सोमवार, १८ फेब्रुवारी, २०१३

आगऱ्याहून सुटका भाग - २

जु. ९ सफर २९                                   श. १५८८ श्रावण वद्य ३०
( २८ ) सोम.                                     इ. १६६६ ऑगस्ट २०
फौलादखानाने अर्ज केला कीं, ‘ सीवाच्या सोबत्यांपैकी राघोजी वगैरे पाच लोक कैदेत आहेत ; ते सांगतात कीं, , मिर्झा राजा जयसिंगाने कुंवर रामसिंगास लिहिले होते कीं, “ समजेल त्या मार्गाने सीवाला तेथून काढावे व हरसतराय हरकारा यास देखील याबद्दल माहिती आहे.” हरकाऱ्याच्या दारुग्यावर अअतमादखानास नेमिले व केसोजी वगैरेंना त्याच्या हवाला केले.’ मिर्झाराजाच्या वकिलास घुसलखाना मना केला. बादशाहाने मुहम्मद अमीनखानास हुकूम केला कीं, ‘ कुंवरसिंगास लिहावे कीं, दरबारांतून जाऊ नये.’ फौलादखानास हुकूम केला कीं, ‘ रामसिंगाच्या तंबूजवळ व हरसतरायापाशीं पाहारा बसवून सावध राहावे.’ खालील लोकांची मनसब बडतर्फ केली. कुंवर रामसिंग चार हजार स्वार बडतर्फ, हरसतराय असल ४०० व ५० अनुक्रमे १०० व २० कमी, हरसताचा नातलग किसनराय ३०० बडतर्फ.
=============================================================
जु. ९ सफर २९                                श. १५८८ श्रावण वद्य ३०
( २८ ) सोम.                                   इ. १६६६ ऑगस्ट २०
  मिर्झा राजा जयसिंग याच्या नांवे बादशाही फर्मान सादर झाला कीं, ‘ तू हर प्रयत्नाने सीवा मजकुरास ताब्यांत आणून हुजूर पाठविलेस व बादशाहाने कुंवर रामसिंगास अत्यंत विश्वासू व भले चिंतणारा समजून सीवा मजकुरास त्याच्या हवाली केले होते. पण कुंवरने कल्याणेच्छा व सेवा यांजकडे दुर्लक्ष करून त्याची तरफदारी करून त्यास कपटाने येथून पळून जाऊ दिले. म्हणून मला वाटते कीं, रामसिंगास त्याच्या अपराधाबद्दल योग्य ती शिक्षा करावी. त्यास दृष्टीआड करून शहरांत फिरवणार होतो. परंतु तुझी एकनिष्ठ सेवा आड आली. मुलाच्या अपराधाबद्दल तुला शिक्षा थोडीच मिळाली ? याबद्दल परमेश्वराचे आभार मानावे.’ नंतर हा फर्मान अअतमादखानाच्या हवाला करून चौकीच्या डाकेने पाठविण्यास सांगितले.
===========================================================
जु. ९ सफर ३०                                        श. १५८८ भाद्रपद शुद्ध २
( २९ ) मंगळ.                                          इ. १६६६ ऑगस्ट २१
जुम्दतुल्मुल्कास हुकूम केला कीं, ‘ सीवाच्या पाहऱ्यावर मनसबदार, बर्कंदाज, बंदूकची व खासखेल कोणकोण होते त्यांची नांवे कळवावी.’
==============================================================
जु. ९ रवल २                                श. १५८८ भाद्रपद शुद्ध ४
गुरु.                                        इ. १६६६ ऑगस्ट २३
नरवरचा ( बरोरचा ) फौजदार इबादुल्लाहखान याची अर्जदाश्त आली. तींत लिहिले होते कीं, ‘ संध्याकाळच्या नमाजाच्या वेळी सीवा पाच स्वारांसह या वाटेने गेला. विचारले तेव्हां त्याने सांगितले कीं, “ आम्ही सीवाचे लोक आहों.” त्यांनी मुहम्मद अमीनखानाच्या शिक्क्याचा दस्तक दाखविला. त्यानंतर त्याने जाहीर केले कीं, ‘ आम्ही सीवाच आहों.’ परंतु समजले नाही. हुकुम केला कीं, ‘ इबादुल्लाहखानाने अत्यंत गैर गोष्ट केली ; त्यांचा पाठलाग केला नाही व दस्तकही नीट तपासले नाहीं.’
 ===============================================================
जु. ९ रवल                                          श. १५८८ भाद्रपद शुद्ध ४
गुरु.                                                इ. १६६६ ऑगस्ट २३
( १ ) बादशहाकडे अर्ज आला कीं, ‘ उदीतसिंग भदूरियाने सीवाच्या चाकरांना पकडून पाठविले आहे.’ हुकूम झाला कीं, ‘ त्यांना अअतमादखानाच्या ताब्यांत द्यावे म्हणजे तो त्यांना हुजुरांसमोर आणील.’
( २ ) मुहम्मद अमीनखानास हुकूम केला कीं, ‘ या पूर्वी तू सीवा मकहूर अतिशय विश्वास दाखविणारा पण हरामजादा आहे असा अर्ज केला होतास. त्यावेळी बादशाहांनी त्यावर विश्वास ठेविला नव्हता ; परंतु ते आतां खरे झाले.’
================================================================
जु. ९ रवल ४                                  श. १५८८ भाद्रपद शुद्ध ६
शनि.                                         इ. १६६६ ऑगस्ट २५
मिर्झा राजा जयसिंगाच्या मरातिबाविषयी विचारले असतां त्यावर जाफरखानाने अर्ज केला कीं, ‘ आपण मिर्झा राजाच्या मरातिबाबद्दल विचारले ; पण तो बेकसूर आहे. तेव्हां त्याची मनस्थिती द्विधा होईल हेंही आपण जाणता.’ तेव्हा बादशाहने मिर्झा राजा जयसिंगाच्या नावाने पुढील आशयाचे फर्मान लिहावे असें सांगितले – ‘ सीवा येथून पळाला तो जाणून बुजून रामसिंगाच्या इशाऱ्याने पाळला आहे. या फितुरांत रामसिंगाचा हात आहे. तरीही तुझ्यासाठी दुर्लक्ष केले आहे. तुझे वतन तुजकडे ठेवतो. तू सीवाच्या बाबतीत खबरदार असावे. तो असेल तेथून त्यास कैद करावे. तेथील बंदोबस्ताविषयी अत्यंत तत्पर राहावे.’
=================================================================
जु. ९ रवल ५                                         श. १५८८ भाद्रपद शुद्ध ७
रवि.                                                इ. १६६६ ऑगस्ट २६
फौलादखानास हुकूम झाला होता कीं, ‘ सीवाच्या जवळपासच्या चौक्यांचे नकाशे काढून नजरेखालून घालावे.’ त्याने हुकूमाप्रमाणे नकाशे काढून बादशाहच्या नजरेखालून घातले. [ व म्हटले ] ‘ आंतील चौकीत रामसिंगाचे व बाहेरील ( चौकीत ) माझे लोक होते, यावर बादशाह गप्प बसला.
 ==================================================================
जु. ९ रवल ५                                        श. १५८८ भाद्रपद शुद्ध ७
रवि.                                                इ. १६६६ ऑगस्ट २६
बादशाहाने हाफिज रहीमुद्दिन यास हुकूम केला कीं, ‘ घुसलखान्याचा मुश्रीफ राय ब्रिंदाबन व कुंवर रामसिंग यांस समोर आणावे.’ [ ते आले ] व त्यांनी पाच मोहरा नजर केल्या. ‘ सीवाची हकीकत सांगा ‘ असा हुकूम झाला. तेव्हां त्याने अर्ज केला कीं, ‘ राय मजकूर विनंती करीत आहे कीं, ‘ ह्या बंद्यास माहिती असती तर ती याने अगोदरच जाहीर केली असती.’ हुकूम झाला कीं, ‘ अशा प्रकारची बातमी त्या बिचाऱ्याशी कशाला बोलेल ?’
======================================================================
जु. ९ रवल ७                                    श. १५८८ भाद्रपद शुद्ध ९
मंगळ.                                          इ. १६६६ ऑगस्ट २८
( २ ) सलीमबेग गुर्जबर्दार याने मिर्झा राजा जयसिंगाकडून येऊन भेट घेतली. पाच रुपये नजर व मिर्झा राजाची अर्जदाश्त नजरेस आणली. बादशाहाने स्वतः ती पाहिली. शाहजादा सुलतान मुअज्जम यासही अर्जी दाखविली. त्यावर हुकूम झाला कीं, ‘ बख्तावरखानाच्या हवाला करावी. मुहम्मद अमीनखानास गुर्जबर्दारांना तोंडी विचारण्यास सांगितले. त्याप्रमाणे विचारून अर्ज केला कीं, ‘ नेकनामखान वगैरे विजापुरी लोकांनी तहाची बोलणी केली आहेत, परंतु बादशाही हुकूम नसल्याने तह केला गेला नाही. सेवक ( मिर्झा राजा ) नर्मदेच्या ( भिंवरेच्या ) कांठी आला ( तेव्हां ) सीवा मकहूराच्या पलायनाची बातमी आली. ठिकठिकाणी वाटेवर सीवाच्या लोकांना कैद करीत आहे.’ हे ऐकून बादशाह गप्प बसला.
=================================================================

जु. ९ रवल ७                                  श. १५८८ भाद्रपद शुद्ध ९
मंगळ.                                        इ. १६६६ ऑगस्ट २८
सलीमबेग याने मिर्झा राजाची अर्जदाश्त आणली ती आजूर ( महिन्याच्या ) १२ तारखेस बादशाहाच्या नजरेखाली घातली. त्यांत लिहिले होते कीं, ‘ विजापूरच्या वकिलांनी तहाचे बोलणे केले कीं, ‘ मंगळवेढ्याच्या हद्दीतील एक परगणा देऊ ; पण रोख रकमेच्या ऐवजी दुसरा परगणा देणार नाही. पावसाळयानंतर लढाई करू इच्छितात.’ त्यावर हुकूम झाला कीं, ‘ मिर्झा राजास हुकूम गेला आहे कीं, ज्याने चांगले होईल तें करावे.’ व सलीमबेगास हुकूम केला कीं, ‘ सीवाबद्दल कांही बातमी आणलीस का ?’ तो म्हणाला ‘ सीवा अलीकडे नर्मदेवर आल्याची खबर समजली होती. परंतु तो दिसला नाही. त्याच्या लोकांना वाटेत कैद केले जात आहे.’ अर्ज शाहजाद्यासही दाखविला.
========================================================================
जु. ९ रवल ८                                      श. १५८८ भाद्रपद शुद्ध १०
रवि.                                             स. १६६६ ऑगस्ट २९
फिदाईखान याने अर्ज केला कीं, ‘ धोलपूर परगण्याच्या जागीरीतून महाबतखानाच्या गुमास्त्याने मला पत्र लिहिले कीं, “ अली आदिल विजापुरी याचे दोन वकील जुम्दतुल – मुल्काचा निरोप घेऊन इकडे आले होते. तसेच सीवाचे तीन नोकर होते.” [ दोन पांढऱ्या पोषाखांतील व एक संन्यासी ] व त्यांच्याबरोबर पाच घोडे होते.” वकिलांनी जाहीर केले कीं, ‘ प्रतीतराय याने पाच घोडे व हे लोक यांस विजापुरास पोचवावे असे सांगितले. म्हणून त्या लोकांना कैद केले. ‘ कुंवर रामसिंगाची इच्छा आहे कीं, ‘ चंबळ नदी ओलांडून त्या लोकांस कैद करावे. परंतु हुकूम नसल्यामुळे त्यास नदी पलीकडे जाऊ दिले नाही. हुकूम व्हावा.’ यावर हुकूम झाला कीं, ‘ त्यास हस्बुलहुकूम लिहावा कीं, त्यांना दरबारकडे पाठवावे.’
=======================================================================
जु. ९ रवल ९                                      श. १५८८ भाद्रपद शुद्ध ११
गुरु. ( सोम )                                      इ. १६६६ ऑगस्ट ३०
( १ ) मुहम्मद आकिल व मीर रुस्तुम गुर्जबर्दार यांनी माळव्याचा सुभेदार तू ( लो ) दीखान यास हस्बुलहुकूम आणला कीं, ‘ सीवा येथून पळून गेला आहे त्याने सावध रहावे व त्यास कैद करावे.’ आतां खान मजकूर याच्या हस्बुलहुकुमाप्रमाणे अर्ज आला व तो नजरेखालून गेला. त्यांत लिहिले आहे कीं, ‘ बादशाही हुकुमाप्रमाणे दिसेल तेथे सीवा मकहूरास पकडावे म्हणून ताकीद देऊन माझ्या लोकांना मी धाडले आहे. आतापर्यंत तो कोठेंही दिसला नाही. ते त्याच्या लोकांना वाटेत ठिकठिकाणी कैद करीत आहेत. ऐकून बादशाह गप्प बसला.
( २ ) मुहम्मद आकिल व रुस्तुमबेग गुर्जबर्दार यांस हुकूम झाला होता कीं, ‘ तुम्ही सीवाला ओळखता. नर्मदेपर्यंत जाऊन ठिकठीकाणी चौकशी करावी.’ कांही दिवसांनी पात येऊन त्यांनी अर्ज केला कीं, ‘ नर्मदेच्या जमुल्याच्या गुजरपट्टीपर्यंत त्याचे काहींच चिन्ह दिसले नाहीं. त्याचे लोक ठिकठिकाणी कैद होत आहेत.’ उज्जैनचा सुभेदार वझीरखान याची अर्जदाश्त नजरेखालून गेली. तींत लिहिले आहे कीं, ‘ आम्हास सीवा मकहूराची खबर मिळाली. आम्ही ठिकठिकाणी बातमीदार ठेविले आहेत.’
( ३ ) धोलपुरांतील महाबतखानाच्या लोकानी सीवाचे दोन नोकर व पाच अरबी घोडे पकडले आहेत. हुकूम झाला कीं, ‘ त्यांस हुजूर पाठवावे.’
===========================================================================
जु. ९ रवल ११                                    श. १५८८ भाद्रपद शुद्ध १३
शनि.                                                  इ. १६६६ सप्टेंबर १
फिदाईखानाने अर्ज केला कीं, ‘ धोलपूर परगण्यांतील महाबतखानाच्या गुमास्त्यांनी हस्बुलहुकुमाप्रमाणे विजापुरी वकील व सीवाचे नोकर यांना कैद करून पाठविले आहे. हुकूम व्हावा.’ हुकूम झाला कीं, ‘ सीदी फौलादखानाच्या हवाला करावे.’
=====================================================================
जु. ९ रवल २३                                     श. १५८८ भाद्रपद वद्य १०
गुरु.                                                     इ. १६६६ सप्टेंबर १३
दक्षिणच्या वाक्यावरून समजले कीं, सीवा मकहूराचे कांही लोक लूटमार करण्याची इच्छा करतात. तेव्हां जुम्दतुल्मुल्कास हुकूम झाला कीं, ‘ मिर्झा राजास हस्बुलहुकूम लिहावा कीं, ‘ “ तिकडील अखत्यार तुजवर आहे. तिकडील बंदोबस्ताबद्दल सावध असावे.” ‘
===========================================================================
जु. ९ रखर ७                                    श. १५८८ आश्विन शुद्ध ९
इ. १६६६ सप्टेंबर २६
( १ ) दिलेरखानाने अर्ज केला होता कीं, हुजूर येण्याचा हुकूम मिळाला. मिर्झा राजा निरोप देईल तेव्हां हुजुरास रवाना होईन.
( २ ) मिर्झा राजाने अर्ज केला होता कीं, सीवा [ अजून ] आपल्या मुलखांत पोचलेला नाही. नेतोजीस कैद केले. [ बादशाह ] आनंदी झाला. रामसिंगाचे मानमरातब बादशाहाने मागवले.
=========================================================================
जु. ९ रखर १५                                       श. १५८८ आश्विन वद्य १
गुरु.                                                इ. १६६६ ऑक्टोबर ४
सुरतेचा फौजदार गियासुद्दीनखान याने अर्ज केला होता कीं, सीवा इकडे दिसला [ नाही ].
===========================================================================
जु. ९ रखर १८                                     श. १५८८ आश्विन वद्य ४
रवि.                                                   इ. १६६६ ऑक्टोबर ७
फौलादखानाने अर्ज केला कीं, सीवाचे घोडे, हत्ती, नकद व जिन्नस जप्त केले आहेत. हुकूम झाला कीं, बैतुलमालामध्ये दाखल करावे.
===========================================================================
जु. ९ जवल १६                                      श. १५८८ कार्तिक वद्य ३
रवि.                                                      इ. १६६६ नोव्हेंबर ४
  दख्खनकडील वाक्यावरून समजले कीं, ‘ सीवा राजगडास आपल्या मुलासह पोहचला. त्याचा मुलगा ……… आजारी होता तो मेला. त्याने ( सीवाने ) मिर्झा राजस लिहिले कीं, तुमच्या शब्दावरून मी हुजुरास गेलों होतो. परंतू स्वतःचे भले न दिसल्यामुळे उठून निघून आलो. मिर्झा राजाने कांहीही उत्तर दिले नाही.
===================================================================
जु. ९ जवल २७                                      श. १५८८ कार्तिक वद्य १४
गुरु.                                                    इ. १६६६ नोव्हेंबर १५
औरंगाबादेच्या वाक्यावरून समजले कीं, सीवाच्या घरी मुलगा जन्मला व तो स्वतः आजारी आहे.
========================================================================
जु. ९ जखर ३०                                       श. १५८८ पौष शुद्ध २
सोम.                                                     इ. १६६६ डिसेंबर १७
  मुहम्मद अमीनखानास हुकूम झाला कीं, मिर्झा राजा जयसिंगास इतराजीचा हस्बुलहुकूम लिहावा कीं, ‘ सीवा पोचल्याची बातमी भागानगरच्या वाक्यावरून समजली. तुम्ही व वाकेनवीस यांनी मात्र कांहीच लिहिले नाही. आतां तिकडील हकीकत तपशीलवार लिहित जावी.’
=========================================================================
जु. ९ रज्जब २४                                   श. १५८८ पौष वद्य ११
गुरु.                                                    इ. १६६७ जानेवारी १०
    बेगमसाहेबास हुकूम झाला कीं, ‘ मीर्झा राजा जयसिंगाच्या मामाने लिहिले आहे कीं, सीवा स्वतःच्या मुलखांत पोंचला. तो राजाच्या इशारतीवरून गेला आहे. [ त्याचा ] एकनिष्ठपणा उघड झाला.’
========================================================================
जु. ९ शाबान ५                                     श. १५८८ माघ शुद्ध ६
सोम.                                                  इ. १६६७ जानेवारी २०
शाही फेरफटक्याच्या शेवटी ताहिरखानाने अर्ज केला कीं, ‘ मिर्झा राजा जयसिंग हा चांगला सरदार आहे. त्याने दक्षिणेत कामगिरी केली आहे. कुंवर रामसिंगाबाबत बादशाहानी मेहेरबानगी करावी.’ हुकूम झाला ‘ आम्ही त्याजवर विश्वास टाकला व सीवास त्याच्या हवाली केले.’ त्यावर त्याने पुन्हा अर्ज केला कीं, ‘ हा घरचा आनुवांशिक चाकर आहे.’ हुकूम झाला कीं, कांही दिवसांनंतर विचार करून सांगूं.
=======================================================================
जु. ९ शाबान १४                                      श. १५८९ माघ शुद्ध १५
सोम. ( मंगळ )                                       इ. १६६७ जानेवारी २९
    दख्खनच्या वाक्यावरून समजले कीं, सीवाचा नातेवाईक महादजी हा किल्ले चमारगोंदा वगैरेच्या आसपासचा प्रदेश लुटून घेऊन गेला. हुकूम झाला कीं, ‘ इराणच्या मोहिमेनंतर त्याकडे लक्ष देऊं. हे सर्व बंड मिर्झा राजाच्या माहितीने चालले आहे.’ बादशाहाने इतराजी जाहीर केली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: