शनिवार, ६ जुलै, २०१३

श्रीमंत रघुनाथराव पेशवे ( भाग - ४ )

दादाची इंग्रजांकडे भरारी :-  दादा - पुणे दरबारमधील तंटा निकाली निघणार हे समजल्यावर पुण्यातील इंग्रज वकील मॉस्टीनच्या पोटात दुखू लागले व तो ताबडतोब मुंबईला गेला. तेथून त्याने साष्टीवर हल्ला करण्याची योजना बनवून मुंबईकरांच्या गळी उतरवली आणि डिसेंबरच्या पूर्वार्धात मुंबईची इंग्लिश फौज साष्टी / ठाण्याचा किल्ला जिंकून घेण्यासाठी रवाना झाली. हि बातमी नर्मदेच्या दिशेने निघालेल्या कारभाऱ्यांना रस्त्यात समजली तेव्हा ते चिंतीत झाले. ब्रिटिशांचे अशा अडचणीच्या वेळी आक्रमण होईल याची अटकळ त्यांनी बांधली नव्हती. मात्र यामुळे भयभीत न होता त्यांनी ठाण्याच्या किल्ल्याला कुमक पाठवण्याची तजवीज केली. परंतु, इंग्रजांचे आक्रमण यावेळी पुणे दरबारास अजिबात उमगले नाही असेच म्हणावे लागेल. वस्तुतः नारायणराव पेशव्याच्या खुनापासून इंग्रज - दादाची दोस्ती सुरु झाली होती. हरीपंतास चुकवण्यासाठी जरी दादा माळव्यात गेला असला तरी त्याचे मन वारंवार गुजरातकडे ओढ घेत होते. त्या ठिकाणी त्याचे पक्षपाती गायकवाड तर होतेच पण सोबतीला इंग्रज देखील होते ! या दोघांकडे त्याची माळवा मुक्कामापासूनच सूत्रे जुळली होती. स. १७७४ च्या सप्टेंबर मध्ये दादाने सुरतच्या इंग्रजांशी अंतस्थ तह केला होता. त्यानुसार इंग्रजांच्या लष्करी मदतीच्या बदल्यात दादाने त्यांना १५ ते २० लक्ष रुपये द्यायचे असून त्याशिवाय वर दक्षिणा म्हणून भडोच व सुरत परगण्यामधील पेशव्यांच्या अंमलाखालील प्रदेश ; तसेच साष्टी, वसई वगैरे बेटे इंग्रजांना द्यायची होती. या तहन्वाये इंग्रजांना जो प्रदेश मिळेल तो परत कधीही त्यांच्याकडून मागू नये. पैकी साष्टी आणि वसई इंग्रजांना देण्यास दादा  कबूल झाला नाही. बाकी तहातील कलमे त्यास मान्य होती. वसई, साष्टी बद्दल दादाची मते / भावना काहीही असो, हा प्रदेश इंग्रजांना हवाच होता आणि एकप्रकारे दादाला सहाय्य करण्यासाठीच कि काय, इंग्रजांनी साष्टीवर हल्ला चढवला. साष्टीवरील इंग्रजी आक्रमणाचा आणि दादाचा काही संबंध असू शकतो याची पुणे दरबारला अजिबात कल्पना नव्हती. परंतु, नर्मदेच्या जवळ आल्यावर दादा आपल्या परिवारास सोबत घेऊन परत उलटा माळव्यात शिरला आणि गर्भवती आनंदीबाईला धारच्या किल्ल्यात ठेवून तो गोधरा - पावागडमार्गे गायकवाडांकडे निघून गेला. तेव्हा कुठे कारभाऱ्यांना इंग्रज - दादा यांच्या युतीची कल्पना आली. तोपर्यंत स. १७७५ चा निम्मा जानेवारी महिना उलटून गेला. दरम्यान सर्व कट - कारस्थानांची कारभाऱ्यांना पूर्णतः उमज पडली. शिंदे - होळकरांनी मुद्दाम दादाला जाऊ दिल्याचे त्यांच्या लक्षात आले. सरदारांच्या या आत्मघातकी धोरणामुळे दादाचा ताबा मिळवण्यासाठी आता इंग्रजांशी लढणे भाग असल्याचे त्यांनी ताडले.   इंग्रजांच्या राजकारणाला शह म्हणून बापू - नानाने निजामाची भेट घेऊन त्यास पुरंदरवर बाल पेशव्याच्या भेटीस नेले. पुणे दरबारची अंतर्गत स्थिती निजामापासून लपलेली नव्हती. त्याने याप्रसंगी आपल्या मदतीचा मोबदला म्हणून दौलताबादचा किल्ला व अठरा लक्षांचा मुलुख परत मागितला आणि कारभाऱ्यांना त्याची हि मागणी मान्य करावी लागली. खरेतर निजामाची मर्जी राखण्यासाठी कारभाऱ्यांना हा उपद्व्याप करावा लागला नसता. जर सर्व सरदार सवाई माधवराव पेशव्याशीच एकनिष्ठ असते तर ! परंतु, वस्तुस्थिती अशी नसल्याने कारभाऱ्यांना निजामाचे पाय धरणे भाग पडले. वास्तविक निजामाची पुणे दरबारास प्रत्यक्ष अशी कसलीच मदत झाली नाही, पण इंग्रज - मराठा युद्धाच्या वेळी तटस्थ राहून त्याने एकप्रकारे पुणे दरबारावर मोठी मेहेरबानीच केली ! 

        पहिल्या मराठा - इंग्रज युद्धास आरंभ :- दादाची स्वारी गुजरातमध्ये आली तेव्हा फत्तेसिंग व गोविंदराव या गायकवाड बंधूंमध्ये सरदारकी मिळवण्यासाठी भांडणे लागली होती. पैकी फत्तेसिंगास पुणे दरबारचा पाठिंबा असून गोविंदरावास दादाचे समर्थन होते. धोडप प्रसंगी गायकवाडांची फौज याच गोविंदरावाच्या नेतृत्वाखाली दादाच्या मदतीस आली होती. असो, दादा गुजरातमध्ये आला तेव्हा नुकताच गायकवाड बंधूंचा आपसांत संग्राम होऊन गोविंदरावाचा पराभव होऊन गायकवाडीची सर्व सूत्रे फत्तेसिंगाच्या हाती आली होती. त्यामुळे गायकवाडांचा पाठिंबा मिळवण्याचे दादाचे स्वप्न भंग पावले. इकडे हरिपंत दादाचा पाठलाग करत मही नदीजवळ आला. याच ठिकाणी दादा - हरीपंताचा सुमारे एक महिनाभर मुक्काम पडून तहाच्या वाटाघाटी घडून आल्या. वस्तुतः दादा आणि कारभारी मंडळ यांच्यात तह घडून येणे दुरापास्त होते पण, लढाईसाठी अनुकूल मुहूर्त नाही या सबबीवर हरीपंताने जवळपास एक महिना तहाचे रहाटगाडगे ओढण्यात वाया घालवला. शेवटी ता. १७ फेब्रुवारी १७७५ रोजी फडक्यास लढाईसाठी शुभ मुहूर्त मिळून त्याने आनंदमोगरी येथे दादाच्या सैन्यावर हल्ला चढवला. विशेष म्हणजे दादाच्या बाजूने गोविंद तर हरीपंताच्या बाजूने फत्तेसिंग, असे दोन्ही गायकवाड बंधू मोठ्या त्वेषाने लढले. या युद्धांत दादाच्या सैन्याचा साफ पराभव होऊन त्याची सर्व फौज लुटली गेली. रातोरात दादाने रणभूमीवरून पलायन करून खंबायतचा रस्ता धरला. लढाईनंतर रात्रीचाच दादा पळून गेल्याने तो कुठे गेला असेल या विचाराने त्याचे शत्रू आणि अनुयायी दोघेही गोंधळात पडले. इकडे खंबायतच्या नवाबाने दादाला आश्रय देण्याचे साफ नाकारल्याने तो तेथील स्थानिक इंग्लिश वखारीत गेला. त्यावेळी इंग्रज वकील मालीट याची गाठ पडून मालीटने त्यास समुद्रमार्गे सुरतला पाठवून दिले.  ता. २३ फेब्रुवारी रोजी दादा सुरतेस दाखल झाल्याचे समजताच त्याचे अनुयायी तिकडे गेले. 
                    सप्टेंबर महिन्यात दादासोबत केलेली वाटाघाट व तह याच सुमारास मुंबईकर इंग्रजांनी आचरणात आणून मुंबईची फौज कर्नल कीटिंगच्या नेतृत्वाखाली सुरतेस रवाना केली. फेब्रुवारी अखेर हि सेना सुरतला पोहोचली. त्यावेळी दि. ६ मार्च १७७५ रोजी दादा आणि कीटिंग यांच्यात एक तह घडून आला. त्यानुसार इंग्रजांनी दादाच्या मदतीस अडीच हजार फौज देण्याचे मान्य केले. त्या बदल्यात दादाने पुढील अटी मान्य केल्या :- (१) इंग्रजांना वसई, साष्टी आणि मुंबईजवळची लहान बेटे तसेच जंबूसर व ओलपाड हे तालुके कायमचे द्यावेत. अंकलेश्वर परगण्याबद्दल ७५००० रु. सालीना द्यावेत. (२) लष्कराच्या खर्चासाठी दरमहा दीड लक्ष रूपये द्यावेत. दादाकडे रोख रक्कम नसल्याने त्याने आपल्याकडील दागिने याप्रसंगी इंग्रजांकडे गहाण ठेवले. (३) बंगाल व कर्नाटक येथील इंग्रजी मुलखात दादाने चौथाई वसूल करू नये. (४) एकमेकांच्या शत्रूंना मदत करू नये इ.  हा तह घडून आल्यावर कीटिंग आणि दादा दोघे मिळून इंग्रजांवर चालून गेले. 
              दादा इंग्रजांच्या ताब्यात जाउन आता तो इंग्लिश सैन्यासह फडक्यावर चालून येत असल्याचे समजताच कारभारी वैतागून गेले. शिंदे - होळकरांनी मध्यस्थीच्या नावाखाली फुकट मसलत लांबवली आणि आता इंग्रजांसोबत लढण्याचा प्रसंग आणवून त्यांनी मराठी राज्य संकटात लोटले अशीच कारभाऱ्यांची भावना बनली. याबद्दल त्यांनी थोड्या कडक भाषेत शिंदे - होळकरांना पत्र लिहिताच दोघेही फडक्याला वाऱ्यावर सोडून माळव्यात निघून गेले. इकडे २८ मे रोजी आरास येथे फडके आणि इंग्रजांची गाठ पडून एक मोठी अनिर्णीत लढाई घडून आली. आरासची लढाई निकाली न निघाल्याने व पावसाळयास आरंभ झाल्यामुळे इंग्रजांनी भडोचला छावणी ठोकली. यावेळी दादा पूर्णतः त्यांचा राजकीय कैदी बनून गेला होता. स. १७७५ च्या पावसाळ्यात इंग्रज - मराठा राजकारणाने अनेक रंग बदलले. मुंबईच्या इंग्रजांनी दादासोबत केलेला तह बाजूला ठेऊन पुणे दरबारसोबत समेट करण्याच्या दृष्टीने पावले उचलली तर पुणेकरांनी कलकत्त्यास वकील पाठवून इंग्रजी आक्रमण विरुद्ध दाद मागितली. दरम्यान आघाडीवरील प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात आल्याने हरीपंताने नाना फडणीसाला स्पष्टपणे सांगितले की, ' इंग्रजांशी मिळते - जुळते तरी घ्या किंवा फ्रेंचांसोबत तह करून त्यांची मदत घ्या. तरचं इंग्रजांचा नक्षा उतरेल. हे जमले नाही तर साष्टी प्रांतवरील इंग्रजांचा अधिकार मान्य करून ताबडतोब दादाला आपल्या ताब्यात घ्या.' यांपैकी कोणतीही सूचना अंमलात आणण्याची कारभाऱ्यांची इच्छा नव्हती आणि शक्तीही ! 
     
             पुरंदरचा तह :- स. १७७५ चा पावसाळा लष्करी हालचालींच्या दृष्टीने थंड गेला असला तरी राजकीय आघाडीवर मात्र अजिबात शांतता नव्हती. गुजरातमधील इंग्रजी फौजेने पावसाळ्याचा फायदा घेऊन फत्तेसिंग गायकवाडास केवळ लष्करी दबावाच्या बळावर आपल्या पक्षात मिळवून घेतले. यामुळे पुणे दरबारात चिंतेचे वातावारण पसरले. ठाणे गेले, गुजरात गेली, दादा तर इंग्रजांच्या लगामी लागलेला आणि दौलतीचे आधारस्तंभ असलेले शिंदे - होळकर दुरून तमाशा पाहात आहेत. अशा स्थितीत राज्य रक्षण करावे तरी कसे, हाच प्रश्न कारभाऱ्यांच्या समोर उभा होता. परंतु, याच वेळी राजकारणाने अकल्पित अशी पलटी मारून पुणे दरबारास आपली बाजू सावरण्यास भरपूर अवधी प्राप्त झाला. स. १७७३ मध्ये ब्रिटीश पार्लमेंटने मंजूर केलेल्या रेग्युलेशन ठरावामुळे कलकत्त्याच्या गव्हर्नरला हिंदुस्थानातील मुख्य गव्हर्नर जनरलचे पद मिळून मद्रास, मुंबई, सुरत येथील इंग्रज वसाहतींवर त्याचे नियंत्रण प्रस्थापित झाले. या ठरावाची बातमी स. १७७४ च्या ऑक्टोबरमध्ये हिंदुस्थानात आली होती, पण मुंबईकरांनी हा ठराव बाजूला ठेऊन कलकत्त्याच्या गव्हर्नरच्या परवानगीशिवाय पुणे दरबार विरुद्ध युद्ध पुकारले. यावेळी कलकत्त्याचा आणि हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींग्स हा होता. त्याला मुंबईकरांची हि शिरोजोरी बिलकुल न खपून त्याने मुंबईकरांना मराठ्यांसोबत चालवलेलं युद्ध ताबडतोब आटोपते घेण्याची आज्ञा केली. त्यानंतर त्यांनी रघुनाथरावासोबत केलेला सुरतेचा तह देखील हेस्टींग्सने आपल्या अधिकारात रद्द करून स. १७७५ च्या जुलैमध्ये अप्टन यास आपल्यातर्फे वकील म्हणून पुरंदरास पाठवले. मुंबईकरांना हेस्टींग्सचा हा उपद्व्याप बिलकुल पसंत पडला नाही पण वरिष्ठांच्या हुकुमाविरुद्ध वागण्याची त्यांची हिंमत झाली नाही. हेस्टींग्सने दादाला पत्र लिहून त्यास आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या अप्टनला कळवण्याची सूचना केली.    इंग्रज पुणे दरबार सोबत तह करणार या बातमीने दादा पुरता अस्वस्थ झाला. त्याने हेस्टींग्सला पत्रांवर पत्रे पाठवून त्यास हैराण केले पण त्याचा काहीही परिणाम न होता पुरंदरावर बरीच प्रदीर्घ चर्चा होऊन दि. १ मार्च १७७६ रोजी इंग्रज - मराठ्यांचा तह घडून आला. या तहानुसार (१) इंग्रजांना ठाण्याचा किल्ला मिळाला. (२) दादावर केलेल्या खर्चाबद्दल १२ लक्ष रुपये इंग्रजांना देण्याचे कारभाऱ्यांनी मान्य केले. (३) दादाला दरसाल ३ लक्ष १५ हजारांची नेमणूक देण्याचे पुणे दरबारने मान्य केले. त्याबदल्यात दादाने राज्यात दंगा / फितूर न करता स्वस्थपणे स्नान - संध्या करत राहावे अशी पुणेकरांची इच्छा होती. तसेच नारायणरावच्या खुनातील जे प्रमुख आरोपी अद्याप दादाने सोबत बाळगले होते, त्यांना आपल्या चाकरीतून रजा द्यावी. (४) इंग्रजांनी दादास मदत करू नये. (५) फत्तेसिंगाने इंग्रजांना गुजरातमध्ये जो ५ लक्ष उत्पन्नाचा मुलुख दिला आहे तो इंग्रजांकडे कायम राहावा. त्याबदल्यात इंग्रजांनी गोविंदरावाच्या विरोधात फत्तेसिंगास मदत करण्याचे मान्य केले. (९) गुजरातमधील पेशवे आणि गायकवाडांची जी काही ठाणी इंग्रजांनी घेतली होती ती मोकळी करावीत.     पुरंदर तहातील या प्रमुख अटी काळजीपूर्वक वाचल्या असता असे दिसून येते कि, पुरंदरच्या तहाने पुणे दरबाराचा किंवा दादाचा  प्रत्यक्षात असा कसलाही फायदा झाला नाही. या तहाचा जो काही फायदा मिळाला तो फक्त इंग्रजांना ! साष्टी, गुजरात मध्ये इंग्रजांचा प्रादेशिक लाभ तर झालाचं पण दादाला मदत न करण्याची अट मान्य करताना सुद्धा त्याचा पेशवाईवर कसलाही अधिकार नाही अशी कबुली त्यांनी दिलेली नसल्याने,  पुढे - मागे केव्हाही दादाला पेशवेपदाच्या प्राप्तीसाठी मदत करण्यास ते मोकळे राहिले. सारांश, पुरंदरचा तह हा, पुणे दरबारासाठी अतिशय जाचक तर इंग्रजांसाठी थोडाफार फायद्याचा होता आणि ज्याच्यासाठी देशभर युद्धाचा वन्हि पेटण्याचा प्रसंग ओढवला होता, त्या दादाचा मात्र या तहाने कसलाही फायदा झाला नव्हता. 
                    खुद्द वॉरन हेस्टींग्सला देखील हा तह फारसा पसंत पडला नाही. पण नाइलाजाने का होईना त्यास या तहाचे काही काळ तरी पालन करणे भाग होते. मुंबईकरांनी तर हा तह सरळसरळ धुडकावून लावला. दादाला त्यांनी पुणेकरांच्या हवाली केले नाही. पुरंदरचा तह घडून आल्यावर दादा सुरत सोडून दमणला गेला. तेथे पोर्तुगीजांनी त्यास काही काळ आश्रय दिला पण हि गोष्ट पुणे दरबारास समजताच त्यांनी पोर्तुगीजांना तंबी दिल्यामुळे त्यांनी दादास बाहेर जाण्याची विनंती केली. त्यामुळे दादास बाहेर पडावे लागून त्याने मग आपला तळ तारपुरास ठोकला. पण त्या ठिकाणी त्याला पकडण्यासाठी मराठी फौजा धावून आल्यामुळे दादा इंग्रजांच्या मदतीने जलमार्गे ता. ११ नोव्हेंबर १७७६ रोजी मुंबईला पोहोचला. इकडे दादाचा बंदोबस्त करण्याच्या नादात कारभाऱ्यांचे आनंदीबाईकडे अजिबात दुर्लक्ष झाले नव्हते. आनंदीबाई धारच्या किल्ल्यात मोठ्या बंदोबस्ताने राहात होती. कारभाऱ्यांच्या सरदारांनी स. १७७६ च्या जुलैमध्ये त्या किल्ल्यास वेढा घातला. आनंदीने नोव्हेंबरपर्यंत किल्ला लढवला व शेवटी किल्ल्यातील सामान सरल्यामुळे तिने शरणागती पत्करली. धारेवर कारभाऱ्यांचे मोर्चे बसल्याचे समजताच दादाचा जीव तळमळला. त्याने या संदर्भात महादजीला पत्र लिहून मध्यस्थी करण्याची विनंती केली. पुढे आनंदीबाईने शरणागती पत्करल्यावर स. १७७९ पर्यंत तिचे वास्तव्य अहिल्याबाई होळकरजवळ झाले. त्यानंतर तिला दादाकडे पाठवण्यात आले. असो, मुंबईला आल्यावर देखील दादा स्वस्थ बसला नव्हता. त्याने मुंबईमध्ये तोफा ओतण्याचा कारखाना काढला. त्याखेरीज वरळी येथे स्वतःच्या निवासासाठी वाडा बांधण्यास आरंभ केला. 
              पुरंदरचा तह खरे पाहता पुणेकर, दादा व इंग्रज यांपैकी कोणालाही मान्य नव्हता. पण वेळ अनुकूल नसल्याने सर्वांनी निमुटपणे त्यास मान्यता दर्शवली होती. वास्तविक, या तहाची जेव्हा वाटाघाट चालू होती त्यावेळी सदाशिवरावाच्या तोतयाने स. १७७६ च्या फेब्रुवारीत पुणे दरबार विरुद्ध बंड पुकारल्याने कारभारी गडबडून गेले. पानिपतावर सदाशिवराव मारला गेल्याची दादाला खात्री झाली होती पण त्यानेही निव्वळ कारभाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी तोतयाचा पक्ष उचलून धरला. त्यामुळे कारभाऱ्यांनी कसाबसा पुरंदरचा तह उरकून तोतयाची बंदोबस्त करण्याचे काम हाती घेतले. पुढे यथावकाश महादजीच्या सहाय्याने तोतयाचा बंदोबस्त झाला खरा पण, यात ५ - ६ महिन्यांचा काळ फुकट वाया गेला. तेवढ्या अवधीत दादाने पुणे दरबारच्या शत्रूंना पत्रे पाठवून त्यांना चिथावणी देण्याचे कार्य उरकून घेतले. पुणेकरांना मुख्यतः शिंदे - होळकरांचा प्रमुख लष्करी पाठिंबा आहे हे लक्षात घेऊन त्या दोन सरदारांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. याशिवाय त्याने आणखी एक अतिशय महत्त्वाची कामगिरी इंग्रजांच्या मदतीने पार पाडली व ती म्हणजे बारभाई मंडळातून मोरोबा फडणीसला आपल्या लगामी लावून घेतले ! बारभाई कारस्थानात बापू व नाना हे दोघेचं हल्ली प्रामुख्याने कारभार करत होते. याबाबतीत मोरोबाला बरेच वैषम्य वाटत होते. कारण कितीही झाले तरी त्याने देखील एकेकाळी प्रमुख कारभाऱ्याचे पद भूषवले होते. मोरोबाची हि मनःस्थिती दादा आणि मॉस्टीन या दोघांनी अचूक हेरली आणि त्यांनी त्याच्याशी संधान जुळवले. दादा आणि मॉस्टिनची हि कृती पुरंदर तहाच्या विरोधात होती पण हा तह पाळण्याची उत्कंठा मुळात होती तरी कोणाला ? खुद्द नाना फडणीसने देखील यावेळी इंग्रजांच्या नाकात काड्या घालण्यासाठी फ्रेंचांच्या सोबत उघड उघड मैत्रीचे संबंध जोडल्याचा देखावा सुरु केला होता. नानाचे हे वर्तन इंग्रजांना जास्त झोंबले. त्यांनी दादाचा पक्ष घेऊन नानाला कारभारातून काढण्याचे कारस्थान रचले. इंग्रजांच्या सुदैवाने बारभाई कारस्थानाचा ज्याने पाया रचला तो सखारामबापू देखील यावेळी नानाच्या विरोधात इंग्रज - मोरोबा युतीत सामील झाला. अलीकडच्या काळात नाना - महादजी यांची वाढती मैत्री पाहून बापूला धास्ती वाटू लागली होती. पण नाना - महादजी मैत्रीचे वैषम्य फक्त बापूलाच वाटत होते असे नाही तर तुकोजी होळकरास देखील फडणीस - शिंदे युतीचे भय वाटू लागले होते. परिणामी, मोरोबाच्या कारस्थानात आता बापू आणि तुकोजी होळकर देखील सामील झाले. 
            कारस्थानाची पूर्वतयारी होताच स. १७७७ च्या पावसाळ्यात मॉस्टिनने मुंबईला जाउन तेथील कौन्सिलला सर्व प्रकार समजावून सांगितला. तेव्हा तेथील बैठकीत असा ठरवा मंजूर करण्यात आला की, बापू, मोरोबा, बजाबा पुरंदरे व तुकोजी होळकर यांनी मिळून सह्या केलेले, इंग्रजांची मदत मागणारे पत्र आल्यावर आपण पुणे दरबारातील राजकारणात हस्तक्षेप करायचा. त्यानुसार मॉस्टिन, दादा व मुंबईकर पुण्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले. इकडे नाना फडणीसला मोरोबाच्या कारस्थानाची कुणकुण लागली. त्याने ताबडतोब पुरंदरास जाउन फौजेची जमवाजमव करण्यास आरंभ केला. नानाच्या हालचालींचा सुगावा लागल्याने बापूने मोरोबास त्वरा करण्याची इशारत दिली. त्यानुसार होळकर, सदाशिव रामचंद्र, बजाबा पुरंदरे, गोपाळ नाईक तांबवेकर इ. सरदारांना सोबत घेऊन मोरोबा पुण्यावर चालून आला. यावेळी नाना पुरंदरावर असल्याने पुणे शहर व शनिवारवाड्यावर ताबा मिळवण्यात मोरोबाला फारशी अडचण आली नाही. ता. २६ मार्च १७७८ रोजी त्याने पार्वतीबाईची भेट घेऊन तिच्या हस्ते मुख्य कारभाऱ्याची वस्त्रे, जरीपटका, नौबत व शिक्के कट्यार घेऊन पुरंदर ताब्यात घेण्यासाठी प्रस्थान केले. इकडे ऐनवेळी बापूने पलटी मारून मूळ कारस्थान बाजूला ठेवले आणि नाना - मोरोबा यांच्या दरम्यान मध्यस्थी करण्यास आरंभ केला. त्यानुसार उभय चुलत बंधूंमध्ये तात्पुरता समेट घडून येउन बापू आणि नानासोबत मोरोबास कारभारात घेण्याचे ठरले. याशिवाय अंतस्थरित्या बापू आणि मोरोबा यांनी दादाला पुण्यास न आणण्याचे निश्चित केले ते वेगळेचं ! ( एप्रिल, स. १७७८ ) इकडे मोरोबा, बापू, तुकोजी इ. च्या सह्या असलेल्या पत्राची वाट पाहून मुंबईकर इंग्रज वैतागून गेले. पण मोरोबाला आता अधिकार मंडळात प्रवेश मिळाल्याने त्यास दादा किंवा इंग्रजांच्या मदतीची अजिबात आवश्यकता वाटत नव्हती. तर बापूचा उद्देश, नानाच्या गर्वाचे घर खाली करण्याचा असल्याने त्यासही आता दादाला पुण्याला आणायची इच्छा होत नव्हती. मिळून बापू - मोरोबा यांनी धूर्तपणे नाना - इंग्रज यांच्यावर कुरघोडी केली. 
  
             तळेगाव - वडगाववर इंग्रजांचा कोंडमारा :- स. १७७८ च्या जानेवारीत पुण्यास येउन बसलेल्या मॉस्टिनला बापूच्या कारस्थानाचा हा सर्व आमशा निमुटपणे बघत बसण्यापलीकडे काही करता आले नाही. मात्र, घडल्या प्रकारातून मॉस्टिन आणि मुंबईकर इंग्रजांना शहाणपण घेता आले नाही. पुणेकर मुत्सद्द्यांच्या मूळ हेतुत आता बदल झाला असून त्यांना दादापेक्षा बाल पेशव्याला हाती धरून राजकारण खेळवण्यात जास्त फायदा असल्याचे चाणाक्ष इंग्रजांना उशीरा कळून आले. पण यासाठी त्यांना वडगाव येथे मराठी सैन्यापुढे माती खावी लागली, तेव्हा कुठे त्यांना शहाणपण आले ! असो, मोरोबाचा डाव काही काळ यशस्वी झाला असला तरी नानाने अंतस्थरित्या महादजीसोबत संधान बांधून दि. ११ जुलै १७७८ रोजी मोरोबाला कैद केले. तत्पूर्वी महादजीने तुकोजी होळकराची भेट घेऊन त्यास मोरोबाच्या पक्षातून फोडण्याची कामगिरी पार पाडली होती आणि या गोष्टीचा मोरोबाला अजिबात पत्ता लागला नव्हता ! पुणे दरबारात शह - काट शहाचे राजकारण चालू असताना युरोपात इंग्रज - फ्रेंचांचे स. १७७८ च्या मार्चमध्ये युद्ध सुरु झाल्याची बातमी त्याच वर्षी जुलै महिन्यात कलकत्त्यास येउन पोहोचली. या बातमीमुळे वॉरन हेस्टींग्सला कमालीचा आनंद झाला. पुरंदरचा तह मोडण्यासाठी ज्या निमित्ताच्या शोधत तो होता, ते निमत्त त्यास आता मिळाले. हिंदुस्थानातील फ्रेंचांचा बंदोबस्त करण्याच्या नावाखाली त्याने बंगालमधील एक मोठी लष्करी तुकडी दक्षिणेत रवाना केली. वस्तुतः, बंगालमधील ब्रिटीश फौजा दक्षिणेत नेहमी जलमार्गानेच यायच्या पण हा प्रघात बाजूला ठेवून, पुणे दरबारची मुद्दाम कुरापत काढण्यासाठी हेस्टींग्सने ब्रिटीश पलटणी मुद्दाम खुष्कीच्या मार्गाने रवाना केल्या. 
                     वॉरन हेस्टींग्सचा हेतू नाना फडणीसने अचूक ओळखला आणि त्याने इंग्रजांचा डाव हाणून पाडण्यासाठी नवीन कारस्थान रचण्यास आरंभ केला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यावेळी पुणे दरबारात इंग्रजी आक्रमण ओळखणारा दुसरा कोणी मुत्सद्दी वा सरदार नव्हता आणि लष्करी बाबतीत नाना फडणीस शुद्ध अडाणी होता ! पण याचा अर्थ असा नाही कि, इंग्रजांचे आक्रमण संपूर्ण पेशवाईत एकट्या नाना फडणीसानेच ओळखले. इंग्रजी आक्रमणाचा मुख्य हेतू काय आहे याची कल्पना, कदाचित नाना फडणीसच्याही आधी आनंदीबाईच्या लक्षात आली होती. मराठी रियासत खंड - ६ मध्ये आनंदीबाईने मंडलेश्वर येथून बापू व नाना यांना स. १७७८ च्या सप्टेंबर महिन्यात पाठवलेली पत्रे वाचली असता आनंदीबाईच्या राजकीय आकलन शक्तीचे आणि समजूतदारपणाचे मोठे कौतुक वाटते. परंतु, दुर्दैवाने आपला इतिहास आणि संस्कृती पुरुषप्रधान असल्याने नाना इतकीच किंवा त्याच्याहून अधिक शहाणी अशी एक स्त्री -- त्याच्याच काळात पण शत्रुवर्गात वावरत होत हे कबुल करण्यास आमचे इतिहासकार कचवचतात ! असो, त्या पत्रात आनंदीबाईने हिंदुस्थानातील इंग्रजी राजकारणाची उदाहरणे देत पुण्यात देखील रघुनाथरावाच्या नावाखाली इंग्रजांना ब्राह्मणी संस्थान हाताखाली घालायचे आहे असे लिहिले आहे. तसेच घरच्या भांडणात परक्यांचा हात शिरून त्यांना शिरजोर होऊ देणे कारभारी म्हणून बापूला जसे शोभत नाही त्याचप्रमाणे तीन पिढ्या फडणीशी भोगणाऱ्या नानाला देखील शोभत नसल्याचे तिने स्पष्टपणे नमूद केले आहे. अर्थात, आमच्या इतिहासकारांप्रमाणेच बापू - नाना आनंदीबाईच्या या पत्रांची दखल घेतली नाही असेच परिणामावरून म्हणावेसे वाटते !  
                 हेस्टींग्स पुणे दरबारविरुद्ध युद्ध पुकारताच मुंबईकर इंग्रजांनी बंगालची फौज मदतीस येण्याची वाट न बघता दादाला सोबत घेऊन थेट पुण्यावर स्वारी करण्याचा बेत आखला. दादानेही यावेळी त्यांना आश्वासन दिले की, आपण बोरघाट चढून वर गेल्यास शिंदे - होळकरांसह बव्हंशी मराठी सरदार आपल्या पक्षास येउन मिळतील. तेव्हा नियोजित स्वारीत आपण जणू काही यशस्वीच झालो या भावनेने मुंबईकरांनी दि. २४ नोव्हेंबर १७७८ रोजी दादासोबत नव्याने तह केला. त्यानुसार पेशवेपदी आता सवाई माधवराव कायम राहणार असून तो सज्ञान होईपर्यंत दादाने त्याचा कारभार पाहावा असे ठरले. त्याशिवाय पेशव्याच्या संरक्षणासाठी इंग्रज पहारेकरी त्याच्यासोबत कायम राहणार होते. बाकीची कलमे सुरतेच्या तहातील कलमांप्रमाणेच होती. सारांश, सबंध पेशवाई गिळून टाकण्यासाठी मुंबईकरांनी यावेळी तोंड पसरले होते ! तह झाल्यावर दुसऱ्याच दिवशी मुंबईची फौज दादा आणि अमृतरावसह कर्नल ईगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या दिशेने रवाना झाली. 
                 मुंबईची फौज चालून येत असल्याचे समजताच शिंदे - होळकरांसह बव्हंशी मराठी सरदार पुण्याच्या बचावासाठी तळेगाव पर्यंत येउन थडकले. बोरघाट चढून इंग्रज फौजा वर येताच त्यांना घेरण्याचा मराठी सरदारांनी डाव रचला. ता. २५ डिसेंबर रोजी ब्रिटीश सैन्य खंडाळ्यास आले. दि. ४ जानेवारी १७७९ रोजी कार्ला येथील संग्रामात कॅप्टन स्टूअर्ट मारला गेला. त्याच्या शौर्याबद्दल मराठी सैन्याने व सरदारांनी त्यास ' फाकडा ' हा गौरवपर किताब बहाल केला. मराठी कागदांत त्याचा उल्लेख ' इष्टुर फाकडा ' असा करण्यात येत असे. ता. ९ जानेवारीस इंग्रज तळेगावला पोहोचले तेव्हा त्यांना आसपासचा सर्व प्रदेश उजाड केल्याचे दिसून आले. तसेच कारभाऱ्यांनी पुणे शहर देखील रिकामे करून जाळून टाकण्याची सिद्धता केल्याचे त्यांना समजले. अशा स्थितीत पुढे जाण्यात काही अर्थ नसल्याचे जाणून त्यांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, वडगावला मागे आल्यावर त्यांना मराठी फौजांनी घाट अडवून त्यांचा परतीचा मार्ग रोखून धरल्याचे दिसून आले. मिळून दोन्ही बाजूंनी इंग्रजांच्या लहानशा फौजेची मराठी सैन्याच्या कात्रीत सापडून चटणी उडण्याचा प्रसंग उद्भवला होता. तेव्हा त्यांनी दादाच्या मार्फत मराठी सरदारांत फितूर करण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी होऊन इंग्रजांना ता. १७ जानेवारी १७७९ रोजी वडगावचा तह करावा लागला. या प्रसंगी दोन इंग्रज अधिकाऱ्यांना ओलिस देऊन त्यांना आपली सुटका करून घ्यावी लागली. विशेष म्हणजे हा तह महादजीच्या दरम्यानगिरीने ठरल्यामुळे इंग्रजांनी त्याला बक्षीस म्हणून भडोचचा परगणा व ४१ हजार रुपये दिले. तह ठरवणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देणे त्यावेळी सर्वमान्य असल्याने त्यात कोणाला काही गैर वाटण्याचे कारण नाही, परंतु , लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे भडोच परगणा हा मुळात पेशव्यांचा असून सुरतच्या तहात दादाने तो इंग्रजांना दिला होता. प्रस्तुत प्रसंगी हाच प्रदेश इंग्रजांनी महादजीला देऊन त्यास खुश केले. प्रदेश कोणाचा, देतं कोण आणि घेतं कोण ?
                 वडगावच्या तहातील महादजीची मुख्य भूमिका लक्षात घेऊन दादाने त्याच्याच स्वाधीन होण्याचा निर्णय घेतला. शिंद्यांच्या ताब्यात जाण्यापूर्वी आणि त्यानंतर दादाने त्याच्याशी काही करार केले. बापू आणि नानाच्या वतीने दादाच्या बव्हंशी मागण्या महादजीने मान्य केल्या. त्यानुसार (१) झांशी जवळ दादाने राहाण्याचे मान्य केले. त्याच्या खर्चासाठी सालीना १२ लक्ष उत्पन्नाची जहागीर लावून देण्यास कारभाऱ्यांनी मंजुरी दिली. (२) येथून पुढे राजकीय भानगडीत आपण भाग घेणार नसल्याचे दादाने जाहीर केले. राजकीय पत्रव्यवहार करणार नाही, पण बाहेरून जर राजकारणाचे पत्र आले तर सरदारांच्या म्हणजे शिंदे - होळकरांच्या कारकुनांकडे देऊ. खेरीज, झांशी सोडून कुठे प्रसंगानिमित्त जायचे झाल्यास सरदारांच्या परवानगी शिवाय जाणार नाही, असे दादाने कबूल केले. (३) मोरोबा, बजाबा, सखाराम हरी इ. आपले साथीदार कारभाऱ्यांच्या कैदेत आहेत त्यांना सोडावे असे दादाने सांगितले. महादाजीच्या सांगण्यानुसार कारभाऱ्यांनी दादाची हि अट देखील मान्य केली. (४)  बालपेशवा आणि आपला मुलगा बाजीराव, हे दोघे वयात आल्यावर त्यांनी नानासाहेब आणि भाऊसाहेबांप्रमाणे कारभार करावा अशीही एक अट दादाने घातली आणि ती देखील मान्य करण्यात आली. दादाने शिंद्यांच्या सोबत जे काही करार केले त्यावरून एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते कि, दादाने स्वतः जरी पेशवाईवरील आपला दावा सोडला असला तरी त्याने स्वतःच्या मुलाला पेशवेपदाचा दावेदार म्हणून उभे केले. तसेच बाजीराव वयात आल्यावर त्यास मुख्य कारभारी पद मिळताच बापू - नाना या दुकलीला कारभारातून बाहेर पडावे लागणार होते आणि हा महत्त्वाचे म्हणजे हे सर्व घडवून आणण्यास महादजी शिंदे जामीन राहिला होता. याचा आणखी एक अर्थ असा होतो कि बापू, नाना, रघुनाथराव आणि प्रत्यक्ष बाल पेशवा देखील या करारांमुळे एकप्रकारे महादजीच्या वर्चस्वाखाली आले.
                  तळेगाव - वडगावच प्रकरण निकाली निघून इंग्रजांच्या सोबत तह झाल्यावर दादाची रवानगी झांशीला करण्यात आली. दादाला झांशीला पोहोचवण्यासाठी महादजीने आपला विश्वासू सरदार हरी बाबाजी केतकर याच्यावर सोपवली. ता. २४ फेब्रुवारी १७७९ रोजी दादाची स्वारी झांशीला रवाना झाली. तत्पूर्वी,  वडगावचा तह झाल्यावर दादाचे बरेचसे सहकारी महादजीच्या ताब्यात आले, त्यांनी मोरोबाच्या कारस्थानात बापूचा सहभाग असल्याचे महादजीला सांगितले. याविषयी खात्री करून घेण्यासाठी महादजीने दादाकडे चौकशी केली असता त्याने त्याने बापूच्या हस्ताक्षरातील पत्रेचं महादजीस दाखवली. तेव्हा प्रथम दादाला झांशीच्या वाटेला लावून दि. २७ फेब्रुवारी १७७९ रोजी महादजीने बापूला कैद केले. यामुळे कारभारात सर्वाधिकारी बनण्याचा नानाचा मार्ग निर्धोक झाला. 

शिंदे - होळकरांच्या कैदेतून दादाचे पलायन :-  दादा - बापूचा बंदोबस्त झाल्यावर एकमेकांना अंतर न देण्याविषयी नाना - महादजीची लेखी शपथक्रिया स. १७७९ च्या मार्चमध्ये घडून आली. वडगावच्या तहाची बातमी बंगालची फौज घेऊन दक्षिणेत येणाऱ्या इंग्रज सेनानी गॉडर्ड यास बऱ्हाणपूर मुक्कामी समजली. तेव्हा पुण्याकडे येण्याचा विचार सोडून त्याने गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. वडगावचा तह इंग्रज कधीच मान्य करणार नाहीत याची अटकळ दादास असल्याने त्याने इंग्रजांशी अंतस्थ सूत्र राखले होतेच. गॉडर्ड बऱ्हाणपुरी आला तेव्हा दादा जवळपासच होता पण, इंग्रजांचे पुढील धोरण निश्चित न झाल्याने गॉडर्डने दादाला फक्त मधाचे बोट लावून ठेवले. परंतु, त्यास भर देऊन लगेच युद्धाला तोंड फोडण्याची त्याची हिंमत झाली नाही. इकडे दादाची मात्र अजून दम धरण्याची बिलकुल इच्छा नव्हती. त्याने झांशीला पोहोचण्याच्या आतच पलायन करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान बाजीरावास घेऊन आनंदीबाई देखील दादाच्या गोटात दाखल झाली होती. दादाकडे यावेळी स्वार - पायदळ मिळून दोन हजार सैन्य व पंधरा तोफा होत्या तर त्याला घेऊन जाणाऱ्या हरी बाबाजीकडे शिंदे - होळकरांची मिळून पाच हजार फौज होती. त्यात होळकरांच्या सैन्यावर हरी बाबाजीची हुकुमत असण्याचा संबंधच नव्हता. सातपुड्यातील भिल्लांशी दादाच्या हस्तकांचे संधान जुळलेलं असून तेथील सरकारी मालेदार देखील दादाचेच पक्षपाती होते. सारांश, शिंदे - होळकरांच्या तावडीतून निसटून जाण्यासाठी याहून अधिक चांगली संधी दादाला मिळणे शक्य नव्हते आणि अशी सुवर्णसंधी दवडण्याइतका दादा निश्चितचं ' भोळा सांब ' नव्हता !  
                 स. १७७९ च्या मे महिन्यात नर्मदा नदी पार करताना दादाने बेसावध हरी बाबाजीवर हल्ला चढवून त्यास ठार केले व हरी बाबाजीची फौज उधळून लावली आणि थेट सुरतेला प्रयाण केले. दादाच्या या भरारीने नान फडणीसावर कपाळावर हात मारण्याची पाळी आणली ! महादजीवर विश्वास ठेऊन आपण काय करून घेतले, हे त्याला दुसऱ्यांकडून निमुटपणे ऐकून घ्यावे लागले. महादजीने याप्रसंगी देखील दादाची अप्रत्यक्षपणे पाठराखण करून एकप्रकारे बालपेशव्याशी म्हणा किंवा पुणे दरबारसोबत म्हणा, पण गद्दारी केलीचं ! त्याने ताबडतोब आपली माणसे दादाच्या पाठलागावर न पाठवता देवाचा कौल अनुकूल न आल्याचे निमित्त करून स्वस्थ बसून राहाणे पसंत केले. 
                                                                  ( क्रमशः )             
                 
                                                     
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: