रविवार, ७ सप्टेंबर, २०१४

गंगाधर शास्त्र्याच्या खुनाचे रहस्य ( भाग - ३ )


    स. १८०६ पासून १८१४ पर्यंतच्या सुमारे आठ वर्षांत गंगाधरशास्त्र्याच्या मदतीने इंग्रजांनी बडोदा दरबारास पूर्णतः पोखरून काढले. वॉकरने काही ना काही निमित्ताने गायकवाडांची फौज कमी करण्याचा उपक्रम चालवला पण तो पूर्णतः सिद्धीस जाण्यापूर्वीच स. १८१० मध्ये प्रकृती बिघडल्याने त्यास राजीनामा देऊन जावे लागले. त्याच्या जागी जेम्स कारनॅकची नेमणूक झाली. तसेच याच वर्षी बाबाजी आपाजी मरण पावल्याने रीजन्सी कौन्सिलमध्ये आता इंग्रज रेसिडेंट व शास्त्री प्रमुख होऊन बसले. मधल्या काळात रावजीने कैद केलेला व मेजर वॉकरने पेन्शनीत काढलेला कान्होजी गायकवाड इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारून उभा राहिला. शास्त्र्याच्या मदतीने इंग्रजांनी कान्होजीला पकडून मद्रासला बंदी म्हणून पाठवले. कान्होजी कसाही असला तरी राजघराण्याशी संबंधित पुरुष असल्याने इंग्रजांच्या या कृत्याने व त्यांस असलेल्या शास्त्र्याच्या पाठींब्याने बडोदा दरबारातील इंग्रज विरोधी मंडळी अतिशय नाराज झाली. इंग्रजांनी त्यांना मुद्दाम खिजवण्यासाठी शास्त्र्याची प्रतिष्ठा वाढवून त्यास सालीना ६० हजार तनखा व मुतालिकचा हुद्दा बहाल केला. पुण्यास खुरशेटजी मोदीने जो उपद्व्याप केला जवळपास त्याच धर्तीचा शास्त्र्याचा वर्तनक्रम बडोद्यास सुरु होता. त्यामुळे शास्त्र्याला अनेक विरोधक निर्माण झाले.

    सीताराम रावजी व दरबारी मुत्सद्द्यांनी प्राप्त संकटावर उतारा म्हणून पुन्हा एकदा पुण्यास साकडे घातले. यासाठी त्यांनी गोविंदराव बंधूजी गायकवाड याची पुण्यास रवानगी केली. याच सुमारास भगवंतरावास बाजीरावाने दिलेल्या अहमदाबाद सुभ्याच्या वहिवाटीची मुदत संपत आली होती. बाजीरावाच्या मनात अहमदाबाद आता गायकवाडांकडेच राहू द्यायचे नसल्याने  दुसऱ्या योग्य इसमांचा शोध घेण्यास आरंभ केला. या जागेसाठी पुण्याच्या इंग्रज रेसिडेंटचा सहाय्यक असलेला खुरशेटजी मोदी हा देखील प्रयत्नशील होता. मॅलेट पुण्यास रेसिडेंट म्हणून आला तेव्हापासून हे मोदी महाशय रेसिडेंटचे सहाय्यक म्हणून  कार्यरत होते. इंग्रज रेसिडेंट येत - जात पण मोदी मात्र पुण्यास तळ ठोकून राहिल्याने पुणे दरबारातील मुत्सद्द्यांशी व बाजीरावाशी त्याचे संबंध चांगलेच जुळले होते. स. १८०९ मध्ये तर बाजीरावाने त्याची कर्नाटकची सरसुभा म्हणून नेमणूकही केली. मोदीवर बाजीरावाची एवढी कृपादृष्टी असण्याचे मुख्य कारण म्हणजे तो आतल्या गोटातील बातम्या पेशव्यास कळवत असे. अर्थात, यामुळे मोदी इंग्रजांच्या डोळ्यांत आला नसता तर नवल ! परंतु, स. १८११ मध्ये एल्फिन्स्टन पुण्यास येईपर्यंत मोदीचा ' डबल एजंट ड्युटी ' चा खेळ सुरूच राहिला व इंग्रजांनीही तिकडे दुर्लक्ष केले. स. १८११ मध्ये एल्फिन्स्टन येताच त्याने मोदीस स्पष्ट शब्दांत, " एक तर पेशव्याची नोकरी करा अथवा आमची " असे सुनावल्याने मोदीने कर्नाटकच्या सुभेदारीचा राजीनामा दिला. तसेच त्रिंबकजी डेंगळेच्या मार्फत पेशव्यास निरोप पाठवून एल्फिन्स्टन पासून सावध राहण्याचा इशारा दिला. 

    खुरशेट मोदी हा इंग्रजांचा नोकर आतल्या अंगाने बाजीरावाची नोकरी करत असल्याचे आधी सांगितले आहेच. सीताराम रावजीचा पुण्यातील हस्तक गोविंदराव बंधूजी, त्रिंबकजी डेंगळे व अंतस्थरित्या खुरशेट मोदी हे त्रिकुट इंग्रजांविरुद्ध बाजीरावास भर देऊ लागले. या तिकडीचे खेळ बडोद्याच्या इंग्रजांना देखील बाधू लागले. तेव्हा बडोद्याचा रेसिडेंट जेम्स कारनॅकने एल्फिन्स्टनला मोदीला नोकरीतून काढण्याची सूचना केली तर एल्फिन्स्टनने कारनॅकला कळवले कि, त्याने गोविंदराव बंधुजीस बडोद्यास बोलावून घ्यावे. या परस्परविरुद्ध निरोपांनी दोन्ही बाजूला थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र इंग्रजांनी त्यातूनही हिकमतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

    गोविंदराव बंधूजी पुण्यास जाऊन बसला. त्याला खुद्द पेशवा व त्रिंबकजी डेंगळे उघड पाठिंबा देऊ लागले होते. भगवंतरावाकडे असलेली अहमदाबादची वहिवाट बाजीराव दुसऱ्या कोणाला तरी द्यायच्या विचारात असल्याचे सर्वांना समजले होते. इंग्रजांचा गुजरातमध्ये ठिकठिकाणी मुलुख असल्याने त्यांना गुजरातमध्ये पेशव्याच्या अंमलदाराचे येणे परवडण्यासारखे नव्हते. तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने अहमदाबाद गायकवाडांकडे राहाणे त्यांच्या हिताचे होते. त्याशिवाय बडोदेकर मंडळींना बाजीरावाचा असलेला छुपा पाठिंबाही त्यांना तोडायचा होता. गायकवाड मंडळींना इंग्रजांचा वरचष्मा नको होता. त्याचप्रमाणे अहमदाबाद पण त्यांना गमवायची नव्हती. या दोन्ही गोष्टी साधण्यासाठी इंग्रजांनी गायकवाडांचा प्रतिनिधी म्हणून गंगाधरशास्त्रीस पुण्याला पाठवण्याचे ठरवले. अर्थात गंगाधरशास्त्र्याचा पूर्वेतिहास पाहता इंग्रजांनी त्याचीच निवड का केली हे सहज लक्षात येते.

    गंगाधरशास्त्रीचे घराण्याकडे हरीपंत फडक्याचे उपाध्येपण होते. गंगाधरचा जन्म स. १७७५ असून वयाच्या आठव्या वर्षी त्यास पेशव्यांच्या कर्नाटक स्वारीत दफ्तरी कारकुनाची नोकरी मिळाली होती. सवाई माधवरावाची कारकीर्द गंगाधरने जवळून पाहिली. दुसऱ्या बाजीरावाच्या कारकिर्दीच्या आरंभी बाळोजी कुंजरच्या मार्फत त्याने बाजीरावाची मर्जीही संपादून घेतली होती. यामुळे व आणखी एका कारणाने त्याच्यावर नाना फडणीसची गैरमर्जी झाली. नानाचा सासरा दादा गद्रे याची एक रक्षा गंगाधारावर अनुरक्त झाली. त्यामुळे चिडलेल्या गद्र्याने गंगाधरच्या वडिलांस समज दिली. तेव्हा पुण्यास राहणे धोक्याचे मानून गंगाधरचा बाप कृष्णभट --- आपल्या मुलास घेऊन रावजी आपाजी सोबत गुजरातला गेला. बडोदा दरबारातील घडामोडीत गंगाधरला रावजी आपाजी मार्फत वॉकरचा आश्रय मिळाला व त्याचे नशीब फळफळले. एल्फिन्स्टनने व इतरांनी त्याचे जे वर्णन लिहून ठेवले आहे त्यावरून गंगाधरच्या एकूण व्यक्तीमत्वाची थोडी कल्पना येते. ' शास्त्री मजकूर हा धूर्त, हिकमती, हुशार असा असून संभाषण कला त्यास चांगल्या प्रकारे अवगत होती. तत्कालीन समजुतीनुसार त्याचे बोलणे विनोदी असल्याने तो माणसांत सहज मिसळे. तत्कालीन प्रघातानुसार त्याचा हुद्दा व ऐश्वर्य उंचावले असल्याने स्वभावात आवश्यक तो गर्विष्ठपणाही उतरला नसल्यास नवल. तसेच बराचसा काळ इंग्रजांच्या सहवासात गेल्याने सहज संभाषणात देखील इंग्रजी शब्द घुसडून देण्यची त्यास सवय जडली होती. बोलताना तो पेशवा व त्याच्या कारभाऱ्याचा Dam आणि Rascal या शब्दांत गौरव करायचा. तसेच इतरांचाही तो अशाच प्रकारे उद्धार करे. उदा :- होळकराविषयी त्याचे मत " बहुत ट्रीकवाला था, लेकिन बडा अकलमंद काकाय ( Cockeye ) था " असे होते.पुण्याला आल्यावर त्याने आपल्या ऐश्वर्याचे मुद्दाम प्रदर्शन करण्यास आरंभ केला. सर्व शहराच्या नजरेत भरेल अशा तऱ्हेने तो स्वतःची स्वारी काढत असे. ' 

    गंगाधरशास्त्री हा पूर्वी पेशव्यांचा नोकर व बाजीरावच्या मर्जीतला असल्याचे इंग्रजांना माहिती होते. मात्र, आपल्याच एकेकाळच्या नोकराशी आता बरोबरीच्या नात्याने वागण्याचा भलताच प्रसंग त्यांनी बाजीरावावर आणला होता. इंग्रजांनी हे मुद्दाम केले कि नकळतपणे झाले ? असो, गंगाधरशास्त्र्याच्या पुण्यातील नेमणुकीविषयी इतिहासकारांनी परस्पर विरोधी विधाने केली आहेत. त्यानुसार शास्त्र्याला बाजीरावानेच पुण्यास बोलावले इथपासून बडोदेकरांनी गंगाधरास काही ना काही निमित्ताने पुण्यास रवाना केले इथपर्यंतची मते मांडली गेली आहेत. परंतु शास्त्र्याचा पूर्वेतिहास व बडोदा दरबारातील इंग्रजांचा प्रभाव लक्षात घेता इंग्रजांनीच त्यास बडोदा दरबारच्या वतीने पण अंतस्थरित्या आपला हस्तक म्हणून पुण्यास पाठवल्याचे स्पष्टपणे दिसून येते. याविषयी अधिक तपशीलवार असे सांगता येईल कि, गंगाधरशास्त्र्याचे अस्तित्व बडोदेकर मंडळींना जरी असह्य झाले असले तरी इंग्रजांच्या परवानगीशिवाय ते आपला वकील म्हणून वा कोणत्याही कारणांनी शास्त्र्यास दूर करू शकत नव्हते. त्याचप्रमाणे बाजीरावही विशिष्ट व्यक्तीस आपल्या दरबारी वकील म्हणून गायकवाडांनी नेमावे अशी सक्ती वा आग्रही मागणी करू शकत नव्हता. आणि केली तरी इंग्रज थोडी मनावर घेणार होते ? यावरून इंग्रजांनीच शास्त्र्यास पुण्याला पाठवल्याचे निःसंशयरित्या सिद्ध होते.

    गंगाधरशास्त्र्याने स. १८१४ च्या फेब्रुवारी - मार्च दरम्यान पेशव्याची भेट घेतली. यावेळी एल्फिन्स्टन देखील हजर होता. गायकवाडांच्या वकीलासोबत बोलणी करण्यास बाजीराव जरी उत्सुक असला तरी एकेकाळचा आपला नोकर आपल्याच सरदाराचा इंग्रजांच्या पाठींब्याने वकील म्हणून बोलणी करण्यास आल्याने बाजीराव नाराज होता. परंतु राजकीय शिष्टाचार म्हणून त्यास शास्त्र्याची उठाठेव करणे प्राप्तच होते. गायकवाडांकडील नजराण्याच्या तुंबलेली रक्कम व अहमदाबादच्या सुभ्याची वहिवाट असे दोन प्रमुख मुद्दे पुणे - बडोदा दरम्यान वादाचे विषय बनले होते.  यामुळे गायकवाड हे पेशव्यांचे मांडलिक कि इंग्रज म्हणतात त्याप्रमाणे ते स्वतंत्र संस्थानिक असा प्रश्न निर्माण झाला. वास्तविक इंग्रजांनी वेळोवेळी जे पेशवा व इतर मराठी सरदारांशी तह केले होते त्यांतील सुसूत्रबद्धतेच्या अभावी हे तांत्रिक पण गंभीर मुद्दे उपस्थित झाले होते. हरएक बाबतीत इंग्रजांची मध्यस्थी आल्याने कोणतीही बाब त्यांच्या सहभागाशिवाय निकाली निघेना व प्रत्येक वेळी इंग्रज आपलाच फायदा बघत असल्याने वादग्रस्त मुद्दे तसेच राहात होते. उदा :- अहमदाबादचा सुभा पेशव्यांचा असून तो कोणाला दयावा न दयावा हा पेशव्यांच्या मर्जीचा प्रश्न. परंतु चौदा - पंधरा वर्षे अहमदाबादची वहिवाट केलेल्या गायकवाडांना हा प्रदेश सोडवेना व गुजरातमध्ये पेशव्याचा सरदार येणे इंग्रजांना अडचणीचे असल्याने त्यांनाही अहमदाबाद विषयी गायकवाडांचा पुळका आला. तेव्हा तोडगा निघावा कसा ?

     गंगाधरशास्त्री, गायकवाड मंडळी व इंग्रजांच्या मनात काहीही असले तरी अहमदाबादचा निर्णय बाजीरावाने घेतला होता. त्रिंबकजी डेंगळे हा यावेळी बाजीरावाचा मुख्य कारभारी असून इंग्रज वकिलांशी बोलताना पूर्वीच्या कारभाऱ्यांप्रमाणे नरमाईचे धोरण न स्वीकारता तो पेशव्यांचा कारभारी या नात्यानेच बोलत असे. तेव्हा अशा इसमास अहमदाबाद देणे श्रेयस्कर असे जाणून बाजीरावाने त्याची नेमणूक अहमदाबादेस केली. त्रिंबकजीने त्या प्रांती स्वतः न जाता आपल्या तर्फेने मुतालिक नेमून दिला. पेशव्याच्या या कृत्याने शास्त्री व इंग्रज सावध झाले. शास्त्र्याने बडोद्याच्या रेसिडेंटास सीतारामास अटकेत ठेवण्याची विनंती केली. त्यावरून स. १८१४ च्या सप्टेंबर मध्ये कारनॅकने फत्तेसिंहाकडून सीतारामास कैदेत टाकले. यांमुळे पेशवा - इंग्रज यांचा गायकवाड प्रकरणी पहिला सामना बरोबरीत सुटला. यानंतर गायकवाडांकडील बाकी रकमेचा प्रश्न ऐरणीवर आला. बाजीराव रोख रक्कम अथवा ठराविक उत्पन्नाचा प्रदेश तोडून मागत होता. बाजीरावाच्या मागणीनुसार दोन ते तीन कोटींचा भरणा करण्याची गायकवाडांची आर्थिक शक्ती नव्हती व प्रदेश तोडून देण्याचेही त्यांना मान्य नव्हते. त्याउलट गायकवाडांनी पेशव्यास प्रदेश तोडून दयावा असे इंग्रजांचे मत होते.  कारण, गायकवाड जितके दुर्बल होतील तितके त्यांना हवेच होते. या विचित्र परिस्थितीने शास्त्र्याची वकीलात पूर्णतः फसण्याची चिन्हे दिसू लागली. खुद्द एल्फिन्स्टनने देखील स. १८१४ चा दसरा झाल्यावर शास्त्र्याला बडोद्याला परत जाण्याची सूचना केली.

    परंतु पुणे - बडोदा दरम्यानची मध्यस्थपणाची भूमिका इंग्रजांनी सहजासहजी सोडली नव्हती. वरवर जरी एल्फिन्स्टनने शास्त्र्यास पुणे सोडायला सांगितले असले तरी त्याचे मन ओळखून शास्त्री पुण्यातच पाय मुरगाळून बसला. परिणामी बडोद्याहून इंग्रज विरोधी मंडळींनी आनंदरावाचा मुलगा भगवंतराव यास स. १८१५ च्या आरंभी पुण्यास पाठवले. इंग्रजांच्या परवानगी शिवाय बडोदेकरांनी केलेला हा उपदव्याप इंग्रजांना चांगलाच झोंबला. त्याशिवाय खुद्द पेशव्याने भगवंतरावाचे स्वागत भरदरबारी केल्याने इंग्रजांना संभाव्य संकटाची चाहूल लागली. एल्फिन्स्टनने बाजीरावास स्पष्टपणे सांगितले कि, " गोविंदराव बंधूजी व भगवंतराव हे सीताराम रावजीचे पक्षपाती आमच्या विरुद्ध खटपट करतात तेव्हा त्यांस बडोद्याला पाठवून द्यावे. अन्यथा आम्ही शास्त्र्याची बडोद्यास रवानगी करू. " त्यावर बाजीरावाने, गायकवाडांशी बोलणी करण्यास आपणांस इंग्रजांच्या मध्यस्थीची जरूर नसल्याचे सांगितले. याचा योग्य तो अर्थ घेऊन एल्फिन्स्टनने ताबडतोब शास्त्र्यास पुण्यातून निघून जाण्याची सूचना केली. या क्षणी खऱ्या अर्थाने पुणे - बडोदा दरम्यानची इंग्रजांची मध्यस्थी संपुष्टात आली होती. शास्त्र्याने एल्फिन्स्टनची सूचना मनावर न घेता पुण्यातच ठाण मांडून बसण्याचे ठरवले. तेव्हा एल्फिन्स्टन पुढील तयारीस लागला. त्याने बडोद्यास कारनॅकला लिहून आनंदराव मार्फत भगवंतराव व गोविंदराव यांना परत बोलावण्याविषयी पत्रे पाठवली. परंतु हे दोघे काही पुण्यातून हलेनात. एल्फिन्स्टनने पेशव्याकडे त्यांना आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली तर पेशवा त्यास दाद देईना. त्यात भर म्हणून नेपाळबरोबर चाललेल्या युद्धात कंपनीची पीछेहाट होत असल्याने इंग्रजांना पडती भूमिका घेण्याशिवाय गत्यंतर नव्हते.

    वस्तुतः इंग्रजांची अंतस्थिती चांगलीच माहिती असणाऱ्या गंगाधरने आता पुणे सोडायला हवे होते परंतु अतिआत्मविश्वास म्हणा वा सीतारामची स्पर्धा त्यांस नडली. एल्फिन्स्टनची सूचना म्हणजे आज्ञा धुडकावून त्याने एकप्रकारे आपल्याच पाठीराख्यांना दुखावले. स. १८१५ चा फेब्रुवारी महिना पुढील राजकीय नाट्याची नांदी ठरला. या महिन्यात वसंतपंचमीच्या दिवशी म्हणजे ता. १४ फेब्रुवारी रोजी बाजीरावाने भरदरबारी भगवंतराव गायकवाडाची भेट घेतली. याच काळात एल्फिन्स्टनने बडोदा - पुणे दरबार दरम्यानची कंपनीची मध्यस्थी काढून घेतली. तसेच आपल्या वकिलातीतून खुरशेटजी मोदीस त्याने सक्तीची निवृत्ती स्वीकारायला भाग पाडून गुजरात मधील आपल्या गावी जाऊन राहण्याचा आदेश दिला. मोदीची आजवरची सेवा लक्षात घेऊन त्यांस दरमहा ५०० रु. ची पेन्शनही बांधून दिली. मोदीची हाकलपट्टी हा बाजीराव, त्रिंबकजी व मोदीस इंग्रजांचा इशारा होता. दि. २७ फेब्रुवारी १८१५ रोजी मोदी विषप्रयोगाने मरण पावला. काहींच्या मते त्याने आत्महत्या केली तर काहींच्या मते त्याचा खून झाला. मोदीच्या मृत्यूने कोणाचा फायदा होता हे सर्वांना माहिती असल्याने त्याविषयी या ठिकाणी अधिक चर्चा करत नाही. मोदीच्या खुनाने खरेतर गंगाधरशास्त्र्याचे डोळे उघडायला हवे होते. परंतु तसे झाले नाही.

    इंग्रजांची पुणे - बडोदा दरबार दरम्यानची मध्यस्थी दूर होताच मार्च - एप्रिल मध्ये बाजीरावाने त्रिंबकजीच्या मार्फत गंगाधरास आपल्या पक्षास मिळवून घेण्याचा प्रयत्न केला. पुणे दरबारच्या या बदललेल्या भूमिकेने शास्त्री अचंबित झाला कि गोंधळात पडला माहिती नाही परंतु, पेशवे दरबारी फक्त गायकवाडांचा प्रतिनिधी म्हणून भूमिका बजावण्यास तो हळूहळू तयार होऊ लागला. राजकीय पटलावर इंग्रजांची पीछेहाट यामुळे सुरु झाली. एल्फिन्स्टनने प्रसंगावर नजर देऊन निष्क्रियतेचे धोरण स्वीकारले. दरम्यान ता. १९ एप्रिल १८१५ रोजी शास्त्र्याने आपल्या मुलाच्या मुंजीचा समारंभ मोठ्या थाटाने करून उपस्थित ब्राम्हणांना शालजोड्या वाटल्या. हा पेशव्याचा अपमान  असला तरी राजकारणावर नजर देऊन त्याने तो गिळून टाकला. शास्त्री आपल्या पक्षात मिळत असल्याचे पाहून पेशव्याने त्याच्यासमोर दोन प्रलोभने मांडली. (१) आपले प्रमुख कारभारी पद देऊ केले (२) आपल्या मेहुणीचा त्याने शास्त्र्याच्या मुलाशी लग्न लावून देण्याचा बेत आखला. शास्त्री पेशव्याच्या कृपादृष्टीने भांबावला. पेशव्याचे कारभारीपद स्वीकारण्याविषयी त्याने एल्फिन्स्टनला सल्ला विचारला. एल्फिन्स्टनला हि बाब पसंत पडली नाही.  गायकवाडांच्या वकिलाने पेशव्यांचे कारभारीपद स्वीकारू नये असे त्याचे मत पडले. परंतु माझ्या मते, आजवर अंतस्थरित्या इंग्रजांची नोकरी करणारा शास्त्री बराचसा पेशव्याच्या कह्यात गेल्याचे एल्फिन्स्टनला यानिमित्ताने स्पष्टपणे कळून चुकले होते.

                                                                                                 ( क्रमशः )



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: