मंगळवार, १३ ऑगस्ट, २०१३

उमाजी नाईकच्या मुलांचे इंग्रजांच्या विरोधात बंड !



ले. ८                               श. १७६७ माघ व|| १

                     श्री            इ. १८४६ फेब्रुवारी १२

         
       स्मरणार्थ म||र तुक्या व म्हकाळा बि|| उमाजी रामोसी भिवडीकर याचे बंड होऊन माग चोरून रानांत हिंडतात. पौष मासी पुणे मुकामी हटसाहेब याचे बंगल्यावर दरवडा सोळा सतरा आसामीनी घातला. ते लोक काही सापडले. त्यात पानवडीकर हणमंत रामोसी याचा लेक किंवा पुतण्या बापू रामोसी हा बंडात होता. तो सदरहू चोरीत सापडला. तो ठाणे सासवड येथे चौकसी करिता हुजुरून आला. त्याजला कैदेत बेड्या पायात घालून कचेरीचे मंडपात होता. तों माघ शु|| १५ रोजी बुधवारी दिवसा बारावर च्यार वाजता म्हणजे अस्तमानचा पाच घटका दिवस होता ते वेलेस सदरहू कैदी यास परसाकडे नेण्याकरता बरोबर तुकाराम भोंगला व रामजी जैन सिपाई नि|| कुपणीसरकारचे हे दोन आसामी सिपाई चाबळीवर सोपानदेवाकडे घेऊन गेले. तेथे तुक्या व म्हंकाळा व हणमंता पानवडीकर व आणखी पाच येक आसामी असे मिलोन सिपाई याजवर चालोन येऊन भोगला याचे हातावर तरवारीचा वार केला व जैन सिपाई याची पाघरुणे व तलवार घेऊन कैदी बेड्यासुधा उचलून घेऊन गेले. मागाहून सिपाई व स्वार चालून गेले. त्याची व बंडवाले याची झटपट जाली. परंतु बंडवाले याणी बाप्या याच्या पायात बेडी होती ती मोडून सिपाई याजवर गोल्या घालून स्वार याचा घोडाहि आजारी केला. सिपाई माघारे आले. बंडवाले निघोन गेले. कासीनाथ विनायक मामलेदार निबुत मु|| होते. हे वर्तमान बापू आभंग वाणी वाल्हे मु|| सांगितले ते लि|| असे. मि|| माघ व|| १ गुरुवार सन १२५५ शके १७६७


विश्लेषण :- जेष्ठ इतिहास संशोधक श्री. कृ. वा. पुरंदरे यांनी उपरोक्त पत्र संशोधित करू प्रसिद्ध केले आहे. उमाजी नाईक याचे इंग्रजांच्या विरोधातील बंड एकेकाळी चांगलेच गाजले होते पण त्याच्या मुलांनीही आपल्या बापाप्रमाणेच इंग्रजांच्या विरोधात बंड केल्याचे फारसे कोणास माहिती नाही. खरे सांगायचे झाले तर, हे पत्र वाचनात येईपर्यंत मलाही उमाजीच्या मुलांची वा त्यांच्या या पराक्रमाची माहिती नव्हती.

         स. १८४६ मध्ये उमाजीची मुले – तुक्या ( तुकोजी ?) आणि म्हंकाळ ( महांकाळ ? ) यांनी इंग्रजांच्या विरोधात बंडाची उभारणी केली. याची झळ काही प्रमाणात रयतेला देखील बसणार होती आणि तशी ती बसलीही असावी. या दोघा भावांच्या पराक्रमाची पराक्रमाची एक झलक वरील पत्रात मिळते. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह इंग्रज अधिकारी हट याच्या बंगल्यावर छापा घालून लुटालूट केली होती. यावेळी त्यांचा एक साथीदार – बापू हा इंग्रजांच्या हाती लागला. त्याच्या पायात बेड्या घालून त्यास सासवड येथे मोठ्या बंदोबस्तात ठेवले होते. आपल्या सहकाऱ्याला इंग्रजांच्या कैदेतून सोडवण्याचा धाडसी डाव नाईक बंधूंनी आखला. पत्रातील माहिती पाहता, बापूसोबत नाईक बंधूंनी बापूला आपली योजना एका मध्यस्थमार्फत कळवली असावी. त्यानुसार बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास शौचास जाण्याच्या निमित्ताने बापूने सासवड ठाण्यातून बाहेर पडायचे होते. योजनेनुसार बापूने पहारेकऱ्यांना आपणास नैसर्गिक विधीसाठी बाहेर जायचे असल्याचे कळवले. तेव्हा दोन सशस्त्र शिपाई त्यास घेऊन चांबळी नदीवर असलेल्या सोपानदेवाच्या समाधीच्या जवळपास घेऊन गेले. त्या ठिकाणी नाईक बंधू आपल्या साथीदारांसह आधीच दबा धरून बसले होते. त्यांनी संधी साधून बापूसोबत असलेल्या दोन्ही शिपायांवर हल्ला चढवून त्यांना जखमी केले व बापूच्या पायात बेड्या असल्याने त्यास उचलून घेऊन जाऊ लागले. जखमी शिपायांनी तातडीने सासवड ठाण्यावर घडल्या प्रकाराची माहिती दिली. तेव्हा ठाण्यातील शिपाई व स्वार नाईक बंधूंच्या पाठीवर धावून गेले. एके ठिकाणी नाईक बंधू व इंग्रज शिपायांची गाठ पडून चकमक घडून आली. त्या प्रसंगी नाईक बंधू व त्यांच्या साथीदारांनी इंग्रज सैन्यावर तुफानी हल्ला चढवून त्यांना माघार घेण्यास भाग पाडले. हि चकमक चालू असताना किंवा संपल्यावर बापूच्या पायातील बेड्या तोडून त्यास सहीसलामत घेऊन जाण्यास नाईक बंधू यशस्वी झाले.       


   संदर्भ ग्रंथ :-

   १)  ऐतिहासिक संकीर्ण साहित्य खंड ६ वा                  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: