रविवार, ९ ऑक्टोबर, २०१६

प्रकरण १०) सम्राट शिवाजी : काही दुर्लक्षित बाबी





    दि. १३ जुलै १६६० हि तारीख गेली कित्येक वर्षे शिवचरित्रात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त करून राहिली आहे. या दिवशीच रात्री नैसर्गिक अनुकुलता पाहून शिवाजी पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडत विशाळगडास रवाना झाला. या दिवशीच रात्री शिवा काशीद शिवाजीचा वेश घेऊन जौहरला हुलकावणी देत असता पकडला जाऊन प्रथम कैद व नंतर ठार केला गेला. या किंवा दुसऱ्याच दिवशी बाजीप्रभू देशपांडे शिवाजीने विशाळगडी सुरक्षित पोहोचावे म्हणून गजापूरच्या खिंडीत सिद्दी मसूदच्या कजाखी हल्ल्यांपुढे कातळासारखा उभा राहून रणात गारद झाला पण जीवात जीव असेपर्यंत व शिवाजी गडावर पोहोचेपर्यंत त्याने शत्रूला खिंड चढू दिली नाही. महाराष्ट्रातील व जगभरातील तमाम इतिहासप्रेमी, विशेषतः शिवचरित्र अभ्यासक, वाचकांना या दिवसाचे, प्रसंगाचे, व्यक्तींचे विशेष अप्रूप आहे. किंबहुना महाराष्ट्राच्या इतिहासाचा तो एक मानबिंदू असल्याचे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. प्रस्तुत प्रकरणात आपण याच जगद्विख्यात घटनेची तपशीलवार चर्चा करणार आहोत.

    मागील प्रकरणांत आपण पाहिलं कि, दि. १३ जुलै १६६० रोजी शिवाजीने सिद्दी जौहरची भेट घेण्याचे निश्चित केले. यासमयी शिवाजीला त्याची खरोखर भेट घ्यायची होती वा नव्हती याची निश्चिती करणे शक्य नाही. परंतु अशी भेट होणार या वार्तेचा शिवाजीला होणारा अनुकूल परिणाम म्हणजे जौहरचा वेढा थोडा शिथिल होऊ शकतो. परंतु अफझलखान प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर असं गृहीत धरणं थोडं अवघड आहे. कारण जौहरच्या छावणीत फाजलखानही आहे व एकाच युक्तीने वारंवार फसणारे असे हे योद्धे मुळीच नव्हते. त्यामुळे वेढ्याच्या कामात ढिलाई वा शिथिलता आली असेल असं वाटत नाही.

    दि. १३ जुलै १६६० रोजी शिवाजी पन्हाळ्याच्या वेढ्यातून नेमका कोणत्या बाजूने बाहेर पडला असावा, याविषयी तर्क करणे अवघड आहे. रूढ समजुतीनुसार मसाई पठार, अर्थात पश्चिम दिशेने शिवाजी पन्हाळ्यावरून खाली उतरला असे मानले जाते. यामार्गे थेट विशाळगड येत असल्याने याची निश्चिती करण्यात आली असावी. परंतु पन्हाळ्याच्या वेढ्याचे जे वर्णन शिवभारतात आलेलं आहे त्यानुसार या बाजूला भोसल्यांचे परंपरागत वैरी बाजी घोरपडे तळ ठोकून असून जोडीला सादत, मसूद, भाईखान हे सरदार तसेच पीड नाईक व काही बंदुकधारी पायदळही त्या भागात तैनात होतं. तात्पर्य, शिवाजी पन्हाळ्यावरून कोणत्या दिशेने खाली उतरला याची निश्चिती करणे तूर्तास तरी शक्य नाही.

    शिवाजीच्या पन्हाळा ते विशाळगड प्रवासाचे वर्णन समकालीन साधनांत --- जेधे शकावली, शिवभारत तसेच पसासं ले. क्र. ८३१ मध्ये आलेलं आहे. यास्थळी सभासद बखर तसेच जेधे करिणा विश्वसनीय साधन म्हणून ग्राह्य धरणे मला अयोग्य वाटते. कारण दोन्ही साधनं शिवाजीच्या निधनानंतर रचलेली आहेत. त्याचप्रमाणे सभासद बखरीत या लढयाविषयी अगदीच त्रोटक माहिती असून यासमयी झालेल्या लढायांचा त्यात उल्लेख नाही. जेधे करिण्यात बाजीप्रभूने गजापूरची घाटी / खिंड लढवल्याचा उल्लेख आहे परंतु यास शिवभारत तसेच पसासं मधील ले. क्र. ८३१ दुजोरा देत नाही. तसेच जेधे शकावलीतही बाजीप्रभू गजापूरच्या खिंडीत मारला गेल्याचे वृत्त नाही. त्यामुळे तूर्तास तरी शिवभारत, जेधे शकावली व पसासं ले. क्र. ८३१ वरच आपणांस भिस्त ठेवणं भाग आहे.
प्रथम आपण जेधे शकावलीतली या संदर्भातली नोंद पाहू.

    " आषाढ वद्य १ पनालियावरून राजश्री स्वामी उतरोन खेळणीयास गेले ते समयी सिदी जोहार यांची फौज पाठीवरी आली युध्याची दाटी बहुत जाली तेव्हा बादलाच्या लोकांनी युध्याची शर्त केली लोक खस्त जाले बाजी प्रभु देश कुलकर्णी ठार जाला. "

    यानुसार शिवाजी पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे गेल्यावर सिद्दी जौहरची फौज पाठीवर आली त्यासमयी झालेल्या संघर्षात बाजी प्रभु मरण पावला. इथे गजापूरची खिंड तसेच शिवाजीचे गडावर पोहोचून तोफांचे आवाज करणे वगैरेंचा उल्लेख नाही.
आता आपण पसासं ले. क्र. ८३१ मधील वृत्त पाहू.             

               ( ८३१ )     { श. १५८२ भाद्र. शु. ११
                          { इ. १६६० सप्टें. ५

डच वाकनीस वेंगुर्ले ------------------ गव्ह. हेग ?

गेल्या म्हणजे आगष्ट महिन्याच्या १४ व्या तारखेस ( = ओल्ड स्टाइल आगष्ट ४ श्रावण शु. ८ ) कृष्णा पै या व्यापाऱ्याकडे पन्हाळ्याखालील सैन्यांतून पत्र आले आहे. त्यांत लिहिले आहे की, " बंडखोर शिवाजीने आपला गंगाधर नांवाचा एक वकील विजापुरी सेनापती सलाबत याजकडे पाठविला असून मागणी केली आहे की, आपण केलेले सर्व मोठे गुन्हे जर माफ होतील व सलाबतखान कोणत्याही संकटापासून वडीलपणे आपले संरक्षण करील तर आपण जातीने सलाबतखानास भेटू व आपली सर्व मालमत्ता बादशहाच्या नांवाने त्याच्या स्वाधीन करू. त्याच पत्री आणखी असेहि लिहिले आहे की, दुसऱ्या दिवशी रात्री चंद्र दिसत नसता ( When the moon was dark ), मुसळधार पाऊस व वादळ सुरु असता वरील बंडखोर ( शिवाजी ) आपल्या बरोबर १००० शिपाई, १५ उमदे घोडे, २ पालख्या व कांही खजिना घेऊन पळाला. ही बातमी थोड्याच दिवसांत विजापूरच्या सैन्यांत पसरली. त्याबरोबर उद्विग्न झालेल्या सलाबतखानाने ताबडतोब २००० स्वार व १००० पायदळ त्याला गांठण्यासाठी पाठविले. हेराकडून ही बातमी ज्या वेळी शिवाजीस समजली तेव्हा तो एकदम खेळणा ( Helna ) नांवाच्या आपल्या एका किल्ल्यांत गेला ; व त्याने आपल्या जवळचे लोक रस्त्यावरील दाट झाडींत ठेविले व पाठलाग करणाऱ्या शत्रूस त्या रस्त्याने येऊ न देण्याविषयी त्यांना आज्ञा केली. एवढेंच नव्हे तर शक्य असल्यास तोंड देऊन पराभूत करण्यासही सांगितले. त्यांनी शिवाजीच्या हुकुमाप्रमाणे शत्रूवर शौर्याने जोराचा हल्ला चढविला. आपली विशेष हानी होऊं न देता त्यांनी शत्रूसैन्याच्या बऱ्याच मोठ्या भागाचा निःपात केला. काहींस कैद केले व बाकीच्यांस पळावयास लाविले आणि धैर्याने त्यांचा पाठलागहि केला. नंतर सलाबतखानाचे कांही लोकांनी आपल्या ताब्यांतील दुसऱ्या एका मार्गाने जाऊन लढाई केली, जय मिळविला व कांही लूटही मिळविली. यामुळे बंडखोराने पळ काढिला. याच वेळी शिवाजीने आपल्या सैन्याचे दोन भाग केले व स्वतःच्या बचावाकरितां एका पालखीत शिवाजी नांवाच्या आपल्या एका न्हाव्यास बसवून ती पालखी नेहमीच्या लवाजम्यासुद्धां नेहमीच्या रस्त्याने पाठविली व स्वतः दुसऱ्या एका पालखींत बसून दुसऱ्या जास्त अवघड रस्त्याने निघाला. शत्रूने पहिली पालखी चांदण्यांत सहज पकडली व गोटांत आणली. यामुळे सर्व राज्यांत ' शिवाजी सलाबताने कैद केल्याची ' बातमी पसरली व बादशहाच्या बाजूकडील लोकांस अत्यानंद झाला. पण ज्या वेळी शिवाजीचा कावा लक्षांत आला त्या वेळी सर्वांचा आनंद नाहीसा झाला. एवढ्या अवधीत बंडखोर शिवाजी पुरणदुर्ग ( पुरंदर ? ) नांवाच्या आपल्या अत्यंत बळकट किल्ल्याच्या आश्रयास गेला व तेथून त्याने निरनिराळ्या किल्ल्यांवर विशेषतः पन्हाळ्यास शिपाई व सामुग्री पाठविली. प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे होत आहे. थोडक्याच दिवसांनंतर अशी बातमी आली की रुस्तुमजमा हा शिवाजी व विजापूरदरबार यांमध्ये सल्ला घडवून आणण्याची खटपट करीत असून त्यास इतके यश आले की, बादशहा ( वृद्ध राणीसह ) तहासाठी विजापुराहून मिरजेच्या किल्ल्यास आला आहे. लोकवार्ता अशी आहे की, रुस्तमजमा यास सेनापतीची पदवी देण्यांत आली. तो बादशहाचा वकील शहासाहेब यासह हुकेरीहून सैन्याकडे जाण्यास निघाला आहे व तेथून तो मिरजेस दरबारी भेटण्यास जाणार आहे. संधी येतांच आम्ही तुम्हांस यापुढे होईल ते कळवू.

संदर्भ ग्रंथ :-
१) शिवकालीन पत्रसार संग्रह ( खंड १ )   

    उपरोक्त पत्र व शिवभारतातील त्या त्या संदर्भात आलेल्या प्रसंगवर्णानातून शिवाजीच्या पन्हाळ्यावरून सुटकेचं रहस्य उलगडण्याचा आपण प्रयत्न करू.

    सर्वप्रथम हे नमूद करणं मी आवश्यक समजतो कि, उपरोक्त पत्रामध्ये ज्या व्यापाऱ्याच्या पत्राचा संदर्भ घेऊन शिवाजीच्या पन्हाळ्याहून सुटकेचं वर्णन देण्यात आलं आहे, त्या व्यापाऱ्याचं यात नाव नाही. त्याचप्रमाणे त्या व्यापाऱ्याचा मुक्काम कोणत्या सरदाराच्या गोटात होता हेही समजायला मार्ग नाही. दुसरे असे कि, पन्हाळ्यावरून जे पत्र वेंगुर्ल्यास आलं ती तारीख १४ ऑगस्ट होती. म्हणजे शिवाजीनं पन्हाळा सोडून विशाळगड गाठून पुढे राजगादी प्रयाण केल्यानंतर पन्हाळ्यावरून बातमीपत्र आलेलं आहे. तिसरं असं कि, शिवाजीने पन्हाळ्यावरून आपली सुटका करून घेतली, त्या संदर्भात या पत्रातील माहिती अधिक विश्वसनीय मानता येते. कारण पन्हाळ्यावरून बातमी पाठवणारी व्यक्ती त्या वेळी वेढ्यात हजर होती. त्यामानानं विशाळगड व तेथून राजगडच्या वृत्तांतावर तारतम्यानेच विश्वास ठेवावा लागेल. असो.

    प्रस्तुत पत्रात आरंभीच दिलेलं आहे कि, शिवाजीने आपला वकील सलाबतखान सिद्दी जौहरकडे पाठवून तहाची वाटाघाट आरंभत जौहरच्या भेटीची इच्छा दर्शवली. या भेटीची तारीख जरी यात दिलेली नसली तरी जेधे शकावलीत आलेल्या नोंदीवरून कालनिश्चिती करण्यात आल्याने ती दि. १३ जुलै अशी निश्चित होते. त्या दिवशी मुसळधार पाऊस व वादळ सुरु असल्याने चंद्रदर्शन झालं नाही. अशा स्थितीत शिवाजी आपल्या सोबत १००० शिपाई, १५ घोडे, २ पालख्या व काही खजिना घेऊन बाहेर पडला.

    आता या माहितीस शिवभारतात दुजोरा मिळतो. फक्त तपशिलात जरासा फरक असून ---  शिवाजी रात्रीच्या पहिल्या प्रहरी पालखीत बसून सहाशे पायदळ शिपायांसोबत गडावरून उतरून विशाळगडाकडे मार्गस्थ झाला. विशेष म्हणजे अध्याय क्र. २६ मधील श्लोक क्र. ६८ नुसार पन्हाळ्यावरून उतरताना कुचाचा नगारा झाला होता पण शत्रूला ती मेघगर्जना असल्याचा भास झाला असे म्हटले आहे.

    या संदर्भात दोन शक्यता संभवतात. प्रथम हि सरळसरळ कविकल्पना दिसते. शिवाजीला गुपचूप जायचं आहे तर तो नगारा वाजवून शत्रूला जागं करण्याच्या फंदात पडणार नाही, हे उघड आहे. परंतु उपरोक्त पत्रातील भेटीचा संदर्भ लक्षात घेता हे वर्णन भेटीसाठी गडावरून खाली उतरण्याकरता केलेल्या इशारतीसंबंधीही असू शकते. म्हणजे पाउस आरंभ झाला असता शिवाजी गडावरून बाहेर पडला व तसा इशारा झाला. परंतु जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु झाल्याने शिवाजी कदाचित गडावर परत गेला असावा असाही शत्रू छावणीचा समज होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात शिवाजी पावसाची तमा न बाळगता तसाच विशाळगडी मार्गस्थ झाला. एक अत्यंत कल्पक योजना व त्यांस लाभलेली नियतीची, नशिबाची साथ असंही याबाबतीत म्हणता येते. परंतु एक गोष्ट मात्र आहे कि, शिवाजी नेमका कोणत्या दिशेने गडावरून खाली उतरला याचे निश्चित उत्तर सध्यातरी माझ्याकडे नाही.

    पन्हाळा ते विशाळगड अंतर परमानंदने पाच योजन तथा ४० मैल ( १ योजन = ८ मैल ; १ मैल = १.६ किमी ) असं दिलेलं आहे. सध्याच्या गाडीरस्त्याने देखील जवळपास इतकेच ( ६० - ६५ किमी ) अंतर पडते. शिवाजीने पन्हाळगडावरून खेळणा तथा विशाळगड कोणत्या मार्गाने जवळ केला याचा निर्देश जेधे करिण्यात मिळतो व तो देखील, " .. राजश्री स्वामी किलियावरून उतरून खिलणीयास येऊ लागले तेव्हा सिदी जोहार पाठीवरी आला ते समई बादलाचा जमाव व बाजी परभुदेशपांडे गजापूरचे घाटी ठेवून राजश्री खिलणीयास गेले व बाजी परभु यांणी व लोकानी युध्याची शर्ती केली बाजी परभु व कांही लोक पडिले गनीम चढो दिल्हा नाही सिदी जोहार माघारा गेला. " एवढाच. त्यामुळे पन्हाळा ते विशाळगड हा शिवाजीचा पूर्वपरंपरेने म्हसाई पठारामार्फत जाणारा जो मार्ग सांगितला जातो, त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

    आता प्रश्न असा आहे कि, शिवाजी विशाळगडी केव्हा नि कसा पोहोचला ? या संदर्भात उपरोक्त पत्र व शिवभारत, दोन्हींतील मजकूर विस्कळीत, विसंगत असल्याने हा घटनाक्रम शक्य तितका यथाक्रम जुळवण्यासाठी थोडाफार तर्काचा अवलंब करणे भाग आहे.

    प्रथम आपण ह्या पत्राचा संदर्भ घेऊ. या पत्रानुसार शिवाजी गडावरून निसटल्याची बातमी जौहरला लगोलग नव्हे तर ' थोड्याच दिवसांत ' मिळाली. आता हे थोडे दिवस किती धरावेत ? 
शिवभारतनुसार शिवाजीला पन्हाळा ते विशाळगड हे ४० मैलांचे अंतरकापण्यास सात प्रहर तथा एकवीस तास लागले. म्हणजे तो दि. १४ जुलै रोजी सायंकाळी विशाळगडी पावता झाला.

    शिवभारतनुसार सिद्दी जौहरने पन्हाळा वेढतानाच विशाळगडासही घेरण्यासाठी काही पथकं रवाना केली होती. विशाळगडाच्या या वेढ्याची तपशीलवार माहिती मिळत नसली तरी शिवभारतनुसार, " पल्लीवनाचा ( पालीचा ) राजा जसवंतराव, शृंगारपूरचा राजा प्रतापी सूर्याजीराव आणि दुसरेही सामंत त्या गडास वेढण्याच्या कामी त्या दुरात्म्या दुष्ट जोहराने पूर्वीच नेमले होते ; ते वारंवार लढत असतांहि पदोपदी पराभूत झाल्यामुळे गडावर चढणाऱ्या शिवाजीस अडवू शकले नाहीत. " ( अध्याय २७, श्लो. क्र. २६ ते २८ ) हि माहिती मिळते. याचा अर्थ काय घ्यायचा ? एकतर विशाळगडावर नियुक्त शत्रूसैन्यास गड घेरण्यास अपयश आले होते व गडावर वारंवार हल्ले चढवूनही अपयशाखेरीज त्यांच्या पदरात काही पडले नव्हते असे म्हणावे लागते. या सोबत अधिकचा मजकूर म्हणजे विशाळगडावरील हल्ल्यांत सातत्याने अपयश आल्याने नीतिधैर्य खचलेल्या या सैन्याकडून गडाच्या आश्रयास जाणाऱ्या शिवाजीस अटकाव होऊ शकला नाही असे म्हणावे लागते. अथवा शत्रू सैन्याला इथेही चकवून शिवाजीने गड गाठला असावा असे तरी म्हणावे लागते. प्राप्त पुरावे पाहता दुसरी शक्यता मला अधिक ग्राह्य वाटते. कारण पन्हाळ्यावरून विशाळगडास जाणाऱ्या शिवाजीला विशाळगडी शत्रू सैन्याचा वेढा पडल्याची बातमी नसणार हे संभवत नाही. दुसरे असे कि, शिवाजी गडावर येत असता गडावरील व त्याच्या सोबतच्या सैन्याची शत्रू बरोबर भयंकर धुमश्चक्री झाली असेल तर तसे वर्णन शिवभारतात येणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात शिवभारत त्यासंदर्भात संदिग्ध मौन बाळगतो. डच पत्राचा संदर्भ घेतला तर सिद्दी मसूद शिवाजीच्या पाठीवर आल्यानंतरच झुंज झाली आहे व शिवभारत अध्याय क्र. २७ मधील श्लोक क्र. २९ ते ४३ मसूद  पालवण - शृंगारपूरकरांच्या पराभवाचे वृत्तांत देतात. यावरून असे दिसते कि, शिवाजी विशाळगडी विनाप्रतिकार पोहोचला व तिथे त्याचा हेतू अतिरिक्त सैन्य मागवून व थकलेल्या सैन्याला विश्रांती देऊन राजगडी जाण्याचा होता. यासंदर्भात शिवभारत व डच पत्र पुन्हा एकदा उपयुक्त ठरते.

    शिवाजी पन्हाळ्यावरून गेल्याची बातमी एक दोन वा तीन दिवसांत जौहरला कळून त्याने लगेच विशाळगड घेरण्यासाठी मसूदला रवाना केले. यावेळी मसूद सोबत २००० स्वार व हजारभर पायदळ होते. इथपर्यंत डच पत्र व शिवभारतातील प्रसंग परस्परांना पूरक असेच आहेत.

    यापुढील डच पत्रातील वृत्तांतानुसार मसूदला रोखण्यासाठी शिवाजीने काही पथके रवाना केली. त्यांनी मसूदचा पराभव करून त्याचे बरेचसे सैनिक ठार तसेच कैद केले. पराभूत मसूदने मग दुसऱ्या मार्गाने --- पत्रात आपल्या ताब्यातील, असा उल्लेख आहे त्याअर्थी विशाळगडास वेढून बसलेल्या सैन्यदलाच्या नियंत्रणात असलेल्या रस्त्याने जाऊन लढाई केली व बंडखोरास, अर्थात शिवाजीच्या लोकांस पराभूत केले.

    याउलट शिवभारतनुसार शिवाजीच्या आज्ञेने विशाळगडावरून मराठी सैन्याने खाली उतरून सिद्दी मसूदच्या साथीनं वेढा देणाऱ्या पालवण, शृंगारपूरकरांच्या फौजांवर त्वेषाने हल्ले चढवून त्यांना पराभूत करून पळवून लावले. या संदर्भात ' शककर्ते शिवराय ' मध्ये श्री. विजय देशमुखांनी केलेलं विधान विशेष उपयुक्त आहे. ते म्हणतात, " .. तर ज्या बांदल घराण्याचे बाजीप्रभू सरनौबत होते त्या बांदल घराण्यातील एका तकरीरीत बाजी विशाळगडावरून उतरून शत्रूवर तुटून पडले व त्यावेळी झालेल्या झुंजीत ते मारले गेल्याचे सांगितलेले आहे. " अर्थात या नोंदीनंतरही त्यांनी पारंपारिक पावनखिंडीवरच विश्वास ठेवला हा भाग वेगळा ! असो.

    डच पत्र, शिवभारत व शककर्ते शिवराय मधील नोंद, या तिहींचा मेळ घालून असे ठामपणे म्हणता येते कि, विशालगडास वेढू पाहणाऱ्या शत्रू सैन्यावर गडावरील जी मराठी पथके चालून गेली त्यामध्ये बाजीप्रभूचा समावेश असून या लढाईत जरी मराठी फौजांचा विजय झाला असला तरी बाजीप्रभू मात्र मारला गेला. यामुळेच त्याची समाधी कुठल्यातरी अज्ञात, ओसाड खिंडीत न आढळता विशाळगडावर आढळून येते.

    आता डच पत्राचा अखेरचा भाग तसेच शिवाजीचे विशाळगडाहून राजगडी प्रयाण व शिवा काशीदची हकीकत, यांची चर्चा करू.

    विशाळगडावर शिवाजी फार दिवस राहणार नव्हता हे उघड आहे. मसूदच्या नेतृत्वाखाली पन्हाळ्याच्या वेढ्यातील फौज आलेली पाहताच शिवाजीने दोन गोष्टी केल्या. प्रथम त्याने वेढा बसू नये याकरता बाजीप्रभू सहित काही सरदारांची रवानगी केली व त्याच वेळी किंवा ती झुंज होऊन शत्रू पराभूत झाल्यावर विशाळगड सोडून राजगडाकडे प्रस्थान ठेवले. मसूदच्या आगमनानंतर शिवाजीला त्वरा करणे आवश्यक होते. कारण सिद्दी जौहर पन्हाळ्याचा वेढा उठवून इकडे येण्याचीही शक्यता होतीच व सिद्दी मसूदची फौज शिवाजीच्या दृष्टीने शत्रूची आघाडीही ठरू शकत होती. शिवाय तो ज्या फौजफाट्याची कुमकेकरीता वाट बघत होता, त्यातील काही भाग त्यांस येऊन मिळालाही असावा किंवा मार्गातच हातमिळवणी करण्याचाही बेत असू शकतो. हे काहीही असलं तरी मसूद येताच शिवाजीने विशाळगड सोडण्याचा निर्णय घेत तो अंमलात आणला हे स्पष्ट आहे.

    शिवाजीचं विशाळगडावरून निसटणं समकालीन साधनांत, विशेषतः त्याच्या अधिकृत शिवचरित्रात -- शिवभारतातही पुरेसं नमूद नाही हि आश्चर्य व दुदैवाची गोष्ट आहे. असो. डच पत्रातील वृत्तांतानुसार विशाळगडावरून निघताना शिवाजीने सैन्याच्या दोन टोळ्या केल्या. एक परिचित मार्गाने तर दुसरी अपरिचित मार्गाने निघाली. यावेळी शिवाजीचा रोख नेमका कुठे होता हे समजायला मार्ग नसला तरी नेहमीच्या रस्त्याने जाणाऱ्या पालखीत शिवाजी नावाचा न्हावी असल्याचे पत्रात नमूद आहे. अपेक्षेप्रमाणे हि पालखी हस्तगत झाली व शिवाजी कैद झाल्याची बातमी पत्रानुसार ' सर्व राज्यांत ' पसरली. इकडे खरा शिवाजी अवघड, अपरिचित मार्गाने पुरंदरास निघून गेला. इथे थोडी मतभेदास जागा आहे. 
    
    विशाळगडाहून थेट राजगडी शिवाजी गेल्याचे शिवभारत सांगते तर डच पत्रानुसार शिवाजी पुरंदरास गेल्याचा अंदाज आहे. कारण पुरंदर ऐवजी पुरणदुर्ग असे नाव आहे. राजगडाचा येथे उल्लेखच नाही. असो. हि विसंगती क्षम्य मानून बाजूला ठेवली तरी आणखी एक मुद्दा उपस्थित होतो व तो म्हणजे या दुसऱ्या तोतया शिवाजीची हकीकत शिवभारत तसेच इतर साधनांत का येत नाही ? या प्रश्नाचे उत्तर पुढील विवेचनातच परस्पर देतो.

    विशाळगडास वेढा पडण्यापूर्वीच निसटून जाणे हि शिवाजीची प्राथमिक गरज होती. त्यानुसार त्याने त्वरा केली व दग्यास जागा राहू नये याकरता त्याने दोन पालख्यांची योजना केली. पैकी, बनवत शिवाजीची पालखी विनासंघर्ष शत्रू हाती पडली असेल का ? प्रश्न इंटरेस्टिंग आहे पण निरर्थक नाही. बाजीप्रभूचा मृत्यू मग इथेही झाल्याची शक्यता वर्तवता येऊ शकते परंतु डच पत्र असा संघर्ष झाल्याचे सांगत नाही त्याचप्रमाणे बांदल घराण्याची तकरीरही ! असो. या स्थळी शत्रूला बेसावध ठेवण्यासाठी विना संघर्षही बनावट शिवाजीने शरणागती दिली असेल वा थोडीशी हलकी झुंजही घडली असेल. यानंतर शिवाजी पकडून मसूदच्या तळावर आणला जातो. अत्यंत महत्त्वाचा कैदी पकडला गेल्याची वार्ता सलाबतखानास पन्हाळ्याकडे त्याच दिवशी रवाना होते. ज्यामुळे छावणीत आनंदाचे वातावरण पसरते. यालाच पत्रलेखक राज्य म्हणत असावा. पुढे एक दोन दिवसांतच मसूद हा आत्यंतिक धोकेदायक, महत्त्वाचा राजकीय कैदी घेऊन सलाबतखानाच्या छावणीत दाखल होतो व तोतयाचे सोंग गळून पडते. सिद्दी मसूद, सिद्दी जौहर, फाजलखान, बाजी घोरपडे यांपैकी यापूर्वी शिवाजीला कोणी प्रत्यक्ष पाहिलं होतं का ? उपलब्ध साधनं नकार दर्शवत असल्याने याचं उत्तर शत्रूपक्षीय छावणीतील वकीलच याबाबतीत प्रमाण मानले पाहिजेत. पन्हाळ्याचा वेढा सुरु असताना तहाच्या वाटाघाटी दरम्यान जौहरच्या वकिलांची शिवाजी सोबत गाठभेट झाली असणारच व त्यांनीच तळावर आणलेला कैदी अस्सल नसून तोतया असल्याचे सांगितले असावे. शिवाजीच्या तोतयाचे पुढे काय झाले, याविषयी डच पत्रात उल्लेख नसला तरी लोककथा, दंतकथा आपण ज्यास म्हणतो त्यानुसार जौहरने तोतया शिवाजी -- शिवा काशीदला ठार केले. पन्हाळ्यावरील त्याचा पुतळा व गडाच्या जवळच असेलेया नेबापुरातील त्याची समाधी याचं प्रतीक मानता येईल. विशेष म्हणजे नेबापूर हे गाव पन्हाळ्याच्या पूर्वेस येत असून सिद्दी जौहरचा तळ वेढ्याच्या प्रसंगी याच दिशेला असल्याचे शिवभारतकारांचे म्हणणे आहे.

    इथवरच्या विवेचनाने हे स्पष्ट होते कि, पावनखिंड हि एक कपोलकल्पित कथा आहे. बाजीप्रभूचा मृत्यू विशाळगडाच्या चकमकीत झाला आहे. त्याचप्रमाणे शिवा काशीदची कैद पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे जाताना झालेली नसून विशाळगडावरून राजगडास जाताना झालेली आहे. परंतु गंमतीचा भाग म्हणा वा दुदैवाचा म्हणा, शिवचरित्रातील या दोन व्यक्तींचे उल्लेख शिवभारतात येत नाहीत. तसेच सभासद बखरीतही. जेधे शकावली बाजीप्रभूचा उल्लेख करते पण शिवा काशीदचा नाही. बाकी सगळा आनंदीआनंद आहे.

    इथे असाही प्रश्न उद्भवू शकतो कि, ज्याअर्थी पावनखिंड प्रकरण शिवभारतात येत नाही त्याअर्थी जर ते कल्पित असेल तर मग शिवा काशीदलाच वेगळा न्याय का ? याचे उत्तर असे कि, तोतया शिवाजी तथा शिवा काशीदची माहिती डच पत्रात ज्या आधारे लिहिली गेली आहे ते पत्र पन्हाळ्याच्या शत्रू पक्षीय छावणीतून आले होते. मसूदने पकडलेला शिवाजी हा खरा शिवाजी नसून तोतया असल्याची गोष्ट विशाळगडीच उघड झाली असती तर तोतयाचे नाव व त्याचा व्यवसाय यांचा एकत्रित उल्लेख पत्रातून तपशीलवार आला नसता. भलेही यातली चांदण्या रात्रीची वगैरे कथा थोडी काल्पनिक असेल पण तोतया शिवाजी पकडल्याची, त्याचे नाव शिवाजीच असल्याची व तो न्हावी असल्याची माहिती ज्याअर्थी यात येते त्याअर्थी तोतयाचे बिंग पन्हाळ्यास आल्यावर उजेडात आल्याचे स्पष्ट होते व छावणीत अशी बातमी पसरून तिची उघड वाच्यता होऊन ती पत्रात शब्दबद्ध झाली आहे इतकेच ! या दरम्यान जो काही दिवसांचा अवधी उलटून गेला त्यात चटका करून शिवाजी जौहरच्या कक्षेतून निसटून पार झाला.

    एकूण पाहता, काही इतिहास अभ्यासक समजतात त्याप्राम्ने शिवा काशीद हि कपोलकल्पित वा दंतकथा असल्याचे म्हणता येत नाही. जर शिवा काशीद दंतकथा मानायची झाल्यास बाजीप्रभूलाही तोच न्याय लागू होतो. यासंदर्भात शिवचरित्र निबंधावलीतील विवेचन विशेष उपयुक्त आहे. फरक इतकाच कि, त्यांनी पावनखिंड तसेच बाजीप्रभू संबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवा काशीदचा उल्लेख टाळला असून प्रस्तुत प्रसंगाचे विवेचन केले नाही. असो.

    प्रस्तुत प्रकरणात, विशेषतः शिवा काशीदच्या अटकेच्या प्रसंग विवेचनार्थ श्री. संजय सोनवणी यांची विशेष मदत झाली, हे नमूद करत प्रस्तुत प्रकरण इथेच समाप्त करतो.


                                                               
                                   ( क्रमशः )

२ टिप्पण्या:

Haresh म्हणाले...

१३ जुलै हि तारीख कोणत्या संदर्भ मध्ये आहे ?

Gamma Pailvan म्हणाले...

नमस्कार संजय क्षीरसागर,

तुम्ही म्हणता तशी शिवाजी पन्हाळ्यावरून कोणत्या दिशेने खाली उतरला याची निश्चिती करणे शक्य नाही. मात्र अंदाज लावता येतो. पन्हाळगडाचं प्रकरण संपल्यावर आदिलशहाने सिद्दी जौहारवर लाचखोरीचा आरोप केला. बादशाहने पैसे घेऊन तू शिवाजीला सोडलंस असा स्पष्ट आरोप करून सिद्दी जौहराची सगळी बिरुदे काढून घेतली. यावरून बहुतेक शिवाजीमहाराजांनी लाच चारून कुठूनतरी सांदिकोपऱ्यातून पलायन केलं असावं. याकरिता रुस्तुमेजमानाच्या मार्फत संधान बांधून आवश्यक तिथे पैसे पोहोचते केले असावेत.

पुढे आगऱ्याहून सुटतांना महाराजांनी बराच स्नेहव्यय (भेटवस्तू, नजराणे, अन्नदान, इत्यादि) केला होता.

आपला नम्र,
-गामा पैलवान