शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

यशवंतराव होळकर ( मुक्त चिंतन )


महाराजा यशवंतराव होळकर या व्यक्तीचा इतिहास समजावून घेणे व तो कथन करणे अतिशय अवघड काम आहे. अवघड यासाठी की ज्यावेळी मध्ययुगीन कालखंड संपुष्टात येऊन आधुनिक कालखंडास आरंभ होत होता अशा संधीकाळात या व्यक्तीचा तत्कालीन हिंदुस्थानच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला. बरं दुसरी गोष्ट अशी की, रूढार्थाने यशवंतरावाला मराठी साम्राज्याचा आधारस्तंभ किंवा पेशव्यांचा सरदार असेही म्हणता येत नाही. भलेही तो पेशवाईत उदयास आलेल्या होळकर घराण्याचा वंशज असला व त्याने होळकरशाही दौलतीची धुरा काही वर्ष यशस्वीरित्या सांभाळली असली तरी, यशवंतराव पूर्वीची होळकरशाही व यशवंतरावाच्या कारकिर्दीतील होळकरशाही यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हा फरक समजावून घेण्यापूर्वी घेण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. 

डोईजड सरदारांना संधी मिळताच चेपण्याचं धोरण हे थो. बाजीराव पेशव्याच्या काळापासून सुरू होतं. पानिपतचा फायदा घेऊन बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्याने शिंदे, होळकर, पवार या तीन सरदारांच्या सरंजामाची जप्ती चालवली. पैकी, मल्हारराव होळकर त्यावेळी हयात असल्याने पेशव्याला त्याच्यावर फार काळ निग्रह करणे शक्य झाले नाही. परंतु शिंदे आणि पवार यात बराच काळ भरडले गेले.

पुढे मल्हारराव तसेच त्याचा नातू मालेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर होळकरशाहीच्या वारसाचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी जर पेशवे घराण्यात भाऊबंदकी माजलेली नसती तर थो. माधवराव पेशव्याने होळकरांची दौलत जप्त केलीच नसती असे निश्चयपूर्वक म्हणता येत नाही. याप्रसंगी होळकरशाहीचा बचाव करण्याचं जे चातुर्य व धाडस अहिल्याबाईने दाखवलं त्याला खरोखरच तोड नाही. पुढे राजकीय कारभार अहिल्याबाईकडे व लष्करी कामगिरी तुकोजी होळकरकडे अशी कार्यभागाची विभागणी झाली. आणि ही अहिल्याबाईच्या निधनापर्यंत कायम राहीली.

अहिल्याबाईच्या मृत्यूनंतर तुकोजी होळकर हा होळकरशाहीचा प्रमुख ठरला. परंतु त्याचाही वृद्धापकाळ आणि घरात मुलांची भांडणं. परिणामी त्याच्या अखेरच्या दिवसात थोरला मुलगा काशीरव व धाकटा मुलगा मल्हारराव यांच्यामधील संघर्ष टोकाला पोहोचला. उभयतांमध्ये दौलतीची विभागणी करण्याचा तुकोजीने प्रयत्न केला खरा पण तो यशस्वी होऊ शकला नाही. होळकरशाहीच्या या अंतस्थ भांडणाला पेशवे दरबारच्या राजकारणाचाही उपसर्ग पोहोचला.

 ज्याप्रमाणे कमकुवत सरदारांना गिळून टाकण्याचं पेशव्यांचं धोरण होतं तेच थोड्याफार फरकाने होळकरांच्या सोबत्याचं म्हणजे शिंद्यांचही होतं. महादजीच्या मृत्यूनंतर शिंद्यांच्या  गादीवर आलेल्या दौलतरावाने काशीरावास हाताशी धरून होळकरी दौलत गिळंकृत करण्याचा प्रयत्न आरंभला. 

 दरम्यान याच काळात सवाई माधवराव पेशव्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पेशवाईचा नवा धनी कोण हा प्रश्न मुत्सद्दी - सरदारांसमोर उभा राहिला. आपल्या पसंतीचा इसम पेशवा म्हणून नेमल्यास पेशव्याचे सर्व अधिकार आपल्या हाती येतील हे उघड गुपीत आता सर्वांनाच कळून चुकलं होतं. त्यामुळे प्रत्येक जण दुसऱ्याचा डाव हाणून  पाडण्यास प्रवृत्त झाला होता. या यावेळी पेशवाईचे अधिकृत वारस म्हणजे मृत रघुनाथरावाचे दोन मुलगे --  बाजीराव व चिमणाजी हेच खरे हक्कदार होते. परंतु नारायणराव पेशव्याच्या खुनानंतर रघुनाथराव व त्याच्या कुटुंबीयांशी सर्वांनीच --  विशेष करून नाना फडणवीसने शत्रुत्वाची भूमिका स्वीकारल्याने या दोघांपैकी गादीवर येणे नाना फडणवीसला पसंत नव्हते. त्यामुळे त्याने प्रथम बाहेरच्या दत्तकाची खटाटोप केली. परंतु ती सिद्धीने न गेल्याने बाजीराव ऐवजी अल्पवयीन चिमाजीला स. माधवरावची पत्नी यशोदाबाई, हिच्या मांडीवर दत्तक देऊन पेशवा बनवण्याचा घाट घातला. वस्तुतः नातेसंबंधाने पाहिलं तर बाजीराव आणि चिमाजी हे यशोदाबाईचे चुलत सासरे होत. परंतु राजकारणात असला शास्त्रार्थ पाहिला जात नसतो हेच खरं !

पुढे अनेक कटकारस्थानं होऊन चिमाजीला यशोदाबाईकडे दत्तक देण्यात आले व त्याला पेशवाईची वस्त्रेही मिळाली. परंतु ही मसलत परशुराम भाऊ पटवर्धन आणि शिंदे यांनी सिद्धीस नेली व नानाला राजकारणातून निवृत्त करण्याचा घाट घातला. तेव्हा बुद्धीसागर नानाने महाडचे कारस्थान रचून बाजीरावाला पेशवे पदावर स्थापित केलं. आणि जर खरोखर तटस्थपणे या घटनेचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करायचे झाल्यास पेशवाईची इतिश्री याचवेळी झाली, असेच म्हणावे लागते. कारण या राजकारणासाठी नानाने निजाम, भोसले यांसोबत इंग्रजांची मदत घेतली होती. असो.  ( यासंबंधी विस्तृत विवेचन दुसऱ्या बाजीराव आणि नाना फडणवीस या दोघांविषयीच्या लेख मालिकांमध्ये याच ब्लॉगवर करण्यात आलेलं आहे. )

 दु. बाजीराव गादीवर येताच त्याचे आणि नानाचे शीतयुद्ध पुन्हा सुरू झाले. यावेळी नानाने हाताशी धरलं होतं रघुनाथ रावाचा दत्तक मुलगा अमृतराव याला. अमृतरावाला पुढे करून बाजीरावाला दाबण्याचा किंवा सत्तेवरून खाली खेचण्याचा त्याने प्रयत्न आरंभला आणि या राजकारणात होळकरशाही आपोआप खेचली गेली. कारण काशीराव होळकर हा दौलतराव शिंदेच्या प्रभावाखाली आला होता. तर मल्हाररावाने नाना फडणवीसचा पक्ष स्वीकारला. परिणामी मल्हारराव बेसावध असताना काशीराव आणि शिंद्यांच्या फौजेने  त्याच्यावर हल्ला चढवून त्यास ठार केले. आणि इथून पुढे सुरू होते यशवंतराव होळकराची कहाणी.


 काशीराव होळकरला हाताशी धरून शिंद्याने होळकरी दौलत घशात घालण्याचा जो उपक्रम आरंभला, त्याला विरोध करण्याची जबाबदारी यशवंतराव व त्याचा भाऊ विठोजी यांनी स्वीकारली. आणि या भावांना अंतःस्थ प्रेरणा होती नाना फडणवीसची. विठोजी होळकरने पंढरपूर वगैरे प्रदेशात जो धुमाकूळ घातला असे इतिहासकार सांगतात, तो आरंभी नाना फडणवीस व नानाच्या मृत्यूनंतर अमृतराव पेशव्याच्या आज्ञेनेच. इतकेच नव्हे यशवंतराव होळकर पुढे पुण्यामध्ये आला ती मसलत देखील नानाच्याच सल्ल्याने उभी राहिली होती. फरक फक्त इतकाच की नाना हयात असताना यशवंतरावाला इकडे येण्याची सवय प्राप्त झाली नाही. पुढे नानाच्या मृत्यूनंतर अमृतरावाने बोलावणं पाठवल्यामुळेच तो पुण्याला आला होता ही गोष्ट कागदोपत्री नमूद आहे, परंतु सहसा सांगितली जात नाही.

 चर्चेच्या ओघात आपण थोडं पुढे आलो. यशवंतरावाचा प्रवास इतका सुलभ झाला नाही. नागपूरकर भोसल्यांनी विश्वास देऊन त्याला कैद केलं होतं. तिथून त्याने स्वतःची सुटका केली. नंतर काही काळ तो माळव्यामध्ये पवारांकडे राहिला होता. स्वतःचे लष्करी बळ वाढवत त्याने अशी सेना उभारली जी त्यावेळच्या बलाढ्य गणल्या जाणाऱ्या शिंद्यांच्या फौजेला खुल्या मैदानात समोरासमोर तोंड देऊ शकेल. आणि त्यानंतर सुरू झाली शिकार !

होळकरी दौलत उघड उघड घशात घालण्याचा दौलतरावाने डाव आरंभल्याने यशवंतराव त्याच्या पाठी हात धुवून लागणार हे निश्चित होतं आणि झालंही तसंच ! मग यातून परस्परांच्या मुलखांवर स्वाऱ्या झाल्या, शहरांची नासधूस झाली आणि सरते शेवटी पेशवा ताब्यात घेण्याची वेळ आली. इथे आपल्याला हेतू लक्षात घेणे आवश्यक आहे.

 अमृतरावाने जरी होळकर बंधूंना हाताशी धरलं असलं तरी त्याचा मुख्य उद्देश हा बाजीरावाला सत्तेवरून खाली खेचण्याचा नव्हता तर मुख्य कारभारी पद मिळवण्याचा होता. याचाच अर्थ शिंद्यांचे वजन कमी करणे आणि त्यांना दख्खन मधून हिंदुस्तानात परत पाठवून देणे. आणि ही बाब विना लढाई घडवून येण्यासारखी नव्हती. परिणामी हडपसर येथे शिंदे-पेशवे यांच्या संयुक्त फौजांशी यशवंतरावाचं खूप मोठे युद्ध झालं. ज्यामध्ये यशवंतरावाने उभयतांच्या सैन्याचा पराभव केला. लष्करी आघाडीवर जरी यशवंतराव विजयी झाला तरी राजकीय आघाडीवर मात्र यावेळी त्याचा पराभव  घडून आला. ज्या कामासाठी तो पुण्याला आला होता ते तर झालं नाही. बाजीराव पुणे सोडून वसईला जाऊन बसला. रिकाम्या झालेल्या मसनदीवर बसण्याची हिंमत अमृतरावाला होईना. अमृतरावाच्या मुलाला यशोदा बाईच्या मांडीवर दत्तक द्यावे तर ती रायगडावर बाजीरावाच्या नजरकैदेत. त्यात राजकीयदृष्ट्या अडचण अशी होती की यशवंतराव हा पेशव्यांचाच नव्हे तर होळकरांचाही अधिकृत सरदार नव्हता. म्हणजे तो एक बंडखोरच. त्यामुळे लष्करी जोर असून देखील दुबळ्या अमृतरावामुळे यशवंतरावाचे ही धडाडी वाया गेली.

 बाजीरावाने वसईचा तह करून ब्रिटिश फौज मदतीला आणली. इंग्रजांनी प्रथम बाजीरावाच्या पक्षपात्यांना -/ भोसले व शिंद्याला लोळवून आपल्या सामर्थ्याची झलक दाखवून दिली. इतिहासात नमूद असलेल्या या दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धामध्ये शिंदे-भोसले यांना मदत करण्याची यशवंतरावाची भरपुर इच्छा होती. परंतु त्याचा काटा काढण्याची बाजीरावास असलेली आतुरता व यशवंतरावाचा काटा काढण्यासाठी  शिंदे आणि बाजीराव यांच्यात चाललेल्या गुप्त वाटाघाटी अमृतराव पेशव्याने यशवंतरावास कळवल्यानंतर त्याने या युतीत सहभागी होण्याचे टाळले. परिणामी एकेकाळचे अजिंक्य योद्धे ईस्ट इंडिया कंपनीचे मांडलिक बनवून राहिले.

 शिंदे आणि भोसले जाग्यावर बसताच इंग्रजांनी होळकरांकडे मोर्चा वळवला. पेशवाई आणि त्यांचे मुत्सद्दी काहीही म्हणत असले तरी इंग्रजांच्या लेखी यशवंतराव हाच होळकरशाहीचा अधिकृत वारस होता. त्यामुळे त्यांनी राजकीय व सामारिकदृष्ट्या त्याची नाकेबंदी करण्यास आरंभ केला. नागपूरकर भोसल्यांचा गनिमी कावा व शिंद्यांचे कवायती कंपू, यांचा अल्पवकाशात पराभव केल्याने यशवंतरावाचा पण सहज बंदोबस्त करू अशी इंग्रजांना साधार घमेंड होती. परंतु अल्पवकाशात त्यांना वास्तवाची जाणीव झाली.

 धावपळीच्या तसेच खुल्या मैदानी युद्धांमध्ये यशवंतरावाने इंग्रजांना अक्षरशः रडवले. मॉन्सनला तर आपल्या तोफा सोडून पळून जावं लागलं. जी अत्यंत नामुष्कीची गोष्ट समजली जाते. हिंदुस्थानातील ब्रिटिश सेनापती लॉर्ड लेकला महादजी शिंद्याने उभारलेलं बलदंड लष्कर बुडवल्याचा जो अभिमान होता, अभिमान गर्व होता तो भरतपूरच्या युद्धात यशवंतरावाने पुरेपूर उतरवला.

यशवंतरावाच्या या पराक्रमाची अद्यापही आपल्याला म्हणावी तशी जाणीव नाही. पण एक गोष्ट इथे नमूद करणे मी आवश्यक समजतो की यानंतर ईस्ट इंडिया कंपनीवर हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल बदलण्याची नामुष्की ओढवली. पेशवा, शिंदे, भोसले यांना आपल्या पंखाखाली आणणाऱ्या रिचर्डला वेलस्लीला गव्हर्नर जनरलच्या पदावरून हटवून कॉर्नवॉलिसला परत आणण्यात आले. कॉर्नवॉलिसने बरोबरीच्या नात्याने यशवंतराव बरोबर तह करून हे युद्ध आटोपतं घेतलं. या संघर्षात यशवंतरावाने दिल्लीच्या बादशहाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता जो यशस्वी झाला नाही. पंजाबात जाऊन शिखांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, तोही अपयशी ठरला.  परिस्थिती अशी की बाह्य जगत यशवंतरावाला मराठी साम्राज्याचा घटक मानत होतं.पण ते साम्राज्य किंवा त्या साम्राज्याचे घटकावयव त्याला आपलं मानत नव्हतं. त्यामुळे जिथे पेशवा, शिंदे, भोसले, गायकवाड इत्यादी सरदार त्याच्या पाठीशी उभा राहण्यास कचरत होते तिथे इतरांनी आपले हात का पळून घ्यावेत !

ब्रिटिशांसोबतच्या तहानंतर यशवंतरावाने आपल्या लष्कराची पुनर्रचना आरंभली. तोफांचे नवीन कारखाने काढले. परंतु अविश्रांत परिश्रम व असाध्य रोगाने ग्रस्त असा हा वीर योद्धा दि. २८ ऑक्टोबर १८११ रोजी मरण पावला. परंतु या व्यक्तीच्या पराक्रमाची दहशत अशी की ,मृत्यू पश्चातही सात वर्षे होळकरांच्या राज्याकडे वाकडी नजर करून बघण्याची हिंमत इंग्रजांना झाली नाही.

यशवंतराव होळकर केवळ एक वीर योद्धाच नव्हता तर कुशल राजकारणी देखील होता. पुण्यात जो डाव फसला तो भरून काढण्यासाठी त्याने जो प्रयत्न आरंभला, त्याची सुरुवातच मुळी त्याने स्वतःला राज्याभिषेक करून केली. जी जग दुनिया त्याला उपटसुंभ, बंडखोर, लुटारू म्हणत होती..  त्यांना त्याने स्वतःला अभिषेक करून महाराज म्हणण्यास भाग पाडले. लष्करात नोकरीसाठी येणारे युरोपियन्स..  विशेष करून इंग्रज हे ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध लढण्यास तयार होत नसत किंवा किंवा ऐन युद्धाच्या वेळी ते आपल्या देशबंधूंना सामील होत. त्यांना धडा शिकवण्यासाठी यशवंतरावाने अशा उद्धट अधिकाऱ्यांच्या गर्दनी उडवल्या. ज्यामुळे अधिकारी वर्गाला दहशत बसली व या कृत्यामुळे इंग्रज इतिहासकारांचा यशवंतरावावर अत्यंतिक रोष ओढवला. असो.

 जाता जाता येथे एका मुद्द्याची चर्चा करणे मला आवश्यक वाटते व तो म्हणजे यशवंतरावावर करण्यात आलेला पुणे शहर लुटीचा आरोप. या संदर्भातील सरदेसायांच्या मराठी रियासत खंड ८ मधील पुरावे पाहता अमृतराव पेशव्याने यशवंतरावास लष्करी मदतीच्या बदल्यात काही रक्कम देणे मान्य केले होते. यशवंतराव पुण्याला आला. हडपसरची लढाई जिंकला आणि त्याने अमृतरावाला पुण्यात आणले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे होळकराला कबूल केलेली रक्कम देणे अमृतरावास शक्य नसल्याने त्याने पुणे शहरातून खंडणी वसुलीचा धडाका लावला. या वसुलीचे काम अमृतरावाचा सरदार हरीपंत भावे हा करत होता व त्याच्या मदतीकरता यशवंतरावाने आपले काही सरदार नेमले होते. त्यामुळे यावेळी जे काही अत्याचार अनाचार झाले त्यांची जबाबदारी यशवंतराव पेक्षा अमृतराव पेशव्यावर अधिक येते. परंतु इतिहासकारांचा दुटप्पीपणा असा की पेशवे घराण्याशी संबंधित कुठल्याही व्यक्तीवर उघड  दोषारोप करण्यास त्यांचे मन धजावत नाही. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचं खापर यशवंतरावाच्या माथी मारलं. असो.

लेखाचा समारोप करताना मी एकच म्हणेन की यशवंतराव होळकर यांचे चरित्र अधिकाधिक संशोधित स्वरूपात लोकांसमोर येणे अतिशय आवश्यक आहे. व अनेक ताज्या दमाचे तरुण इतिहासकार या कामी प्रयत्नशील असल्याचे आशादायी चित्रही दिसत आहे. ज्यामुळे केवळ यशवंतरावच नव्हे तर अनेक अशा ज्ञात - अज्ञात,  इतिहासकारांनी हेतूतः खलपुरुष/व्यक्ती म्हणून प्रसिद्ध केलेल्या चरित्रांची उजळ बाजू आपल्यासमोर येत राहील.

1 टिप्पणी:

deom म्हणाले...

आपले पुस्तक कधी प्रसिदध होणार ?