शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१३

अमृतराव पेशव्याचे मोरोबा फडणीस यास पत्र



ले. ३९                            श. १७२४ फा. व. १२

No. 178                         इ. १८०३ मार्च २०

                       नकल

        राजश्री मोरो बाबुराव स्वामी गोसावी यांसी     

    विनंती उपरी तुम्ही पत्र पाठविले ते प्रविष्ट जाहाले वाईस आल्यावर माधवराव आनत रास्ते याच्या येक दोन बैठका जाहाल्या त्यात वाकडेपणाचा आर्थ किमपी दिसत नाही याविशी संदेहे नसावा याचा आणुभवही येईल आम्ही येथून कूच करून राजश्री पंतप्रतिनिधी याची भेट घेऊन रास्ते सुधा मिरजेस जातो तेथे सर्वाचे ऐक्यता करून ठरेल आर्थ तो सेवेसी लेहून पाठऊ माने पठाण वगैरे फौजा आहेत त्याचा जागा जागा पटवर्धनरास्ते प्रतिनिधी याचे तालुकियात उपद्रव होतो त्यामुळे हे बाशा खातात यास्तव निक्षुण पत्रे होळकर याची यावी येविशी राजश्री बाळाजी विष्णु याणीही विनंती लिहिली आहे म्हणोन लिहिले ते विदित जाहाले म||रनिलेचेही पत्रावरून समजेल ऐशास रास्ते याची व तुमची बोलणी होऊन त्याचे सफाईचा मजकूर लिहिला त्यास च्यार सरदार दौलतीत आहेत हीच सरकारची दौलत आहे इंग्रजास चिरंजीव ----------- राजश्री बाबासाहेब ( दुसरा बाजीराव ) याणी कोकणांतील बंदर किनारा व गुजराथेतील माहाल लेहून देऊन पलटणे चाकरीस ठेविली याचा दौलतीत पाये शिरला मग पुढील स्थीत समजलोच आहे टोपीवाले काबूगार सर्वश्वी आकर्षण करितील शिंदे होळकर याचा तरी परस्परे कलह आहे त्याची याप्रसंगी समेटच आसावी त्यास चिरंजीवानी इंग्रजासी तह केला फरासीस सरदार शिंदे याचे पलटणांत राहू नयेत हा मजकूर राजश्री दौलतराव शिंदे यासी लेहून पाठविला आहे येविशी भोसले यासही पत्र पाठविले आहे आजपरियेत सर्वाचे येकदिली मुळे दौलतीचे संरक्षण जाहाले आता तमाशा पाहू लागल्यास सर्वाची स्थीत राहाणे कठीण आहे त्यापेक्षा फौजेची जूट बाधल्याने बहुत गुण आहेत मीरखानमाने वगैरे होळकराकडील सरदार मुलुक मारतात त्याचा बाशा खाऊन त्याणी आजुर्दे न राहावे आपल्या फौजा साऱ्या जमल्यानंतर त्यासही दबाऊन गोष्ट सांगावयासी येईल चिंता नाही पेशजी प्रतिनिधीरास्ते पटवर्धनविंचुरकर यासी होळकराची खातरजमेची पत्रे गेलीच आहेत तुम्हाकडील लाखोटा होळकर यास आला तो त्याजकडे पाठविले आहे व सरकारातूनहि त्यास लिहिले आहे की मसलतीचे प्रसंगी आपसात फूट न पडावी मीरखानमानेनागो जिवाजी यास पत्रे पाठऊन बोलाऊन घेणे त्याचा उपद्रव प्रतिनिधी रास्ते पटवर्धन याच्या मुलुकास न लागे ते करणे याप्रमाणे लिहिले गेले आहे तेथून उतर येईल ते तुम्हास लेहून पाठविले जाईल. बाबाकडील पत्रे आताच आली सारांष इंग्रज बाजीरावसाहेब येक जाहाले नवाबाचे बोलणे आहे की रास्ते पटवर्धन आदिकरून सर्वाचे येकमत जाले आसता याची सला आम्ही आतून सांगू नाहीतर तुमचे मुद्दे काये आहे ते सांगावे तोडजोड पाडून देऊ त्याजवरून बाबानी याद करून त्याजवळ दिल्ही त्याची नकल इकडे पाठविली आहे ( http://peshwekalinitihas.blogspot.in/2013/08/blog-post_450.html ) ती पाहिली त्यात आम्हास दाहा लक्षाचा सरंजाम द्यावा दोन किले द्यावे नानास दतक देऊन पूर्ववत चालवावे आपण स्नानसंध्या करून स्वस्थ राहावे इतकेच आहे फडक्याचा सरंजाम व आसाम्या पूर्ववत असाव्या याप्रमाणे आहे असो काये घडेल खरे त्यास होळकर वगैरे संमज आम्हास टाकून गेले फतेसिंग माने आमचे लक्षात आहेत पठाण माघारे बोलाविले आहेत येशवंतराव घोडनदीवर राजापूर आहे तेथे आहे आम्हाजवळ ठराऊन गेले आहेत की चांदवडास जातो आपण वाईस पटवर्धन रास्ते आदिकरून समेट करावी नाहीतरी फतेसिंग माने व आपण गारदौडचे सुमारे आसावे पुढे मी आहे याप्रमाणे ठराऊन गेले आता सर्वानी दौलतीकडे पाहावे नाहीतरी दौलत इंग्रजाचे घरी गेली त्यास सर्वानी येकरूप होऊन आम्ही व ते सारे येक होऊन मग सर्वाचे विचारे मसलत करावयासी येईल नाहीच तरी मग आम्हास कसेही आसेल तरी होळकरास सोडून परिणाम नाही तरी येविसीचे ते ल्याहावे आम्ही वर्षप्रतिपदेस कूच करितो खर्चाची वोढ बहुत आहे तुमचे कार्य ते करावे पठाण प्रांतात दंगा करितात त्यामुळे बाशा खातात हे तरी खरे परंतु पठाण कोणाचे आळ्यात आहेत नाहीत याची माहीतगारी आहेच त्यात मनाईची पत्रे येशवंतराव याची पाठविली आहेत परंतु सर्वांनी मजकडे पाहून येकत्र होऊन दौलत सांभाळावी नाही तरी सर्वांनी आम्हासुध आपला बच्याव तरी करून घ्यावा जाणिजे छ २५ जिल्काद हे विनंती



( हे पत्र ता. १ ला निघून ता. २४ एप्रीलला पोचले असे इंग्रजीत लिहिले आहे. ) 
      

टीप :- उपरोक्त पत्र कोणी लिहिले याचा खुलासा पत्राच्या संपादकांनी केला नाही परंतु पत्रातील मजकूर व घटनाक्रम पाहता या पत्राचा लेखक अमृतराव पेशवा असल्याचे अनुमान बांधता येते.  यासाठी आणखी एक प्रमाण असे की, दु. बाजीराव पेशव्याचा ‘ चिरंजीव ‘ म्हणून उल्लेख करणारा वयस्कर असा पुरुष त्यावेळी भट कुटुंबात इतर कोणी नव्हता. तसेच दुसऱ्या बाजीरावाचे टोपण / घरगुती नाव बाबासाहेब असे होते.  



संदर्भ ग्रंथ :-
१)      भारत सरकारच्या केंद्रीय ( दिल्ली ) दफ्तरखान्यांतील ऐतिहासिक मराठी साधने :- संपादक - प्रा. गणेश हरी खरे, शंकर नारायण जोशी
                                                                       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: