Tuesday, July 24, 2012

इतिहास कोणाचा ? एक चिंतन

            मराठी इतिहास अभ्यासकांना व वाचकांना मराठ्यांचा / ब्राम्हणांचा इतिहास या संकल्पना किंवा विवाद अपरिचित आहेत असे नाही. गतकाळात या दोन जातींनी जो इतिहास घडवला आहे त्याहून अधिक त्यांच्या वंशजांनी आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचे ग्रंथरूपी लेखन केले आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती वाटू नये ! असो, या ठिकाणी आपल्याला हे बघायचे आहे कि मराठी इतिहासात मराठ्यांचा / ब्राम्हणांचा असे इतिहासात काही भेद खरोखर आहेत का ?
               शिवाजीपासून मराठ्यांच्या इतिहासास आरंभ होतो असा एक मतप्रवाह आहे त्याचप्रमाणे शिवपूर्वकाळात देखील मराठ्यांना इतिहास आहे असाही एक मतप्रवाह आढळतो. तसे पाहता दोन्ही मतांमध्ये तथ्य आहे ! मात्र यात फरक इतकाच कि, शिवपूर्वकाळातील मराठ्यांचा इतिहास हा स्वतंत्र मराठा राजघराण्यांचा इतिहास होता असे म्हणता येत नाही.  अर्थात मांडलिक म्हणून जी काही मराठा राजघराणी होती ती एकप्रकारे स्वतंत्रच होती असेही म्हणता येते. नाहीतर मांडलिक या शब्दाचा दुसरा अर्थ  काय  ?  शिवाजीपासून मराठ्यांच्या इतिहासास आरंभ झाला असे जे म्हटले जाते त्यामागील महत्त्वाची भूमिका म्हणजे शिवाजीच्या आधीचे मराठे, परधर्मीय सत्तांच्या व स्वतःच्या स्वार्थासाठी एकमेकांचे गळे कापत. परंतु शिवाजीच्या काळात व नंतर देखील मराठा छत्रपतीसाठी परधर्मियांचे व प्रसंगी सजातीयांचे देखील गळे घोटण्यास मराठ्यांनी मागे - पुढे पाहिले नाही. 
                कोणत्याही काळात, समाजात एक गोष्ट व्यवहारात दिसून येते व ती म्हणजे एखाद्या क्षेत्रात एका विशिष्ट वर्गातील / समूहातील / जातीमधील व्यक्ती अधिकारपदावर असते तेव्हा त्या क्षेत्रात ती व्यक्ती मोक्याच्या आणि अधिकाराच्या जागी स्ववर्गीय / स्वजातीय लोकांची नेमणूक करत असते. या दृष्टीने पाहता शिवाजी देखील या नियमास अपवाद असल्याचे दिसून येत नाही. शिवाजीच्या काळात व त्याच्यानंतर देखील शाहू छत्रपतीपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये लष्करावर मराठा सरदारांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. या काळात दरबारी राजकारणात मराठ्यांचे स्थान जरी दुय्यम असे दिसत असले तरी खुद्द छत्रपती हा मराठा असल्याने व सर्व लष्करी शक्ती मराठा सरदारांच्या हाती असल्याने स. 1630 ते  1749 पर्यंतचा इतिहास हा निर्विवादपणे मराठ्यांचा इतिहास आहे असे म्हणता येते.   
                            स. 1749 ते 1818 पर्यंतचा जो काळ आहे त्या काळाला वरील अर्थाने ब्राम्हणी इतिहास म्हणता येईल का ?  
                 बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव आणि बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्याच्या कारकिर्दीची आरंभीची 10 वर्षे, या काळात कमी - जास्त प्रमाणात लष्करावर मराठा सरदारांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. परंतु, यामध्ये देखील काही भेद आहेत. उदाहरणार्थ -  शिंदे, पवार, भोसले, दाभाडे, गायकवाड या मराठा सरदारांच्या सोबत होळकराचा देखील मराठा सरदार म्हणून उल्लेख होतो. या ठिकाणी ' मराठा ' हि संकल्पना जातीय अर्थाने न घेता व्यापक अशा अर्थाने घेतली जाते असे म्हटले जाते. परंतु जेव्हा, पानिपतच्या रूपाने अपयशाचा तडाखा मराठी राज्याला बसला तेव्हा मात्र केवळ एकट्या होळकराला दोषास पात्र ठरवले जाते. अशा वेळी  ' मराठा ' संकल्पनेचा संकुचित अर्थ घेतला जातो हे उघड आहे. याच धर्तीचे दुसरे उदाहरण म्हणजे, पेशवाईमध्ये विजय मिळाल्यास तो पेशव्याचा, ब्राम्हणांचा किंवा हिंदू धर्माचा असतो आणि पराजय झाला कि तो मराठ्यांचा असतो ! तेव्हा पेशवाईचा इतिहास म्हणजे ब्राम्हणांचा किंवा बामणांचा इतिहास असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा प्रश्न असा पडतो कि, नेमका कोणत्या बामणांचा हा इतिहास ? 
                           आधीच्या परिच्छेदात म्हटल्यानुसार अधिकारी व्यक्ती ज्या वर्गाचे / समुहाचे / जातीचे प्रतिनिधित्व करते, त्या समूहातील / वर्गातील अथवा जातीतील लोकांना योग्य वेळी मोक्याच्या आणि अधिकाराच्या जागा देत असते. या व्यावहारिक नियमास ज्याप्रमाणे शिवाजी अपवाद नव्हता त्याचप्रमाणे पेशवेदेखील अपवाद नव्हते ! कोणत्याही राज्यसत्तेचे बळ तिच्या लष्करी सामर्थ्यात असते. हे लक्षात घेता, पेशव्यांनी संधी मिळताच सजातीय लोकांना या पेशामध्ये येण्यास उत्तेजन दिले त्यात गैर ते काय ! स. 1750 पर्यंत उत्तर हिंदुस्थानात जाधव, पवार, शिंदे, भोसले, होळकर इ. सरदार वावरत होते. त्यांच्या जोडीला हळूहळू विंचूरकर, माणकेश्वर, बुंदेले हे सरदार देण्यात आले. यामागील पेशव्यांचा हेतू काय होता हे अधिक तपशीलवर सांगण्याची गरज आहे का ?
              जे उत्तर हिंदुस्थानात झाले तेच मोठ्या प्रमाणात दक्षिण हिंदुस्थानात झाले. दक्षिण हिंदुस्थानातील मोहिमांमध्ये पेशव्यांची प्रामुख्याने भिस्त सजातीय ब्राम्हण सरदारांवर असल्याचे दिसून येते. याचा असाही अर्थ काढता येऊ शकतो कि, डोईजड मराठा सरदारांना पर्याय म्हणून पेशव्यांनी सजातीय सरदार निर्माण केले. अर्थात, हा केवळ तर्क आहे याची वाचकांनी जाणीव ठेवावी ! नानासाहेब पेशव्याच्या नंतर पुणे दरबारात व लष्करात मराठ्यांचे वर्चस्व कमी होऊन ब्राम्हणांचे वाढू लागले. या पार्श्वभूमीवर पेशवाईचा इतिहास हा ब्राम्हणी इतिहास म्हटला जाऊ शकतो पण अधिक विचार केला असता असे म्हणणे धाडसाचे असल्याचे दिसून येते. 
                     दरबारात व लष्करात ब्राम्हणी सरदारांची संख्या जरी वाढली असली तरी प्रसंग पडला असता पेशव्यांना मुख्य आधार मराठा सरदारांचाच होता. बरे, त्यातही आता निव्वळ मराठा आणि बिनमराठा असाही भेद निर्माण झाला होता. अर्थात, होळकराच्या रूपाने तो भेद आधीपासूनच अस्तित्वात होता आणि होळकर हे नाव त्यामानाने प्रसिद्ध असल्याने ते एकमेव आणि अपवादात्मक उदाहरण असावे असा वाचकांचा ग्रह होण्याची दाट शक्यता आहे. परंतु, पेशवे काळात लष्करी चाकरीत निव्वळ ब्राम्हण अथवा मराठा जातीतील लोकच पुढाकार घेत होते असे नसून महाराष्ट्रातील अठरापगड जातींचा त्यात सहभाग असल्याचे दिसून येते.
                      कित्येक वाचकांना पुढील काही काही विधाने वाचून धक्का बसेल. पेशवेकाळात मोठा / चांगला पराक्रम गाजवणाऱ्या व्यक्तीस ' उडत रुमाल ' नामक पदवी दिली जात असे. अर्थात हि पदवी मोठ्या बहुमानाची असून,  हि पदवी अथवा हा बहुमान देताना व्यक्तीची जात लक्षात न घेता त्याचा पराक्रम पाहिला जात असे. हा बहुमान आजकाल ज्यांना ' दलित ' म्हटले जाते त्यांना देखील दिला गेल्याचे तत्कालीन लेखांमध्ये नमूद आहे. { वि. सु. : - प्रस्तुत ठिकाणी  ' दलित ' या संज्ञेमध्ये निव्वळ महार / नवबौद्ध समाविष्ट नसून सर्वच अस्पृश्य जातींचा समावेश आहे. }  पेशवाई अखेरच्या काळात तर प्रमुख मराठा सरदार मुख्य सत्तेपासून किंवा प्रवाहापासून अलग राहिल्याचे दिसून येते. या निर्णायक काळात ब्राम्हणांच्या जोडीने सध्याच्या मराठा व्यतिरिक्त  बहुजन समाजातील कर्तबगार व पराक्रमी व्यक्तींनी  सहभाग घेतला होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
           सारांश, स. 1749 ते 1818 हा जो काही 60 - 70 वर्षांचा काळ आहे त्या काळाचे प्रथमदर्शनी नायकत्व ब्राम्हणवर्गाकडे असल्याचे दिसून येत असले तरी त्या काळाचे खरे नायक म्हणजे महाराष्ट्रीयन / मराठी लोक आहेत. ज्यामध्ये महराष्ट्रातील तत्कालीन व सध्याच्या सर्व जाती - जमातीच्या कर्तबगार व्यक्तींचा समावेश होतो. एकूणच, स. 1630 ते 1749 पर्यंतचा इतिहास हा ज्याप्रमाणे मराठ्यांचा इतिहास म्हणून ओळखला जातो त्याप्रमाणे स. 1749 ते 1818 पर्यंतच्या कालखंडातील इतिहास हा निव्वळ ब्राम्हणांचा इतिहास आहे असे न म्हणता तो ब्राम्हण व इतर सर्व जातींचा मिळून संमिश्र असा मराठी लोकांचा इतिहास होता असे म्हणता येईल. 
                              

4 comments:

Sanjay Sonawani said...

Very Good analysis my dear brother.

spartan said...

really great article...!!

शांतीसुधा (Shantisudha) said...

इतिहास या शब्दाची फोड "इति-ह-आस: हे असे घडले" अशी आहे. एखादी गोष्ट जेव्हा घडत असते तेव्हा त्या गोष्टीकडे प्रत्येक जण आपापल्या दृष्टिने पहात असतो. म्हणूनच इंग्रजांचा इतिहास म्हणजे इंग्रजांनी त्या गोष्टी ज्या पद्धतीने पाहिल्या आणि लिहील्या तो मजकुर. आता यात पुन्हा पेशवेकालिन इतिहास, शिवकालिन इतिहास म्हणजे देखिल तसेच. पेशव्यांच्या काळात तसेच शिवाजी महाराजांच्या काळात घडलेल्या घटनांची नोंद त्यांच्या दरबारी असलेल्या लोकांकडून त्यांनी करून घेतली तो मजकूर. हेच सर्व आपण राजपूत लोकांचा इतिहास, शिखांचा इतिहास या बाबत म्हणू शकतो. त्यात ब्राह्मण आता मराठ्यांचा इतिहास, ब्राह्मणांचा इतिहास हे वर्गिकरण नंतरच्या काळात मराठा आणि ब्राह्मण समाजातील लोकांनी इतर वाचलेल्या इतिहासांचे स्वत:च्या दृष्टिकोनातून जे आकलन केले आणि लिहीले तो मजकूर असे म्हणता येईल. म्हणजे खरं तर तो इतिहास नाहीच. ते एक इंटरप्रीटेशन आहे. सध्याच्या काळात केवळ राजकिय स्वार्थासाठी हे असले भेद करून समाजामधे दुही पसरवून स्वत: सत्ता मिळवण्यासाठी चालू आहे. यात इतिहासाच्या दृष्टिने काहीही तथ्य नाही असे मला वाटते.

Anonymous said...

अप्रतीम लेख


पण एक शंका आहे

काहीजण म्हणतात की पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले


पण जेव्हा पानीपत युद्‌ध घडते तेव्हा मात्र मराठ्यांचे पानीपत झाले असे का म्हणतात