शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

प्रकरण ८) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी





    मागील प्रकरणात आपण औरंगच्या साम्राज्यविस्तार धोरणातील शिवाजीच्या भूमिकेची थोडक्यात चर्चा केली. प्रस्तुत प्रकरणात आपण शिवाजीच्या स्वतंत्र राज्यस्थापन, विस्तार व अफझलखानाच्या स्वारीची थोडक्यात माहिती पाहू.


    स. १६५८ च्या आरंभी औरंगजेब वारसा युद्धांत सहभागी होण्यासाठी उत्तरेत रवाना झाला. तोपर्यंतची मोगलांची स्थिती अशी होती :- स. १६५७ च्या डिसेंबरमध्ये गुजरातचा सुभेदार शहजादा मुरादने स्वतःला बादशाह म्हणून घोषित करत लष्करी तयारीकरता सुरतेची लुट केली. तिकडे बंगालमध्ये सुजानेही स्वतःला बादशाह म्हणून घोषित करत गडबड उडवून दिली होती. दिल्लीला दारा शुकोहने बादशाही पद वा तख्त हाती न घेता फक्त सर्वाधिकार हाती घेऊन पडद्यामागील सूत्रधाराची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला. जो त्याच्या अंगी आला. त्याउलट औरंगने आपलं धोरण आगाऊ जाहीर न करता परिस्थितीनुसार वागण्याचा निर्णय घेतला.


    या चार शहजाद्यांच्या महत्त्वाकांक्षा, भूमिका काहीही असल्या तरी त्यांपैकी आपल्या बंडखोरीचा --- यशस्वी झाल्यास न् झाल्यास हा भाग वेगळा --- मोगल साम्राज्याला अधिक फटका बसू नये याची सर्वधिक काळजी औरंग घेत असल्याचे दिसून येते. असो.


    औरंगने दख्खन सोडताना आपल्या पाठीमागे शिवाजी - आदिल परस्परांशी झुंजत बसतील असाही सोय केली होती असं म्हणणं सयुक्तिक ठरणार नाही. कारण शिवाजीची नव्याने उदयास येणारी सत्ता मोगल - आदिलच्या सरहद्दी दरम्यान असल्याने व शिवाजीचा प्रमुख उद्योग आपल्या ताब्यातील भूप्रदेशास सलग असलेला भाग जिंकून घेण्याचा --- विशेषतः आधीच्या निजामशाहीत मोडणारा प्रदेश ताब्यात घेण्याचा असल्याने आदिल व शिवाजी यांचं झगडा जुंपणे अपरिहार्य होते.


    इथे एक महत्त्वाची बाब मी नमूद करू इच्छितो व ती म्हणजे शिवाजीचं राज्य मूळ आदिलशाहीत मोडणाऱ्या भूप्रदेशाचं मिळून बनलेलं, अशा आशयाच्या सिद्धांताचा पुरस्कार आजवर इतिहासकारांनी केला आहे, तो पुराव्यांनी साफ चुकीचा असल्याचे दिसून येते.


    स.१६३६ पर्यंत शहाजीने निजामशाही उभारण्याकरता जो भूप्रदेश ताब्यात घेतला --- ज्यातील बव्हंशी मूळ निजामशाहीचाच भाग होता --- तोच प्रदेश शिवाजीने फिरून जिंकण्याची खटपट आरंभली होती. मात्र, शहाजी - शिवाजीच्या भूमिकांतील फरकामुळे दोघांच्या योजनांना वेगवेगळे फळ प्राप्त झाले. शहाजीने सर्व उद्योग निजामशहाच्या नावाने केला. परंतु शिवाजीने प्रथमपासूनच स्वतंत्र वर्तनाचा मार्ग स्वीकारला होता. ज्यामुळे त्याच्या पदरी असणाऱ्यांच्या वृत्तीला एक वेगळे वळण लाभले, त्याचप्रमाणे त्यांस आपल्या स्वतंत्र भूमिका, वर्तनाचा फायदाही झाला. तसेच शिवाजीने आपला राज्यविस्तार करताना संरक्षण व आक्रमण या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊनच पद्धतशीरपणे मोहीम आखल्याचे दिसून येते. परंतु या सर्वांची चर्चा करण्यापूर्वी आणखी एका मुद्द्याची आपण संक्षिप्त चर्चा करू.


    शिवाजीने निर्मिलेलं राज्य निजामशाही प्रदेशात असलं तरी त्यांस इतकं यश, तेही अल्पावधीत कसं काय लाभलं असावं ? स. १६३६ मध्ये जीवाचं रान करून आदिल - मोगल या संयुक्त आघाडीने निजामशाही खालसा केली खरी, परंतु निजामशाहीच्या प्रदेशावर पूर्णतः ताबा बसवणे त्यांना शक्य झालं नाही. उदाहरणार्थ, जंजिरेकर सिद्दी स. १६४२ पर्यंत विजापूरकरांना जुमानत नव्हता. आदिलशहाने महत्प्रयासाने त्यांस आपली चाकरी बजावण्यास भाग पाडले. स. १६४६ पर्यंत कुडाळकर सावंतही विजपुरकरांकडे सामील झालेला नसल्याचा तर्क बांधता येतो. म्हणजेच कोकणात विजापूरकरांचा तितकासा जोर दिसत नव्हता. या प्रदेशातील मुळचे संस्थानिक नाममात्र मांडलिकत्व स्वीकारत होते व त्यावरच निजाम, आदिल वा मोगलांसारखे सत्ताधीश खुश होत असत. असो.


    शिवाजीने जावळी पालथी घालताच कोकणात उतरून तिकडून आदिलशाहीस चाप लावत आपल्या राज्यविस्तारास आरंभ केला. तेव्हा शिवाजीचा बंदोबस्त करण्याच्या हेतुस्तव आदिलशहाने स. १६५८ मध्ये रुस्तमेजमानला कुडाळवर स्वारी करण्यास पाठवले. रुस्तमने कुडाळकरांना चांगलेच रगडून काढले खरे, परंतु त्याचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजीला होऊन पुढच्याच वर्षी --- म्हणजे स. १६५९ मध्ये कुडाळकर सावंताने शिवाजीचं मांडलिकत्व स्वीकारणारा पुढील तह पदरात पाडून घेतला :-


ले. १ ]                       [ श. १५८० फा. व. ७ 

(४११) ]                       [ ता. ५ मार्च १६५९

                     श्री

सन १०६८ फसली                   फेरीस्त नंबर

       तहनामा राजश्री खेम सावंत व लखम सावंत देसाई बहादूर प्रांत कुडाळ यांजकडील पीतांबर शेणवई कारभारी येऊन ठराव करून दिला सुरु सन तिस्सा खमसैन अल्लफ

प्रांत मजकूरचे महाल वगैरे चालत आहेत. आकार होईल त्याचा ऐवज दरसाल निम्मे हुजूर पावता करावा, निम्मा आकार राहील त्यांत तीन हजार लोक पायदळ हेटकरी ठेवावे आणि ज्या वेळेस हुजूर चाकरीस बोलाविले जातील तेव्हां तीन हजार लोकांनिशी सेवा करावी. खांसा जातीने येण्याचे प्रयोजन पडेल तेव्हां बोलावणे होईल तेव्हां येत असावे.                  कलम १


किल्ले फोंडे प्रांत तालुका घेऊन हुजर ठेविला त्यास हरएक प्रसंगास कुमक राखीत जावी. बिदनूर वगैरे संस्थानच्या खंडण्या घेण्यास स्वारी होईल त्यांच्या कुमकेस जात असावे.      कलम १


स्वराज्य साधनाच्या ठायी वकीलापाशी मध्ये राहून तुरुक लोकांचे साधन करावे.  कलम १


प्रांतांतील जमाबंदीच्या चौकशीस हुजुरून कारकून व लोक राहतील ते ठेवून त्यांच्या नेमणूकीबद्दल हुजूर अमल पैकी पावते करावे.            कलम १


प्रांत मजकूरची देशकत वतने तुमची व बहादूर किताब अजरा [ मऱ्हा ] मत चालेल. त्यांतील किल्ले, कोट व ठाणी तुमच्या स्वाधीन केली आहेत. तेथे दस्तान करून जतन करावी. तेथे हुजूरचे कारकून व लोक येतील ते ठेवावे.   कलम १


शके १५८० विलंबीनामसंवत्सरे फाल्गुन वद्य ७. एकूण पांच कलमे करार करून तहनामा दिला असे " मोर्तब. "


( संदर्भ ग्रंथ :- काव्येतिहास संग्रहांत प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रें यादी वगैरे लेख

संपादक :- गो. स. सरदेसाई, या. मा. काळे व वि. स. वाकस्कर. )       


    उपरोक्त तहाची चर्चा करण्यापूर्वी स. १६५६ च्या एका संदिग्ध पत्राचा येथे विचार होणे अत्यावश्यक आहे. पत्रसार संग्रह ले. क्र. ( २३२० = ७२० अ ) नुसार महंमद आदिलशहा खेम सावंतास लिहितो कि, " तुम्ही वडिलार्जित चाकरीवर आला, ठीक केले. कोणते तऱ्हेने राजा संभाजीशी ममता राखून मोगल याजबरोबर मैत्री न ठेवावी. बादशाही मुलखाची आबादानी करून कुमकेकरितां हुजूर फौजेत येणे. एक हुशार मनुष्य पाठवणे. " या पत्रातील राजा संभाजी कोण, याचा उलगडा होणे आवश्यक आहे. कदाचित शिवाजी ऐवजी संभाजी असेही वाचन झाल्याची शक्यता आहे. परंतु यावर पुराव्याअभावी अधिक काथ्याकुट करता येत नाही. दुसरे असे कि, उपरोक्त पत्रान्वये स. १६५६ मध्ये सावंतही आदिलशहाला पूर्णतः रुजू नसल्याचे दिसून येते. बहुधा यामुळेच स. १६५८ च्या पूर्वार्धात विजापूरकरांनी कुडाळवर स्वारी पाठवली असावी. असो.


    यास्थळी हे देखील नमूद करणे योग्य ठरेल व ते म्हणजे स. १६५८ च्या ऑक्टोबर मध्ये शिवाजी कर्नाटक स्वारीत होता. परंतु त्याची मोहीम नेमकी कोणत्या भागात चालली होती याची स्पष्टता होत नाही. असो. आता आपण शिवाजी - कुडाळकरांमधील तहाची चर्चा करू. 


    या तहाच्या संदर्भात ' शककर्ते शिवराय ' मध्ये विजय देशमुखांनी अशा आशयाचं विधान केलंय कि, प्रस्तुत तह शिवाजीच्या स. १६६४ च्या कुडाळ स्वारी वेळी बनला असावा. परंतु आपल्या मताच्या पुष्टीकरता त्यांनी संदर्भ वा पुरावे दिले नाहीत. प्रस्तुत तहनाम्यावरील हा आक्षेप लक्षात घेऊन खरे जंत्री नुसार यांच्या तारखांचा तपास केला असता तारखांचा घोळ नसल्याचेही स्पष्ट होते. तेव्हा सदर तहनामा हा स. १६५९ चाच असल्याचे सिद्ध होत असले तरी काही बाबी निश्चितच संशयास्पद आहेत, ज्यांचे निरसन करण्यास आवश्यक ते पुरावे उपलब्ध झाले नाहीत.


    या तहातील एका कलमात बेद्नुर संस्थानच्या खंडणी वसुलीचा उल्लेख आहे. त्यावरून स. १६५९ मध्ये बेद्नुरकर शिवाजीचा मांडलिक असल्याचे दिसून येते. परंतु याला प्रत्यंतर पुराव्याची जोड, मला मिळाली नाही. त्याचप्रमाणे फोंड्याबाबतही तीच स्थिती आहे.

कुडाळकरांना आपल्या अंकित करून शिवाजीने कोकणात जशी आपली सत्ता विस्ताराली त्याचप्रमाणे कोकणातून कोल्हापूर - पन्हाळ्यावर झडप घालण्यासाठी त्याला एक सोयीस्कर मार्गही खुला झाला. पन्हाळ्याचा मजबूत किल्ला विजापूरच्या सरहद्दीच्या रक्षणाची मोठी भूमिका बजावत असल्याने पन्हाळा जिंकून विजापूरच्या उरात भाला खुपसण्याची इच्छा यावेळी कदाचित शिवाजीच्या मनी असल्याने त्याने या अनुषंगानेही कुडाळकरांना आपल्या पंखाखाली घेतले असावे. तसेच शिवाजी याच समयी आपलं नौदल उभारत असल्याने किनाऱ्यावरील चौल, वसई, गोव्यासारखी स्थळे व्यापणाऱ्या पोर्तुगीजांसारख्या प्रबळ युरोपियन सत्तेला धाकात ठेवण्यासाठीही कोकण किनारा, शक्य तितक्या सलग प्रमाणात त्यांस ताब्यात ठेवणे अत्यावश्यक होते. मिळून या स्वारीमुळे शिवाजीचे एकाहून अधिक हेतू साध्य होणार होते.


    या स्थळी एक प्रश्न उद्भवतो कि, यासमयी रुस्तमेजमान व विजापूरकर काय करत होते ? इतिहासकारांच्या मते रुस्तम व शिवाजीचा पूर्वापार मैत्रीसंबंध होता. त्याचा बाप रणदुल्लाखान हा शहाजीचा मित्र असून मैत्रीचा वारसा पुढच्या पिढीतही चलला असल्याने रुस्तमने शिवाजीच्या कोकणातील प्रवेशाकडे सहेतुक दुर्लक्ष केले तर आदिलशाही दरबार यावेळी डचांकडून पैसा उकळून पोर्तुगीजांवर स्वारी करण्याच्या प्रयत्नांत होता. वस्तुतः अशी स्वारी होऊ नये म्हणून पोर्तुगीजांनी एक लक्षाचा नजराणा दरबारात भरला होता. परंतु डचांनी याहून अधिक मोठा नजराणा देऊ केल्याने आदिलशहाने हा सौदा स्वीकारला. याचं फलित म्हणजे मडगावजवळ त्याला मार खाऊन परत यावं लागलं. ( स. १६५९ ) असो.


    कुडाळकरांनी जरी शिवाजीचं मांडलिकत्व स्वीकारलं असलं तरी ते फार काळ त्यांस रुजू राहिले नाहीत. विजापूरकरांनी अफझलखानाची रवानगी शिवाजीवर करताच कुडाळकरांनीही लगेच रंग बदलला असा पसासं ले. क्र. ( २३२१ = ७७१ अ ) स. १६५८ - ५९ मधील " घाटाचे पायाखालील तमाम परगणे इनाम दिले. जमाबंदी करणे. वाजवी वसूल घेणे. आदलखान अमलांत हिंदवीत लिहिल्याप्रमाणे मसुरा वगैरे १३ गावे हक्कासह इनाम दिली. घाटावरून फौजा येतील तेव्हा हजर राहणे. रहदारीस हरकत न होईसा बंदोबस्त करणे. " या मजकुरावरून तर्क करता येतो. परंतु सदर पत्राची निश्चित तारीख उपलब्ध नसल्याने यावर अधिक चर्चा अशक्य आहे.


    शिवाजीची वाढती सत्ता जमल्यास नियंत्रणात आणण्यासाठी वा नष्ट करण्यासाठी आदिलशाही विशेष उत्सुक असली तरी याकरता लागणारे पुरेसं सैनिकी सामर्थ्य त्यांच्याकडे अजिबात नव्हतं. त्यामुळेच हरप्रयत्ने शिवाजीचा बंदोबस्त करण्याकरता त्यांनी आपला सर्वोत्तम सरदार --- अफझलखान याकामी नेमला.


    अफझलच्या निवडीमागे बऱ्याच इतिहासकारांनी अफझल व भोसले घराण्याचा दावा असल्याचा एक सिद्धांत प्रचलित केला आहे. त्याची सत्यासत्यता पडताळून पाहण्याआधी काही गोष्टी येथे विचारात घेणे आवश्यक आहे. विजापूरची आदिलशाही मोडकळीस आली असून काही मोजके एकनिष्ठ सरदार अपवाद केल्यास उर्वरित आदिलशाही सरदारांचा भर सवता सुभा निर्माण करण्यावरच होता. दुसरे असे कि, महंमद नंतर तख्तावर बसलेला अली हा अनौरस पुत्र असल्याने शहाजी, बहलोलखान, रुस्तमजमा इ. चा त्याच्या वारसा हक्कावर आक्षेप होता. अशा स्थितीत निव्वळ आदिलशाही अभिमानी व पराक्रमी असा अफझलखान आदिलशहास शिवाजीरुपी संकटावर उतारा वाटल्यास त्यात नवल ते काय !


    शिवाजीवर अफझखानास रवाना करण्यामागे आदिलशहा --- विशेषतः बडी बेगमचे निश्चितच एक धोरण ठरलेलं होतं. शिवाजीचं अस्तित्व व त्याचं वाढत जाणारं प्रस्थ आदिलशाहीच्या नाशास कारणीभूत ठरण्याची तिला रास्त भीती वाटत होती. जरी मोगल दख्खनी सत्तांचे स्वाभाविक शत्रू असले तरी समानधर्मीय तसेच प्रसंगी गोवळकोंड्याच्या मदतीच्या भरवशावर आदिलशाही स्वतःचा बचाव करू शकत होती. शिवाय अफझलची शिवाजीवर नियुक्ती करेपर्यंत जरी वारसा युद्धाचा निकाल लागला नसला व अफझल विजापूरातून निघण्यापूर्वी औरंग तख्तावर बसला असला तरी आधी म्हटल्याप्रमाणे धार्मिक कट्टरता वा प्रेमाच्या बळावर मोगली तडाख्यातून या शाहीचा बचाव करण्याची बडी बेगमला उमेद असावी. अर्थात, जास्त व्यावहारिक विचार केला असता शहजादा औरंगने स्वतःच्या मर्जीने अनाधिकारपणे का होईना विजापूरकरांना निजामशाही कोकणचा भूप्रदेश देऊ केल्याने --- जो सध्या शिवाजीच्या ताब्यात होता --- तो प्रदेश फिरून जिंकून घेऊन आपले बळ वाढवणे व भविष्यातील मोगल - शिवाजी अशा संभाव्य युतीला मुळातच खुडून टाकणे असाही दृष्टीकोन विजापूरकरांचा असू शकतो. तात्पर्य, शिवाजी - आदिलशहा यांच्यातील झगडा एका निर्णायक टप्प्याजवळ येऊन पोहोचला होता. या लढ्यात जो जिंकेल त्याचेच नंतर वर्चस्व राहणार होते, हे उघड आहे.


    विजापूरकरांनी शिवाजीवरील स्वारी आखली खरी परंतु अलीकडच्या काळातील सततच्या मोहिमांमुळे लष्करीदृष्ट्या त्यांना आवश्यक तितके बळ जमवता न आल्याचे उपलब्ध साधनांवरून दिसून येते. अफझलच्या सैन्याचा सरासरी आकडा पंधरा ते वीस हजारांच्या दरम्यान जातो. त्याउलट शिवाजीकडे याहून अधिक सैन्य असल्याचे दिसून येते. परंतु इतिहासकारांनी वस्तुनिष्ठ पद्धतीने घटनेचं आकलन करून न घेता, या प्रकरणाचे एकंदरच काल्पनिक - अद्भुत वर्णन करण्यातच धन्यता मानल्याचे दिसून येते.


    उदाहरणार्थ, अफझलखानाची शिवाजीवरील मोहिमेसाठी नियुक्ती जरी एप्रिल - मे मध्ये झाली असली तरी प्रत्यक्षात तो स्वारीकरता विजापुरातून सप्टेंबर मध्ये बाहेर पडला. परंतु तत्पूर्वीच शिवाजीला त्याच्या हालचालींची आगाऊ वार्ता लागली होती. इतिहासकार सांगतात, समजतात त्याप्रमाणे शिवाजीच्या अनुरोधाने खानाच्या हालचाली होऊन तो जावळीत शिरला. परंतु वस्तुस्थिती वेगळीच दिसते. जावळीकर मोऱ्यांचा एक वंशज -- प्रतापराव मोरे विजापूरच्या आश्रयास असून विजापूरकरांच्या सहाय्याने त्यांस आपलं गमावलेलं राज्य मिळवण्याची मोठी आशा वाटत होती. प्रतापराव व त्याचे सैन्य त्या प्रांताचे माहितीगार असल्याने, तो प्रांत नुकताच शिवाजीकडे नुकताच आल्याने व वाईकडचा सरसुभेदार म्हणून खानाची नियुक्ती झालेली असल्याने अफझलखानाच्या स्वारीचा मुख्य रोख जावळी प्रांताकडेच असल्याचे शिवाजीने ताडले होते व अफझलही जवळपास याच आराखड्यांनी चालला होता. ( मूळ सिद्धांत शिवचरित्र निबंधावलीत असून शब्दांकन माझे असल्याची नोंद घ्यावी. )


    खानाचे हे नियोजित बेत उधळून लावण्याची शिवाजीने दोन आघाड्यांवर तयारी चालवली. खान आला तर थेट वाई वा जावळी परिसराच्या रोखानेच येणार हे हेरून शिवाजीने जशी बचावाची सिद्धता चळवळी --- ज्यामध्ये ओस पडलेला जासलोडगडाचे ' मोहनगड ' असे नामांतर करून तो वसवण्याची त्याने तजवीज केली --- त्याचप्रमाणे खानाच्या जहागीर प्रदेशात -- तेरदळ भागावरही एक आघाडी रवाना केली. जेणेकरून खान आपल्या जहागिरीच्या बचावार्थ पुण्याचा रोख सोडून कर्नाटकात गुंतून पडेल. परंतु शिवाजीच्या सैन्याला त्या भागातील कृष्ण गौड देसाईने उधळून लावले व खानानेही या स्वारीची फारशी तमा बाळगल्याचे दिसून येत नाही.


    या संदर्भात शिवचरित्र प्रदीप मध्ये पृष्ठ क्र. ८३ ते ८६ वर छापलेली पत्रं विशेष उपयुक्त असून त्यानुसार शिवाजीने या प्रांती सुभेदार गंगाजी महादेवला पाठवल्याचे स्पष्ट होते. या स्वारीत कृष्ण गौडा मारला गेल्याचा एका पत्रात उल्लेख आहे परंतु हा प्रकार नेमका कधी घडला --- म्हणजे दि. ७ ऑक्टोबर १६५९ चं अफझलचं पत्र तेरदळ परगण्याच्या कारकुनांना उद्देशन लिहिलेलं असून त्यानुसार शिवाजीच्या सैन्याचा बंदोबस्त केल्याबद्दल कृष्ण देसाईला इनाम दिल्याचा उल्लेख आहे. परंतु कृष्ण देसाई मेल्याविषयीचा उल्लेख नाही. असो. परंतु यावरून असे दिसून येते कि, खान शिवाजीला मोकळ्या मैदानात खेचायला बघत होता व शिवाजी खानला जावळीत ओढू पाहत होता, असा सर्वसाधारण समज असल्याप्रमाणे प्रकार नसून प्रत्यक्षात उभयतांचे डावपेच काही वेगळेच असल्याचे दिसून येते. असो.


    वाईजवळ आल्यावर खानाने शिवाजीच्या प्रदेशात ठिकठिकाणी आपले सरदार रवाना करून शिवाजीचे राज्य ताब्यात घेण्याची व त्याचे लष्करी बळ ठिकठिकाणी विखुरले जावे यासाठी कारवाई आरंभली. त्यानुसार पुणे प्रांती सिद्दी हिलाल, सुप्यावर जाधव, शिरवळवर नाईकजी पांढरे, सासवडवर खराटे तर तळकोकणात सैफखानास खानाने रवाना केले. या सरदारांच्या प्रतिकारार्थ शिवाजीने काय योजना आखल्या याची पुरेशी माहिती मिळत नाही. लष्करी कारवाई सोबत खानाने --- विशेषतः आदिलशहाने शिवाजी विरोधात राजकीय आघाडीवरही बरीच मुसंडी मारली होती. शिव्जीला सामील झालेल्या व त्याच्या राज्यातील बहुतांशी देशमुख वतनदारांना फितवण्याची त्याने पराकाष्ठा केली व त्याच्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यशही आले. शेवटी दीडशे वर्षांच्या प्रस्थापित राजवटीचे जनमानसावरील परिणाम हे त्या राजवटीस अनुकूल असेच होणार !


    वाईला तळ ठोकून खानाने जी काही राजकीय - लष्करी मोहीम शिवाजीविरुद्ध चालवली होती त्यांस शक्य तितका प्रतिकार करण्याची शिवाजीने शिकस्त केली असली तरी या लढ्याचा निर्णायक टप्पा नजरेत येत नव्हता व या पद्धतीने निकाल लागणंही शक्य नव्हतं. लष्करीदृष्ट्या उभय पक्ष तुल्यबळ असले तरी एकाच लढाईत सर्व बळ एकवटण्याचा जुगार खेळणे शिवाजीच्या नव्या सत्तेला परवडणारे नव्हते. त्याचप्रमाणे मोहिमेकरता आदिलशहाने कितीही प्रचंड प्रमाणात आर्थिक तसेच दारुगोळा, अन्नधान्याची तरतूद केली असली तरी औरंगजेब तख्तारूढ झाल्याने मोगलांच्या हस्तक्षेपाची शक्यताही नाकारता येत नव्हती. तात्पर्य, मोहीम कशाही प्रकारे का होईना शक्य तितक्या लवकर आटोपणे उभयतांनाही आवश्यक झाले होते व त्यानुसार खानाने वाटाघाटीचा मार्ग अवलंबला. ज्यानुसार शिवाजीने तहास प्रवृत्त होऊन आपल्या भेटीस येण्यास तयार व्हावे अशी खानाने खटपट आरंभली.


    खानाच्या हेतूंची शिवाजीस कल्पना असल्याने त्याने खानाच्या गोटात जाण्याचे अखेरपर्यंत टाळले व खानाचे आवडते भक्ष्य -- म्हणजे जावळीचा प्रांत व स्वतः शिवाजी --- यांची त्याने खानास लालूच दाखवत त्यांस जावळीत खेचण्याचा उपक्रम आरंभला. इथे जावळीचे रणक्षेत्र कोणाच्या सोई वा अडचणीचे हा प्रश्नच मुळी उद्भवत नाही. कारण हे रणक्षेत्र तसेही उभयतांच्या सोईचेच होते. शिवाजी व त्याचे सहाय्यक जसे या प्रदेशाचे जाणकार होते तद्वत खानाच्या फौजेतील मोरे, खोपडे प्रभूती मंडळीही इथली माहितीगार होती. शिवाय आरंभी खान जावळीकडे न यावा अशी शिवाजीचीच इच्छा असल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते. परंतु एकदा खानाचा कल त्या भागातच घुसण्याकडे विशेष असल्याचे लक्षात येताच शिवाजीने स्थिती अनुकूल बनवण्याकरता शक्य तितके प्रयत्न केले.


    त्याने प्रथम खानास हरप्रयत्ने ससैन्य जावळी खोऱ्यात, प्रतापगडानजीक येण्यास भाग पाडले. लष्करासह त्या प्रदेशात शिरण्याचे प्रलोभन खानास आवडणारेच होते. अनायासे त्या प्रदेशात होणारा शिरकाव व प्रत्यक्ष भेटीचा होणारा लाभ या गोष्टींचा मोह तो कसा काय टाळणार होता ? खान प्रतापगडानजीक येईपर्यंत त्याला कसलाही उपसर्ग पोहोचू नये याची शिवाजीने पुरेपूर काळजी घेतली. याचाच अर्थ असा कि, सावज टप्प्यात येईपर्यंत गप्प राहून वाट पाहण्याची त्याने भूमिका त्याने स्वीकारली. त्याचप्रमाणे अंतस्थरीत्या त्याने आणखी एका डावाची तयारी आरंभली होती ज्याची अफझल वा आदिलशहास बहुधा अजिबात कल्पना नव्हती !    

    शिवाजीच्या विनंतीवरून खान प्रतापगडाकडे निघाला खरा परंतु मार्गातील मोक्याच्या जागा ताब्यात ठेवण्याचा त्याने काही प्रयत्न केल्याचे उल्लेख आढळून येत नाहीत. जर तो जावळी जिंकण्यास आत शिरला होता तर त्याने अशी बेपर्वाई दाखवावी याचं मोठं आश्चर्य वाटते. असो. प्रत्यंतर पुराव्यांअभावी याविषयी अधिक न लिहिणे श्रेयस्कर.


    वकिली बोलाचाली होऊन खान - शिवाजीच्या भेटीचा तपशील, सावधगिरीच्या उपाययोजना कशा प्रकारे ठरल्या याची तपशीलवार चर्चा बऱ्याच शिवचरित्रांत आल्याने त्याची इथे उजळणी करत नाही. मात्र प्रत्यक्ष भेटीच्या आरंभी उभयपक्षी परस्परांना दगा करण्याची इच्छा मनात भरपूर असल्याचे सूचक निर्देश करणारे तपशील मात्र उपलब्ध साधनांत भरपूर प्रमाणात आढळत असल्याचे नमूद करतो.

ससैन्य खान प्रतापगडाच्या पायथ्याजवळ येताच शिवाजीने चौफेर लष्कराचा पेरा करून ज्या प्रकारे त्याची छावणी वेढून घेतली होती, त्यावरून भेटीचा निकाल काहीही लागला तरी खानाचे सैन्य बुडवण्याचा त्याचा निर्धार यातून स्पष्ट होतो. त्याचप्रमाणे खान शक्यतो एकाकी भेटीस कसा येईल याकडेही त्याने विशेष लक्ष पुरवले होते. शेवटी विजापुरी दरबारचा तो मुख्य आधारस्तंभ होता. त्यालाच फोडल्याशिवाय विजापुरी सत्ता नरमणार नाही, याची शिवाजीला पुरेपूर जाणीव होती.


    इकडे खानही काही कमी नव्हता. भेटीचे तपशील, स्थळ निश्चित झाल्यावर प्रत्यक्ष भेटीच्या वेळी छावणीतून बाहेर पडताना त्याने प्रत्येक अटीचा भंग करण्यास आरंभ केला होता. भेटीस जाताना बरोबर जी माणसे सोबत घेण्याची मर्यादा होती, त्यापेक्षा कितीतरी अधिक मनुष्यबळ त्याच्या समवेत होतं. त्यात बंदुकधारी पथकाचाही समावेश होता.


    शिवाजी - खानाच्या या ज्या काही चाल्चाली होत्या, त्या सावधगिरीच्या उपाययोजनाही म्हणता येतील परंतु त्यांचे अंतिम हेतू लक्षात घेता यांना सावधगिरीच्या उपाययोजना म्हणणे मूर्खपणाचे ठरेल. भेटीत दगा न व्हावा अशी शिवाजीची इच्छा होती असं क्षणभर जरी गृहीत धरलं तरी या भेटीअंती त्याच्या हाती नक्की काय येणार होतं ? शिवाजीच्या सत्तेचा नाश हाच खान तसेच आदिलशाहीचा मुख्य हेतू, उद्दिष्ट असल्याने या भेटीतून निष्पन्न काहीच होणार नव्हतं. दुसरीकडे खानाने भेटीत दगा न व्हावा असं ठरवून भेटीस येण्याचं मान्य केलं असलं तरी फारतर शिवाजी आदिलशाही मांडलिक बनेल यापलीकडे दुसरं काय पदरी पडणार होतं ? शिवाय या भोसले पिता - पुत्रांचे उद्देश खानास बऱ्यापैकी माहिती होते. परिस्थिती पाहून आज जरी शिवाजीने माघार घेतली तरी पुन्हा आपली पाठ वळताच तो मूळ पदावर येणार नाही याची काय शाश्वती ? शिवाय तेरदळ प्रांती शिवाजीचे हल्ले, कर्नाटकातील शिवाजीचा वाढता प्रभाव व पुणे व आसपासच्या भूप्रदेशावर विस्तारत जाणारी शिवाजीची सत्ता, यांच्यादरम्यान विजापूरची सत्ता आकुंचित होतं कोंडली जाणार होती, हे त्यांस दिसत नव्हते काय ?

 तात्पर्य, भेटीच्या निमित्ताने प्रतिपक्षाचा संहार करण्याची मनीषा उभयपक्षी सारखीच वस्त होती हेच खरे. त्यामुळेच खानाने स्वसंरक्षणार्थ म्हणण्यापेक्षा शिवाजीला पकडून नेण्यासाठी वा संधी साधून प्रतापगडासह शिवाजीचा ताबा घेण्यासाठी बंदुकधारी पथकं सोबत घेतली असंच म्हणावं लागेल. खानाचा पूर्वलौकिक व त्यांस दाखवलेलं आमिष लक्षात घेऊन शिवाजीनेही प्रत्येक पावलावर त्याचे बेत हाणून पाडत त्यांस स्वतःच्या अटींवर भेट घेण्यास भाग पाडले व दि. १० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेल्या या भेटीत खानाचा निकाल लावला.


    उभयतांच्या मगरमिठीची वर्णनं विजापुरी व मराठी साधनांत विपुल प्रमाणात असली तरी प्रत्यक्ष भेटीत नेमकं काय झालं याची निश्चित माहिती कशातच आढळून येत नाही. खरोखर खानाने दगा केला कि शिवाजीने प्रथम चाल केली, याचा निकाल करणे शक्य नाही व असा वाद उत्पन्न करणेही योग्य ठरणार नाही. उलट या दोघांची प्रत्यक्ष भेटीपूर्वीची मनोभूमिका व त्यात अंती नियोजित उद्दिष्ट पूर्तीत कोण यशस्वी झाले हे लक्षात घेऊनच या घटनेकडे बघणे योग्य ठरले.  


    खानाचा काटा काढल्यावर शिवाजी गडावर परतला व इशारतीची खुण होताच त्याच्या सरदारांनी खानाच्या छावणीवर हल्ला चढवला. आरंभी बेसावध असलेली खानाची छावणी नंतर सावरून लढू लागली तरी सेनापतीच्या मृत्यूची बातमी व शत्रूचा हल्ला, दोन्ही लागोपाठ आल्याने त्यांच्या नीतीधैर्यावर परिणाम होऊन काही वेळाने शरणागती स्वीकारत त्यांनी आपला बचाव केला.


    प्रतापगडाच्या या युद्धात शिवाजीचा आर्थिक, नैतिक, राजकीय असा लाभ बराच घडून आला. तात्कालिक लाभ म्हटल्यास अफझलचा सारा खजिना, दारुगोळा, युद्धोपयोगी जनावरे त्याच्या ताब्यात आली. खानाचा मृत्यू व शिवाजीची चढती कमान पाहून सिद्दी हिलाल, पांढरे, खराटे आदि सरदार त्याच्या सेवेत दाखल झाले. नैतिक लाभ म्हणजे या घटनेमुळे शत्रू - मित्रांवर त्याचा भयंकर वचक बसला व राजकीय फायदा म्हटल्यास या धक्क्यातून त्याचा मुख्य शत्रू --- आदिलशाह सावरण्याच्या आतच शिवाजीने आपल्या पूर्वनियोजित मोहिमेस आरंभ केला. त्यानुसार खानाच्या वाईच्या तळाचा कब्जा घेऊन त्याची पथके चंदन - वंदन किल्ले काबीज करून खटाव, वडूज, मायणी, मसूर, विसापूर, तासगाव वरून अष्टीच्या पुढे पन्हाळ्यास येऊन धडकली व दि. २८ नोव्हेंबर १६५९ रोजी त्यांनी पन्हाळ्याचा ताबा घेतला. अफझलच्या मृत्यूनंतरचा हा दुसरा मोठा आघात होता ! 

                                                           ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: