शनिवार, ६ जुलै, २०१३

श्रीमंत रघुनाथराव पेशवे ( भाग - ५ )

 गुजरातवर इंग्रजांचा कब्जा :-  पुरंदरच्या तहानुसार कारभाऱ्यांनी अप्रत्यक्षपणे फत्तेसिंग गायकवाडास इंग्रजांच्या ओट्यात घातले होतेच. प्रस्तुत समयी त्याच्याशीच पत्रव्यवहार करून दादाने त्यास आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला. इकडे महादजीने देखील याचवेळी फत्तेसिंगला पत्र लिहून दादा इंग्रजांना भेटायच्या आत त्याला कैद करण्याची सूचना केली. स. १७७९ च्या पावसाळ्यानंतर परत एकदा इंग्रज - मराठा युद्ध भडकणार हे उघड होते. अशा परिस्थितीत पुणे दरबारात अंतस्थ लाथाळीमुळे इंग्रजांना यशस्वीपणे तोंड देण्याचे सामर्थ्य नसल्याचे ताडून नाना - महादजीने हैदरची मदत घेण्याचे ठरवले. याच सुमारास निजामाने इंग्रजांच्या विरोधात पेशवा, भोसले, हैदर व निजाम या महायुतीची कल्पना नानासमोर मांडली. त्यानुसार हैदरने मद्रासवर चाल करून जायचे होते तर निजामाने सध्याच्या आंध्रप्रदेशात. तसेच भोसल्यांनी बंगाल पालथा घालायचा होता व मुंबई, सुरत, दिल्ली येथील अनुसंधान पेशवे व त्यांच्या सरदारांनी सांभाळायचे होते. परंतु, कारस्थानात ठरल्यानुसार निजाम - भोसल्यांनी काहीच हालचाल केली नाही आणि मह्दाजी - नाना यांच्यात याच वेळी भांडण होऊन पुणे दरबार देखील निष्क्रिय राहिला. 
      वडगाव प्रकरणातून इंग्रज एक धडा शिकले व तो म्हणजे दादाच्या भरवशावर राहण्यात आता काही एक अर्थ नाही. आणि युद्ध करायचेचं झाले तर ते फक्त आपल्या फायद्यासाठीच करायचे, दादास पेशवाई मिळवून देण्यासाठी नव्हे ! मात्र, पुणेकरांना अडचणीत आणण्यासाठी दादाचा शक्य तितका उपयोग करून घेण्याचे त्यांनी मनोमन ठरवले. 
        गॉडर्डने स. १७७९ च्या पावसाळ्यात गुजरातमध्ये फत्तेसिंग गायकवाडास आपल्या बाजूला वळवण्यासाठी वकिली बोलाचाली व लष्करी बळ या दुधारी शस्त्राचा वापर केला. याच सुमारास दादा गुजरातमध्ये आला. त्याने गॉडर्डच्या सांगण्यानुसार आपल्या हस्तकांच्या मार्फत गुजरातमधून फत्तेसिंगाच्या मुलखात बंडाळी माजवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सरदारांत फितूर माजवला. गॉडर्डने फत्तेसिंगाचा कारभारी गोंदबा यास वश करून घेतले. तरीही सहजासहजी इंग्रजांचा आश्रय घेण्यास फत्तेसिंग तयार झाला नाही. त्याने शक्य तितका दादा आणि इंग्रजांचा प्रतिकार करत पुणेकरांच्या मदतीची वाट पाहिली. दसरा झाल्यावर किंवा दसऱ्याच्या आतचं महादजी आणि तुकोजी त्याच्या मदतीस गुजरातमध्ये येणार असल्याचे नानाने त्यास कळवले होते. परंतु, स. १७७९ च्या दसरा उलटून महिना झाला तरी महादजी - तुकोजीचा पाय महाराष्ट्रातून बाहेर पडेना तेव्हा नाईलाजाने ता. २६ जानेवारी १७८० रोजी फत्तेसिंग इंग्रजांच्या पंखाखाली गेला. इंग्रजांच्या शौर्यास व मुत्सद्देगिरीस दादाची जोड लाभल्याने त्यांना यावेळी गुजरातमध्ये यश प्राप्त झाले. तसे पाहिले तर इंग्रजांच्या या यशात महादजीचा देखील अप्रत्यक्षपणे वाटा आहे. आधी कबूल केल्यानुसार पावसाळा संपताच तो गुजरातमध्ये गेला असता तर फत्तेसिंग कदाचित इंग्रजांकडे रुजूही झाला नसता. परंतु हरिपंत फडक्यास नानाने काढून टाकावे असा हट्ट धरून त्याने विनाकारण तीन महिने जांबगावी बसून काढले. याप्रकरणी नानासोबत त्याचा पत्रोपत्री वाद चालू असताना फत्तेसिंगास पत्रे लिहून लवकरचं आपण मदतीस येत असल्याचे कळवण्यास तो विसरला नाही. फत्तेसिंगाने जानेवारी पर्यंत वाट पाहून शस्त्रे म्यान केली व शिंदेस्वारी फेब्रुवारीत गुजरातमध्ये प्रकट झाली ! मल्हारराव होळकरास अंगचोर, स्वार्थी, लबाड म्हणणाऱ्या इतिहासकारांनी महादजीच्या या वर्तनावर फारशी टीका केल्याचे दिसून येत नाही. याचा अर्थ असा नाही कि, महादजीवर टीका केलीच जात नाही. त्याच्यावर टीका जरूर केली जाते पण केव्हा ? तर त्याच्या तुलनेने नाना फडणीस कसा श्रेष्ठ होता हे दर्शवण्यासाठी !  
  
पहिल्या इंग्रज - मराठा युद्धाची इतिश्री :-  गुजरातमध्ये आल्यावर महादजीने ओलिस इंग्रजांना सोडून गॉडर्डकडे पाठवले व त्याच्याशी तहाची वाटाघाट सुरु केली. पण त्याचा मूळ हेतू कोणत्याही परिस्थितीत दादास आपल्या ताब्यात घेण्याचा असल्याचे ताडून गॉडर्डने महादजी सोबत तह करण्यास मुळीच उत्सुकता दाखवली नाही. दरम्यान दादाने गॉडर्डला, आपणांस पुण्याला घेऊन जाण्याची सारखी टोचणी लावली होती. मात्र, इंग्रजांना आता दादाला पेशवेपदी बसवण्यात अजिबात रस नसल्याने त्यांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करत आपले सर्व लक्ष मुंबईपासून गुजरातपर्यंतचा सलग प्रदेश ताब्यात घेण्याकडे केंद्रित केले. यामध्ये मोठा अडथळा वसईचा होता. मराठ्यांचे ते मजबूत ठाणे दि. १२ डिसेंबर १७८० रोजी गॉडर्डने जिंकून घेत पुणे दरबारास मोठा हादरा दिला. स. १७८० च्या पूर्वार्धात जरी शिंदे - होळकर गुजरातमध्ये गेले असले तरी पावसाळा येतच महादजी माळव्यात निघून गेला, तर होळकरांच्या हालचालीं विषयी माहिती मिळत नाही. परंतु एवढे निश्चित कि, गॉडर्डचा बंदोबस्त करण्यात यावेळी या दोन्ही सरदारांना अपयश आले. 
               स. १७८१ च्या जानेवारीत गॉडर्डने बोरघाट पार करून पुण्यावर चालून जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार फडके, पटवर्धन या सरदारांना न जुमानता तो फेब्रुवारीत बोरघाटात दाखल झाला. परंतु, पुढे परशुराम पटवर्धन आणि तुकोजी होळकराने पुणे दरबारची लाज राखली. होळकर, पटवर्धन यांनी गॉडर्डला घाटात कोंडून धरून त्याची रसद तोडल्याने त्यास पुण्याला जाण्याचा विचार सोडून द्यावा लागला. एप्रिलच्या पूर्वार्धात गॉडर्डने घाट सोडून मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला खरा पण मराठी फौजांसोबत लढाई देत माघार घेणे तितकेसे सोपे काम नव्हते. तळेगावच्या प्रसंगाची पुनरावृत्ती होते कि काय अशी इंग्रजांना धास्ती लागून राहिली होती. परंतु गॉडर्डने आपली सर्व अक्क्ल पणाला लावून ससैन्य यशस्वीपणे माघार घेतली. 
                       गॉडर्डला बोरघाटात माघार घ्यावी लागल्याने आणि हैदरने मद्रासमधून इंग्रजांचे समूळ उच्चाटन करण्याचा निकराने प्रयत्न केल्याने गव्हर्नर जनरल हेस्टींग्सला मराठ्यांशी युद्ध थांबवणे भाग पडले. यावेळी मद्रासमधील इंग्रजांवर मोठी आणीबाणीची वेळ आली होती. हैदरविरुद्ध त्यांना यश मिळणे तर दूरचं, पण त्याच्यापासून स्वतःचाच बचाव कसा करायचा याची त्यांना धास्त लागून राहिली. त्यामुळे त्यांनी मुंबईकर व हेस्टींग्सला मराठ्यांशी तह करून हैदरच्या बंदोबस्तासाठी फौज रवाना करण्याचा तगादा लावला. तेव्हा हेस्टींग्सने प्रथम महादजीसोबत स्वतंत्र तह करून त्यास युद्धातून बाहेर काढले आणि त्याच्या मार्फत पुणे दरबारसोबत फायदेशीर असा तह पदरी पाडून घेतला. 

रघुनाथरावाची अखेर :-  स. १७८३ च्या फेब्रुवारीत झालेल्या सालबाईच्या तहानुसार रघुनाथरावाने चार महिन्यांच्या आत कोठे स्थायिक व्हायचे ते निश्चित करावे आणि त्यास पुणे दरबारने दरमहा पंचवीस हजार रुपये खर्चास द्यावे असे ठरले. बदल्यात दादाला कसलीही मदत न करण्याचे इंग्रजांनी मान्य केले तर दादाच्या जीवितास अपय न करण्याचे आश्वासन पुणे दरबारने दिले. सालबाईचा तह घडून आल्यावर रघुनाथरावाने गोदावरीकाठी कोपरगाव येथे राहण्याचे ठरवले. मात्र पुणे दरबारचा विशेषतः, नाना फडणीसाचा त्यास भरवसा नसल्याने त्याने आपल्या सुरक्षेसाठी परशुरामभाऊ पटवर्धन, हरिपंत फडके आणि तुकोजी होळकर यांच्याकडून शपथपूर्वक लेखी आश्वासने मिळवली. दादाला आणण्यासाठी तुकोजी व हरिपंत गेले. ता. १६ जुलै १७८३ रोजी चांदवड येथे त्यांची भेट झाली. तेथून दादा कोपरगावी गेला. त्यावेळी त्याने गोपिकाबाईची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली पण गोपिकाबाईने त्यास नका दिला. तेव्हा गोदादारणा संगमी दि. ४ ऑगस्ट १७८३ रोजी नारायणरावाच्या खुनाबद्दल  विधीपूर्वक प्रायश्चित्त घेतले. त्यानंतर गोपिकाबाईने त्याची भेट घेतली. पुढे लवकरचं ता. ११ डिसेंबर १७८३ रोजी कचेश्वर गावी दादाची प्राणज्योत मालवली. दादाच्या निधनाची वार्ता नाना फडणीसाने पत्राद्वारे तुकोजी होळकरास कळवली ती अशी :- ' श्री. दादासाहेबांचे शरीरी समाधान नव्हते. मध्ये चांगले आरोग्यही झाले होते. फिरून ज्वर होऊन मार्गशीर्ष व॥ ३ गुरुवारी सहा घटका रात्रीस कैलासवास झाला. विसाजीआपाजीची रवानगी बाई व बाजीराव यांचे समाधानार्थ केली.'  

उपसंहार :-  स्थूलमानाने पाहता रघुनाथरावाने एकूण ४९ वर्षे आयुष्य उपभोगले. त्यातील आरंभीची १० - १२ वर्षे वजा केल्यास त्याचे राजकीय जीवन ३५ - ३७ वर्षांचे आहे. या तीस - पस्तीस वर्षांच्या आयुष्यात तथाकथित ' पेशवाईतील कलिपुरुषाने ' नेमके काय साध्य केले ? काय प्राप्त केले ? बाजीरावाची मजल फक्त दिल्लीचा दरवाजा ठोठावण्यापर्यंत गेली. परंतु त्याच्या या पराक्रमी पुत्राने अटकेवर भगवा फडकावून आपल्या बापावर ताण केली. उदगीर असो वा उरळी किंवा पेशवेपद प्राप्त स्वीकारल्यावर केलेली निजामाची स्वारी ; दादाने निजामाला डोकं वर काढू दिले नाही. त्याची हि कामगिरी निश्चितचं उल्लेखनीय अशीच आहे. दादाच्या कारकिर्दीचा काळाकुट्ट भाग म्हणजे माधवराव व नारायणराव या आपल्याच पुतण्यांच्या विरोधात याने केलेल्या कारवाया आणि त्यासाठी इंग्रज, हैदर, निजाम इ. मराठेशाहीच्या शत्रूंची घेतलेली मदत हा होय ! 
      स. १७६१ मध्ये पानिपत घडून गेल्यावर आणि नानासाहेब पेशव्याचा मृत्यू झाल्यावर पेशवेपदासाठी लायक असा पुरुष त्याच्याखेरीज कोण होता ? माधवाची लायकी - नालायकी अजून दिसून यायची होती. परंतु, तत्कालीन प्रघातानुसार गादीवरील व्यक्तीचा वंश हयात असताना त्याच वंशातील इतरांना -- म्हणजे भाऊबंदांना -- गादीवर बसवण्याचा प्रघात नव्हता. दादाच्या महत्त्वकांक्षेला पहिला मोठा अडथळा आला तो या ठिकाणी ! या प्रसंगी गोपिकाबाईने त्यास दिवाणी कारभार देण्याचा सल्ला मुत्सद्द्यांना दिला असता तर त्याच्या वृत्ती काहीशा शांत झाल्या असत्या. पण त्याला पूर्णतः कारभारातून बाहेर काढणे मूर्खपणाचे होते आणि थोरल्या माधवरावाने तो केला ! याचे फळ म्हणजे दादाने निजामाची साथ धरली. आळेगाव येथे किंवा यानंतरही जेव्हा - जेव्हा दादाने निजामाशी जवळीक केली तेव्हा - तेव्हा त्याला जो भूप्रदेशाचा नैवद्य दिला, तो मराठी राज्यात तहानुसार दाखल झाला असला तरी त्यावर माराठी राज्याचा प्रत्यक्ष असा अंमल कधी बसलेला नव्हता. म्हणजे, दादाने मराठी राज्याचे नुकसान काही केले -- निदान निजामासोबत केलेल्या मैत्रीत तरी -- असे म्हणता येत नाही. 
        हैदरला मात्र त्याने माधवरावाने रक्ताचे पाणी करून मिळवलेला प्रदेश देऊन त्याच्याशी सख्य जोडले खरे, पण ते केव्हा ? तर बारभाईंची स्थापना होऊन त्यांनी कारभार हाती घेतल्यावर ! इंग्रजांची मदत घेऊन दादाने फार मोठे पाप वा गुन्हा केल्याचे चित्र रंगवले जाते. पण, इंग्रजांकडे मदतीची भिक मागणारा तो काही पहिलाचं पेशवा नव्हता ! थो. बाजीरावाने आंगऱ्यांच्या विरोधात इंग्रज - पोर्तुगीजांकडे मदत मागितली होती. नानासाहेब पेशव्याने आंगऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांना साकडे घातले होते. थो. माधवरावाने निजाम व हैदरचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजांकडे मदतीची याचना केली होती. सारांश, इंग्रजांकडे या सर्वांनीच मदत मागितली असता केवळ रघुनाथरावासच का नावे ठेवली जातात ?  पेशवेपद मिळवण्यासाठी दादा एवढा हपापलेला होता कि, प्रसंगी पुतण्याचा काटा काढण्याच्या आज्ञापत्रावर सही करताना त्याचे हात कापले नाहीत पण तोच दादा इंग्रजांना वसई, साष्टी देण्यास सहजासहजी तयार झाला नाही. वसई, साष्टी देण्याचे मान्य केल्याखेरीज इंग्रज मदत करणार नाहीत असे दिसून आल्यावर केवळ नाईलाजाने त्याने वसई, साष्टीचे इंग्रजांना दान देऊन टाकले. 
                 सत्तेचा मोह हा राजघराण्यातील पुरुषांना नसतो असे कधी होत नाही. आपल्या घराण्याची सरदारकी साबाजी शिंद्याच्या घरात जाऊ नये यासाठी महादजीने होळकराचे पाय धरले. पण त्याच महादजीच्या पुतण्याचे -- तुकोजीपुत्र केदारजीचे पुढे काय झाले याविषयी इतिहासकार गप्प का आहेत ? तुकोजी शिंदे हा राणोजीचा औरसपुत्र असून पानिपतावर जनकोजी, तुकोजी मारले गेल्यावर शिंद्यांच्या सरदारकीवर केदाराजीचा हक्क होता. पण धोडपच्या युद्धांत त्याने दादाची साथ दिल्याने युद्धानंतर माधवाने केदारजीस पकडून महादजीच्या ताब्यात दिले. त्यानंतर केदाराजीचे काय झाले याविषयी फारशी माहिती मिळत नाही. तो कधी मेला किंवा मारला गेला ? त्याला महादजीने कैदेत ठेवले कि कुठे स्वतंत्र जहागीर दिली याची माहिती मला तरी मिळाली नाही. हे झाले शिंद्यांचे उदाहरण. प्रत्यक्षात स्वराज्यसंस्थापक शिवछत्रपतींच्या घरात तरी काय झाले ? संभाजीला औरंगजेबाने कैद केले, त्यास खुद्द संभाजीच्या घरातून पाठिंबा नव्हता असे कोणी म्हणून शकेल काय ? संभाजीवर मोगलांचा छापा पडला तेव्हा त्याची बरीचशी फौज आपल्या राजाला मागे टाकून पळून जाते याचा अर्थ काय ? संभाजी कैद झाल्यावर राजाराम मंचकारोहण करतो पण भावाच्या सुटकेसाठी औरंगजेबासोबत तहाची वाटाघाट करत नाही याचा अर्थ काय होतो ? 
                      शिंदे, भोसले हे मराठा आहेत म्हणावे तर ब्राह्मणी परंपरेचे भट घराणे तरी या दोषापासून अलिप्त राहिले असे म्हणता येत नाही. बाजीराव - मस्तानी संबंधांचा गवगवा केव्हा झाला ? तर समशेरबहाद्दरच्या रूपाने पेशवाईचा नवा वारस जन्माला आले तेव्हा ! गारपीरावर मुजफ्फरखान गारद्याने निजामाच्या सांगण्यावरून भाऊचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असे सांगितले जाते पण, खरोखर तो कट निजामानेचं रचला होता कि भट कुटुंबीयांनी यावर कोणी विचार वा चर्चा केली आहे ? पानिपतावर भाऊ मारला गेल्याबद्दल जर माधवरावाची खात्री झाली होती तर त्याने सदोबाच्या तोतयाला का जिवंत ठेवले होते ? उलट असे खूळ राज्यात राहिल्यास मागे - पुढे आपणांस वा आपल्या वंशजांना भारी पडू शकते याची त्या सुज्ञ पेश्व्यास जाण नसावी ? याच तोतयाला आपला पुतण्या म्हणून मान्यता देण्यामागे बाळाजी विश्वनाथची कन्या -- अनुबाई घोरपडे हिचा कोणता स्वार्थ साधला होता ? सारांश, राघोबा सत्ताभिलाषी होता म्हणून त्याचा धिक्कार करणाऱ्यांनी प्रथम इतिहासाचे डोळसपणे वाचन करावे. नारायणरावाचा खून करण्याची लेखी आज्ञा देण्यात दादाने मोठी चूक केली असे सामान्यतः म्हणता येईल. परंत, नारायणाच्या कैदेत आपणांस आयुष्यभर राहावे लागणार याची कल्पना आल्यावर दादासमोर तरी दुसरा पर्याय काय होता ?
        आपल्या मुख्य प्रतिस्पर्ध्यास संपूर्णतः नष्ट केल्याखेरीज सत्ता प्राप्त करणे वा तिचा उपभोग घेणे शक्य होत नाही,  या कटू पण राजकीय सत्याचा अनुभव रघुनाथरावास धोडप येथे पराभूत झाल्यावर माधवच्या कैदेत असताना आला. माधवराव खरोखरचं संयमशील पेशवा होता म्हणून त्याने चुलत्याचा काटा काढला नाही. पण त्याचे फळ त्यास भोगावे लागलेच. कैदेत पडलेल्या चुलत्याच्या उपद्व्यापांची सतत टांगती तलवार माधवाच्या मानेवर तळपत राहिली. मात्र,नारायण हा माधव इतका संयमशील नव्हता. जर दादाने त्याचा खून करण्याची योजना आखली नसती वा अंमलात आणली नसती तर नारायणाने,  दादाचा पलायन करण्याचा एखादा कट उघडकीस आल्यावर दादाचा निकाल लावून टाकण्याचा निर्णय घेतलाचं नसता असे कोणी छातीठोकपणे सांगू शकेल काय ? त्वरेला तिथे महत्त्व होते आणि दादाने ते ओळखून नारायणाचा खून केला. एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्याच्या कृतीचे समर्थन कोणीही करू नये व माझाही असा उद्देश अजिबात नाही. परंतु , ऐतिहासिक घटनांचे तटस्थपणे विश्लेषण करताना प्रसंगी मानवी भावना - विकार बाजूला ठेवावेचं लागतात, त्याला इलाज नाही ! 
                राजसत्तेच्या प्राप्तीसाठी पुतण्याचा खून करण्याचादादाने जसा कटू निर्णय घेतला, त्याचप्रमाणे समुद्रप्रवास करून त्यावेळी ब्राम्हणांमध्ये प्रचलित असलेली समुद्रबंदीचे देखील उल्लंघन करण्याचे त्याने धाडस केले. अर्थात, या दोन्ही पातकांबद्दल त्याने प्रायश्चित्त घेऊन आपला कर्मठपणादेखील लगोलग सिद्ध केला. पण पेशवेपदावरील व्यक्तीचे हे कृत्य निश्चित दखल घेण्यासारखे आहे.
      सारांश, भट घराण्यातील कर्तबगार पुरुषांच्या मालिकेत रघुनाथरावाचे नाव निश्चितपणे शोभण्यासारखे आहे. सत्तेसाठी भले त्याने पुतण्याचा खून केला असेल पण प्रजेच्या दृष्टीने पाहिले असता तो अन्यायी वा जुलमी सत्ताधीश नव्हता हे लक्षात घेतले पाहिजे. एक कारभारी मंडळ व त्यातही नाना फडणीस आणि त्याचे अनुयायी सोडले तर बाकी कित्येकांचा दादाला पाठिंबा होता हे विसरता येत नाही. तात्पर्य, रघुनाथरावाच्या कारवायांनी मराठी राज्याचा विनाशकाल जवळ आला असे म्हणणे चुकीचे आहे. मराठी राज्य निकालात निघण्याची कारणे दुसरीचं आहेत पण, कोणाचा तरी बळी द्यायचा म्हणून दुसऱ्या बाजीरावासोबत रघुनाथरावचे नाव उगाचचं घुसवले गेले आहे.      
                                                                          ( समाप्त ) 

संदर्भ  ग्रंथ :- 
१) मराठी रियासत ( खंड - ४, ५ व ६ ) :- गो. स. सरदेसाई 
२) मराठे व इंग्रज :- न. चिं. केळकर 
३) नाना फडणवीस यांचे चरित्र :- वा. वा. खरे 
४) ज्ञात - अज्ञात अहिल्याबाई होळकर :- विनया खडपेकर 
५) काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे :- य. न. केळकर 
६) भूतावर भ्रमण ( ऐतिहासिक लेखसंग्रह ) :- य. न. केळकर
           
                        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: