सोमवार, ४ फेब्रुवारी, २०१३

तीन परस्पर विरोधी आज्ञा.


                           

              सवाई माधवराव पेशव्याच्या काळातील जवळपास एकाच गुन्ह्यासाठी तीन विविध जातीतील गुन्हेगारांना वेगवेगळ्या शिक्षा देणाऱ्या तीन परस्पर विरोधी आज्ञा.

९३१ ( १०८७ )                         अर्बा तिसैन मया व अलफ रविलावल
कसबे खेड, तर्फ मजकूर, प्रांत जुन्नर, येथील महारांनी गोवध केला, व गुरे मारली, म्हणोन विदित जाले; त्याजवरून महाराचे हाडोळ्याची जमीन आहे, तिची जफ्ती सरकारांत करून कमावीस तुम्हांकडे सांगितली असे, तरी हाडोळ्याचे जमीनीची जफ्ती करून उत्पन्नाचा आकार होईल तो सरकार हिशेबी जमा करणे म्हणोन, महिपत कृष्ण कमाविसदार कसबे मजकूर यांचे नावे.                                           सनद १
रसानागी, त्रिंबक नारायण परचुरे कारकून निसबत दफ्तर.
      विश्लेषण :- खेड येथील महारांनी गोवध केल्याचे समजल्यावर गुन्हेगार महारांची हाडोळ्याची जमीन जप्त केल्याची आज्ञा पेशवे दरबाराने काढली. याव्यतिरिक्त गुन्हेगारांना कसलेही शासन करण्याची आज्ञा पेशवे दरबारने दिलेली नाही.
=================================================      ९३२ ( १०९३ )                   अर्बा तिसैन मया व अलफ जमादिलावल १७
केशवराव जगन्नाथ यांचे नावे की, तुम्ही विनंतीपत्र पाठविले ते प्रविष्ट जाहले. केदारी मांग, वस्ती मौजे कल्याण, घेरा किल्ला सिंहीगड, याचे घरी येश्या व अंबऱ्या मांग, वस्ती मौजे किकवी, तर्फ खेडेबारे हे चार महिने येऊन राहिले होते, त्यास तिघां मांगांनी छ १० रविलावली धोंडजी करजवणा, याची गाय मोगरवाडीचे रानांतून गुरांतील धरून आणून कल्याणचे रानांत दिवसास बांधोन ठेऊन, सायंकाळी तिघां जणांनी सुरा व कुराड विळे वस्त्र्याने जिवे मारली. त्याचे चौकशीस किल्ले मजकुरीहून शिपाई, व कल्याणकर पाटील व बेरड पाठविले. जाग्याचा थांग मोघमदऱ्यात लागला, सबब कल्याणकर महाराचे घरातील झाडे घेऊन, मांगाचे घरांत गेले तो केदाऱ्या मांग याचे घरांत मुद्दा सांपडला, सबब घर जफ्त करून तिघे मांग किल्यास आणून चौकशी करितां कबूल जाहले. त्यांची जबानी लिहोन घेतली. तिची नक्कल पाठविली आहे. मांगांचा अपराध थोर आहे. पारपत्याची आज्ञा जाहली म्हणोन, तपसीले लिहिले ते कळले. त्यास मांगांनी गाईचा वध केला, सबब सदरील तीन असामींचे उजवे हात तोडून सोडून देणे म्हणोन छ. ९ रबिलाखर                                                                                    सनद १
रसानागी, त्रिंबक नारायण
विश्लेषण :-  सिंहगड किल्ल्यानजीक एका वस्तीवरील मांग जातीच्या लोकांनी गाईची हत्या केली. याविषयीचे वृत्त समजताच स्थानिक अधिकाऱ्यांनी चौकशी करून गुन्हेगार मांगांना अटक केली व त्यांच्यावर काय कारवाई करायची याविषयी पेशवे दरबारकडे आज्ञा मागितली. दरबाराने, मांगांचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचे आहे असे सांगून गुन्हेगार व्यक्तींचे उजवे हात तोडून त्यांना सोडून देण्याची आज्ञा फर्मावली.
=======================================================
१११७ ( ५१६ )                        समान सबैन मया व अलफ सवाल ३०
रामा कानडा जातीचा ब्राम्हण म्हणवितो, परंतु पुण्यात गाईंची पुच्छे तोडली वगैर उपद्रव केले, प्रायश्चित्त योग्य नव्हे, सबब किल्ले कोहज येथे अटकेस ठेवावयासी बेडीसुद्धां पाठविला आहे, तरी पायांत बेडी घालून पोटास कोरडा शेर देऊन पक्क्या बंदोबस्ताने अटकेत ठेवणे म्हणोन, भिकाजी गोविंद यांस छ. १२ रमजान         सनद १
रसानागी यादी
विश्लेषण :- पुण्यातील रामा नामक ब्राम्हणाने गाईंच्या शेपट्या कापणे वगैरे कृत्ये केली. त्यास, या गुन्ह्याबद्दल प्रायश्चित्त देणे योग्य न वाटून पेशवे दरबारने कोहज किल्ल्यावर पायांत बेडी घालून त्यास कैदेत ठेवण्याची आज्ञा दिली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
     सवाई माधवराव पेशव्याच्या काळातील न्यायविषयक ३ प्रकरणे या ठिकाणी दिलेली आहेत. तिसरे प्रकरण वजा करता पहिल्या दोन प्रकरणातील गुन्ह्याचे स्वरूप सारखेच आहे. दोन्ही ठिकाणी गाईंचा वध करण्यात आलेला आहे हे उघड आहे. परंतु पहिल्या प्रकरणातील महार गुन्हेगारांची जमीन जप्त करण्यापलीकडे त्यांना कसलीही शिक्षा ठोठावण्यात आली नाही तर दुसऱ्या प्रकरणातील मांग गुन्हेगारांचे उजवे हात तोडण्याची शिक्षा फर्मावली आहे. दोन्ही ठिकाणी गुन्हा एकच आहे. गायींची हत्या झाली हे उघड. पण हि कशासाठी झाली याची स्पष्टता केलेली नाही. एखाद्याचे आर्थिक नुकसान करण्याच्या हेतुस्त्व वरील कृत्ये घडली आहेत का ? किंवा निव्वळ उदरभरणास्तव हे कार्य करण्यात आले आहे का ? याची उकल होत नाही. पण एक आहे कि, एकाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी दोन वेगवेगळ्या जातीतील लोकांना वेगवेगळ्या प्रकारची शिक्षा करण्यात आली. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, दुसऱ्या प्रकरणात — सिंहगड जवळील वस्तीवरील मांग गुन्हेगारांच्या प्रकरणात — प्रथम संशय महार लोकांवर घेण्यात आला होता. महार वस्तीची झडती घेतल्यावर मगच मांग वस्तीवर धाड टाकण्यात आली होती. याचा अर्थ काय घ्यायचा हेच या ठिकाणी स्पष्ट होत नाही.
तिसरे प्रकरण पहिल्या दोन प्रकरणांपेक्षा बरेचसे वेगळे आहे. रामा कानडा नामक ब्राम्हण गाईंच्या शेपट्या कापत असल्याचा उल्लेख आहे, त्याशिवाय “ … गाईंच्या शेपट्या कापणे वगैरे कृत्ये ….” हि वाक्ये महत्त्वाची आहेत. याचा अर्थ असा होतो कि, रामाने केवळ गाईंच्या शेपट्या न कापता त्यांना इतर प्रकारेही उपद्रव दिला होता. आता तो उपद्रव कोणत्या स्वरूपाचा होता किंवा त्याने काय केले याची स्पष्टता या ठिकाणी केलेली नाही. त्याच्या या गुन्ह्याबद्दल त्याला पायात बेडी घालून कोहज किल्ल्यावर त्याची रवानगी केली. कदाचित, रामा हा मानसिक रुग्ण आहे या कारणास्तव त्याला काहीशी सौम्य शिक्षा देण्यात आली असावी.

     संदर्भ ग्रंथ :-     सवाई माधवराव पेशवे यांची रोजनिशी ( निवडक उतारे, अंक – ३ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: