शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

पेशवाईतील खाद्यजीवन


    आमचे उत्साही व अभ्यासू ब्लॉगर मित्र श्री. ' कोहम महोक ' यांनी एकदा चर्चेदरम्यान पेशवेकाळात छत्रपती, पेशवे व त्यांच्या सरदारांना कोणते खाद्य पदार्थ आवडत असत अशा आशयाचा एक प्रश्न विचारला होता व याच विषयावर एक लेख लिहिण्याची सूचनावजा आज्ञाही केली होती. तेव्हा त्या आज्ञेस स्मरून हा लेख लिहिण्याचा खटाटोप करीत आहे.

    ऐतिहासिक पत्रांमध्ये लढाया, राजकीय कट - कारस्थाने, मानपान, जमाखर्च, वतन - निवाडे याशिवाय काही प्रमाणात घरगुती बाबी इत्यादी गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. त्यामानाने  आवडीच्या खाद्यपदार्थांच्या मागणी विषयी किंवा संबंधित असे आवर्जून केलेले उल्लेख फारसे आढळत नाही. पण त्यातूनही जे काही उल्लेख वाचनात आले ते या ठिकाणी नमूद करत आहे. यातून तेव्हाच्या खाद्य संस्कृतीची वाचकांना तोंडओळख व्हावी हाच यामागील हेतू.

    इतिहास अभ्यासकांना वैद्य दप्तराविषयी अधिक काही सांगायची गरज नाही. परंतु सर्वसामान्य वाचकांसाठी थोडी माहिती देणे गरजेचे आहे. वैद्यांच्या घराण्याचा उल्लेख शिवछत्रपतींच्या काळातील पत्रांमधून आढळत असला तरी खऱ्या अर्थाने त्यांचा राजकारणाशी संबंध संभाजीपुत्र शाहूच्या काळात आला. शाहूच्या विश्वासू राजकीय सल्लागारांत या घराण्यातील पुरुषांचा समावेश होतो. शाहूजवळ यांचे असलेले वजन लक्षात घेऊन आंग्रे, भोसले इ. प्रमुख वजनदार सरदारांनी या घराण्यातील पुरुषांना सातार दरबारी एकप्रकारे आपले वकील म्हणून नेमले होते. त्याशिवाय वेळप्रसंगी वैद्य घराण्यातील पुरुष मराठी सरदारांना मोहिमांसाठी कर्जही देत असत. त्यामुळे त्यांचा मराठी राज्यातील बव्हंशी प्रमुख सरदारांशी जवळचा संबंध होता. प्रस्तुत विषयाच्या मर्यादेत एवढी माहिती पुरेशी आहे. वैद्यांच्या दप्तरांत जी काही पत्रे प्रसिद्ध करण्यात आली, त्यांपैकी त्यांच्या घरगुती पत्रांमध्ये कोकणातून ज्याप्रमाणे वारंवार तांदूळ मागवल्याचे उल्लेख आढळतात त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या परिचयाची फणसपोळीही मागविल्याचे उल्लेख आढळतात. फणसपोळीचा एकदम जुना उल्लेख स. १७४३ च्या पत्रांत आढळतो. 

    छत्रपती घराण्यातील पुरुषांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांचे तपशील फारसे वाचनात आले नाहीत. अपवाद छत्रपती शाहूचा.  वैद्य दप्तरांत जी आंग्रे व इतरांची पत्रे प्रकाशित करण्यात आली आहेत त्यानुसार शाहूच्या मागणीस्तव तसेच त्याची मर्जी राखण्यासाठी आंगऱ्यांनी त्यांस वारंवार पुढील खाद्यपदार्थ पाठवल्याचे उल्लेख मिळतात :- नारळ, सुपारी, खजूर, केळी, तसेच मासे, सोडे, बोंबील इ. तत्कालीन राजकीय मुत्सद्द्यांप्रमाणे शाहूलाही बागांची बरीच आवड होती. अशाच एका शाहूच्या बागेकरिता तुळाजी आंग्रेने सुपारी, नारळ, अननस, केळी, भुईचा चाफा, मीरवेल, अशोक इ. ची मिळून सुमारे साडेचारशे रोपे पाठविली होती. 

    छत्रपती प्रतापसिंहाच्या कारकिर्दीतील एका मेजवानीचा उल्लेख मराठी दफ्तर मध्ये आढळतो. त्यानुसार तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धांत इंग्रजांनी सातारा ताब्यात तेथे छत्रपतींची पुनर्स्थापना केली. त्यावेळी इंग्रज मुत्सद्दी एल्फिन्स्टन यांस प्रतापसिंहाने बकऱ्याची मेजवानी दिली होती.

    पेशवे घराण्याचा पुरंदऱ्यांशी असलेला संबंध सर्वांच्या परिचयाचा आहे. स. १७४८ साली रघुनाथरावाने नाना पुरंदरेस पाठवलेले एक पत्र उपलब्ध आहे. त्यानुसार त्यावेळी रघुनाथ आजारी होता व वैद्यांनी त्यास पथ्यही सांगितले. रघुनाथाने वीस दिवस पथ्य पाळले पण नंतर कणसे खाण्याचा मोह होऊन पथ्याचा भंग झाला. त्यामुळे प्रकृती बिघडली. तेव्हा नानासाहेबाने त्याची कडक शब्दांत हजेरी घेतली होती. या पत्रानुसार पठ्ठ्याला कणसे पचत नव्हती व खाल्ल्याशिवायही राहवत नव्हते असे दिसून येते. 

    नाना पुरंदरेच्या घरगुती पत्रांत काही नोंदी आढळतात. त्यानुसार एका पत्रात ब्राम्हणांना भोजनात दही व दुध देण्याची सूचना केल्याचे दिसून येते. तसेच स. १७६८ च्या वसंतपूजेच्या वेळी जेजुरीच्या म्हाळसाकांतास जो नैवद्य अर्पण करायचा तो कसा बनवायचा याचेही निर्देश नाना पुरंदरेने दिल्याचे आढळतात ते पुढीलप्रमाणे :- नैवद्यात जो भात बनेल तो उत्तम बारीक तांदळाचा असावा. दह्यात मीठ घालून मग ते भातावर टाकावे. त्याशिवाय वांग्याचे भरीत बनवताना फोडणीसाठी जिरे, हिंग, मिरे इ. चा वापर करून थोडे तिखट टाकण्याची सूचना आहे. तसेच नैवद्याच्या जितक्या वाट्या बनतील त्या प्रत्येक वाटीवर एक पापड ठेवण्याची दक्षता घेण्याचीही आठवणीने सांगितले आहे. देवाच्या पूजेनंतर ब्राम्हणांना भोजनात पोळ्यांची खीर देण्याचेही निर्देश दिले आहेत.

    स. १७७० साली थोरल्या माधवरावास स्वारीच्या प्रसंगी पुरंदरे घराण्यातील व्यक्ती भेटावयास गेली. त्यावेळी माधवरावास पेश केलेल्या जिनसांत भाजीपाल्याचाही समावेश होता. त्यापैकी वांगी व घेवड्याच्या शेंगांची भाजी लगेच करण्याचा करण्याचा माधवरावाने हुकुम केला. वांग्यावरून आठवले. त्यावेळी वांगी हि बहुतेक सर्वांच्या आवडीची असावी. कारण, सवाई माधवराव पेशव्याला देखील खास कृष्णाकाठची वांगी आवडत असल्याचे उल्लेख खऱ्यांच्या लेखसंग्रहात वाचल्याचे स्मरते.

    पेशवाईतील प्रख्यात मुत्साद्द्यांपैकी एक नाना फडणीस --- जो आपल्या हिशेबी कारभारासाठी व गुप्त कारस्थानासाठी प्रसिद्ध आहे -- त्याच्या खाण्याच्या आवडीविषयी पुढील माहिती मिळते :- समशेरबहाद्दरचा मुलगा अलीबहाद्दार बुंदेलखंडात होता. नाना त्याच्याकडून द्राक्षे, डाळींब मागवून घेत असे. तसेच त्याला तोंडली व कोवळ्या कोथिंबीरीचीही आवड होती. खेरीज त्याने कित्येक फळ - फुलबागांची निर्मितीही केली होती.

    सवाई माधवरावाचा प्रथम विवाह समारंभ हा उत्तर पेशवाईत अनेक कारणांनी जरी गाजला असला तरी या विवाहाच्या प्रसंगी जो काही थाटमाट करण्यात आला होता तसा पूर्वी आणि नंतरही झाला नसल्याचे उल्लेख आढळतात. या प्रदीर्घ काळ चाललेल्या लग्नसमारंभात पाहुण्यांच्या फराळाची, भोजनाची व्यवस्था कशी असावी याची सूचना असणारे एक दीर्घ पत्र काव्येतिहाससंग्रहात प्रकाशित केले आहे. त्या समारंभातील फराळ व भोजनाच्या पदार्थांची यादी खालीलप्रमाणे :- 

    फराळाचे पदार्थ :- पाच प्रकारचे लोणचे, १० प्रकारच्या कोशिंबिरी, लाडू, पोहे आंबेमोहर बारीक भात. मातबरांस लाह्या, खानदेशातून नवीन पोहे मागवण्याची सूचना. तसेच खजूर, खारीक, खोबरे, बदाम, पिस्ते, मेवा, मिठाई, मुरांबे, नारळ, दही - दुध, साजूक व मध्यम प्रकारचे तूप.

    ब्राम्हण भोजनातील पदार्थ :- वरण, भात, दोन ते तीन प्रकारच्या भाज्या, सांबार, आवळे गाजराचे लोणचे, कढी, पुरणपोळी व तूप, बुंदीचे लाडू 



    मुख्य भोजन समारंभातील पदार्थ :- खासा व मध्यम असे भाताचे दोन प्रकार ; साखरभात, वांगे भात ; तुरीचे वरण ; दोन प्रकारचे सांबार ; दोन प्रकारची आमटी ; १० प्रकारचे लोणचे , साखरेचे लोणचे ; कढी ; सार दोन प्रकारचे ; दहा ते बारा प्रकारच्या भाज्या. त्यात तोंडली, पडवळ, वांगी इ. चा समावेश ; पूरणपोळ्या ; साधे वडे व वाटल्या डाळीचे कडिवडे ; ओल्या हरभऱ्याच्या डाळीची खिचडी ; चांगले - मध्यम साजूक तूप ; मठ्ठा, चख्खा, अंबरस, श्रीखंड ; पापड, सांडगे, फेण्या, तिळवडे, चिकवड्या, मीरगोडे बोंडे मेक्यांच्या काचऱ्या तळून ; कोशिंबीरीचे २० प्रकार. 


    असो, असे अनेक तुरळक उल्लेख अनेक ऐतिहासिक पत्रांत आढळून येतात. परंतु इतिहासकारांना केवळ राजकीय उलाढाली व लढायांमध्ये अधिक रस असल्याने या नोंदींची दखल फारशी घेतली जात नाही. वास्तविक खाद्यसंस्कृती हे इतिहासाचे एक अंग आहे. परंतु, काही कारणांनी आपल्याकडे अजूनही ते दुर्लक्षित आहे. निदान या लेखाच्या वाचनातून कोणास या विभागावर संशोधन वा तपशीलवार लेखन करण्याची प्रेरणा मिळेल असा आशावाद व्यक्त करून हा लेख समाप्त करतो.

    संदर्भ ग्रंथ :-
१) वैद्य दप्तर - खंड २ व ४
२) मराठी रियासत - खंड ८
३) पुरंदरे दप्तर - खंड ३
४) मराठी दप्तर - भाग दुसरा
५) काव्येतिहास संग्रह पत्रे व यादी 



३ टिप्पण्या:

deom म्हणाले...

स्वादिष्ट लेख !!! अजूनही उल्लेख करण्या सारखे पदार्थ आहेत जसे चटणी भाकर,लाल तिखट,आणि मांसाहारी पदार्थ. बरे तुम्ही सरदार पेशवे वगैरे मंडळीन बद्दल बोललात सर्वसामान्य मावळे काय खात होते बरे??

sanjay kshirsagar म्हणाले...

deom,
उल्लेख करण्यासारखे पदार्थ शिल्लक राहिले खरे, पण हल्ली कोणतेही विधान पुराव्याशिवाय करता येत नाही. सामान्य लोकांच्या किंवा मावळ्यांच्या आहारात काय असणार ? आपल्या नेहमीच्या भाज्या, नागली, वरी, उडीद, हरभरा, गूळ , बाजरी, ज्वारी इ. बाकीच्या पदार्थांचा तुम्ही उल्लेख केलेला आहेच. सबब पुनरोक्ती करत नाही.

Unknown म्हणाले...

याबद्दल मला थोडी अजून माहिती मिळेल का.....पेशवेकालीन खाद्यसंस्कृती च्या प्राथमिक साधनांची उपलब्धता किती आहे हे जाणून घ्यायचे होते.