शुक्रवार, ३१ मार्च, २०१७

सहसुभ्याच्या चौथाईची सनद




पत्र क्र. ७८       

तह व करारमदार }                              { Treaties Agreements and Sanads  
पृ. १ }

 [ ही मूळ सनद नव्हे. निजाम उल्मुल्क दक्षिणचा सुभेदार झाला तेव्हा त्याजकडून ही मूळ प्रतीवरून संमत करून घेतलेली आहे. ]

 .... छ २५ रबिलावल सन दोन फई ( हा शब्द लागत नाही ) दसखत जाली त्याचा तपसील :--
" वकील राजे शाहू ( शाहूचा वकील ) अर्ज करितो की, सा सुभे दक्षणची चवथाई, पंधरा हजार फौज सुभ्यासमागमे चाकरीस ठेवावी लागते, त्याचे सरंजामास हजरत रफीउद्दराजत यांच्या कारकीर्दीच्या फर्मानाप्रमाणे आमच्या यजमानाकडे मुकरर आहे. त्यास हल्ली सनद नवी इनायत करावी. " दसखत जाले की सनद देणे.

कैफियत :--
" राजे शाहू यांच्या वकिलाजवळ हजरत रफीउद्दराजत यांचे कारकीर्दीचे फर्मानाची नक्कल आहे. त्यांत मजकूर की, पंधरा हजार फौज सुभेदारासांगत चाकरीस ठेवावी. त्याचे सरंजामास सा सुभे दक्षणची चवथाई राजे शाहू यांस इनायत जाली. पेशजी हुसेनअल्लीखां यांच्या कारकीर्दीत चवथाईचे परवाने दक्षणच्या दिवाणीच्या दप्तरांतून घेतले होते. "

महीपत आनदराव वकील राजे शाहू याणी ताहोद ( करार ) लिहून दिल्हा, त्याचा तपसील :-
" सा सुभे दक्षणच्या सरदेशमुखीची खिदमत हजरत रफीउद्दराजत यांच्या कारकीर्दीच्या फर्मानाबमोजीब ( प्रमाणे, बरहुकुम ) व दिवाणी दप्तरच्या सनदाप्रमाणे आमचे यजमानाकडे करार जाली. सबब ताहोद लिहून दिल्हा ऐसा की, यजमान खिदमतीच्या लाजिम्याविशी ( हक्क ) कायावाचामने सादर राहून, रयतीस आबादी विशेष होय व सरकारची दौलतख्वाई ( राज्याचे मित्रत्व ) व मुफसदाचे ( पुंड, बंडखोर ) पारपत्य घडे ते करतील ; व पंधरा हजार फौज सुभेदाराच्या समागमे चाकरीस ठेऊन, रयतीस आपल्याकडोन राजी राखतील, व उजाड गांवाची लावणी तीन सालांत करोन ऐसा बंदोबस्त करितील, जे दुष्टाचा उपद्रव होणार नाही. कदाचित कोणाचे घरी चोरी जाली, किंवा कोणाचा माल चोरीस गेला, तरी चोरास शिक्षा व ज्याचा माल त्यास देतील. कदाचित चोरास शिक्षा करोन चोरीचा ठिकाण न लागे, तरी चोरीचे मालाची निशा आपण करितील. शिवाय चवथाई सरदेशमुखी अधिक लोभ धरणार नाहीत, अगर जाहीर जाल्यास जे रुपये ज्यादा तलबी करोन घेतील, ते सरकार - आलींत ( सार्वभौम सरकारकडे ) दाखल करितील. हा ताहोद लिहिला असे. छ. २४ रबिलावल सन दोन जलुसी. "
                
 सुभा एक सरकारा ( सुभ्यापेक्षा लहान व महालापेक्षा मोठा विभाग ) दाहा १०.

सरकार दौलताबाद १       सरकार पैठण १
सरकार अहमदनगर १      सरकार बीड १
सरकार धारूर १           सरकार सोलापूर १
सरकार परांडे १           सरकार जुन्नर १
सरकार संगमनेर १        सरकार जालनापूर १                
      

संदर्भ ग्रंथ :-
१) साधन परिचय अर्थात महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास :- संपादक - द. वि. आपटे, रा. वि. ओतुरकर  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: