बुधवार, ६ फेब्रुवारी, २०१३

उत्तर पेशवाईतील जातीय व्यवस्था


         मुतालिक ह्यांचे रोजनिशीपैकी
९५६ ( ३ )                  खमस सबैन मया व अलफ रमजान २२
श्रीसिद्धेश्वर महादेव, वास्तव्य कसबे पैठण, येथे देवालयांत श्रीचे पुजेची उपकरणे, व वस्त्रे, व पूजेचे साहित्य नेहमी असते, व देवालयांत रात्री गरीब वाटसरू वगैरे राहतात ; याजकरितां देवालयाजवळ रात्रीस चौकी पाहारा नेहमी ठेवावयाचा करार करून हे सनद तुम्हांस सादर केली असे, तरी परगणे मजकूरचे नेमणूकचे प्याद्यांपैकी दोन मराठे व दोन महार एकूण चार असामी श्रीचे देवालयाजवळ चौकीस रात्री दररोज देऊन चौकी पाहारा करवीत जाणे म्हणोन, कमावीसदार वर्तमान, व भावी परगणे पैठण यांस.             सनद १.
रसानगी यादी.
————————————————————————————————

हरी बल्लाळ यांच्या कीर्दीपैकी
११२९ ( ८४१ )                  अर्बा समानीन मया व अलफ जमादिलावल ५
श्री पांडुरंग क्षेत्र पंढरपूर येथे श्रीच्या देवालयांत मर्यादा येणेप्रमाणे कलम. बीतपशील.
श्रीदेवाचे दर्शनास येतात त्यांणी त्यांणी देवास भेटो नये. पूजने करून सिंहासनावर मस्तक ठेऊन नमस्कार मात्र करावा.            कलम १
देवापुढील तृतीय मंडपांत दक्षणेकडे द्वार आहे. परंतु यात्रेचे दाटीमुळे अंधःकार पडतो, त्यास उत्तरेकडे प्राचीन द्वार होते ते बुजवोन, तेथे हणमंताची मुहूर्त { मूर्ती } ठेविली आहे ते काढून देवालयांत ठेऊन द्वार मोकळे करून, तेथे जाळी मातबर थोर भोकाची देवालयांत उजेड पडोन वाराही पुष्कळ येईल अशी नवी दगडाची करून लावावी.                                             कलम १
आषाढी कार्तिकेचे यात्रेंत दाटी बहुत माणसांची होते. एकाच द्वाराने जाण्या – येण्याचे दाटीमुळे माणसे दुखावतात, व मरतात. यास्तव यात्रेचे दिवसांत पूर्व द्वाराने दर्शनास जाणाराने जावे, देवदर्शन करून दक्षण द्वाराने बाहेर निघावे ; पूर्व द्वाराने बाहेर जाऊ नये येणेप्रमाणे.                      कलम १
 देवालयाचे बाहेर चोखामेळ्याचा दगड उत्तरेचे आंगे आहे, तेथे अतिशूद्र दर्शनास येतात. जागासंकोच गलीची आहे. तेथे जाणारां येणारांस स्पर्शास्पर्श होतो. हे ब्राम्हणांस विरुद्ध. यास्तव अतिशूद्रांनी चोखामेळ्याचे दीपमाळेजवळ अथवा महारवाड्यांत असेल तेथे पुजा करीत जावी. देवालयाजवळ अतिशूद्रांनी येऊ नये. कोणी आला तरी पारिपत्य करावे.                        कलम १
गर्भागारापुढील दुसरे मंडपाचे द्वार आहे, तेथे बाहेरचे फरसापेक्षां उंबऱ्यातील फरस नीच आहे, त्यास यात्रेचे दाटीमुळे अंधकार पडतो, याजमुळे बाहेरून आंत येणारास हिसका बसोन माणसे पडतात. यास्तव बाहेरील फरसाबरोबर आंतील फरस उंच, हिसका माणसास न बसे असा, करावा.                कलम १
देवाचे पुढील दुसऱ्या मंडपांत अंधःकार विशेष पडतो, याजमुळे यात्रेकराची वस्तभाव उचलोन नेतात, याजकरतां मंडपाचे वरील छतास हमचौरस अदगजाचे गवाक्षे पाडून, पर्जन्यकाळी गवाक्षाने पावसाचे पाणी आंत न पडे असा बच्याव करून उजेड मंडपांत पडे असे करावे.                           कलम १
 देवदर्शनास मातबर येतात त्यांजबरोबर यवन येतात ते प्राकारांत { प्राकार – हद्दीची भिंत } जातात, याजमुळे अनाचार होतो तो अयोग्य. याजकरितां मुसलमानाने नामदेवाचे पायरीस स्पर्श करू नये, व दुसऱ्याही प्रकाराने मुसलमान आंत जाऊ नये. कोणी गेला तर पारिपत्य करून गुन्हेगारी घ्यावी. येणेप्रमाणे.
कलम १
येणेप्रमाणे सात कलमे करार करून पाठविली आहेत, याप्रमाणे बंदोबस्त करावयास चिंतो रामचंद्र कमावीसदार क्षेत्र मजकूर, दिंमत परशराम रामचंद्र, यांस आज्ञा केली आहे, तरी सरकारचे खास बारदार पाठविले आहेत, त्यांचे गुजारतीने सदरहू लिहिल्याप्रमाणे बंदोबस्त करणे म्हणोन.               जाबता १
सदरहू अन्वये कमावीसदार मजकूर यांस                सनद १
                                                                                                                                             ———–
                                                                                                                                                    २
                                                                                                                                            रसानगी यादी.


विश्लेषण :- सवाई माधवराव पेशव्याच्या रोजनिशीमधील या दोन नोंदी या ठिकाणी प्रसिद्ध केल्या आहेत. या दोन्ही नोंदींवरून तत्कालीन समाजस्थिती, विशेषतः जातीव्यवस्थेविषयी म्हटले तर बऱ्यापैकी माहिती मिळते आणि म्हटले तर माहितीचा गोंधळ होतो. पहिल्या नोंदीनुसार, पैठण येथील शिवमंदिराच्या संरक्षणास्तव सराकरने चार पहारेकरी नेमण्याची सूचना केली आहे. या ठिकाणी निव्वळ ४ पहारेकरी नेमा असे न सांगता २ मराठा जातीचे व २ महार जातीचे रक्षक नेमावे अशी तपशीलवार आज्ञा दिलेली आहे.
दुसरी नोंद पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराशी संबंधित अशी आहे. या नोंदीनुसार, पांडुरंगाच्या दर्शनास येणारे अतिशूद्र भाविक मंदिराच्या बाहेर असलेल्या चोखामेळ्याच्या दगडापर्यंत ( पायरीपर्यंत ?) येतात. या ठिकाणी जागा अरुंद असल्यामुळे अतिशूद्रांचा ब्राम्हणांस स्पर्श होतो. तेव्हा हे टाळण्यासाठी अतिशूद्रांनी चोखामेळ्याच्या दीपमाळेजवळ किंवा पंढरपुरातील महारवाड्यातील स्थळ ( एखादे विविक्षित ठिकाण ) असेल तेथूनच विठोबाची पूजा करावी असा पेशवे दरबाराचा आदेश आहे. तसेच या आदेशाविरुद्ध देवालयाजवळ कोणी अतिशूद्र गेल्यास त्याचे पारिपत्य करण्याचीही आज्ञा आहे. याच ठिकाणी दाखल घेण्यासारखी दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, विठ्ठलाच्या दर्शनासाठी जे हिंदू मातबर असामी जातात त्यांच्यासोबत मुस्लीम लोकं असतात. हे मुसलमान देवालयाच्या हद्दीच्या भिंतीपर्यंत जातात तर कित्येकदा देवालयानजीक म्हणजे जवळपास नामदेवाच्या पायरीच्या आसपास असे जातात. यामुळे अनाचार होतो तो थांबवण्याच्या दृष्टीने देखील दरबारने आज्ञा दिलेली आहे.
उपरोक्त दोन्ही नोंदींच्या तारखा या ठिकाणी स्पष्ट करणे मला शक्य नाही तरीही, या नोंदी सवाई माधवराव पेशव्याच्या काळातील असल्याने यांचा काल स्वाभाविकपणे स. १७७४ ते १७९५ हा वीस – एकवीस वर्षांचा असल्याचे इतिहास अभ्यासकांना माहिती आहेच. या दोन्ही नोंदींचा अधिक बारकाईने विचार केला असता त्यावेळच्या सामाजिक स्थितीवर थोडा बहुत प्रकाश तर पडतोच पण अनेक शंका निर्माण होऊन गोंधळ देखील उडतो.
१)    पैठण येथील शिवमंदिराच्या रक्षणासाठी जे ४ शिपाई नेमले, त्यातील २ महार आहेत.
२)    पंढरपूरची नोंद लक्षात घेतली तर महारांना मंदिरापर्यंत एका विविक्षित ठिकाणापर्यंतच येण्याची मुभा आहे. अशा परिस्थितीत, पैठण येथील शिवमंदिराचे रक्षण २ महार कसे करणार होते ?
३)    पंढरपूरच्या नोंदीनुसार चोखामेळ्याची पायरी असे ज्यास म्हटले जाते, त्याचा उल्लेख तत्कालीन पद्धतीनुसार ‘ चोखामेळ्याचा दगड ‘ असा केला आहे. समाधीला पेशवेकालीन मुत्सद्दी दगड कधी म्हणू लागले हा एक संशोधनाचा विषय आहे.
४)    पंढरपूरविषयक नोंदीमधील अतिशूद्र कलमाचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास केल्यास असेही लक्षात येते कि, अतिशूद्रांना विठ्ठल मंदिराच्या बाहेरच्या भागात का होईना येण्याची जी मोकळीक होती, ती या आज्ञेने साफ बंद झाली. म्हणजे, पेशवे सरकारच्या या आज्ञेने आता अतिशूद्र लोकांनी विठ्ठल मंदिराजवळ न येता चोखामेळ्याच्या दीपमाळेपासून किंवा तत्कालीन पंढरपुरातील महारवाड्यातील एका विशिष्ट ठिकाणाहूनच आता विठोबाचे दर्शन घ्यावे लागणार होते. याचाच अर्थ असा होतो कि, यापुढे कधीही  अतिशूद्रांना देवदर्शनासाठी चोखोबाच्या पायरीपर्यंत येण्याचा हक्क सांगता येणार नाही !
५)    पंढरपूरविषयी कमालीचे जागरूक असलेले पेशवे सरकार मुस्लिमांच्या विषयी मात्र काहीसे बोटचेपेपणाचे धोरण स्वीकारताना दिसतात. विठ्ठलाच्या दर्शनास येणाऱ्या मातबर हिंदू लोकांसोबत कित्येकदा मुस्लीम लोक देखील येत. त्यापैकी काहीजण मंदिराच्या आवाराची भिंत लागल्यावर त्या भिंतीच्या बाहेर ( सध्याच्या भाषेनुसार ‘ गेटच्या बाहेर ‘ ) थांबत तर काही थेट नामदेवाच्या पायरीपर्यंत येत. तेव्हा याविषयी पेशव्यांनी खूपच जहाल अशी आज्ञा काढली कि, मुसलमानाने नामदेवाचे पायरीस स्पर्श करू नये तसेच दुसऱ्या कोणत्याही प्रकारे / मार्गाने मंदिरात जाऊ नये. मुसलमान आत गेल्यास त्याचा बंदोबस्त करून गुन्हेगारी – अर्थात शिक्षा / दंडाची रक्कम  –– घ्यावी. म्हणजे, विधार्मीय मुसलमानांनी देवालयाजवळ यावे पण नामदेवाच्या पायरीस हात लावू नये आणि स्वधर्मीय अतिशूद्रांनी मात्र देवालयाजवळ येऊ नये ! वाह रे पेशवेकालीन न्याय !!

संदर्भ ग्रंथ :-  सवाई माधवराव पेशवे यांची रोजनिशी ( निवडक उतारे, अंक – ३ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: