गुरुवार, ३ मार्च, २०१६

शिवाजीचे राज्य नेमकं किती जिल्ह्यांचं ?





    काही दिवसांपूर्वी एके ठिकाणी वाचनात उल्लेख आढळला कि, छ. शिवाजी महाराजांचे राज्य तीन ते साडेतीन जिल्ह्याइतकं होतं. शिवाजीने स्थापलेल्या स्वराज्याविषयी कोणत्या तरी अज्ञात इतिहासकाराने अशा आशयाचं विधान शिवाजीच्या कर्तुत्वाच्या मूल्यमापनासाठी केलं असेल परंतु आपल्याकडच्या काही ' पढतमुर्खांनी ' या विधानाचा अक्षरशः अर्थ घेऊन त्याचा भलताच विपर्यास केला. त्याचे सर्वात जास्त प्रत्यंतर इंटरनेटवरील लेखांत आपणांस आढळून येईल. अस्सल पत्रांचे पुरावे, मान्यवर इतिहासकारांचे निष्कर्ष प्रमाण मानत असताना शब्दशः त्यांचा अर्थ कधीच घ्यायचा नसतो. उलट प्रत्यंतर पुराव्यांत त्यांना दुजोरा मिळतो का हे बघायचे असते. शिवाय तत्कालीन परिस्थिती, मानवी स्वभाव वगैरे गोष्टीही ध्यानी घ्याव्या लागतात. परंतु अलीकडे अशाप्रकारची शिस्त इतिहास अभ्यासकांत क्वचितच दिसून येते. शिवाय इतिहासाची आवड असणारे जे वाचक आहेत, ते देखील आपणांस मिळत असलेली माहिती --- मग ती छापील पुस्तकातील असो वा इंटरनेटवरील --- तिची सत्यासत्यता पडताळून न पाहता त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात. यांमुळे कित्येक गैरसमज रुजत जातात. प्रचलित होत जातात.


    शिवाजीचं राज्य तीन ते साडेतीन जिल्ह्याइतकं होतं अशा आशयाचं विधान कोणत्या इतिहासकाराने केले हे जाणून घेण्यासाठी मी, माझ्याजवळील सर्व संदर्भ ग्रंथ चालून पाहिले असता डॉ. वि. गो. खोबरेकर यांच्या ' महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड ( भाग - १ ) ' ग्रंथात मला पुढील नोंद आढळली ती अशी :-

' महाराजांनी " हिंदवी स्वराज्य " हे विजापूरच्या आदिलशहाचे लचके तोडून निर्माण केले. श्री. पगडी सांगतात की विजापूरच्या राज्याच्या उत्कर्षाच्या काळांत त्याचे आजच्या परिभाषेत बोलावयाचे तर चौवीस जिल्हे होते. महाराजांच्या मृत्यूच्या पूर्वी यापैकी बारा जिल्हे मराठी राज्यांत समाविष्ट झाले होते. मुघलांचा एकच जिल्हा, बागलाण हा मराठी राज्यात आला होता आणि तेथेच मुघल आणि मराठे यांची अटीतटीची झुंज चालू होती. '


              

    उपरोक्त नोंदीवरून शिवाजीचे राज्य हे बारा ते तेरा जिल्ह्यांचं ठरतं. परंतु तरीही एक प्रश्न कायम राहतो व तो म्हणजे इतिहासकारांनी भौगोलिक क्षेत्रफळ सांगण्यासाठी ' जिल्हा ' हे प्रमाण का वापरले असावे ? इतरवेळी हा प्रश्न मूर्खपणाचा वाटला असता परंतु सध्याची स्थिती अशी आहे कि, शिकली - सवरलेली माणसं स्वतंत्र बुद्धीनं विचार न करता केवळ पोथीप्रमाण्यात अडकून पडली आहेत. त्यामुळे इतिहासकारांनी सहजगत्या काढलेल्या उद्गारांचेही अर्थापेक्षा अनर्थच काढले जात आहेत. परंतु हा दोष इतिहासकारांचा तरी का मानावा ?


    या प्रश्नाची चर्चा करण्यापूर्वी नमुना म्हणून इथं एक उदाहरण देतो.


    विभाजनापूर्वी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचं क्षेत्रफळ  सुमारे ९५५८ चौ. कि.मी. इतकं होतं. पालघरच्या निर्मितीनंतर ते आता सुमारे ४२४१ चौ. किमी इतकं बनलं आहे. याचवेळी महाराष्ट्राशेजारच्या गोवा राज्याचे क्षेत्रफळ जर आपण पाहिले तर ते अवघं ,७०२ चौ.किमी इतकं आहे.

    सांगण्याचं तात्पर्य इतकंच कि, ' जिल्हा ' हि संज्ञा अमुक इतकं क्षेत्रफळ असलेल्या भूभागालाच द्यावी असाही काही नियम नाही. तसेच अमुक इतक्या भूभागाचं राज्य असावं असाही निर्देश नाही. परंतु हि देशांतर्गत उदाहरणे झाली. जगभरातील लहानमोठ्या देशांची क्षेत्रफळं जरी पाहिली तर आपल्या लक्षात येईल कि, एखाद्या स्वतंत्र देशाचं किमान क्षेत्रफळ अमुक इतकं असावं, असा नियम नाही. तुलनेकरता इस्त्रायल वा तत्सम इतर देशांची उपलब्ध क्षेत्रफळं बघा.


    यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की, राज्याचा आकार, विस्तार किती मोठा - लहान असतो यावर काही अवलंबून नसून त्याची शत्रूंकरता असलेली उपद्रवक्षमता तसेच राज्यांतर्गत असलेली उत्पादन, कार्यक्षमता महत्त्वाची असते.


   
    कारण, शांतताकाळातील आपल्याच देशातील ठाणे जिल्हा विभाजन वा तेलंगण राज्यनिर्मितीचं उदाहरण लक्षात घेतलं तर मध्ययुगीन काळातील युद्धमान स्थितीतील राज्याच्या सीमा किती काटेकोर असतील ? राज्याची हद्द ठरवताना सीमारेषेवरील गावांची हद्द निर्विवाद व काटेकोरपणे ठरवता आली पाहिजे. अजून आपल्याला महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न सोडवता आला नाही, हे देखील लक्षात घेतले पाहिजे. तर अशा स्थितीत मध्ययुगीन काळातील एखाद्या राज्याच्या भौगोलिक विस्ताराची मर्यादा सांगताना इतिहासकारांना आधुनिक परिभाषेतील एखादी संज्ञा वापरावी वाटणं स्वाभाविक आहे. स्वराज्यात अमुक इतके प्रांत होते, परगणे होते वा सुभे होते म्हटल्याने स्वराज्याची भौगोलिक मर्यादा थोडी लक्षात येणार ? त्यात आणखी परगणा, प्रांत, सुभा यातला भेदही माहिती पाहिजे. इतिहास अभ्यासकांखेरीज या संकल्पना इतिहास वाचकांना माहिती नसतात. अशा वेळी प्रचलित संज्ञा वापरून वाचकांसमोर एक भौगोलिक मर्यादेचं ढोबळ चित्र उभं करणं इतिहासकारांना आवश्यक ठरतं. त्यामुळे अशा संज्ञा वापरल्या जातात.



    इथे खरा प्रश्न जबाबदारीचा आहे. इतिहासकार जबाबदारीने लेखन करतो का ? तर सामान्यतः कोणताही इतिहासकार बेजबाबदार विधान करत नाही. परंतु वाचकांनीही थोडीफार आपली जबाबदारी समजावून घेतली पाहिजे. इतिहासकाराने वापरलेली संकल्पना, संज्ञा नेमकी कशाकरता आहे याचं भान बाळगलं पाहिजे. अन्यथा गैरसमज निर्माण होऊन ते प्रचलित होण्यापलीकडे काय साध्य होणार ? अशा गैरसमजांना जन्म द्यायचा, प्रचलित करायचं कि ते मुळातच होऊ नयेत याकडे लक्ष पुरवायचं याचा विचार वाचकांनीच करावा. 
             
 
संदर्भ ग्रंथ :-
  

(१) महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड ( भाग १ ) :- डॉ. वि. गो. खोबरेकर

   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: