रविवार, २८ जुलै, २०१३

बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीस ( भाग - ३ )

    

               
                     मोरोबाचा निकाल लावल्यावर देखील नाना व त्याच्या सहाय्यकांस स्वस्थता लाभली नाही. कारण, स. १७७८ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईची इंग्लिश पलटणे पुण्याच्या रोखाने चालून येऊ लागली होती. या सैन्याला अडवण्यासाठी मराठी सरदारांनी बोरघाटाजवळ चांगली तयारी केली आणि तळेगाव - वडगाववर इंग्रजांचा पराभव करून त्यांना तह करण्यास भाग पाडले. ता. १७ जानेवारी १७७९ रोजी झालेल्या वडगावच्या तहानुसार इंग्रजांनी दादाला शिंद्याच्या ताब्यात दिले. तसेच घेतलेले प्रांत सोडून देण्याचे व बंगालची फौज माघारी पाठवण्याचेही मान्य केले. महादजीने मोठ्या धूर्तपणाने हा तह आपल्या मार्फत घडवून आणला. इंग्रजांशी ठ करताना महादजीने त्यांना कमीत कमी दुखवण्याची दक्षता घेतली. परिणामस्वरूप इंग्रजांनी त्यास भडोचचे ठाणे, त्याखालील मुलखासह बक्षीस म्हणून दिले. वडगावचा तह झाल्यावर दादा महादजीच्या ताब्यात आला. नाना व बापूने त्याची भेट देखील घेतली नाही, तेव्हा बापूच्या या वर्तनाने चिडून जाउन दादाने बापूच्या फितुरीची पत्रे महादजीला दाखवली. तहानुसार दादाला झांशी प्रांतात मोठ्या बंदोबस्ताने रवाना करून महादजीने सखारामबापूस कैदेत घातले. महादजीच्या या खेळीने नानाचा मार्ग काहीसा निष्कंटक झाला. कारण, मोरोबानंतर पुणे दरबारात बापूचं त्याच्या मार्गातील अडथळा होता. मात्र, यासोबतच नानाने हे देखील ताडले की, दादा कैदेदाखल महादजीच्या ताब्यात असल्यामुळेच महादजीने बापूला अटक केली आहे. म्हणजे प्रसंगी आपणांस वाकवण्याचे एक साधन अजूनही शिंद्याच्या हाती आहे ! बापू ठिकाणी बसल्यावर नानाने महादजीचे वर्चस्व झुगारून लावण्यासाठी हरिपंत फडकेला कारभारात घेतले. हरिपंत हा लढवय्या सरदार असल्याने लष्करी बाबतीत आता नानाला महादजीवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती. नानाचा हा डाव महादजीने ओळखला पण परिस्थिती अनुकूल होण्याची वाट बघत बसण्याखेरीज त्याच्या हाती काय होते ? मात्र, उभयतांमध्ये याच सुमारास एक मैत्री करार घडून आला त्यानुसार, दोघांनी प्रसंग पडला असता एकमेकांची पाठराखण करण्याचे मान्य केले. 
                               स्वाऱ्या  - शिकाऱ्या थंडावताच नानाने ता. २१ एप्रिल १७७९ रोजी पर्वतीवर सवाई माधवराव पेशव्याच्या मुंजीचा कार्यक्रम मोठ्या समारंभाने उरकून घेतला. यावेळी हा कार्यक्रम पुण्यात न करता पुरंदरावर करावा असे अनेक सरदारांचे मत होते परंतु, नानाने कोणाचेही न ऐकता हा समारंभ पुण्यात घडवून आणला आणि लागलीच पेशव्याचा शनिवारवाड्यात गृहप्रवेश देखील करवला. यावेळी सर्वांना वाटले कि, आता स्वस्थतेचे दिवस येतील. पण मे महिन्यात सर्वांची मनःशांती हिरावून घेणारा प्रकार घडून आला. शिंदे - होळकरांच्या लष्करी तुकड्यांच्या बंदोबस्तात दादाची स्वारी झांशीला निघाली होती पण, नर्मदेवर दादाने सरदारांच्या फौजेस उधळून लावले आणि तो सुरतेस निघून गेला. दादा पळून इंग्रजांच्या आसऱ्यास गेल्याचे समजताच नानाने महादजीला पत्र पाठवून तातडीने दादाला पकडण्याची सूचना केली. पण पावसाळा तोंडावर आल्याने आणि दादाला इंग्रजांनी फिरून आश्रय दिल्याने महादजीने हे कार्य अंगावर घेतले नाही. त्यामुळे नाना - महादजीमध्ये वितुष्ट निर्माण झाले. नानाच्या आज्ञेनुसार महादजी ताबडतोब दादाच्या पाठीवर न गेल्याने इंग्रज - दादा युतीने गुजरातचा घास घेतला. इंग्रजांच्या आक्रमण शक्तीचे यावेळी सर्वांनाच आकलन झालेले नव्हते. महादजी आपल्या लष्करी बळाच्या घमेंडीत होता पण नानाला मात्र हि चिन्हे काही ठीक दिसत नव्हती. दरम्यान निजामाने इंग्रज विरोधात निजाम, हैदर, पेशवे व भोसले असा चौकडीचा संघ उभारण्याची कल्पना नानासमोर मांडली. हि योजना सर्वांच्याच फायद्याची असल्याने नानाने ती उचलून धरली. हि योजना प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आज कित्येक वर्षे हैदर आणि पुणे दरबारचे जे युद्ध चालले होते ते बंद करणे आवश्यक होते. हैदरला नेमके काय हवे आहे याची नानाला कल्पना असल्याने त्याने हैदरला तुंगभद्रा आणि मलप्रभा या नद्यांच्या मधील सर्व प्रदेश देऊन त्यास चौकडीच्या कारस्थानात सहभागी करून घेतले. यामुळे मद्रासच्या इंग्रजांवर हैदरचा शह बसून, आज कित्येक वर्षे हैदरच्या विरोधात लढणाऱ्या मराठी फौजा कर्नाटक आघाडीवरून मोकळ्या होऊन त्यांना इंग्रजांच्या विरोधात वापरण्याची संधी नानास प्राप्त झाली. चौकडीचे हे कारस्थान शिजत असतानाच नाना - महादजी यांचा स. १७७९ च्या अखेरीस बेबनाव दूर होऊन नानाने त्यास जहागीर देऊन राजी केले. तेव्हा कुठे महादजीबावा होळकरांना घेऊन गुजरातमध्ये रवाना झाले !
                      पहिल्या इंग्रज - मराठा युद्धाचा हा उत्तरार्ध होता. आघाडीवर मराठी सरदार लढत होते आणि पुण्यात बसून नाना त्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरवत होता. देशभर युद्धाचा धडाका उडाला असला तरी अजून पुण्यावर शत्रूच्या आक्रमणाची छाया पडली नव्हती. नेमकी हीच बाब हेरून दादाने इंग्रजांच्या मागे ' आपणांस पुण्याला घेऊन जाण्याची ' टोचणी लावली. त्यानुसार इंग्रज सेनानी गॉडर्ड दादाला घेऊन स. १७७९ च्या आरंभी बोरघाट चढून पुण्याच्या दिशेने येऊ लागला. तेव्हा हरिपंत फडके, तुकोजी होळकर, परशुराम पटवर्धन इ. सरदारांनी त्यांस घाटाखाली पिटाळून लावले. गॉडर्डच्या पराभवाने इंग्रजांना मोठाच हादरा बसला. कारण; त्यावेळी मद्रासमध्ये हैदरने इंग्रजांना जवळपास प्रत्येक रणांत खडे चारून प्रांताची धुळदाण उडवली होती. माळव्यात महादजी पाय रोवून उभा होता. येउन जाउन वसई व गुजरातच तेवढे इंग्रजांना मिळाले होते, पण हैदर - मराठ्यांचा असाच जोर वाढत राहिला तर जिंकले तेही गमवावे लागेल अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण होऊन ग. ज. वॉरन हेस्टिंग्सने प्रथम महादजी सोबत स्वतंत्र तह करून माळव्यातील युद्ध आटोपते घेतले आणि त्याच्याच मार्फत पुणे दरबारशी तह घडवून आणला. ( सालबाईचा तह, स. १७८३ )   या तहानुसार पुरंदर तहाच्या नंतर इंग्रज - मराठ्यांनी जे काही एकमेकांचे प्रांत ताब्यात घेतले होते ते सोडण्याचे मान्य केले,पण साष्टी व लगतची तीन बेटे मात्र इंग्रजांनी आपल्याकडे ठेऊन घेण्याची सवलत प्राप्त करून घेतली. दादाला आपणहून पुणे दरबारच्या स्वाधीन करण्याचे इंग्रजांनी टाळले. पेशव्यांनी इतर युरोपियन राष्ट्रांच्या लोकांस आश्रय देऊ नये अशी जाचक अट इंग्रजांनी घातली आणि पाटीलबावांनी ती मान्य देखील केली. गायकवाडांकडील मागील खंडणी बुडाली. त्याशिवाय तहाच्या पूर्ततेसाठी उभयपक्षीयांच्या वतीने महादजी शिंदे जामीन राहिला. सारांश, पहिल्या इंग्रज - मराठा युद्धात वडगावचा तह अपवाद केल्यास पुरंदर वा सालबाईच्या तहात पुणे दरबारचे साफ नुकसान झाल्याचे दिसून येते. मात्र याची सर्व जबाबदारी नानापेक्षा महादजीवर अधिक असल्याचे दिसून येते. महादजीने दिल्लीच्या राजकारणास आणि रोहील्यांच्या बंदोबस्तास वाजवीपेक्षा अधिक महत्त्व देऊन व इंग्रजांचे मन राखून पुणे दरबारचे -- पर्यायाने मराठी राज्याचे बरेच नुकसान घडवून आणले. खुद्द नानाने याबाबतीत त्याची कानउघडणी केली असता थातूरमातूर कारणे सांगून त्याने वेळ मारून नेली. 
                            सालबाईच्या तहानंतर रघुनाथराव पुणे दरबारच्या स्वाधीन झाला. मात्र आपल्या रक्षणासाठी पटवर्धन, होळकर इ. सरदारांशी शपथक्रिया करून घेतली. पुढे लवकरचं म्हणजे ता. ११ डिसेंबर १७८३ रोजी कोपरगावी त्याचे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्याने विधीवत प्रायश्चित्त घेताना नारायणरावाच्या खुनात आपला सहभाग असल्याची कबुली दिली होती. असो, दादाचा अवतार समाप्त झाल्याने नाना आता बिनघोर झाला. शांत चित्ताने त्याने दक्षिणेतील राजकारणाकडे आपले लक्ष केंद्रित केले. महादजीने मोठ्या मिजाशीने पुणे दरबार व इंग्रजांच्या दरम्यान जामीन राहून सालबाईचा तह घडवून आणला. त्या तहातील काही कलमे पुणे दरबारचा मित्र हैदरअली याच्यासाठी जाचक अशी होती. सालबाईचा तह बनत असताना हैदरचा मृत्यू होऊन टिपू सुलतान हा राज्याचा उत्तराधिकारी बनला. सालबाईच्या तहान्वये मराठ्यांनी आपल्या बापाचा विश्वासघात केल्याची त्यास टोचणी लागून राहिली. सध्या तरी म्हैसूर व पुणे दरबारचा तह कायम असल्याने त्याने इंग्रजांशी युद्ध सुरु ठेऊन त्यांचा उच्छेद आरंभला. तेव्हा महादजीच्या मार्फत इंग्रजांनी पुणे दरबारची टिपू विरुद्ध मदत मागितली. त्यावेळी परस्पर टिपूशी तह कोणी करू नये या अटीवर नानाने टिपूच्या विरोधात मराठी फौजा रवाना केल्या. परंतु तत्पूर्वीच मद्रासच्या इंग्रजांनी स. १७८४ च्या मार्चमध्ये टिपूसोबत पुणेकरांना आगाऊ सूचना न देत किंवा आपल्या गव्हर्नर जनरलची परवानगी न घेत परस्पर तह करून पुणे दरबारास तोंडघशी पाडले.  या घटनेने हेस्टिंग्स व महादजी दोघेही अडचणीत सापडले. मद्रासकरांनी गव्हर्नर जनरलच्या परवानगी शिवाय तह केल्याने हिंदुस्थानातील ब्रिटीश कंपनीच्या कारभारात विसंगती असल्याचे दिसून आले. ज्या हेस्टिंग्सने, मुंबईकर इंग्रजांनी वडगावचा तह आपणांस न विचारता केल्याचे कारण सांगून मराठ्यांशी देशभर युद्ध पुकारले होते त्याच हेस्टिंग्सला आता मद्रासकरांच्या या कृत्याचे समर्थन करून पुणेकरांच्या समोर आपली लाज वाचवण्याची धडपड करावी लागली. इंग्रजांच्या या दुटप्पी वर्तनाने नाना इंग्रजांच्या पेक्षाही महादजीवर अधिक संतापला. बिचारा महादजी ! कावेबाजपणात इंग्रज आपणांस भारी असल्याचे त्यास उशिरा का होईना लक्षात आले. परंतु उघडपणे आपली चूक कबूल न करता त्याने गोड बोलून हि वेळ मारून नेली. 
                                   इंग्रजांच्या मदतीसाठी पुणे दरबारने टिपूच्या विरोधात युद्ध पुकारून त्याचे शत्रुत्व ओढवून घेतले होते. तेव्हा आता इंग्रज मदतीस येवो न येवो, टिपूचा बंदोबस्त करण्याचे कार्य हाती घेण्याचे नानाने यावेळी ठरवले होते. यामागे दोन कारणे प्रमुख होती. पहिले कारण म्हणजे, चौकडीच्या कारस्थानात जो मुलुख हैदरला तोडून देण्यात आला होता तो परत मिळवणे आणि दुसरे कारण म्हणजे, टिपूने हिंदूंना बाटवून सक्तीचे धर्मांतर कार्य चालवले होते त्यास आळा घालणे हे होय ! जे कृत्य करण्यास निजामासारखा बलवान सत्ताधीश देखील कचरत होता, ते सक्तीचे धर्मांतराचे कार्य टिपूने मोठ्या धडाक्याने सुरु केले होते. त्याची दखल घेणे नाना फडणीसास भागच होते. मात्र टिपूचा बंदोबस्त करण्याचे कार्य हाती घेण्यापूर्वी त्याने खबरदारी म्हणून निजाम आणि इंग्रजांना राजी राखण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रथम त्याने, कलकत्त्यास पत्र लिहून पुणे दरबारी इंग्रज वकील पाठवण्याची सूचना केली. वस्तुतः, सालबाईच्या तहानुसार महादजीच्या पदरी इंग्रज वकील होता. मात्र यामुळे महादजीचे प्रस्थ अतोनात वाढून व्यवहारात पुणे दरबार दुय्यम ठरून महादजीला महत्त्व येऊ लागले. पुणेकरांना इंग्रजांशी जो व्यवहार करावा लागे त्यात महादजीची मध्यस्थी अपरिहार्य ठरे, तसेच महादजीच्या मार्फत हा व्यवहार उलगडण्यास बराच कालावधीही लागे. हे टाळण्यासाठी नानाने कलकत्त्यास पत्र लिहून पुणे दरबारी स्वतंत्र इंग्रज वकिलाची मागणी केली. नानाच्या मागणीनुसार इंग्रज वकिलाचे पुणे दरबारी आगमन होण्यास स. १७८६ चा मार्च महिना उगवावा लागला. इंग्रजांचा वकील पुणे दरबारी मागवण्याची खटपट केल्यावर नानाने स. १७८४ च्या मध्यावर निजामाची भेट घेऊन टिपूविरोधी मोहिमेत त्यास सहभागी करून घेतले. निजामाला आपल्या सोबत घेण्यामागील नानाचा प्रमुख हेतू म्हणजे टिपूला निजामाची मदत मिळू नये हा होय. टिपूचा बंदोबस्त स्वबळावर करण्यात पुणे दरबार तितकासा समर्थ नसल्याची नानास जाणीव होती. निजामाची उघड मदत घेऊन आपण आपले दौर्बल्य शत्रूस उघड उघड करून दाखवत आहोत हे देखील त्यास समजत होते. परंतु, निव्वळ स्वबुद्धीच्या बळावर त्याने हा साहसी डाव मांडला. याचसोबत नानाने आणखी एक क्रांतिकारी पाउल उचलले व ते म्हणजे आजपर्यंत शिंदे - होळकर यांच्या सत्तास्पर्धेत पेशव्यांनी नेहमी शिंद्यांची पाठराखण केली होती, परंतु सध्याच्या सत्तेच्या चुरशीमध्ये नानाने होळकरास हाताशी धरून शिंद्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आरंभला. नानाने होळकरांना हाताशी धरण्याचे जे धोरण अवलंबिले त्याचे मर्म महादजीच्या लक्षात येण्यास जवळपास ४ - ५ वर्षांचा काळ उलटून जावा लागला. याचे प्रमुख कारण म्हणजे होळकर घराण्यातील अंतर्गत कलह होय !
                                  मालेराव होळकराच्या मृत्यूनंतर मल्हारराव होळकराचा वंश संपुष्टात आला होता. सरदारकीचा सर्व कारभार जरी अहिल्याबाई होळकर करत असली तरी लष्करी जबाबदारी पेलण्यास तिला मर्यादा असल्याने मल्हारराव होळकराच्या हाताखाली वाढलेला सरदार तुकोजी होळकरवर तिने लष्करी जबाबदारी सोपवली. मात्र, असे करताना सर्व मुख्य सूत्रे बाईंनी आपल्याच हाती राखून ठेवण्याची दक्षता तेवढी घेतली होती. लौकिकात जरी तुकोजी स्वतःस मल्हाररावाचा पुत्र म्हणवत असला तरी त्याचा रीतसर दत्तकविधी असा झालाच नव्हता. होळकरांची सरदारकी तुकोजीस प्राप्त झाल्यावर काही काळातचं त्याचे अहिल्याबाईशी वितुष्ट येऊ लागले. यामागील मुख्य कारण म्हणजे होळकरांच्या खजिन्यावर कोणाची मालकी असावी हे होय ! नारायणराव पेशव्याच्या खुनानंतर जवळपास १० वर्षे सर्वच मराठी सरदारांना प्रमाणाबाहेर फौजा बाळगाव्या लागल्या होत्या. तुकोजीही यास अपवाद नव्हता. पण, होळकरांच्या पद्धतीनुसार दिवाणी कारभार अहिल्याबाईच्या ताब्यात असल्याने पैशांसाठी त्यास बाईंकडे वारंवार याचना करावी लागे. तुकोजीने पैशांची मागणी केली कि बाई त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असे. याचे कारण असे की, मुलूखगिरीवर फौजेचा खर्च परस्पर बाहेर  भागवावा असे तिचे मत होते. त्याशिवाय तुकोजी हा पैशांची निरर्थक उधळपट्टी करतो अशी तिची समजूत होती. याचा परिणाम म्हणजे, होळकरांचे लष्कर कोणतीही मोहीम पार पाडण्यास हळूहळू असमर्थ बनू लागले. कारण, पुणे दरबारने तुकोजीवर मोहीम सोपवावी आणि त्याने ती पार पाडण्याचा प्रयत्न करावा तर त्याचे सैन्य पगारासाठी धरणे धरून त्यास पुढे जाऊ देत नसे. याचा परिणाम म्हणजे महादजी शिंद्याचे प्रस्थ वाढत जाउन तुकोजी होळकर मागे पडू लागला. तुकोजी - अहिल्याबाईच्या वादात महादजीने अहिल्याबाईचा पक्ष घेतला तर नानाने तुकोजीचा !   
                     महादजीने अहिल्याबाईची बाजू घेण्यामागे काही कारणे निश्चित होती. मल्हारराव होळकराने व अहिल्याबाईने पानिपतनंतर महादजीला बऱ्यापैकी मदत केली होती. तसेच मरतेसमयी मल्हाररावाने महादजीकडून, प्रसंगी मालेराव व अहिल्याबाई यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे संरक्षण करण्याची शपथ देखील घेतली होती. त्यास अनुसरून तुकोजी - अहिल्याबाई वादात महादजीने अहिल्याबाईचा पुरस्कार केला. त्याउलट नानाने बाजू होती. दक्षिणेत त्याचे भरवशाचे सरदार फडके, पटवर्धन इ. असले तरी महादजीच्या तोडीचा म्हणून नानाने तुकोजीला जवळ केले होते. लष्करी कामगिरीत तुकोजी नालायक असल्याचा जो गवगवा  काही मान्यवर इतिहासकारांनी केला आहे तो साफ चुकीचा असून याच तुकोजीने प्रसिद्ध अटक स्वारीत मोठा पराक्रम गाजवला होता. इतकेच नव्हे तर शिंद्यांच्या वतीने साबाजी शिंदे आणि होळकरांच्या वतीने तुकोजी हे दोघेही सुमारे वर्षभर सरहिंद ते अटक पर्यंतच्या प्रांतात तळ ठोकून राहिले होते. कित्येक प्रसंगी त्यांनी सिंधूपार गिलचे, गक्कर यांचे बंड मोडून काढल्याचे इतिहासात नमूद आहे. त्याशिवाय नुकत्याच झालेल्या पहिल्या इंग्रज - मराठा युद्धात गॉडर्डला बोरघाटात रोखण्याचे श्रेय देखील तुकोजीकडे जाते. अशा पराक्रमी तुकोजीला हाताशी धरून नाना महादजीला शह देऊ पाहत होता. दिवाणी कारभार अहिल्याबाईकडे असल्याने तिच्याकडून तुकोजीला वेळेवर आर्थिक पुरवठा व्हावा अशी नानाची अपेक्षा होती पण, या बाबतीत अहिल्याबाई मुद्दाम दिरंगाई करत असल्याने नानाने महादजीला कळवले कि, खासगी खर्चापुरते बाईंना महाल तोडून देऊन बाकीचे सर्व महाल तुकोजीच्या हवाली करण्यासाठी अहिल्याबाईंचे मन वळवा ! या गोष्टीला महादजीने ठाम नकार तर दिलाच पण अहिल्याबाईने देखील नानाच्या वकिलास सुनावले की, " मी सुभेदारांची सून आहे. केवळ तुकोजीबावाच दौलतीचे धनी आणि मी कोणी नाही, असे समजू नका. तुकोजीबावा माझे हातचे कामास लावलेले आहेत. निमकहरामीचे फंद केल्यास आणि दौलत करू म्हटल्यास त्या गोष्टी दुरापास्त आहेत. त्यांस पाटीलबावांस दम असेल तर उभयतांनी फौज सुद्धां मजवर चालून यावे, श्रीमार्तंड समर्थ आहे. "    या प्रसंगामधून अहिल्याबाईच्या मनात होळकर घराण्याविषयी असलेला अभिमान व आत्मविश्वास जसा दिसून येतो, त्याचप्रमाणे तिच्या बाणेदार, लढवय्या आणि करारी स्वभावाचे दर्शन घडून येते. वकिलाने बाईंचे हे शब्द नानास कळवले, तेव्हा प्रसंगी बाई पुणे दरबार विरोधात शस्त्र देखील उपसण्यास मागे - पुढे पाहणार नाही याबाबत त्याची खात्री पटली. इतउत्तर अहिल्याबाईस अधिक न दुखवता त्याने तुकोजीला बगलेत मारले. पण त्या तंट्यात महादजीने स्वीकारलेल्या भूमिकेमुळे तुकोजी आणि त्याच्या पुत्रांच्या मनात शिंद्यांच्या विरोधी चांगलीच अढी निर्माण झाली. 
                                   स. १७८४ मध्ये राजकीय आघाडीवर नाना आपले जाळे विणत असताना टिपूने त्यास एक जबरदस्त हादरा देऊन आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखवली. निजाम - पुणे दरबार यांच्या गुप्त मैत्री कराराची कुणकुण टिपूला लागली होती. तेव्हा त्याने पुणे दरबारी तहाची वाटाघाट करण्यासाठी आपला वकील पाठवला आणि स. १७८५ च्या आरंभी नरगुंद संस्थानास वेढा घातला. नरगुंदचे संस्थान मुळात पेशव्यांचे मांडलिक असून चौकडीच्या कारस्थानात नानाने ते हैदरअलीस दिले होते. परंतु, तेथील संस्थानिक भावे, हे पटवर्धनांचे आप्त असल्याने त्यांनी अनेकदा हैदर व टिपूची ताबेदारी झुगारून देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना धडा शिकवण्यासाठी टिपूने डाव टाकला आणि दुर्दैवाने  नाना व नरगुंदकर त्यात फशी पडले. टिपूचा वकील पुणे दरबारी तहाची बोलणी करत असताना टिपूच्या फौजांनी नरगुंद ताब्यात घेतले. त्यावेळी परशुराम पटवर्धन जवळच होता आणि त्याने नरगुंदच्या बचावासाठी जाण्याविषयी नानाकडे परवानगी देखील मागितली. परंतु, टिपूच्या वकिलाशी बोलण्यात गुंग झालेल्या नानाने परशुरामभाऊच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि शत्रू चालून आला तरच त्याचा प्रतिकार करण्याची सूचना केली. परंतु, भाऊने नरगुंदच्या बचावास जाऊ नये अशी साफ आज्ञा दिली. त्याच्या मते आपली व निजामाची तयारी झाल्यावर मग टिपूवर मोहीम काढण्याचे आधीच निश्चित झाले होते. नरगुंद प्रकरणी हस्तक्षेप केला असता अपुऱ्या तयारीनिशी टिपूसोबत युद्ध करून पदरी फक्त पराभवचं पडणार होता. त्यामुळे त्याने पटवर्धनांना अडवून धरले. परिणामी, नरगुंद संस्थान टिपूच्या ताब्यात गेले. तेथे त्याने आपले नेहमीचे अत्याचार केले आणि लगोलग कित्तूरवर त्याचे मोर्चे बसले. नरगुंदप्रमाणेच कित्तूरकर देखील पेशव्यांचे मांडलिक होते, पण मराठी फौजांच्या देखत टिपूने नरगुंद घेतल्याचे पाहून कित्तूरने शरणागती पत्करली. मात्र, कित्तूरमध्येही टिपूने नरगुंदच्या अत्याचारांची पुनरावृत्ती केली. परशुरामभाऊस या सर्व प्रकरणाचा इतका उबग आला कि, टिपूवरील पुढे निजाम - पेशव्यांच्या संयुक्त स्वारीत त्याने बिलकुल सहभाग घेतला नाही. स्वबळावर नरगुंद व कित्तूरचा बचाव करण्यास तो समर्थ होता पण नानाने त्यास परवानगी न दिल्याने तो मनातून नाराज झाला. नरगुंद व कित्तूरच्या उदाहरणांनी नानाचे डोळे उघडले.  त्याने टिपूवरील स्वारीची तयारी जोरात चालवली पण सर्व सरदारांची मर्जी राखण्याच्या उद्योगात मराठी फौजा म्हैसूरच्या दिशेने रवाना होण्यास स. १७८६ चा उन्हाळा उगवला. प्रसंगी माघार घेण्याची वेळ  ओढवू नये यासाठी नानाने नागपूरकर भोसल्यांनाही आपल्या मदतीस घेतले. अखेर स. १७८६ च्या एप्रिलमध्ये नानाच्या नेतृत्वाखाली निजाम - पेशव्यांची संयुक्त सेना टिपूवर चालून गेली. खुद्द नानाने यावेळी सैन्याचे नेतृत्व करून बदामीचा किल्ला २० दिवसांत जिंकला. याप्रसंगी मराठी सैन्याची बरीच हानी झाली पण २० दिवसांत बदामीसारखे मजबूत स्थळ हाती आल्याने सरदारांचा आत्मविश्वास बराच दुणावला. बदामीचा किल्ला ताब्यात येताच नानाने हरीपंतास सैन्याचे नेतृत्व सोपवून पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. नाना जाणार म्हटल्यावर मुधोजी भोसल्यानेही प्रकरणातून अंग काढून घेतले आणि बिचाऱ्या हरीपंतावर होळकर, भोसले, निजाम व पेशवे यांच्या विस्कळीत संयुक्त फौजेकडून टिपूच्या सुसज्ज व एकसंध सैन्याचा मुकाबला करण्याचा प्रसंग ओढवला !  बदामीनंतर निजाम - पेशव्यांची टिपूवरील मोहीम रेंगाळत चालली. चार दोन प्रसंगांचा अपवाद केल्यास टिपूने ठिकठीकाणी मराठी फौजांचा चांगलाच समाचार घेतला आणि स. १७८७ मध्ये आपणहून त्याने पेशव्यांशी तह करून युद्ध थांबवले. या मोहिमेने पेशव्यांचे वा निजामाचे कसलेही हित साध्य झाले नाही. त्याउलट टिपूच्या फौजांची या स्वारीत जी हानी झाली त्याचा फायदा इंग्रजांना मात्र भरपूर मिळाला. 
                           कर्नाटकात मराठी फौजा टिपूसोबत लढत असताना याचवेळी उत्तरेत महादजी शिंदेने मोगल बादशहाकडून पेशव्यांच्या नावे बादशाही कारभारातील सर्वश्रेष्ठ असे वकील - इ - मुतलकीचे पद स्वीकारून राजपुतांवर स्वारी करून लालसोट येथे राजपूत - मोगलांकडून सपाटून मार खाला होता. लालसोटच्या पराभवाने महादजीला डीगपर्यंत माघार घ्यावी लागली. तेव्हा टिपूवरील स्वारी संपताच स. १७८७ च्या पावसाळयानंतर नानाने पहिल्या बाजीराव पेशव्याचा नातू व समशेरबहाद्दरचा पुत्र अलीबहाद्दार आणि तुकोजी होळकर यांना महादजीच्या मदतीस तातडीने पाठवले. परंतु, महादजीविषयीच्या असूयेने आणि फौजेच्या देण्याने उत्तरेत पोहोचण्यास तुकोजीला स. १७८८ चालाचा उत्तरार्ध उजडावा लागला. महादजीच्या मदतीस जाण्यास तुकोजीने दिरंगाई केल्यामुळे अलीबहाद्दारने देखील महादजीच्या सहाय्यास जाण्यासाठी विशेष उत्सुकता दाखवली नाही. अर्थात, तुकोजी - अलीबहाद्दारच्या या वर्तनास थोडीफार नानाची देखील फूस होतीच ! महादजीचे उत्तरेत प्रस्थ वाढणे नानाला खपण्यासारखे नव्हते. त्याने तुकोजीच्या मार्फत राजपुतांशी स्वतंत्रपणे व्यवहार करण्यास आरंभ केला. बऱ्याच इतिहासकारांनी याबाबतीत नानास सडकून दोष दिला आहे. परंतु, वस्तुस्थिती पाहता नानासमोर याखेरीज दुसरा पर्याय नसल्याचे दिसून येते. 
                               स. १७८४ अखेर महादजीने पेशव्याचे नावे ' वकील - इ - मुतलकी ' व मीरबक्षीचे पद मोगल बादशहाकडून मिळवले होते. पैकी वकील - इ - मुतलकी म्हणजे बादशहा खालोखाल ज्याचा अधिकार समजला जातो अशा पदाची सत्ता या वेळी पेशव्यांना प्राप्त झाली. परंतु पेशवे यावेळी दूर दक्षिणेत असल्याने पेशव्यांची नायाबी बादशहाने महादजीला दिली. याचा परिणाम म्हणजे उत्तरेतील किंवा समग्र हिंदुस्थानातील सत्ताधीशांशी शिंद्यांचा दुहेरी संबंध जुळला. एक, पेशव्यांचा सरदार म्हणून आणि दुसरा, मोगल बादशहाचा प्रतिनिधी म्हणून ! एकप्रकारे एकाचवेळी दोन धन्यांची चाकरी करण्याची जबाबदारी महादजीने गळ्यात बांधून घेतली. अर्थात, यामागे स्वतःचे महत्त्व आणि सामर्थ्य वाढवण्याचा त्याचा उद्देश असल्याने त्याने त्यादृष्टीने प्रयत्न करण्यास आरंभ केला व राजपूत - मोगलांकडून लालसोटवर मार खाल्ला ! पेशवे व दिल्ली दरबारची चाकरी करण्यामागील शिंदेच्या हेतूंची नानास कल्पना असल्याने त्याने पेशव्यांच्या हितास प्राधान्य देऊन तुकोजी मार्फत राजपुतांची प्रकरणे निकाली काढण्यास सुरवात केली. परंतु, आर्थिक दैन्यामुळे तुकोजीकडून अपेक्षित कार्यभाग साधला न गेल्याने उत्तरेच्या राजकारणातून नानाने आपले मन व लक्ष काढून घेतले. मात्र, अलीबहाद्दारला त्याने बाजीराव पेशव्याच्या खासगी जहागिरीचा बंदोबस्त करण्याच्या कामी बुंदेलखंडात जाण्याची आज्ञा पाठवली. दिल्ली दरबारातील महादजीच्या वाढत्या वजनाचा धार्मिक क्षेत्रात फायदा उचलण्याचा नानाने वारंवार प्रयत्न केला. मथुरा, काशी, प्रयाग, अयोध्या इ. हिंदूंची तीर्थक्षेत्रे मुसलमानांच्या हातातून सोडवण्यासाठी महादजीने खटपट करावी तसेच काशीविश्वेश्वराचे मंदिर पाडून औरंगजेबाने तेथे मशीद उभारली होती. तेव्हा तिथे मशीद पाडून त्या ठिकाणी पूर्ववत मंदिर बांधावे अशी नानाने महादजीस सारखी टोचणी लावली. पैकी, मथुरा - वृंदावन तेवढे मोकळे करण्यात महादजीला यश आले. काशीचा प्रश्न राजकीय असल्याने त्याने नानाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. मात्र, स. १७८९ मध्ये महादजीने मोगल बादशहास सबंध हिंदुस्थानात गोवध मनाईचे फर्मान काढण्यास भाग पाडून एक मोठीच कामगिरी बजावली !
                                                                          ( क्रमशः )  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: