बुधवार, ३१ जुलै, २०१३

बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीस ( भाग - ५ )

               

                 सवाई माधवराव मरण पावला त्यावेळी दौलतराव शिंदे यावेळी सुमारे १५ - १६ वर्षांचा असल्याने त्याचा कारभार बाळोबातात्या व जिवबादादा लाड हे दोघे पाहत होते. महादजीचे हे विश्वासू सरदार आणि सल्लागार असून शिंद्यांच्या सरदाराकीचे रक्षण करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट होते. महादजी हयात असताना नानाने कित्येक प्रसंगी शिंद्यांचा घात करण्यासाठी केलेले प्रयत्न हे दोघे विसरले नव्हते. तसेच लाखेरीचा प्रसंग तर अजून ताजाच होता. त्यामुळे नानाच्या प्रत्येक मसलतीकडे ते काहीशा साशंक नजरेनेच बघत. दत्तकाच्या योजनेस त्यांचा आरंभी पाठिंबा होता पण शिंद्यांच्या कारभाऱ्यांची मनःस्थिती बाजीरावास माहित असल्याने त्याने बाळोबातात्या, लखबादादा, जिवबादादा प्रभूती शिंद्यांच्या सरदारांशी गुप्त करार करून असे ठरवले कि, शिंद्यांनी बाजीरावास पेशवेपदी बसवावे. बदल्यात बाजीरावाने शिंद्यांना एक कोट रुपये रोख व २५ लाखांची जहागीर देण्याचे मान्य केले. हा करार होताच शिंद्यांच्या कारभाऱ्यांनी नानाच्या दत्तक योजनेस विरोध करण्यास आरंभ केला. बाजीराव - शिंद्यांच्या गुप्त कराराची नानास अजिबात कल्पना नव्हती. परंतु लवकरच त्यास निजामाकडून या बनावाची बातमी कळली आणि त्यासोबत निजामाने नानास निरोप पाठवला की, प्रसंगी आम्ही तुमची कुमक करू.  बस्स … ! नानाने मग त्यास प्रसंग पडताच पंधरा हजार कवायती पायदळ व पंधरा हजार फौज पाठवण्याची सूचना केली. 
                  सवाई माधवराव पेशव्याच्या मृत्युनंतर पुणे दरबारात इतके गोंधळाचे आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले कि, दिल्लीचा मोगल दरबार आणि पुण्याचा पेशवे दरबार यांत काडी इतकाही फरक नसल्याचे दिसून येते. घटकेत एक कारस्थान रचावे आणि दुसऱ्या घटकेत दुसरे ! एका योजनेस सर्वांनी मान्यता देऊन त्यासाठी शपथक्रिया करायची आणि काही तासांनीच पहिल्या योजनेतील नाराज इसमांनी नवी योजना करून आधीची शपथक्रिया मोडून टाकावी. सारांश, दुसरा बाजीराव सत्तेवर आल्यावर नाना फडणीसचा मृत्यू होईपर्यंत हि कट - कारस्थाने सारखी चालूच राहिली. नाना हयात असेपर्यंत बाजीरावास स्वस्थता लाभली नाही तर बाजीराव गादीवर असेपर्यंत नानास आपल्या जीविताची शाश्वती वाटत नव्हती. असो, नानाच्या राजकीय कारकिर्दीतील आणि आयुष्याच्या अखेरील भागाचा आढवा या लेखात घेऊन हि लेखमालिका पूर्ण करतो.  सवाई माधवरावाचा मृत्यू झाला त्यावेळी रघुनाथराव पेशव्याची ३ मुले हयात होती. पैकी थोरला अमृतराव हा दत्तकपुत्र असून यावेळी तो वयाने प्रौढ होता. परंतु तो दत्तक असल्या कारणाने त्यास पेशवेपदावर स्थापने शक्य नव्हते. दुसरा बाजीराव हा यावेळी १९ - २० वर्षांचा असून तिसरा चिमाजीआपा सुमारे १२ वर्षांचा होता. पेशवेपदासाठी बाजीराव व चिमाजी या दोघांचीच नावे यावेळी पुढे आली. रघुनाथरावाचा वंश पेशवेपदी येणे नानास नको होते. परंतु, दत्तकाच्या योजनेस सरदार व मुत्सद्दी मंडळ राजी नसल्याने नानाचा नाइलाज झाला. मात्र, हार मानेल तो नाना कसला ? त्याने सारासार विचार करून रघुनाथपुत्र चिमाजीस सवाई माधवराव पेशव्याची पत्नी यशोदाबाईस दत्तक देण्याची मसलत मांडली. यामागील कारणे अशी :- (१) बाजीराव २० वर्षांचा असल्याने व कळत्या वयात तो नानाच्या कैदेत पडल्याने त्याच्या मनात नाना विषयी अढी निर्माण झाली होती. (२) बाजीराव दत्तक म्हणून गादीवर बसणार नाही याची नानाला पूर्ण खात्री होती. (३) सज्ञान बाजीरावापेक्षा अज्ञ चिमाजीस यशोदाबाईस दत्तक देऊन त्याच्या वतीने पेशवाईचा कारभार पूर्ववत प्रमाणे आपल्या हाती घेणे नानास शक्य होते. नानाच्या या योजनेस आरंभी सर्व सरदार व मुत्सद्द्यांनी संमती दर्शवली पण बाजीरावास याची कुणकुण लागताच त्याने पुणे दरबारातील आपल्या वडिलांच्या पक्षातील मंडळींना चिथावणी देऊन नानाच्या या योजनेस विरोध करण्यास प्रवृत्त केले. वस्तुतः शास्त्रानुसार देखील नानाची मसलत योग्य नव्हती. कारण, नात्याने चिमाजी हा सवाई माधवरावाचा चुलता असल्याने यशोदाबाईचा सासरा लागत होता व सुनेच्या मांडीवर सासऱ्यास दत्तक देणे कोणत्या धर्मशास्त्रात बसते ? नानाच्या या दत्तक योजनेस एक परशुरामभाऊ अपवाद केल्यास इतरांनी हळूहळू विरोध करण्यास आरंभ केला.
                            यावेळी अमृतराव, बाजीराव व चिमाजी जुन्नरला होते. शिंदे अजून पुण्याहून दूर होते. अशा परिस्थितीत रघुनाथरावाच्या तिन्ही मुलांना किंवा चिमाजीला ताब्यात घेऊन त्यास यशोदाबाईस दत्तक देण्याचे नानाने ठरवले व तातडीने त्याने परशुरामभाऊस जुन्नरला पाठवले. जुन्नरला भाऊ गेला तेव्हा बाजीरावाने त्याची भेट घेतली. भाऊने चिमाजीस आपल्या सोबत पाठवण्याची विनंती केली असता बाजीरावाने ती धुडकावून लावली व पेशवेपदी आपणच बसणार असल्याचे जाहीर केले. बाजीरावाच्या दट्ट्यापुढे भाऊचा नाईलाज झाला. त्यातही त्याने बळाने चिमाजीचा ताबा घेतला असता पण याच वेळी शिंद्यांचा सरदार रामजी पाटील जुन्नरजवळ आल्याने भाऊला सबुरीचे धोरण स्वीकारावे लागले. दरम्यान जिवबादादा बक्षीचा मृत्यू झाल्याने दौलतरावास पुण्याला तातडीने निघून येणे शक्य नसल्याचे लक्षात येताच बाजीरावाने आपला पहिला पवित्रा साफ बदलून भाऊचे पाय धरून आपणांस गादीवर बसवण्याची विनंती केली. तेव्हा भाऊने बाजीरावासह चिमाजीआपास ता. ३ मार्च १७९६ रोजी पुण्याजवळ खडकी येथे आणले. तेथे नाना - बाजीराव यांची भेट होऊन दोघांनी मागील प्रकार विसरून परस्परांशी निष्कृत्रीम वर्तन ठेवण्याचे मान्य केले. दरम्यान बाजीराव नानाच्या मदतीने पेशवा बनणार याचा अर्थ आपणांस रोख रक्कम व जहागीर मिळणार नाही हे बाळोबास समजले. तेव्हा तो शिंद्यांची सेना घेऊन तातडीने पुण्यास येऊ लागला. नानाला पुढील संकटाची चाहूल लागली. बाजीरावाचे मन आपल्याविषयी साफ नसल्याचे त्यास माहिती होतेच. तेव्हा त्याने आपल्या पक्षातील मंडळींना सर्व परिवारासह पुणे सोडण्याची सूचना केली आणि स्वतःच्या कुटुंबाची रायगडी रवानगी करून तो साताऱ्यास निघून गेला. यावेळी नानासोबत फक्त पाच - सात हजारांची फौज होती. साताऱ्यास जाण्याचा निर्णय नानाने मोठा विचारपूर्वक घेतला होता. पेशवेपद मिळवण्यासाठी कितीही उमेदवार उभे राहिले तरी जोपर्यंत छत्रपती आपल्या ताब्यात आहेत तोपर्यंत पेशवेपदाची वस्त्रे कोणालाही मिळणार नाहीत हे नानास पक्के ठाऊक होते. तेव्हा छत्रपतींना हाताशी धरून त्याने बाजीरावाला वेसण घालण्याचा प्रयत्न केला. 
                     इकडे नानाच्या अनुपस्थितीमध्ये बाजीराव पुण्यास गेला. पाठोपाठ शिंदेस्वारी देखील आली आणि दोघांच्या भेटी झाल्यावर शिंद्यांनी मुद्द्याची गोष्ट काढली. प्रथम त्यांनी एक कोट रुपयांची व पंचवीस लक्षांच्या जहागिरीची मागणी केली आणि नानास कारभारातून काढण्याची बाजीरावास ' विनंती ' केली. बाजीरावास शिंद्यांच्या मागण्या अवास्तव वाटल्या. प्रथम त्याने एक गोष्ट स्पष्ट केली कि, करारानुसार शिंद्यांनी वेळेवर आपणांस मदत न केल्याने त्यांना जहागीर व रोख रक्कम देण्याचा प्रश्नच येत नाही. राहता राहिला नानास कारभारातून काढण्याचा प्रश्न तर ते आम्ही घडू देणार नाही. खरे तर, नानास आत्ताच दुखवले तर त्याच्या ताब्यात छत्रपती असल्याने आपणांस पेशवेपद मिळणार नाही हा खोड ओळखून बाजीरावाने यावेळी नानाच पक्ष घेतला होता. परंतु, शिंद्यांना बाजीरावाच्या अडचणीचे काय ? त्यांनी पाहिले की, बाजीराव हा अतिशय बेभरवशी आहे. तेव्हा त्यांनी परशुरामभाऊस विश्वासात घेऊन चिमाजीआपस यशोदाबाईस दत्तक देण्याची योजना आखली आणि बाजीराव - नानाला कैदेत टाकण्याचे ठरवले. त्यानुसार, बाजीरावास शिंद्याने कैद केले पण नानास कैद करण्याच्या बेतास परशुरामभाऊ अनुकूल होईना. त्याने स्पष्टपणे सांगितले की, नानाच्या जीवितास व अब्रूस धक्का लावू नये. पाहिजे तर त्यास तुम्ही कारभारातून काढून टाका. तेव्हा बाळोबातात्याने हि गोष्ट मान्य केली पण, नानाने आपल्या ताब्यातील सर्व मुलुख आणि किल्ल्यांच्या सोडचिठ्ठ्या देऊन राजकारणातून संन्यास घ्यावा अशी अट घातली. नानाच्या रक्षणासाठी भाऊने या अटी मान्य केल्या आणि आपल्या दिवाणास साताऱ्याला नानाच्या भेटीसाठी पाठवले. परशुरामभाऊचे चरित्र अभ्यासले असता असे दिसून येते की, हा एक लढवय्या सरदार असून कारस्थान व मुत्सद्देगिरीत हा फारच कच्चा होता, नव्हे त्यास यामध्ये फारसा रसही नव्हता. त्यामुळे बाळोबाच्या अटी त्यास सरळसोट वाटून त्याने त्या नानांस कळवल्या. बाळोबाच्या अटींचा अर्थ जाणून नानाने सातारा सोडून वाईजवळ मेणवलीस आपला मुक्काम हलवला. तेव्हा भाऊने साताऱ्यास जाउन छत्रपतींकडून चिमाजीआपासाठी पेशवेपदाची वस्त्रे आणली. इकडे मेणवलीस जाउन नानाने बाजीरावास पेशवेपदावर स्थापण्याचा निश्चय केला आणि त्यासाठी त्याने निजाम - भोसल्यांशी गुप्त कारस्थाने रचण्यास आरंभ केला. नानाच्या पाळतीवर शिंद्यांचे हेर होतेच. त्यांनी हि बातमी बाळोबास कळवताच त्याने भाऊला या प्रकारची माहिती देऊन नानास बंदोबस्ताने काशीस रवाना करण्याचे ठरवले. भाऊने आपला दिवाण चिंतोपंत लिमये यांस, नानाकडे रवाना करून सांगितले की,  तूर्त तुम्ही टोक्यास राहा. माझा मुलगा महादजी सहा हजार सैन्यासह तुमच्या रक्षणास राहिला. तुमचे वित्त, प्राण वा अब्रूला धोका होणार नाही यासाठी मी जामीन आहे. भाऊचा हा निरोप मिळाल्यावर नानाने दि. ४ जून १७९६ रोजी मेणवलीहून रायगडी प्रयाण केले. तेथे त्याचा एक दोन दिवस मुक्काम पडून तेथील हवामान न मानवल्याने त्याने महाडला आपला तळ ठोकला. महाडला येणारे सर्व घाटमार्ग त्याने तोडून व वाटा बुजवून बंद केले. कमीत कमी चार महिने तरी पुण्याची फौज आता महाडपर्यंत येण्याचा धोका नव्हता. 
                                महाडच्या मुक्कामात नानाने आपल्या आयुष्यातील अतिशय कल्पनारम्य व अचाट आणि मुख्य म्हणजे यशस्वी असे कारस्थान रचले. यावेळी परिस्थिती सर्वथा त्यास अनुकूल होती पण त्याने फक्त एकच चूक केली व ती म्हणजे त्याने बाजीरावावर विश्वास टाकून त्यास आपल्या कारस्थानात घेतले ! शिंदे व भाऊ चिमाजीला पेशवा बनवणार या बातमीने बाजीराव हवालदिल झाला होता. त्याची अस्वस्थता ओळखून नानाने आपले जाळे विणण्यास आरंभ केला. लवकरच उभयतांमध्ये बाळोजी कुंजर नामक शिलेदाराच्या मार्फत गुप्त करार घडून आला. त्यानुसार नानाने बाजीरावास पेशवेपद मिळवून दिल्यास बाजीरावाने त्याच्या सल्ल्याने कारभार करण्याचे मान्य केले. त्याचप्रमाणे याकामी निजाम, भोसले, इंग्रज इ. ची मदत लागल्यास नानाने ती घ्यावी व त्या बदल्यात नाना त्यांना जे काही कबूल करेल ते सर्व करार अंमलात आणण्याचे बाजीरावाने मान्य केले. बाजीराव आपल्यास अनुकूल झाल्यावा नानाने शिंद्यांना शह देण्यासाठी इंग्रजांना जवळ केले. ज्यांनी रघुनाथरावास दूर लोटले नाही ते इंग्रज नानाची उपेक्षा का करतील ? आपल्या मदतीने नाना परत कारभारावर स्थापन होणार असेल तर इंग्रजांना ते नको होते असे नाही. नानाच्या मदतीसाठी देशभरातील प्रमुख इंग्रजी ठाण्यांमध्ये कवायती पलटणे जमा होऊ लागली. इंग्रज दिल्ली ताब्यात घेणार असल्याच्या बातम्या पसरू लागल्या. उत्तरेतील शिंद्यांच्या सरदारांनी दौलतरावास तातडीने दिल्लीच्या बचावासाठी निघून येण्याची विनंती केली. इंग्रजांचे प्रकरण चालीस लावून नानाने निजाम - भोसल्यांना मधाचे बोट लावले. त्यानुसार निजामाला खर्ड्याच्या तहातील मुलुख व खंडणी माफ करण्यात आली तर त्याच तहात नमूद केल्याप्रमाणे भोसल्यांना देऊ केलेला गढेमंडळ प्रांत देण्याचे नानाने मान्य केले. निजाम, भोसले, इंग्रज या तिघांशी एकाचवेळी लढण्याची कुवत शिंद्याच्या सैन्यात नव्हती. त्यातच त्यांच्या सरदारांत मतभेदही बरेच होते. बाळोबातात्या, लखबादादा इ. चे कारभारातील वाढते प्रस्थ रायाजी व रामजी पाटलासारख्या मुत्सद्द्यांना सहन होत नव्हते. त्यांनी दौलतरावास नानाशी मिळतेजुळते घेण्याचा सल्ला दिला. तेव्हा त्यांच्याच मार्फत दौलतरावाने नानासोबत गुप्त करार करून बाजीरावास पेशवेपदावर स्थापण्याच्या कामी नानास मदत करण्याचे मान्य केले. बदल्यात नानाने त्यास १ कोटी रुपये, दहा लाखांची जहागीर व अहमदनगरचा किल्ला देण्याचे कबूल केले. अशा प्रकारे शिंद्याचा बंदोबस्त केल्यावर नानाने परशुरामभाऊचे प्रकरण हाती घेतले. त्याने पटवर्धन घराण्यातील भाउबंद मंडळीत तेढ उत्पन्न करून भाऊचे सामर्थ्य खच्ची केले. तसेच कोल्हापूरच्या छत्रपतींना पैसा पुरवून त्यांना भाऊच्या सरंजामी मुलखावर स्वाऱ्या करण्यास प्रोत्साहन दिले. त्यावेळी छत्रपतींनी शंका उपस्थित केली की, पुढे - मागे तुम्ही व भाऊ एक झाल्यास भाऊ आमचा सूड घेईल त्याचे काय ? त्यावर नानाने भाऊपासून आम्ही तुमचे रक्षण करू, असे वचन दिले. बाळोबातात्या व भाऊच्या विरोधात अशी कारस्थाने रचतानाच नानाने पुण्यातील आपल्या हस्तकांच्या मार्फत शिंद्याच्या व भाऊच्या सैन्यात फितूर करण्यास आरंभ केला. दोघांच्याही फौजांना अनेक महिने पगार न मिळाल्याने त्या तशा बेदील झालेल्या होत्याच, तेव्हा त्यांना फितवणे नानाच्या सहाय्यकांस फारसे जड गेले नाही. इकडे बाळोबा व भाऊने नानाचा पुण्यातील वाडा आपल्या ताब्यात घेऊन त्यातील सामानाची जप्ती केली. त्याचे सरंजामी मुलुख जप्त करण्यास आरंभ केला. खर्ड्याच्या लढाईनंतर पुणे दरबारच्या स्वाधीन झालेला निजामाचा दिवाण मशीरउल्मुल्क यावेळी पुण्यास नजरकैदेत होता. त्याने तात्या - भाऊसोबत बोलणे लावले की, मला तुम्ही कैदेतून मुक्त कराल तर निजामाशी तुमची गोडी करून देतो. मग आपण सर्व मिळून नानाचा सूड घेऊ.  मशीरच्या बोलण्यात तथ्य असल्याचे जाणून या दोघांनी मशीरला मोकळे केले व त्याने गुलटेकडीस आपला तळ ठोकून लष्कर भरतीस आरंभ केला. वस्तुतः, मशीरला नानाने यापूर्वीच अनुकूल करून घेतले होते. खुद्द त्याचा धनीच नानाला सामील असल्याने मशीरला तरी दुसरा पर्याय काय होता ? नानाच्या सांगण्यानुसारच मशीरने सुटकेची धडपड करून फौज गोळा केली होती. 
               राजकारणाच्या या धांदलीत ता. २ जून १७९६ रोजी चिमाजीआपास पेशवेपदाची वस्त्रे मिळून पेशवा म्हणून तो अधिकारावर दाखल झाला होता. नानाने जर कारस्थान उभारले नसते तर चार दोन महिन्यात तात्या - भाऊचा कारभारात जम बसून चिमाजीची राजवट स्थिर झालीही असती. परंतु, नानाच्या बुद्धीसामर्थ्याने हे घडून आले नाही. दरम्यान दसऱ्याचा सण येउन गेला आणि पाठोपाठ चिमाजीची औटघटकेची पेशवाई संपुष्टात आली. स. १७९६ च्या ऑक्टोबर अखेर दौलतराव शिंद्याने बाळोबातात्या व त्याच्या सहाय्यकांस कैद केले. या बनावाची वार्ता समजताच परशुरामभाऊ चिमाजीला घेऊन जुन्नरला पळाला पण त्याच्या पाठीवर टाकोटाक फौजा धावून आल्याने त्याने नाईलाजाने शरणागती पत्करली. पुण्यातील भाऊच्या मदतनीसांनाही कैद करण्यात आले. अशा प्रकारे नानाचे ' महाड कारस्थान ' फळास येउन बाजीरावाचा पेशवा बनण्याचा मार्ग निष्कंटक झाला. आपल्या बुद्धीबळाने नाना कारस्थान रचण्यात मग्न असताना बाजीरावानेही आपल्या अक्कलहुशारीचा असा काही झटका नानाला दिला कि, त्यामुळे नानाचे महाड कारस्थान एकप्रकारे मोडीतच निघाले. बाजीरावाने दौलतरावासोबत एक गुप्त करार केला. त्यानुसार नाना हयात असेपर्यंत बाजीरावाच्या रक्षणासाठी दौलतरावाने पुण्यातच राहायचे. बदल्यात त्यास दोन कोटी रुपये देण्याचे बाजीरावाने मान्य केले. तसेच पुण्यात जितका काळ दौलतरावाचा मुक्काम होईल तितका काळ फौजेचा खर्च चालवण्याचेही त्याने मान्य केले. दौलतराव - बाजीराव यांच्या गुप्त मैत्रीचा नानाला अखेरपर्यंत पत्ताच लागला नाही. असो, स. १७९६ च्या अखेरीस बाजीराव पेशवा बनला. बाजीरावाने पेशवेपद स्वीकारताच नानाने कारभाराची सूत्रे हाती घेण्याचा प्रयत्न केला, पण सलामीलाच त्याला बाजीराव - शिंद्याने झटका दिला. 
                          महाडच्या कारस्थानात कबूल केल्यानुसार निजामास खर्ड्याच्या तहातील खंडणी व मुलखाची माफी देण्यास बाजीरावाने ठाम नकार दिला. तसेच भोसल्यांना गढेमंडळ प्रांत देण्याचेही त्याने नाकारले. शिंद्याने या प्रकरणी बाजीरावाची बाजू घेतली. तसेच करारानुसार नानाने आपणांस एक कोटी रुपये व नगरचा किल्ला ताबडतोब द्यावा अशी मागणीही केली. त्यामुळे नाना वैतागून गेला. त्याने सर्व कारभार सोडून काशीयात्रेस जाण्याचा निर्णय घेतला आणि पेशव्यासोबत स. १७९७ च्या जानेवारीत करार करून, दत्तक पुत्र घेतल्यास त्याच्याकडून फडणीशीचे काम करून घेण्याचे मान्य करवून घेतले. या करारातील एकूण १३ कलमांपैकी १२ कलमे बाजीरावाने कबूल करून नानाला काशीयात्रेची परवानगी मात्र दिली नाही. दरम्यान, महाडच्या कारस्थानात कबूल केल्याप्रमाणे बाजीराव आपली वचने पाळत नाही हे पाहून निजाम - भोसल्यांनी संयुक्त चढाईचा धाक दाखवला. त्याबरोबर वठणीवर येउन बाजीरावाने नानाच्या मार्फत निजाम - भोसल्यांना कबूल केलेल्या प्रदेशाचे दान देऊन टाकले. याचवेळी शिंद्यांना कबूल केल्याप्रमाणे जहागीर व नगरचा किल्ला देण्यात आला. नानाला वाटले कि, जहागीर व किल्ला मिळताच शिंदे उत्तरेत जाईल पण तो काही पुणे सोडायचे नाव घेइना. उलट फौजेचे देणे थकल्यामुळे नानाने आपणांस कबूल केल्यानुसार एक कोटी रुपये आत्ताच द्यावे असा तगादा त्याने लावला. दरम्यान स. १७९७ च्या ऑगस्टमध्ये तुकोजी होळकराचा मृत्यू झाल्याने होळकरांच्या वारसाचा प्रश्न निर्माण झाला. तुकोजीला दोन औरस व दोन अनौरस असे चार पुत्र असून थोरला काशिराव हा शारीरिक दौर्बल्याने लष्करी चाकरीस सक्षम नसल्याचे जाणून धाकटा मल्हारराव यास सरदारकी देण्याचा सर्वांचा विचार होता. परंतु यात दौलतरावाने हस्तक्षेप करून होळकरांची सरदारकी काशिरावासच मिळावी यासाठी खटपट करून त्यास वस्त्रे देववली. याचा परिणाम म्हणजे काशिराव शिंद्यांच्या आहारी गेला आणि हि गोष्ट इतर होळकर बंधूंना अजिबात आवडली नाही. कित्येक इतिहासकारांनी काशिराव हा वेडसर असल्याचे नमूद केले आहे. अनेकांनी तर होळकरांच्या घराण्यात वेड हे आनुवांशिक असल्याचे सांगत आपले मानसिक संतुलन ढासळल्याचे दाखवून दिले आहे. राज्यकारभारविषयक काशिरावची उपलब्ध पत्रे पाहता तो वेडसर असल्याचे अजिबात दिसून येत नाही. 
                            दौलतराव - बाजीराव हि अनिष्ट युती फोडल्याशिवाय आपणांस स्वस्थता लाभणार नाही हे ओळखून नानाने शिंद्याची खोड मोडण्यासाठी मल्हारराव होळकरास हाताशी धरले. तुकोजीच्या पश्चात मल्हाररावास सरदारकी मिळावी असे होळकरशाहीतील कित्येक जुन्या सरदारांचे मत होते. त्यांनी देखील मल्हाररावास पाठिंबा दर्शविला. तेव्हा मल्हारराव हा पाच सात हजार सैन्यासह पुण्यास तळ ठोकून राहिला. दौलतरावाच्या डोक्यात एव्हाना सत्तेची घमेंड व मस्ती चांगलीच भिनली होती. त्याने ता. १४ सप्टेंबर १७९७ रोजी भर दिवसा कवायती पलटणे व घोडदळाच्या तुकड्या पाठवून मल्हाररावावर छापा घातला. त्यासमयी मल्हारराव मारला गेला. विठोजी व यशवंतराव कसेतरी निसटून गेले. या घटनेमुळे पुण्यातील मुत्सद्दी मंडळ पुरते हादरून गेले. प्रत्यक्ष पेशव्याच्या उपस्थितीत हा प्रकार घडावा याचा त्यांना भारी खेद वाटला. होळकरांना हाताशी धरून शिंद्यांना शह देण्यात नानाला अपयश आले तरी त्याने हार मानली नाही. तत्पूर्वीच त्याने अमृतरावास चिथावणी व द्रव्याची मदत देऊन बाजीरावाकडे प्रमुख कारभारीपद मागण्यास प्रवृत्त केले. पेशव्याचा मुख्य कारभार आपल्या हाती येणार म्हटल्यावर अमृतराव उघडपणे नानाचा पक्ष घेऊन लागला. याखेरीज नानाने दौलतरावाच्या घरात देखील दुफळी माजवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. महादजीच्या स्त्रियांचे व दौलतरावाचे कधीच पटले नाही. नानाने त्यांना दौलतरावाच्या विरुद्ध चिथावणी देऊन दुसरा दत्तक घेण्याची सूचना केली, तेव्हा त्यांनी दौलतरावाविरुद्ध बंड पुकारले. नानाच्या या कारस्थानांनी पेशवे - शिंदे अगदी त्रस्त झाले. त्यांनी विश्वासघाताने नानास पकडून कैद करण्याची योजना आखली. त्यनुसार शिंद्याच्या सैन्यातील मुकीर नामक फ्रेंच सरदार होता, त्यास विश्वासात घेण्यात आले. हिंदुस्थानी लोकांच्या वचनापेक्षा नानाचा युरोपियन लोकांच्या शब्दावर अधिक भरवसा असल्याचे सर्वांना माहिती होते. मुकीरने बायबलवर हात ठेऊन नानांच्या रक्षणाची शपथ घेतली तेव्हा त्याच्या मध्यस्थीने नाना दौलतरावाच्या भेटीस गेला आणि कैदेत सापडला. ( डिसेंबर स. १७९७ ) 
                             शिंद्याने नानास तीन महिने आपल्या छावणीत ठेऊन घेतले. यामागे त्याचा हेतू, नानाचा सर्व द्रव्यसंचय आपल्या ताब्यात घेण्याचा होता. परंतु नानाने त्यास अजिबात भीक घातली नाही. तेव्हा त्याने नानाची रवानगी नगरच्या किल्ल्यावर केली. नाना कैदेत पडताच बाजीराव - दौलतरावात वितुष्ट निर्माण झाले. मुळात बाजीरावास दौलतरावाचा सहवास देखील नकोसा झाला होता पण नानाच्या भीतीमुळे त्याने शिंद्याला आजवर जवळ बाळगले होते. त्याच्यामार्फत नानाचा काटा निघताच त्याने शिंद्याला अडचणीत आणण्यासाठी निजाम व महादजीच्या स्त्रियांशी राजकारणाचे सूत्र लावले. तेव्हा चिडून जाउन दौलतरावाने दहा लक्ष रुपये रोख व पंधरा लाख रुपये देण्याच्या वायद्यावर नानाला नगरच्या कैदेतून मुक्त केले.( स. १७९८, जुलै ) त्याशिवाय बाजीराव - निजाम यांची जमत असलेली युती फोडण्याचे व शिंदे बायांची समजूत काढण्याचेही नानाने मान्य केले व कैदेतून सुटका झाल्यावर शब्द दिल्यानुसार त्याने दोन्ही प्रकरणे निकाली काढली. 
                      कैदेतून सुटका झाल्यावर नाना फडणीस आता खरोखर राजकारणातून संन्यास घेण्याच्या बेतात होता. दरबारातील भानगडीत त्याने आता फारसे लक्ष न घालता आपले उरलेलं आयुष्य सुखाने काढण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यास स्वस्थता कोण लाभू देणार ? ज्या इतिहासप्रसिद्ध महाडच्या कारस्थानाने बाजीराव पेशवा बनला होता, त्या कारस्थानाची सर्वच फळे अजून नानास कुठे भोगावी लागली होती ? महाडच्या कारस्थानात आपल्या वतीने नानाची अधिकारपदावर स्थापना करण्याचा जो डाव हुकला होता, तो पूर्ण करण्याच्या उद्देशाने ब्रिटीशांनी जाळे टाकण्यास आरंभ केला. स. १७९८ - ९९ मध्ये गव्हर्नर जनरल वेलस्लीने टिपूवर मोहीम काढून त्यास ठार केले. करारात ठरल्यानुसार पेशव्यांची फौज वेळेवर मदतीस न आल्याने टिपूच्या राज्यातील काही भाग पुणे दरबारास देण्यास इंग्रज - निजाम नाखूष होते. परंतु, पेशवे दरबारात आपले हात - पाय पसरण्याची हि एक चांगली संधी आहे असे जाणून इंग्रजांनी टिपूच्या राज्यातील काही भूप्रदेश पेशव्यांना देण्याचे ठरवले पण त्या बदल्यात आपली तैनाती फौज पदरी बाळगण्याची अट त्यांनी मांडली. बाजीरावाने यावेळी तरी हि अट अमान्य केली. तेव्हा, इंग्रजांनी पेशव्यांच्या वाटणीचा प्रदेश निजाम व आपल्यात परस्पर वाटून घेतला. इंग्रजांशी पुणे दरबारचे असे संबंध बिघडत चालले होते तो,  तिकडे कोल्हापूरचे प्रकरण उद्भवले. महाडच्या कारस्थानानुसार कोल्हापूरकर छत्रपतींनी पटवर्धनांच्या आणि पेशव्यांच्या प्रदेशात बरीच धामधूम माजवली होती. बाजीरावास छत्रपतींच्या या दंग्याची उपेक्षा करून चालणार नव्हते. त्याने कोल्हापूर स्वारीची जबाबदारी परशुरामभाऊवर टाकली पण दुर्दैवाने त्या मोहिमेत भाऊ जीवानिशी गेला. पूर्वी अमृतरावाच्या मार्फत नाना बाजीरावास धाकात ठेवायचा प्रयत्न करत होता, आता तोच नाना शिंद्यांच्या मदतीने कारभारावर आल्याने अमृतरावाने नानाला कैदेत टाकण्यासाठी कारस्थाने रचण्यास आरंभ केला. सारांश, शिंद्यांच्या कैदेतून सुटका झाल्यावर नानास असे आढळून आले कि, आता कारभारात आपल्याला काहीही स्थान नाही ! 
                  येथून पुढे त्याने प्रसंगावर नजर ठेऊन फडणीशीचे आणि राज्यकारभाराचे काम केले, परंतु त्याने आपल्या वतीने नारोपंत चक्रदेव यास पेशव्याजवळ नेमले. त्याने राज्यकारभार विषयी पेशव्यास नानाचा सल्ला कळवण्याच्या मध्यस्थाची भूमिका स्वीकारली. मिळून बाजीरावाशी प्रत्यक्ष संबंध येऊ न देता नानाने राज्यकारभारात अशा प्रकारे अप्रत्यक्षरीत्या सहभाग घेतला. नानाने राजकारणातून कितीही विरक्ती घेण्याचे योजले असले तरी परिस्थिती त्यास अशी सहजासहजी निवृत्ती घेऊ देण्यास राजी नव्हती. तत्कालीन हिंदुस्थानच्या राजकारणाची राजधानी म्हणून पुण्याचा नावलौकिक होता. त्या पुणे दरबारात बाजीराव आणि दौलतराव या जोडगोळीच्या व मुत्सद्यांच्या धरसोडीच्या राजकारणाने परस्पर अविश्वासाचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. टिपूचा पाडाव झाल्याने आज ना उद्या इंग्रज आपल्यावर चालून येणार हे सर्वांनी ओळखले होते. इतकेच काय पण, नादान म्हणून प्रसिद्ध असलेल्या बाजीरावास देखील हा धोका कळत होता. परंतु, भावी संकटाचे निवारण करण्यासाठी धडपड करण्याच्या मनःस्थितीत आता कोणी नव्हते. अशा वेळी नानाने परत एकदा आपले बुद्धिबल वापरून संकटातून मार्ग काढण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला. वस्तुतः, कैदेतून मुक्तता झाल्यापासून नानाची शारीरिक शक्ती तशी क्षीण होत चालली होती. तरीही त्याने अखेरचा डाव टाकला. या सुमारास होळकर घराण्याचा एक वंशज उत्तरेत शिंद्यांच्या उरावर पाय देऊन ठासून बसला होता. पुण्याच्या मल्हार गर्दीतून मोठ्या संकटाने बचावलेल्या यशवंतरावाने स्वपराक्रमाच्या बळावर उत्तरेतील होळकरांच्या कोसळत्या सत्तेचा डोलारा समर्थपणे सावरून तर धरला होताच, पण शिंद्यांच्या सैन्याचा ठिकठीकाणी पराभव करून त्यांच्या सत्तेला जबरदस्त हादरा दिला होता. नानाने यशवंतरावासोबत संधान जोडून त्यास पुण्याला येण्याची सूचना केली. होळकराच्या मदतीने शिंदे व बाजीरावाचा बंदोबस्त करून पेशवाई सावरण्याचा नानाने डाव आखला. परंतु, आता वेळ निघून गेली होती. कारण, सैन्याची जमवाजमव करून बुंदेलखंडाच्या सरहद्दीपर्यंत येण्यास यशवंतरावास स. १८०० चा मार्च महिना उगवावा लागला. तत्पूर्वीच दि. १३ मार्च १८०० रोजी नानाने आपला अखेरचा श्वास घेतला होता ! होळकरास मिळवून घेऊन बाजीराव - दौलतराव या जोडगोळीचा बंदोबस्त करण्याच्या नानाच्या या कारस्थानाची पूर्तता पुढे अमृतराव पेशव्याने केली !
                             ता. १२ फेब्रुवारी १७४२ रोजी बाळाजी उर्फ नानाचा जन्म झाला होता. मृत्यूसमयी त्याचे वय सुमारे ५८ वर्षांचे होते. या ५८ वर्षांच्या त्याच्या हयातीमधील आरंभीची १५ - १६ वर्षे वजा केल्यास जवळपास ४२ वर्षांची त्याची प्रदीर्घ अशी राजकीय कारकीर्द होती. या ४२ वर्षांमध्येही स. १७७९ ते स. १७९५ अशी सुमारे पंधरा वर्षे पेशव्यांची मुख्य सत्ता त्याने अप्रत्यक्षपणे उपभोगली. प्रत्यक्ष कारभारातून बाजूला असतानाही केवळ तोंडी निरोपांवर त्याने मोरोबाचे व महाडचे कारस्थान यशस्वीपणे पार पाडून दाखवले हे लक्षात घेता त्याच्या कर्तबगारीचे आणि अक्कल हुशारीचे मोठे कौतुक वाटते. 
                      आजवर अनेक इतिहासकरांनी नानाचे जितके गुणवर्णन केले आहे तितक्याच त्यास शिव्याही घातल्या आहेत. अर्थात, पूर्वग्रहदुषित वृत्तीने त्यांनी नानाचे चरित्र अभ्यासल्याने असे घडले असावे. वस्तुतः, तत्कालीन काळातील प्रचलित प्रघात - रिवाजांच्या विरोधात नाना वागल्याचे दिसून येत नाही. रघुनाथरावास हटवण्याचे जेव्हा बारभाईंनी कारस्थान रचले, तेव्हाच पेशव्यांची सत्ता कोणा तरी मुत्सद्द्याच्या वा सरदाराच्या हाती जाणार हे स्पष्ट झाले होते. हि राज्यक्रांतीची वेळ होती. यात भरभक्कम लष्करी सामर्थ्य हाताशी असणारी व्यक्तीच यशस्वी होणार असे दिसत असताना हा डाव नानासारख्या लष्करीदृष्ट्या दुबळ्या मुत्सद्द्याने हातोहात जिंकला हि नानाच्या बुद्धीसामर्थ्याची चुणूक दाखवणारी घटना आहे. सत्तेच्या राजकारणात नाना - महादजीचा अनेकदा सामना घडून आला. त्यात त्यांनी परस्परांना अडचणीत आणणारी कारस्थानेही रचली. त्यावरून नारायणरावाच्या खुनानंतर मराठी राज्य झपाट्याने विनाशाच्या मार्गाने जात असल्याचे दिसून येते. कारण, या नाना - महादजी वादाचे अनेक कंगोरे असून त्यात होळकरांचेही उपकथानक आहे. यातचं शिंदे - होळकरांच्या रक्तरंजित लढ्याची बीजे दडल्याचे दिसून येते.
                   राज्याचे हित साधताना आपलाही स्वार्थ साधण्याचा तेव्हाचा प्रघात होता. तो लक्षात घेता नानाने महाडला बसून जे कारस्थान रचले त्याचे आपण संक्षिप्त मूल्यमापन करु :- महाडच्या कारस्थानाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे नानाला मुख्य कारभार स्वतःच्या हाती हवा होता. पेशवेपदी चिमाजी असो वा रावबाजी, राज्यकारभार आपल्या तंत्राने चालला म्हणजे बस्स, अशी त्याची भावना होती. त्यावेळी भाऊ व तात्याने चिमाजीचा पक्ष घेतल्याने नानाने नाईलाजाने बाजीरावास उचलून धरले व स्वतःचा नाश ओढवून घेतला. बाजीराव आणि आपले पटणे शक्य नाही हे त्यास माहिती होते. पण, पेशवे घराण्यात यावेळी बाजी - चिमाजी हे दोनचं औरस वंशज हयात असल्याने नानाचा निरुपाय झाला होता. असे असले तरी, महाडचे कारस्थान रचून बाजीरावास पेशवा बनवण्यापेक्षा नानाने सातारच्या छत्रपतींनाच जर सर्व मदत पुरवून त्यांनाच राज्यकारभार हाती घेण्याची विनंती केली असती तर ? महादजीने मोठ्या मिजाशीने पेशव्यास वकील - इ - मुतलकीची वस्त्रे व पदे आणून दिली, पण या कार्यक्रमाच्या वेळी पेशव्यास नजर करण्यास मराठे मंडळी आली नव्हती. कारण, कित्येकांना मुळात हा उपक्रम पसंतच नव्हता. छत्रपतींनीही खरेतर नाईलाजाने या वस्त्रांच्या स्वीकृतीची परवानगी दिलेली होती. या गोष्टी नानास माहिती नव्हत्या अशातला भाग नाही. या सर्व घटनांचा फायदा उठवून जर त्याने बाजीरावा ऐवजी छत्रपतींचा पुरस्कार केला असता तर राज्याचा विनाश इतक्या लवकर ओढवला नसता. परंतु, छत्रपतींवर आपला शह राखता येणार नाही या कारणामुळे नानाने रावबाजीस जवळ केले. पुढे महाडचे कारस्थान यशस्वी होऊन देखील नानास कैदेचे सोहळे भोगावेचं लागले. त्यानंतर त्याने राजकारणा फारसा सहभाग असा घेतलाच नाही. बाजीरावाने मराठी राज्य घालवले असे सर्वच म्हणतात परंतु त्या बाजीरावाची नालायकी माहिती असून देखील महाडच्या कारस्थानानुसार त्यास परत राज्यावर आणण्याची जी नानाने घोडचूक केली, त्यावरून मराठी राज्याच्या विनाशाच्या कृत्यात त्याचाही अंशतः का होईना पण वाटा होता असे नमूद करावे लागते. अर्थात, आपल्या अखेरच्या दिवसांत नानास आपली चूक उमगून यशवंतरावास हाताशी धरून त्याने बाजीरावाची उचलबांगडी करण्याच्या दृष्टीने काही हालचाली केल्या हे खरे, पण हे शहाणपण त्यास -- बाजीराव व दौलतरावापुढे आपले काही चालत नाही हे दिसून आल्यावर सुचले हे देखील विसरता येत नाही. तात्पर्य, तत्कालीन प्रघात व परंपरा लक्षात घेता नाना हा त्याच्या समकालीन इतिहासप्रसिद्ध मुत्सद्द्यांपेक्षा काही फारसा वेगळा वा सरस होता असे म्हणता येत नाही.
                                                                                   ( समाप्त )
संदर्भ ग्रंथ :- 
१) मराठी रियासत ( खंड ४ ते ८ ) :- गो. स. सरदेसाई 
२) नाना फडणवीस यांचे चरित्र :- वा. वा. खरे
                     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: