मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

बाळाजी विश्वनाथ भट ( भाग – २ )



         स. १७०८ मध्ये बाळाजीला सेनाकर्ते पद मिळाले असले तरी त्यास आपले स्वतंत्र कर्तुत्व झळकवण्याची एकही संधी उपलब्ध झाली नव्हती. त्यात तो पडला कारकुनी पेशाचा असामी ! युद्धकलेत तो अगदीच कच्चा नसला तरी त्यावर त्याची विशेष अशी हुकुमत देखील नव्हती. आणि धामधूमीचा तो काळ पाहता प्रशासकीय व्यवसायातील तज्ञ व्यक्तीस पुढे येण्यासाठी सर्वस्वी प्रतिकूल असाच काळ होता. शाहूचे राज्य जर स्थिर असते तर प्रशासकीय व्यवस्थेत आपल्या गुणांचा उपयोग करून बाळाजीने मराठी राज्याची एका भक्कम पायावर उभारणी केली असती. तेवढी गुणवत्ता त्याच्या अंगी जरूर होती पण प्रचलित पद्धतीनुसार त्याच्यावर लष्करी सेवेची जबाबदारी पडल्याने त्यांस आपले कर्तुत्व दाखवण्यासाठी योग्य संधीची फार वाट बघावी लागली. दरम्यान, सेनाकर्तेपद सांभाळताना पैशांची उभारणी करून खास छत्रपतींसाठी अशी हुजुरात त्याने निर्माण केली. वेळप्रसंगी शाहूच्या हाती आता उपयोगी पडेल असे मर्यादित पण प्रभावी सैन्यदल उपलब्ध झाले. तिकडे राजकीय आघाडीवर वेगळीच घडामोड चालू होती. मोगल बादशहाने शाहू व ताराबाईस आपसातील तंट्याचा निकाल लावण्याचा सल्ला दिल्यावर दोन्ही पक्ष एकमेकांवर आपला शह बसवण्याचा प्रयत्न करु लागले. याबाबतीत ताराबाईने बरीच आघाडी मारत शाहूचे अनेक सरदार – विशेषतः सेनापती धनाजीपुत्र चंद्रसेन जाधव यालाच गळास लावले. मात्र, चंद्रसेन ताराबाईपेक्षा आतल्या गाठीचा निघाला. ताराबाईकडे आपला कल दाखवत त्याने पुढे मोगलांची चाकरी पकडली. असो, स. १७०९ नंतर ताराबाईने शाहूच्या अनेक सरदारांना आपल्या पक्षात यश मिळवले. शाहूचा मुख्य सेनापतीच फितूर झाल्याने शाहूच्या इतर सरदारांची निष्ठाही डळमळीत झाली. स. १७११ च्या उत्तरार्धात चंद्रसेन व बाळाजी यांच्यात काही कारणांमुळे तंटा उद्भवून बाळाजीला आपला जीव घेऊन पळून जावे लागले. पाठोपाठ जाधवाचे सरदार त्याच्या मागे धावून आले. चंद्रसेनच्या सैन्याचा सामना करणे बाळाजीच्या ताकदीबाहेर असल्याने त्याने खंडो बल्लाळच्या मार्फत शाहूचा आश्रय घेतला. तोपर्यंत चंद्रसेनचे सैन्य साताऱ्याजवळ आले होते. वस्तुतः बाळाजीचे फक्त निमित्त होत. स. १७११ च्या ऑगस्टमध्ये ताराबाईच्या सल्ल्यानुसार चंद्रसेनने साताऱ्यावर हल्ला करण्याचे आधीच निश्चित केले होते. तेव्हा बाळाजीला शाहूने आश्रय दिल्याने चंद्रसेन शाहूवर नाराज होऊन ताराबाईकडे गेला असे म्हणता येत नाही. चंद्रसेनने शाहूला बेदरकारपणे निरोप पाठविला कि, ‘ स्वामींनी बाळाजीस माझ्या स्वाधीन करावे ; त्यास आश्रय दिल्यास आम्हांस महाराजांचे पाय सुटतील.’ जाधवाचा हा उद्धटपणा पाहून शाहूने हैबतराव निंबाळकरास त्याचा बंदोबस्त करण्यास पाठवले. त्यावेळी उभयतांची लढाई घडून जाधव पराभूत होऊन ताराबाईकडे निघून गेला. जाधव निघून गेल्यानंतर शाहूची अवस्था बिकट बनली. त्याचे कित्येक सरदार – ज्याने चंद्रसेनचा पराभव केला तो निंबाळकर देखील – डळमळीत बनून गेले. यावेळी बाळाजी विश्वनाथने काही प्रमाणात त्याची बाजू सावरून धरली. परंतु, त्याच वर्षी मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे हा ताराराणीच्या पक्षास मिळाल्याने कोकण भागातून साताऱ्यावर कोणत्याही वेळी आक्रमण होण्याची शक्यता निर्माण झाली. शाहूने बहिरोपंत पिंगळे या आपल्या पेश्व्यास कान्होजीच्या पारीपत्याची कामगिरी सोपवली. मात्र पेशव्याची मोहीम सुरु होण्यापूर्वीच राजमाची, तुंग, तिकोना हे किल्ले झपाट्याने ताब्यात घेत बहिरोपंत ज्या लोहगड किल्ल्यावर मुक्कामास होता तो किल्लाच कान्होजीने पिंगळयासह ताब्यात घेतला. कान्होजीच्या या पराक्रमामुळे शाहू हतबुद्ध झाला. याच सुमारास, म्हणजे स. १७१३ साली निजामउल्मुल्क हा दक्षिणचा सुभेदार म्हणून कारभारावर दाखल झाला. त्याने सुभेदारीवर येताच करवीरकरांना पाठिंबा देत शाहूला उखडून काढण्याचा खटाटोप सुरु केला. अशा परिस्थितीत शाहूने आपले पेशवेपद बाळाजी विश्वनाथास देऊन त्यास या संकटांचे निवारण करण्याची जोखीम सोपवली.

           खरेतर पेशवेपदी बाळाजी विश्वनाथाचीच निवड का झाली हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. कान्होजीने बहिरोपंतास पकडले म्हणून त्याचे वंशपरंपरागत पेशवेपद ( बहिरोपंत हा मोरोपंत पिंगळेचा वंशज ) गेले मान्य होण्यासारखे असले तरी चंदसेन जाधवासोबत झालेल्या संघर्षात जीव घेऊन पळत सुटणाऱ्या व्यक्तीला पेशवेपद देणे कितपत सयुक्तिक होते ? दुसरे असे की, शाहूची खरोखरच इतकी निकृष्टावस्था बनली होती का, ज्यामुळे बाळाजीखेरीज दुसरा कोणी पेशवेपदासाठी लायक इसम त्याच्या पदरी नसावा ? यावर अधिक संशोधनाची गरज आहे. असो, स. १७१३ च्या नोव्हेंबर मध्ये बाळाजीस पेशवेपद मिळून तो कान्होजीच्या बंदोबस्तास रवाना झाला. आंग्रे व भट घराण्याचा पूर्वीपासून काही घरोबा वा पत्रव्यवहार होता का याची विश्वसनीय माहिती मिळत नाही, परंतु लोणावळ्याजवळ वळवण या गावी उभयतांची भेट घडून कान्होजीला शाहूच्या पक्षास मिळवून घेण्यात  बाळाजीला यश मिळाले. आंगऱ्यासारख्या दर्यावर्दी सरदारास एकाच वेळी कोकण आणि घाटावरील मुलुख सांभाळणे शक्य नसल्याने त्याने फारसे ताणून न धरता शाहूच्या पदरी आरमार प्रमुख राहण्याचे मान्य केले. सातार दरबारसोबत हातमिळवणी करण्यात आंगऱ्याचे विशेष असे नुकसान झाले नाही. कोकणावरील त्याचे प्रभुत्व सातार दरबारने मान्य केले. बदल्यात आपला राजा म्हणून शाहूला मान देण्याचे कान्होजीने कबुल केले. ज्याला मराठ्यांचा राज्यसंघ म्हणून पुढे प्रसिद्धी मिळाली, त्याची उभारणी / निर्मिती करण्याचे कार्य शाहूने यापूर्वीच सुरु केले होते. तेच धोरण बाळाजीने पुढे चालवले. परंतु कित्येक इतिहासकारांनी या राज्यसंघ निर्मितीचे श्रेय बाळाजी विश्वनाथला दिले आहे. वस्तुतः, मराठा सरदारांचा संघ वा राज्यसंघ बनवण्याची खरी सुरवाट राजारामाच्या कारकिर्दीत झाली. त्याच्या व औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू जेव्हा मोगलांच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात आला तेव्हा भोसले, कदम बांडे, दाभाडे प्रभूती फौजबंद सरदारांना आपल्या पक्षास वळवून घेताना शाहूने राजारामाचेच धोरण पुढे चालू ठेवले. तुम्ही जो प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आहे तो तुमच्याच ताब्यात असू द्या पण राजा म्हणून मला मान्यता द्या, अशा प्रकरचा हा व्यवहार होता. या धोरणाची खरी सुरवात राजारामाने करून ते प्रभावीपणे राबविण्याचे कार्य शाहूने केले आणि याबाबतीत काही विशेष प्रयत्न न करणाऱ्या बाळाजीस इतिहासकारांनी सर्व श्रेय दिले ! असो, स. १७१४ च्या फेब्रुवारीमध्ये आंग्रेचे प्रकरण निकाली निघाले आणि पाठोपाठ त्याच वर्षी जुलै –- ऑक्टोबर दरम्यान कोल्हापुरास राज्यक्रांती होऊन ताराबाई व तिचा मुलगा शिवाजी हे कैदेत पडले आणि तिचा सावत्र मुलगा संभाजी हा कोल्हापूरचा छत्रपती बनला. या कटास प्रसिद्ध मुत्सद्दी रामचंद्रपंत अमात्य याचे जबरदस्त पाठबळ होते. काही इतिहासकारांनी शाहू व बाळाजीने देखील या कटास काही प्रमाणात हातभार लावल्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु, पुढील इतिहास पाहता संभाजीला करवीरच्या गादीवर आणण्यामागे शाहू व बाळाजीचा हात असल्याचे अजिबात दिसून येत नाही. जर या दोघांनी संभाजीला सत्तेवर आणण्याचा प्रयत्न केला असता तर निदान काही काळ का होईना संभाजी यांच्या आज्ञेत वागता. पण असे काही घडल्याचे दिसून येत नाही. तेव्हा कोल्हापूरच्या राज्यक्रांतीचे सर्व श्रेय रामचंद्रपंतासच देणे योग्य ठरले. कोल्हापुर गादीवरील राजा बदलला आणि पुढच्याच वर्षी दक्षिणचा सुभेदार म्हणून दिल्लीच्या प्रसिद्ध सय्यद बंधूंपैकी हुसेनअली सय्यदची नेमणूक झाली. ( स. १७१५ एप्रिल )

            या ठिकाणी मोगल बादशाहीची थोडी माहिती देणे आवश्यक आहे. मोगल बादशहा बहादूरशहा ता. १७ फेब्रुवारी १७१२ रोजी लाहोर येथे मरण पावला. त्याच्या पश्चात झुल्फीकारखानाच्या सहाय्याने जहांदरशहा तख्तावर बसला पण वर्षभरातच अब्दुल्लाखान व हुसेनअली या सय्यद बंधूंच्या मदतीने फर्रुखसेयर हा बादशहा बनला. ( दि. ११ जानेवारी १७१३ ) या मोगल शहेनशहाची कारकीर्द स. १७१९ पर्यंत चालली. तख्तावर येताच त्याने अब्दुला सय्यद यास आपला वजीर म्हणून नेमले तर हुसेनला मीरबक्षी अर्थात सरसेनापती बनवले. फर्रुखसेयरच्या कारकिर्दीत मोगल बादशाही खालावत जाऊन राजपूत व मराठ्यांना पुढे येण्याची संधी प्राप्त झाली. बहादूरशहाच्या नंतर गादीवर आलेले मोगल बादशहा तितकेसे कर्तबगार नसल्याने त्यांच्या हाताखालच्या अंमलदारांचे फावले. पेशवाईत ज्याप्रमाणे नारायणराव पेशव्याच्या खुनानंतर पेशव्यांना बगलेत मारून नाना फडणीस, शिंदे यांनी सर्व कारभार हाती घेतला तसाच प्रकार यावेळी मोगल बादशाहीत सुरु होता. फरक इतकाच की, तख्तावरील बादशहाचे दर्शन घेऊन डोळे शिणले कि त्याची मान मुरगाळून त्या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा उपक्रम मोगली मुत्सद्द्यांनी स्वीकारला. त्याउलट, गादीवरील आहे त्याच शोभेच्या मालकास कायम ठेऊन त्यास आपल्या मुठीत ठेवण्याचे धोरण मराठ्यांनी राबवले. असो, राजकीय परिस्थिती इतकी अनिश्चित असल्याने आपल्या हाताखालच्या लोकांचा पाडाव करून आपला निभाव करण्याचा उपक्रम फर्रुखसेयरने स्वीकारला. ज्या सय्य्दांनी त्याला तख्त मिळवून दिले, त्यांनाच मारून टाकण्याचा प्रयत्न त्याने आरंभला. हुसेन सय्यदला त्याने दक्षिणच्या सुभ्यावर तर नेमले पण अंतस्थरीत्या दक्षिणेतील सर्व प्रमुख मराठा सरदारांना हुसेनअलीचा बंदोबस्त करण्याची भरही दिली. परिणामी, हुसेनअली कारभारावर येताच त्यास मराठी सरदारांच्या हल्ल्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचीच पहिली कामगिरी पार पाडावी लागली. मराठा सरदारांना कमकुवत करण्यासाठी त्याने भेदनीतीचा अवलंब केला. कोल्हापूरकरांना सातारच्या विरोधात चिथावणी दिली. त्याखेरीज कित्येक असे फौजबंद मराठा सरदार होते ज्यांनी सातारा व कोल्हापूरचे स्वामित्व मान्य केले नव्हते. त्यांना फूस लावून या दोन्ही दरबारांच्या विरोधात बंड करण्यास हुसेनअलीने प्रवृत्त केले. मोगल बादशहाचा जर हुसेनअलीस यावेळी पाठिंबा असता तर मराठ्यांचा बंदोबस्त करण्यास त्यास यश मिळालेच नसते असे म्हणवत नाही, पण बादशहाने गळेकापूपणाचे धोरण स्वीकारल्याने त्याचा नाईलाज झाला व आपल्या कारभाऱ्यास – शंकराजी मल्हार यास त्याने सातार दरबारसोबत तह करण्यासाठी रवाना केले. { राजारामाच्या कारकिर्दीत शंकराजी मल्हार हा सचिव पदावर कार्यरत होता. नंतर त्याने नोकरीचा राजीनामा देऊन काशीयात्रेस प्रयाण केले. तिकडे असताना त्याचा दिल्ली दरबारी प्रवेश होऊन हुसेनअलीचे कारभारी पद त्यास प्राप्त झाले. सातार व दिल्ली दरबारच्या दरम्यान मध्यस्थी करून त्याने सातार दरबारचा बराच मोठा फायदा करून दिला. }

           दरम्यान हि तहाची वाटाघाट सुरु असताना सुपे व पाटस परगण्याचा जहागीरदार दमाजी थोराताने हुसेनअली सय्यदच्या प्रेरणेने शाहूच्या विरोधात बंडाळी आरंभली. स. १७१६ मध्ये दमाजीचा बंडावा विशेष वाढल्याने शाहूने बाळाजी विश्वनाथला त्याचा बंदोबस्त करण्याची आज्ञा दिली. थोराताचे बंड आंगऱ्याप्रमाणेच बोलाचालीने निकाली काढण्याच्या उद्देशाने बाळाजी त्याच्या भेटीस सहपरिवार गेला. तत्पूर्वी बेलभंडाऱ्याच्या शपथक्रियेचा औपचारिक कार्यक्रम पार पडला होता. दमाजीचा मुक्काम त्यावेळी पुण्याच्या पूर्वेस हिंगणगाव येथे होता. या गावाला गढी बांधून थोरात मंडळी राहात होती. पेशवा भेटीस आल्यावर दमाजीने त्यास कैद केले. यावेळी पेशव्याने त्यास शपथेची आठवण दिली असता ‘ बेल म्हणजे झाडाचे पान व भंडारा म्हणजे हळद ‘ अशा तऱ्हेची मुक्ताफळे दमाजीने उधळल्याचे सांगतात. पेशव्याला कैद केल्यावर दमाजीने त्याच्याकडे जबर आर्थिक दंडाची मागणी केली. बाळाजीने आर्थिक दंड भरण्यास तयार व्हावे म्हणून त्यास उपाशी ठेवण्यात आले. खेरीज राखेचे तोबरे भरण्याचा धाकही दाखवण्यात आला. अखेर बाळाजीने आपले सर्व कुटुंब, मुतालिक अंबाजी पुरंदरे व धडफळे कुटुंबातील दोन इसम ओलीस ठेऊन सुटका करून घेतली आणि शाहूकडे धाव घेतली. बिचारा शाहू ! कान्होजीने बहिरोपंतास पकडले म्हणून त्याची पेशवाई काढून त्याने बाळाजीस दिली होती तर त्याची हि तऱ्हा !! मात्र, यावेळी शाहूने आपल्या पेशव्याची पाठराखण करून सावकार आणि इतर मुत्सद्द्यांच्या मार्फत द्रव्याची जुळणी करून पेशव्याची माणसे सोडवली. पेशव्याच्या कुटुंबाची सुटका होताच शाहूने सचिव नारो शंकर यास थोराताचा बंदोबस्त करण्याची आज्ञा केली. सचिव अल्पवयीन असल्याने हि कामगिरी त्याच्या कारभाऱ्याने उचलली पण थोराताने याही वेळेस शाहूवर मात केली. सचिवाची फौज थोरातावर चालून जाण्यापूर्वीच रोहिडा किल्ल्याखाली सचिवाचा मुक्काम असल्याची बातमी मिळवून दमाजीने नारो शंकरास कैद केले आणि आपल्यावर चालून आल्यास तुमच्या पुत्रास ठार करू अशी धमकी त्याने नारो शंकरच्या आईस दिली. त्यामुळे सचिवाची स्वारी सुरु होण्यापूर्वीच संपुष्टात आली. थोराताच्या कैदेत नारो शंकर चार आठ महिने राहिला. शाहूने सचिवाच्या सुटकेसाठी परत एकदा भला मोठा आर्थिक दंड थोरातास दिला. दरम्यान, हुसेन सय्यद सोबत चाललेल्या तहाची वाटाघाट फळास येऊन उभयतांमध्ये सख्य होताच बाळाजी विश्वनाथने मोगलांचा तोफखाना सोबत घेऊन हिंगणगावावर हल्ला केला. त्यावेळी झालेल्या संघर्षात थोराताचा पराभव झाला. बाळाजीने त्यास पुरंदरावर कैद करून ठेवले. थोराताची हिंगणगावची गढी खणून काढली आणि पांढरीवर गाढवाचा नांगर फिरवून आपल्या अपमानाचा सूड उगवला. अशा प्रकारे थोराताचे बंड निवळले खरे पण यातून एक प्रश्न असा उद्भवतो की, बाळाजी विश्वनाथने या काळात अशी कोणती कर्तबगारी दाखवली कि, थोराताने त्यास सहपरिवार कैद करून देखील शाहूने त्याची पेशवाई कायम राखली ? यातून फक्त दोनच तर्क केले जाऊ शकतात व ते असे – (१) शाहूच्या पदरी यावेळी खरोखर लायक माणसे नव्हती किंवा (२) या काळातील बाळाजीच्या कर्तबगारीची वा कामगिरीची माहिती अजूनही अज्ञात आहे.

           इकडे शंकराजी मल्हारच्या वकिलीस यश मिळून अखेर स. १७१८ मध्ये हुसेनअली सय्यद व सातार दरबारच्या दरम्यान चौथाई व सरदेशमुखीचा तह घडून आला. या तहातील प्रमुख अटी पुढीलप्रमाणे :- (१) शिवाजीच्या वेळचे स्वराज्य, तमाम गडकोट सुद्धां शाहूचे हवाली करावे. (२) अलीकडे मराठे सरदारांनी जिंकलेले प्रदेश म्हणजे खानदेश, गोंडवण, वऱ्हाड, हैदराबाद, कर्नाटक या भागातले, यादीत नमूद केल्याप्रमाणे मोगलांनी सोडून देऊन ते मराठ्यांच्या स्वराज्यात दाखल करावे. (३) मोगलांच्या दक्षिणेतील मुलुखांवर चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांनी स्वतः वसूल करावे. या चौथाईचे बदल्यांत आपली पंधरा हजार फौज मराठ्यांनी बादशहाचे मदतीस ठेवावी आणि सरदेशमुखीच्या बदल्यात मोगलांचे मुलखांत मराठ्यांनी चोऱ्या वगैरेंचा बंदोबस्त करावा. (४) कोल्हापूरच्या संभाजीस शाहूने उपद्रव करू नये. (५) मराठ्यांनी दरसाल बादशहास दहा लाख रुपये खंडणी द्यावी. (६) शाहूची मातुश्री, कुटुंब, संभाजीचा दासीपुत्र मदनसिंग वगैरे दिल्लीस बादशहाचे कबजांत आहेत, त्यांस सोडून स्वदेशी पावते करावे.

         या तहानुसार शिवाजीच्या स्वराज्याचा उत्तराधिकारी / वारस म्हणून शाहूला मोगलांची मान्यता मिळाली. उपरोक्त तहातील पहिल्या दोन अटींच्या विषयी फारशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही. मात्र अट क्रमांक ३,४,५ या महत्त्वाच्या आहेत. तिसऱ्या कलमानुसार दक्षिणच्या सहा सुभ्यातून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार मोगलांनी शाहूला दिला. पण त्याबदल्यात १५ हजार फौज बादशहाच्या मदतीस देण्याचे व शाही मुलखातील चोऱ्यांचा बंदोबस्त करण्याचे शाहूला मान्य करावे लागले. इथपर्यंतचा तह मराठ्यांना तसा फायदेशीर होता पण दोन अटी हुसेनअलीने अशा घातल्या की, त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणाची दिशाच साफ बदलून गेली. पहिली अट म्हणजे शाहूने कोल्हापूरच्या संभाजीस उपद्रव देऊ नये व दुसरी अशी की, शाहूने मोगल बादशहास दरसाल दहा लाख रुपये खंडणी द्यायची होती. या अखेरच्या दोन अटींनी तहाचे स्वरूप साफ बदलले. पहिल्या ४ अटींनी अकबर, जहांगीर, शहाजहान व औरंगजेब या चार मोगल बादशहांच्या उद्योगावर साफ पाणी फिरवले असले तरी याच तहातील दोन अटींच्या बळावर त्याने मराठ्यांना चांगलीच वेसण घातली.

        शाहूने मोगल बादशहास दरसाल दहा लाख खंडणी भरण्याचे मान्य केल्याने तो बादशाही ताबेदार बनला. याचा अर्थ उघड होता. त्याचे स्वराज्य वा छत्रपतीपद बादशाही मेहेरबानीने त्यास मिळाले असाच त्याचा अर्थ होतो. आपल्या छत्रपतीपदास त्याने एकप्रकारे मोगल तख्ताची मान्यता मिळवून घेतली. शाहू वा त्याच्या वारसांनी मोगलांना किती वर्षे खंडणी भरली हा तर संशोधनाचा विषय आहे. परंतु, लौकिकात शाहू व त्याचे वारस मोगलांचे अंकित बनल्याने त्यांच्या कार्यामागची मूळची स्वातंत्र्याची आच काही प्रमाणात सौम्य झाली.

        हुसेन सय्यदने जी दुसरी अट घातली, त्यामुळे कोल्हापूर संस्थान कायम राहून शाहूकडून त्यास उपद्रव होऊ नये यासाठी मोगल --- म्हणजे दक्षिण सुभ्याचा मोगली सुभेदार एकप्रकारे जामीनदार राहिला. कोल्हापूरकरांना निजामाने पुढे वेळोवेळी जी मदत केली ती याच तहातील अटीला धरून हे लक्षात घ्यावे. या ठिकाणी असा प्रश्न उद्भवतो की, सातार व कोल्हापूर यांच्यात मग काय फरक राहिला ? एक बादशाही ताबेदार तर दुसरे मोगल – सातार दरबारच्या मेहेरबानीवर अवलंबून ! कोल्हापूर संस्थान कायम राहिल्याने मराठा सरदारांची निष्ठा कायमची दुभंगली. वेळप्रसंगी पुढे पेशवेदेखील सातारकरांच्या विरोधात कोल्हापूरकरांशी हातमिळवणी करू लागले. या अटीमुळे कोल्हापूरचा कायमचा काटा काढण्याच्या सातारकरांच्या राजकीय स्वातंत्र्यावर बंधन आले. हुसेनअलीच्या या दोन अटींमुळे पुढे मराठ्यांच्या राजकारणाची दिशा साफ बदलली जाऊन ते आपल्या मूळ हेतूंपासून, उद्दिष्टांपासून भरकटले गेले. कित्येक इतिहासकार लिहितात की, शाहूने मोगलांची ताबेदारी कागदावर स्वीकारली होती. जर हे खरे तर बाजीरावाने दिल्लीवर धडक मारल्यावर दिल्ली का लुटली नाही ? ‘ पुऱ्यास आगी देऊन शहर खाक करावें, त्यास दिल्ली महास्थळ, पातशहा बरबात जालियांत फायदा नाहीं.’ असे त्याने चिमाजीस पत्र लिहून कळवले त्याचे कारण काय ? रघुनाथराव किंवा सदाशिवराव दिल्लीस गेले पण त्यांना बादशाही वैभव लुटण्याची बुद्धी का झाली नाही ? त्यानंतरही महादजी शिंदेने बादशाही सर्वाधिकार पेशव्यास मिळवून दिले, तेव्हा पेशव्यांनी बादशाही नोकर म्हणूनच त्यांचा स्वीकार केला. हे कशाचे प्रतीक आहे ? शत्रूच्या राजधानीत जाऊन त्याच्या तख्ताची मर्यादा राखण्याचे भान शिवाजी महाराजांच्या मराठ्यांना कधीच मानवले नाही. याबाबतीत मल्हारराव होळकर हा शिवाजी महाराजांचा खरा शिष्य शोभतो. प्रसंग येताच त्याने बादशाही छावणी साफ लुटली. असो, हुसेनअलीने केलेल्या या चौथाई – सरदेशमुखीच्या तहाचा निजामाने पुढील काळात पुरेपूर फायदा उचलला. परंतु, प्रस्तुत लेखाच्या मर्यादेत हा विषय बसत नसल्याने तूर्तास इतकेच पुरे !

          स. १७१८ मध्ये हा तह घडून आल्यावर त्यास मोगल बादशहाची मान्यता मिळवून घेण्यासाठी हुसेनअली सय्यद हा बाळाजी विश्वनाथ व इतर प्रमुख मराठा सरदारांसह दिल्लीस रवाना झाला. याचवेळी दिल्लीत अब्दुल्ला सय्यदच्या विरोधात मोगल बादशहाचे कारस्थान विशेष रंगात आले होते. राजपूत राजे व निजामाच्या मदतीने त्याने सय्यद बंधूंचा नाश करण्याचे योजले होते परंतु सय्यद बंधूंनी मराठ्यांच्या बळावर शत्रूंचे बेत साफ उधळून लावले. त्यांनी फर्रुखसेयरला कैद करून रफीउद्दराजत यास बादशहा बनवले व त्याच्या मार्फत मराठ्यांच्या सोबत केलेल्या करारास बादशाही मान्यता मिळवून घेली. पैकी ता. ३ मार्च १७१९ रोजी चौथाई व ता. १५ मार्च १७१९ रोजी सरदेशमुखीचा करार करण्यात आला. करार होताच ता. २० मार्च १७१९ रोजी शाहूचा परिवार सोबत घेऊन बाळाजी विश्वनाथ दक्षिणेस रवाना झाला. वाटेत बरोबरच्या मंडळींना पुढे मार्गस्थ करून त्याने काशीयात्रा उरकून घेतली व जुलैमध्ये तो साताऱ्यास दाखल झाला.

             स. १७१९ च्या जुलैमध्ये दिल्लीहून परतल्यावर बाळाजीने शाहूच्या आज्ञेनुसार पुणे प्रांत ताब्यात घेण्यास आरंभ केला. त्यासोबतच कोल्हापूरकरांच्या विरोधात देखील याचवेळी त्याने मोहीम उघडली. बाळाजीची कोल्हापूरवरील मोहीम मोगल बादशहाच्या सोबत झालेल्या तहाच्या अटीविरोधात अजिबात नव्हती. संभाजीने सातार दरबारच्या विरोधात लष्करी कारवाया करण्यास प्रारंभ केल्याने बचावासाठी सातारकरांना संभाजीवर शस्त्र उपसावे लागले. बाळाजीने आष्ट्याचे व येळावीचे ठाणे आपल्या ताब्यात घेऊन कोल्हापूरास वेढा घातला. कोल्हापुराचा वेढा सुरु असताना बाळाजीने बेळगाव रुकडी ते तारळे डिग्रज पर्यंत एक फेरी मारली. दरम्यान दि. २० मार्च १७२० रोजी इस्लामपूरजवळ उरण बहे येहे बाळाजी – संभाजीची लढाई घडून आली. कोल्हापूर स्वारीचा निकाल काय लागला याची माहिती मिळत नाही पण स. १७२० च्या मार्चमध्ये बाळाजी विश्वनाथ साताऱ्यास परतला आणि तेथून तो सासवडला गेला. यावेळी पेशवे कुटुंबाचे वास्तव्य सासवडला होते. त्या ठिकाणीच दि. २ एप्रिल १७२० रोजी बाळाजी विश्वनाथचे निधन झाले. मृत्यूचे नेमके कारण नमूद नाही. अखेरच्या दिवसांत तो फारसा आजारी असल्याचे उल्लेख मिळत नाहीत. मृत्यूसमयी त्याचे वय साठीच्या आसपास असल्याचा अंदाज केला जातो पण या अंदाजात काही दम नाही. जिथे जन्मवर्षाचीच नोंद नाही किंवा अनुमान बांधण्याचे साधन नाही तिथे मृत्यूसमयीचे वय वर्तवणे मूर्खपणा आहे.

           दिल्ली मोहीम पार पाडल्यावर बाळाजीने सातार दरबारातील मुत्सद्दी व शाहूच्या सल्ल्याने मराठी राज्याच्या कारभाराची एक नवीन व्यवस्था ठरवून दिली. वस्तुतः त्यात नवीन असे काही करण्यालायक नव्हतेच. फक्त परिस्थितीचे आकलन करून त्यानुसार राज्यकारभाराची घडी बसवणे एवढेच आता मुत्सद्द्यांच्या हाती राहिले होते. शिवाजीनिर्मित अष्टप्रधान आता साफ नामशेष झाले होते. वऱ्हाड, खानदेश, बागलाण, गुजरात इ. प्रदेशांत फौजबंद मराठा सरदार आपापले वर्चस्व स्थापण्याच्या प्रयत्नात होते. या सरदारांनी शाहूला आपला छत्रपती म्हणून मान्यता द्यावी व त्या बदल्यात जिंकलेला प्रदेश त्या सरदारांना दिल्याची सनद शाहूने द्यावी असा मध्यम मार्ग शाहूने आपल्या सल्लागारांच्या सल्याने स्वीकारला. या सरदारांना चौथाई व सरदेशमुखीच्या सनदांच्या व्यवस्थेत गुंतवून घेणे आवश्यक होते व ते कार्य बाळाजीपंतनानाने पार पाडले.

           राज्याच्या वसुलाची व एकंदर उत्पन्नाची त्याने वाटणी नेमून दिली. त्यानुसार राज्याचा एकूण वसुल, चौथाई व सरदेशमुखी यांची विभागणी करण्यात आली. पैकी सरदेशमुखी हे छत्रपतींचे खासगत वतन असल्याने त्या उत्पन्नावरवर फक्त छत्रपतींचा अधिकार राहिला. चौथाई व स्वराज्यातील मिळणारा एकूण वसूल म्हणजे राज्याचे एकूण उत्पन्न. पैकी यातील पंचवीस टक्के भाग ‘ राजबाबती ‘ म्हणून छत्रपतींच्या खर्चास लावून दिले. उर्वरीत ७५% ‘ मोकासा ‘ राहिला. त्यात आणखी ‘ साहोत्रा ‘ व ‘ नाडगौडा ‘ असे दोन भाग पाडण्यात आले. यातील ‘ साहोत्रा ‘ म्हणजे एकंदर वसुलावर शेकडा सहा आणि ‘ नाडगौडा ‘ म्हणजे त्या वसुलाचे तीन टक्के. यातील साहोत्रा शाहूने सचिवास देऊन टाकला आणि नाडगौडा वेळोवेळी आपल्या मर्जीतील इसमांस तो देत असे. साहोत्रा व नाडगौडाची वसुली हा एक वेगळा विषय आहे. राज्यातील ज्या भागात साहोत्रा व नाडगौडा नेमून दिला जाई, तेथून वसूल करून आणण्याची जबाबदारी उपरोक्त हक्क प्राप्त इसमांवर असे. साहोत्रा व नाडगौडाचे प्रदेश कित्येक सरंजामी सरदारांच्या जहागीरींमध्ये मोडत असल्याने सचिव व नाडगौडा प्राप्त इसमास इतर सरदारांशी मिळते जुळते धोरण ठेवावे लागे. राजबाबती, साहोत्रा व नाडगौडा यांची वाटणी झाल्यावर उर्वरीत ६६% चा वाटा इतर सरदार व अष्टप्रधानांमध्ये जहागीर म्हणून वाटून टाकण्यात आला. पैकी, सरंजामी प्रदेशाची वाटणी सामान्यतः अशी झाली --- सेनापती दाभाडे – गुजरात ; सेनासाहेब सुभा भोसले – वऱ्हाड, नागपूर, गोंडवन ; सरलष्कर – गंगथडी, औरंगाबाद ; फत्तेसिंग भोसले – कर्नाटक ; प्रतिनिधी – नीरा व वारणा नद्यांच्या दरम्यानचा प्रदेश आणि हैद्राबाद, बेदर ; चिटणीस व आंग्रे यांच्याकडे कोकण. अर्थात हे प्रमुख सरंजामदार झाले. आणखी पुष्कळ आहेत. खुद्द पेशवा हा देखील सरंजामदार असून जेथे गरज पडेल तेथे राजाज्ञेने सेवा बजावण्याची जबाबदारी शाहूने त्याच्यावर सोपवली.

        वरवर पाहता हि व्यवस्था सुटसुटीत दिसते पण ही एकदम गुंतागुंतीची असून त्यामुळे सर्वांनाच मनात असो वा नसो, परस्परांशी स्नेहाने वागावे लागे. प्रत्येकाची वतने व इनामगावे दुसऱ्याच्या जहागिरीत असल्याने उभयपक्षी सलोखा असणे त्यांच्या हिताचे असे. एकंदर वसुलाचे जे ६६% उरले होते व ज्याची वाटणी सरदारांत केली होती, त्यांनी आपणांस नेमून दिलेल्या प्रदेशातून वसूल गोळा करून स्वतःचा खर्च भागवून उर्वरीत रक्कम सरकारी खजिन्यात जमा करायची होती. सरंजामदारांच्या प्रदेशात छत्रपतींची सरदेशमुखी वतने असत. त्यांच्या वसुलीसाठी छत्रपतींकडून नायब सरदेशमुख रवाना केले जात. याखेरीज सरंजामदारांवर नियंत्रण राखण्यासाठी कित्येक नियम बनवण्यात आले होते. सरंजामदारांकडे जे दरखदार असत – म्हणजे चिटणीस, फडणीस, पोतनीस इ. कामगार असत त्यांची नेमणूक छत्रपतींचे मुख्य दरखदार करत. उदाहरणार्थ, अष्टप्रधान व सरंजामी सरदारांकडे चिटणीस पदावर मनुष्य नेमण्याचा अधिकार छत्रपतींच्या चिटणीसाचा असे. यामुळे सरंजामदाराकडे जे अधिकारी नेमले जाट ते पर्यायाने छत्रपतींचेच हस्तक असत असे म्हणता येते. याशिवाय सरंजामदारावर आणखी एक बंधन लादण्यात आले होते. छत्रपतींच्या कारखान्यांचा --- म्हणजे हत्तीखाना, फरासखाना, कोठी, इमारत इ. चा खर्च चालवण्याची जबाबदारी अष्टप्रधान व प्रमुख सरदारांवर सोपवण्यात आली. राज्याची जी हि व्यवस्था बसवण्यात अली त्यामुळे मराठा सरदारांचे परस्पर संबंध एकमेकांशी निगडीत करून एकीने काम करण्याची प्रवृत्ती काही प्रमाणात वाढीस लागली हे नाकबूल करता येत नाही. परंतु, या व्यवस्थेची दुसरी बाजू अनर्थकारी होती. सरंजामदारांना जे मुलुख लावून दिले गेले वा दिले जात ते मूळ त्यांच्या ताब्यात नसून शत्रूच्या अंमलात होत. शत्रूचा पराभव करून त्या प्रदेशाचा ताबा मिळवायचा म्हणजे घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यासारखे होते. पदरचा पैसा खर्चून सैन्य उभारायचे, शत्रूशी लढाई करून प्रदेश मिळवायचा. अशा प्रदेशावर ताबा येतो न येतो तोच सरकारी अंमलदार वसुलीसाठी व वाटणीसाठी दारात हजर ! आधी सावकार, सैन्याचे देणे भागवायचे कि सरकारचे या तिढ्यात मराठी सरंजामदार जे यावेळपासून अडकले ते पेशवाई बुडेपर्यंत काही त्यातून वर निघाले नाहीत.

             बाळाजी विश्वनाथाची एकूण राजकीय कारकीर्द पाहता त्याने विशेष असे काही कार्य केल्याचे दिसून येत नाही. आहे त्या स्थितीशी जुळवून घेऊन राज्याची घडी बसवण्याच्या कामाचे मात्र त्यास श्रेय देता येते. शिवाजीमहाराजांप्रमाणे नव्याने एखादी व्यवस्था अंमलात आणण्याचा त्याचा वकूब होता कि नव्हता हा वादाचा मुद्दा होईल पण तितके सामर्थ्य त्याच्याकडे नव्हते हे निश्चित ! निंबाळकर, भोसले, सोमवंशी इ. मंडळी शाहूच्या लगामी लागली होती, तर आंग्रे प्रभूतींना बाळाजीने अनुकूल करून घेतले हे त्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल. परंतु परिस्थितीशी जुळवून घेणारा मुत्सद्दी यापलीकडे त्याचे काही खास असे गुणविशेष मला आढळून येत नाही. भट घराण्याच्या या पहिल्या पेशव्याच्या सर्व उणीवा पुढे त्याच्या वंशजांनी भरून काढल्या एवढे मात्र या ठिकाणी नमूद करता येईल !

                                         ( समाप्त )

संदर्भ ग्रंथ :-


१)    मराठी रियासत ( खंड – ३ ) :- गो. स. सरदेसाई

२)    मराठ्यांचा इतिहास ( खंड – २ ) :- संपादक – अ. रा. कुलकर्णी व ग. ह. खरे                     

२ टिप्पण्या:

Gamma Pailvan म्हणाले...

नमस्कार संजय क्षीरसागर.

छत्रपती शाहूंची बाळाजी विश्वनाथावर एव्हढी मर्जी का होती याचं महत्त्वाचं कारण माझ्या मते बाळाजीचा कान्होजी आंगऱ्यांशी असलेला स्नेह असावं. याच मैत्रीयोगे कान्होजी ताराबाईंचा पक्ष सोडून शाहूकडे आले. पुढे त्यांनी कधीच छ.शाहूंविरुद्ध हालचाली केल्या नाहीत.

कान्होजी आणि बाळाजीचे अध्यात्मिक गुरू एकच होते, ते म्हणजे श्री ब्रह्मेंद्रस्वामी. ही जवळीक नंतर उभयतांना परस्परपूरक ठरली.

आपला नम्र,
-गामा पैलवान

sanjay kshirsagar म्हणाले...

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद गामा पैलवानजी !