शुक्रवार, २२ फेब्रुवारी, २०१३

मारुती लबाड आहे !

             स. १८४८ मधील सांगलीच्या चिंतामणराव आप्पा पटवर्धन यांच्या दिनचर्येतील एक चमत्कारी अशी नोंद नुकतीच माझ्या वाचनात आली. ती नोंद कशाबद्दल आहे हे सांगण्याआधी हे चिंतामणराव पटवर्धन कोण याची आधी वाचकांना थोडक्यात ओळख करून देतो. थो. माधवराव पेशव्याच्या काळात पटवर्धनांचे घराणे खऱ्या अर्थाने उदयास आले. नानासाहेब पेशव्याच्या काळात पटवर्धन सरदारकी करत होतेच पण माधवरावाच्या कारकिर्दीत त्यांच्या पराक्रमास जसा वाव मिळाला तसा नानासाहेब पेशव्याच्या काळात मिळाला नव्हता. पटवर्धन सरदार घराण्याच्या आद्य पुरुष वा संस्थापक म्हणून हरभट बाबा पटवर्धनाचा उल्लेख मिळतो. या हरभटाला सात मुले. त्यापैकी चार मुले पेशव्यांच्या चाकरीत कारकुनी व शिपाईगिरीच्या पेशात शिरली. त्यापैकी गोविंदपंत पटवर्धनास चार मुले असून त्यापिकी पांडुरंगराव पटवर्धन हा एक होय. याच पांडुरंगरावाचे दुसरे अपत्य म्हणजे चिंतामणराव पटवर्धन. चिंतामणराव पटवर्धन हा उत्तर पेशवाईत बाजीरावाचा विरोधक आणि नाना फडणीसाचा समर्थक म्हणून ओळखला जातो. दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांशी तैनाती फौजेचा तह केल्यावर पटवर्धन प्रभूती सरदार इंग्रजांच्या कलाने वागू लागले. बाजीरावास हे सहन झाले नाही. इंग्रजधार्जिण्या आपल्या सरदारांना या ना त्या निमित्ताने त्याने त्रास देण्यास आरंभ केला. तेव्हा इंग्रजांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील भांडण मिटवले पण सोबतीला बाजीरावाच्या सरदारांवरील आपला प्रभाव देखील वाढवला. तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धात आरंभी चिंतामणराव आप्पा बाजीरावाच्या सोबत होता पण नंतर लवकरच त्याने इंग्रजांचा पक्ष घेऊन युद्धातून अंग काढून घेतले. परिणामी पेशवाई संपुष्टात आल्यावर आप्पाला सांगलीचे संस्थान मिळाले. संस्थानिक म्हणून त्यास इंग्रज सरकारने मान्यता दिली. स. १८१८ मध्ये पेशवाई नष्ट झाल्यामुळे या सरदारांना / संस्थानिकांना आता फारसे काही स्वातंत्र्य शिल्लक राहिले नव्हते व मोहिमा – स्वाऱ्याची दगदग देखील राहिली नाही. त्यामुळे चिंतामणरावच्या या रोजनिशीमध्ये फारशी काही महत्त्वाची माहिती मिळतच नाही. मात्र एक चमत्कारी नोंद वाचनात आली ती सर्वसामान्य वाचकांना माहिती असावी यासाठी या ठिकाणी प्रसिद्ध करीत आहे.
                  
     छ. १७ जमादिलावल चैत्र व|| शनिवार सांगली
खाशास आज बराच ज्वर आला. प्रकृत हल्लक झाली आहे.
ब्रह्मनाळास श्री. स्वामी आनंदमूर्ती यांचे वृंदावनाचा डोल होतो म्हणून काल समजले त्याजवरून स्वार पाठविला तो आज उत्तर आले त्यांत डोल आज पांच दिवस पौर्णिमापासून होत आहे म्हणोन लिहून आले.
ऐकीव वर्तमान, मेहरबा अंडरसनसाहेब जमखिंडीस होते तेव्हा जमखिंडीजवळ कलहळी म्हणोन गांव आहे तेथे श्री. मारुती जागृत आहे त्याजवळ एक विहीर आहे त्या विहिरीस गांवातील ब्राह्मणाची बायको पाण्यास आली तिने नाकातील नथ काढून चूळ भरली नंतर माघारी जाताना नथ विसरली. कोणी पळविली. साहेब रपोर्टास गेले होते ते त्या विहीरीपाशी गेले होते त्यास ती नथ दृष्टीस पडली त्यानीं उचलून चपराशाजवळ दिली इकडे नथ हरवल्या बाईने दुसऱ्या बाईने नथ चोरल्याचे किटाळ घेऊन मारुतीस कौल लावला कौल चार वेळा लावला त्यांत दुसऱ्या बायकोने नथ उचलली असा आला म्हणोन ती बाई तिच्या गळ्यांत पडली अखेर फिर्याद साहेबाकडे गेली साहेब म्हणाला मारुती लबाड आहे मी नथ उचलली असतां या गरीब बाईवर तुफान घेऊन कौल देतो म्हणून रागास येऊन श्रीची पूजा वगैरे बंद करून कवाडसा कुलूप घालून त्या कुलपास बेडी लोखंडी घातली आणि श्रीस नैवद्याबद्दल तीन पैसे देऊन त्याकडिल जमीन वगैरे नेमणूकीची जप्ती केली !  

संदर्भ ग्रंथ :-     ऐतिहासिक संकीर्ण साहित्य
१२ वा खंड
श्रीमंत चिंतामणराव आप्पा पटवर्धन यांची दिनचर्या
संपादक :- श्री. यशवंत नरसिंह केळकर

1 टिप्पणी:

GANESH GOLE म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.