Friday, March 31, 2017

भाउ असेल तर पत्र दर्शनी येणे.


    संक्षिप्त परिचय व पार्श्वभूमी :- स. १७५० मध्ये शाहूच्या मृत्यूनंतर सातारच्या गादीवर बसलेल्या रामराजास ताराबाईने कैद करून सर्व सत्ता आपल्या हाती घेत पेशव्याशी विरोध आरंभला. ताराबाईचे राजकारण तसेच थोडेबहुत अंतस्थ कलह यामुळे पेशव्याचे आप्त व सेवक देखील संशयाच्या भोवऱ्यात येऊन पेशवा त्यांच्याविषयी साशंक असल्याचे या पत्रातून दिसून येते.             लेखांक [ ७ ]      श्री     संवत १८०७ पौष्य शुद्ध १०
७२ ]                    [ २७ दिसबर १७५० ]
                      
                         राजश्री जयाजी सिदे गोसावी यांसि.
आसिर्वाद उपरी. राजश्री माहादोबासी ( महादजी अंबाजी पुरंदरे ) आम्हासी विमनस्कता तीन वर्शे आहे. सातारियापासून विशेष वृधी पावली. तुमचे पक्षपातामुले अति कष्टी होते. याजमुले आम्हास हरयेक कामात मुरदाड करावे याची तजवीज रामचंद्र बाबा [ सुखठणकर ] [ सदासिवराव ] भाऊकडे राजकारणे पत्रे जात येत असेत. आम्हापासून हरयेक मसलत पुर्ती पायाशुध सेवटास न जावी या भावे भाउकडेच फौज पाठवावी, आम्हास घरी बसउन गोविदरायाचे आज्ञेत वर्तावे. उमाबाईस ( दाभाडे ) राखावे. ताराबाईसी गोविदरायाचे मारफातीने चढवावे. आम्हावर सर्वाचे उपर राखावे. येसा विचार दिसोन आला. तेव्हा आम्ही भाउस साफ लिहिले की जर भाउ असेल तर पत्र दर्शनी येणे. दाभाडियाकडील काम चांगले करा त्यावरून भिडेस पडून आले. दाभाडियाचे काम रगडून आरंभिले. नासरजंग मेला. जप्ती करावी. दहावीस लाख मेलवावे. सरदारही बोलवावे. हिदायेत मोहिदीखानावर जावे. गरमी दाखउन जे मिलेल ते मेलवावे येसा विचार आम्ही केला. याजमुले बाबानी बहुत वाईट मानून घरास गेले. कोणी म्हणतात की ताराबाईकडे जातील परंतु ते कुलीन जुने चाकर हरामखोरी कधी करणार नाहीत असे वाटते. कालगत मात्र न कले. असो. आम्हासी बाबासी तूट पडली. भाउ अर्ध इकडे अर्धे तिकडे. रामचंद्रबाबा बाह्यात्कारे आम्हाकडे. अंतर्यामी बहुत गुप्त रितीने बाबाकडे. येथे बाहेर तो सर्वत्र दाखवितात की खावंदाची मर्जी तेच प्रमाण परंतु अंतरभाव तुम्ही जाणतच आहा. त्रिंबक विनायेक कोनरपंत हे केवल बाबाचे. गंगोबासी ( गंगाधर चंद्रचूड ) त्यासी राजकारण पूर्ण. येथून मल्हारबास लिहितील की खामखा बाबाचा पक्षपात करून आमचे केल मोडावे. मल्हारबा भोला माणूस खामखा येखादे जागी वचनास गुतल्यास आम्हासी तूट मात्र पडेल. आमचे विचारे चालले तर समजाविसी करावी. चालवावे येसे आमचे मनात आहेच. आता जाहाले तरी बरे. न जाहाले तरी पुढेही जो विचार आमचे मनापासून खुलासियाने ठहरेल तोच सेवटास न्यावा. गंगोबानी त्रिंबक विनायेकाचे मारफातीने लिहिले तर साफ जाब करावा कि खावंदासी आम्ही इरे वाढविणार नाही. एसे साफ बोलावे. जे करणे ते आमचे विचारे करावे. या मजकुरावर मल्हारबास कायेम आगोधर करून ठेवणे. असे असता आम्हासी विरुध करितील तर करोत. आमची तवकल ईश्वरावर आहे. तुमचे भरवसियावर असे केले. [ अपूर्ण ]

संदर्भ ग्रंथ :-
१) शिंदेशाही इतिहासाची साधने ( भाग ३ रा ) :- संपादक - आनंदराव भाऊ फाळके

सहसुभ्याच्या चौथाईची सनद
पत्र क्र. ७८       

तह व करारमदार }                              { Treaties Agreements and Sanads  
पृ. १ }

 [ ही मूळ सनद नव्हे. निजाम उल्मुल्क दक्षिणचा सुभेदार झाला तेव्हा त्याजकडून ही मूळ प्रतीवरून संमत करून घेतलेली आहे. ]

 .... छ २५ रबिलावल सन दोन फई ( हा शब्द लागत नाही ) दसखत जाली त्याचा तपसील :--
" वकील राजे शाहू ( शाहूचा वकील ) अर्ज करितो की, सा सुभे दक्षणची चवथाई, पंधरा हजार फौज सुभ्यासमागमे चाकरीस ठेवावी लागते, त्याचे सरंजामास हजरत रफीउद्दराजत यांच्या कारकीर्दीच्या फर्मानाप्रमाणे आमच्या यजमानाकडे मुकरर आहे. त्यास हल्ली सनद नवी इनायत करावी. " दसखत जाले की सनद देणे.

कैफियत :--
" राजे शाहू यांच्या वकिलाजवळ हजरत रफीउद्दराजत यांचे कारकीर्दीचे फर्मानाची नक्कल आहे. त्यांत मजकूर की, पंधरा हजार फौज सुभेदारासांगत चाकरीस ठेवावी. त्याचे सरंजामास सा सुभे दक्षणची चवथाई राजे शाहू यांस इनायत जाली. पेशजी हुसेनअल्लीखां यांच्या कारकीर्दीत चवथाईचे परवाने दक्षणच्या दिवाणीच्या दप्तरांतून घेतले होते. "

महीपत आनदराव वकील राजे शाहू याणी ताहोद ( करार ) लिहून दिल्हा, त्याचा तपसील :-
" सा सुभे दक्षणच्या सरदेशमुखीची खिदमत हजरत रफीउद्दराजत यांच्या कारकीर्दीच्या फर्मानाबमोजीब ( प्रमाणे, बरहुकुम ) व दिवाणी दप्तरच्या सनदाप्रमाणे आमचे यजमानाकडे करार जाली. सबब ताहोद लिहून दिल्हा ऐसा की, यजमान खिदमतीच्या लाजिम्याविशी ( हक्क ) कायावाचामने सादर राहून, रयतीस आबादी विशेष होय व सरकारची दौलतख्वाई ( राज्याचे मित्रत्व ) व मुफसदाचे ( पुंड, बंडखोर ) पारपत्य घडे ते करतील ; व पंधरा हजार फौज सुभेदाराच्या समागमे चाकरीस ठेऊन, रयतीस आपल्याकडोन राजी राखतील, व उजाड गांवाची लावणी तीन सालांत करोन ऐसा बंदोबस्त करितील, जे दुष्टाचा उपद्रव होणार नाही. कदाचित कोणाचे घरी चोरी जाली, किंवा कोणाचा माल चोरीस गेला, तरी चोरास शिक्षा व ज्याचा माल त्यास देतील. कदाचित चोरास शिक्षा करोन चोरीचा ठिकाण न लागे, तरी चोरीचे मालाची निशा आपण करितील. शिवाय चवथाई सरदेशमुखी अधिक लोभ धरणार नाहीत, अगर जाहीर जाल्यास जे रुपये ज्यादा तलबी करोन घेतील, ते सरकार - आलींत ( सार्वभौम सरकारकडे ) दाखल करितील. हा ताहोद लिहिला असे. छ. २४ रबिलावल सन दोन जलुसी. "
                
 सुभा एक सरकारा ( सुभ्यापेक्षा लहान व महालापेक्षा मोठा विभाग ) दाहा १०.

सरकार दौलताबाद १       सरकार पैठण १
सरकार अहमदनगर १      सरकार बीड १
सरकार धारूर १           सरकार सोलापूर १
सरकार परांडे १           सरकार जुन्नर १
सरकार संगमनेर १        सरकार जालनापूर १                
      

संदर्भ ग्रंथ :-
१) साधन परिचय अर्थात महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास :- संपादक - द. वि. आपटे, रा. वि. ओतुरकर  

मराठी कागदपत्रांतील अब्दालीची प्रथम हिंदुस्थान स्वारी
पुरंदरे दप्तर भाग १ ला,}                          { श. १६७० वैशाख - ज्येष्ठ
 ले. २१९, पृ. १६० }                              { इ. स. १७४८ एप्रिल - मे
                        श्रीशंकर
चिरजीव राजश्री नाना ( पुरंदरे ) यासी प्रती रघुनाथ बाजीराव आसीर्वाद उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लिहिणे विशेष तुम्ही पत्र पाठविले ते पावले लिहिला मजकूर कलला ऐसियास आम्ही दो चौ रोजा आड पत्रे पाठवितो परंतु तुम्हास पावतात न पावतात हे काहीच कलत नाही आम्ही तर दो चौ रोजा आड येखादे पत्र पाठवितो विशेष काही लिहिले नाही यानंतर येथे तीर्थरुपाची ( नानासाहेब पेशवे ) पत्रे आली की तिकडील पठाणास हिकडून या पातशाहाची फौज गेली होती तिणे मोडिले ते दो चौ हजारानिसी पलाले ऐसी पत्रे आली आतां दिसोन येते की यंदा प्रायः तीर्थरूप देशास येतील मग पुढे होईल ते कलल्यासारिखे लिहू तुम्हास कलावे म्हणून लिहिले असे तिकडील वर्तमान वरचेवर लिहित जाणे आमचे येथे राहावयाचे बरे उत्तम प्रकारे तीर्थरुपाची मर्जी व विद्याभ्यास करितो दरबारास दुवख्त जातो दंड काढतो बहुत काय लिहिणे हे आसीर्वाद. 


संदर्भ ग्रंथ :-
१) साधन परिचय अर्थात महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास :- संपादक - द. वि. आपटे, रा. वि. ओतुरकर