सोमवार, ८ जुलै, २०१३

इतिहास लेखन :- एक मुक्त चिंतन

                     इतिहासाचा अभ्यास / वाचन करताना पूर्वग्रह नेहमी बाजूला ठेवावे लागतात त्याचप्रमाणे मनोविकार देखील आपल्याला नेहमी नियंत्रित करावे लागतात. कारण त्याशिवाय तत्कालीन घटनांचे मर्म वा आकलन आपणांस होत नाही. हि दोन पथ्ये विशेषतः पेशवेकालीन इतिहास अभ्यासताना विशेष सांभाळावी लागतात. याचे कारण म्हणजे, तुलनेने हा कालखंड अगदी अलीकडचा असल्याने व एका विशिष्ट राजवटीसोबत त्याचा संबंध जुळल्याने आपल्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. 
                ' विशिष्ट राजवट ' हा शब्दप्रयोग वाचताच अनेकांच्या मनात ' मराठा ' , ' ब्राम्हणी ' इ. भेद निर्माण झाले असतील आणि ते स्वाभाविक आहे. परंतु, या ठिकाणी मराठा किंवा ब्राम्हणी राजवट अपेक्षित नसून हा शब्दप्रयोग इंग्रजी अंमलास उद्देशून योजला आहे. पेशवाई ही एतद्देशीयांची एक बलवान राजवट होती आणि ती अस्त पावताच या देशावर इंग्रजांचा अंमल बसला. पुढे यथावकाश इंग्रजांच्या विरुद्ध देशभरात जनजागृती होऊन स्वातंत्र्यप्राप्तीचे आंदोलन भडकले. अनेकांच्या सर्वस्वाची होळी झाली. कित्येकांची कुटुंबे देशोधडीला लागली तेव्हा कुठे स्वातंत्र्यलक्ष्मी प्रसन्न होऊन या देशाला स्वतंत्रता प्राप्त झाली. यामुळेचं कि काय, इतिहास वाचनात इंग्रज हा शब्द आला की आमच्या मनात जितकी चीड निर्माण होते तितकी इतरांविषयी -- म्हणजे डच, पोर्तुगीज, फ्रेंच इ. विषयी होत नाही. नेमक्या याच कारण कारणामुळे आम्ही पेशवेकालीन इतिहास समजून घेण्यात कमी पडतो असे माझे मत आहे. ' इंग्रज ' या शब्दाविषयी आमच्या मनात इतका, राग संताप आहे की पेशवेकाळातील एखादा मुत्सद्दी वा सरदाराने इंग्रजांशी संधान बांधल्याचा वगैरे उल्लेख वाचला की, लगेच आम्हांला तो ' देशद्रोही ' वा शत्रू भासतो. जो इंग्रजांविरुद्ध लढून देशोधडीला लागतो वा प्राणांस मुकतो तो आमच्या दृष्टीने ' देशभक्त ' वा नायक ठरतो. बाळाजीपंत नातू व टिपू सुलतान हि याच दोन वर्गांची  प्रतिनिधित्व करणारी उदाहरणे आहेत. 
                 तत्कालीन इतिहास अभ्यासताना किंवा त्याचे वाचन करताना आपण आपले मनोविकार त्या त्या ऐतिहासिक व्यक्तींवर लादत असतो. आपल्या काळातील स्वातंत्र्य, पारतंत्र्य, सूड, द्वेष इ. कल्पना मनाशी बाळगून तत्कालीन बंडखोरी वा इंग्रजविरोधी लढायांकडे पाहतो. पण अशा पद्धतीने अभ्यास करून खरोखरच हाती काही लागते का ? जी तऱ्हा पेशवेकालातील इंग्रजी राजकारणाची तीच मुस्लिम राजकारणाचीही ! हिंदुस्थानातील मुस्लिमांचा इतिहास हा तसा हिंदू धर्मियांच्या रक्तरंजित कत्तलींचा, बाटवाबाटवीचा व धर्मस्थळे भ्रष्ट केल्याचा इतिहास ! धर्मविषयक आजही आमच्या भावना इतक्या प्रखर आहेत की, अशाच धार्मिक दृष्टीकोनातून छ. शिवाजी महाराजांचे अथवा संभाजीचे लिहिलेलं चरित्र वाचले कि, सगळ्या दाढीवाल्यांमध्ये आम्हांला अफझल - औरंग्या दिसू लागतात ! पण वस्तुस्थिती काय आहे ? भारतात आज जितके मुस्लिम आहेत त्यातील शेकडा ९० % हून अधिक मूळचे हिंदू आहेत. धर्मांतर झालेल्या व्यक्तीला परत स्वधर्मात घेण्याची आमची मानसिकता नसल्याने आज हि परिस्थिती उद्भवली आहे. जोपर्यंत ' बरे झाले, घाण गेली ' या अधम, निर्लज्ज आणि घमेंडी वृत्तीची मानसिकता नष्ट होत नाही तोवर हिंदू धर्मात गळती सुरुचं राहणार आहे ! 
                   अनेकांना हे विषयांतर वाटेल, पण तसे नाही. इतिहासाचा अभ्यास वा त्यावर चर्चा करताना हा मुस्लिमद्वेष नेहमी अडथळा बनत आला आहे. उदाहरणार्थ, शिंदे घराणे व नजीबखानाचे वैर हे इतिहासात नेहमी हिंदू - मुस्लिम द्वेषाचे प्रतीक म्हणून मानले जाते. पण खरोखर प्रत्यक्षात शिंदे व नजीब एकमेकांचे कट्टर वैरी होते का ? दत्ताजीचे शीर नजीबने कापले असा एक सर्वसाधारण गैरसमज प्रचलित आहे. पुढे जनकोजीलाही नजीबच्या सांगण्यावरून अब्दालीने ठार केले असे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर महादजी शिंद्याने इतिहासप्रसिद्ध पत्थरगड स्वारीत नजीबचे थडगे उध्वस्त केल्याची गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगितली जाते. दत्ताजी व जनकोजीच्या बाबतीत नजीबने केलेल्या कारवाया जर खऱ्या असतील तर नजीबचे थडगे उध्वस्त करण्याच्या कृतीचे समर्थन करणे वा तिचा गौरवपर उल्लेख करणे समर्थनीय आहे. पण हि गोष्ट सांगताना एक महत्त्वाची वस्तुस्थिती लपवली जाते व ती म्हणजे -- पानिपतनंतर शिंद्यांची सरदारकी महादजीला न देता त्याच्याच भावबंदांपैकी एक मानाजी शिंदे याला दिल्यावर महादजीने नजीब व सुजा यांना पत्र पाठवून मैत्री आणि सेवेविषयी लिहिले होते. स्पष्ट शब्दांत सांगायचे तर महादजीने नजीबकडे चाकरीची मागणी केली ! जर शिंदे - नजीबखान यांचे वैर इतके तीव्र असते तर महादजीने नजीबकडे नोकरी मागितली असती का ? 
                  ' गोब्राम्हण प्रतिपालक ' या बिरुदावलीचाही असाच गोंधळ आहे. हे पद / बिरुद वा विशेषण छ. शिवाजी राजांनी आपल्या पत्रांत स्वतःस लावल्याचे अजूनही माझ्या वाचनात आलेलं नाही. तसेच हे बिरुद जर ते स्वतः लावून घेत होते तर मग संभाजी, राजाराम, संभाजी पुत्र शाहू, राजाराम पुत्र शिवाजी - संभाजी यांनी का वापरात आणले नाही हा प्रश्न उरतोच. ' गोब्राम्हण प्रतिपालक ' हे विशेषण पेशव्यांना लिहिलेल्या पत्रांत अगदी क्वचित आढळून येते. अर्थात, यामागे खुशमस्करीचा अथवा तत्कालीन लोकभावनेचा भाग असू शकतो व हे नाकारता येत नाही. 
                     जातीयतेचा शाप तर आम्हांस पूर्वीपासून लागलेलाच आहे. या शापाचा वसा आम्ही इतिहास लेखन करताना देखील कधी त्यागला नाही. परिणामी, पहिल्या इंग्रज - मराठा युद्धात तत्कालीन समाजाच्या दृष्टीने दासीपुत्र असला तरी मराठा म्हणून महादजी शिंद्यास झुकते माप दिले जाते. त्याचा उदोउदो होतो तर धनगर असल्यामुळे तुकोजी होळकर तळेगाव, मोरोबाचे कारस्थान, बोरघाट इ. प्रकरणात किरकोळ पथक्या म्हणून रंगवला जातो. पण मराठा म्हणून महादाजीला जे झुकते माप दिले जाते ते फक्त होळकर प्रकरणापुरतेचं ! नाहीतर मुस्लिम मित्र, मुस्लिम गुरु असलेला महादजी तसा अर्धबाटगाचं होता असेही सूचक उद्गार काढले गेले नसते. मराठा जातीच्या ताराबाईने आपल्या तथाकथित नातवास कैद घातले असता, छत्रपतीच्या परवानगी शिवाय त्यांचा जामदारखाना ब्राम्हण पेशव्याने जप्त करणे म्हणजे एकप्रकारे लूटचं ! पण जातीय इतिहास लेखनात हे प्रकरण मुळातच वगळले जाते वा फार सौम्य प्रकारे लिहिले जाते. त्रिंबकजी डेंगळे हा दुसऱ्या बाजीरावाच्या काळात आरंभी हुजऱ्या होता पण पुढे स्वकर्तुत्वाने तो पेशव्यांचा मुख्य कारभारी बनला. या त्रिंबकजीचा गौरवपर उल्लेख कधी इतिहासकारांनी केल्याचे कोणाच्या वाचनात आले आहे का ? उलट राज्यबुडव्या बाजीरावाचा नीच आणि अधम साथीदार असाच त्याचा गौरव केला जातो.                             याचा अर्थ असा नव्हे कि, त्यावेळी समाजात जातीयता अजिबात प्रचलित नव्हती. उलट आजच्यापेक्षाही ती अधिक तीव्र होती. पण असे असले तरी जातीचे बंधन केव्हा पाळावे आणि केव्हा नाही याची त्यांना समज होती. उदाहरणार्थ, खर्ड्याच्या लढाईच्या वेळी ब्राम्हण, मराठा सरदारांच्या तंबुंच्या रांगांमध्ये एका महार सरदाराने तंबू ठोकला होता. तत्कालीन ब्राम्हण - मराठ्यांना हे खटकले व त्यांनी पेशव्याकडे याबाबतीत तक्रार केली. पेशव्याने या सर्वांसमक्ष आपल्या सल्लागारांना याबाबतीत सल्ला मागितला. तेव्हा हिरोजी पाटणकर नामक वयोवृद्ध सल्लागार म्हणाले, ' हि काही जेवणाची पंगत नसून रणांगण आहे !' हे ऐकताच ब्राम्हण - मराठा सरदारांचे चेहरे उतरले. यातील गंमतीचा भाग म्हणजे जन्माधीष्टीत चार वर्णांचे समर्थन करणाऱ्या ब्राम्हणांनी क्षत्रियांचा पेशा पत्करून चातुर्वर्ण व मनुस्मृती या दोन्हींचेही आपद्धर्म म्हणून उल्लंघन केले होते. जणू काही ब्राम्हण जातीतच त्यावेळी शूरवीरांचा जन्म होत होता ! परंतु, एकीकडे वर्णवर्चस्ववादाचे समर्थन करत खुद्द त्याचे उल्लंघन करण्याचा तत्कालीन ब्राम्हणांचा दुटप्पीपणा तेव्हा चालू होता आणि उर्वरीत समाजानेही तो मान्य असल्याचे दाखवत चालवून घेतला.  पण याचा अर्थ असा होत नाही की, सत्ताधारी ब्राम्हणांविरुद्ध बंड झाले नाही. 
                सत्तेच्या प्राप्तीसाठी ब्राम्हणांच्या विरोधात बंडे झाली, लढाया घडून आल्या. उदाहरणार्थ, ताराबाई व नानासाहेब पेशवा यांच्यातील तंट्याचे मूळ म्हणजे छत्रपतींवर कोणाचे नियंत्रण असावे हे होय ! आपल्या पक्षाला जोर यावा म्हणून ' मराठ्याचे राज्य ब्राम्हणाने बळकावले ' अशी ओरड ताराबाईने चालवली. त्याला दाभाडे, आंग्रे प्रभूती ब्राम्हणेतर सरदारांची सक्रिय साथ मिळाली. 
                             सत्ता - स्वार्थ यांचा संबंध आला तेव्हा प्रसंगी जात - पात, गोत्र सर्व काही खुंटीला टांगले गेल्याचेही प्रसंग कमी नाहीत. सत्ताप्राप्तीच्या स्वार्थात / स्पर्धेत अंध झालेल्या ताराबाईने दुसऱ्याच कोणत्यातरी वंशातील मुलास आपला नातू म्हणून एकताटी भोजन केले. त्यास छत्रपती बनवले. केवळ सत्ताप्राप्तीसाठी तिने आपली ९६ कुळे अशी खुंटीला टांगून ठेवली.  महादजी शिंदे, एवढा मोठा बलवान सरदार. दिल्लीची बादशाही याच्या मुठीत होती पण हलक्या कुळाचा म्हणून त्यास नेहमी हिणवले गेले. हि खंत पाटीलबाबाच्या मनात मरेपर्यंत कायम राहिली. 
                         मराठा छत्रपती जाग्यावर बसून सत्ता ब्राम्हणी पेशव्यांकडे आली ब्राम्हणांची परस्पर लाथाळी सुरु झाली. त्यात मुख्य पक्ष म्हणजे कोकणस्थ आणि देशस्थ ! पैकी पेशवे स्वतः कोकणस्थ तर त्यांचे मुख्य कारभारी व सल्लागार पुरंदरे, सखाराम बोकील हे देशस्थ होते. पुढे सदाशिवराव कारभारी बनल्यावर पुणे दरबारातील देशस्थांचा प्रभाव कमी झाला पण पानिपतमुळे देशास्थांचे प्रस्थ परत वाढले. पुढे पेशवे घराण्यात वारसा कलह माजून माधवराव त्यानंतरच्या पेशव्यांच्या पाठी कोकणस्थ ब्राम्हण उभे राहिले तर रघुनाथरावास देशस्थ ब्राम्हणांनी जितकी मदत केली तितकी सजातीय कोकणस्थांनी देखील केली नाही. 
                         सत्ताप्राप्ती वा स्वार्थ साधण्यासाठी मराठा समाज आपली ९६ कुळे खुंटीला टांगत असल्याचे आपणांस इतिहासात दिसून येते त्याचप्रमाणे ब्राम्हण समाज देखील प्रसंगी स्वतःच्या घराण्याची अब्रू वेशीवर टांगत असल्याचे दिसून येते. मराठ्यांच्या बाबतीत ताराबाईचे उदाहरण आपण पाहिलेच. ब्राम्हणांच्या संदर्भात बोलायचे झाले तर सदाशिवराव पानिपतावर मारला गेला व कैदेत आहे तो त्याचा तोतया आहे ही बाब पेशवे कुटुंबात एक पार्वतीबाई अपवाद केल्यास सर्वांना माहिती होती. मान्य होती. पण हा तोतया नसून खरा सदाशिवराव असल्याचे सांगण्यात बाळाजी विश्वनाथची कन्या व दादा, भाऊ, नाना यांची आत्या अनुबाई हिचा काय स्वार्थ साधला जाणार होता ? पेशव्यांची आत्या, इचलकरंजीकर घोरपडेची हि सून हिला काय कमी होते ? उलट आपल्या या एका असत्याने आपण पार्वतीबाईच्या अब्रूसोबत, भावनेसोबत खेळत आहोत याची चाड एक स्त्री असून या बाईच्या मनाला नसावी ? स्वार्थाचा प्रश्न आला कि स्वस्वार्थ साधण्यासाठी मनुष्य कोणत्या थराला जाऊ शकतो याचे हे एक उदाहरण ! आपला स्वार्थ साधण्यासाठी अनुबाईला पाठिंबा देणारा दादा देखील तितकाच ग्रेट ! मात्र, आपण आपला स्वार्थ साधण्याकरता एका मानवी जीवासोबत, त्याच्या भावनांसोबत खेळत आहोत याची चाड ना अनुबाईला होती ना दादाला !!
                    सध्या, खरा इतिहास लिहिण्याची एक चळवळ जोरात चालू आहे. या खरा इतिहास लेखकांनी लिहिलेला पानिपतचा इतिहास नुकताच माझ्या वाचनात आला. मराठ्यांची कत्तल करण्याकरता ब्राम्हणांनी रचलेलं षड्यंत्र म्हणजे पानिपत ! एका ओळीत त्यांनी सर्व इतिहास सांगून टाकला व तो रंगवण्यासाठी शेकडो पुस्तकाची शेकडो पाने वाया घालवली. 
                   अशाच खऱ्या इतिहास लेखनातून भीमा - कोरेगाव युद्ध आणि पेशवाई धुळीला मिळवणाऱ्या महार पलटणीची गौरवगाथा हि भाकडकथा जन्माला आली. महार पलटणीचा जन्म पेशवाई बुडवण्यासाठी झाला, कोरेगाव येथे लढाई करण्यास इंग्रज तयार नव्हते पण महार सैनिकांनी स्वबळावर ते युद्ध केले वगैरे वगैरे . मुळात भीमा - कोरेगाव येथे झालेली लढाई अनिर्णीत असल्याचे त्या लढाईत सहभागी असलेल्या इंग्रजांनीच कोरून ठेवले आहे याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते. ज्या दुसऱ्या बाजीरावाची पेशवाई महारांनी भीमा - कोरेगावच्या युद्धात धुळीस मिळवली असे सांगितले जाते, त्याच बाजीराव पेशव्याच्या वतीने महारांनी इंग्रजांच्या विरोधात रायगड लढवला त्याचे काय ? महार रेजिमेंट वा पलटणीचा इतिहास स. १८१८ सोबतच यांनी निगडीत करून टाकला. प्रत्यक्षात स. १७७७ च्या ऑगस्ट मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने ज्या मरीन बटालियनची स्थापना केली होती त्यास महार मरीन बटालियन म्हटले जात असे हे पुराव्यानिशी सांगण्यासाठी श्री. संजय सोनवणी यांना पुढाकार घ्यावा लागला. 
              याचा अर्थ तर मला स्पष्ट दिसतो, तो म्हणजे खरा इतिहास सांगण्याच्या नावाखाली आम्हांला केवळ जुलूम - अन्याय सहन केल्याचा व त्याच्या प्रतिकारार्थ लढाया केल्याचा इतिहासचं वाचायचा आहे, ऐकायचा आहे. बाकी गौरवशाली किंवा खरोखर समाजमनाचा आरसा दाखवणारा इतिहास आम्हांला बंबात घालून पेटवून द्यायचा आहे. 
                     अशा प्रकारचे लेखन करण्याची परंपरा हि अनुकरणातून जन्माला आली आहे. जर सर्व चांगल्या गोष्टींचे श्रेय ब्राम्हणांकडे जाते तर वाईट गोष्टींचे श्रेय देखील जायला हवे. या चष्म्यातून पाहता, स्वजातीचा गौरव करणारा इतिहास वा स्वजातीच्या दोषांपेक्षा गुणांचे वर्णन करणारा इतिहास लिहिण्याची परंपरा बव्हंशी ब्राम्हण इतिहास लेखकांनी निर्माण केली व इतर जातींच्या बहुसंख्य लेखकांनी याच मार्गाने जाउन माती खाल्ली ! 
             उदाहरणार्थ, न. चिं. केळकर हे एक महान देशभक्त आणि इतिहास संशोधक, विनोदी लेखक आणि वक्ते होते हे मान्य. पण याच नरसोपंत भटजींनी मराठेशाही बुडून १०० वर्षे झाल्याबद्दल ' मराठेशाहीचे शत सांवत्सरिक श्राद्ध ' घालणारा ' मराठे व इंग्रज ' हा ग्रंथ लिहिला. यात मराठी राज्य कशाने बुडाले याविषयी चर्चा करताना जातीभेद या मुद्द्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पण जातीभेदाची हि चर्चा ब्राम्हण, मराठा व होळकर असल्यामुळे धनगर इ. जातींच्या पुरती मर्यादित आहे. आता पेशवाई काळात महाराष्ट्रामध्ये फक्त ब्राम्हण, मराठा व धनगर या तीनचं जाती अस्तित्वात होत्या असे नरसोपंत भटजींना म्हणायचे होते कि काय ते त्यांनाच ठाऊक ! तसेच नरसोपंतांनी आपली भटजीगिरी मोठ्या उदारपणे अधिक विस्तारत जातीभेदाची चर्चा करताना ब्राम्हणांमधील जातीभेदांची मोठी सखोल अशी चर्चा केली आहे. जवळपास अशीच तऱ्हा रियासतकारांची आहे ! स. १८१८ सालच्या पेशवाई अस्ताचे व स. १८५७ च्या बंडाचे विश्लेषण करताना सरदेसाई सरळ ठोकून देतात की, इंग्रजांना या देशातील खरा लढवय्या वर्ग कधीच सामील झाला नाही. त्यांना लष्कर भरतीसाठी जे हिंदूलोक मिळाले ते खालच्या जातीतले होते !    
             सारांश, आजवर जे काही इतिहास लेखन आपल्या मराठी भाषेतून झाले ते जरी अव्वल दर्जाचे असले तरी एका विशिष्ट विचारसारणीतून झाल्याचे नाकबूल करता येत नाही. त्यामुळे शक्य तितक्या निरपेक्षपणे इतिहास लेखन करण्याची सध्या आवश्यकता आहे. यामुळे खरा इतिहास आपणांस समजेल अशी आशा धरणे व्यर्थ आहे. कारण, खरा इतिहास असा काही प्रकारचं मुळी नसतो. उदाहरणार्थ, एखाद्या क्षणी आपण जो निर्णय घेतो त्या निर्णयाचे समर्थन आपण कालांतराने कितीतरी बाजूंनी, प्रकारांनी करतो. पण त्यातील एकही कारण खरे नसते वा समर्पक नसते. कारण, तो निर्णय त्या विशिष्ट वेळेची, काळाची गरज असतो. आणि हे आपणांस माहिती असते. ऐतिहासिक घटनांचे देखील असेच आहे आणि इतिहास लेखन म्हणजे त्या घटनांचे विश्लेषण याहून अधिक काही नाही !
                                

३ टिप्पण्या:

deom म्हणाले...

म्हणायचेच झाले तर मराठीतून लिहिला गेलेला इतिहास हा बर्याच अंशी एक विशिष्ठ वक्ति. समाज, समोर ठेवून लिहिला गेला. त्याच मुळे तो "निरपेक्ष " असा नव्हताच. आश्चर्य असे वाटते कि रणगणं वर शूरपणे लढणारा मराठी समाज , इतिहास निरपेक्ष पणे लिहिण्याचे धाडस करत नहि.

sanjay kshirsagar म्हणाले...

खरं आहे, यापूर्वी मराठी समाजात खरा इतिहास लिहिण्याचे साहस नव्हते. पण आता ते दिवस संपले आहेत असे दिसत आहे.

deom म्हणाले...

होय. असे चित्र दिसत आहे. संजय सर आणि तुम्ही छान लिहित आहत. ते साहस दाखवत आहात आणि तेही एक शिस्त बाळगत. इतरांनीही बोध घ्यावा असे.