शुक्रवार, ३१ मार्च, २०१७

पेशवेकालीन समाजेतिहास





पत्र क्र. १११
शाहू रोजनिशी, पृ ८३ }                              { वैशाख शु. ५ शके १६५९
                                                 { ता. २४ - ४ - १७३७
सबा सलासीन मया व अलफ मोहरम ४
[ ३०९ ] कित्तापत्र ( नकल करावयाचे पत्र ) चिटणीशी वैशाख शुद्ध पंचमी रविवार पिंगळनाम संवत्सरे बनाम ( नावाने ) मोकादमानी मौजे घारगाव परगणे कर्डे - रांजणगाव यासी आज्ञा केली ऐसी जे, दावजी पाटील मडका मौजे पारगाव तर्फ चांभारगोंदे परगणा कडेवलित याणे हुजूर येऊन विनंति केली की, सदरहू दो गांवींची मुले रानात गुरे चारीत असतां दोन फौजा करून घारगावकर मोगल आणि पारगावकर मराठे ऐसे होऊन पांच रोज भांडत होते. त्या खेळामध्ये पारगावकर मुलांनी घारगावकर मुलांस पिटून काढिले. तेव्हा पळताना मौजे मजकूरचा हजामाचा पोर तोंडघशी पडून कपाळ फुटले आणि मयत पंधरा विसा रोजांनी जाहला. याकरितां हजामाचे पोराची आई अहमदनगरास फिर्याद जाहली. तेथे काजीशरा याणी इनसाफ केला की, मुलांचा कज्या आहे त्यांत खुनाचा दावा पोचत नाही, खून माफ. असे म्हणून कागद शराचा करून दिल्हा असतां हजामीण जागा जागा फिर्याद देत फिरते. तर महाराजांनी इनसाफ करून हुकुम करणे तो करावा म्हणोन अर्ज केला. त्यावरून मनास आणतां तुमचे भांडणामुळे पोर मेला त्या खुनाचा दावा वाजवी नाही. ऐसे जाणोन काजीनी इनसाफ केला आहे त्याप्रमाणे करार करून पारगावकरांस खुनाचे लिगाड ( कटकट ) माफ केले असे. दावजी पाटिलास शिरपाव मुंडासे देऊन खून माफ केला असे. तुम्ही हजाम मजकुरास व त्याचे बायकोस ताकीद करून खुनाचा कज्या (?) करून यावे. फिरोन बोभाट आल्यास कार्यास येणार नाही. पारगावी कज्या करावयास संबंध नाही. ताकीद असे म्हणून पत्र १        

===================================================================================







पत्र क्र. १४६
पे. द. भा. ४३, नं. १० }                                   { ९ - २ - १७६९
           
प|ो
                                      श्री
 वेदशास्त्रसंपन्न राजश्री शास्त्रीबाबा स्वामीचे सेवेसी.  
 विद्यार्थी मालोजी जाधवराऊ कृतानेक दंडवत विनंती. येथील कुशल त|| माघ शुद्ध तृतीया येथास्थित असे विशेष. पुरुषाकडील तीन, स्त्रीकडील चार हे करावे किवा न करावे, याचा शास्त्रार्थ कलला पाहिजे यास्तव हे पत्र आपणास लि|| असे ; तरी शास्त्रार्थलेखन केला पाहिजे पिढ्या तपशील :

पुरुषाकडील                               स्त्रीकडील
१ मूळ पुरुष सुभेदार                      १ मूळ पुरुष सुभेदार
१ सटवोजी जाधवराव पुत्र ( भाऊ )          १ कन्या फिरंगुबाई ( बहिण )
१ जोत्याजी जाधवराव ( नातू, वर )         १ त्याची कन्या बुगाबाई ( आतेमामे भावंडे )
                                    १ त्याची कन्या वधू ( आते बहिणीची मुलगी )
----                                                                -----
                                                                  
याप्रमाणे असेत. कर्तव्य न कर्तव्यतेचे शास्त्रार्थ येईल त्या प्र|ो वर्तणूक केली जाईल. विशेष काये लिहिणे, कृपा केली पाहिजे, हे विनंती.
 

 ===================================================================================




पत्र क्र. १६६
पे. द. भा. ४३, नं. १४५ }                            { पैवस्ती २० - ६ - १७७८
                                श्री
त्रिंबक धारप याण करमरकर याची मूल पलून नेऊन लग्न लावीत होता, त्यांतील जोसी व त्याचा चुलतभाऊ हे दोघे वाड्यांत होते त्यास शहरात फिरऊन दवंडी पिटून असे फिरोन कोणी न करी असे लोकास कलऊन तोफखान्यात आटकेस बिडीखेरीज ठेवावे आण फुटाणे गावात भीक मागून खावे. याजप्र|ो व|ो  राजश्री शास्त्रीबोवाची आज्ञा जाली आहे हे विनंती.
 



====================================================================================




पत्र. क्र. २००
ऐ. ले. सं. भा. १० वा, नं. ४०४०  }                       { ११ - १२ - १७९८                   
                  
                                 श्रीगणराज
रा|| जैन गुरुगोळ मठ मौजे नांदणी गोसावी, यास ---
   स्ने|| गंगाधरराव गोविंद ( मिरजकर पटवर्धन ) सु|| तिस्सा तिसैन मया व अलफ. रेवापा केंचाण्णा रयत मौजे कुपवाड याने विदित केले की, " आपली लेक लिंबी लिंगापा जैन यास देऊन लग्न केले. नंतर तो निघून गेला त्याचा पत्ता कोठे लागेना. पोरगी थोर झाली. तेव्हां लिंगापाचा भाऊ सावंता यास विचारिले. त्याने सांगितले की, लिंगापा हल्ली कोठे आहे त्याचा पत्ता लागत नाही. तेव्हां त्यापासून सोडचिठ्ठी लिहून घेऊन मी आपले लेकीचा पाट लाऊन दिला. त्यास गुदस्तां त्या पोरीचा दादला लिंगापा सरकारांत फिर्यादीस आला की, मी लग्नाचा दादला जिवंत असतां माझे बायकोचा पाट लागला त्यास माझी बायको माझे हवाली करवावी. त्यावरून लग्नाचे दादल्याचे हवाली बायको झाली. परंतु आमचे जातीत पाट लागलेली बायको फिरोन लग्नाचे दादल्याचे घरी नांदवयाची नाही. पोरगीही तेथून निघून आली. ती पाटाकडे द्यावयास आज्ञा व्हावी म्हणून. " ऐशियास ही जैन जातीची गोष्ट. याकरितां तुम्हांस हे पत्र लिहिले असे. तरी येविशीची चौकशी पुर्तेपणे करून तुमचे जातीत चाल असेल त्याप्र|ो लिहून मिरजेस सरकारांत पाठविणे. उपरांतिक रेवापा केंचाण्णास आज्ञा होणे ती होईल. जाणिजे. छ. २ रज्जब. सु|| तिस्सा तिसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे.
 




संदर्भ ग्रंथ :-
१) साधन परिचय अर्थात महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास :- संपादक - द. वि. आपटे, रा. वि. ओतुरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: