शनिवार, १० ऑगस्ट, २०१३

लालसोटची लढाई ( स. १७८७ )

                                     
                                           महादजी शिंदे
                मराठी राज्याच्या इतिहासात एकच पानिपत घडून आले असा सर्वसाधारण समज आहे, परंतु स. १७६१ च्या पानिपतप्रमाणेच स. १७८७ मध्ये लालसोट येथे पानिपतच्या प्रसंगाची पुनरावृत्ती होते कि काय अशी काही काळ तरी मराठी मुत्सद्यांच्या मनी भीती तरळत होती. अर्थात, या दोन्ही पानिपतच्या घटनांमध्ये जसे २६ वर्षांचे अंतर आहे, त्याचप्रमाणे परिस्थितीत देखील जमीन - अस्मानचा फरक आहे. स. १७६१ च्या पानिपतावर जवळपास सर्व महाराष्ट्र एकवटला होता असे अतिशयोक्तीचा आधार घेत म्हणता येईल. पण, १७८७ च्या लालसोट प्रसंगाबद्दल असे काही म्हणता येत नाही. पानिपतावर पेशवे कुटुंबातील मंडळी व अनेक लहान - मोठे सरदार एकवटले होते, तर लालसोटवर फक्त एकच मराठी सरदार -- महादजी शिंदे अडकून पडला होता. पानिपतावर मराठी सेना परिस्थिती व सेनापतीच्या विशिष्ट विचारसरणीवर आधारीत निर्णयांमुळे कोंडीत सापडली होती. त्याउलट लालसोटवर शिंदेशाही सेना, आपल्या सेनापतीच्या फाजील आत्मविश्वासामुळे अडचणीत आली होती. पानिपत आणि लालसोट या दोन लढायांची तुलना करता असे लक्षात येते की, पानिपतचे युद्ध हे काहीसे स्थिर प्रकारात मोडते तर लालसोटचे गतिमान ! विश्वासघात, फितुरी यांचा उपद्रव जितका पानिपतावर झाला नाही तितका लालसोटवर झाला. अर्थात, पानिपतप्रमाणे लालसोटवर मराठी फौज घेरली जाउन तिची कत्तल उडाली नसल्याने लालसोट विषयी मराठी इतिहास वाचकांना फारशी माहिती नाही. काही अज्ञात कारणांमुळे इतिहासकारांनी देखील याकडे काहीसे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. असो, प्रस्तुत लेखात या लालसोटच्या लढाईचे विश्लेषण करण्याचा हेतू आहे. 

                                           पार्श्वभूमी 


                   स. १७८३ मध्ये पहिल्या इंग्रज - मराठा युद्धाची समाप्ती सालबाईच्या तहाने झाली. हा तह महादजी शिंदेच्या मध्यस्थीने पुणे - कलकत्ता दरबारच्या दरम्यान घडून आला होता. पहिल्या इंग्रज - मराठा युद्धामध्ये देशभरात ठिकठीकाणी युद्धप्रसंग करावे लागल्याने इंग्लिश ईस्ट कंपनीचा व्यापार जवळपास ठप्प झाला. कंपनीच्या चालकांनी याबाबतीत हिंदुस्थानातीचा गव्हर्नर जनरल हेस्टिंग्सचे कान उपटल्यामुळे त्याने कसेबसे हे युद्ध आवरते घेतले. दरम्यान, सालबाईचा तह घडवून आणताना महादजी व हेस्टिंग्सच्या दरम्यान एखादा गुप्त करार झाल्याची शंका येते. कारण, सालबाईचा तह घडून आल्यावर महादजीने दिल्लीच्या राजकारणात हात घातला. त्यावेळी मोगल बादशहाने मागणी केली असता व परिस्थिती अनुकूल असतानाही हेस्टिंग्सने दिल्लीच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याचे साफ नाकारले. परिणामी, मोगल बादशहाने मराठ्यांचा -- पर्यायाने महादजी शिंदेचा आश्रय घेतला. पानिपतप्रसंगी व पूर्वीदेखील मराठी सरदारांनी दिल्ली दरबारचे राजकारण खेळवले होते. परंतु, आधीच्यांनी ज्या चुका केल्या त्या टाळून आपली व मराठी राज्याची सत्ता प्रस्थापित करण्याचा महादजीचा प्रयत्न होता. पानिपतपर्यंत आणि नंतर देखील पेशव्यांची मजल दिल्ली दरबारची मीरबक्षी -- सरसेनापतीपद मिळवण्यापलीकडे गेली नव्हती. यावेळी मात्र मोगल बादशहाचे प्रतिनिधीपद -- वकील - इ - मुतलकी प्राप्त करून घेण्याचा महादजीने खटाटोप आरंभला. इकडे सालबाईचा तह झाल्यावर इंग्रजांना देखील काही काळ स्वस्थता लाभली. महादजी दिल्लीचे राजकारण हाती घेताना मोगल बादशहाच्या प्रतिनिधीचे पद घेण्याचा प्रयत्न करेल अशी हेस्टिंग्सला आरंभी बिलकुल कल्पना नव्हती. पण त्याची पावले त्या दिशेने वळलेली पाहताच हेस्टिंग्सने महादजीसोबत केलेला गुप्त सलोखा साफ उडवून लावत स. १७८४ च्या मे महिन्यात लखनौला येउन तळ ठोकला. तेथे बसून त्याने मोगल शहजादा मिर्झा जवानबख्तला मधाचे बोट लावून त्याच्यामार्फत बादशाहीत हात - पाय पसरण्याचा यत्न केला. परंतु, महादजीने स. १७८४ च्या नोव्हेंबरमध्ये हेस्टिंग्सचे प्रयत्न निष्फळ करीत बादशाही प्रतिनिधीचे पद प्राप्त करून घेतले. त्यामुळे मोगल बादशाहीची सर्व सत्ता महादजीच्या हाती आली. वकील - इ - मुतलकीचे पद पुणे दरबारकडे गेल्याने हेस्टिंग्सची मोठी निराशा झाली. त्याने लखनौला मुक्काम गुंडाळून कलकत्ता गाठला. एवढ्यात त्याच्या नोकरीचा कालावधी पूर्ण झाल्याने स. १७८५ च्या फेब्रुवारीमध्ये त्याने इंग्लंडचा रस्ता धरला, तर त्याच्या जागी नियुक्त झालेल्या लॉर्ड कॉर्नवॉलिसला अधिकारावर येउन सर्व सूत्रे हाती घेण्यास स. १७८६ चा सप्टेंबर उजडावा लागला. कॉर्नवॉलिस अधिकारावर येईपर्यंत इंग्रजांनी अगदीच तटस्थतेचे धोरण स्वीकारल्याने दिल्लीच्या कारभारात आपला जम बसण्यास फारसा अडथळा येणार नाही असा महादजीचा अंदाज होता. परंतु, त्यास मोगलांच्या राजकीय सामर्थ्याचा अजून पुरता अंदाज आलेला नव्हता. दक्षिण्यांनी मोगल बादशाहीची सूत्रे आपल्या हाती घ्यावी हे खुद्द बादशहा शहा आलमच्या परिवारातील मंडळींना सहन झाले नाही तिथे इतर उमरावांची काय कथा ? कसल्याही परिस्थितीत महादजीचा जम बसू न देण्याचा त्यांनी एकप्रकारे निश्चय केला. त्यांस इंग्रजांची देखील भर मिळाली. त्यांनी ठिकठीकाणच्या हिंदू - मुस्लिम सत्ताधीशांना महादजी विरोधात -- पर्यायाने पुणे दरबारच्या विरोधात चिथावणी देण्यास आरंभ केला. परिणामी जाट, राजपूत, शीख हे संस्थानिक महादजीच्या विरोधात बंडावा करू लागले. यावेळी महादजीकडून एक मोठी चूक घडून आली. त्याने पूर्वीची पद्धत साफ सोडून नव्या पद्धतीचा स्वीकार केला. यापूर्वी संस्थानिकांनी विरोध वा बंडाळी केल्यास थोडीफार लष्करी कारवाई करून त्यांचा बंडावा मोडण्यात येई, पण संस्थाने कायम राखली जात. त्यांचे महत्त्व एकदम न घटवता हळूहळू त्यांना निष्प्रभ केले जात होते. होळकर घराणे या धोरणाचे प्रमुख पुरस्कर्ते होते. एकेकाळी शिंदे देखील याच सूत्रानुसार वागत होते पण महादजीने यावेळी हा क्रम मोडून सरसकट संस्थानेच निकाली काढण्याचा उपक्रम स्वीकारला. परिणामी त्याच्याविरोधात उत्तरेतील लहान - मोठ्या सत्ताधीशांनी कारस्थाने उभारणे स्वाभाविक होते. राज्यकारभाराच्या अशाच घालमेलीत लालसोटचे प्रकरण उपस्थित झाले. लालसोट प्रकरणात जयपूर, जोधपुरच्या संस्थानिकांनी प्रामुख्याने सहभाग घेतला. त्यांना बादशाही अंमलदारांची उघड साथ असल्याने अल्पकाळ महादजीची परिस्थिती बिकट बनली होती. पैकी, जयपूर - जोधपुरकरांची या ठिकाणी संक्षिप्त माहिती देतो. 

                  जयपूरास यावेळी माधोसिंगचा मुलगा प्रतापसिंग राज्यकर्ता असून पानिपत पूर्वीपासूनच जयपूरकरांचे व मराठी सरदारांचे वैर जुळले होते. जोधपुरास बिजेसिंग राजा असून, यानेच मारेकरी पाठवून जयाजी शिंद्याचा खून केल्याचे शिंदे कुटुंबीय अजून विसरले नव्हते. महंमद बेग हमदानी हा मोगल मनसबदार असून बादशाही सैन्यावर याचे बऱ्यापैकी वजन होते. लालसोट प्रसंगी याने उघड उघड फितुरी केल्यानेच महादजीवर संकट ओढवले. जयपूरकरांचा एक मांडलिक, माचेडीचा रावराजा प्रतापसिंग -- अलवार संस्थानाचा संस्थापक -- हा महादजीचा समर्थक होता. ( जयपूर व माचेडीच्या संस्थानिकांचे नाव एकच असल्याने वाचकांचा गोंधळ उडू नये यासाठी माचेडीकर प्रतापसिंगाचा उल्लेख यापुढे रावराजा म्हणून करण्यात येईल.) याखेरीज भरतपूर जाट राजा रणजितसिंग हा देखील महादजी पक्षपाती होता. या दोघांमुळेच लालसोट नंतर उत्तर हिंदुस्थानात महादजीचा निभाव लागला.   
           

     लालसोट स्वारीचे प्रयोजन :- लालसोटची मोहीम मुख्यतः जयपूरकरांमुळे उद्भवली. पेशवे व मोगल बादशहा यांच्या वतीने महादजीणे जयपूरकरांकडे खंडणीची मागणी केली. मागील थकबाकी व चालू सालची मिळून सकून साडे तीन कोटींची आकारणी महादजीने जयपूरवर केली. जयपूरकरांनी एवढी मोठी रक्कम भरण्यास असमर्थता दर्शवली. याच सुमारास माचेडीच्या रावराजाने महादजीसमोर एक नवीन प्रस्ताव मांडला. जयपूरचा खरा वारस प्रतापसिंग नसून मृत पृथ्वीसिंगचा पुत्र मानसिंग हाच खरा हक्कदार आहे. त्यास आपण जयपूरची गादी मिळवून द्याल तर मी तुम्हाला ५० लक्ष रुपये देईन. जयपूरकरांना हि बातमी लागली. यावरून महादजीचा व त्यांचा बराच वाद झाला आणि महादजीने बादशाही अधिकारांचा वापर करून जयपूरच्या जप्तीस आरंभ केला. संस्थान खालसा होणार म्हटल्यावर जयपूरकर खवळून उठले. त्यांनी जोधपुरच्या बिजेसिंगाकडे मदतीची याचना केली. जोधपुरकरांशी तर शिंद्यांचा उभा दावा होता. त्यात महादजीने जोधपुरकरांकडे अजमेरचा ताबा मागितल्याने ते नाराज झाले होतेच. तेव्हा त्यांनी जयपूरकरांची बिलकुल उपेक्षा केली नाही.

              
                लालसोट मोहिमेस आरंभ 

     स. १७८६ च्या दसऱ्यास महादजी मोगल बादशहा शहा आलमला सोबत घेऊन जयपूरवर चालून गेला. आरंभी उभय पक्षांमध्ये बोलाचाली झाल्या. त्यात जयपुरकरांनी माचेडीकर रावराजाच्या मध्यस्थीने साडेतीन कोटीं ऐवजी बासष्ट लक्ष रुपये देण्याचे मान्य केले. त्यापैकी आठ लक्ष रोख देऊन बाकीचे हप्ते देण्याच्या गोष्टी बोलू लागले. वस्तुतः यावेळी पैशाच्या बाजूने महादजीची हलाखी झाली होती. मोगल बादशाहीचा कारभार जरी त्याच्या हाती आला असला तरी याचा अर्थ असा नाही की, त्यास मोगलांचा धनसंपन्न खजिना प्राप्त झाला. उलट मोगल बादशहा व त्याचा परिवार आणि बादशाही सैन्यास जागवण्याची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. जिथे खुद्द महादजीला आपल्या फौजेला दरमहा पगार देता येत नव्हता तिथे बादशाही सैन्य वा परिवारास तो काय देणार ? तेव्हा मिळेल त्या मार्गाने पैसा पदरात पाडून त्यास मोगल बादशहास राजी राखायचे होते. यासाठी त्याने दोन्ही दरडींवर हात ठेवला. जयपूरकरांनी रोख रकमा हाती दिल्या तर प्रतापसिंगासच कायम ठेवायचे नाहीतर रावराजाच्या मार्फत मानसिंग यास जयपूरची गादी देऊन पैसा उकळायचा. तात्पर्य, निव्वळ पैसे मिळवण्यासाठी महादजीने राजपुतांवर मोहीम आखली होती.
        याच सुमारास म्हणजे स. १७८५ – ८६ मध्ये पुणे दरबार व निजामाची टिपू विरुद्ध नियोजित मोहिमेची तयारी जोरात सुरु होती. प्रसंगी माघार घ्यावी लागू नये म्हणून नाना फडणीसने यावेळी तुकोजी होळकरास मुद्दाम या स्वारीत सहभागी करून घेतले होते. परिणामी, उत्तरेत महादजीस प्रसंगी कुमक करणारा वजनदार मराठी सरदार कोणी राहीला नव्हता. पुणे दरबारची टिपूवर स्वारी होणार हे महादजीला माहिती होते, पण त्यासाठी त्याला राजपुतांवरील मोहीम पुढे ढकलण्याची गरज वाटली नाही. प्रथमदर्शनी तरी आपल्या व बादशाही फौजांच्या बळावर आपण सहजी राजपुतांचा पराभव करू अशी त्यास उमेद होती.
             जयपूरकरांनी आरंभी बासष्ट लाखांची खंडणी भरण्याचे मान्य केले खरे पण रकमेचा भरणा करण्यास त्यांनी टाळाटाळ आरंभली. तेव्हा महादजीने युद्धाची तयारी चालवली. तिकडे जोधपुरकरांची सेनाही जयपूरच्या मदतीस येण्यासाठी रवाना झाली होती. सर्व रागरंग पाहून, ता. १० मार्च १७८७ रोजी शहा आलमच्या राज्यारोहणाचा वाढदिवस झाल्यावर महादजीने त्यास दिल्लीला रवाना केले. मोगल बादशहाची पाठवणी चालू असताना महादजीने उदेपूरकरांकडेही खंडणीची मागणी केली. परंतु, त्यांनी रकमेचा भरणा करण्याची तयारी दर्शवून युद्ध प्रसंग टाळण्याचा मार्ग स्वीकारला. त्यामुळेच महादजीचा काहीसा बचाव झाला. अन्यथा याचवेळी त्याच्यावर आणि उत्तर हिंदुस्थानातील मराठी सत्तेवर भयंकर मोठे संकट ओढवले असते. मात्र, त्याला अजूनही परिस्थितीची व्हावी तशी जाणीव झाल्याचे दिसून येत नाही, कारण, ता. १२ मे १७८७ रोजीच्या एका पत्रानुसार जयपूर – उदेपूरचा बंदोबस्त करून महादजी छावणीसाठी मथुरेस जाणार असल्याचा उल्लेख आहे. यावरून, प्रत्यक्ष लढ्याचा प्रसंग न उद्भवता लष्करी कारवाईचा धाक दाखवून आपण कार्य साधून घेऊ असा महादजीचा आरंभीचा अंदाज असल्याचे दिसून येते. असो, मे महिन्यात महादजीचा मुक्काम डिग जवळ होता. याच सुमारास इंग्रजांनी कानपूर येथील आपल्या फौजांचा तळ हलवला. तेव्हा बादशहाने महादजीला जयपूरचे प्रकरण सोडून दिल्लीस येण्याचा आदेश दिला. परंतु, महादजीने यावेळी शाही सल्ला अव्हेरून जयपूरची मोहीम पुरी करण्याचा निर्धार केला. जून महिन्यात त्याची स्वारी जयपूरनजीक आली. बादशाही उमराव महंमद बेग हमदानी यास त्याने जयपूरच्या उत्तरेस पाठवले होते. त्या ठिकाणी तो असताना दररोज तीन हजार रुपये देण्याच्या बोलीवर जयपूरकरांनी त्यास आपल्या पक्षात वळवून घेतले. महादजीच्या पक्षाला हा सर्वात मोठा हादरा होता. तरीही, शिंदे पाटलांना वस्तुस्थितीची व्हावी तशी जाणीव झालेली दिसत नाही. हमदानी सारखा मातबर सरदार फुटल्याने बादशाही फौजांवर विसंबून राजपुतांशी गाठ घालणे – तेही वजनदार मराठी सरदार आसपास नसताना – लष्करीदृष्ट्या आत्मघातच होता. त्याशिवाय, ज्या मोगल बादशहाने महादजीला आपला प्रतिनिधी बनवले होते, तो शहा आलम तरी महादजीला मनापासून कुठे पाठिंबा देत होता. बादशहाचा धरसोडपणा आणि गळेकापूवृत्ती शिंद्याच्या चांगलीच परिचयाची होती. मात्र, त्याने यावेळी एकप्रकारे हट्टास पेटून हि स्वारी पुढे चालूच ठेवली. मारवाड मोहिमेत जयाजी शिंदेने जे केले त्याचीच हि सुधारित पुनरावृत्ती होती !
                  स. १७८६ – ८७ च्या दरम्यान अफगाण बादशहा तयमुर अब्दालीचा मुक्काम पेशावारास होता. यावेळी राजपुतांनी तयमुरला आपल्या मदतीस येण्याची विनंती केली. खासा अफगाण पातशहास जर येण्यास सवड नसेल तर त्याने शहजादा हुमायूनला तरी पाठवावे अशी सूचनाही केली. त्याखेरीज पंजाबातून शीख रस्ता देणार नाहीत तर आम्ही आमच्या मुलखातून तुमच्या येण्याची व्यवस्था करू असे आश्वासनही दिले. परंतु, यावेळी तयमुरचे आसन अस्थिर असल्याने त्याने राजपुतांना साफ नकार कळवला. अफगाण बादशहाने मदत नाकारल्याने राजपूत काहीसे नाराज झाले. मात्र मोगल दरबारातील असंतुष्ट उमरावांना हाताशी धरण्याच्या त्यांच्या प्रयत्नास बऱ्यापैकी यश प्राप्त झाले. हमदानी तर त्यांना उघडपणे येऊन मिळाला होताच, पण त्यासोबत महादजीसोबत असलेल्या मोगल फौजेतील कित्येक अंमलदारही अंतस्थरित्या त्यांना सामील झाले. सारांश, पानिपतपूर्व शुक्रताल येथे जी दत्ताजीची परिस्थिती होती तशी आता महादजीची बनली. आता गरज फक्त अब्दालीची होती. मात्र, यावेळी अब्दालीची भूमिका बजावण्याची संधी इंग्रजांकडे चालून आली असतानाही त्यांनी या संघर्षात उघड भाग घेण्याचे टाळले. अन्यथा, शुक्रताल नंतर बुराडी येथे दत्ताजीची जी गत झाली अथवा पानिपतावर भाऊच्या फौजेचे जे झाले तेच यावेळी शिंद्याच्या सैन्याचे झाले असते.
             जून – जुलैमध्ये वृंदावन येथे असलेला मानसिंग, महादजीच्या निरोपावरून त्याच्या छावणीत दाखल झाला. जयपूरकर पैसे देत नाहीत तर मानसिंगला गादीवर बसवून त्याबदल्यात पैसे उकळण्याचा महादजीने निर्धार केला. दरम्यान, जयपूर – जोधपुरच्या फौजा एकत्र येऊन त्यांना हमदानी देखील मिळाल्याने युद्धाचा प्रसंग उपस्थित झाला. ता. २८ जुलै १७८७ रोजी लालसोटची लढाई घडून आली. या संग्रामाचे वृत्त महादजीने नाना फडणीसास लिहून कळवले ते खालीलप्रमाणे :-
   “ हमदानी सुद्धां राजपुतांचा जमाव पन्नास हजार जाला. साठ तोफा त्यांच्या होत्या. खंडेराव हरी व अंबुजी इंगळे येऊन पोचल्यावर सड्या फौजा मुकाबल्यास होत्या, त्यां सुद्धां गांठ घालावी हे ठरवून अधिक श्रावण शु. १४ स ( २८ जुलै १७८७ ) तोफखाना सुद्धां चालून गेले. तेही गोठ सोडून पुढे आले. प्रथम दोन प्रहरपर्यंत दुतर्फा तोफांची मारगिरी झाली, तेव्हां रांगड्यांनी तीन टोळ्या करून डावे बाजूस अंबुजी इंगळ्यावर उठावणी केली. इंगळ्यांनीही घोडे चालवून त्यांचा गोल फोडून दोन तुकडे केले. इकडून शिवाजी विठ्ठल, धारराव शिंदे, रायाजी पाटील व खंडेराव हरी यांसी कबरक्यांत घोडे घालावयासी सांगितले. त्यांनी उठोन राजपुतांचे तोंड फिरवून पाऊण कोस मारीत गेले. राणेखानभाईचे तोंडावर प्रतापसिंग व हमदानी होता, त्यांसीं आडवी मार देऊन त्यांची मदत करू दिली नाही. हमदानी गोल बांधून उठावणी करण्याच्या विचारात होता. इतक्यांत इकडील तोफांनी मारगिरी दिल्ही, त्यांत हमदानी गोळा लागून ठार झाला. डावे बाजूस राठोड व कच्छवे यांचे तोंड ठेचले. राणेखान भाई उभे होते त्यांजवर दोनतीन तोफा थोरल्या जयपूरकरांनी लागू केल्या. गोळे बहुत आले. शेपन्नास घोडी, माणसे जखमी व ठार जाली, परंतु भाई ठिकाणावरून हालले नाहीत. तोफेच्या गोळ्याने त्यांच्या तलवारेच्या कबजाची वाटी उडाली, तोच गोळा मोतद्दारास लागला, पण भाई ठिकाणावरून हालले नाहीत. ईश्वरे त्यांस कुशल केले. प्रातःकाळचे प्रहर दिवसापासून दोन घटका रात्रपावेतो परस्पर तोफा चालल्या. उपरांत दोघेही चौकी ठेवून आपापले गोटांत गेले. ते दिवस इकडील लढाई चांगली झाली. रांगडे मोडून घातले. हमदानी मेला. तसेच चालून गोटावर जावे इतक्यांत पर्जन्य आला. त्यांचे तोंडापुढे नाले व खळ्या होत्या त्या आसऱ्यास गेले. झुंज रुबकर होऊन राठोडास मारून माघारे घातले. शोभाराम भंडारी व भीमसिंग राठोडाचा मेहुणा व पंधरा वीस मातबर जमादार रणांत पडले. हमदानी गोळा लागून हत्तीखाली पडून मृत्यू पावला. आपले फौजेस पाणी नजीक नव्हते. मागे पाऊण कोस नदी होती तेथून पखालीने पाणी पुरविले. घोड्यांस पाण्याचा ताण बसला, म्हणून ते दिवशी रांगडे वाचले. हजार मुडदा राठोडांचा व जयपूरवाल्यांचा खेतांत राहिला. शिवाय जखमी दोन हजार जाले. त्यांचा सरंजाम पोक्त व माणूस लढवाई एकजूटीचे, परंतु श्रीमंतांचे प्रतापे त्यांचे पारपत्यच जाले. दुसरे दिवशीही फौज तयार होऊन गेली, परंतु शत्रू गोठ सोडून पुढे वाढून आले नाहीत. गोटानजीकच संगर खोदून उभे राहिले. लवकरच पुरतेपणे पारपत्य होऊन येईल.” ( संदर्भ ग्रंथ :- मराठी रियासत खंड ७ )
              महादजीचे हे पत्र वाचल्यावर कोणालाही वाटेल कि पाटीलबावांनी यावेळी मोठाच विजय मिळवला. पण वस्तुस्थिती तशी नाही. खरेतर लालसोटचे रण निकाली निघालेच नव्हते. राजपुतांचा निर्णायक काय पण पुसटसा देखील पराभव झाला नव्हता. उलट त्या दिवशीचा संग्राम म्हणजे निव्वळ कबड्डीचा सामना ठरून, दोनच दिवसांनी महादजीला जीव घेऊन पळत सुटावे लागले होते. वाचकांना माझे मत धक्कादायक वाटेल, परंतु ते वस्तुस्थिती आणि पुराव्यावर आधारीत आहे याची त्यांनी नोंद घ्यावी. नानाचा महादजीजवळ असलेला वकील सदाशिव दिनकर यावेळी महादजीसोबत नव्हता, पण त्याने लालसोट व त्यानंतरच्या घटनांची सखोल चौकशी करून नाना फडणीसला जे लांबलचक पत्र पाठवले तेच या ठिकाणी देतो. त्यावरून वाचक देखील माझ्या निष्कर्षाशी सहमत होतील अशी आशा आहे.
       “ आतून रांगड्यांनी बावांचे फौजेत फितूर केला हे समजले नव्हते. पलटणे व मोगल यांजकडे संधाने करून बावांस व भाईआदिकरून सरदारांस दगा करावा, लढाईत घालवावे, हे न साधल्यास आमचे फौजेत शिरून दक्षण्यांची लढाई मोडावी, अशी संधाने सिद्ध जाली होती. शनिवार ता. २८ जुलैचेच लढाईत आमचेकडील हजारो गोळे चालले असतां शत्रूची फौज उभी आहे, हालत का नाही, भाईंस संदेह येऊन बातमीदार पाठविले, त्यांनी बातमी आणली की, गोळा तेथपावेतो पोचतच नाही. तेव्हा गोलंदाजास पुसले. ते म्हणू लागले तोफा धाकट्या. तेव्हां थोरल्या दोन तोफा नेऊन लाविल्या. त्यांचाच गोळा हमदानीस लागून तो ठार झाला. दुसरे दिवशी आदितवारी दोनचार तोफांचे गोळे मारिले, परंतु शत्रू बाहेर आले नाहीत. तो सोमवारी ( ३० जुलै ) आमचे सारे पलटणांनी डी बॉयनच्या पायदळांनी आठ महिन्यांची तलब चुकवून द्या म्हणून तटाचे बोलणे घालून अडवणूक केली. सात हजार माणूस एकत्र जाले. वरकड आपापले जागां बैदा करून बसले. बावांनी बहुतांकडून तोडीजोडी बोलविल्या. शेवटी ‘ बावांच्या अंगावरील वस्ता ठेवून तुम्हांस तीन रोजमऱ्याचा ऐवज देऊ, वरकड हिशेब लढाई आटोपल्यावर चुकवू ‘ असे बोलले. परंतु ते कोणताही जाबसाल ऐकेनात. त्यांचे निसबतीस सवाशे तोफा दारूगोळ्या सुद्धां होत्या. तलब चुकवून द्या, नाही तर याच तोफांची तोंडे तुम्हांवर फिरवू व तोफा घेऊन जाऊ, असे बोलले. मंगळवार ( ता. ३१ जुलै ) रोजी सवाशे तोफा व सात हजार बंदुक गोलंदाज सुद्धां घेऊन चालले. तेव्हां बावांनी शिवाजीपंत बापू व रावराजा आदिकरून तमाम सरदारांस सल्ला पुसली. त्यापूर्वीच जयपूरकरांस सूचना मिळून त्यांचे गोटांत तमाम फौजेची तयारी झाली. याप्रमाणे बातम्या एकामागून एक येऊन पोचल्या, तेव्हां सर्वांचे विचारे ठरले, जे हिंदुस्थान्यांचा विश्वास काय, सारेच फितुरी. येसमयी लढाई घेणे सलाह नाही. लष्करांत गर्दी होऊन पाणिपत होईल. याप्रमाणे बोलत आहेत तोच कंपू दीड कोस निघून गेला ; त्यास जयपुरकराने आपले जवळ उतरविले आणि लढाईस सिद्ध झाले. तेव्हां इकडूनही भाईसमागमे तमाम सरदार जीनबंदी होऊन लढाईस उभे राहिले. चारपांच घटका रात्री कंपूने तोफांची एक शिलग केली, तेव्हा चालून येतात असे सर्वांस समजले. बावांनी चिलखत आणविले आणि निश्चय केला की, आपण चालून जावे, ईश्वराने नेमिले असेल ते होईल. उपरांतिक प्रहर सहा घटिकांनी शिवाजीपंत बापू पाटीलबावांस व भाईंस एकांती घेऊन बोलले. ‘ समय पाणिपतासारखा प्राप्त झाला. आजच रात्री ते चालून येते तर मरणे प्राप्त. आपली पलटणे तोफा त्यांजकडे गेल्याने ते हावभरी झाले. आतां परीक्षा पाहावयाची बाकी नाही. दक्षणी फौज किती आपले ध्यानांत आहे. चार शेरांची धारण, बाहेरून रसद येत नाही. शिलेदार उपासाने मेले. घोडी मेली. राहिली त्यांत सामर्थ्य नाही. वैरणीचा दुष्काळ, लढाई कशाचे बळावर घेणार ! चार दिवस येथून निघावे. मसलतीस टाळा द्यावा. पुढे पाहून घेऊ. याप्रमाणे बोलून मागील प्रहर रात्री सड्या फौजा तोंडावर ठेवून बावा व आपण मागे राहून बुणग्यांचे कूच माघारां करविले. लोकं आपापले सामान लादायाचे गडबडीत असतां बुणग्यांत तोफा होत्या, त्यांतील एक दारूचा संदुक कोणे प्याद्याने बत्ती लावून उडविला. त्याने कडाखा उडून जवळ आणखी दारू होती तीही उडाली. संधान करणाराने कसूर केला नाही, परंतु ईश्वरे मोठे कुशल केले. बाणांस बत्ती पोचती म्हणजे लष्कर ते दिवशीच बुडाले होते. लोकांस वाटले, पलटणांनी तोफा आपले लष्करावर फिरवल्या. वसवास ( दहशत , धास्त ) खाऊन पळू लागले. वस्तभाव लादालाद ज्यांची जाली होती ते घेऊन निघाले, ज्यांची राहिली ते तसेच टाकून पळाले. बाजारकऱ्यांचा दाणादुणा, कापड, राहुटी, पाले, पाटीलबावांच्या मुदपाकाची भांडी व फरासखान्याची ओझी तशीच तळावर राहून लोकं जीव घेऊन पळू लागले तो लष्करचे सोद्यांनी व पेंढारी यांनी अफरासियाबखानाचा बाजार लुटला. विनालढाई एकच गर्दी चहूंकडून विलग तऱ्हेची होऊन बुणगे निघाले. पाठीमागून पाटीलबावा तळावर आले तों ही अवस्था दिसली. तेव्हां तेथे उभे राहून सामान लादविले आणि अफरासियाबखानाची स्त्री व मूल यांस हत्तीवर मार्गस्थ करून तळास आग देवविली, आणि पिंपळाईस येऊन तिसरे प्रहरी मुक्काम केला. ( दि. १ ऑगस्ट ) पाठीमागून भाई वगैरे फौजा घेऊन रात्री गोटांत आले. बादशहाच्या तैनातीतली दयाराम पुरब्याची दोन पलटणे तलब द्या, नाही तर येत नाही म्हणून अडून उभी राहिली होती. बावांनी बहुतां प्रकारे सांगितले. न ऐकत. पाठीमागून भाई आले, त्यांनी बावांस बिदा केले आणि सांगितले यांसी बोलून पाहतो. आले तर उत्तम, नाही तर दोनही पलटणे कापून काढून तोफा आपल्या घेऊन येतो, आपण पुढे जावे. नंतर भाईंनी पलटणांस सख्त रीतीने बोलून लष्करांत घेऊन आले. दुसरे दिवशी पुनः आठा कोसांवर येऊन मुक्काम केला. पाठीमागून हमदानीचा पुतण्या इस्मईलबेग व पहाडसिंग व दौलतराम हलद्या पंधरा हजार फौजेनिशी पाठ्लागास येतात, अशी बातमी आल्यावरून बावा, भाई व सरदार मोठमोठ्या मजला करीत डिगे पावेतो आले. लष्कराने अवाई खादली आहे. इतका फितूर केवळ एक दों रोजांत जाला नाही. दोनचार महिने संधान चालत आल्याचे समजले. चौकशी होत आहे. फितुरीयांची पारिपत्ये होतील. बावांनी कुलकुटुंबे व कारखाने ग्वालेरीस रवाना करून आपण सडे झाले. हिंदुस्थानी माणूस बेईमानी, सावधपणे वर्तत जावे म्हणून स्वामींची चिठी बावांस एकांती दाखविली. स्वामींच्या लिहिल्याप्रमाणेच प्रत्ययास आले. आतां स्मरतात. हिंदुस्थानीयांनी दौलतच गारद केली होती. पाणिपत होण्यांत बाकी नव्हती. श्रीमंतांच्या पुण्येंकरून बचाव जाला, ही मोठी गोष्ट. सांप्रत बावाही आपले जागां खिन्न आहेत. सर्वांनी लिहिले व सांगितले, परंतु होणारासारखी बुद्धी जाली. पुढे बंदोबस्त होईल तो मागाहून लिहून पाठवू. “ ( संदर्भ ग्रंथ :- मराठी रियासत खंड – ७ )
     
         महादजी व सदाशिव दिनकरच्या पत्रांमधील माहितीत विरोधाभास असला आणि प्रत्यक्ष घटना घडतेसमयी सदाशिव दिनकर त्या ठिकाणी हजर नसला तरी त्याचेच बातमीपत्र अधिक विश्वसनीय आहे. लालसोटचे रण आपण जिंकल्याचा दावा जरी महादजी करत असला तरी त्याच्याच पत्रात त्याने दाखवून दिले आहे कि शत्रूचे रणावरील मोर्चे देखील त्यास उध्वस्त करता आले नाहीत, आणि त्याच्या नाकावर टिच्चून शत्रू तळ ठोकून बसला आहे. याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, महादजीने  लालसोटचे वर्तमान नानास कळवताच त्यातील गर्भितार्थ जाणून त्याने तुकोजी होळकर व अलीबहाद्दर ( समशेरबहाद्दरचा मुलगा ) यांना महादजीच्या मदतीसाठी रवाना केले. जर खरोखर महादजी लढाई जिंकला असता तर या दोघांना ताबडतोब उत्तरेत रवाना करण्याची नाना फडणीसला आणि महादजीला माघार घेण्याची काय गरज होती असे प्रश्न उद्भवतात. सारांश, लालसोटची लढाई अनिर्णीत राहून केवळ उत्तरेतील सैन्याने फितुरी केल्याने महादजीला एकप्रकारे पराभूत होऊन जीव घेऊन पळत सुटावे लागले होते हे उघड आहे. 

       लालसोटच्या संग्रामाचे विश्लेषण :- शनिवार २८ जुलै १७८७ रोजी लालसोट येथे शिंदे – मोगल यांची संयुक्त सेना जयपूर – जोधपुरकरांच्या समोर ठाकली. दोन्ही बाजूंनी सैन्यरचना कशा प्रकारे केली होती याची माहिती सध्या तरी मला उपलब्ध झाली नाही. परंतु, एक गोष्ट स्पष्ट आहे कि, युद्धक्षेत्राचा विस्तार हा कित्येक मैलांचा असून प्रतीपक्ष्याचे सर्व प्रमुख योद्धे, सेनानी रणात हजर होते तर खासा महादजी शिंदे आपल्या राखीव सैन्यासह आघाडीवरील सैन्य आणि छावणी यांच्यादरम्यान उभा राहिला होता. पानिपतमध्ये अब्दालीने मागे राहण्यात जी चतुराई दाखवली होती त्याचे एकप्रकारे महादजीने अनुकरणच केले असे म्हणावे लागते. चुकांमधून शिकत जाणारीच माणसे पुढे महत्पदास जातात, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
               पहाटे सूर्योदयानंतर केव्हातरी दोन्ही बाजूच्या सेना रणभूमीवर झेपावल्या. दुपारी बारा वाजेपर्यंत दोन्हींकडून तोफखान्याचे युद्ध झाले. अखेर मारवाडच्या फौजांनी अंबुजी इंगळेवर घोडदळासह हल्ला केला. त्यावेळी धारराव शिंदे, रायाजी पाटील, खंडेराव हरी इ. च्या मदतीने अंबुजीने हा हल्ला परतवून लावत आपला मोर्चा कायम राखला. दुसऱ्या बाजूला जयपूरकर व हमदानी यांची राणेखान सोबत झटापट चालली होती. याही मोर्च्यावर मुख्यतः तोफांचे युद्ध झाले. राणेखानच्या नेतृत्वाखाली असलेल्या सैन्यातील बव्हंशी अंमलदार शत्रूला फितूर झालेह होते. त्यामुळे त्यांनी युद्धाला सुरवात होताच लांब पल्ल्याच्या तोफा वापरात न आणता हलक्या तोफांचा मारा जयपूरकरांवर चालवला. आपल्या तोफखाना अधिकाऱ्यांची हि चलाखी राणेखानच्या लक्षात येण्यास बराच वेळ लागला. शत्रूसैन्यावर तोफांचा अविरत मारा होऊनही ते आपल्या जागी स्थिर असल्याचे दिसून आल्यावर राणेखानने अधिक चौकशी केली असता, शत्रूसैन्य तोफेच्या टप्प्याबाहेर असल्याचे समजले. तेव्हा त्याने तोफखाना अधिकाऱ्यांना याचे कारण विचारताच त्यांनी लांब पल्ल्याच्या तोफा वापरता न आणल्याचे मान्य केले. माझ्या मते, सैन्यात फितुरी झाल्याचे याच वेळी खरेतर उघड झाले होते आणि या गोष्टीची जाणीव राणेखान तसेच महादजीलाही झाली होती. याचे प्रत्यंतर, या संग्रामात शिंद्यांनी घेतलेल्या सावधपणातून दिसून येते. राणेखानाने आपल्या अधिकाऱ्यांना लांब पल्ल्याच्या तोफांचा मारा करण्याची आज्ञा केली. त्यानुसार दोन मोठ्या तोफा सुरु करण्यात आला. त्यांपैकी एका तोफेने हमदानीचा बळी घेतला. हमदानीच्या मृत्यूने शत्रूची विशेष अशी हानी झाल्याचे दिसून येत नाही. त्याच्या पश्चात त्याचा पुतण्या – इस्माईल बेग याने – हमदानीच्या सैन्याचे नेतृत्व केले. शिंद्यांच्या सैन्यातून लांब पल्ल्याच्या तोफांचा मारा झाल्याने जयपूरकर व इस्माईलणे आपल्या डावपेचात बदल केला. शिंद्यांच्या लहान तोफांचा अविरत मारा होऊन त्या तापून निकामी झाल्यावर ते राणेखानच्या मोर्च्यावर चालून जाणार होते. परंतु, त्यांनी आपला आधीचा बेत साफ बदलून आहे त्याच ठिकाणी पण तोफांच्या टप्प्याबाहेर राहाणे पसंत केले. परिणामी, राणेखानच्या मोर्च्यावर प्रत्यक्ष असे हातघाईचे युद्ध घडून आलेच नाही. रात्र पडेपर्यंत उभय पक्षांनी एकमेकांवर दुरूनच तोफगोळे डागण्यात समाधान मानले व दिवस मावळल्यावर रणभूमीवर निवडक लष्करी पथकांच्या चौक्या नेमून मुख्य सैन्यास विश्रांतीसाठी गोटांत पाठवून दिले.

    दुसऱ्या दिवशी सकाळी महादजीची पथके लढाईच्या तयारीने युद्धभूमीवर गेली खरी पण शत्रू सैन्य यावेळी आपल्या छावणीबाहेर पडले नाही. त्यांनी आपल्या तळाभोवती खंदक खोडून बचावाचा पवित्र स्वीकारल्याने महादजीचा निरुपाय झाला. त्याने आपली सेना मागे बोलावली. सोमवार दि. ३० जुलै रोजी महादजीचा सरदार डीबॉईनच्या आठ पलटणींनी थकीत पगारासाठी गोंधळ केला. महादजीने त्यांची हरतऱ्हेने समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु, ३१ जुलै रोजी ती सर्व पलटणे छावणी सोडून जाऊ लागली. हि बातमी मिळाली त्यावेळी महादजी आपल्या प्रमुख सल्लागारांसह बैठकीत गुंतला होता. पलटणे निघून जात असल्याचे समजल्यावर पुढील अनर्थाचे चित्र सर्वांच्या समोर स्पष्टपणे दिसू लागले. पाठोपाठ जयपूरकरांची फौज लढण्यासाठी बाहेर पडत असल्याच्या बातम्या हेरांकडून येऊ लागल्या. तेव्हा प्रसंग जाणून यावेळी सर्वांनी अक्षरशः जीवावर उदार होऊन लढण्याची तयारी केली. परंतु, महादजीच्या सुदैवाने त्या दिवशी जयपूरकरांना युद्धप्रसंग करण्याची बुद्धी झाली नाही. मात्र, रात्र पडल्यावर शिंद्यांची जी पलटणे जयपूरकरांकडे गेली होती त्यांनी शिंद्यांच्या छावणीच्या रोखाने काही काळ तोफांचा मारा करून आपल्या नव्या धन्यासमोर स्वामीनिष्ठेचे प्रदर्शन केले. यावेळी स्वतः महादजी चिलखत परिधान करून लढून मरण्याच्या इराद्याने रणभूमीकडे निघाला होता पण शिवाजीपंत बापू व राणेखान यांनी त्यास समजावले व त्याच रात्री लालसोटमधून माघार घेण्यासाठी महादजीचे मन वळवले. शिंद्यांच्या फौजांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन माघार घेण्यास आरंभ केला खरा, पण जयपूरकर महादजीला सुखासुखी माघार थोडी घेऊ देणार होते ?

             महादजीसोबत मयत मोगल उमराव अफरासियाबखानाचे कुटुंब, बुणगे होते. त्याशिवाय काही बादशाही पथके व पलटणी, रावराजा माचेडीकराची फौज आणि महादजीचे दक्षिणी – हिंदुस्थानी सैन्य होते. माघार घेताना सडी फौज जयपूरकरांच्या तोंडावर ठेऊन महादजी स्वतः मागे राहिला आणि बुणगे, पलटणी, अफरासियाबखानाचे कुटुंब, तोफखाना व दारुगोळा त्याने जाट राजा रणजीतसिंगांच्या मुलखाकडे लावून दिले. यावेळी फितुरांनी  महादजीच्या सैन्यातील दारूगोळ्याचा साठा उडवून देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा निर्माण झालेल्या गोंधळात शिंद्यांच्या पेंढाऱ्यांनी स्वतःच्याच सैन्यातील बाजार व बुणगे लुटले. गोंधळ कानी पडताच महादजीने जातीने सर्वांची व्यवस्था लावून त्यांना मार्गस्थ केले. त्यानंतर काही वेळाने तळास अग्नी देऊन महादजी निघून गेला व उर्वरित सैन्य घेऊन महादजीची पाठराखण करत राणेखान निघाला. ता. १ ऑगस्ट रोजी पिंपळाईस महादजीचा मुक्काम पडला. त्यावेळी बादशाही पलटणांनी थकीत पगारासाठी अडवून आणले. महादजी त्यांची समजूत काढत होता पण ते काही ऐकायला तयार नव्हते. पाठोपाठ राणेखान पिछाडी सांभाळत आला. त्याने हा प्रकार पाहून महादजीला पुढे पाठवले आणि पलटणांना चार शब्द सुनावून त्यांना काबूत आणले. या पलटणी व उर्वरीत फौज घेऊन राणेखान महादजीच्या पाठोपाठ निघाला. दरम्यान जयपूर व जोधपुरच्या फौजा आणि इस्माईल बेग महादजीच्या पाठीवर वेगाने चालून येत असल्याच्या बातम्या आल्या तेव्हा एकप्रकारे जीव मुठीत घेऊन शिंद्यांच्या फौजा मोठ मोठ्या मजला मारत डिगेस आल्या. त्या ठिकाणी जाट राजा रणजीतसिंगाने महादजीस आश्रय दिल्याने त्याचा निभाव लागला.

          महादजीच्या या पराभवाने व माघारीने काय अनर्थ ओढवला याचे वर्णन दिल्लीतील पेशव्यांचा वकील हिंगणे याने नाना फडणीसला पुढीलप्रमाणे कळवले :- ( स. १७८७, जुलै – सप्टेंबर ) “ लालसोटच्या लढाईत सरकारची फत्ते होऊन नक्ष बराच जाला, परंतु पलटणांनी फितूर केला त्यावरून आपल्या फौजेस धीर न पुरे. त्याजवरून सर्व लष्कर संभाळून पाटीलबावा माघारा आले हे वर्तमान ऐकून चहुंकडे लोकांनी गव्हार गर्दी केली. गुलाम कादिराने तमाम मेरट आदिकरून अंतर्वेदीतील सरकारचा अंमल उठवून आपला बंदोबस्त केला, आणि आपण दिल्ली समीप शहादरियास आला. हे वर्तमान ऐकून शितोळे व निजामुद्दीन दिल्लीहून पातशहांस न पुसता रात्रीचे पळून गेले. त्या समयी त्यांचे वस्तभाव वीस उंटे दिल्लीच्या सोद्यांनी लुटून घेतली. गुलाम कादिराने येऊन पातशहाची भेट घेतली. पातशहाने त्याचा सन्मान केला. तो मीरबक्षीगिरीची वस्त्रे मागतो. पाणिपतपासून आग्र्यापावेतोची दरोबस्त ठाणी उठोन गेली. अवघ्या मुलखांत मराठा दृष्टीस न पडावा ऐशी बदमामली जाली. जैसा मुलुख मेळविला तैसाच गमावला. पाटीलबावा अलवारेस गेले, तेथे रावराजाने एक लाख खर्चास व अलवार किल्ला सरंजाम सुद्धां राहवयास खाली करून दिला. तेथे अंबुजी इंगळ्यांचा बंदोबस्त आहे. ता. ५ सप्टेंबर रोजी गुलाम कादिर दोन हजार रोहिले समागमे घेऊन पातशहाचे दरबारास गेले, खिजमद द्या म्हणून विनंती केली. खानाचे नेत्र आरक्त बेबदल पाहून बादशहांनी दबून मीरबक्षीची वस्त्रे इनायत केली . खानाजवळ तरवारीची नजर करावयास एक मोहोर पाहिली तर कोठे न मिळाली, हे अवस्था मीरबक्षीगिरीची आहे. तमाम मुत्सद्दी व लोक दिक्क व नाखूष जाले. कोणी कोणी बोलले की, मीरबक्षीगिरीस गुलाम कादिर योग्य नाहीत. त्यावर पातशहा बोलले, ‘ दिल्लीहून ब्याद कशी तरी काढून द्यावी इतकाच मला विचार आहे. नाही तर रोहिल्याने शहरावर हात घातला तर येथे संभाळणार कोण आहे ? याजकरितां यास येथून संतोषाने काढून द्यावे. समरूचे बेगमेनेही गुलाम कादिराची ताबेदारी करावी, याप्रमाणे कारभार ठरला. “ ( संदर्भ ग्रंथ :- मराठी रियासत खंड – ७ )    महादजीप्रमाणेच हिंगणे देखील लालसोटच्या लढाईत मराठी सैन्याचा विजय झाल्याचे लिहितो. परंतु, फितुरीमुळे महादजीने माघार घेणे, अंतर्वेदीतील ठाणी उठली जाणे, दिल्लीजवळच्या भागात मराठी माणसाचे अस्तित्वच न दिसणे इ. गोष्टी काय सुचवतात ? या सर्वांचा अर्थ उघड आहे कि, लालसोट येथून महादजीला माघार घेणे - पळून येणे भाग पडले होते.                

          ऐतिहासिकदृष्ट्या लालसोटची लढाई ही काही फारशी प्रसिद्ध नाही. याचे कारण म्हणजे हि लढाई निकाली निघाली नाही, त्याचप्रमाणे पराभवाचा रंग दिसताच महादजीने सावधपणे बचावाचे युद्ध खेळत यशस्वी माघार घेतल्याने मोठा अनर्थ टळला. वस्तुतः, राजपूत – मोगलांनी यावेळी निकराने महादजीवर हल्ला चढवला असता तर उत्तरेतून मराठ्यांची प्रस्थापित असलेली सत्ता मोडकळीस आली असती. प्रसंग इतका बाका होता कि, काही काळ आपण यातून वाचत नाही असे वाटून महादजीने लढता – लढता मारण्याचा निश्चय केला होता. मात्र सोबत्यांनी चार शब्द समजुतीचे सांगितल्याने महादजीने आपला निर्णय रद्द केला. त्याच वेळी दैवानेही त्यास साथ दिली. ता. ३१ जुलै रोजी तळ उठवताना राजपुतांनी शक्य असूनही महादजीवर चढाई न केल्याने त्याचा बचाव झाला. असो, लालसोटच्या प्रकरणातून एक बाब मात्र प्रकर्षाने लक्षात येते व ती म्हणजे, मराठी सरदारांमधील एकीची भावना हळूहळू लयास जाऊ लागली होती. एकाच वेळी दक्षिण – उत्तरेत दोन मोठ्या महिमा चालू असताना या दोन्ही ठिकाणच्या मोहीम चालकांमध्ये अजिबात ताळमेळ नव्हता. टिपूवरील मोहिमेसाठी नानाने हाताशी असलेले बव्हंशी सरदार लोटले होते, त्याउलट उत्तरेत प्रसंगी महादजीच्या कुमकेसाठी जाईल असा एकही फौजबंद सरदार जवळपास हजर नव्हता.

    स. १७८५ मध्ये महादजीजवळ असलेल्या सैन्याची आकडेवारी मराठी रियासत खंड – ७ मध्ये दिलेली आहे ती अशी :- ७३,००० स्वार ;  ६२,००० पायदळ ; ८१,००० गोसावी व बैरागी ; ४,००० प्यादे. फौजेचा हा आकडा अवास्तव वाटत असला तरी कमीत कमी १ लाख सैन्य महादजीकडे असावे असा तर्क बांधता येतो. अर्थात, हि आकडेवारी निव्वळ शिंदेशाही सैन्याची आहे कि, यामध्ये बादशाही सैन्याची गणती करण्यात आली आहे याची स्पष्टता सरदेसाई यांनी केलेली नाही. असो, एवढ्या मोठ्या सैन्याचा खर्च चालवणे शांतता काळात देखील तसे बिकट कार्य आहे, तर त्यावेळच्या धामधूमीत महादजीला आपल्या लष्करास वेळेवर पगार देता आला नाही यात आश्चर्य ते काय ? महादजीच्या पदरी असलेले हे सर्व सैन्य लालसोटच्या मोहिमेत सहभागी झाले नव्हते. शिंद्यांच्या जहागिरीच्या प्रदेशात – म्हणजे पंजाबपासून पार जांबगाव पर्यंत ठिकठीकाणी या सैन्याच्या तुकड्या विखुरलेल्या होत्या. लालसोट मोहिमेत महादजीच्या अधिपत्याखाली एकूण किती सैन्य सहभागी झाले होते याची विश्वसनीय माहिती मिळत नाही. परंतु ते पन्नास हजारपेक्षा कमी नसावे असे अनुमान बांधता येते. कारण महादजीसोबत यावेळी त्याची स्वतःची फौज अपवाद केल्यास बादशाही पथके, माचेडीकराची पथके देखील सहभागी झालेली होती. लालसोटवर शत्रूचा जमावसुद्धा पन्नास हजारांवर होता, हे लक्षात घेता पानिपतच्या खालोखाल म्हणण्यापेक्षा त्याच्या बरोबरीचा हा प्रसंग असल्याचे दिसून येते. 

  लालसोट प्रकरणाने कवायती पलटणांच्या निष्ठेचाही मुद्दा खरे तर याचवेळी ऐरणीवर आला होता. हि पलटणे किती विश्वासाची आहेत हे याच वेळी प्रामुख्याने सिद्ध झाले होते. परंतु यामुळे मराठी सरदारांचे डोळे न उघडल्याने दुसऱ्या व तिसऱ्या इंग्रज – मराठा युद्धांत त्यांना सडकून मार खावा लागला. 

संदर्भ ग्रंथ :- 
१) मराठी रियासत खंड - ७ :- गो. स. सरदेसाई                     

                 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: