गुरुवार, २५ जुलै, २०१३

बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीस ( भाग - १ )

                          

              बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीसाचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास हे असून त्याचे पूर्वज हे त्या गावचे वतनदार होते. वेळास गाव बाणकोट खाडीच्या दक्षिण तीरास असून त्याच खाडीच्या उत्तर तीरी श्रीवर्धन हे गाव आहे. या ठिकाणी त्या प्रांताचे देशमुख असलेले बाळाजी विश्वनाथ भटाचे घराणे नांदत होते. निवासाचे व कार्याचे क्षेत्र एकच असल्याने भट व भानू या दोन घराण्यांचे तसे स्नेहसंबंध होतेचं. 
                  स. १७०० - १७१०  च्या दरम्यान आंग्रे व जंजिरेकर सिद्द्यांचा झगडा जुंपला. त्यावेळी बाणकोट खाडीवर हबश्यांचा अंमल होता. सिद्द्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आंगऱ्यांनी श्रीवर्धनच्या देशमुखांची म्हणजेच बाळाजी विश्वनाथची मदत घेतली. हि बाब सिद्द्यांना समजताच त्यांनी बाळाजी विश्वनाथ व जानोजी विश्वनाथ या भट बंधूंना कैद करण्यासाठी शिपाई पाठवले. त्यावेळी भट बंधू वेळास येथे हरी महादेव, रामजी महादेव व बाळाजी महादेव या भानू बंधूंच्या आश्रयास आले. तेथे या सर्वांचा विचारविनिमय होऊन त्यांनी कोकण सोडून घाटावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्रिवर्ग भानु व भट बंधू निघून जात असताना अंजनवेलीच्या किल्लेदाराने भट बंधूंना कैद केले. त्यावेळी त्रिवर्ग भानूंनी हरतऱ्हेने प्रयत्न करून भट बंधूंची सुटका केली. भानूंचे हे ऋण बाळाजी विश्वनाथ व त्याचे वंशज कधी विसरले नाहीत. योग्य समय येताच बाळाजीने भानूंच्या उपकारांची परतफेड करण्याचा मनोमन निर्धार केला. 
                       पुढे यथावकाश बाळाजी विश्वनाथास सातारकर छत्रपतींची पेशवाई मिळाली. त्यावेळी त्याने राज्याची फडणीशी स्वतःकडे मागून घेतली आणि फडणीशीची वस्त्रे हरी महादेव भानूस प्रदान केली. ( जानेवारी स. १७१४ ) त्याखेरीज रामजी महादेवला लोहगडाची सबनिशी व हरी महादेवला नाणे मावळची मुजूमदारीही देण्यात आली. इथपासून मराठी राज्यात भट घराणे पेशवेपदी तर भानू फडणीसपदी विराजमान झाले. मात्र, फडणीशी पदाचा उपभोग घेण्याचे भाग्य काही हरी महादेवास लाभले नाही. फडणीसपद प्राप्त झाल्यावर अवघ्या काही महिन्यांतच जेजुरी मुक्कामी त्याची मृत्यू झाला. तेव्हा फडणीशीचा दरख पेशव्याने रामजी महादेव व बाळाजी महादेव या बंधूंकडे सोपवला. स. १७१८ - १७१९ मधील बाळाजी विश्वनाथच्या प्रसिद्ध दिल्ली स्वारीत बाळाजी महादेव मारला गेला. तेव्हा फडणीशीची सर्व सूत्रे रामजी महादेवच्या हाती गेली, परंतु तो देखील लवकरचं मरण पावल्याने त्याचा मुलगा बाबुराव रामचंद्र आणि बाळाजी महादेवचा मुलगा जनार्दन बाळाजी यांना पहिल्या बाजीरावाने फडणीशी दिली. प्रस्तुत प्रसंगी हे दोन्ही चुलत बंधू अल्पवयीन असल्याने फडणीसाचे काम त्यांच्या जवळच्या आप्तामार्फत घेण्यात येत असे पण हे दोघेही वयात येताच त्यांनी कारभार आपल्या हाती घेतला. पुढे स. १७५६ मधील दादाच्या पहिल्या उत्तर हिंदुस्थानच्या स्वारीत पोटशूळाच्या विकाराने जनार्दन बल्लाळचे निधन झाले व  त्याच्या पश्चात ता. २९ नोव्हेंबर १७५६ रोजी बाळाजी जनार्दन उर्फ नाना यांस फडणीशीची वस्त्रे प्राप्त झाली. यावेळी नानाचे वय अवघे १४ वर्षांचे होते.  
                            नाना अल्पवयीन व प्रकृतीने अशक्त असल्याने स्वारीची फडणीशी व दरबारची प्रमुख कामे त्याचा चुलता बाबुराव रामचंद्र हाच पाहत असे. स. १७६० - ६१ च्या पानिपत मोहिमेत नाना फडणीस आपली पत्नी व आईसह सहभागी झाला होता. या स्वारीत त्याचा मामा व मोहीमप्रमुख सदाशिवरावभाऊचा विश्वसनीय सरदार आणि मित्र बळवंतराव मेहेंदळे हा देखील सामील झाला होता. ता. १४ जानेवारी १७६१ रोजी झालेल्या पानिपतच्या युद्धात मराठी फौजांचा मोठा पराभव झाला. पराभवानंतर झालेल्या लुटालुटीत आणि धावपळीत नानाची त्याच्या आई व पत्नीपासून ताटातूट झाली. पुढे सुदैवाने नानाची व त्याच्या बायकोची गाठभेट घडून आली परंतु त्याच्या आईचा काही ठावठीकाणा लागला नाही. पानिपतच्या पराभवानंतर झालेल्या जीवघेण्या पाठलागातील अनुभव आणि मातेचा वियोग यांमुळे नानाच्या स्वभावात बराच बदल घडून आला असे मानले जाते. नानाचे चरित्रकार श्री. वासुदेवशास्त्री खरे यांच्या मते ' पूर्ववयातील विपत्तींच्या योगाने नानाच्या स्वभावावर काहीशी खिन्नतेची छाया पडून राहिली ती शेवटपर्यंत नष्ट झाली नाही. त्याच्या वृत्तीमध्ये गांभीर्य उत्पन्न होऊन ; चैनी, लहरी व रंगेल स्वभावाच्या लोकांचा त्यास तिटकारा येऊ लागला. ' खरे शास्त्रींनी नानाच्या स्वभावाचे जे वर्णन केले आहे आणि त्याच्या या स्वभावाचा व पानिपतचा जो संबंध जोडला आहे तो मला अजिबात मान्य नाही. नानाचे आत्मवृत्त पाहिले असता असे दिसून येते की, तो लहानपणापासूनचं अतिधार्मिक व श्रद्धाळू स्वभावाचा होता. तसेच त्याची प्रकृती अशक्त असल्याने त्याचा स्वभाव तब्ब्येतीने कमजोर असलेल्या व्यक्तींचा ज्याप्रमाणे चिडचिडा वा अंतर्मुख असतो तसा एकलकोंडा बनला होता. प्रसंगोत्पात व्यक्तीच्या स्वभावात बदल घडून येत असतात हे जरी सत्य असले तरी बदललेल्या स्वभावाचे बीज त्या व्यक्तीमध्ये पूर्वापार असल्याखेरीज टोकाचे बदल घडून येत नाहीत. तात्पर्य; नानाचा स्वभाव पूर्वीपासूनचं अंतर्मुख असून पानिपत नंतर तो जर जास्तचं प्रकर्षाने प्रकट झाला इतकेच काय ते सत्य असून त्याच्या या स्वभावाचा आणि पानिपतच्या पराभवाचा तसा फारसा काही संबंध नाही. तसाच संबंध जोडायचा असेल तर बळवंतराव मेहेंदळेचा मुलगा आपा बळवंत याचाही जोडावा लागेल. त्याने तर अल्पवयात आई व बापाला या स्वारीत गमावले होते. त्याच्या डोळ्यांदेखत त्याची आई, नवऱ्याच्या शवासोबत सती गेली होती. परंतु आपा बळवंतचा स्वभाव नानाप्रमाणे धीरगंभीर किंवा खिन्न बनल्याचा उल्लेख आढळत नाही. 
                 भानू व भट घराण्याचे पूर्वापार संबंध, नानासाहेब व भाऊचे नाना आणि मोरोबा या चुलत बंधूंवर असलेले प्रेम यांमुळे हे दोन्ही बंधू , विशेषतः नाना हा भट घराण्याशी -- त्यातल्या त्यात नानासाहेब पेशव्याच्या वंशजांशी जास्त एकनिष्ठ राहिला. असो, पानिपत नंतर नानासाहेब पेशव्याचे निधन होऊन माधवराव पेशवेपदी विराजमान झाला. त्यावेळी नाना आणि त्याचा चुलता बाबुराव हे फडणीशी पाहात होते परंतु ; दादासाहेब आणि माधवरावाच्या कलहात भानूंना उभयतांची मर्जी रक्षून आपला निभाव करणे भाग पडले. राक्षसभुवनच्या संग्रामानंतर दादाचे प्रस्थ कमी होऊन माधवरावाचे स्वतंत्र कर्तुत्व झळकू लागल्याने नानाच्या उदयकालास प्रारंभ झाला. येथून पुढे म्हणजे माधवराव पेशव्याच्या मृत्युपर्यंत त्यास फडणीशी व्यवहार सांभाळत असताना रघुनाथरावाची मर्जी रक्षून मोहिमेवर असलेल्या पेशव्याच्या माघारी तो काही कट - कारस्थान रचणार नाही याचीही दक्षता घेण्याची बिकट जबाबदारी त्यास पार पाडावी लागली. सुमारे ७ - ८ वर्षे हे कार्य नानाने मोठ्या निष्ठेने आणि सावधतेने पार पाडले. खरेतर हि कामगिरी पार पाडणे म्हणजे निव्वळ तारेवरची कसरत होती. चुलत्याने कितीही उपद्व्याप केले तरी त्यास नजरकैदेत ठेवण्यापलीकडे त्यास जीवे मारण्याचा अथवा त्यास अधू करून जाग्यावर बसवण्याचा विचार माधवरावाच्या मनात कधीच आला नाही. दादा जरी नजरकैदेत असला व पेशव्याच्याविरोधात कट - कारस्थान रचत असला तरी तो पेशवे घराण्यातील असल्याने त्याचा योग्य तो आदर आणि मान राखण्याची खबरदारी घेण्यास स्वतः माधवराव चुकत नसे. या पार्श्वभूमीवर नानाला दादाचा मानसन्मान रक्षून त्याच्यावर देखरेख करण्याचे कार्य पार पाडण्यास किती प्रयास पडत असतील याची वाचकांनी कल्पना करावी. 
              ता. १८ नोव्हेंबर १७७२ रोजी थेउर मुकामी माधवराव पेशव्याचा मृत्यू होऊन दि. १३ डिसेंबर १७७२ रोजी नारायणराव पेशवा बनला. माधवराव आणि नारायणराव या दोन बंधूंमध्ये कमालीचे अंतर होते. व्यक्तीच्या गुणांची पारख करून त्यांच्याकडून आपल्यास अनुकूल असे कार्य काढून घेण्याची हातोटी माधवरावाकडे होती. याबाबतीत नारायण कमी पडला. अर्थात, पेशवेपद प्राप्त झाले त्यावेळी नारायणाचे वय १७ वर्षांचे असल्याने राज्यकारभाराचा अनुभव घेऊन स्वतःचे बरे - वाईट मत बनवण्याची योग्यता त्याच्या अंगी येण्यास काही कालावधी लागणे स्वाभाविक होते. परंतु, रघुनाथरावच्या कारस्थानामुळे त्याची आयुष्यमर्यादा अगदी अल्प बनली. राज्यकारभार करताना माधवराव वेळप्रंसगी दादाच्या पक्षपात्यांचाही सल्ला घेत असे. अर्थात, अनुभवाने त्यास शहाणपण आलेले असल्याने कोणाचे कधी ऐकावे याची त्यास चांगलीच जाणीव होती. नारायणास हा पोच येण्यास अवधी मिळाला नाही. तरीही त्याने जो काही आठ महिने राज्यकारभार केला त्यात त्याचे प्रमुख सल्लागार सखारामबापू आणि हरिपंत फडके हे दोघे होते. पैकी बापू हा दादाचा पक्षपाती तर हरिपंत माधवाचा ! मात्र यामुळे कारभारात विसंवाद असा निर्माण झाला नाही. नाना फडणीस यावेळी मुख्य राजकारणापासून अलिप्त असा आपली फडणीशी सांभाळून राहिला होता. मुख्य धन्याचा त्यास पाठिंबा नसल्याने त्याने यावेळी फक्त आपल्या पायापुरते पाहण्याचे धोरण स्वीकारले होते.              नारायणरावाचा खून होण्यास ज्या घटना कारणीभूत ठरल्या, त्या तशा वरवर पाहता स्वतन्त्र दिसत असल्या तरी त्यांत एकसूत्रता होती. उदाहरणार्थ, दादाचे कैदेतून पलायन करण्यासाठी वारंवार प्रयत्न करणे -- त्यासाठी हैदरअली आणि नागपूरकर भोसल्यांच्या वकिलांनी त्यास मदत करणे -- ब्राम्हण - प्रभू वादात नारायणराव पेशव्याने प्रभूंना शुद्र ठरवल्याने प्रभू मुत्सद्द्यांनी दादाची बाजू घेणे इ. या ज्या काही घटना आहेत त्या तशा स्वतंत्र वा विस्कळीत दिसत असल्या तरी त्या घटना घडून येण्यामागे नारायणराव पेशवा कारणीभूत असल्याने उपरोक्त घटनांतील संबंधित व्यक्तींमध्ये त्याच्याविरोधात नाराजी उत्पन्न होणे स्वाभाविक होते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे नारायणरावास कैद करून त्याच्याजागी दादासाहेबास पेशवेपदी बसव्ण्याच्ये कारस्थान घटू लागले. मुद्दाम लक्षात घेण्याची बाब म्हणजे नारायणास ठार करण्याची इच्छा पेशवे कुटुंबीय अपवाद केल्यास इतर कोणाच्याही मनात आली नव्हती ! नारायणास कैद करण्याच्या कटात जसा बापू सहभागी होता तसाच नानाचा चुलतभाऊ मोरोबादादा देखील सामील होता. याखेरीज कित्येक लहान - मोठे मुत्सद्दी व सरदार या कटात शरिक होते. राहता राहिला नारायणास ठार करण्याचा निर्णय कोणी घेतला हा मुद्दा तर, रघुनाथरावानेच आयत्यावेळी गारद्यांच्या सांगण्यावरून नारायणास पकडण्याऐवजी त्यास मारून टाकण्याचा निर्णय घेतला. 
            नारायणराव पेशव्यास कैद करण्याचा कट रचला जात असल्याची बातमी पुण्यात जवळपास सर्वांनाच माहिती झाली होती. खुद्द नाना फडणीसास देखील याची कल्पना होती.  परंतु, माधवाच्या वेळी राज्यकारभारात जसे त्याचे वजन होते तसे नसल्याने आणि नारायणाचा  देखील नानावर फारसा विश्वास नसल्याने नाना याबाबतीत उदासीन राहिला. त्याशिवाय एखादा कट रचला जाउन फारतर नारायणास कैद केले जाईल अशी त्याची प्रामाणिक समजूत होती, पण त्याचा खून करण्यापर्यंत कटवाल्यांची मजल जाईल अशी त्यास अजिबात कल्पना नव्हती. असो, दि. ३० ऑगस्ट १७७३ रोजी शनिवारवाड्यात गारद्यांनी नारायणराव पेशव्याचा खून करून रघुनाथरावास कैदेतून सोडवले. शनिवारवाड्यात नेमके काय घडले याची बातमी त्याच दिवशी संध्याकाळी दरबारातील सर्व प्रमुख मुत्सद्द्यांना व सरदारांना समजली. दादाची कैदेतून सुटका होऊन तो पेशवा बनला याचे कोणाला फरसे वाईट वाटले नाही पण नारायणराव मारला गेल्याबद्दल दादाच्या पक्षपात्यांनाही बराच खेद वाटला. दादाचा कट्टा अभिमानी सखारामबापू तर या बनावाने गळाठून गेला. दादाचा निरोप घेऊन त्याने दुसऱ्या दिवशी पुणे सोडले. नाना व मोरोबा मात्र दादाच्या आज्ञेनुसार त्याच्या सेवेत दाखल झाले. 
                       मराठेशाहीत वा पेशवाईत नारायणराव पेशव्याचा खून ही एक मोठी राजकीय उलथापालथ घडवण्यास कारणीभूत ठरलेली घटना होती. या खुनामुळे मराठी राज्याच्या सत्ताकेंद्रात बदल घडून आला असे पुढील इतिहास सांगतो. छत्रपती शाहूच्या निधनानंतर छत्रपतींची सत्ता जशी पेशव्यांच्या हाती आली त्याचप्रमाणे नारायणरावाच्या खुनानंतर पेशव्यांची सत्ता नाना फडणीससारख्या एका कारकुनाच्या हाती एकवटली. पण सत्तेचे हे हस्तांतरण काही सहजासहजी घडले नाही. किंबहुना, शाहूच्या मृत्यूनंतर छत्रपतींची सत्ता पेशवा बळकावणार हे  सर्वांना माहिती होते पण, नारायणरावाच्या खुनानंतर पुणे दरबारातील कोणी सरदार वा मुत्सद्दी आत्ताच्या भाषेत ' सत्तेचा रिमोट कंट्रोल ' हाती घेईल असे कोणाच्या मनात देखील आले नव्हते. उलट, नारायणाचा खून झाल्यावर आता आपल्या हाती काही पर्याय नाही असे समजून सर्व मुत्सद्द्यांनी आणि सरदारांनी दादासाहेबास मनोमन आपला धनी मानला होता. असो, नारायणाचा खून झाला त्यावेळी त्याची पत्नी -- गंगाबाई --  ही गर्भवती होती. यावेळी मुत्सद्दी मंडळात अनेक अनुभवी आणि कारस्थानी पुरुष मौजूद होते. मात्र दादाला पदच्युत करून त्याच्याजागी प्रथम गंगाबाई व नंतर ती प्रसूत झाल्यावर तिच्या मुलास पेशवा बनवण्याची योजना आखण्यास सखारामबापूने तेवढा पुढाकार घेतला. त्यास हरिपंत फडके, त्रिंबकराव पेठे इ. माधवरावाच्य पक्षपात्यांचा पाठिंबा होता. आरंभी नाना फडणीस या कटात सहभागी नव्हता. त्यास बापूचा भरवसा नसल्याने सुरवातीला तो काहीसा तटस्थ राहिला. पण नंतर मात्र त्याने या कारस्थानाच्या कामी आपली सर्व शक्ती पणास लावली. यावेळी सिंहगड, पुरंदर व लोहगड हे पुण्याजवळचे किल्ले नानाच्या ताब्यात असून त्याखेरीज पेशव्यांची खासगी मालमत्ता आणि सातार संस्थानचा कारभार देखील त्याच्या हाती होता. 
                   नाना बारभाई मंडळात आल्याने या मंडळाचे सामर्थ्य वाढले. नारायणरावाचा खून झाल्यावर दादाने पेशवेपद धारण केल्यावर निजाम आणि हैदरवर स्वारी करण्यासाठी तो पुण्यातून बाहेर पडला. या मोहिमेत पेठे, पटवर्धन, फडके,  नाना व बापू हे बारभाई कारस्थानाचे मुख्य शिलेदार दादासोबत हजर होते. गंगाबाईचा मुक्काम या सुमारास पुण्यात होता. स्वारीत असताना दादा आणि आनंदीबाईने गंगाबाईचा गर्भपात करण्याचा वा तिला ठार करण्याचा खटाटोप चालवला. हे वर्तमान समजताच बारभाई मंडळातील एकेक मुत्सद्दी काही ना काही निमित्ताने दादाची छावणी सोडून पुण्यास परतू लागला. ता. १७ जानेवारी १७७४ रोजी नाना - बापू यांनी गंगाबाईस शनिवारवाड्यातून बाहेर काढून पुरंदरावर नेले आणि पुण्यात तिच्या नावाने द्वाही फिरवून कारभार आपल्या हाती घेतला. यावेळी कारभारीमंडळाची रचना बनून त्यात प्रमुख कारभारी बापू असून दुय्यम कारभाऱ्याचे पद नानाकडे आले आणि प्रमुख सेनापतीपद त्रिंबकराव पेठ्यास देण्यात आले. ता. १७ जानेवारी ते १८ एप्रिलपर्यंतचे ४ महिने बारभाई मंडळास मोठ्या संकटाचे गेले. ता. २७ फेब्रुवारी १७७४ रोजी कारभाऱ्यांच्या विनंतीवरून सातारकर छत्रपतींनी दादासाहेबास पेशवेपदावरून बडतर्फ केल्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामुळे चिडून जाउन दादा पुरंदरच्या रोखाने येऊ लागला. त्यावेळी त्याला अडवण्यासाठी पुढे गेलेल्या त्रिंबकराव पेठ्याची व दादाची कासेगाव येथे ता. २६ मार्च रोजी लढाई घडून आली. यात पेठ्याचा पराभव होऊन तो जखमी अवस्थेत दादाच्या हाती लागला व काही दिवसांनी जखमा असाध्य होऊन मरण पावला. त्रिंबकरावाच्या मृत्यूने कारभारी काही काळ कुंठीत झाले. परंतु लवकरचं त्यातून सावरून बापूने आपल्या सहकाऱ्यांना धीर दिला. त्यातच त्रिंबकरावाची उणीव भरून काढण्यास हरिपंत पुढे सरसावल्याने कारभाऱ्यांची खचलेली बाजू काहीशी सावरली. दरम्यान, आपल्या विरोधात दादाला निजाम - भोसल्यांनी मदत करू नये म्हणून कारभाऱ्यांनी निजाम - भोसल्यांना पैसा आणि काही भूप्रदेश तोडून देऊन त्यांना आपल्या लगामी लावून घेतले. 
                                इतके सर्व उपद्व्याप करून देखील गंगाबाई प्रसूत झाल्यास तिला मुलगाच होईल याची शाश्वती नव्हती ! पण ज्या कारस्थानाचे बापू - नाना सारखे आधारस्तंभ होते, ते अशा संकटाला थोडी भिक घालणार ! गंगाबाईस जर मुलगी झाली तर गंगाबाईस दत्तकपुत्र देऊन त्याच्या नावे पेशवेपद घेण्याची त्यांची तयारी होती. त्याहीउपर म्हणजे, मुलगा झाल्यास काही हितशत्रू मुद्दाम असा आक्षेप घेतील कि मुलगी झाली असता मुलांची अदलाबदल करून मुलगा झाल असे जाहीर करण्यात आले आहे. हि शक्यता लक्षात घेऊन आणि विरोधकांना हि संधी देखील  साधण्याची मोकळीक न राहावी यासाठी बापू व नानाने छत्रपतींना विनंतीपत्र पाठवून आपले विश्वासू हुजरे आणि दोन स्त्रिया पाठवण्यास सांगितले. गंगाबाईच्या प्रसूतीसमयी छत्रपतींनी पाठवलेल्या स्त्रिया समक्ष हजर असल्याने मुलांची अदलाबदल केल्याचा आरोप कोणी करणार नाही आणि केला तरी तो टिकणार नाही असा या उभय कारभाऱ्यांचा विश्वास होता. अखेर दि. १८ एप्रिल १७७४ रोजी गंगाबाई प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. त्याचे नाव माधवराव असे ठेवण्यात येउन हाच पुढे ' सवाई माधवराव पेशवा ' म्हणून ओळखला जाऊ लागला. बापू व नाना यांनी माधवरावाच्य नावाने छत्रपतींकडून पेशवेपदाची वस्त्रे मागवून त्यास वयाच्या ४० व्या दिवशी म्हणजे ता. २८ मे १७७४ रोजी देण्यात आली.
                                                                                    
                                                                                         ( क्रमशः )
              
                  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: