शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

स. १७७० नंतरचे शिंदे - होळकरांचे संबंध

 
हिंगणे दप्तर, खंड २ रा                           सु।। ११९३ जमादिलाखर १० 
ले. ९३, पृ. ८१ - ८४                                      इ. १७९३ जानेवारी २३ 
                                     
                                            श्री
    राजश्री यशवंतराव गंगाधर गोसावी यांसी, 
             दंडवत. विनंती उपरी. शिंदे याचे बोलणे सरकारात पडले आहे की, होळकर बराबरीचे सरदार. आम्ही श्रमसाहस करून मुलुख सोडविला त्यापौ। वाटणी देऊन ज्याजती त्याचे समजोतीकरिता पाच लाक्षाची जागा दिल्ही. यैसे असोन खावंद त्याची चाकरी मनास आणीत नाहीत हे काय ! सरंजामाप्रमाणे फौजदेखील बाळगीत नाहीत. दरोबस्त सरंजामा पौ। { पैकी } दहा लक्ष रुपये सिलकेस मागे पाडितात त्यासी बोलून त्याजला पटाल्याची आथवा काठेवाड कच्छभूजची मोहीम सांगावी. हे त्याच्याने न होये तर देसी बोलावून घ्यावे, आणि त्यानी आमचे मसलतीत जागजागा हिसके फितूर फादडे केले आहेत ते अंगी लाऊन देतो. खावंदानी मनास आणून दोष त्याजकडे किंवा आम्हाकडे हे ध्यानास आणावे म्हणौन त्यावरून श्रीमंताचे समक्ष उभयेता कारभारी यानी आम्हास बोलाऊन नेऊन सदरहू प्रो। आज्ञा केली. त्याची उत्तरे प्रसंगास उचित आणि सुचली ती केली. बोलण्याचे भाव बहुत रीतीचे पडले आहेत. यातील स्वच्छतेचा व सरळतेचा भाव शिंदे याजकडील द्रिष्टोतपतीत आलियावर मग त्यांचा विचार व्हावा. ती गोस्ट दिसण्यात येत नाही. येखादे कोडे घालून थकवावे यैसे करू लागल्यास मान्यता कसी होईल ? प्रस्तुत वाटावाट चालली आहे. मागाहून बोलणी होतील तसे लिहिण्यात येईल म्हणौन उत्तरे प्रत्योत्तरे जाली याचा मजकूर तपसिले लि।। लिहिला तो सर्व समजल्यात आला. यैसियास तुम्ही माहीतगारीने उतरे केली ती समर्पकच केली. खावंद खावंदपणियाने मनास आणू लागलिया फक्त शिंदे यानीच सरकारचाकरी केली आणि आम्ही घरी बसून चाकरी न करिता सरंजाम खाल्ला ही गोष्ट घडली असि नाही. बारा वर्षे हुजूर राहून सांगितली ती चाकरी केली हे ध्यानात ठेऊन शिंदे कोडे घालून थकवावयास पाहातात. ते रुचीस न पडता कजिया तुटून मार्गाने सर्व गोष्टी घडल्यात येतील. खावंदानी वाजबी ध्यानास न आणिता जसे शिंदे सांगतील तैसेच यैकून बोलण्यात आणिल्यास खावंदगिरीपुढे उपाये नाही. वरकडा विचार पाहाता शिंदे यांनीं हिंदुस्थानात चाकरी केली तसी आम्ही देसी राहून, गाडर खास चालून आला ते समई लढाई मारली. खावंदाचे प्रतापे फत्ते होऊन गाडराने समुद्रकिनारा पाहिला. मदी कर्नाटकाची मोहीम जाली तेथेही खावंदाचे वर्चस्वच राहिले. आलीकडे हिंदुस्थानात आलियावर इस्मालने गाची {?} व मेडत्याची लढाई पडली ते समई कामकाज कोणाचे जाले हे सर्वत्र प्रसिधांत आहे. केवल शिंदे यांनीच चाकरी केली आणि आम्ही न केली आसा अर्थ नाही. आम्ही देसी बारा वर्षे सरकार आज्ञेने राहिलो म्हणौन शिंदे हिंदुस्थानचे वारसदार होऊन बोलणी बोलतात त्यापक्षी सरकारातूनच येविषईचा विचार होन त्यासी उत्तरे व्हावी. आम्हास देसी राहाविले नसते तर शिंदे वारसदार कशाने होते ? आणि लढाही कशास पडला ? देसी राहाविले म्हणौन इतका प्रकार घडला. येविशोचा { येविषईचा } विचार उभयता कारभारियानी करावा आम्ही त्यांचे वचनांवर राहिलो व वचनांवर इकडे आलो, त्याचे फल हेच की काये ? शिंदे सरंजामापौ। दहा लक्ष रुपये सिलकेस मागे पाडितात यैसे म्हणतात. येविषईचाही मजकूर उभयेतास लोपला नाही. इसने समानीनचे साली तीर्थरूप मातुश्री ( मोकळी जागा ) बाईसाहेबासी कारणेकडून वाकडेपणाची चाल पडली. त्या प्रसंगेकरून सरंजामाचा अपव्यये आणि सिलिक राहाती किंवा कर्ज होते हे सर्व कागदीपत्री उभयेतास समजाविल्यावरून त्याचेही ध्यानात आहे. येविशी पाऱ्हेरा { पाऱ्हेरा - पुरावा } देणेच न लगे. तत्रापि शिंदे याचे मनात त्यांचा सरंजाम थोडका आणि इकडील सरंजाम फार जमेचा आसे आहे त्याअर्थी त्यानी आपला सरंजाम देऊन हा घ्यावा. यासही नाही म्हणावयाचे नाही. शिंदे याचे मते कोडेंका घालून थकवावे. याज करिता काठेवाड, कछ भूज अथवा पटाला दोहीतून येक मसलत सरकारातून सांगावी यैसे म्हणतात. याचे निराकर्ण दरबारातूनच व्हावे ती गोष्ट न होता याचे बोलण्याआन्वये सरकारातूनही बोलणे पडले. त्यास काठेवाड, कछ भूज हा मुलुख या जिल्ह्यातील नाही. त्यापक्षी तिकडे जाण्याचे कारण नाही. पटश या जिल्ह्यातील, आणि हिंदुस्थान आमची हाडवाई. { हडपावी ?} त्यापक्षी येद्यापि पटाले प्रांत जोरतलब सिख वगैरे यांचा तेथे पोट. याजमुळे शिंदे याजपासी फौजेचा भरणा पुष्कळ व दरोबस्त हिंदुस्थानची तहसील त्याजखाली. आसे - आसोन आजपावेतो त्याचा रीघ त्या प्रांतात आला नाही व होत नाही आसे आहे. तथापि खावंदाची आज्ञा व आम्हास हिंदुस्थानात विभाग रीतीप्रमाणे घेणे त्याअर्थी कबूल होईल. परंतु मोहिमीची रीत, ज्या मुलकात मोहिमीस जावे त्या मुलका अलीकडे जितका मुलुख असेल तितका सोडऊन आपला दखल करून रस्त { रसद } व पैका यावयास जागा करून मग पुढे जावे. म्हणजे रसदेची पुरवणी होऊन व पैका मिळून खावंदाचे प्रतापे मोहीम सर होणे ती होती, याप्रमाणे रीत आहे. दरम्यान दुसऱ्याचा अंमल आणि आपल्यास प्रतिकूल यैसे असता तो मुलुख पाठीशी घेऊन मोहीम करा म्हटल्यास कसे घडेल ? याजकरिता हिंदुस्थानची वाटणी पातशाही खालसासुधा दरोबस्त { दरोबस्त - सर्व } मुलकाची तारंतार द्यावी. पातशाहाकडील खर्च लागतो तो निमे वाटणीप्रो। आम्हाकडून देवावा ; निमे शिंदे यानी द्यावा. श्रीमंताचे मर्जी दरोबस्त सुटलेला मुलुख सरकारात ठेवावा असलिया तेही मान्ये आहे. त्यास व आम्हास न देता सरकारातून बंदोबस्त करावा. याउपरी मुलुख सुटेल तोच यथाविभागे घेऊ हेही न घडे आणि शिंदे कर्जवाम ( भाग ) वित्तात त्याऐवजी त्याची फेड होये तो पावतो मुलकाचा यैवज शिंदे यानी घ्यावा आसी मर्जी असली तर शिंदे यानी दिलीपो। व आफरासियान { अफ़्रासियाब खान, बादशाही उमराव } व गुलाम कादर { नजीबखानचा नातू } याची मालियेत कोट्यावधीची व इस्मालबेग व पाटण मेडते येथील लूट मनस्वी घेऊन याखेरीज किरकोळ खडदड व मुलकाचे तहसिलीचा यैवज मुबलक घेतला याचा विचार सरकारातून मनास आणिल्यास कर्ज भा ( भाग ) वितात तोही आर्थ कसा आहे. तो ध्यानास भरले इतके असोन काहीच मनास आणू नये. त्याचे कर्जाचा फेड होये तो पावेतो मुलकाचे तहसिलेचा यैवज त्याजकडेच द्यावा मानस आसलिया दरोबस्त मुलकाची वाटणी करून आमचे हिशाचे मुलकाचे उपेद्र {?} येईल ते शिंदे याजकडे सरकार आज्ञेने देऊ.  परंतु मुलकात अंमल आमचा असावा. येणे प्रो। आगोधर करण्यात येऊन मग उभयेतानी भाऊपणियाचे रीतीने आमचे घरचा बंदोबस्त करून देऊन सरकारची पथके शिंदे याजसमागमे होती तसी नेमून द्यावी, म्हणजे पटाल्याची मोहीम कबूल होईल. सदरहु प्रो। न होता शिंदे याचे म्हटल्यावर मोहीम करावी आसे म्हणू लागल्यास मान्यता कसी घडेल ? विचाराचे मार्गाने कोणतेही सांगितल्यास अवघड पडावयाचे नाही. खावंदाचे प्रतापे सरकार चाकरीस कमी न होता घडत गेली. पुढेही अंतर पडेल ऐसे नाही. मोहीम न होये तर देसी बोलाऊन घ्यावे. आमचे कामात कामात फितूर फांदडे केलेत ते अंगी लाऊन देतो. खावंदानी मनास आणून दोष कोणाकडे हे समजून घ्यावे असे शिंदे म्हणतात. त्यास मोहिमीचा अर्थ मिळून कोडे घालावे इतकाच दिसून आला. वरकड फितूर फांदडे केले न केले याचा शोध श्रीमंतास नसेल यैसे नाही. त्याजकडून जैपूर { जयपूर } प्रांतात त्याचा दाखला नसोन फौज पाठऊन सर्वोपरी बिघाड केला असता आमचे अंगी लाऊन देऊ म्हणतात आणि श्रीमंत व कारभारी यैकता हेच आश्चर्ये. अस्तु, आम्हास हिंदुस्थानाचा वारसा यावतजीव सोडावयाचा नाही हा कृतनिश्चय गोस्टीस सरकारातून मनन करून ज्यांचे त्यापरी सांगून वर्तनाने याप्रो। घडावे ते न घडता प्रस्तुत शिंदे याची भीड अथवा दबाव काये असेल तो असो. याजमुळे सरकारची बोलणी शिंदे याचे बोलण्याअन्वये पडतात पडोत. आम्ही आजपावेतो सरकार आज्ञा उलघन { उल्लंघन } केली नाही. त्याजकडून दगा जाल असता, उतावळी करू नये अशी पत्रे येत गेली. त्यावरून तीन मास येथेच दम खाऊन चिरंजीव बापूसही इकडे बोलावून घेतले. असे असता अद्याप तेथे जाबसाल येकरुखीच होतात. फार चांगले आहे. सरकार आज्ञा उल्लंघन न व्हावी, आपसात कळहबा {?} न लावता तुटावा या अर्थी आजपावेतो दम धरला. परंतु तिकडे प्रथम दिवस आहे. तेव्हा आथःपर { अतःपर ?}घडेल ते केले पाहिजे. यास्तव तुम्ही तुम्ही येविशीचा अर्थ उभयेतास दरशऊन प्रसंगास उचित दिसल्यास हेच पत्र दाखवणे आणि ते उत्तर करतील ते लेहून पावणे. { पाठवणे } पटाल्याचे मोहिमीस पिछाडी निर्वेध आसला पाहिजे. याजकरिता दरोबस्त आत रवेद { अंतर्वेदी ?} आमचे स्वाधीन करावी, म्हणजे पटाल्याची मोहीम आटोपून लाहोरपरियेत जाण्यास येईल. रा। छ १० जाखर बहुत काये लि। ( नि. ) { नि - निशाणी } हे विनती. ( नि. ) मोर्तब सु

संदर्भ ग्रंथ :- 
१) मराठ्यांचा इतिहास, साधन परिचय :- संपादक - प्रा. अ. रा. कुलकर्णी, डॉ. म. रा. कुलकर्णी, डॉ. मा. रा. कंटक
  
टीप :- उपरोक्त पत्र संपादकांनी ज्याप्रमाणे छापले आहे जवळपास तसेच या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे. 
  
           पत्रातील घटनांची पार्श्वभूमी :- स. १७७९ नंतर महादजी शिंदे पुण्यातून जो रवाना झाला तो सुमारे बारा वर्षांनी म्हणजे स. १७९२ मध्येच पुण्यास परतला. या दरम्यानच्या बारा वर्षांच्या कालावधीत तुकोजी होळकर बहुधा दक्षिणेतच असल्याने उत्तरेत शिंद्याने जो मुलुख प्राप्त केला त्यात तुकोजी आपला हिस्सा मागू लागला. अर्थात, त्याची मागणी पूर्वसंप्रदायानुसार असली तरी शिंद्याने उत्तरेत ज्या मोहिमा पार पाडल्या त्यात होळकरांचा सहभाग किती हा प्रश्न उपस्थित करून शिंद्याने होळकरांना मुलखाची वाटणी देण्यास उघड नसला  तरी आडवळणाने नकार दिला. पुणे दरबारात या संदर्भात नाना फडणीस, हरिपंत फडके, महादजी शिंदे आणि होळकरांचा वकील यांच्या वाटाघाटी चालल्या होत्या. त्याविषयीची चर्चा वकिलाने तुकोजीस कळवली असता त्याने आपले मुद्दे वरील पत्रात लिहून यशवंत गंगाधर यास लिहून पाठवले आहेत.        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: