गुरुवार, २५ जुलै, २०१३

बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीस ( भाग - २ )

                                     
                       ( सवाई माधवराव पेशवा आणि नाना फडणीस )
             सवाई माधवराव पेशव्याच्या जन्मानंतर बारभाई मंडळात प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष अशी अस्वस्थता माजू लागली. यावेळी बापू व नाना हे दोघे मुख्य कारभारी असून या दोघांच्या नजरेसमोर वेगवेगळी उद्दिष्ट्ये तरळत होती. सखारामबापूच्या दृष्टीने पाहता, त्याच्यासमोर काही मुलभूत प्रश्न उभे होते. सवाई माधवरावाच्या जन्मामुळे दादा आता निव्वळ बंडखोर बनला असला तरी त्याच्या बंडाचा बीमोड कसा करायचा हा मोठा प्रश्नचं होता. बापू हा हा फौजबंद सरदार नसल्याने दादाला आपण कायमस्वरूपी कैदेत ठेवू असा त्यास बिलकुल विश्वास नव्हता. दादाला मारून टाकण्याचा पर्याय त्याच्या समोर उपलब्ध होता पण कितीही झाले तरी बापू जुन्या वळणाचा मुत्सद्दी असल्याने त्याच्या मनात असा विचार आला तरी त्याने त्यांस थारा दिला नाही. रघुनाथराव कसाही असला तरी तो आपल्या घराण्याला उर्जीतावस्थेला आणणाऱ्या भट घराण्याचा वंशज आहे हि भावना केवळ बापूच्याच नव्हे तर राज्यातील सर्वचं लहान - मोठ्या अधिकाऱ्यांच्या मनात जागृत होती. त्यातचं बापूचे वय झाल्याने आणि पोटी पुत्रसंतान नसल्याने त्याच्या अधिकारलालसेस आणि महत्त्वकांक्षेस अनेक मर्यादा पडल्या होत्या. खेरीज, महत्त्वाची गोष्ट म्हणजे सवाई माधवरावास आता प्रतिस्पर्धी असे दोनचं प्रमुख इसम होते. एक रघुनाथराव व दुसरा त्याचा दत्तक पुत्र अमृतराव ! पैकी, दादा हा नारायणाचा खुनी असल्याने त्यास पेशवा म्हणून सरदार व मुत्सद्दी मंडळाकडून मान्यता मिळणे शक्य नव्हते पण त्याचा दत्तकपुत्र अमृतराव हा तर त्याबाबतीत निर्दोष असल्याने पुढे - मागे पेशवाईवर तो हक्क सांगू शकत होता. तसेच सवाई माधवराव हा अगदीच अल्पवयीन असून तो किती काळ जगतो, पुढे तो सद्गुणी निघतो कि दुर्वर्तनी इ.चाही भरवसा नव्हता. तात्पर्य, दादाला राजी राखून पण कैदेत ठेवून भटवंश संपुष्टात न आणता पेशवाई त्याच वंशाकडे कायम राहावी या दृष्टीने बापू धडपडू लागला. 
               याउलट नानाचा दृष्टीकोन होता. यावेळी नानाचे वय सुमारे ३२ वर्षांचे असून तो ऐन तारुण्यात होता. अधिकारलालसा आणि महत्त्वकांक्षा त्याच्या ठायी जबरदस्त होती. भट घराण्याशी जरी त्याचे वाडवडिलांपासून ऋणानुबंधाचे नाते असले तरी त्याविषयी तो तितकासा भावनिक देखील नव्हता. मात्र, पेशवाई हि भट घराण्याकडेच कायम राहिली पाहिजे हे बापूप्रमाणेचं त्याचेही ठाम मत होते. पण त्यासोबत आपले हित, स्वार्थ देखील साधले गेले पाहिजेत याकडेही त्याचे पुरेपूर लक्ष होते आणि मुख्य म्हणजे पेशवेपदाची अप्रत्यक्ष सत्ता हाती घेण्याची -- राज्यक्रांतीची वेळ आता चालून आली आहे याची चाहूल त्याच्या महत्त्वकांक्षी आणि धोरणी स्वभावास लागली होती. बापूप्रमाणेचं नाना देखील लाशाक्री बाबतीत सर्वथैव दुर्बल होता. त्याच्या हाती सरंजामी अशी चार दोन हजारांची फौज होती. त्या बळावर तो दादा वा इतर कोणा प्रबळ सरदारासोबत उघड सामना शकत देऊ शकत नव्हता. पण, त्याचे बुद्धीसामर्थ्य अफाट होते आणि त्यावरचं त्याचा सर्व भरवसा होता ! बापूप्रमाणे दादाचे वा अमृतरावाचे पुढे काय करायचे हा प्रश त्याला पडला नाही. आपण दादाला मारून टाकू शकत नाही याची नानाला जाणीव होती. त्याचप्रमाणे त्याला व त्याच्या परिवाराला आपण कायमस्वरूपी कैदेत ठेवू शकतो हा आत्मविश्वास देखील त्यास होता. त्रिंबकराव पेठे जरी आता हयात नसला तरी हरिपंत फडके, आपा बळवंत, पटवर्धन इ. प्रमुख दक्षिणी सरदारांच्या बळावर आपण दादाचा बंदोबस्त सहज करू असा त्यास विश्वास होता. सवाई माधवराव अल्पवयीन असल्याने तो सज्ञान होईपर्यंत सर्व सत्ता नानाच्या हाती राहणार होती. माधवराव अल्पायुषी ठरला अथवा दुर्वर्तनी निघाला तर त्याचाही पर्याय त्याने मनाशी योजून ठेवला होता. एकूण, पेशव्यांच्या सर्वाधीकाराची प्राप्ती करून घेण्याची संधी नानासमोर चालून आलेली होती. परंतु, अजून फळ पूर्णतः पिकलेलं नव्हतं. तसेच या फळाचा गंध नानासोबत इतरांच्याही नाकास लागला होता. पैकी या फळाचा प्रमुख इच्छुक होता, नानाचा चुलतभाऊ मोरोबादादा फडणीस ! पण त्याचा आवाका आणि त्यास असलेले पाठबळ अगदीच अल्प होते. त्याशिवाय सखारामपंत देखील होते. पण या वृद्धाच्या पाठीशी प्रबळ सरदार मंडळी नसल्याने त्याची उपद्रव क्षमता मोरोबापेक्षाही कमी होती. परंतु त्याचे राजकीय वजन लक्षात घेत तूर्त तरी त्याला गोंजारण्याचे धोरण स्वीकारून राहाणे नानास भाग होते. राहता राहिले शिंदे आणि होळकर ! हे दोनचं सरदार आपले खरे प्रतिस्पर्धी असणार याचा अचूक अंदाज नानाने आपल्या मनाशी बांधला होता. 
              चतुर आणि धोरणी नानाने पुढील घटनांविषयी आपल्या मनाशी काही ठोकताळे बांधलेले होते. बालपेशव्याचे संगोपन, संरक्षण व त्याचे शिक्षण या जबाबदाऱ्या अतिशय अवघड आणि तितक्याच नाजूक होत्या. सखारामबापू हा उघड उघड दादाचा पक्षपाती असल्याने तो स्वतःहून बालपेशव्याची जबाबदारी घेणार नाही आणि त्याने तशी घेण्याचा प्रयत्न केला तरी इतर लोक त्याकडे बालपेशव्यास सोपवणार नाहीत. आणि त्याउपर देखील बालपेशवा बापूच्या हाती गेला व दुर्दैवाने त्यास काही दगाफटका झाला तर बापूचीच मान कापली जाणार होती. शिंदे - होळकरांचा प्रश्न जर वेगळा होता. होळकरांचे सर्व हितसंबंध उत्तरेत असल्याने अहिल्याबाई दक्षिणेत येउन पेशव्याची जबाबदारी आपल्या गळ्यात घेणार नाही हे उघड होते. तुकोजी हा सरदार असल्याने तो या कामास योग्य नव्हता. त्यामुळे होळकरांचा प्रश्न तर निकाली निघाला. राहता राहिला महादजी शिंदे, तर त्याच्या बाबतीत मात्र निश्चित असे काही आडाखे बांधणे शक्य नव्हते. होळकरांचा कारभार द्विमुखी असल्याने त्यांचे सामर्थ्य विभागलेलं होतं. त्याउलट महादाजीची परिस्थिती होती. होळकरांप्रमाणेच शिंद्यांचे देखील हितसंबंध उत्तरेत गुंतले असले तरी महादजी अजून त्यात विशेष असा गुरफटला नव्हता. त्याशिवाय त्याचा मूळ स्वभाव आणि कर्तुत्व अजूनही स्वतंत्र असे झळकले नसल्याने त्याच्या विषयी अंदाज बांधणे इतरांना तितकेसे सोपे नव्हते. परंतु, फडणीस पदावर कार्यरत असल्याने नानाच्या नजरेला जे काही महादजीचे रूप पडले होते ते इतरांपेक्षा वेगळे होते. 
                    सारांश, नाना फडणीसाच्या समोर त्यावेळी फक्त एक महादजी शिंदेच तेवढा प्रतिस्पर्धी होता. त्याच्याइतकाच सावध, चतुर, प्रसंगावधानी, स्वार्थी, पेशव्यांचा अभिमानी व महत्त्वकांक्षी अशा महादजीचा आपणांस पुढेमागे अडथळा होणार हे नाना ओळखून होता आणि त्याचा बंदोबस्त कसा करायचा हे देखील त्याने मनाशी योजले होते. परंतु, या सर्व लांबच्या गोष्टी असून तुर्तास, बालपेशव्याचा आणि स्वतःचा बचाव कसा करायचा हा त्याच्यापुढे यक्षप्रश्न होता. कारण, कासेगावची लढाई जिंकून दादा पुरंदरच्या दिशेने येऊ लागला होता. परंतु, नानाची समस्या दादानेच आपणहून सोडवली आणि तो माळव्याकडे निघून गेला. दादाच्या प्रत्यक्ष आक्रमणाचा धोका तात्पुरता टळल्यावर नाना - बापूने इतर महत्त्वाच्या प्रश्नांना हात घातला. नारायणरावाच्या खुनात सहभागी असलेल्यांना पकडून देहांत शिक्षा देण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. शेजारच्या सत्ताधीशांना पत्रे पाठवून त्यांच्याशी सलोख्याचे संबंध राखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शिंदे - होळकरांना खलिते पाठवून दादाला नर्मदापार करू न देण्याची सूचना करण्यात आली. दादा आपणहून उत्तरेत गेल्याने नानाची एक चिंता मिटली असली तरी दुसरी निर्माण झाली होती. शिंदे वा होळकर यांपैकी एकाने जरी दादास हाताशी धरून बालपेशव्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यास आपले काय होईल ? नानाची काळजी अगदीच अनाठायी नव्हती. दादा उत्तरेत येत असल्याचे पाहून शिंदे - होळकरांच्या, विशेषतः महादजीच्या महत्त्वकांक्षेला पालवी फुटली. बालपेशव्याला हाताशी धरून सत्ता गाजवण्याची नानाची इच्छा अजून कोणाच्या ध्यानात आली नव्हती. महादजी मात्र त्यास अपवाद होता ! त्याने प्रथम होळकरांना आपल्या बाजूला वळवले आणि दादाच्या पाठलागावर असलेल्या हरीपंतास सांगितले की, आम्ही दादाला नर्मदापार करून देत नाही. त्याचवेळी दादा विनासायास नदीपार कसा होईल याचीही त्याने दक्षता घेतली. शिंद्यांच्या भरवशावर हरिपंत दादाचा पाठलाग करत पुढे आला नाही. याचा फायदा घेऊन शिंद्याने दादाशी आपले संधान बांधण्याचा यत्न केला. दादाची मर्जी प्रसन्न करून नानाला शह देण्याची त्याची योजना होती. मात्र, दादा हा काही भोळासांब नव्हता. शिंदे - होळकरांचे खेळ त्यास परिचित असल्याने माळव्यात येण्यापूर्वीचं त्याने गुजरातमध्ये गायकवाड आणि इंग्रजांशी सुत जुळवले होते व या गोष्टीची नाना किंवा महादजीला कल्पना नव्हती ! 
                     माळव्यात शिंदे -  होळकरांशी निरर्थक वाटाघाटी करत दादाने कालहरण केले आणि गुजरातमध्ये इंग्रजांच्या आश्रयास जाण्याची योजना आखली. इकडे, शिंदे - होळकर दादाला घेऊन पुण्याच्या रस्त्याला लागले. दादा पुण्यापर्यंत येईल न येईल या आशंकेने बापू - नाना हे दोघे शिंदे - होळकरांमार्फत दादाची भेट घेण्यासाठी तापीच्या दिशेने रवाना झाले. दादाला ताब्यात घेऊन सर्व सत्ता हाती बळकावण्याची संधी यावेळी नानासमोर चालून आली होती पण दैव नानाला अनुकूल नव्हते ! स. १७७४ अखेर दादाच्या भेटीसाठी बापूसोबत नाना पुरंदरावरून निघून गेला आणि इकडे पूर्वसंकेतानुसार मुंबईकर इंग्रजांनी साष्टी प्रांतावर हल्ला चढवून ठाण्याचा किल्ला ताब्यात घेतला. इंग्रजांनी उचल खाण्यापूर्वीचं दादा हरिपंतासह शिंदे - होळकरांना गुंगारा देऊन सुरतेला निघून गेला. बिचारे नाना - बापू ! सरदारांवर चरफडत अर्ध्या वाटेतून मागे फिरले. रस्त्यांत निजामाची गाठ घेऊन त्याची आणि बालपेशव्याची पुरंदरावर भेट घडवून आणली. दादा इंग्रजांना मिळाला याचा अर्थ ओळखून निजामाने पुणे दरबारकडे दौलतबादचा किल्ला व अठरा लक्ष उत्पनाच्या प्रांताची मागणी केली. काळावर नजर देऊन बापू व नानाने ती मान्य केली. पुढे गुजरातमध्ये दादा - इंग्रज यांच्या संयुक्त फौजेशी हरीपंताने गायकवाडांच्या मदतीने यशस्वी सामना दिला. दरम्यान, ब्रिटीश पार्लमेंटने नव्याने मंजूर केलेल्या रेग्युलेशन कायद्याची अंमलबजावणी करण्याची हिंदुस्थानचा ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींग्सला हुकी आली. त्यानुसार त्याने मुंबईकर इंग्रजांना पुणे दरबारसोबत चालवलेलं युद्ध बंद करण्याची आज्ञा करून आपला वकील अप्टन यांस त्याने पुणेकरांशी तह करण्यासाठी पाठवले. अप्टनच्या मार्फत दि. १ मार्च १७७६ रोजी पुरंदरचा तह घडून आला आणि इंग्रज - मराठ्यांचे युद्ध काही काळ थंडावले. या तहाने उभयपक्षीयांचे सर्वचं प्रश्न काही निकाली निघाले नाहीत. दादाचा ताबा मिळवण्यास नाना फडणीस विशेष उत्सुक होता पण दादाला पुणे दरबारच्या हवाली करण्यास इंग्रज नाखूष होते. पुणे दरबारात भेद करण्यासाठी त्यांना दादासारखा मोहरा हाती असणे आवश्यक वाटत होते. पुरंदरचा तह घडून येत असताना एक म्हटले तर सामान्य आणि म्हटले तर क्रांतीकारी घटना घडून आली. 
                      पानिपतच्या युद्धात सदाशिवरावभाऊ मारला गेल्याची खात्री नानासाहेब पेशव्यासह सर्वच मुत्सद्द्यांची केव्हाच झाली होती. पण, राजकीय अपरिहार्यता म्हणून तो जिवंत असल्याच्या बातम्या त्यांनी त्यावेळी उठवल्या होत्या. दरम्यान राज्याच्या रक्षणाकरता मुद्दाम उठवण्यात आलेल्या वावड्या लगेच सत्यही होऊ लागल्या. भाऊसारखे दिसणारे कित्येक इसम ठिकठीकाणी प्रकट होऊ लागले. त्यांपैकी सुखलाल नामक कनोजी ब्राम्हणाचे प्रकरण पेशवाईत बरेच गाजले आणि हे प्रकरण आजही कित्येक इतिहासकारांसाठी संशोधनाचा विषय म्हणून अतिशय जिव्हाळ्याचे वाटत आहे. थोरल्या माधवराव पेशव्याच्या कारकिर्दीतच सुखलालचा बंडावा मोडून काढण्यात आला होता. पेशवे कुटुंबातील सर्वांनी त्याची परीक्षा घेऊन तो तोतया असल्याचे मान्य केले होते. अपवाद फक्त पार्वतीबाईचा ! तिची आणि भाऊच्या तोतयाची कधीही भेट घडवून आणण्यात आली नाही. आपल्या कैदेत असलेली व्यक्ती भाऊ नसून तोतया असल्याची माधवरावास कितपत खात्री होती याविषयी निश्चित काही विधान करणे शक्य नाही. कारण, कैदेत असलेली व्यक्ती हि तोतया आहे अशी जर त्याची पूर्ण खात्री असती तर त्याने त्याला कधीच ठार केले असते. विशेषतः, दादाचा उपद्व्याप पाहता भाऊच्या तोतयास जीवनात ठेवणे त्यास तसे परवडणारे नव्हते. परंतु तरीही त्याने तोतयास ठार केले नाही. असो, माधवाच्या मृत्युनंतर राज्यात जी धामधूम उडाली त्यात बारभाईंच्या शत्रूंनी या तोतयास रत्नागिरीच्या किल्ल्यातील कैदेतून मुक्त करून कारभाऱ्यांची अडचण वाढवली. इंग्रजांच्या छावणीत हजर असलेल्या दादाला माहिती होते कि, तोतया हा खरा सदाशिवराव नाही. पण, पुणे दरबारास कात्रीत पकडण्यासाठी त्याने खुशालपणे हाच खरा सदाशिवराव असल्याचे जाहीर केले. खुद्द दादाचा पाठिंबा मिळाल्याने तोतयाचे बंड वाढले. त्यास पुढे बाजीराव पेशव्याची बहिण अनुबाई आपल्या मुलासह जाउन मिळाली. त्याशिवाय पार्वतीबाईचा भाऊ रघुनाथराव कोल्हटकर आणि गंगाबाईचा मामा नारो शंकर हे देखील तोतयास सामील झाले. पेशवे कुटुंबीय तोतयास जाउन मिळाल्याने कारभाऱ्यांनी घाईघाईने पुरंदर येथे इंग्रजांशी तह उरकून घेतला व महादजी शिंद्याच्या मार्फत त्यांनी तोतयास पकडून घेतले. निवडक मंडळींसमोर त्याची परत एकदा चौकशी करण्यात येउन तो तोतया असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आणि त्यास देहांताची शिक्षा देण्यात आली. ( डिसेंबर १७७६) मुख्य तोतयाचा बंदोबस्त झाल्यावर त्याला सामील असलेल्यांना देखील कठोर शिक्षा ठोठावण्यात आल्या. याकामी बापूपेक्षा नानाने जास्त पुढाकार घेतला. पेशव्यांच्या आप्त मंडळींकडून तसेच धनाढ्य व्यक्तींकडून तोतयास सामील झाल्याबद्द्ल मोठमोठे आर्थिक दंड वसूल करण्यात आले. वरकडांना कैद वा मृत्यूची शिक्षा देण्यात आली. यावेळी गुन्हेगार ब्राम्हण असला तरी त्यास दया न दाखवता ठार करण्याची नानाने आज्ञा काढली होती. याशिवाय तोतयाच्या सहवासात राहण्याने जो संसर्गदोष घडला होता त्यासाठी सर्वांना प्रायश्चित्त देण्यात आले. तोतयाचा बंडावा मोडताना नानाने जो कठोरपणा दाखवला त्यामुळे बापू आणि रघुनाथराव चपापून गेले. आपल्या तरुण सहकाऱ्याची महत्त्वकांक्षा आत्ता कुठे बापूच्या नजरेत येऊ लागली. जे कृत्य करण्याचे साहस खुद्द माधवराव पेशव्यास झाले नाही ते नानाने करून दाखवल्यामुळे दादाला आपल्या भवितव्याची काळजी वाटू लागली. सुखलाल हा तोतया होता आणि आपण तर नारायणाच्या खुनाची आज्ञा दिली होती. त्याचे भांडवल करून नाना आपला कायमचा निकाल लावले हि भीती दादाच्या मनात घर करून राहिली. 
                      इकडे मोरोबादादास आपल्या चुलत भावाचा उत्कर्ष असह्य होऊ लागला. बारभाईच्या आरंभीच्या कारभार मंडळात जरी तो सहभागी असला तरी अलीकडे बापू आणि नाना स्वबळावर मोठमोठी कार्ये पार पाडू लागल्याने बारभाई मंडळ निकालात निघाले होते. परिणामी, मोरोबासारखे मुत्सद्दी अडगळीत पडल्यासारखे झाले होते. आपली उपेक्षा करवून घेण्याइका मोरोबा अजून विरक्त न झाल्याने त्याने थेट इंग्रज आणि दादासोबत सुत जुळवायला आरंभ केला. मोरोबाची चलबिचल पाहून नाना व बापूने त्यास कारभारात घेऊन त्याला राजी राखण्याचा यत्न केला, पण त्यामुळे कसलाही फायदा झाला नाही. बापू व नानाला घरी बसवून सर्व कारभार हाती घेण्याची मोरोबाची इच्छा होती. परंतु, बालपेशव्याचा ताबा नानाकडे असल्याने तो जिवंत असेपर्यंत आपणांस मुख्य कारभार हाती घेता येणार नाही हे मोरोबा ओळखून होता. तेव्हा त्याने नानाला शह देण्यासाठी सखारामबापूस जवळ केले. नानाची धडाडी पाहून अलीकडे बापूही साशंक झाला होता. नानाइतकाच बुद्धिमान पण वस्तुस्थितीची जाणीव नसलेला आणि काहीसा घमेंडी मोरोबा जर आपल्यास अनुकूल झाला तर नानाला जाग्यावर बसवून आपण आपले महत्त्व परत प्रस्थापित करू अशी बापूला उमेद वाटू लागली. सर्व शक्यता लक्षात घेऊन बापू - मोरोबा यांनी इंग्रजांशी गुप्त करार करून रघुनाथरावास पुण्यास आणण्याची मसलत योजली. खरेतर रघुनाथराव परत सत्तेवर येणे बापू किंवा मोरोबा यांपैकी कोणालाही परवडण्यासारखे नव्हते. पण, बालपेशव्याचे बाहुले नानाच्या हाती असल्याने त्यांनी दादाचे मोहरे पुढे दामटवण्याचा उपक्रम स्वीकारला. मोरोबा हा दादाचा पक्षपाती असून इंग्रजांशी त्याची जरुरीपेक्षा जास्त घसट असल्याचे नानाच्या नजरेतून सुटले नव्हते. परंतु, त्याला बापूचा पाठिंबा असल्याची नानाला अजिबात कल्पना नव्हती. कारस्थानात जरी मोरोबा आपल्या तोडीस तोड असला तरी कारस्थानामागे जे लष्करी पाठबळ लागले ते मोरोबाकडे नसल्याने नाना काहीसा निश्चिंत होता. मात्र, मोरोबाच्या आडून आपल्याशी विरुद्ध वागणाऱ्या इंग्रजाना वठणीवर आणण्यासाठी नानाने फ्रेंच वकिलास पुणे दरबारात मोठ्या सन्मानाने ठेऊन घेतले. त्याउलट इंग्रज वकील मॉस्टिनची पुणे दरबारात उपेक्षा होऊ लागली. नानाचे हे वर्तन इंग्रजांना असह्य होऊन त्यांनी नानाला कारभारातून काढण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गव्हर्नर जनरल हेस्टींग्सने बंगालहून ब्रिटीश फौज दक्षिणेत भूमार्गाने रवाना केली. वस्तुतः इंग्लिश सैन्य आजवर जलमार्गानेच दक्षिणेत येत असे, पण हेस्टींग्सने यावेळी मुद्दामहून खुष्कीच्या मार्गाने फौजा रवाना करून पुरंदरचा तह मोडण्याच्या दिशेने एक पाउल पुढे टाकले. मात्र, इंग्रजांनी अजून तरी उघडपणे पुणे दरबारविरुद्ध अधिकृतपणे युद्ध पुकारले नव्हते. ( फेब्रुवारी स. १७७८ ) 
                        उत्तरेतून इंग्लिश सैन्य दक्षिणेत येत असल्याच्या बातम्या मिळताच त्याचा योग्य तोच अर्थ घेऊन नाना, बापू व मोरोबा आपापल्या उद्योगास लागले. नानाने ओळखले की, आता इंग्रजांशी युद्ध अटळ आहे. त्याने सर्व सरदारांना आवश्यक त्या सूचना देऊन युद्धाची तयारी सुरु केली. बापूने यावेळी पलटी खाल्ली. बंगालचे इंग्रज दक्षिणेत येत आहे याचा अर्थ मुंबईकर दादास पेशवाईवर आणल्याखेरीज राहात नाहीत. दादाला पेशवेपदावरून पदच्युत करण्यात आपण पुढाकार घेतल्याने दादा सत्तेवर आल्यास आपली वाट लावण्यास तो मागेपुढे पाहणार नाही. तेव्हा मोरोबाची समजूत काढून दादाला पुण्यास न आणता त्याची व नानाची दिलजमाई घडवून आणावी असा विचार करून बापूने त्यादृष्टीने मोरोबाची मनधरणी चालवली. मोरोबा मात्र यावेळी हट्टास पेटला होता. त्याने निजामाच्या हद्दीत गुप्तपणे चाकरीस ठेवलेल्या गारदी व पठाण सैन्याला पुण्याला येण्याची आज्ञा केली. विना परवाना शस्त्रधारी लष्करी तुकड्या औरंगाबादहून पुण्याकडे येत असल्याचे नानाला समजताच त्याने पथके पाठवून घोडनदीजवळ कित्येक गारदी - पठान मारून काढले व उरलेल्यांना कैद केले. ताब्यात आलेल्या गारद्यांची चौकशी केली असता ते मोरोबाचे नोकर असल्याचे समजले. हि बातमी बापूला कळताच त्याने तातडीने मोरोबास पुढील संकटाची सूचना दिली. 
                मोरोबाने चिंतो विठ्ठल, बजाबा पुरंदरे, गोपाळ तांबवेकर, सदाशिव रामचंद्र इ. च्या मदतीने पुणे ताब्यात घेतले.  तत्पूर्वीच नाना पुरंदरावर जाउन लढाईच्या बंदोबस्ताने राहिला होता. ता. २६ मार्च १७७८ रोजी मोरोबाने पार्वतीबाईकडून मुख्य कारभाऱ्याची वस्त्रे घेऊन पुरंदरकडे प्रस्थान ठेवले. पुण्यातील घटनांची माहिती मिळताच आपा बळवंत, बाजीपंत अण्णा, पटवर्धन, फडके इ. नानाचे सहाय्यक सावधगिरीने पुण्याच्या दिशेने येऊ लागले. दरम्यान नानाने निजाम, भोसले यांनाही पत्रे पाठवून आपल्या मदतीस बोलावले. यावेळी वस्तुस्थिती अशी होती की, नानाचे पक्षपाती लांब होते तर मोरोबाचे त्याच्या समीप ! यावेळी बापूने जर त्यास मनापासून साथ दिली असती तर नानाचा ग्रंथच आटोपला जाणार होता !! परंतु, बापूच्या मनाने पलटी खाल्लेली असल्याने त्याने मोरोबा - नानाची भेट घडवून उभयतांमध्ये सख्य निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आपले फौजबंद सरदार दूरवर असल्याने नानाला वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारणे भाग पडून त्याने तात्पुरती माघार घेतली. नानाने अशी शरणागती पत्करताच बापूने मोरोबाचे मन वळवून त्यास इंग्रजांची मद आणण्यापासून परावृत्त केले, आणि सर्व कारस्थान रचून त्याचा उपशम केल्याचे श्रेय मिळवले. मात्र या क्षणिक विजयाच्या आनंदात त्यांना वस्तुस्थितीचे भान राहिले नाही. बंगालची फौज अजून नर्मदेपर्यंत आली नव्हती आणि मुंबईकरांनी पुण्यावर चालून यायचे ठरवले तरी अखेरीचे दिवस असल्याने ते या भरीस पडणार नव्हते. तात्पर्य, तोंडावर आलेला पावसाळा यावेळी नानाची कुमक करणार होता आणि नेमक्या याच महत्वाच्या घटकाकडे बापू - मोरोबाचे दुर्लक्ष झाले. मोरोबा सोबत तडजोड करत असतानाच नानाने महादजी शिंदे सोबत अंतस्थपणे संधान जोडले होते. मोरोबाच्या कारस्थानात जरी तुकोजी होळकर अंशतः सहभागी असला तरी अहिल्याबाई व महादजी हे दोघे एकविचाराने वागतात हे नानास पक्के माहिती होते. तेव्हा महादजीला आपल्या पक्षात ओढल्यास तुकोजी कुठे जाणार नाही याची त्याला खात्री होती. मात्र, नाना - महादजी यांच्या गुप्त मैत्रीचा बाहेर कोणासही पत्ता नव्हता. महादजीचे वर्तनचं असे होते की, त्यावरून तो नानास सामील असल्याचा संशयही न यावा ! वास्तविक नानाची बाजू घेण्यात महादजीचा देखील स्वार्थ साधला जाणार होता. मोरोबाचा पक्ष घेऊन जर त्याने नानाचा पाडाव केला असता तर राज्यात इंग्रजांचे वजन वाढून त्याचे महत्त्व घटणार होते. तसेच खुद्द दादा हा एक लढवय्या सेनानी असल्याने लष्करी बाबतीत महादजीच्या ओंजळीने पाणी पिण्याची त्यास थोडी गरज होती ? त्याउलट नाना हा लष्करी बाबतीत दुबळा असून त्याचे आपल्याविना काही एक चालणार नाही याची महादजीला जाणीव होती. त्यामुळे त्याने पूर्ण विचारांती नानाची बाजू घेण्याचा निर्णय घेतला आणि कोल्हापूर स्वारी जशीतशी आटोपून तो पुण्याकडे रवाना झाला. 
                          महादजी शिंदे पुण्याकडे येत असल्याचे समजताच बापू व मोरोबा गडबडून गेले. बापूने शिंद्यांची भेट घेऊन त्याच्याशी मैत्री जोडण्याचा प्रयत्न केला तर मोरोबाने महादजीची मोठ्या मिनतवारीने गाठ घेऊन देखील महादजी त्याच्याशी एक शब्दही न बोलता केवळ मुखावलोकन करून बैठकीतून निघून गेला. बापू व मोरोबाची भेट घेतल्यावर महादजीने तुकोजी होळकराचे मन वळवून त्यास मोरोबाच्या पक्षातून फोडले.  होळकराचा बंदोबस्त होताच महादजीने बापू व नानाची दिलजमाई घडवून आणली. यावेळी बापू हा मोरोबास सामील असल्याचे नाना आणि महादजीला माहिती नव्हते. आणि जरी माहिती असते तरी महादजीने नानाला बापूसोबत मिळते जुळते घेण्यास भाग पाडले असते. कारण, कारभारात एकट्या नानाचे प्रस्थ वाढू देणे आपल्या हिताचे नाही हे महादजी कधी विसरला नाही. नानालाही महादजीच्या अंतस्थ हेतूची जाणीव होती पण इतर काही पर्याय उपलब्ध नसल्याने त्याने नाईलाजाने बापूसोबत तडजोड केली. ता. ५ जून १७७८ रोजी झालेल्या बापू - नाना यांच्या करारनुसार दोघांनी एकमेकांशी निष्कृत्रीमपणे वागण्याचे मान्य केले. एकंदर कारभार एकविचाराने करण्याचे ठरवण्यात आले आणि आपल्या पश्चात नानाने आपल्या मुलास कारभारात घ्यावे अशी बापूने मागणी केली व नानाने ती मान्यही केली ! खरेतर बापूचा एकुलता एक मुलगा आकोपंत हा यापूर्वीच वारला होता. परंतु मुलगा होईल या आशेवर बापूने लग्न केले होते आणि मुलगा न झाल्यास दत्तक घेण्याचीही तयारी केली होती. मिळून अस्तित्वात नसलेला मुलाला बापूच्या माघारी कारभारात घेण्याचे मान्य करण्यात नानाला कसलीही अडचण वाटणार होती ? बापूचा अशा प्रकारे बंदोबस्त केल्यावर महादजीने तुकोजी होळकराचा कारभारी नारो गणेश यांस कैद केले. त्याच्याच सल्ल्यावरून तुकोजी मोरोबास सामील झाला होता. असो, सर्व लहान - मोठे फितूर जाग्यावर बसले तेव्हा नाना - महादजीने मोरोबाला पकडण्याचे कार्य हाती घेतले. ता. २२ जून रोजी हरीपंताने त्याच्या गोटावर चाल केली तेव्हा मोरोबा पराभूत होऊन पळून गेला. परंतु सरकारी फौजांनी त्यास बहुल मुक्कामी ताब्यात घेतले आणि नानासमोर हजर केले. नानाने त्यास नगरच्या किल्ल्यात नजरकैदेत टाकले. 
                सारांश, मोरोबाच्या कारस्थानात सखारामबापू सामील झाल्याने नानाची कारभारातून उचलबांगडी होण्याचा प्रसंग उद्भवला होता. परंतु, बापूचा धरसोडपणा नानाच्या पथ्यावर पडून त्याचा या समयी निभाव लागला. तसेच मोरोबाचे बंड मनोडून काढण्यात नानाने जी चतुराई दाखवली त्यावरून त्याच्या कारस्थानी स्वभावाविषयी काहीसा अंदाज बांधता येतो.  खरे तर परिस्थिती पूर्णतः प्रतिकूल असताना आणि त्याचे जीवन - मरण हे शत्रूच्या मर्जीवर अवलंबून असताना देखील त्याने हा जो डाव यशस्वी करून दाखवला त्यावरून नानाच्या कर्तबगारीची आणि बुद्धिमत्तेची कल्पना येते.
                                                                                   ( क्रमशः )
                                                                                     
                                                                         
                         

२ टिप्पण्या:

deom म्हणाले...

छान. नानाच्या कर्तृत्वावर, मराठे - इंग्रज यांतील घडणाऱ्या घडामोडी, नानाचा स्वभाव यांकडे वेगळ्या पैलूने बघण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे. एकंदरीत उत्सुकता वाढतेय …

sanjay kshirsagar म्हणाले...

Thank's deom !