गुरुवार, ४ जुलै, २०१३

श्रीमंत रघुनाथराव पेशवे ( भाग - ३ )

                                         
                                                                   नारायणराव पेशवा 
      
       नारायण - दादा यांच्या संघर्षास आरंभ   :-  नारायणराव पेशव्याची कारकीर्द तशी उणीपुरी ८ महिन्यांची. या ८ महिन्यांत एक रघुनाथरावाच्या मुलीच्या लग्नाचा प्रसंग अपवाद केल्यास दादा व नारायणाचे फारसे कधी पटलेचं नाही. दादाच्या मुलीच्या लग्नाची पुण्यात आमंत्रणे देण्याचे कार्य स्वतः नारायणाने मोठ्या हौसेने केले. फेब्रुवारीमध्ये हा समारंभ पार पडला. पुढे मार्च महिन्यात नारायण व बापू गोपिकाबाईच्या भेटीसाठी गंगापूर येथे गेले. त्यावेळी दादाने हैदरचा वकील आपजीराम, याच्या सहाय्याने कैदेतून निसटून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु तो उघडकीस आल्याने नारायणाची मर्जी क्रुद्ध झाली. दादाच्या फितुरीचे वर्तमान समजताच तो त्वरेने पुण्यास परतला. हैदरच्या वकिलाला शिवीगाळ करून कैदेत टाकून त्याने दादाची कैद आणखी कडक केली. तेव्हा फिरून एकदा दादाने सुटकेचा यत्न केला. नागपुरास यावेळी भोसले घराण्यात वारसा कलह सुरु झाला होता. त्यातील दोन पक्षांपैकी एका पक्षाला म्हणजे मुधोजी भोसल्याला दादाचा पाठिंबा होता,  तर दुसऱ्या पक्षाच्या प्रमुखाला म्हणजे साबाजी भोसल्याला नारायणरावाचे समर्थन होते ! मुधोजीने नागपूरची गादी आपणांस मिळावी यासाठी पुणे दरबारांत खटपट करण्यासाठी आपले दोन वकील पाठवले. परंतु, त्याचा काही उपयोग न होता पेशव्याचा कल साबाजीकडे झुकत असल्याचे पाहून मुधोजीने आपल्या वकिलांना कळवले की, कोणत्याही परिस्थितीत दादासाहेबांशी संधान बांधून निकाल आपल्या बाजूने लागेल असे प्रयत्न करा. त्यानुसार मुधोजीचा वकील लक्ष्मण काशी याने दादाला शनिवारवाड्यातून बाहेर काढण्याची योजना आखली खरी, परंतु पहारेकऱ्यांच्या दक्षतेमुळे कारस्थान उघडकीस येऊन दादाची फिरून कैदेत रवानगी करण्यात आली. दादाच्या या वारंवार घडून येणाऱ्या पलायन नाट्याने नारायणाचा तोल जाऊन त्याने दादाची कैद जरुरीपेक्षा जास्त कडक करून त्यास व त्याच्याप्रती सहनुभूती असणाऱ्या लोकांना दुखवले. दररोज सूर्याकडे नजर लावून अनुष्ठान करण्याचा दादाचा प्रघात होता पण दादाला उघड्यावर येण्याची बंदी करून नारायणाने दादाचे हे अनुष्ठानव्रत खंडित केले. याविषयी दादाने त्याच्याकडे तक्रार करताच, अशी अनुष्ठाने करूनचं तुम्ही माधवरावास मारले असा सरळसरळ आरोप नारायणाने केला. पुतण्याचे शब्द वर्मी लागल्याने दादाने अन्नत्याग केला. नवऱ्याने जेवण सोडल्याने आनंदीबाईस देखील उपवास घडू लागले. चुलते - पुतण्यामधील वाढलेला तणाव लक्षात घेऊन दरबारी मुत्सद्द्यांनी तडजोड घडवून आणण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु नारायणरावाच्या तापट व उद्दाम स्वभावामुळे प्रकरण अधिकचं चिघळत गेलं. याचा परिणाम म्हणजे कोणत्याही परिस्थितीत दादाला कैदेतून सोडवलेचं पाहिजे असा त्याच्या पक्षपात्यांनी निश्चयचं केला. 
                नारायणाच्या स्वभाववैगुण्यामुळे केवळ रघुनाथ व त्याचे पक्षपाती मंडळचं तेवढे दुखावले गेले असे नाही तर नाना फडणीस सारखे त्याचे खरे हितचिंतक देखील त्याच्यापासून दुरावले गेले ! त्यात आणखी भर पडली प्रभूंच्या ग्रामाण्याची !! नारायणाने ब्राम्हण - प्रभू वादात उघडपणे ब्राम्हणांची बाजू घेऊन प्रभूंना शुद्र म्हणून घोषित करून त्यांच्यावर जाचक निर्बंध लादले. यावेळी प्रभूंचे प्रमुख म्हणून जे कोणी प्रतिष्ठित प्रभू जातीचे इसम पुण्यात होते, त्यांच्याकडून जबरदस्तीने आपण शुद्र असल्याच्या कबुलीनाम्यावर सह्या घेण्यात आल्या. यामध्ये बव्हंशी दादाच्या पाठीराख्यांचा भरणा होता हे विशेष ! 
  नारायणरावास कैद करण्याचे कारस्थान :- नारायणरावाचा शत्रुपक्ष बराच मोठा असून तुलनेने त्याचे पक्षपाती अगदीचं नगण्य असल्याने त्याच्या विरोधकांना आपली कारस्थाने रचून ती शेवटास नेण्यास बरीच सवड प्राप्त झाली. नारायणाचा राज्यकारभारात अजून जम बसला नाही तोच त्यास कैद करून कारभार हाती घ्यावा असे दादाने ठरवले. याकामी सखारामबापू प्रभूती मुत्सद्दी त्यास अनुकूल असून तुळाजी पवार सारखे प्रसंगी वाटेल ते करण्यास न कचरणारे हस्तक देखील होते. दादावर गारद्यांचा पहारा असून त्यांचा प्रमुख सरदार सुमेरसिंग यास फितवण्याचा तुळाजी पवाराने प्रयत्न केला आणि त्यात यश देखील मिळाले. इकडे बापू व मोरोबा फडणीस यांनी बाहेरून सूत्रे खेळवून हैदर, नागपूरकर भोसल्यांशी संधान पक्के केले. या कटाचा प्राथमिक व मुलभूत उद्देश दादाला कैदेतून बाहेर काढून नारायणास कैद करण्याचा होता. यामागे दादाला पेशवेपद मिळवून देणे हाच प्रधान हेतू होता. नारायणास ठार करण्याचा विचार देखील बापू, मोरोबा प्रभूती मंडळींच्या मनात नव्हता.  परंतु या कटात अनेकांची भाऊगर्दी झाल्याने आणि प्रत्येकाचे मतलब वेगवेगळे असल्याने या कारस्थानाच्या मूळ हेतूस धक्का लागून पुढे भलतेचं घडून आले. त्यात मुख्य मालक -- कारस्थानाचा उत्पादक जर स्थिर आणि खंबीर मनाचा व बुद्धीचा असता तर नारायणरावच्या खुनाचा प्रकार घडलाचं नसता. परंतु, दादा याबाबतीत बराच कमजोर निघाला.
              पेशव्याला कैद करण्याचे कारस्थान शेवटास नेण्याची मुख्य जबाबदारी गारद्यांनी उचलली. त्याबदल्यात त्यांना ३ लाख रुपये देण्याचे बापू व मोरोबा यांनी मान्य केले. ठरवलेल्या कराराच्या यादीवर दादाची सही घेण्यास गारदी गेले असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मसलत पार पाडताना पेशव्याच्या जीवास धक्का लागला तर आम्हांस दोष देऊ नये. अर्थात गारद्यांचे मत रास्त होते. नारायणराव सहजासहजी हाती लागण्याची शक्यता तशी कमीचं असल्याने त्याचा घात झाल्यास गारद्यांना दोषी धरू नये आणि त्याच कारणावरून दादाने त्यांचा बचाव करण्यास वा ठरलेल्या कामाचे पैसे देण्यास टाळाटाळ करू नये यासाठी त्यांना आपली बाजू स्पष्टपणे मांडून त्यावर रघुनाथरावाचे मत जाणून घेणे गरजेचे होते. दादाने या बाबतीत त्यांना आपल्या तर्फेने अभयवचन देऊन टाकले. या प्रसंगी झालेल्या कराराच्या चिठ्ठीत ' नारायणरावास धरावे ' असा मजकूर असून ' धरावे ' चे ' मारावे ' असे करण्यात आल्याचे उलेख अनेक तत्कालीन कागदपत्रांत आल्याचे सांगितले जाते. मात्र हा फेरबदल कोणी केला याची स्पष्टता होत नाही. आनंदीबाईचे नाव याप्रकरणी अग्रभागी असले तरी यात ती सहभाग घेईल हे संभवत नाही. गारद्यांनी असा फेरबदल केल्याची अजिबात शक्यता नाही. राहता राहिला रघुनाथराव ! तर पुढील घटनाक्रम पाहता हे कार्य त्यानेच पार पाडले असे माझे स्पष्ट मत आहे. असो, कटाची सिद्धता झाली खरी पण कटात सहभागी मंडळींची भाऊगर्दी झाल्याने कटाची वाच्यता पुण्यात होऊ लागली. 
        नारायणराव पेशव्याचा खून :-  ता. ३० ऑगस्ट रोजी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी रघुजी आंग्रेची भेट घेण्यास नारायणराव पर्वतीला गेला होता. रघुजीला पेशवेविरोधी कारस्थानाची कुणकुण लागल्याने त्याने पेशव्याच्या भेटीत सावधगिरीचा इशारा दिला. रघुजीची भेट झाल्यावर नारायणरावाने हि गोष्ट हरिपंत फडकेच्या कानी घातली. मात्र असे कित्येक कट आजवर उघडकीस आल्याने त्याला या कारस्थानाचे महत्त्व वाटले नाही. नारायण देखील बराचसा गाफील राहिला. आपल्या विरोधात कट - कारस्थान रचण्यात आले आहे हे माहिती असताना देखील त्याने शनिवारवाड्यात परत आल्या आल्या कटवाल्यांचा तपास करून कारस्थानाची पाळेमुळे खणून काढण्याऐवजी सरळ विश्रांतीसाठी शयनगृहात जाण्याचा निर्णय घेतला. हरीपंतास त्या दिवशी एके ठिकाणी जेवणाचे निमंत्रण असल्याने भोजनोत्तर कटाचा बीमोड करता येईल अशा विचाराने तो गाफील राहिला. 
                  दरम्यान कट फुटल्याची वार्ता कटवाल्यांना लागून त्यांनी त्वरा केली. हरिपंत जर परत आला तर सर्वांच्याच जिवावर बेतेल हे जाणून गारद्यांनी दंगा केला. वाड्यात घुसून त्यांनी सरळ तोडातोडी आरंभली. वाड्यात चाललेल्या आरडाओरड्यांनी नारायणास जाग आली. प्रसंगाचे गांभीर्य जाणून तो प्राण रक्षणास्तव पार्वतीबाईच्या दालानाकडे धावला. परंतु गारद्यांपासून त्याचा बचाव करण्यास ती असमर्थ असल्याने तिने दादाकडे जाण्याच्या त्यास सल्ला दिला. घाबरलेला नारायण तसाच चुलत्याकडे पळत गेला. त्याच्या कमरेला मिठी मारून आपणांस जीवनदान देण्यासाठी त्याची आर्जवे करू लागला. तितक्यात गारदी येउन पोहोचले. यावेळी दादाच्या मनात बरीच चलबिचल माजली. हा एक असा क्षण होता कि त्यावेळी त्याच्यातील सत्तेसाठी हपापलेला राजकारणी  व एक कुटुंबवत्सल पुरुष यांच्यात झगडा पडून त्यात राजकारणी पुरुषाची हार झाली. दादाने गारद्यांना आपला हात आवरता घेण्याची आज्ञा केली पण गारदी सरदारांना दादाची स्वभाव परिचयाचा असल्याने त्यांनी त्याची आज्ञा धुडकावून लावत नारायणावर घाव घातले. त्याप्रसंगी नारायण दादाला बिलगलेला असल्याने दादाच्या हातावर आणि डोक्यावर हलक्या अशा जखमा झाल्या. नारायणास पुरता शांत केल्यावर गारदी शांत झाले. वाड्यातील या खूनसत्रात सुमारे ११ गडी व २ स्त्रिया मारल्या गेल्या तर एका गाईला देखील आपले प्राण गमवावे लागले. 
                         शनिवारवाड्यात गारद्यांनी धुमाकूळ घातल्याची वार्ता एव्हाना सर्वत्र पसरली होती. परंतु आत नेमके काय चालले आहे याचा कसलाच अंदाज न आल्याने हरिपंत वगैरे सरदार वाड्याभोवती फौजा व तोफा पेरून स्वस्थ बसले. इकडे गारद्यांनी वाड्यात दादाच्या नावाचा जयजयकार करत शक्य तितकी लुट केली. वाड्याच्या बाहेर नारायण - दादाच्या पक्षपात्यांची झुंबड उडाली. आत काय घडले असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. दादाने बाहेर चिठ्ठी पाठवून बजाबा पुरंदरे, भवानराव प्रतिनिधी, बापू, मालोजी घोरोपडे यांना आत घेतले. आतील वर्तमान नजरेस आणि कानावर पडताच या मंडळींनी दादाचा निषेध केला. त्यानंतर नारायणाच्या देहाचे दहन करण्याचा निर्णय घेण्यात येउन त्याच रात्री दहनविधी गुपचूप उरकण्यात आला. यावेळी नारायाणाची बायको गंगाबाईने सती जाण्याचा अट्टाहास केला परंतु ती गरोदर असल्याने दादा - आनंदीने तिला सती जाऊ दिले नाही. अर्थात यामागील भावनिक कारणांपेक्षा राजकीय कारणे अतिशय प्रभावी होती. सतीचा समारंभ गुपचूप पार पाडता आला नसता. त्यामुळे घडल्या प्रकाराची सर्वत्र वाच्यता होऊन हाती आलेलं यश दुरावण्याचा धोका होता. असो, नारायणाचा दहनविधी वगैरे उरकून झाल्यावर दादाने कारभार हाती घेतला. यावेळी इंग्रज वकील मॉस्टिन हा पुण्यातचं होता. त्याने ता. ५ सप्टेंबर १७७३ रोजी दादाची भेट घेतली. मनातील भाव हा कि, प्रस्तुत राज्यक्रांतीच्या प्रसंगी दादास आपल्या मदतीची गरज असणार तेव्हा त्याला मदत करण्याच्या नावाखाली कंपनीचे हित साधून घ्यावे. पण बोलाचालीत दादा त्याचा बाप निघाला. आपल्या मनाचा अजिबात थांगपत्ता लागू न देत त्याने मॉस्टिनची बोळवण केली. यामुळे इंग्रजाना चरफडत का होईना पण स्वस्थ बसावे लागले.   ता. १८ सप्टेंबर रोजी सुमेरसिंग व महंमद इसफ या गारदी सरदारांच्या घरी जाउन दादाने त्यांचा गौरव केला. बापूला कारभारात घेण्याची त्याची इच्छा होती पण दादाने नारायणास मारून भलतेच कृत्य केल्याने बापू त्याच्यापासून दुरावला. कारण, कितीही झाले तरी तो नारायणाचा मुख्य कारभारी व एक्पाकारे त्याचा संरक्षक होता. एकप्रकारे नारायणाच्या खुनाला आपणचं अप्रत्यक्षरित्या जबाबदार झालो, याची टोचणी त्याच्या मनाला लागून राहिली. त्यामुळे दादाचा कारभार करण्याचे त्याने साफ नाकारले. 
       रघुनाथरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली :- नारायणरावचा खून झाल्याची वार्ता सर्वत्र पसरून पुणे दरबारच्या शत्रूंनी उचल खाल्ली. भोसल्यांच्या वारसा युद्धांत निजामाने साबाजीची बाजू उचलून मुधोजीवर -- म्हणजे अप्रत्यक्षपणे दादावरच शस्त्र उपसले. परिणामी निजामाचा  करण्यासाठी दादाला मोहीम काढणे भाग पडले. ता. ८ ऑक्टोबर १७७३ रोजी तो मुहूर्तावर बाहेर पडला. याच सुमारास पेशवेपदाची वस्त्रे मिळवण्याचा देखील त्याचा प्रयत्न चालू होता. आरंभी पेशवेपद स्वतः न घेत अमृतरावास पेशवा बनवण्याचा त्याचा विचार होता आणि त्यानुसार त्याने अमृतरावास पेशवाईची वस्त्रे स्वीकारण्यासाठी साताऱ्यास पाठवूनही दिले. पण, लवकरचं दादाच्या मनाने पलटी खाल्ली आणि त्याने अमृतरावास निरोप पाठवला कि, ' पेशवाईची वस्त्रे तू स्वीकारू नकोस, माझ्या नावाने घेऊन ये. शत्रूंचा बंदोबस्त केल्यावर मी स्वतः छत्रपतींच्या दर्शनाला येईन.' त्यानुसार दादाच्या नावे पेशवाईची वस्त्रे घेऊन अमृतराव भीमा नदीच्या काठी दादाच्या गोटात दाखल झाला व आळेगाव मुक्कामी, ऑक्टोबर महिन्यात सुमुहुर्ताने दादा अखेर पेशवा बनला ! 
दादाची निजाम स्वारी ; बारभाई कारस्थानाची उभारणी :- पेशवेवाईची वस्त्रे स्वीकारण्याचा समारंभ उरकून निजामाला कोंडीत पकडण्यासाठी लढाईचे डावपेच आखण्यात दादासाहेबांची स्वारी मश्गुल असताना, सखारामबापूने निराळेचं कारस्थान रचण्यास आरंभ केला होता. नारायणरावाच्या कैदेतून दादाला सोडवून त्यास पेशवा बनवण्याच्या कारस्थानात जरी बापूचा हात असला तरी नारायणास ठार करण्याच्या कटाशी त्याचा अजिबात संबंध नव्हता. दादाने नारायणास कैदेत ठेऊन कारभार हाती घ्यावा अशा मताचा बापू होता. परंतु दादाने भलतेच कृत्य केल्याने बापू उद्विग्न झाला. काय करावे आणि काय करू नये हेच त्याला सुचत नव्हते. कारण, त्यावेळी रघुनाथराव व त्याचा दत्तक पुत्र अमृतराव वगळल्यास भट घराण्याचा वंशज तिसरा कोणी नव्हता. नाही म्हणायला बाजीरावाचा नातू अलीबाहाद्दार यावेळी पुण्यात असला तरी मस्तानीच्या वंशजांकडे ब्राम्हणी दौलत सोपवण्याची मानसिक तयारी तत्कालीन ब्राम्हण मुत्सद्द्यांची बिलकुल नव्हती. तेव्हा काही कारस्थान रचून दादास पदच्युत केले तरी त्याच्या जागी कोणाला पेशवा बनवायचे हा एक यक्षप्रश्न होता आणि आपण ज्या व्यक्तीला पेशवा म्हणून उभे करू त्यास दरबारी मंडळी मान्यता देतील कि दादाच्या बाजूने उभे राहतील हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न होता. परंतु, अशा अडचणींना भिक घालतील ते मुत्सद्दी कसले ? सखारामपंत हा खरा राजकारणी पुरुष होता. कल्पक बुद्धी, थोडीफार समशेर बहादुरी इ. मुळे सावकार आणि परराष्ट्र दरबारात त्याची चांगली पत होती. त्यामुळे कट - कारस्थाने रचणे हा तसा त्याच्या हातचा मळ होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये. बापूला वस्तुस्थितीची पूर्णतः जाणीव होती. राजसत्तेच्या प्राप्तीसाठी राजघराण्यातील व्यक्तींनी केलेले खून क्षम्य असतात. सर्वसामान्य लोकांना याबाबतीत जी शिक्षा दिली जाते वा जो नियम लावला जातो तो राजघराण्यातील पुरुषांना लावता येत नाही. त्यामुळे दादाला जरी आपण नारायणाच्या खुनातील आरोपी म्हणून पेशवेपदावरून पदच्युत केले तरी त्यास देहदंडाची शिक्षा देऊ शकत नाही हे बापू ओळखून होता. त्याचप्रमाणे त्यास कैद करून ठेवण्यात देखील काही फायदा नाही हे देखील त्यास माहिती होती. कारण कितीही झाले तरी तो भट घराण्याचा औरस वंशज असल्याने पेशवेपदाचा तो एक प्रमुख दावेदार राहणार आणि त्याच्याही पाठीशी आपलेच काही सरदार उभे राहणार. तेव्हा दादाला फारसे न छेडता त्यास पदच्युत करून पेशवेपदावर दुसऱ्या कोणाची तरी स्थपना करण्याचा त्याने बेत आखला.  परंतु, हे कारस्थान सिद्धीस नेण्यासाठी त्याला पुणे दरबारातील मुत्सद्यांचा व प्रमुख सरदारांचा पाठिंबा हवा होता. हा पाठिंबा मिळवण्याचा उद्योग त्याने यावेळी सुरु केला. 
                  बापूच्या कारस्थानाला अपेक्षेपेक्षा जास्त पाठिंबा मिळू लागला. फडके, पेठे, पटवर्धन, धायगुडे, रास्ते इ. पुणे दरबारातील प्रमुख सरदार आणि भट घराण्याचे स्नेही असलेले भानू घराण्यातील नाना व मोरोबा हे दोन्ही फडणीस बंधू देखील बापूच्या कारस्थानास अनुकूल झाले. यामुळे बापुची स्वारी उत्साहित झाली. कारस्थानाचा प्राथमिक टप्पा तर पार पडला होता. आता दुसरा टप्पा होता गंगाबाईच्या सुटकेचा ! गंगाबाई गरोदर असल्याने तिला किंवा त्याच्या गर्भात वाढणाऱ्या नारायणरावाच्या वारसास मारून टाकण्याचे प्रयत्न दादा व आनंदीने हस्ते - परहस्ते सुरु केले होते. शनिवारवाड्यावर दादाच्या मर्जीतील इसमांचा बंदोबस्त असल्याने गंगाबाईला अधिक काळ तिथे ठेवणे धोक्याचे होते. तेव्हा कोणत्याही प्रकारे गंगाबाईला तेथून काढून सुरक्षित स्थळी ठेवण्याचा विचार बापू - नाना करू लागले. त्यातून मग गंगाबाईला पुरंदर किल्ल्यावर बंदोबस्तात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे, कारस्थानाची हि सर्व आखणी दादासोबत निजामावरील मोहिमेत सहभागी असताना बापूने त्याच्याच छावणीत राहून केली. कारस्थानाची सर्व जुळवाजुळव होताच बापू प्रकृती बिघडल्याच्या निमित्ताने ऑक्टोबरच्या उत्तरार्धात स्वारीतून मागे फिरला आणि सासवड येथे आला. पाठोपाठ कटातील एक एक मंडळी या ना त्या निमित्ताने दादाच्या छावणीतून बाहेर पडू लागली. इकडे निजाम - साबाजी भोसल्याचा बंदोबस्त करण्याच्या नादात दादा मग्न असून त्याने निजामाच्या ताब्यातील औसा किल्ला जिंकून साबाजीचा बंदोबस्त करण्यास पेठे व रास्ते यांना रवाना केले. 
                    दरम्यान निजाम - दादाच्या फौजांची बेदर जवळ गाठ पडून काही चकमकी घडून आल्या आणि नेहमीप्रमाणे निजामाने वकीली बोलाचाली सुरु करून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले. महिनाभर वाटाघाटी चालून निजामाने दादास वीस लाख उत्पन्नाचा मुलुख व औरंगाबाद शहर देण्याचे मान्य करून समेट केला. यावरून असे दिसून येते कि, दादाने या मोहिमेत निजामाला चांगलेच नरम केले होते. त्याशिवाय औरंगाबादसारखे मुस्लिम वैभवाचे आणि राजसत्तेचे प्रतिक असलेले नावाजलेले शहर निजामाने दादाच्या ताब्यात देण्याचे मान्य केले नसते. कारण कितीही झाले तरी एकेकाळी दख्खनच्या मोगल सुभेदाराच्या निवासाचे ते शहर असून आरंभी निजामाची मुख्य राजधानी देखील तेथेचं होती. असो, डिसेंबर अखेर निजामाचे प्रकरण उलगडून दादा हैदरच्या मुकाबल्यासाठी कर्नाटकात शिरला. दादा कर्नाटकात गेल्याचे समजताच बापूने आपली सर्व अक्कल आणि राजकीय तपश्चर्या पणाला लावून ता. १७ जानेवारी १७७४ रोजी शनिवारवाड्यातून गर्भवती गंगाबाईस बाहेर काढून पुरंदरवर नेउन ठेवली. गंगाबाईला पुरंदरवर नेउन ठेवल्यावर बापू - नानाने पुण्यातील प्रमुख सावकारांकडून कर्जाऊ रकमा उचलून नवीन फौज चाकरीस ठेवून दादाच्या संभाव्य आक्रमणास तोंड देण्याची तयारी चालवली. तसेच कारस्थानात सहभागी असलेल्या मंडळींच्या हालचालींत सुसूत्रता आणि एकवाक्यता असावी म्हणून याच सुमारास त्यांनी कारभारी मंडळाची आखणी देखील केली. बापू व नाना हे दोघे मुख्य कारभारी असून त्यांनी गंगाबाईच्या नावाने कारभार करायचा होता. तसेच लष्करी बाबतीत सर्व अधिकार त्रिंबकराव पेठ्याकडे देण्यात आले. पुण्यातील या घडामोडी रायदुर्ग जवळ असताना दादाला समजल्या. त्याबरोबर त्याने हैदरला बराचसा मुलुख देऊन त्याच्याशी तह केला. त्याबदल्यात हैदरने त्यास वार्षिक सहा लक्ष खंडणी भरण्याचे व पेशवाईवर दादाखेरीज इतर कोणाचाही अधिकार न मानण्याचे मान्य केले. हैदरला आपल्या लगामी लावल्यावर दादाने निजामाला निरोप पाठवून दोन महिन्यापूर्वी केलेल्या तहातील अटी माफ केल्याचे कळवून त्यास राजी राखण्याचा प्रयत्न केला. आपल्या दोन बलवान मित्रांना खुश करून दादाची स्वारी महाराष्ट्राच्या दिशेने येऊ लागली. 
 रघुनाथराव पेशवे पदावरून बडतर्फ :- रघुनाथरावासमोर यावेळी दोन पर्याय उपलब्ध होते. सरळ पुण्यात येउन कटवाल्यांचा बंदोबस्त करणे वा प्रथम कारस्थानी मंडळाचा नायनाट करून मग राजधानीत परतणे. यापैकी पहिला पर्याय हा कोणत्याही परिस्थितीत अंमलात आणण्यासाठी अतिशय योग्य असा पर्याय होता. कारण, राजधानीचा ताबा या क्षणी बारभाई मंडळाकडे असल्याने लौकिकात त्यांचे वजन जनतेवर आणि परराष्ट्रदरबारावर पडण्याची शक्यता अधिक होती. परंतु दादाने हा सरळ व्यवहारी मार्ग न धरता दुसरा पर्याय अवलंबून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. दरम्यान इकडे कारभाऱ्यांनी हरिपंत फडक्यास साताऱ्याला रवाना करून छत्रपतींकडून गंगाबाईच्या नावे पेशवेपदाची आणि बापू - नानाच्या नावे कारभाऱ्यांची वस्त्रे मागवली. त्याखेरीज आणखी एक महत्त्वाचे कार्य या मुत्सद्दी कारभाऱ्यांनी केले व ते म्हणजे छत्रपतींमार्फत ता. २७ फेब्रुवारी १७७४ रोजी दादाला पेशवेपदावरून बडतर्फ केल्याचा जाहीरनामा काढून तो प्रसिद्ध केला. त्यातील मजकूर खालीलप्रमाणे :- 
" रघुनाथ बाजीराव यांनी नारायणराव पंडित प्रधान यांजवर कसाला केला ही गोष्ट धर्मराज्यांत अयोग्य झाली. पुढे त्यांनी पेशवाईची वस्त्रे मागितली ती संकट जाणोन पाठविली. परंतु पेशवाईची मर्यादा अगदीच राहिली नाही. यास्तव त्यांजकडील पेशवाई दूर केली असे. हल्ली भवानराव, त्रिंबकराव, साबाजी व वामनराव गोविंद हे स्वामींच्या लक्षांत आहेत, तरी तुम्ही त्यांचे लक्षांत वागून स्वामिसेवा करून दाखविणे. " 
  छ्त्रपतींच्या जाहीरनाम्यावरून काही ठळक मुद्दे लक्षात येतात ते पुढीलप्रमाणे :- (१) या जाहीरनाम्यात प्रतिनिधी, भोसले, पेठे व पटवर्धन या चार प्रमुख सरदारांचा उल्लेख येतो. पैकि प्रतिनिधी हा छ्त्रपतींशी एकनिष्ठ असून तुलेनेने हे पद पेशव्याच्या वरचे आहे. नागपूरच्या भोसलेंची बाब निराळी आहे. म्हटले तर छत्रपतींचे सरदार वा म्हटले तर स्वतंत्र सत्ताधीश. राहता राहिले पेठे व पटवर्धन तर हे दोघेही कै. माधवराव पेशव्याचे पक्षपाती असून दादाचे कट्टर विरोधक होते. (२) पेशव्यांना बडतर्फ केल्याची तशी अनेक उदाहरणे आहेत पण जाहीरनाम काढून बडतर्फ केल्याचे हे एकमेव उदाहरण आहे. (३) या आज्ञापत्रातील ठळकपणे लक्षात येणारी बाब म्हणजे, यात बापू - नाना या कारभाऱ्यांचा बिलकुल उल्लेख नाही. (४) रघुनाथरावास बडतर्फ केल्यावर खुद्द छत्रपतीला बंदिवासातून बाहेर काढून त्यांच्या नावे कारभार करण्याची संधी याप्रसंगी बापू - नाना यांनी दवडली. पेशव्याची सत्ता हाती घेण्यापेक्षा छ्त्रपतींची सत्ता हाती घेणे खरेतर आवश्यक होते पण त्यांनी हा उपक्रम स्वीकारला नाही. 
 कासेगावच्या लढाईत दादाचा विजय आणि पलायन :- छत्रपतींनी आपणांस बडतर्फ केल्याचे समजताच दादा चवताळून गेला पण या क्षणी त्याच्या हातातील डाव त्याच्याच एकेकाळच्या प्रमुख सहाय्यकाने उपटला होता. बापूच्या या कारस्थानाला तोंड देईल असा एक मोहरा दादाकडे होता, तो म्हणजे गंगोबातात्या ! पण दि. २० फेब्रुवारी १७७४ रोजी त्याचे निधन झाल्याने दादाची ती बाजू खचली. तेव्हा त्याने निराळा उपक्रम आरंभला. बापू - नाना सोबत वाटाघाटींची सुरवात करून त्याने साताऱ्यास जाऊन छत्रपतींना ताब्यात घेण्याची योजना आखली. दादाचा हा डाव कारभाऱ्यांनी आधीच हेरला होता. त्यादृष्टीने त्यांनी आपल्या सरदारांना योग्य त्या सूचना दिल्या होत्याच. वरवर पाहता पेठे, फडके, पटवर्धन, भोसले हे सरदार विखुरलेले होते परंतु, या सर्वांनी दादाला घेरण्यासाठी संगनमताने एक सापळा रचला होता. बस्स… ! दादा त्या सापळ्यात अडकण्यासाठी जरा जवळ येण्याची गरज होती.  परंत, दैवाने दादाची पाठराखण केली. साबाजी भोसल्याच्या फौजेत पगारावरून कटकटी सुरु झाल्या तेव्हा त्याने कारभाऱ्यांकडे पैशांची मागणी केली, पण जिथे पुणेकर सरदारांच्या फौजांना द्यायला कारभाऱ्यांकडे पैसा नव्हता तिथे ते साबाजीला कोठून देणार ? परिणामी,  भोसल्यांची लष्करी हालचाल मंदावली. जी तऱ्हा भोसल्यांची तीच थोडीफार फरकाने निजामाची ! निजाम दादाला जाउन मिळू नये म्हणून त्यास हरतऱ्हेने राजी राखण्याचा कारभाऱ्यांनी प्रयत्न केला. त्यानुसार निजाम दादाच्या पक्षाला मिळाला नाही. परंतु दादाच्या पाठलागासाठी त्याची फौज झटपट हालचालही करत नव्हती. त्यला पुणे दरबारातील हे खूळ निकालात काढण्याची अजिबात इच्छा नव्हती. कारण, त्यावरचं त्याचे महत्त्व आणि अस्तित्व टिकून राहणार होते. सारांश, यावेळी परीस्थिती दादा आणि कारभारी दोघांनाही अनुकूल होती. आता याचा फायदा कोण उचलतो हेच पाहायचे होते. 
                    ता. २६ मार्च १७७४ रोजी कासेगाव येथे त्रिंबकराव पेठ्याचा मुक्काम असताना दादाने त्याच्यावर हल्ला चढवून त्यास पराभूत केले. या प्रसंगी झालेल्या चकमकीत पेठे जखमी अवस्थेत दादाच्या हाती लागला. त्याची उर्वरीत फौज उधळून गेली. घायाळ त्रिंबकराव दादाच्या गोटात कैदेदाखल असताना जखमा असाध्य चार आठ दिवसांनी मरण पावला. पेठ्याच्या पराभवाने आणि मृत्यूने कारभाऱ्यांची बाजू खालावली. त्रिंबकरावाचा पराभव झाल्याचे समजताच नानाचा धीर खचला पण बापूने त्यास हिंमत दिली. इकडे मिळालेल्या विजयाचा फायदा घेऊन दादा तडक पुरंदर वा साताऱ्यावर चालून गेला असता तर कारभाऱ्यांचा निभाव लागणे शक्य नव्हते. परंतु, याच वेळी हरिपंत फडक्याने निजाम - भोसल्यांना सोबत घेऊन दादाची पाठ धरल्याने दादाला नगरला पळून जावे लागले. नंतर तेथून तो तसाच बऱ्हाणपुरास निघून जाऊ लागला. पाठोपाठ फडके, निजाम आणि भोसले या तिघांच्या फौजा होत्या. पण निजाम आणि भोसल्यांना आता या लढ्यात फारसे रस उरले नव्हते. त्यांच्या दृष्टीने दादाचा बंदोबस्त होऊन कारभारी बळावणे वा कारभारी मंडळ निकालात निघून पेशवाईवर दादाची घट्ट पकड बसणे दोन्हीही हानिकारक होते. पुणे दरबार अस्थिर असण्यातच त्यांचे हित सामावलेलं होतं. त्यामुळे दादाचा पाठलाग करण्यास ते दिरंगाई करू लागले. निजाम - भोसल्यांच्या या पवित्र्याने हरीपंताचा नाइलाज झाला. या दोघांना सोडून स्वतः पुढे जाउन दादाचा पाठलाग करावा तर लढाईत आपलीही पेठ्याप्रमाणेच गत होण्याची त्यास धास्ती होती. कारण, पगारावरून त्याच्याही सैन्यात कटकटी होऊन त्यांत दादाने फितूरही केला होता. त्याखेरीज दादा कसाही असला तरी लढवय्या होता आणि त्याची अटकेपार भरारी अद्याप लोकांच्या स्मरणात ताजी होती. तसेच आपण निजाम - भोसल्यांना सोडून अलग झालो तर दादाचे हस्तक त्यांच्याकडे जाउन त्या दोघांना फितवतील हि देखील भीती फडक्यास होतीच.
    सवाई माधवराव पेशव्याचा जन्म :-   दादा आणि कारभाऱ्यांचा पाठशिवणीचा खेळ सुरु असताना ता. १८ एप्रिल १७७४ रोजी पुरंदरावर गंगाबाई प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्याचे नाव माधवराव असे ठेवण्यात येउन त्यास वयाच्या ४० व्या दिवशी म्हणजे दि. २८ मे १७७४ रोजी पेशवेपदाची वस्त्रे प्राप्त झाली. माधवरावाच्या जन्मामुळे कारभाऱ्यांच्या कारस्थानास अधिकच जोर आला. दैवावर हवाला ठेऊन त्यांनी दादाला पदच्युत करण्याचा जो कट आखला होता तो आता काही प्रमाणात यशस्वी झाला होता. येथून पुढे पेशव्याच्या नावे राजकारण करण्यास त्यांना एक प्रकारे नैतिक बळ प्राप्त झाले. नाहीतर पेशव्यांच्या विधवेच्या नावाने कारभार हाती घेतलेल्या सत्ताभिलाषी मुत्सद्यांचा समूह म्हणून बारभाईंची दादासाहेबाचे पक्षपाती हेटाळणी करत होते. अर्थात, गंगाबाईस मुलगा न होता मुलगी झाली असती अथवा मृत अर्भक जन्मास आले असते तर गंगाबाईस दत्तक पुत्र देण्याचीही कारभाऱ्यांची योजना होती. गंगाबाईच्या प्रसूतीच्या बाबतीत कारभारी अतिशय सावध आणि दक्ष होते. मुलगा झाला तरी मुद्दाम मुलगी झाल्याची बातमी उठू शकते वा मुलांची अदलाबदल केल्याचा आळ येऊ शकतो हे गृहीत धरून नाना फडणीसाने छत्रपतींना पत्र लिहून विनंती केली कि, त्यांनी आपले दोन विश्वासू हुजरे आणि दोन बायका पाठवून द्याव्यात. गंगाबाईच्या प्रसूतीसमयी छत्रपतींनी पाठवलेल्या स्त्रिया समक्ष हजर असल्यावर कोणाला काही वावड्या उठवण्यास संधी मिळू नये हा यामागील हेतू ! 
                कारभाऱ्यांनी एवढी दक्षता घेतली तरी पुण्यात वार्ता उठल्या कि, गंगाबाईस मुलगी झाली असून कारभाऱ्यांनी दुसऱ्याचा मुलगा देऊन गंगाबाईस पुत्र झाल्याचे जाहीर केले आहे. दादाला हे समजताच त्याने देखील याच आक्षेपाचे भांडवल करत सवाई माधवराव हा आपला नातू नसल्याचे त्याने जाहीर केले. असो, तूर्तास तरी पेठेच्या पराभवाने खचलेली कारभाऱ्यांची बाजू या निमित्ताने वर आली तर दादाचा पक्ष त्यामानाने पुष्कळच खालावला. 
दादा - कारभारी संघर्षात शिंदे - होळकरांची लुडबुड :-  हरिपंत फडक्यास चकवून गुजरातमध्ये जायचे आणि गायकवाड व इंग्रजांची मदत मिळवून कारभाऱ्यांचा समाचार घ्यायचा असा दादाचा बेत ठरला. त्यासाठी तो नर्मदेपर्यंत गेला. पण, इंग्रजांशी सूत्र जुळण्यास वेळ लागल्याने त्याने माळव्यात जाण्याचा निर्णय घेतला. दादा माळव्यात आल्यामुळे पेशवे घराण्यातील यादवीत हात घालण्याची संधी शिंदे - होळकरांना प्राप्त झाली. यावेळी शिंदे - होळकर हे दोन्ही सरदार एकमताने व एकविचाराने वागत असल्याचे दिसून येते. या दोन्ही सरदारांच्या सरदारकीवर नवीन वारसाची नेमणूक करताना दादाने भरपूर गोंधळ घातला होता. शिंद्यांची सरदारकी राणोजीपुत्र महादजीस,  तो दासीपुत्र असल्याचे निमित्त करून न देता, साबाजी शिंद्याचा नातू व आपला पक्षपाती मानाजी शिंदे यास देण्याचा दादाने प्रयत्न केला होता. त्याखेरीज मालेराव होळकराच्या मृत्यूनंतर होळकरांच्या दौलातीत देखील दादाने नको तितका हस्तक्षेप केला होता. अर्थात हि प्रकरणे ताजी असून देखील उभय सरदारांना त्याचा साफ विसर पडला आणि त्यांनी दादा म्हणजे बाजीरावाचा पुत्र -- ज्याने आपणांस सरदार बनवले त्या पेशव्याचा मुलगा -- एवढीच भावना आणि जाणीव मनाशी बाळगून दादाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्याखेरीज महत्त्वाची खोच म्हणजे ज्या कारणांसाठी निजाम - भोसलेंना दादाचे खूळ राज्यात कायम राहावे असे वाटत होते, जवळपास त्याच कारणांसाठी शिंदे - होळकरांची देखील दादाचे प्रकरण निकाली निघू नये अशी भावना होती. दादाचा निकाल लागला म्हणजे कारभारी निरंकुश बनून आपण मात्र कमजोर पडू हि भीती सरदारांना होती. कारण बालपेशव्याचा ताबा यावेळी कारभाऱ्यांकडे असल्याने सर्व सत्ता त्यांच्याच हाती होती. तसेच दादाला हैदर वा निजामाचा पाठिंबा मिळून यशप्राप्त झाले तर त्याच्याविरोधात आपण गेलो होतो या गोष्टीचा तो सूड उगवल्याशिवाय राहणार नाही हि धास्ती देखील त्यांना होती. मिळून काय तर, दादाचे प्रकरण निकालात काढण्याची बापू - नाना वगळता इतर कोणास फारशी उत्कंठाच नव्हती ! 
               रघुनाथराव माळव्यात जात असल्याचा अंदाज येताच कारभाऱ्यांनी शिंदे - होळकरांना पत्रे लिहून त्यांना परिस्थितीची यथायोग्य कल्पना दिली. त्याखेरीज या सरदारांनी आपणांस दगा देऊ नये यासाठी थो. माधवराव पेशव्याच्या विश्वासातील मनुष्य म्हणून महादजी बल्लाळ गुरुजी याची उभय सरदारांकडे रवानगी केली. पुणे दरबारात हा गोंधळ सुरु असताना स्वराज्याचा सेनापती, मुराराव घोरपडे याने कारभाऱ्यांना एक सविस्तर पत्र लिहून असे सुचवले कि, ' दादाला जहागीर वगैरे देण्याचे मान्य करून त्याची समजूत घालावी. माधवरावाने त्यास ज्या पद्धतीने वागवले होते त्याच पद्धतीने पुढे त्यास ठेवावे. म्हणजे चार सहा महिन्यात हा सर्व गोंधळ शांत होऊन महत्त्वाची राजकीय प्रकरणे निकाली काढण्याकडे लक्ष देत येईल.' मुराररावाचा हा सल्ला योग्य होता खरा पण,  घेऊन स्वस्थ बसणाऱ्यांमधील दादा नव्हता ! त्याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे जरी छत्रपतींनी दादाला पेशवेपदावरून बडतर्फ केले असे तरी त्याचा पेशवाईवरील हक्क वा दावा त्यांनी रद्द / अमान्य  केला नव्हता. नेमक्या याच त्रुटीचा फायदा घेऊन शिंदे - होळकरांनी आपापल्या मतलबास्तव दादाला हाताशी धरण्याचा प्रयत्न केला. असो, बापू , नाना व हरीपंताने शिंदे - होळकरांना पत्रे पाठवून दादास नर्मदा पार न करू देण्याची वारंवार आज्ञावजा विनंतीपत्रे लिहिली. तेव्हा त्यांनी सांगितले कि, आम्ही दादाला नर्मदा उतरून माळव्यात घुसू देणार नाही पण कृती मात्र त्यांनी उलट केली. परिणामी दादाच्या बंदोबस्ताचे प्रकरण लांबणीवर पडले ! शिंदे - होळकर आपल्याच पक्षाला सामील आहेत असा दादाचा समज होता. त्याखेरीज आता आपण नर्मदा तर पार केली आहेच तेव्हा उत्तरेतील संस्थानिकांची मदत मिळते का ते पहावे या विचाराने दादासाहेबाने  रोहिले, जाट, सुजा इ. संस्थानिकांना पत्रे पाठवून त्यांच्याकडे कुमकेची मागणी केली. त्याशिवाय जोवर आपण शिंदे - होळकरांच्या प्रदेशात आहोत तोवर फडके आपणांस कैद करणार नाही हे ओळखून दादाने गुजरातमधील इंग्रजांशी देखील संधान बांधण्याची खटपट केली.
          शिंदे - होळकरांनी कारभारी व दादा यांच्यात मध्यस्थी करण्याची जबाबदारी घेतल्याने प्रकरण वाटाघाटींच्या मार्गाने रेंगाळत चालले. दरवेळी दादा नवीन मागणी उपस्थित करून निकाली तोडगा कसा निघणार नाही याची दक्षता घेत असे. अखेर असे ठरण्यात आले कि, दादाला घेऊन शिंदे - होळकरांनी दक्षिणेत यावे आणि बापू - नाना यांनी देखील पुरंदर सोडून नर्मदेच्या रोखाने यावे. म्हणजे रस्त्यात सर्वांच्या भेटी होऊन दादाचा एकदाचा काय तो निकाल लागेल. त्यानुसार शिंदे - होळकर दादाला घेऊन दक्षिणेत येऊ लागले तर नोव्हेंबर अखेर पुरंदर सोडून कारभारी मंडळ नर्मदेच्या दिशेने रवाना झाले. आता दादाचा कायमचा बंदोबस्त घडून येईल अशीच सर्वांची अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात घडले ते वेगळेचं ! ( स. १७७४ ) 
                                                                         ( क्रमशः )             
  
                                       
                              


       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: