बुधवार, १४ ऑगस्ट, २०१३

पेशव्यांना माळव्याच्या सुभेदारीची प्राप्ती !



 पत्र क्र. १)                   श. १६६२ पौष शुद्ध १० पूर्वी
                            इ. १७४० डिसेंबर १० पूर्वी
                    बाळाजीराव पंडित प्रधान व चिमणाजीराव यांनी केलेला करार असा की, माळव्याच्या सुभेदारीची आम्हांवर कृपा होत असल्याने आम्ही पुढीलप्रमाणे सेवा करू. (१) हुजूरच्या भेटीस येऊ. (२) माळवा सुभ्याशिवाय इतर कोठेही दखल – ढवळाढवळ करणार नाही. (३) इतर कोणीही मराठा सरदार नर्मदेचा घाट उतरून हिंदुस्थानच्या सुभ्यांत शिरणार नाही. त्याची जिम्मे आम्हांवर आहे. (४) एक मातबर मराठा सरदार पांचशे स्वारांसह हमेशा हुजूरच्या चाकरीस राहील. (५) इनाम म्हणून या साली जे द्रव्य मिळणार त्याहून अधिक एकही दाम यापुढे सरकारकडून मागणार नाही आणि सेवेत कायम राहू. (६) बादशाही फौज त्या प्रांती बाहेर पडेल तेव्हां चार हजार मराठे स्वारांसह हजर होऊन सेवा व प्राणार्पण करू. याशिवाय हुजूरकडून मराठी स्वारांची मागणी आल्यास हुजूर असे तोपर्यंतचाच रोजमरा मागू. (७) चंबळेच्या पलीकडील जमीदारांकडून ठरलेल्या पेशकशीहून अधिक एका दामाचीही मागणी करणार नाही. (८) त्या प्रांतांतील लहान मोठ्या जमीदारांना तंबी देण्याविषयी हुजूरकडून हुकूम होईल तर चार हजारपर्यंत स्वारांच्या मदतीने बनेल तशी त्यांस तंबी देण्याचा प्रयत्न करू. (९) किल्लेदारांच्या जागीरी, काजी, मुफ्ती वगैरे धार्मिक मनुष्यांच्या शर्ती व निर्वाहासाठी त्यांस दिलेल्या जमिनी, रोजनदारांचे रोजमरे व इनामे, फर्मानांचे पुरावे असतील त्यांप्रमाणे चालविण्यात अडथळा न आणितां त्यांच्या ताब्यांत देऊ. म्हणजे ते कल्याण चिंतून राहतील.

पत्र क्र. २) 
मुहम्मदशहाचा                        श. १६६३ ज्येष्ठ शुद्ध ९
जु. २३ रवल ७                        इ. १७४१ मे १२
                       असफजाहाच्या मध्यस्थीने मी बाळाजी बाजीराव मुख्य प्रधान महाराजाधिराज, समसामुद्दौला, अअजमखान व मुहम्मद सईदखान यांच्या समक्ष ता. ७ रबिलावल जुलूस सन २३ रोजी खली दिल्याप्रमाणे करारनामा लिहून देत आहे. मजवर जागीरी व फौजदारी यांसह आणि वालागुहर (?) पादशाहजादा याच्या नायबीसह माळव्याच्या सुभेदारीची कृपा झाली आहे. तेव्हां कबूल करतो की, तेथे माझा अमल चालू करीन. चंबळा व यमुना या नद्यांच्या पलिकडच्या तीरावरील राजांकडून पूर्वीपासून जो पैसा घेत आलो आहे तो छत्रसालाच्या मुलांवर नजर देऊन ....... ......... ....... ज्याचा या नोकराशी संबंध आला आहे तो राजा अयामलच्या सल्ल्याने घेत जाईन. याशिवाय दुआबांतील मसना ? व पराग इत्यादि दुसऱ्या मुलखांत दखल देणार नाही. येत्या वर्षी महाराजाधिराजांबरोबर हजरतांच्या सेवेस – भेटीस येईन. हुजूरकडून दरोबस्त माळव्याची आणि चंबळा व यमुना यांच्या सुभेदारीची नायबी या चाकराशी संबद्ध केली गेली असल्याने दुसऱ्या कोणा मराठ्यास नर्मदा उतरून पादशाही मुलखांत येऊ देणार नाही. मातबर वकीलास पांचशे स्वारांसह हुजूर ठेवीन. हुजूरकडून पंधरा लाख रुपये इनाम म्हणून या सेवकास मिळाले. यापुढे एक दामही अधिक मागणार नाही आणि सेवेत दृढ राहीन. बादशाही कामासाठी केव्हांही बोलाविल्यास चार हजार स्वारांसह येऊन कामाचा मनाजोगा निकाल केला जाईल. बारा हजार स्वार पाठविले तर चार हजारांचा खर्च मागणार नाही. बाकी आठ हजार स्वारांचा खर्च रोजमऱ्याच्या हिशेबाने घेऊन काम निकालांत काढीन. फौजदारी, जागीरी व किल्ले यांसह दरोबस्त माळव्याच्या सुभेदारीच्या नायबीची सनद सहा महिन्यांत मिळावी आणि चंबळा व यमुना यांच्या अलीकडच्या बाजूच्या राजांकडून पेशकश घेण्याच्या सनदेचीही कृपा व्हावी. ता. उपर्युक्त.


पत्र क्र. ३)
मुहम्मदशहाचा                     श. १६६१ ज्येष्ठ शु. ९
जु. २३ रवल ७                     इ. १७४१ मे १२
                आम्ही राणोजी शिंदे, मल्हारजी होळकर, यशवंतराव पवार व पिलाजी जाधव लिहून देतो की, बाळाजीराव मुख्य प्रधान हुजूरची चाकरी कबूल करून नंतर चाकरीत विरुद्धता आणतील तर आम्ही त्यांस विनंति करून उलटू देणार नाही. त्यातूनही त्याचे डोके फिरलेच तर पंडित प्रधानांची नोकरी सोडू. येवढ्यासाठी हे चार शब्द लिहून दिले आहेत. ता. ७ रवल सन २३ { जु. }

पत्र क्र. ४)
मुहम्मदशहाचा                    श. १६६३ ज्येष्ठ शुद्ध १४ 
जु. २३ रवल                      इ. १७४१ मे १८          
                     मी बाळाजी बाजीराव मुख्य प्रधान करार करतो की, हुजूरच्या मर्जीखेरीज आसफजाहा वगैरेंशी विश्वासाची कामे करणार नाही. यासाठी हे चार शब्द लिहून देत आहे. ता. १३ रवल स. २३ { जु. } 

 विश्लेषण :- बाळाजी विश्वनाथाने दक्षिणच्या सहा सुभ्यातून चौथाई व सरदेशमुखी वसुलीच्या सनदा मिळवल्यावर मराठी सैन्याची धाड माळव्यावर पडली. वर्षानुवर्षे माळव्यावर स्वाऱ्या करून त्यांनी तिथे आपले अंमलदार स्थपीत केले. माळव्यातील मोगल बादशाहीची सत्ता साफ उडून त्या ठिकाणी मराठी सरदारांचा अंमल सुरु झाला होता. परंतु, कायदेशीररित्या त्यांच्या माळव्यातील सत्तेस अजून मान्यता न मिळाल्याची त्यांना रुखरुख लागून राहिली होती व त्यासाठी बाजीराव पेशव्याने मोगल बादशहाकडे माळव्याच्या सुभेदारी आपल्या नावाने करून देण्याची विनंती देखील केली होती. आरंभी हा सर्व व्यवहार त्याने निजामाच्या मार्फत उलगडण्याचा यत्न केला. पण निजाम बोलाचालीवर वेळ मारून नेत असल्याचे पाहून बाजीरावाने जयपूरच्या सवाई जयसिंगामार्फत दिल्ली दरबारी खटपट केली. वस्तुतः सवाई जयसिंगास माळवा प्रांत हवा होता पण मोगल उमराव जयसिंगाच्या विरोधात असल्याने त्याने हा प्रांत पेशव्याला मिळवून देण्याचा डाव आरंभला. परंतु, जयसिंगास त्यावेळी दिल्ली दरबारातून फारसा पाठिंबा न मिळाल्याने हे कार्य काहीसे लांबणीवर पडले. दरम्यान बाजीराव पेशव्याचा मृत्यू होऊन त्याचा मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब हा पेशवा बनला. मध्यंतरी नादिरशहाच्या आक्रमणाने मोगलांची हाडे खिळखिळी झाल्याने मोगल बादशहा महंमदशहाने माळव्याच्या सुभेदारीचे फर्मान नानासाहेब पेशव्याच्या नावाने जारी केले. परंतु, माळव्याची सुभेदारी पेशव्याला एकदम कशी द्यायची म्हणून त्याने तो सुभा शहजादा अहमदशहाच्या नावे लिहून त्याचा नायब – म्हणजे दुय्यम सुभेदार म्हून पेशव्याची नियुक्ती केली.
        दम्यान या निमित्ताने जो काही करार / पत्रव्यवहार झाला, त्यापैकी काही पत्रे वर देण्यात आली आहेत. त्यातील पहिले पत्र – ज्यामध्ये नानासाहेबासोबत चिमाजीआपाचे नाव आहे – ते पहिले असता दिल्ली दरबारी पेशव्याने माळव्याच्या सुभेदारी संदर्भात कशा प्रकारे अर्ज पाठवला होता याची कल्पना येते. माळवा प्रांत आपल्या हाती दिल्यास इतर कोणा मराठा सरदारास आपण नर्मदा पार करू देणार नाही असे पेशवा म्हणतो. याचा अर्थ असा की, येथून पुढे फक्त पेशवे आणि त्यांचे सरदारच नर्मदा पार करून शकणार होते. म्हणजे दाभाडे, गायकवाड आणि भोसले यांना म्हटले तर नर्मदापार करण्यास प्रतिबंध करण्याचे कार्य नानासाहेबाने आपल्या शिरावर घेतले होते आणि नर्मदापार न करता इतर मार्गांनी दाभाडे, गायकवाड व भोसले यांनी बादशाही प्रांतावर हल्ले चढवले तर तेवढ्यापुरती आपली बाजू पेशव्याने सोडवून घेतली होती. यातून पेशव्याचे चातुर्य दिसून येते असे म्हणण्यास हरकत नाही. परंतु, या ठिकाणी माझा मुख्य आक्षेप असा आहे की, पेशव्यांनी माळव्याचा सुभा आपल्या नावे का मागावा ? तसे बघायला गेले तर छ. शाहू हयात असून लौकिकात तो बादशाही ताबेदार होता. तेव्हा त्याच्या नावे सुभेदारी मिळवून त्याची नायबी पेशव्याने घेतली असती तर ते समजण्यासारखे होते. परंतु, असे काहीही न करता पेशव्यांनी उलटा क्रम स्वीकारून एकप्रकारे छत्रपतींच्या सत्तेलाच उडवून लावल्याचे दिसून येते. अर्थात, याचा प्रतिवाद देखील केला जाऊ शकतो. नाही असे नाही, परंतु एकाच वेळी दोन दरबारांची – ते देखील परस्पर शत्रुत्व असलेल्या – चाकरी करणे कितपत योग्य / समर्थनीय आहे ? याबाबतीत शेजवलकरांनी आपल्या पानिपत विषयक ग्रंथात पेशव्यांच्या मोगल बादशहा विषयी धोरणाची केलेली चिकित्सा चिंतनीय आहे.
          महमदशहाने पेशव्याच्या मागणीनुसार माळव्याच्या सुभेदारीचे फर्मान पेशव्याच्या नावे जारी केले. परंतु, आपला बोज राखण्यासाठी मुख्य सुभेदार म्हणून शहजादा अहमद याचे व त्याचा दुय्यम म्हणून नानासाहेबाचे नाव सुभेदारीवर दाखल केले. पेशव्याच्या मागणीनुसार माळवा सुभा बादशहाने पेशव्यास दिला खरा ; पण असे करताना देखील या कारस्थानी, चतुर अशा मोगल मुत्सद्द्याने पेशवे दरबारात अशी काही पाचर मारली की, त्यामुळे पेशवा व त्याच्या सरदारांच्या संबंधांत येथून पुढे नेहमीच एक संशयाचे वातावरण राहिले. मोगल बादशहाने माळव्याची सुभेदारी पेशव्याच्या नावे देताना, पेशव्याने कबूल केलेल्या अटींच्या विपरीत वर्तन केल्यास त्याला ताळ्यावर आणण्याची जबाबदारी शिंदे, पवार, जाधव, होळकर यांनी घेतली. पैकी शिंदे, पवार व होळकर हे माळव्यात प्रस्थापित झालेले असून नर्मदेच्या उत्तरेकडे स्वाऱ्या करताना पेशवा नेहमी यांच्यावर अवलंबून असे. मोगल बादशहाने नेमके हेच हेरून उपरोक्त त्रिवर्ग सरदारांना जामीनदार बनवले. याचा परिणाम असा झाला की, या तिघांची सत्ता एकप्रकारे पेशव्याच्या बरोबरीची झाली. कारण, करारातील तिसरा पक्ष नेहमी करार करणाऱ्या दोन पक्षांच्या तुल्यबळ असतो. हे लक्षात घेता मोगल बादशहाने काय साध्य केले हे उमगते. यामुळेच येथून पुढे शिंदे – होळकर हे संधी मिळताच पेशव्यावर आपला शह बसवण्याचा प्रयत्न करू लागले तर, पेशव्याने या बलदंड सरदारांना दुबळे करण्याचे धोरण अवलंबले. परिणामी, पेशवे आणि शिंदे – होळकर यांच्यात काही प्रमाणात का होईना, पण एकमेकांविषयी संशयाचे वातावरण कायम राहिले. याचा अनिष्ट परिणाम पुढे पेशवाई व पर्यायाने मराठी राज्यावर झाल्याचे दिसून येते.
 { टीप :- पत्रांचे क्रमांक मूळ संपादकांनी दिलेले नसून, प्रस्तुत लेखासाठी मी दिले आहेत याची नोंद घ्यावी. }
संदर्भ ग्रंथ :-
१) ऐतिहासिक फार्सी साहित्य ४ था खंड :- संपादक – ग. ह. खरे           

३ टिप्पण्या:

deom म्हणाले...

आपले ​विश्लेषण लाजवाब आहे. पेशवे आणि इतर सरदार यामध्ये बेबनाव होण्याची बीजे या करारनाम्यात होति. ​

sanjay kshirsagar म्हणाले...

धन्यवाद,deom !

Chinmay 'भारद्वाज' म्हणाले...

तीनशे वर्ष झालीत पण ही चूक अजुनही आपल्या देशाला भोवते आहे. असली फर्मान मागण्यापेक्षा पेशव्यांनी सरळ स्वतःला किंवा छत्रपती शाहुंना दिल्लीचा बादशहा म्हणुन का जाहिर केल नाही?