रविवार, १८ ऑगस्ट, २०१३

बाळाजी विश्वनाथ भट ( भाग – १ )



           बाळाजी विश्वनाथ भट उर्फ बाळाजीपंत नाना हा पेशवे घराण्याचा संस्थापक. ऐतिहासिक घराण्यांच्या संस्थापकांचे प्रसिद्धीस येण्यापूर्वीचे चरित्र जसे अज्ञात असते, त्याचप्रमाणे बाळाजीचेही आहे. भट घराण्याच्या या कर्तबगार पुरुषाचा जन्म कधी झाला याविषयी निश्चित नोंद आजवर उपलब्ध झालेली नाही. मात्र एक गोष्ट नक्की आहे व ती म्हणजे बाळाजीच्या घराण्यात पिढ्यानपिढ्याची श्रीवर्धन व हरेश्वरची देशमुखी चालत आलेली होती. स. १५७५ मध्ये बाळाजीचा पणजोबा महादजीपंत या देशमुखीवर कार्यरत असल्याचा उल्लेख मिळतो. कोकण सोडून बाळाजी व त्याचे कुटुंब वर घाटावर नेमके कधी व कसे आले याविषयी निश्चित अशी माहिती मिळत नाही. काही जणांच्या मते सिद्दीच्या छळास त्रासून बाळाजी देशावर आला तर काही जणांच्या मते तो छ. राजारामाच्या कारकिर्दीत अथवा संभाजी कैद होण्यापूर्वीच  स्वराज्याच्या सेवेत दखल झाला होता. प्रस्तुत ठिकाणी या तपशिलाच्या चर्चेत शिरणे योग्य होणार नाही, परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे व ती म्हणजे कोकण सोडून एकटे भट कुटुंबीयच देशावर आले नसून त्यांच्यासोबत भानू देखील आले होते.

     स. १७०७ मध्ये औरंगजेबाचा मृत्यू होऊन त्याच्या मुलांमध्ये वारसा युद्ध जुंपले. त्यावेळी संभाजीपुत्र शाहू हा मोगलांच्या कैदेत होता. राजारामाच्या पश्चात मोडकळीस आलेली मराठेशाही सावरण्याचे बिकट कार्य ताराबाई करत होती. मराठ्यांचा बंदोबस्त करण्याची उत्सुकता औरंगजेबाच्या मुलांमध्ये आता अजिबात राहिली नव्हती. आपल्या बापापेक्षा वस्तुस्थितीची त्यांना अधिक जाणीव होती. मराठ्यांना रोखायचे असेल तर त्यांच्या घरात भांडणे लावली पाहिजेत हे हेरून शहजादा आजमने उत्तरेच्या वाटेवर असताना शाहूला कैदेतून मोकळे केले. मोगली कैदेतून सुटलेला शाहू स. १७०७ च्या ऑगस्ट / सप्टेंबर मध्ये महाराष्ट्रात आला व त्याने आपल्या चुलतीकडे निरोप पाठवून राज्याची सूत्रे आपल्या हाती देण्याची विनंती केली. ताराबाईने शाहूची विनंती धुडकावून लावत प्रथम तो खरा शाहू नसू तोतया असल्याची घोषणा केली. मात्र, त्यात तथ्य नसल्याने तिने नंतर असा युक्तिवाद केला की, छ. शिवाजी महाराजांनी कमावलेले राज्य शाहूच्या बापाने – म्हणजे संभाजीने गमावले. त्यानंतर आपल्या पतीने – राजारामाने नव्याने राज्य संपादले असता त्यावर आपला हक्क सांगण्याचा शाहूला अधिकार नाही. वातुतः राजारामाने राज्यपद स्वीकारताना राज्याचा खरा वारस शाहू असून तो मोगलांच्या कैदेत असल्यामुळे त्याच्या गैरहजेरीत आपण राज्यभार करत असल्याचे पूर्वीच जाहीर केले होते. खुद्द ताराबाई व तिचे कित्येक सरदार या घोषणेचे साक्षीदार होते. त्यामुळे शाहूचा अधिकार डावलण्यासाठी ताराबाईने जी कारणे पुढे केली ती कित्येकांना पटली नाहीत व त्यांनी सरळसरळ शाहूचा आश्रय घेतला. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर या सर्व घडामोडी सुरु असताना बाळाजी विश्वनाथ यावेळी काय करत होता ? इतिहासकारास ज्या काही नोंदी मिळतात, त्यानुसार बाळाजी हा स. १६९६ मध्ये दंडा राजपुरी व श्रीवर्धनचा देशमुख असून त्यास सभासद पद प्राप्त झाले होते. स. १६९९ ते १७०२ दरम्यान तो राजारामाच्या वतीने पुण्याचा सरसुभेदार असून स. १७०५ मध्ये वणी दिंडोरीच्या मोहिमेवर असल्याचा उल्लेख मिळतो. त्याचप्रमाणे स. १७०४ – ०७ मध्ये तो दौलताबादचा सुभेदार होता. म्हणजे, शाहू जेव्हा महाराष्ट्रात आला त्यावेळी बाळाजी विश्वनाथ हा ताराबाईच्या पदरी सुभेदार म्हणून कार्यरत असल्याचे सिद्ध होते. या ठिकाणी प्रश्न असा उद्भवतो कि, बाळाजी विश्वनाथने शाहूची नोकरी कधी पत्करली ? खेडची लढाई होईपर्यंत तो धनाजी जाधवाच्या हाताखाली असल्याचे सांगितले जाते पण सुभेदार पदावरील व्यक्ती सेनापतीच्या हाताखाली एखाद्या मोहिमेत सहभागी होऊ शकते पण ती कायमस्वरूपी त्याच्या सेवेत कशी काय राहू शकते ? खेडच्या लढाईत धनाजीला मदत करण्यासाठी ताराबाईच्या आज्ञेनुसार बाळाजी सहभागी झाला असेल पण मग प्रश्न असा उद्भवतो कि, खुद्द बाळाजी मनाने शाहूला कधी मिळाला होता ? खेडचे युद्ध सुरु होण्यापूर्वी बाळाजीने धनाजी जाधवास ताराबाईच्या पक्षातून फोडल्याचे सांगितले जाते. वस्तुतः, धनाजी जाधव हा शिवाजी महाराजांच्या अखेरच्या काळात स्वराज्याच्या सेवेत दखल झाला होता. महाराजांच्या कर्नाटक स्वारीत त्याने पराक्रम देखील गाजवला होता. संभाजीच्या सर्व नसल्या तरी बऱ्याच मोहिमांमध्ये त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. सारांश, राज्याचा खरा उत्तराधिकारी कोण आहे हे सांगण्यासाठी त्याला बाळाजी विश्वनाथच काय इतर कोणाचीही गरज नव्हती. मग खेडची लढाई घडून येण्यापूर्वीच तो शाहूला जाऊन का मिळाला नाही ? बाळाजी विश्वनाथने अशी काय मध्यस्थी केली कि ज्यामुळे धनाजीला शाहूच हा राज्याचा खरा वारस असल्याचे कळून चुकले ? या प्रकरणी सखोल संशोधनाची गरज आहे.

             खेडची लढाई जिंकल्यावर स. १७०८ च्या आरंभी शाहूने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. त्यावेळी धनाजी जाधवास त्याने आपले सेनापतीपद दिले. बाळाजीला यावेळी कोणते पद दिल्याचा उल्लेख मिळत नाही. परंतु धनाजी सोबत पुणे – जुन्नर प्रांतात वसुली करण्याच्या कामी त्याची नियुक्ती झाली होती हे निश्चित. परंतु स. १७०८ च्या २७ जून रोजी धनाजीचा मृत्यू झाल्याने पुणे प्रांत ताब्यात घेण्याचे कार्य तसे अर्धवटच राहिले. यावेळी खासा शाहू ताराबाईशी लढण्यात गुंतला होता. धनाजीचा मृत्यू झाल्याने व रांगणा घेण्यात अपयश आल्याने त्याने कोल्हापूर मोहीम आटोपती घेतली. यावेळी बाळाजी नेमका कुठे होता हे समजायला मार्ग नाही पण दि. २० नोव्हेंबर १७०८ रोजी शाहूने त्यास ‘ सेनाकर्ते ‘ पद दिल्याचा उल्लेख मिळतो. शाहूने बाळाजीला केवळ पादच दिले असे नाही तर त्यासोबत कित्येक जबाबदाऱ्या देखील त्याच्यावर सोपवल्या. त्यातील प्रमुख म्हणजे सैन्य व पैशांची उभारणी करणे हे होय ! वस्तुतः हा समय राज्यक्रांतीचा होता. मराठा राज्य दोन तुकड्यांमध्ये विभागलेलं होतं. सातारची गादी संभाजीपुत्र शाहू तर कोल्हापुरास राजारामपुत्र शिवाजी हे दोघे राज्याचे उत्तराधिकारी बनले होते. स्वराज्यसंस्थापक शिवाजी राजांचे व त्यांचा मोठा मुलगा संभाजी याच्या इतके कर्तुत्व या दोघांकडेही नव्हते. शिवाजी निर्मित अष्टप्रधान व्यवस्था केव्हाच मोडकळीस आलेली होती. राजारामाच्या काळात अष्टप्रधान नाममात्र राहून शिलेदार - सरदारांच्या लहान – मोठ्या टोळ्या उभ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या. आपापल्या जमावाच्या बळावर असलेल्या वतनांना दोन्ही छत्रपतींकडून मान्यता मिळवून घेणे व दुसऱ्याचे वतन हडपण्यासाठी लढाया करणे हा त्यांचा नित्याचा क्रम बनला होता. हाताशी असलेल्या फौजांचा खर्च चालवण्यासाठी मोगलाई मुलुख तुटून लुटला जात होता. संभाजीच्या मृत्यूनंतर स्वराज्य असे काही राहिलेच नव्हते. सर्वत्र मोगलांचाच अंमल बसला होता. तेव्हा या तथाकथित ‘ मोगलाईत ‘ पण प्रत्यक्षात स्वराज्यातीलच जनतेवर यांनी लुटमारीचा अक्षरशः कहर करून सोडला होता. एक शासक या नात्याने जनतेला दिल – दिलासा देण्याच्या कामी नाही म्हटले तरी शाहू व ताराबाई हे दोघेही अपयशीच ठरत होते. अर्थात, याबाबतीत त्यांनाही फारसा दोष देता येत नाही. कारण, याच सुमारास मोगल राजवट देखील राज्यक्रांतीच्या फेऱ्यात सापडली होती.

            औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाही तख्तासाठी मुअज्जम, आजम व कामबक्ष एकमेकांशी लढत होते. आपापल्या प्रतीस्पर्ध्यांना जगातून हद्दपार करण्यासाठी त्यांना जशी मोगली सरदारांची गरज होती, त्याचप्रमाणे मोगलांच्या शत्रूंची देखील मदत हवी होती. मोगल शहजाद्यांची अडचण शाहू – ताराराणी ओळखून होते. त्यांनी महाराष्ट्रभर पसरलेल्या मारही सरदारांना आपापल्या कळपात खेचून मोगलांच्या मदतीस पाठवण्याची योजना आखली. परंतु, बादशाही वारसा युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची वेळ मराठी सैन्यावर फारशी आलीच नाही. मुअज्जम व आजम यांचा सामना उत्तरेत घडून आला व त्यात आजमचा निकाल लागला. आता दक्षिणेत फक्त कामबक्ष राहिला होता. कामबक्ष हा तरुण व अननुभवी असल्याने आणि दक्षिणचा माहितीगार झुल्फीकारखान हा मुअज्जम उर्फ बहादूरशहाचा सहाय्यक असल्याने कामबक्षचा शेवट काय होणार हे सर्वजण ओळखून होते. तेव्हा बहादूरशहाचा विजय झाल्यावर त्याला नजराणा भरून आपल्या सत्तेला मोगलांची कायदेशीर मान्यता मिळवण्याच्या उद्योगाला शाहू व ताराबाई लागले. या दोघांच्या धडपडीमागील कारणे उघड होती. मराठ्यांशी लढून मोगल जसे रडकुंडीस आले होते, त्याचप्रमाणे मराठ्यांचे छत्रपती देखील या लढ्याने जेरीस आले होते. छत्रपतींचे पूर्वीचे तेज, सत्ता साफ मावळून बलदंड मराठी सरदारांच्या हातातील बाहुले अशी त्यांची प्रतिमा बनू लागली होती. तात्पर्य, राज्यकारभार सुरळीत चालवण्यासाठी उभय पक्षांना आता शांततेची गरज होती. परंतु, त्यासाठी निवडलेला मार्ग योग्य नव्हता. स. १७०९ मध्ये कामबक्षचा निकाल लावून बहादूरशहा खऱ्या अर्थाने मोगल बादशहा म्हणून प्रस्थापित झाला. त्यावेळी शाहू व ताराबाईने त्याच्याकडे, ‘ आपणांस दक्षिणच्या सहा सुभ्यातून सरदेशमुखी व चौथाई वसूल करण्याची सनद मिळावी ‘ अशी अर्जी दिली. या ठिकाणी सरदेशमुखी म्हणजे काय हे नेमके समजून घेणे आवश्यक आहे.

             शिवपूर्वकाळापासून सरदेशमुखी वतनाची महाराष्ट्रात परंपरा होती. प्रांत वा महालांवर देशमुखांचा अधिकार असे. प्रांतातील वा महालातील लावणी – संचणीची कामे करणे, वसूल गोळा करणे, युद्ध प्रसंगी सैन्य भरती करून आपापल्या सरकारांना मदत करणे इ. त्यांची कामे असत. या बदल्यात गोळा केलेल्या वसुलापैकी त्यांना स्वतःसाठी दहा टक्के घेण्याचा अधिकार होता. अनेक देशमुखांवर मिळून एक सरदेशमुख असे. हाताखालील देशमुखांच्या कामांवर देखरेख करण्याचे त्याचे काम असून गोळा केलेल्या वसुलातील दहा टक्के घेण्याची सवलत त्यास असे. स्वराज्यनिर्मिती जेव्हा करण्यात आली तेव्हा शिवाजीने असे ठरवले की, छत्रपती हाच एकंदर राज्यातील देशमुखांचा सरदेशमुख. त्या अर्थाने, त्याने सरदेशमुखीचा हक्क बजावण्यास आरंभ केला. स्वराज्यातील बव्हंशी देशमुखांना त्याने आपले वेतनी नोकर बनवून त्यांना एकप्रकारे आपले अंकित करून सोडले. आपणांस दक्षिणची सरदेशमुखी कायदेशीररित्या मिळावी यासाठी शिवाजीने शहाजहान – औरंगजेब यांच्याशी अनेकदा पत्राद्वारे वाटाघाटी केल्या पण त्यांनी शिवाजीच्या बोलण्यास कधी स्पष्टपणे होकार वा नकार दिला नाही. परंतु, स. १६६८ मध्ये आदिलशहा व कुतुबशहा यांनी शिवाजीला दक्षिणचा सरदेशमुख समजून त्यास वार्षिक ठराविक रक्कम देण्याचे मान्य केले. एकार्थाने, सरदेशमुखीचा वापर राज्यविस्तार आणि विस्तारीत राज्यास कायदेशीर मान्यता अशा दोन्ही हेतूंनी वापरण्याचा शिवाजीचा हा एक अतिशय धोरणी उपक्रम होता. सरदेशमुखी हक्कांचा अर्थ शाहू व ताराबाई दोघेही जाणून असल्याने त्यांनी, आपणांस दक्षिणच्या सहा सुभ्यातील सरदेशमुखी वसुली हक्कास मोगलांनी मान्यता द्यावी अशी मागणी केली. बहादूरशहा मराठ्यांना हे हक्क देण्यास नाखूष होता. परंतु, त्याने उघडपणे मराठ्यांची मागणी फेटाळून न लावता फक्त इतकेच सांगितले की, ‘ आम्ही हक्क देण्यास तयार आहोत पण तुमच्यातील नेमका कायदेशीर वारस कोण आहे ते आधी ठरवा. मग आम्ही त्यास रीतसर फर्मान देऊ.’ मोगल बादशहाच्या या निवाड्याने स. १७०९ पासून पुढे स. १७१९ पर्यंत – म्हणजे तब्बल १० वर्षे सातारा – कोल्हापूर दरबारांत परस्परांविरुद्ध लढा जुंपून राहिला. या १० वर्षांच्या अवधीत उभयपक्षांनी एकमेकांचा पाडाव करण्यासाठी अनेक भल्या – बुऱ्या मार्गांचा अवलंब केला. दरम्यान या दोन घराण्यांच्या वैरात कित्येक जुनी घराणी मागे पडून नवीन सरदार घराणी पुढे आली. त्यांपैकी एक म्हणजे बाळाजीपंताचे घराणे होय !
                                                                      ( क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: