मंगळवार, १९ मार्च, २०२४

औरंगजेबाचे कवित्व : ब्रह्मा, विष्णू, महेश यांना वंदना



अनिवार सत्तालोभी, राक्षसी महत्त्वाकांक्षा असलेला, क्रूर, कपटी, पाताळयंत्री, उलट्या काळजाचा.. .. अशा विविध उपाध्यांनी सजलेला औरंगजेब आपल्या परिचयाचा आहे. क्वचित एखादा ना. सं. इनामदार सारखा कादंबरीकार या पाषाणहृदयी व्यक्तीच्या मनाचा कोपरा आपल्या लेखनातून दृशवतो. परंतु या चित्रणावर मात करते इतिहासात असलेली औरंगजेबाची धर्मांध प्रतिमा. ती किती खरी / खोटी, अतिरंजित या वादात शिरण्याचे तूर्तास प्रयोजन नसून प्रस्तुत लेखात आपणांस औरंगजेबाने रचलेल्या काव्याची अल्पशी चर्चा करायची आहे.

इतिहास हा नेहमी वस्तुनिष्ठ असावा, व्यक्तिनिष्ठ नव्हे. परंतु या महत्वाच्या बाबीचे आपल्या इतिहास लेखकांना नेहमीच विस्मरण होते. पर्यायाने निर्माण होणारे इतिहासलेखन शास्त्रशुद्ध न ठरता बखर वा ललित वाङमय अधिक घडते. ज्यामध्ये ऐतिहासिक संदर्भ साधनांधारे लेखकाचे अनुमान दृग्गोचर न होता त्यावर व्यक्तिगत विकारांचा पगडा अधिकाधिक पडून लेखन विपर्यस्त, विकृत बनते. आणि अशा विपर्यस्त लेखनावर जोपसलेली पिढी इतिहासाकडे, ऐतिहासिक चरित्रांकडे कधीही निकोप दृष्टीने पाहू शकत नाही.             याचे प्रयोजन म्हणजे, नुकतेच औरंगजेब रचित एक काव्य आमच्या वाचनात आले. ब्रज भाषेत लिहिलेल्या त्या काव्यात हिंदू आणि वैदिक देवतांचा कट्टर इस्लामी, हिंदू तसेच परधर्मद्वेष्टा म्हणून रंगवलेल्या औरंगजेबाने करावे, याचे आम्हांस परम आश्चर्य वाटले. औरंगजेब एक कठोर शासक, प्रियकर, प्रेमळ पिता, धर्मनिष्ठ असू शकतो, परंतु कवी ??? यावर विश्वास बसण्यास आम्हांस वेळच लागला. त्यानंतर औरंगजेबाच्या या सर्वसामान्यजनांस अज्ञात असलेल्या कलागुणांचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, त्याचे थोडक्यात सार येथे देतो.

हिंदुस्थानातील तुर्की साम्राज्याचा संस्थापक बाबर हा एक कवी होता.【१】 तुर्की व फारसी भाषेत त्याने अनेक काव्यरचना केल्या आहेत. बाबरची मुलगी गुलबदन बेगम व नात सलीमा सुलताना यांनी देखील फारसी भाषेत कविता केल्याचे उल्लेख मिळतात.                   
बाबर नंतर तख्तावर विराजमान झालेला त्याचा मुलगा हुमायून हा कला रसिक होता. तो स्वतः एक चित्रकार असून त्याने काही कवितांचे लेखनही केले होते.
हुमायून पुत्र अकबर हा तर अत्यंत कलाप्रिय. त्याचा नवरत्नांचा दरबार तर इतिहासात प्रसिद्ध आहे. तत्कालीन अस्थिर राजकीय वातावरणातही त्याची विविध ज्ञानशाखा - विषयांमधील रुची प्रशंसनीय आहे. विविध क्षेत्रांतील कलाकारांना राजाश्रय देणारा अकबर स्वतः कवी असून त्याच्या रचना ‘ संगीत राग कल्पद्रुम ‘ मध्ये समाविष्ट आहेत. 
        काव्य लेखनाची ही परंपरा अकबराच्या पुढच्या पिढ्यांमध्येही कायम राहिल्याचे दिसून येते. अकबर पुत्र दानियल व जहांगीर हे दोघे कवी होते. जहांगीरने ब्रज आणि फारसी भाषेत काव्यलेखन केले. त्याच्या अनेक रचना ‘ संगीत राग कल्पद्रुम ‘ समाविष्ट आहेत. जहांगीरची पत्नी नूरजहाँ ‘ मफकी ‘ नावाने फारसी भाषेत काव्यरचना करत असे.
जहांगीरचा मुलगा खुर्रम उर्फ शाहजहान हा तर अत्यंत रसिक ! स्थापत्यात त्याची विशेष रुची असली तरी काव्यासहीत इतर कलागुणांनाही त्याच्या दरबारी राजाश्रय होता. खुद्द शहाजहान देखील कवी असून त्याच्या ब्रज भाषेतील काही रचना ‘ संगीत राग कल्पद्रुम ‘ मध्ये समाविष्ट असल्याचे अभ्यासक नमूद करतात. शहाजहानची मुलगी जहांआरा देखील फारसी भाषेत काव्यरचना करत असे.   तसेच शहाजहानचा थोरला मुलगा दारा शुकोह फारसी भाषेत कविता करायचा. ब्रज भाषेतही त्याने काही काव्यरचना केल्याचे उल्लेख मिळतात.  या पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या काव्यगुणाचे आपणांस विशेष आश्चर्य वाटायला नको !

अभ्यासकांच्या मते औरंगजेबाची मुलगी झेबुन्निसा ब्रज तसेच फारसी भाषेत कविता करायची. तिच्या फारसी भाषेतील रचना ‘ मफकी का दीवान ‘ या शिर्षकाखाली प्रकाशित झाल्याचा उल्लेख मिळतो.          औरंगजेबचा मुलगा आजमशाहच्या ब्रज भाषेतील कविता ‘ संगीत राग कल्पद्रुम ‘ मध्ये समाविष्ट असल्याचे अभ्यासक नमूद करतात.
तुर्की राजघराण्यातील काव्यरचनेची परंपरा पुढे अखेरचा सम्राट बहादूरशहा जफर पर्यंत असल्याचे आढळून येते.

औरंगजेबाच्या उपलब्ध कवितांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या तत्कालीन ब्रज भाषेत आहेत. आज जरी हिंदी, ही प्रामुख्याने उत्तर भारतात बोलली जाणारी एक प्रमुख भाषा असली तरी ती संस्कृत प्रभावाखाली विकसित करण्यात आलेली एक प्रकारे कृत्रिम भाषा आहे. तत्पूर्वी अवधी, मैथिली, डिंगल, पिंगल, ब्रज इ. विकसित प्राकृत तथा लोकभाषांचा प्रभाव होता.            तुर्कांची राजधानी प्रथम आग्रा परिसरात होती, तिथून दिल्लीला स्थलांतर करण्यात आले. ग्वाल्हेरपासून दिल्ली पर्यंतच्या भूप्रदेशात ब्रज भाषा प्रचलित असल्याने तुर्की राजघराण्याची ती एकप्रकारे मातृभाषा बनल्यास त्यात आश्चर्य ते काय !

औरंगजेबाची काव्यरचना :- 

उत्तम लगन शोभा सगुन गिन गिन ब्रह्मा विष्णु    
महेश व्यास कीनो शाह औरंगजेब जसन तखत बैठो आनन्दन ।

नग खेंच दाम विशात वर गायन मोहनप्रत
ब्रह्मा रचौ तिन मध गायन गुमी जन गावत तिनके हरत दुखदन्दन ।।

एक निर्तत निर्तत लास ताण्डव रंग भावन एक वन
बावत वन्दिक पंडित कर कवि सरस पूरण चन्दन ।

शाह औरंगजेब जगत-पीर-हरण लोक तारे
निस्तारे फन्देही रहत दुख दारिद्रके गंजन ।।  

औरंगजेब बादशाही तख्तावर विराजमान झाल्यावर या काव्याची रचना करण्यात आल्याचे उपरोक्त कवितेवरून सिद्ध होते. 

या कवितेचं संक्षिप्त विश्लेषण करण्यापूर्वी प्रथमतः काही महत्वाच्या गोष्टी आपणांस लक्षात घेणे क्रमप्राप्त आहे :-
अकबराच्या काळापासून तुर्कांचे राजपुतांसोबत विवाहसंबंध घडून येत होते. 
(१) अकबराचा मुलगा जहांगीर याची पत्नी मानमती ही मोटा राजा उदयसिंह याची मुलगी होती. हीचा उल्लेख ‘ जगत् गोसाईन ‘ असाही आढळतो. खुर्रम उर्फ शहाजहान हा तिच्याच पोटी जन्मला.
(२) औरंगजेबाची दुसरी पत्नी रहमत उन्निसा उर्फ नबाब बाई ही काश्मीरातील राजाउरी संस्थानच्या राजपूत राजाची मुलगी. 
(३) विवाहित स्त्रियांखेरीज औरंगजेबाला हिराबाई उर्फ जैनाबादी नावाची एक उपस्त्री होती. ही पूर्वी औरंगजेबाच्या मावशीचा नवरा मीर खलील याच्या जनानखान्यातील एक दासी होती. दख्खन मधील आपल्या दुसऱ्या सुभेदाराच्या कार्यकाळात बऱ्हाणपूरास औरंगजेब आपल्या मावशीच्या भेटीस गेला असता तापी नदीच्या तीरावर असलेल्या जैनाबाद बगिच्यात त्याची व हिराबाईची प्रथमतः नजरानजर झाली. तिच्या प्रथम दर्शनानेच औरंगजेब घायाळ झाला. हिराबाईच्या प्रेमात औरंगजेब इतका बुडाला की, एकदा तिच्या आग्रहाखातर त्याने मद्य घेण्याचाही प्रयत्न केला होता. 
[ औरंगजेबाच्या दुसऱ्या दख्खन सुभेदारीचा कार्यकाळ स. १६५२ - ५८ ]
(४) ‘ राजस्थान का इतिहास ‘ अनुसार किशनगडची राजकुमारी चारुमती सोबत विवाह करण्याची औरंगजेबाची मनीषा होती. मात्र तिने मेवाडच्या राजसिंहास वरले. यामुळे औरंगजेब थोडा कष्टी झाला होता. 

सर जदुनाथ सरकार लिखित व डॉ. भ. ग. कुंटे अनुवादित  औरंगजेब चरित्रानुसार – औरंगजेबास अरबी, पर्शियन भाषा लिहिता - वाचता येत होती. दरबारात तसेच खासगी व्यवहारात बोलली जाणारी ब्रज ही त्याची मातृभाषा होती. काव्यरचना त्यांस आवडत असली तरी त्याचा रस धार्मिक ग्रंथ अध्ययनात अधिक होता. 

‘ मुगल बादशाहों की हिंदी ‘ तसेच एका लेखानुसार औरंगजेबाच्या दरबारात वृन्द, कालिदास, कृष्ण, सामंत नावाचे कवी होते. पैकी, कवि वृन्द प्रसंगी औरंगजेबासमोर परखडपणे बोलण्यास कचरत नसे. उदाहरणार्थ :- जोधपूर नरेश महाराजा जसवंतसिंह मरण पावल्यावर औरंगजेबाने जोधपूरचे राज्य बळकावण्याचा प्रयत्न केला, त्या प्रसंगास अनुलक्षून वृन्दने एक रचना केली, त्यातील एक ओळ अशी..  जब जसवंत सुरपुर को सिधाए तब 
 तेग बांध आए, यह कैसी मरदानगी ? 

शिवचरित्रातील प्रसिद्ध कवी भूषण देखील औरंगजेबाच्या दरबारी होता. त्याने एके प्रसंगी औरंगजेबास उद्देशून रचलेल्या काव्यात – औरंगजेबाने आपल्या पिताव बंधूंवर केलेल्या अत्याचारांचा उल्लेख करत अंतिम ओळ अशी रचली की – 
‘ भूषण ‘ भनत छरछंदी मतिमंद महा, 
सौ सौ चूहे खाइ कै बिलारी बैठी तपके 
अशा काव्यरचना करणाऱ्यांना औरंगजेबाने देहदंडाची वा तत्सम क्रूर शिक्षा दिल्याचे आमच्या तरी वाचनात अद्यापि आले नाही.

औरंगजेबाची कट्टर इस्लामी, धर्मांध प्रतिमा आपल्या परिचयायची आहे. या पार्श्वभूमीवर एक घटना इथे नमूद करणे आवश्यक आहे. औरंगजेबाचा मुलगा आजम याने बापाकडे काही आंबे पाठवले होते. त्यांची नावं ( आंब्याच्या जातीची ) माहिती नसल्याने, ती ठरवण्याचीही त्याने औरंगजेबास विनंती केली होती. औरंगजेबाने त्या आंब्याच्या जातींची नावे अनुक्रमे ‘ सुधा रस ‘ आणि ‘ रसना विलास ‘ अशी निश्चित केली. यापैकी एकही नाव इस्लामी परंपरेतील नाही.

आता आपण औरंगजेबाच्या काव्यरचनेची चर्चा करून प्रस्तुत विषयाचा समारोप करू. 
उत्तम लगन शोभा सगुन गिन गिन ब्रह्मा विष्णु    
महेश व्यास कीनो शाह औरंगजेब जसन तखत बैठो आनन्दन ।
उपलब्ध इतिहासानुसार दि. २४ ऑक्टोबर १६१८ रोजी गुजरात मधील दोहद गावी औरंगजेबाचा जन्म झाला. 
शहाजहानला पदच्युत करून दि. २१ जुलै १६५८ रोजी तो सिंहासनावर विराजमान झाला. म्हणजे जवळपास तो चाळीशीच्या घरात होता. तोपर्यंत औरंगजेबाची कट्टर धर्मनिष्ठ प्रतिमा बनलेली होती. त्यामुळेच उत्तम लगन शोभा सगुन गिन गिन ब्रह्मा विष्णु    
महेश व्यास कीनो शाह औरंगजेब जसन तखत बैठो आनन्दन  या काव्याची रचना खुद्द औरंगजेबाने न करता दुसऱ्या कोणी आश्रित कवीने करून त्यांस आपल्या आश्रयदात्याचे नाव जोडले म्हणावे तर ते शक्य वाटत नाही. कारण, ज्या काव्यात अल्ला किंवा पैगंबराचा उल्लेख नाही परंतु ब्रह्मा, विष्णू या वैदिक व महेश या हिंदू देवतांचा उल्लेख आहे, त्या रचनेत आपले नाव जोडावे हे औरंगजेब कसे मान्य करेल ? 
 मुगल बादशाहों की हिंदी मधील औरंगजेबाच्या ब्रज भाषेतील इतर रचना पाहता उत्तम लगन शोभा सगुन गिन गिन ब्रह्मा विष्णु    
महेश व्यास कीनो शाह औरंगजेब जसन तखत बैठो आनन्दन ।  या काव्याचा रचेयता निर्विवादपणे औरंगजेबच असल्याचे सिद्ध होते. या विधानाच्या पुष्टतेसाठी औरंगजेबाची एक खास रचना वानगीदाखल येथे देत आहे.

तुव गुण रवि उदै कोनो याही तें कहत तुमकों बाई उदैपुरी । 
अनगिन गुण गायन के अलाप विस्तार सुर जोत दीपक जो तोलो सों विद्या है दुरी ॥

जब जब गावत तब तब रससमुद्र लहरे उपजावत 
एसी सरस्वती कौन कों फुरी।

जानन मन जान 'शाह औरंगजेब' रीझ रहे याही तें 
कहत तुमको विद्यारूप चातुरी ॥

सदर काव्यात बाई उदैपुरी म्हणून जो उल्लेख आला आहे, तो औरंगजेबाची प्रिय पत्नी उदेपुरी बेगमेचा असून पुढील ओळीत त्याने तिच्या गायन कौशल्यास सरस्वती या वैदिक देवतेची उपमा दिली आहे. तसेच अखेरच्या ओळीत तो तिचा विद्यारूप चातुरी असा उल्लेख करतो. विशेष म्हणजे यातील एकही उपमा इस्लामी परंपरेतील नाही. 

या सर्व बाबींवरून निर्विवादपणे स्पष्ट होते की, औरंगजेब हा सर्वार्थाने हिंदुस्थानी होता. त्याचा धर्म जरी परदेशी मातीत जन्मला असला तरी त्याच्यावर झालेले संस्कार याच मातीतील होते. इथल्या ब्रज भाषेतच तो व त्याचे पूर्वज - वंशज आपल्या मनातील भावना काव्यरूपाने व्यक्त करत होते. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे की इथल्या तटस्थ, अभ्यासू म्हणवून घेणाऱ्या इतिहासकारांनी औरंगजेब तसेच कित्येक मुस्लिम शासकांचे चरित्र अत्यंत भडक, अतिरंजित स्वरूपात रंगवून विकृत केले आहे. त्यांना परकीय आक्रमक ठरवत त्यांच्या कालजेयी रचना जुलुमी अत्याचारी कारकिर्दीचे प्रतीक म्हणून जनमानसावर ठसवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

या सर्व चर्चेचे सार अंतिमतः असे की, इतिहासाचे पुनर्लेखन हे आवश्यक असून वेळोवेळी उपलब्ध होणाऱ्या संदर्भ ग्रंथांधारे ते सातत्याने होत राहिले पाहिजे. कारण इतिहास हा  वर्तमान तसेच भविष्यकालीन सामाजिक जीवनावर प्रभाव पाडणारा एक महत्वाचा घटक असल्याने इतिहास लेखन हे अत्यंत वस्तुनिष्ठ अन् विश्लेषणात्मक होणे अत्यावश्यक ठरते. 

तळटीप :- 

【१】बाबर हा तुर्क तैमुरलंगचा वंशज असल्याने त्याने स्थापलेली राजवट निःसंशय तुर्की ठरते.


संदर्भ ग्रंथ :- 

१) औरंगजेबाचा इतिहास ( A SHORT HISTORY OF AURANGZIB या सर्व जदुनाथ सरकार लिखित इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद ) :- डॉ. भ. ग. कुंटे ( अनुवादक )

२) राजस्थान का इतिहास :- बालूलाल पानगड़िया 

३) मुग़ल बादशाहों की हिंदी :- चंद्रबली पांडे 

४) मुग़ल बादशाह और हिंदी कविता : अरुण यह मधुमय देश हमारा :- श्याम कुलपत यांचा खालील संकेतस्थळावर प्रकाशित झालेला लेख 
https://hindi.newsclick.in/Mughal-Emperor-and-Hindi-Poetry 

५) रीतिकालीन साहित्य : इतिहास लेखन और मुग़ल बादशाहों की हिंदी कविताएँ :- डॉ. रामानुज यादव यांचा खालील संकेतस्थळावर प्रकाशित झालेला लेख 
https://www.apnimaati.com/2023/03/blog-post_72.html#_edn9 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: