रविवार, २८ सप्टेंबर, २०१४

श्रीमंत बाजीराव रघुनाथ पेशवे ( भाग - १ )

 श्रीमंत बाजीराव रघुनाथ पेशवे
                                                                    
    ' राज्यसंहारक ', ' नादान ', ' विषयलोलुप ', ' लंपट ', ' कपटी ', ' नीच ', ' विश्वासघातकी ', ' उल्लू ' इ. शेलक्या विशेषणांनी इतिहासकार रघुनाथपुत्र बाजीरावाची संभावना करतात. मराठी राज्याच्या इतिहासात थोरला बाजीराव हा ' बाजीराव ' म्हणून नावाजला जातो तर दुसरा ' रावबाजी ' ! यातच सर्व काही आले. प्रस्तुत लेखांत या रावबाजीच्या राजकीय कारकीर्दीचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. तो खरोखरच --- इतिहासकार म्हणतात तसा नादान, पळपुटा, लंपट, राज्यसंहारक होता कि कि ना. सं. इनामदारांनी म्हटल्याप्रमाणे ' मंत्रावेगळा ' होता हे आपण पाहू.

    जन्म व बालपण :- नारायणराव पेशव्याच्या खुनानंतर रघुनाथराव हा पेशवा बनला. परंतु सखाराम बापू, नाना फडणीस प्रभूती मुत्सद्यांनी बारभाई मंडळ स्थापून रघुनाथ उर्फ दादा दादासाहेबांस पदच्युत करून प्रथम नारायणाची पत्नी गंगाबाई व नंतर तिचा अल्पवयी पुत्र सवाई माधवरावाच्या नावाने कारभार आपल्या हाती घेतला व नारायणाच्या खुनाचा ठपका दादावर ठेवून त्यास कैद करण्यासाठी फौजा रवाना केल्या. पाठीवर धावून आलेल्या कारभाऱ्यांच्या व त्यांच्या पक्षाच्या सरदारांच्या फौजांना झुकांडी देत, दादा दत्तक पुत्र अमृतरावास घेऊन गुजरातमध्ये इंग्रजांच्या आश्रयास्तव धावला. त्यावेळी त्याची पत्नी आनंदीबाई गर्भवती असून तिचा प्रसूतीसमय जवळ आल्याने, दादाने तिला धारच्या पवारांकडे ठेवले होते. याच ठिकाणी ता. १७ जानेवारी १७७५ रोजी तिला मुलगा होऊन त्याचे नाव बाजीराव असे ठेवण्यात आले. मराठी राज्याच्या इतिहासात हा दुसरा बाजीराव म्हणून (कु)प्रसिद्ध आहे.

    वस्तुतः रावबाजींची राजकीय कारकीर्द स. १७९५ च्या सुमारास सुरु झाली असली तरी  त्यांच्या पूर्वायुष्याचा थोडाफार मागोवा या ठिकाणी घेणे आवश्यक आहे. बाजीरावाचा जन्म झाला तेव्हा दादा गुजरातमध्ये सुरत येथे होता. बाजीरावास घेऊन त्याची आई --- आनंदीबाई सुरतला काही दिवस गेली होती. तिथून ती परत धारेस आली. यावेळी इतिहासप्रसिद्ध असा ' पुरंदरचा तह ' इंग्रज - पेशव्यांमध्ये घडून आला होता. ( दि. १ मार्च १७७६ )

    धारेस आल्यावर आनंदीबाईने पदरी फौज ठेवून कारभाऱ्यांची --- म्हणजे पुणे दरबारची ठाणी उठवण्यास आरंभ केला. बाईचा दंगा मोडून काढण्यासाठी कारभाऱ्यांनी विसाजी गोविंद आठवले व खंडेराव त्रिंबक ओढेकर यांना रवाना केले. त्यांनी धारच्या किल्ल्यास वेढा घालून आनंदीबाईची कोंडी केली. स. १७७६ च्या जुलैपासून नोव्हेंबर पर्यंत आनंदीबाईने धारचा किल्ला लढवला व जकीरा ( सामग्री ) समाप्त झाल्यावर तिने शरणागती पत्करली. यावेळी तिने आपणहून कारभाऱ्यांपुढे दोन पर्याय ठेवले. (१) पुण्यास पोहोचवणे (२) अहिल्याबाईजवळ ठेवणे. कारभाऱ्यांनी दुसरा पर्याय स्वीकारून तिला नर्मदेनजीक मंडलेश्वर येथे बंदोबस्ताने ठेवले. तेथून काही मैलांवरच महेश्वर येथे अहिल्याबाईचा मुक्काम होता. या स्थळी आनंदीबाईचा मुक्काम दोन वर्षे झाला. स. १७७९ मध्ये कारभाऱ्यांनी तिला दादाकडे बऱ्हाणपुरावर पोहचवले. तेथून ती दादासोबत सुरतला गेली. सालबाईच्या तहानंतर दादा कारभाऱ्यांच्या स्वाधीन झाला व तेव्हापासून सहपरिवार त्याचा मुक्काम कोपरगावाजवळ कचेश्वर येथे झाला. ( स. १७८३ )
    

    चर्चेच्या ओघात आपण थोडे पुढे आलो. प्रस्तुत लेखाच्या नायकाचे आपल्या पित्यास लिहिलेलं पत्र इतिहासात प्रसिद्ध आहे. पत्राचा लेखक नावाला जरी बाजीराव असला तरी त्यातील मजकूर आनंदीबाईच्या तोंडचा आहे. स. १७७८ च्या १ जानेवारीस आनंदीबाईने बाजीरावामार्फत सुरतेला पाठवलेल्या पत्रात जो मजकूर दिला आहे त्यापैकी प्रस्तुत विषयास उपयुक्त तेवढा येथे देत आहे :- ' …. आम्ही लेकरे, विशेष लिहिले तर तीर्थरुप म्हणतील की, " बायको सारा वेळ आम्हांस गांजीत असते. तिला लेक झाला तोही तसाच खोटा निघाला ! " ' यावेळी बाजीरावाचे वय सुमारे ३ वर्षे होते. तीन वर्षांच्या मुलाचे हे उद्गार असणे शक्य नाही हे उघड गुपित आहे. परंतु आनंदीबाईच्या विषयी दादाची भावना काय होती हे सांगण्यासाठी हे शब्द पुरेसे आहेत.
 

    स. १७८३ च्या ११ डिसेंबर रोजी दादाचे कचेश्वर येथे निधन झाले. तेव्हापासून १० वर्षे आपल्या मुलाबाळांसह आनंदीबाई कोपरगावी राहात होती. पुढे स. १७९२ मध्ये ती आनंदवल्लीस आली आणि तेथेच दि. २७ मार्च १७९४ रोजी तिचा मृत्यू झाला. यावेळी बाजीराव सुमारे १९ वर्षांचा होता. वयाच्या १९ व्या वर्षांपर्यंत बाजीरावाची वर्तणूक कशी होती ? सत्ताप्रप्तीचा हा तंटा नाना फडणीस व रघुनाथरावाच्या वंशात दीर्घकाळ चालला. त्यामध्ये रघुनाथ, आनंदी व नानाच्या मृत्यूनेही खंड पडला नाही. नानाच्या निधनानंतर त्याच्या पत्नीने इंग्रजांच्या मदतीने बाजीरावाशी तंटा सुरु ठेवला. मात्र त्याचे स्वरूप वेगळे होते. असो. 

     या ठिकाणी आपण हे पाहू कि, स. १७७५ पासून १७८४ पर्यंत बाजीरावाची वागणूक कशी होती ते :- स. १७७६ ते ७९ हि दोन तीन वर्षे व नंतर स. १७८३ पासून ते पेशवेपद प्राप्त होईपर्यंत बाजीराव आपल्या परिवारासह नानाच्या नजरकैदेत होता. भट कुटुंबातील मुलांना जे शिक्षण देण्यात येई तेच बाजीराव व त्याच्या बंधूंना मिळेल याची खबरदारी नानाने घेतली होती. परंतु, प्रचलित राजकारणास उपयुक्त असे शिक्षण मात्र त्यांस न मिळू देण्याची त्याने दक्षता घेतली होती. अर्थात, तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता नानाचे हे कृत्य योग्य असले तरी दूरदृष्टीचे खासच नव्हते. 

    असो, नानाच्या नजरकैदेत असताना बाजीरावास तत्कालीन प्रचलित शिक्षण पद्धतीनुसार जे शिक्षण देण्यात येई त्यात त्याला फारसा रस वाटायचा नाही. पुस्तकी विद्येपेक्षा मैदानी खेळ व शारीरिक कसरतीची त्यांस अधिक आवड होती. घोडेस्वारी, तलवार - तिरंदाजी व भालाफेकीत तो कुशल असल्याचा ग्रांट डफनेच उल्लेख केला आहे याशिवाय तालमीचाही त्यास विशेष शौक होता. खेरीज स्वारी ' वयात ' आल्याने विषयासक्तही झाली होती. आनंदीबाई नानाच्या नावाने जी ओरड करायची ती याच कारणासाठी ! बाजीरावाच्या तैनातीस जी माणसे नेमली होती त्यात चांगली कमी व त्याकाळच्या समजुतीनुसार हलक्या दर्जाची --- म्हणजे सुशिक्षित, सुसंस्कृत नसलेली --- मंडळी जास्त होती. विशेष म्हणजे याच आशयाची तक्रार स. माधवाच्या बाबतीत गोपिकाबाईचीही होती. असो, बाजीरावाच्या पुढील आयुष्यातील दुर्वर्तनाची पाळंमुळं त्याच्या भूतकाळात दडलेली आहेत.

    बाजीरावाच्या वाईट गुणांचा, वर्तनाचा व संगतीचा दृश्य परिणाम आई या नात्याने आनंदीबाईच्या नजरेस लगोलग आला. याबद्दल तिने बाजीरावाची पुष्कळ कानउघडणी केली. प्रसंगी मारहाण केली. पुण्यास नानाला पत्रे पाठवून याविषयी योग्य त्या उपाय योजना करण्याची विनंती केली. परंतु नानाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले. यामागील त्याच्या हेतूंची यापूर्वीच्या लेखांमध्ये ठिकठिकाणी चर्चा येऊन गेल्याने पुनरोक्ती करत नाही.  


    मैदानी खेळ, शस्त्रविद्या, कामशास्त्र यांसोबत बाजीरावाची परंपरागत धर्मशास्त्रातही तज्ञ होता. कित्येकदा यज्ञ - होम प्रसंगी करावयाच्या मंत्रोच्चारात यज्ञ - हवनकर्त्या ब्राम्हणांच्या बरोबरीने तो स्वतःही सहभाग घेत असे. खेरीज तो बापाप्रमाणेच कट्टर शिवभक्त होता.

    सारांश, आनंदीबाई मरण पावली तेव्हा अटक प्रसिद्ध राघोभरारीचा मुलगा --- बाजीराव हा १९ - २० वर्षांचा पोथी - पुराण पांडीत्यात पारंगत असलेला ; शस्त्रविद्या जाणणारा ; तालीमबाज ; विषयासक्त असा तरुण होता. जन्मापासूनचा काळ बंदीवासात गेल्याने प्रचलित राजकारणाची, आपल्या कर्तव्याची त्यांस ओळख नव्हती. मात्र, राजनीतीतज्ञ व कारस्थानी ( चांगल्या अर्थाने ) अशा मातेचा --- आनंदीबाईचा त्यांस सहवास भरपूर लाभला होता. रावबाजी बोलण्यात सापडत नाही असा एल्फिन्स्टन प्रभूतींचा सूर आहे. रावबाजीच्या या अंगच्या गुणांच्या विकासाचे मूळ त्याच्या मातृसहवासात दडलेलं आहे.

    स. १७९४ मध्ये आनंदीबाईचा मृत्यू झाल्यावर बाजीरावाची परिस्थिती थोडी बदलली. मार्गदर्शन करण्यासाठी वडील बंधू अमृतरावखेरीज आता त्यास कोणी नव्हते.  अमृतराव यावेळी  २९ वर्षांचा असून तो जाणता व कर्ता पुरुष. पण तो दादाचा दत्तक पुत्र असल्याने बाजीरावावर त्याचा जितक्यास तितकाच वचक होता. तर बाजीरावाचा  धाकटा भाऊ चिमणाजी या समयी अवघ्या १० वर्षांचा होता. सारांश, आनंदीबाईच्या निधनानंतर खऱ्या अर्थाने रावबाजीची स्वारी निरंकुश झाली !   

    रावबाजीवर आधारित लेखमालिकेचा हा पहिलाच भाग असल्याने ज्यांचा पुढील विषयांशी फारसा संबंध येणार नाही, त्या ऐतिहासिक व्यक्तींचा, घटनांचा याच लेखात परामर्श घेणे योग्य ठरेल. 


    बाजीरावाचा थोरला भाऊ अमृतराव हा बाजीरावापेक्षा वयाने १० वर्षांनी मोठा. परंतु दत्तक पित्यासोबत --- रघुनाथरावाबरोबर त्याचा बराचसा काळ गेल्याने व पहिल्या इंग्रज - मराठा युद्धात बापासोबत इंग्रजी छावणीतून सहभाग घेतल्याने तत्कालीन राजकारणाची त्यांस चांगलीच ओळख झाली होती. समकालीन इंग्रज अधिकाऱ्यांचे अमृतरावाविषयी मत चांगले असले तरी त्याच कारणांस्तव त्यांना बाजीराव प्रिय वाटे. असो, आपण दत्तक असल्याने औरस वंशजाचा मान ( बाजीरावाच्या जन्मानंतरचे हे विवेचन आहे. ) व अधिकार आपणांस लाभणार नसल्याची अमृतरावास जाणीव होती. बाजीरावास पेशवाई मिळाली तेव्हा पूर्वप्रघातानुसार आपणांस त्याचे कारभारीपद मिळेल हि त्याची आशाही फलद्रूप झाली नाही. कारण ; पेशवेपदप्राप्तीच्या वेळी घडलेल्या घटनांनी बाजीरावाचे डोळे व डोके फिरले आणि अमृतराव त्यांस शत्रुवत वाटू लागला. तेव्हा निरुपाय होऊन अमृतरावाने विठोजी - यशवंत या होळकर बंधूंशी हातमिळवणी करून बाजीरावास गादीवरून खेचण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण बाजीरावाने इंग्रजांची मदत घेऊन अमृतरावाचे बेत हाणून पाडले. यानंतर दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धास आरंभ झाला. परंतु त्यात प्रत्यक्ष सहभाग न घेता अमृतरावाने ऑर्थर वेल्स्ली सोबत तह करून सालीना ७ - ८ लक्षांची नेमणूक पदरात पाडून घेतली व इतउत्तर तो राजकारणातून संन्यास घेऊन बुंदेलखंडातील करवी संस्थानाकडे निघून गेला. अमृतरावास दत्तक घेतल्यावर रघुनाथरावाने हे संस्थान त्याच्याकडे सोपवले होते. या संस्थानावर देखरेख करत तो काशीस स्थायिक झाला. इतिहासात हे घराणे पुढे करवी / चित्रकूटचे पेशवे म्हणून प्रसिद्ध झाले. अमृतरावाचे वंशज सध्या पुण्यात स्थायिक असल्याची माहिती माझ्या ' फेसबुक फ्रेंड ' श्री. मोहना जोगळेकर यांनी दिली. ( याविषयी अधिक माहिती पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे :-    http://www.loksatta.com/diwali-magazine/peswas-392727/  )  

    बाजीरावाचा धाकटा भाऊ चिमणाजी आपा हा कर्तबगारीने कसा होता हे समजण्याचे काही साधन नाही. कारण याचा बराचसा काळ कैदेतंच गेला. लहानपणी नानाची तर नंतर बाजीरावाची ! आपाचा अपराध काय तर स. १७९६ मध्ये पटवर्धन व शिंद्यांच्या कारस्थानाने अल्पकाळ का होईना बाजीरावाच्या ऐवजी त्यांस पेशवाई मिळाली होती. असो, शरीरप्रकृतीने उभयतां बंधू समसमान होते. तसेच बापाच्या चंचल वर्तणुकीमुळे उभयतांनाही जन्मतः रोगांची देणगी प्राप्त झाली होती. बाजीरावास फिरंग रोग जडलेला तर रघुनाथरावाचे कान फुटण्याचे दुखणे प्राप्त झालेले. बाजीराव रंगाने किंचित सावळा तर चिमणाजी गोरा. बाजीराव रागीट तर चिमणाजी सोशिक वृत्तीचा ! बाजीरावाने बापाचे सर्व रंगढंग उचलले होते तर चिमणाजी कायम बंदिवासात राहिल्याने त्यांस अशी काही चैन करता आली नाही. बाकी, उभयतांच्या गुणांमध्ये फारसा फरक नव्हता. चिमाजीचे पुढील आयुष्यातील वर्तन पाहता बाजीरावाच्या ऐवजी तोच पेशवा म्हणून कायम राहिला असता तर मराठी राज्याचा विनाश इतक्या लवकर झालाच नसता असे म्हणण्यास काही आधार नाही. तिसऱ्या इंग्रज -  मराठा युद्धाच्या अखेरीस चिमाजीने इंग्रजांशी स्वतंत्र तह करून आपल्या तनख्याची सोय पदरात पाडून घेऊन काशी गाठली.

    सवाई माधवरावाचा मृत्यू :- स. १७९४ मध्ये आनंदीबाईचा मृत्यू झाल्यावर पुढच्याच वर्षी इतिहास प्रसिद्ध खर्ड्याची लढाई घडून आली. त्यावेळी खबरदारी म्हणून नानाने रघुनाथरावाच्या तिन्ही मुलांना आनंदवल्लीतून काढून जुन्नरास ठेवले. निजामावरील मोहीम संपल्यावर या तिघांची काहीतरी व्यवस्था लावण्याचा नानाचा विचार होता. परंतु राजकारणाच्या धांदलीत असेल अथवा या त्रिवर्गाची सोय लावण्याची नानास इच्छा नसेल, ( जे काही असेल ते ) नानाकडून बाजीराव प्रभूतींचे काम काही होईना. त्यामुळे कदाचित असेल किंवा स्वयंप्रेरणेने असेल पण बाजीरावाने थेट पेशव्याशीच संधान बांधण्याचा प्रयत्न केला हे निश्चित !

    दादाच्या मुलांवर नजर ठेवण्यास नानाने बळवंतराव नागनाथ वामोरीकरास ठेवले होते. बाजीरावाने त्यालाच आपल्या लगामी लावून त्याच्या मार्फत स. माधवास चिठ्ठी पाठवली. त्यात राजकीय मजकूर नसून ' परस्परांच्या भेटी घडाव्यात ' अशा आशयाचा मजकूर होता. नानापासून हि गोष्ट लपून राहिली नाही. त्यांनी बळवंतरावास कैद केले आणि घडला मजकूर पेशव्याच्या कानी घातला. पुढचा इतिहास सर्वांच्या परिचयाचा आहेच. स. माधवाचे ता. २७ ऑक्टोबर १७९५ रोजी निधन झाले. उपलब्ध परस्पर विसंगत पुरावे पेशव्याचा मृत्यू हा अपघाती असल्याचे सांगतात पण त्याच पुराव्यांकडे तटस्थ वृत्तीने पाहिल्यास / अभ्यासल्यास पेशव्याचा खून करण्यात आल्याचे लक्षात येते. असो, स. माधवाच्या मृत्यूने बाळाजी बाजीरावाचा वंश खुंटला आणि भट कुटुंबात रघुनाथ व समशेर बहाद्दरचे पुत्र सोडल्यास इतर औरस संतती हयात नव्हती. पैकी, समशेरच्या मुलांवर मुसलमान असल्याचा शिक्का बसल्याने व ते कर्तुत्ववान, कर्तबगार, फौजबंद असल्याने पुणे दरबारने त्यांना दूरच ठेवले. रघुनाथरावाच्या मुलांना तर गादीवर आणायचे नाही असा नानाचा पण होता. तेव्हा पुढे काय हा प्रश्न सर्वांसमोर पडला.

                                                                                  ( क्रमशः )

४ टिप्पण्या:

Santosh म्हणाले...

Khup chan lekh Sanjay. Aaple sagale post me vachato and mala te khup avadtat.

Samshebahadur hyanchya vansha baddal janun ghenachi far eecha ahe and aasha ahe tumhi tya baddal hi lihitil.


- Aapala Santosh Borse

sanjay kshirsagar म्हणाले...

संतोष साहेब,
सर्वप्रथम प्रतिक्रियेविषयी मी आपले आभार व्यक्त करतो. समशेरचे वंशज बुंदेलखंडात थो. बाजीरावास मिळालेल्या जहागिरीत बांदा येथे स्थायिक झाले. त्याचा मुलगा अलीबहाद्दर हा बराच पराक्रमी होता. त्याने बुंदेलखंडात आपली सत्ता प्रस्थापित करून तिचा विस्तार केला पण पुण्याहून आवश्यक ते पाठबळ त्यास न मिळाल्याने तिकडे मराठी राज्याचा विस्तार म्हणावा तसा झाला नाही. असो, याबद्दल परत कधीतरी सविस्तर लिहीन. कळावे. लोभ असावा. हि विनंती !

Santosh म्हणाले...

Dhanyawad

http://naadiastrologystudycircle.blogspot.in/ म्हणाले...

फेह्रुवारीत २०२० नांदेडसिटीत डॉ लता अकलूजकर यांनी मस्तानीवर एक वेगळा प्रकाश टाकणारे पुस्तक प्रकाशित केले. त्यात मस्तानीचे अनेक वंशज उपस्थित होते.
विश्वास पाटील याचे अध्यक्षस्थानी होते...