बुधवार, २१ ऑगस्ट, २०१३

यशवंतराव होळकराचे हरिपंत फडक्याच्या मुलास लिहिलेले पत्र



 ले. ३६                  श्री       श. १७२४ फा. व. ४
No. 137                         इ. १८०३ मार्च १६
         राजश्री रामचेंद्र बाबा गोसावी यासी
आखंडीत लक्षेमी आलंकृत राजमान्य ------------------- येशवंतराव होळकर दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लिहीत आसावे विशेष तुम्हाकडून डांके समागमे दोन तीन वेळा पत्रे आली ते पाऊन लेखनार्थ आवगत जाला ‘ नवाब बंदगान आली याची व कारभारी याची बोलनी जाली बोलण्याचे भाव श्रीमंत राजश्री रावसाहेबकडील ( अमृतराव पेशवे ) व आपल्याकडील मतलबाच्या यादी पाठऊन द्याव्या व आपल्याकडील निश्चये खचित कळवावा म्हणजे त्याप्रमाने येथे बोलावयासी येईल शिंदे व भोसले याजकडेही पत्रे पाठविली आहेत त्याची उत्तरे येतील तसे लिहून पाठऊ म्हणून लिहिले यैसियांसी श्रीमंताचा व नवाबाचा सिलसिला पांच पिढ्या कसा चालला त्या रीतीने पाहाता नवाबाकडे वडिलपण कोठ काही आधीक उने आढळल्यास सांगून लिहून ताला घालावा हे न घडे तर आपण जातीने मन घालून हे दौलत व ते दौलत दोन नाहीत तेव्हा सर्व सरदारास ज्याचे त्याजपरी सांगून आवघे येकदिल करून श्रीमंताचे दौलतीचा आळा घालून त्यानी आपण येक होऊन परराष्ट्राचा प्रसार होऊ न द्यावा हे त्याचे वडीलपनास योग्य आनी परस्परे दोहीं दौलतीचे उपयोग मागे पुढे सर्वास मार्ग हेच आहेत त्यांनीं शंभर वर्षाचा भाऊपणा सोडून नवीन प्रकार योजिल्यास श्रीमंताचीहि दौलत मोठी आहे माणूसमसाला पहिल्यापेक्षा दुपट तिपट आहे येकदिली नाही हा भरवंसियावर जाऊ नये तसाच प्रसंग दृष्टीस पडल्यास येके दिवसी येक होतील याचा विचार करून पूर्वापार चालीवर द्रीष्टी देऊन श्रीमंताचे दौलती आनकूल होऊन घरातील बखेडे तोडून बंदोबस्त करावा यात चांगले फार आहे शिंदे व भोसले याजकडे तुमची पत्रे गेली त्या आनव्येच इकडून ही पत्रे रवाना जालीच आहेत विच्यार केल्यास कांही जड नाही श्रीमंत राजश्री बाजीरावसाहेबाकडून पत्रे व कारकून वगैरे येत गेले त्यावरून पुण्यांत श्रीमंत सौभाग्यवती मातुश्री ताईसाहेब ( दु. बाजीराव पेशव्याची तृतीय पत्नी राधाबाई ) याची स्थापना केली बंदोबस्ताचा जिमा त्याचा करून आम्ही आज्ञा घेऊन श्री जेजुरीस आलो यात्रा करून गारदवंडेकडून चांदवडचे सुमारे जातो सोबतीयाकडूनही ( दौलतराव शिंदे ) समेटप्रकर्णी बोलावयासी कोन्ही पाठऊन द्यावा यैसी पत्रे राजश्री आंबोजी इंगळे ( शिंद्यांचा सरदार ) याची आली होती त्याजवरून राजश्री विठल लछमन शामराव जिवाजी ( होळकरांचा वकील ) यांजला पाठविले आहे त्याची निखालसताच दिसली तर आणखीहि कोनास पाठऊ त्याची व आमची समेट जाल्यावर सर्व लाहानथोर येक व्हावयासी आवघड पडणार नाही नवाबाची खंबीर पूर्व चालीवर कायेम आसलियास सर्वही घडेल तुम्ही मर्जीचे भाव पाहून दर मजल यावयाचे करावे सर्वानुमते उचित तेच घडेल वडीलपणे पूर्व चालीवर लक्ष ठेवितील तर हाजार तोडी व मार्ग निघतील ते कायेम नसलियास दो तोडीत काये आहे श्रीमंताचे दौलतीत सर्व आहे श्रीकृपे उत्तम तेच घडेल छलछिपडे करून आपसात वांकडी पडावी याजकरिता मनस्वी खबरा उडवितील त्याजवर न जावे तुम्ही तेथील हावभाव पाहून सत्वर यावे त|| छ १९ जिल्कामद बहुत काये लिहिने हे विनंती

A true copy.  Henry Russile Secretary. from Rest at Hydi D. 25 March 1803        



संदर्भ ग्रंथ :-
१)      भारत सरकारच्या केंद्रीय ( दिल्ली ) दफ्तरखान्यांतील ऐतिहासिक मराठी साधने :- संपादक - प्रा. गणेश हरी खरे, शंकर नारायण जोशी
         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: