शनिवार, ३ ऑगस्ट, २०१३

मोगल बादशहा शहा आलमचे गोहत्या प्रतिबंधक फर्मान

                          
मोगल बादशहा शहा आलम
          

             महादजी शिंदेच्या विनंती वरून मोगल बादशहा शहा आलमने गाय - बैल यांच्या कत्तलीस मनाई करण्यासाठी काढलेले फर्मान.     


मु. दि. भा. २. प्रु. ४३२                                  दि. ४ सप्टेंबर १७८९
                समस्त राज्य प्रबंधक खिलाफतचे ( खिलाफत - ईश्वरी राज्य ) कार्यकर्ते तसेच बादशहांच्या कृपेस पात्र असे अमीर व परगणा निहायचे शासक व प्रांतो प्रांतीचे कारभारी व जबाबदार अधिकारी या सर्वास कळविण्यास येते की, 
               बादशहाच्या कारभारात व मालिकगिरीत ( मालिकगिरी - राज्यात ) स्वामीची आज्ञा म्हणून या मुबारिक ( मुबारिक - विजयी ) फर्मानाचे पालन अवश्य करण्यात यावे आणि सर्वांनी स्पष्ट ध्यानात बाळगावे की, पशुसुद्धा विधात्याच्या सृष्टीतील जीव असून ते निरुपयोगी होत असे समजू नये. यातही विशेषतः बैल व गाय हे प्राणी अगणित लाभ देणारे आहेत. कारण मनुष्य पशु या दोघांचेही जीवन यांच्या पैदासीवर अवलंबून असून, गाय व बैल यांच्या शिवाय शेतीचे काम बिलकुल साध्य होणार नाही. मेहनती शिवाय खेती नाही, आणि मेहनतीस तर बैलाचे साह्य आवश्य पाहिजे. यास्तव जनतेचा संसार व निर्वाह चालण्यास गाईची अवश्य जरूर आहे. आणि गाईवरच मनुष्यांचे व पशूचे जीवन अवलंबून आहे. 
                   यास्तव आमचे प्रिय पुत्र महाराजाधिराज सिंधिया बहादूर यांनी आमचेकडे विनंती केली. त्यावरून आम्ही आपल्या उदार अंतःकरणाने व हर्षपूर्ण दृष्टीने आमच्या समस्त राज्या भूमीमध्ये गोकुशाचा म्हणजे गो - हत्तेचा परिपाठ सर्वथैव मना करीत आहो. या आमच्या फर्मानाचा अंमल इतउत्तर राज्यातील समस्त अधिकाऱ्यांनी सावधगिरीने प्रयत्नपूर्वक करून ही आज्ञा पाळीत जावी की, जेणे करून कोणते नगर, कसबा, गाव यात गोहत्तेचे नावसुद्धा दिसू नये. इतक्या उपर जर कोणी इसम या आज्ञेच्या विरुद्ध वागून गोवधाच्या पापात लिप्त होईल तर तो बादशाहाच्या कोपास पात्र होऊन दंड पावेल. छ १२ जिल्हेज

संदर्भ ग्रंथ :- 
१) मराठ्यांचा इतिहास, साधन परिचय :- संपादक :- प्रा. अ. रा. कुलकर्णी, डॉ. म. रा. कुलकर्णी, डॉ. मा. रा. कंटक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: