो हे लक्षात घेऊन या प्रकरणाशी संबंधित जवळपास सर्व नोंदी या ठिकाणी प्रसिद्ध करण्याचे मी ठरवले आहे. शिवकालीन इतिहासाचा मी अभ्यासक नसल्यामुळे या विषयावर मी माझे मत या ठिकाणी प्रसिद्ध करणार नाही.

संदर्भ ग्रंथ :- ऐतिहासिक फारसी साहित्य खंड सहावा
औरंगजेबाच्या दरबारचे अखबार
संपादक :- प्रा . गणेश हरी खरे
सहसंपादक :- गोविंद त्र्यंबक  कुळकर्णी


सितामऊ संग्रह                                           श. १५८८ ज्येष्ठ शुद्ध ८
जु. ९ जिल्हेज                                           इ. १६६६ मे ३१
६ गुरु.
फौलादखानाने अर्ज केला कीं, सीवाकडील सर्व दख्खनी लोक तक्रार करीत आहेत व सीवाही याचना करून सांगत आहे कीं, ‘ माझ्याकडून कांहीं एवढी मोठी चूक झाली नाहीं कीं, बादशाहानीं माझ्यावर एवढी अवकृपा करावी. ‘ ऐकून बादशाह गप्प बसला. मुहम्मद अमीनखानास हुकूम झाला कीं, गाझीबेग गुर्जबर्दारास विचारावें कीं, सीवाने इमामविर्दीखानाकडून किती हत्ती विकत घेतले ? उपर्युक्ताने चौकशी करून ‘ त्याने पंधरा हजार रुपयांचे घेतले आहेत व ते पैसे अजून वसूल झाले नाहींत ‘ असे कळविले.
——————————————————————————————————
ज. ९ सफर २५                                   श. १५८८ श्रावण वद्य ११
( २४ ) गुरु.                                      इ. १६६६ ऑगस्ट १६
कुंवर रामसिंगास हुकूम झाला कीं, ‘ सीवा मनसब कबूल करील अशा तऱ्हेने  त्याचें मन वळवावे. त्याचे नातेवाईक व इतर लोक यांस हुजूर बोलवावे. त्याने स्वतःचे किल्ले देऊन टाकावे. त्याची येथून काबूल येथें नेमणूक करीन.’ रामसिंगाने अर्ज केला कीं, ‘ सीवा विनंती करीत आहे कीं, ‘ बंद्यास वतनावर असूं  द्यावे. मग हुकूम होईल तो मान्य आहे.”
———————————————————————————————————
जु. ९ सफर २७                                      श. १५८८ श्रावण वद्य १३
( २६ ) शनि.                                       इ. १६६६ ऑगस्ट १८
(१)   बख्तावरखानाने अर्ज केला कीं, ‘ कुंवर रामसिंग म्हणतो “ सीवा पळून गेला.” फौलादखानाने अर्ज केला कीं, ‘ मलाही कळले नाहीं. त्याच्या पलायनाचे रहस्य कोणासही उमगले नाहीं.’ हुकूम केला ‘ तूं जा व बातमी काढ.’ फौलादखान सीवाच्या डेऱ्यापाशी गेला तेव्हां त्याने ऐकले ( पाहिले ) कीं, एक बांधलेली पगडी व एक आरसा पलंगावर आहेत व त्याचे जोडे खाली पडले आहेत. तीन घोडे, दोन पालख्या व एक नोकर पाठीमागें सोडून तो गेला. इतर कांहीही सामान नाहीं. तेव्हां उपर्युक्त खानाने येऊन तसा अर्ज केला. यावर हुकूम केला, ‘ त्याचा तपास करा.’ या बाबतींत राय ब्रिंदाबनने अर्ज केला कीं, ‘ कुंवर रामसिंग घुसलखान्यांत  बसला आहे.’ यावर हुकूम केला कीं, ‘ त्याला म्हणावे “ तू त्याचा ( सीवाचा ) जामीन आहेस. तू त्यास हजर केले पाहिजेस. नाहींतर तो गेला आहे तेथें तूही जा.” कुंवर रामसिंगास खास, आम व घुसलखाना यांत येऊं देऊं नये.” कुंवरचे चार ब्राम्हण सीवाच्या पलंगापाशीं पहाऱ्यास होते त्यांस कैद करावे व फौलादखानास हुकूम केला कीं, शहरांतही ताकीद करावी.
(२)    जुम्दतुल्मुल्कास हुकूम केला कीं, देशांतील सुभेदार, फौजदार मार्गाधिकारी ( गुजर पाथानच ) व जमीदार यांस लिहा ‘ सीवा हुजुराकडून पळाला आहे. प्रत्येकाने आपापल्या सरहद्दीबाबत जागरूक असावे. प्रत्येकाच्या हद्दींत जो कोणी येईल त्याचा तपास करावा. सीवा ज्याच्या हद्दीतून निसटेल त्यास काढून टाकण्यात येईल.
(३)    महाराजास हुकूम केला कीं, ‘ बघितलेस, कुंवर रामसिंगाने काय केलें. सीवास हातांतून निसटूं दिले.’ त्याने अर्ज केला कीं, ‘ तो आपल्या घरचा आहे. त्याची काय छाती आहे कीं, तो असें करील आणि तो ( सीवा ) तरी कुठे जाऊं शकेल. त्यास बांधून आणीन.’
(४)    हाजी अब्दुल वहहाब व आबिदखान यांनी अंतस्थ अर्ज केला कीं, ‘ सीवा पळून गेला आहे. ‘ हुकूम केला कीं, ‘ सीवा कुठे जाईल ? त्याने मातबर जामीन दिला आहे.’
  

२ टिप्पण्या:

deom म्हणाले...

छ शिवाजी महाराजांचे आग्रा युथून पलायन हि एक आश्चर्यकारक घटना आहे तिचा नेमकेपणा अजूनही सांगता येत नाही, यातच महाराजांची अलौकिकपण दिसून येते. आपण हि पत्रे सादर केलीत त्याचे आभार आणि याचा अभ्यास करताहात यात सुयश चिन्तितो.

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ म्हणाले...

शिवरायांचा आठवावा प्रताप !

आज शिवजयंती निमित्ताने शिवाजीरायांच्या एका महत्वाच्या जीवनप्रसंगावर आधारित पुस्तकाचा परिचय करून देत आहे.

या प्रसंगावर आधारित चित्रात दाखवलेल्या ऐसपैस बुट्टी-पेटाऱ्यात, शेजारी टोकऱ्यात ढिगाने रचलेल्या लाडू, बर्फी, जिलेबी, इमरतीसारख्या ठिसूळ व नरम मिठायांना 60 -70 किलो वजनांपर्यंत रचून भरता येणार का हे ठरवावे लागेल. चौक्यावर पहारेकऱ्यांना चकवायला खाली लपलेल्या व्यक्तीच्या अंगावर मिठाया ठेवायला हव्यात. अशा पेटाऱ्यांना दोन भोयांनी ते कमीत कमी 7-8 किमी दूर नेताना लागणारा वेळ. भोयांना कटात सहभागी करून कितीवेळ हे निसटणे लपलेले राहणार, वगैरे कसे शक्य आहे याची चिकित्सा करायला हवी. त्यातील त्रुटी पाहता मिठाईच्या पेटाऱ्याची युक्ती फक्त कल्पना होऊ शकते असे लेखकाला वाटते.

लेखक, डॉ. अजित प. जोशी आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्फूर्तिदायक जीवनावर आजपर्यंत अनेक छोटे मोठे ग्रंथ लिहिले गेले आहेत. (त्यात) संशोधनात्मक लेखन खूप कमी आहे. आगऱ्याहून सुटका प्रसंगाची उपलब्ध ऐतिहासिक पत्रे, बखरी तसेच शिवाजी महाकाराजींची व्यक्तिरेखा लक्षात घेऊन एक नवी मांडणी प्रस्तूत ग्रंथात केली आहे. त्यामुळे त्याला काही प्रमाणात संशोधन प्रबंधाचे स्वरूप आले आहे. चिकित्सक वाचक तसेच इतिहासाचे अभ्यासक यांना हा ग्रंथ आवडेल असा विश्वास वाटतो.
‘नव्याने जुने शुद्ध करावे’ असा कौटिलिय अर्थशास्त्राच्या 25व्या ‘दुर्गनिवेश’ नावाच्या प्रकरणात उल्लेख आहे. दुर्गनिवेश म्हणजे किल्ल्याची मांडणी. उपलब्ध लेखन सामुग्रीवर आधारित नवीन विचार करून त्याचा नवीन अन्वयार्थ लावून प्रस्तूत ग्रंथात नवीन प्रमेय मांडले आहे.
सध्या मान्य असलेल्या मिठाईच्या पेटाऱ्याच्या कथेचे विश्लेषण केले आहे. पुरंदरच्या तहापासून शिवाजीराजे व संभाजीराजे राजगडावर परत येईपर्यंतचा कालखंड विस्तृत पुराव्यांसह सादर केला आहे. शिवाय नेताजी पालकरबद्दल उपलब्ध माहिती परिशिष्ठ 1 मधे दिलेली आहे.