मंगळवार, ३० जुलै, २०१३

बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणीस ( भाग - ४ )

     

                    
                       स. १७८७ मध्ये निजाम - पेशव्यांची टिपूवरील स्वारी तशी निष्फळ ठरली होती आणि इंग्रजांनी तटस्थ राहून दुरून गंमत पहिली होती. परंतु, पुढील दोन - तीन वर्षांत राजकारणाचे रंगरूप साफ पालटले होते. उत्तरेत महादजीने आरंभीचे अपयश पचवून स. १७९० च्या सुमारास अभूतपूर्व यश संपादले होते. दक्षिणेत निजामाचे तसे पाहिले तर नाममात्र अस्तित्व उरले होते. टिपूचे सामर्थ्य वाढीस लागून इंग्रज - मराठे - टिपू असा तिरंगी सामना जुंपण्याची चिन्हे दिसत होती. पैकी टिपूची राजवट एकमुखी व एकसूत्री असल्याने आणि मुख्य म्हणजे मर्यादित असल्याने त्याच्याकडून इंग्रज वा मराठ्यांना फार मोठा धोका पोहोचणार नव्हता. मात्र, त्याने इंग्रजांना मराठ्यांविरुद्ध अथवा मराठ्यांना इंग्रजांविरुद्ध मदत करण्याचे ठरवले तर मात्र दोघांपैकी एकाच काटा निश्चित निघणार होता. राजकारणाचा हा रंग ओळखून हिंदुस्थानचा तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर जनरल कॉर्नवॉलिसने यावेळी मराठ्यांची मदत घेऊन टिपूला संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने टिपूलाच लक्ष्य करण्यामागे काही कारणे होती. मराठेही तसे इंग्रजांचे शत्रू असले तरी देशभर त्यांच्या सत्तेचा पसारा असल्याने त्यांच्याशी चालाणारे युद्ध एक - दोन वर्षांत निकाली निघणे शक्य नसल्याचा अनुभव पहिल्या इंग्रज - मराठा युद्धात आला होता आणि सध्या तरी दीर्घकालीन युद्ध खेळण्याइतपत कंपनीचा खजिना समृद्ध नसल्याचे कॉर्नवॉलिसला माहिती होते. त्यामानाने टिपूवरील मोहीम तुलनेने सोपी होती. तेव्हा प्रथम टिपूचा निकाल लावून आपल्या मार्गातील एक काटा काढून मग आस्तेकदम पेशवाई गिळण्याचा बेत इंग्रजांनी आखला. स. १७८८ पासून दक्षिणेतील जवळपास सर्वच लहान - मोठ्या सत्ताधीशांशी कॉर्नवॉलिसने टिपूविरोधात लढण्यासाठी संधान बांधण्यास आरंभ केला. पैकी निजामाला तर त्याने सहज गुंडाळले पण पुणे दरबार मात्र टिपूविरोधात इंग्रजांची मदत करण्यास सहजासहजी तयार झाला नाही. कॉर्नवॉलिसचा नेमका काय डाव आहे याची यावेळी प्रमुख मराठी मुत्सद्द्यांना जाणीव झालेली असल्याने ते इंग्रजांची मदत करण्यास नाखूष होते. परंतु, निजाम इंग्रजांच्या गोटात गेल्याने पुणे दरबारास दक्षिणेतील सत्तासमतोल संतुलित राखण्यासाठी टिपूविरुद्ध आघाडीत सहभागी व्हावे लागले. इंग्रजांच्या मदतीस मराठी सेना रवाना करण्यापूर्वी नानाने निजामाशी गुप्त करार केला की, इंग्रज जर टिपूला साफ बुडवण्याचा प्रयत्न करतील तर तसे करण्यापासून आपण त्यांना परावृत्त करायचे. निजाम - इंग्रज - पेशवे या त्रिकुटामधून पुणे दरबारास फोडण्याचा टिपूने बराच प्रयत्न केला पण त्यात त्यास यश आले नाही आणि स. १७९० मध्ये निजाम - इंग्रज - पेशवे यांच्या फौजा तीन वेगवेगळ्या दिशांनी टिपूवर चालून गेल्या. या त्रिकुटाच्या विरोधात टिपूने वर्ष - दीड वर्ष सामना दिला खरा पण, पुढे त्यास माघार घेणे भाग पडून स. १७९२ च्या फेब्रुवारीमध्ये कॉर्नवॉलिसने श्रीरंगपट्टण घेण्याची तयारी सुरु केली. तेव्हा हरिपंत व निजामाने कॉर्नवॉलिसला गळ घालून तहासाठी राजी केले. टिपूही आता टेकीस आला होता. त्यानेही तहाची आतुरता दाखवून अर्धे राज्य आणि तीन कोटी रुपये देऊन युद्ध संपुष्टात आणले. कॉर्नवॉलिसच्या या मोहिमेने टिपूचे महत्त्व लयास जाउन श्रीरंगपट्टणचे पूर्वीचे सामर्थ्य साफ मावळून गेले. इतउत्तर टिपूची अवस्था दात व नखे काढलेल्या वाघासारखी बनून इंग्रजांची सत्ता दक्षिणेत काही प्रमाणात निर्वेध झाली. 
                              दक्षिणेत टिपूची मोहीम सुरु असताना पुण्यात एक लहानशी पण इतिहासात प्रसिद्ध असलेली घटना घडून आली. स. १७९१ च्या श्रावण मासाच्या दक्षिणा समारंभानंतर देशभरातून पुण्यास गोळा झालेले ब्राम्हण परतीच्या वाटेस लागले होते. पैकी काही द्रविड तेलंगी ब्राम्हण पुण्याचा तत्कालीन कोतवाल - घाशीराम सावळादासच्या बागेत तळयाजवळ मुक्काम ठोकून राहिले. त्यावेळी ब्राम्हणांनी कणसेमळ्यातील काही कणसे तोडली. तेव्हा तेथील माळ्याची व त्यांची भांडणे होऊन माळ्याने कोतवालास फिर्याद केली. कोतवालाने शिपाई पाठवून सुमारे सव्वीस - सत्तावीस ब्राम्हणांना कैद करून भवानी पेठेतील आपल्या वाड्याच्या भुयारात कैदेत डांबले. रविवार रात्री हा प्रसंग घडला. दुसरा दिवस उजाडला. घडल्या प्रकाराची आसपास कुजबुज मात्र झाली. कोतवालाने कैदी ब्राम्हणांकडे लक्ष दिले नाही. मंगळवारी मात्र हि वार्ता सर्वत्र पसरली आणि सरदार मानाजी शिंदे उर्फ फाकडेच्या कानी पडली. त्याने ताबडतोब कोतवालाच्या वाड्यात जाउन भुयारातील ब्राम्हण कैद्यांची सुटका केली. पण पाहतो तो काय ? अठरा ब्राम्हण मरण पावले होते. उर्वरीत नऊ जणांपैकी तिघांनी मंगळवारी सायंकाळी जीव सोडला तर सहाजण कसेबसे जिवंत राहिले. मानाजीने घडला प्रकार पेशव्याच्या कानी घातला. ( दि. ३० ऑगस्ट १७९१ ) इकडे घाशीरामास मानाजीचा पराक्रम समजला होता. त्याने घाईघाईने नानाची भेट घेऊन कैदेत मेलेले ब्राम्हण फितुरी व चोर असल्याचे सांगून त्यांनी अफू व विष घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले. अशा घटना नेहमी घडत असल्याने नानाने त्यास मृत कैद्यांच्या दहनाची परवानगी दिली. तेव्हा कोतवाल ब्राम्हणांची शवे ताब्यात घेण्यास गेला असता मानाजीने त्यास धुडकावून लावले व पेशव्यांनी आज्ञा दिल्याखेरीज मृतदेह ताब्यात देण्यास नकार दर्शविला. घडले वर्तमान सवाई माधवराव पेशव्यास समजत होतेच. त्याने नानाला याविषयी चौकशी करण्याचे आदेश दिले. नानाने घाशीरामास दरडावून खरा प्रकार विचारला मात्र, त्याने आधीचीच हकीकत परत एकदा सांगितली. तेव्हा नानाने त्यास कैद केले आणि चौकशीस आरंभ केला. तोपर्यंत हजारभर तेलंगी ब्राम्हण नानाच्या वाड्यासमोर गोळा झाले होते. रात्र पडली तरी ब्राम्हण हटेनात तेव्हा नानाने अय्याशास्त्रीस बोलावून त्याचा सल्ला घेतला. अय्याशास्त्रीने कोतवालास देहांत शिक्षा देण्याची नानास सूचना केली. तेव्हा रात्रीच हत्ती आणून त्याच्यावर कोतवालास पाठीवर उपडे बांधून चार पेठांमधून फिरवले. दुसऱ्या दिवशी उंटावरून त्यास शहरभर मिरवले आणि सायंकाळी भवानी पेठेच्या पलीकडे सुमारे १ किमी अंतरावर सोडले. या सर्व समारंभात तेलंगी ब्राम्हणांनी उत्साहाने सहभाग घेऊन कोतवालास शिपायांनी मुक्त करताच दगड - धोंडे मारून ठार केले. घडल्या प्रकरणात नानाचा अजिबात दोष नसता इतिहासकरांनी त्यास या बाबतीत दोषी मानले आहे. कदाचित, कैदेत ब्राम्हण मरण पावल्याने त्यांना या गोष्टीचा अधिक राग आला असावा ! दुसरे काय ? 
                              स. १७९२ मध्ये हिंदुस्थानात आणखीही कित्येक घटना घडत होत्या पण त्यातील एक अतिशय महत्त्वाची आणि काही काळ का होईना नानाचे आसन डळमळीत करणारी एक घटना घडून आली व ती म्हणजे महादजी शिंदेचे पुण्यास आगमन ! स. १७८० मध्ये महादजीने पुणे सोडले तो, त्यानंतर तब्बल १२ वर्षांनीच पुण्यास परतला. या अवधीत पुणे दरबारात नानाचे तर दिल्ली व पुणे दरबारात महादजीचे वजन अतोनात वाढले होते. लौकिकात पाहिले तर नाना हा पेशव्यांची सत्ता हाती असलेला कारकून होता तर महादजी हा मोगल बादशहाचा अधिकार हाती असलेला नोकर होता ! १२ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात नाना - महादजीच्या स्नेहसंबंधात बराच दुरावा आला होता. नानाची होळकरांशी जवळीक महादजीला खटकत होती. मोगल दरबारची सूत्रे हाती आल्यावर पेशवाईची सत्ता आपल्या ताब्यात घेण्याची त्याची महत्वकांक्षा परत एकदा उफाळून आली होती. मात्र हे कार्य प्रत्यक्ष युद्धाने न करता केवळ लष्करी बळाचे प्रदर्शन आणि राजकीय दबावाने घडवून आणण्याचा त्याचा मानस होता. महादजीचा अंतस्थ हेतू नानाने ओळखला. या सुमारास टिपूवरील मोहीम जवळपास संपुष्टात आलेली होती. तेव्हा त्याने पटवर्धन व फडकेला पत्र लिहून ताबडतोब परत येण्याची आणि येताना इंग्रजांची दोन पलटणे सोबत आणण्याची आज्ञा केली. परंतु, नानाच्या सूचनेचा अर्थ जाणून कॉर्नवॉलिसने इंग्रज पलटणी पुण्यास पाठवण्यास साफ नकार दिला.  दरम्यान तुकोजीचे ' आपण लवकरचं दक्षिणेत येत असल्याचे ' पत्र नानास मिळाल्याने तो काहीसा निश्चिंत झाला. प्रसंग पडला तर पटवर्धन, फडके व होळकरांच्या सहाय्याने आपण शिंद्यांचा नक्षा उतरवू शकतो अशी त्यास उमेद वाटू लागली. 
                               स. १७९२ च्या पूर्वार्धात महादजी पुण्यात आला. पुण्यात आल्यावर प्रथम त्याने आग्रह धरला की, बादशहाने पेश्व्यास प्रदान केलेल्या वकील - इ - मुतलकीच्या वस्त्रांचा स्वीकार करण्याचा कार्यक्रम व्हावा. नाना फडणीसने यास विरोध केला. अर्थात, यामागे सत्तास्पर्धा नसून तात्विक आणि व्यावहारिक भेद होता. मोगल बादशहाने पेशव्यांना वकील - इ - मुतलकीचे पद देताना ' महाराजा ' हा किताब दिला होता. लौकिकात पेशवे हे छत्रपतींचे नोकर असताना त्यांनी बादशहाकडून ' महाराज ' हा किताब कसा घ्यायचा हा प्रश्न नानाने उपस्थित केला. नानाच्या मते यांमुळे छत्रपतीपद दुय्यम राहून पेशवे त्यांचे नोकर असूनही वरचढ झाल्याचे दिसून येते. नानाप्रमाणेच अहिल्याबाई होळकरची भूमिका होती, पण त्यामागील दृष्टीकोनात फरक होता.  परंतु, महादजीने नानाचा युक्तिवाद धुडकावून लावत साताऱ्यास आपले सेवक छत्रपतींच्या भेटीस पाठवून त्यांच्याकडून परस्पर परवानगी मागवली आणि ता. २२ जून रोजी फर्मानबाडीचा समारंभ होऊन पेशव्यांनी वकील - इ - मुतलकीची वस्त्रे व फर्मानाचा स्वीकार केला. यावेळी मराठे मंडळींनी या समारंभात फारसा सहभाग घेतला नाही. प्रस्तुत, वादाविषयी उपलब्ध पत्रव्यवहार आणि त्यावरील विविध इतिहासकारांची मते अभ्यासल्या नंतर माझे असे मत बनले आहे कि, छत्रपती शाहूने बादशाही मांडलिकत्व स्वीकारल्या नंतरची मराठी राजकारणात घडून येणारी हि दुसरी चूक होती. महादजीने थोडा जरी विवेक दाखवला असता तर हि अनिष्ट घटना टाळता आली असती. असो, हा कार्यक्रम आटोपल्यावर महादजीने नानाचे आसन डळमळीत करण्यासाठी दरबारात एक नाजुक मुद्दा उपस्थित केला. 
                              स. १७७८ पासून कैदेत असलेल्या मोरोबा फडणीसची सुटका करून त्यास पुन्हा अधिकारपदी नेमण्यात यावे अशी महादजीने मागणी केली. यामागे नानाची अडवणूक करण्यापलीकडे महादजीचा दुसरा हेतू नव्हता. तसेच अलीकडे नानाने सातारच्या छत्रपतींवर अनेक निर्बंध लादले होते ते सैल करून घेण्याचाही महादजीने मर्यादित प्रमाणात यशस्वी प्रयत्न केला. महादजी राज्यकारभारात अशा प्रकारे हस्तक्षेप करू लागला तेव्हा नानाने आपले हुकमी अस्त्र बाहेर काढून त्यास नरम करण्याचा प्रयत्न आरंभला. गेल्या दहा वर्षांतील शिंद्यांच्या जहागिरीचे व नव्याने संपादन केलेल्या मुलखाची गोळाबेरीज करून सुमारे सहा कोटी रुपयांच्या थकबाकीची मागणी केली. नानाच्या अपेक्षेप्रमाणे महादजी थंड पडला नाही. उलट त्यानेच आपल्या आजवरच्या मोहिमांत केलेल्या खर्चापोटी पेशवे दरबार आपणांस पाच कोटींचे देणे लागत असल्याचे दाखवले. अशा परिस्थितीत उभयपक्षांनी तडजोड करून महादजीचे कर्ज फिटेपर्यंत उत्तर हिंदुस्थानात त्याने नव्याने जो मुलुख संपादन केला आहे तो त्याच्याकडेच राहावा आणि सर्व देणे फिटल्यावर पेशव्यांच्या वाटणीचा प्रदेश त्यांच्या ताब्यात द्यावा असे ठरले. जहागिरीच्या हिशेबावरून शिंद्याला कात्रीत पकडण्याचा उद्योग निष्फळ ठरल्याने नानाने दुसरा डाव टाकला. दिल्ली दरबारात महादजीचे प्रस्थ अतोनात वाढल्याने तुकोजी होळकर मनातून नाराज झाला होता. त्याच्या मते अहिल्याबाईने त्यांस वेळेवर द्रव्यपुरवठा न केल्याने महादजीला हे मोठेपण प्राप्त झाले. तसेच वेळोवेळी आपली कोंडी करण्यासाठी महादजीने अहिल्याबाईस पाठिंबा दिल्याचेही तो आणि त्याचे पुत्र विसरले नव्हते. त्यात आता अहिल्याबाईचीही भर पडलेली होती. इतकी वर्षे तिचे व महादजीचे बहिण - भावाप्रमाणे असलेले नाते काही राजकीय व आर्थिक व्यवहारांनी तुटल्यासारखे झाले होते. लालसोट प्रसंगी महादजीने वारंवार मागणी करूनही आणि शक्य असूनही अहिल्याबाईने महादजीला सैनिकी वा आर्थिक मदत न केल्याचा दंश महादजीच्या मनी होताच. त्यात आणखी सत्वास प्रकरणाची भर पडली. नर्मदेच्या दक्षिणेस असलेल्या नेमावर महालात शिंदे - होळकरांची सामाईक मालकी होती. तेथे अहिल्याबाईने सत्वास येथे लष्करी ठाणे उभारले. महालात निम्मी वाटणी असल्याने ठाण्यातही महादजीने निम्म्या वाटणीची मागणी केली, पण बाईने ठाणे उभारण्यासाठी व सांभाळण्यासाठी केलेल्या खर्चाची मागणी केल्याने महादजी नाराज झाला आणि पुण्यास येताना मार्गात त्याने सत्वासचे ठाणे जबरदस्तीने ताब्यात घेतले. अहिल्याबाई व महादजी मध्ये इतका दुरावा वाढला होता की, दक्षिणेत येताना महादजीने पूर्वप्रघातानुसार अहिल्याबाईची भेट देखील घेण्याचे कटाक्षाने टाळले. नानाला या सर्व प्रकाराची कल्पना असल्याने त्याने होळकरांना चिथावून शिंद्यांच्या सैन्याचा पाडाव करण्याची योजना आखली. त्यानुसार नानाच्या अंतस्थ आणि अहिल्याबाईच्या सक्रिय पाठींब्यामुळे तुकोजीपुत्र मल्हारराव, विठोजी व यशवंतराव यांनी लाखेरी येथे शिंद्यांच्या फौजांशी लढाई केली. या संग्रामात होळकरांचा पराभव होऊन शिंद्यांची सेना विजयी झाली. घडल्या घटनेचा कोणालाच खेद वाटला नाही. आपली सर्व अस्त्रे निष्फळ ठरल्याचे पाहून नानाने मग कारभार सोडून काशीयात्रेस जाण्याचे ढोंग केले. अखेर हरिपंत फडके आणि स्वतः सवाई माधवराव पेशव्याने नाना - महादजीमध्ये सन्मान्य तडजोड घडवून आणून उभयतांमधील संघर्ष संपुष्टात आणला. 
                                   नाना - महादजीच्या वादात मराठी राज्यकारभाराचे जवळपास एक वर्ष फुकट गेले. त्यात शिंदे - होळकरांचा वैराग्नी आणखी प्रज्वलित करण्याचे कृत्य घडवून आणण्याचे श्रेय तेवढे नानाच्या पदरी पडले. मात्र, एका बाबतीत नानाला यश आले व ते म्हणजे पुणे दरबारची प्रमुख सूत्रे आपल्या हाती घेण्याची महादजीची जी हाव होती, ती जागच्या जागी त्यांस जिरवता आली. होळकर जरी लाखेरीवर पराभूत झाले असले तरी त्यांचे सामर्थ्य अबाधित होते. त्यात अहिल्याबाई परत एकदा लढाईच्या दृष्टीने तयारी करत असल्याच्या बातम्या उठल्या होत्या. पुणे दरबारचे फौजबंद सरदार पूर्ण भरात होते. अशा वेळी नानाला आपण कारभारातून दूर करू शकत नाही हे ओळखून महादजीने आपला हात आवरता घेतला. यानंतर लवकरच म्हणजे दि. १२ फेब्रुवारी १७९४ रोजी महादजीचा मृत्यू होऊन नाना पूर्णतः निर्धास्त झाला परंतु पाठोपाठ ता. २० जून १७९४ रोजी हरिपंत फडके मरण पावल्याने त्याची एक बाजू खचली. 
                               महादजीच्या मृत्यूनंतर त्याचा पुतण्या दौलतराव हा शिंदे घराण्याचा वारस बनला. नाना - महादजी मधील बेबनाव संपुष्टात आला त्या सुमारासच निजाम मराठी राज्यावर आक्रमण करण्याच्या हेतूने बेदरला येउन ठाण मांडून बसला होता. महादजी व हरीपंताचा मृत्यू झाल्यावर त्याने पुणे दरबारसोबत युद्ध करण्याचा निर्णय घेतला. मात्र, निजाम - पेशवे यांच्यात तंटा निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, रघुनाथराव आणि इंग्रजांच्या बंदोबस्तासाठी नानाने त्यास जो वेळोवेळी भूप्रदेश तोडून दिलेला होता, तो त्यास आता परत आपल्या ताब्यात घ्यायचा होता आणि ज्याप्रमाणे टिपू दुर्बल होऊन शांत बसला आहे त्याचप्रमाणे निजामालाही थंड करून भविष्यात इंग्रजांना आपल्या विरोधात त्याची कसलीही मदत न व्हावी यादृष्टीने बंदोबस्त करण्याचा त्याचा विचार होता. पण प्रकरण वर्दळीवर आणण्यासाठी काहीतरी खुसपट काढावे म्हणून नानाने निजामाकडे आजवर राहिलेल्या चौथाई - सरदेशमुखीच्या तीन कोटी रुपयांचा ताबडतोब भरणा करण्याचा तगादा लावला. पुणे दरबारास एवढी मोठी रक्कम देण्यास निजाम व त्याचा दिवाण मैनुद्दौला उर्फ मशीरउल्मुल्क बिलकुल तयार नव्हते. त्यांनी नानाची मागणी फेटाळून लढाईची तयारी चालवली. त्यांना वाटले की, महादजी व हरिपंताच्या मृत्यूने पुणे दरबारचे सामर्थ्य आता घटले आहे. परंतु, महादजीच्या मृत्यूमुळे शिंद्याची सर्व फौज एकप्रकारे नानाच्या हुकुमतीखाली आल्याचे निजामाच्या लक्षात आलेच नाही. असो, अखेर दोन्ही पक्ष चीडीस पेटून ता. १० मार्च १७९५ रोजी निजाम - पेशव्यांचा खर्डा येथे मोठा संग्राम घडून आला आणि त्यात निजामाचा पराभव होऊन त्याने तह करून आपल्या सैन्याची होणारी फुकट हानी टाळली. यावेळी झालेल्या तहानुसार उदगीरच्या तहानंतर निजामाने मराठ्यांचा  भूप्रदेश दाबला होता वा प्रसंग पाहून पुणे दरबारने त्यास दिला होता तो सर्व परत देण्याचे निजामाने मान्य केले. तसेच चौथाई - सरदेशमुखीच्या बाकीबद्द्ल ३ कोटी रूपये पुणे दरबारास देण्याचे मान्य करून वर त्याने नानाच्या मागणीनुसार आपल्या दिवाणास पुणेकरांच्या हवाली केले. खर्ड्याचा हा विजय म्हणजे नानाच्या राजकीय कारकिर्दीच्या उत्कर्षाचा परमोच्च बिंदू होता. येथून पुढे त्याच्या राजकीय प्रगतीस उतरती कळा लागण्यास आरंभ झाला. 
                                         स. १७९४ च्या मार्च महिन्यात रघुनाथरावाची पत्नी आनंदीबाई मरण पावली. यावेळी तिचा मुलगा बाजीराव हा १८ - १९ वर्षांचा होता. पैकी त्याच्या आयुष्याची ८ - ९ वर्षे नानाच्या नजरकैदेत गेल्याने त्याच्या मनात नानाविषयी अढी तर बसलेली होतीच, पण त्याशिवाय आपण पेशवे घराण्यातील असल्याचाही त्यास विसर पडला नव्हता. सवाई माधवराव हा त्याचा तसा नात्याने पुतण्याच होता. माधवरावाचा बाजीरावाशी कसलाही संबंध न यावा यासाठी नाना दक्ष होता पण, तरीही बाजीरावाने आपल्या पुतण्यासोबत पत्राद्वारे सुत जुळवण्याचा प्रयत्न केला. सवाई माधवरावाने देखील आपल्या चुलत्याशी गुप्त पत्रव्यवहार करण्यास आरंभ केला पण नानाने तो पकडला आणि याविषयी पेशव्याकडे खुलासा मागितला. आरंभी, बाजीरावासोबत पत्रव्यवहार केल्याचे पेशव्याने नाकारले पण नानाने पुरावाच समोर ठेवल्यावर त्याचा नाईलाज झाला. त्याने आपल्या कृत्याची कबुली दिली. तेव्हा नानाने बाजीरावाची कैद शक्य तितकी कडक केली. याच दरम्यान खर्ड्याची मोहीम घडून आली आणि स. १७९५ च्या ऑक्टोबरात सवाई माधवराव तापाने आजारी पडला व दि. २५ ऑक्टोबर १७९५ रोजी शनिवारवाड्यातील आपल्या महालाच्या गच्चीतून तोल जाऊन खाली पडला. या अपघातात जखमी होऊन दिनांक २० ऑक्टोबर १७९५ रोजी सवाई माधवराव पेशवा मरण पावला आणि नानाच्या आसनास जबरदस्त हादरा बसला.        
                                अनेक इतिहासकारांनी सवाई माधवरावाच्या अपघाती मृत्यूस आत्महत्येचे स्वरूप दिले असून नानाची करडी शिस्त असह्य झाल्याने पेशव्याने आत्महत्या केल्याचे पुराव्यांनिशी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी, या आरोपाची शहानिशा करण्याचा हेतू नाही परंतु, त्यात कितपत तथ्य आहे तेवढंच येथे बघायचे आहे. राज्यकारभारात पेशव्याला कित्येकदा नानाच्या सल्ल्याने प्रकरणांचा निकाल करावा लागे व त्याचे अल्पवय आणि नानाचा प्रदीर्घ अनुभव पाहता ते स्वाभाविक होते. तसेच खर्ड्याच्या मोहिमेदरम्यान देखील त्यास नानाची करडी शिस्त वा वर्चस्व जाचत असल्याचे उल्लेख आढळून येत नाहीत. बाजीरावासोबत त्याने केलेल्या गुप्त पत्रव्यवहाराचे उठसुठ भांडवल केले जाते परंतु, केवळ त्या एका प्रकरणावरून पेशव्याने इतका टोकाचा निर्णय घेतला असावा असे अनुमान बांधता येत नाही. त्याचप्रमाणे, जर नानाचे वर्चस्व पेश्व्यास खरोखर असह्य झाले असते तर त्याने स्वतः पुढाकार घेऊन महादजी - नानामध्ये सलोखा घडवून आणण्याऐवजी महादजीच्या मदतीने नानाची कारभारातून उचलबांगडी केली असती. तात्पर्य, नानाने सवाई माधवरावाचा छळ वा जाच केला ही सरळसरळ कपोलकल्पित कथा असल्याचे दिसून येते. असो, सवाई माधवरावाच्या निधनाने नानाच्या राजकारणाचा सर्व पायाच ढासळून गेला. सवाई माधवराव निपुत्रिक असल्याने गादीचा वारस निवडण्यासाठी मुत्सद्द्यांच्या बैठकांवर बैठका भरू लागल्या. नाना व त्याच्या पक्षीयांच्या मते, सवाई माधवरावाची पत्नी यशोदाबाई हिला दत्तकपुत्र देऊन त्याच्या नावाने पेशवाईची वसते आणावीत असे ठरू लागले. तर दुसऱ्या एका गटाच्या मते, भट घराण्याचा औरस वंश रघुनाथरावाच्या मुलांच्या रूपाने हयात असताना दत्तकाची उठाठेव का करावी ? या प्रश्नातच नानाचे आणि समस्त मराठी राज्याच्या भवितव्याचे उत्तर दडले होते.
                                                                             ( क्रमशः )  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: