रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

गंगाधर शास्त्र्याच्या खुनाचे रहस्य ( भाग - ४ )

    
    दरम्यान गायकवाड प्रतिनिधी या नात्याने पेशव्याची शास्त्र्यासोबत बोलणी होऊन गायकवाडांनी गुजरात प्रांती आपणांस सात लक्षांचा मुलुख दिल्यास मागील देणे माफ करू असे पेशव्याने सुचवले शास्त्र्याने हे बडोद्यास कळवले पण गायकवाडांनी त्यास नकार दिला. यामुळे  शास्त्र्याची कुचंबणा मात्र झाली. इकडे बाजीरावाने आपल्या मेव्हणीचा शास्त्र्याच्या मुलाशी विवाह निश्चित करून लग्नाचे स्थळ देखील ठरवले. अलीकडे दरवर्षी पेशवा तीर्थाटनास बाहेर पडे. तेव्हा या यावर्षीच्या यात्रेत नाशिकला विवाह उरकून घेण्याचा त्याने बेत आखला. पेशवा दीर्घकाळ पुण्याच्या बाहेर राहणार असल्याने रेसिडेंट एल्फिन्स्टन देखील त्याच्या सोबत बाहेर पडणार होता. मात्र बडोद्याहून तहाच्या वाटाघाटीविषयी प्रतिकूल मत आल्याने शास्त्र्याने हा विवाह समारंभ पुढे ढकलण्याची सूचना केली. लग्नाची सर्व तयारी होऊनही शास्त्री डळमळीत झाल्याने पेशव्याने समारंभ रहित केला. हा सर्व प्रकार नाशिकच्या वाटेवर असताना वा नाशिकला पोहोचल्यावर घडला. तत्पूर्वी पुण्यात सर्व मंडळी हजर असताना किंवा पुण्यातला मुक्काम हलल्यावर शास्त्र्याचा खून करण्यास्तव मारेकरी आल्याची भूमिका उठली तेव्हा शास्त्र्याच्या बंदोबस्तासाठी पेशव्याने हत्यारी पथकाची नियुक्ती केली. एल्फिन्स्टनचा मात्र या बातमीवर विश्वास नव्हता. असो, नाशिकहून आषाढी एकादशीच्या निमित्ताने पेशवा पंढरपुरास ;निघाला. त्याने एल्फिन्स्टनला कळवले कि, " आम्ही थोडे लोक सोबत घेऊन पंढरपुरास जाऊन परस्पर लगेच पुण्यास येतो. तुम्ही सोबत आला नाहीत तरी चालेल. " त्याचप्रमाणे शास्त्र्याचा सल्लागार बापू मैराळ यासही पुण्याला रवाना करण्यात आले. पंढरपुरास जाताना पेशव्यासोबत त्याचे निवडक सैन्य, इतबारी लोक, त्रिंबकजी डेंगळे व गंगाधरशास्त्री होते. त्याशिवाय गोविंदराव बंधूजीही आता त्यात सामील झाला होता. याविषयी शास्त्र्याने कुरकुर केली पण त्रिंबकजीने त्याचे समाधान केले. एल्फिन्स्टन नाशिकहून अजिंठ्याची लेणी बघायला निघून गेला. इकडे पेशवा, शास्त्री व मंडळीसह पंढरपुरास गेला व दि. २० जुलै १८१५ रोजी संध्याकाळ नंतर त्रिंबकजीच्या आग्रहावरून देवदर्शनास आलेल्या शास्त्री महाशयांचा मुक्कामाच्या स्थळी परत जात असताना खून झाला.  

' पेशवाईच्या सावलीत ' या ना. गो. चापेकर संपादित ग्रंथात चिपळूणकर दप्तरातील याविषयाशी संबंधित काही पत्रे प्रकाशित करण्यात आली आहेत. या पत्रांची विशेष दखल घेण्याचे कारण म्हणजे हि पत्रे पेशव्यास लिहिलेली असून खुनाच्या प्रसंगी नेमके काय घडले याचा वृत्तांत सांगणारी आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेचा तपशील पत्राद्वारे कळवला असून त्याची तारीख १३ सप्टेंबर १८१५ हि दिली आहे. असो, चिपळूणकर दप्तरातील पत्रे व त्या वरील संपादकीय टिपण्णी खालीलप्रमाणे :-

    चिपळूणकर }                                              { श. १७३७ भाद्र. शु. १०
                                                                       { इ. १८१५ सप्टें. १३
  

    श्रीमंत महाराज राजश्री बाबासाहेब स्वामीचे सेवेसी विनंती. सेवक बापुजी गंगाधर चिपळोणकर साष्टांग नमस्कार विज्ञापना. गंगाधरशास्त्री क्षेत्र पंढरपुरी मारले गेले ते समयी तुम्ही बरोबर होता तेथील मजकूर कसा जाला ते लिहून देणे म्हणून आज्ञा त्यास. आषाढ शु. १४ गुरुवारी आम्ही गंगाधरशास्त्री यांचे बिऱ्हाडी बसलो होतो. दोन घटका रात्र अवशीची सुमार जाली तो इतक्यांत राजश्री त्रिंबकजी तात्या यांजकडील कारकून व दोन प्यादे नेहमी शास्त्रीबाबा यांजकडे असत त्यांपैकी एक प्यादा व कारकून सूचनेस आले कीं देवदर्शनास चलावे. तेव्हा शास्त्री यानी उत्तर केले कीं मला ताप आलेला आहे मी येत नाही. नंतर मी शास्त्रीबावास पुसिले कीं मी जातो. नंतर तेथून निघून राजश्री रावजी मराठे व आम्ही उभयतां देवळांत गेलो तेथे राजश्री त्रिंबकजी तात्या बसले होते. यानी आम्हांस पुसिले कीं शास्त्रीबावा का आले नाहीत. आम्ही उत्तर केले कीं त्यांस ताप आलेला आहे. तेव्हा तात्या बोलिले कीं देवदर्शन घेतल्याने देव कृपा करील. नंतर राजश्री रावजी मराठे आमचे बरोबर होते त्यास सांगितले कीं तुम्ही जाऊन तात्या बोलिले हे सांगावे. नंतर मराठे शास्त्रीबावा यांजकडे गेले. मग आम्ही देवदर्शन करून देवळांत बसलो होतो इतक्यांत शास्त्रीबावा दर्शनास आले. ते तात्यापाशी बसून देवदर्शनास गेले. देवदर्शन घेऊन फिरून तात्याजवळ काही बसून निघाले. आम्ही बरोबरच होतो. कमानी दरवाजाचे वाटेने चाललो. शास्त्रीबावा पुढे व त्यांचा हात राजश्री रामचंद्र बडवे यांनी धरला होता व शास्त्रीबावा यांचे माघे ( गे ) आमचा मशालजी, त्याचे माघे ( गे ) आम्ही चालत होतो. भजनीबाबा याचे जाग्यापासून पुढे दहा पंधरा हातचे सुमार गेलो. तो इतक्यांत मागाहून गलबल होऊन आम्हास तरवारेचा परज लागला. नंतर पाहू लागलो तों शास्त्रीबोवा यावर गर्दी होऊन खाली पडले त्याचे मशालची व आमचा मशालची मशाली टाकून पळाले व बडवाही पळाला. नंतर मी इतक्यांत पाठीमागून एकीकडे बाजूस झालो. गर्दी पाहून भयभीत होऊन पळून निघालो. तो राजश्री नरसिंगराव भावे याचे बिऱ्हाडी जाऊन बसलो.
 ( वरील मजकूर ज्या कागदावर आहे त्या कागदावर ' नक्कल ' म्हणून लिहिलेले आहे. यासंबंधाने एकंदर आठ निरनिराळे कागद लिहिलेले आहेत. एका कागदावर ' मसुदा ' म्हणून लिहिलेले आहे. कित्येक ठिकाणी ' शोध ' म्हणून घातलेले आहे. पुष्कळ विचार करून बाजीराव साहेबाला उत्तर काय द्यावयाचे ते ह्यांत ठरविले असावे. दुसऱ्या पत्रांत थोडा जास्त मजकूर आहे तो असा ) --

    देवदर्शनास गेलो तेथे सरकारचे महापुजेची तयारी करिता देवालयांतील दाटी काढून झाडलोट करवीत राजश्री त्रिंबकजी तात्या गरुडखान्याजवळ बसले होते. तेव्हा मी दर्शनाकरितां परवानगी लावून आंत गेलो तो तात्यानी पुसिले कीं दाजी आले कीं काय ? तेव्हा आम्ही बोलिलो कीं त्याचे शरीर स्वस्थ नाही. तेव्हा तात्या म्हणाले कीं वार निवळ आहे आल्यास देवदर्शन होईल तेव्हा आम्ही रावजी मराठे यांस सांगितले कीं जाऊन सूचना करावी म्हणून पाठविले. नंतर तात्या बोलले कीं बरे असल्यास यावे नाहीतर न यावे. तेव्हा मी उतर केले कीं स्वस्थ असल्यास येतील नाही तर येणार नाही. मिति भाद्रपद शु।। १० बुधवार शके १७३७ युवानाम संवत्सरे शेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
    ( दुसऱ्या एका लेखांत " कमानी दरवाजाचे वाटेने चाललो " याचे अगोदर " प्रथम देवाचे पायरी जवळ येऊन चोखामेला उजवा घालून त्या गल्लीने " हे शब्द घालून नंतर खोडलेले आहेत.
    रावजी मराठे हा शास्त्रीबोवांचा मेहुणा असे एका कागदांत आहे.
    तसेच शास्त्रीबोवा यास मारतात असा मजकूर प्रथम लिहिला असून तो खोडून शास्त्रीबोवा यावर गर्दी होऊन खाली पडले हा ' शोध ' घातला आहे. त्याचप्रमाणे शास्त्रीबोवा पडले व ' आई आई, मेलो मेलो ' म्हणाले हे शब्द खोडले आहेत. सारांश त्रिंबकजी डेंगळे यांनी शास्त्रीबोवांस मारले असे दिसू नये असा प्रयत्न केलेला दिसतो. ) ( चिपळूणकर रुमाल दप्तर नं. ११ )  

    शास्त्र्याच्या खुनाच्या प्रत्यक्षदर्शीची हि हकीकत अव्वल दर्जाची  मानली पाहिजे. जवळपास अशाच आशयाची माहिती या घटनेचा इतिहास लिहिणाऱ्यांनी दिली आहे. खुनाच्या दुसऱ्या दिवशी शास्त्र्याच्या कारभाऱ्यांनी त्रिंबकजीस भेटून शास्त्र्याच्या खुन्यांचा शोध घेण्याची विनंती केली. तेव्हा त्याने संशयितांमध्ये सीताराम रावजी  कान्होजी गायकवाड यांची नावे घेतली. अर्थात, या दोघांशिवाय आणखीही शास्त्र्याच्या जीवाचे सोबती असल्याने कोणाचा म्हणून संशय घ्यायचा असा प्रतिप्रश्नही त्याने त्या कारकुनांना केला.

     इंग्रज रेसिडेंट एल्फिन्स्टनने आपल्या पद्धतीने सदर प्रकरणाची चौकशी करून या खुनाची जबाबदारी त्रिंबकजीवर टाकून बाजीरावास ' क्लीन चीट ' दिली. समकालीन लेखांतील याविषयीचे उल्लेख माझ्या वाचनात अजून आले नाहीत. परंतु, गो. स. सरदेसाई, ना. गो. चापेकर, सदाशिव आठवले, प्रमोद ओक इ. इतिहासकारांच्या मते शास्त्र्याच्या खुनाच्या कटात बाजीराव - त्रिंबकजी हि दुकली सहभागी असून बडोदेकर मंडळींचाही यात सहभाग होता. याबाबतीत सरदेसायांनी राणी तख्ताबाईकडे निर्देश केला असून भगवंतराव गायकवाड  गोविंदराव बंधुजी हे प्रमुख सूत्रधार असल्याचे त्यांचे मत आहे. नरसोपंत केळकरांनी याविषयी काहीशी तटस्थ भूमिका स्वीकारत बाजीराव - त्रिंबकजी या कटात सहभागी नसल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित करत बडोदा दरबार विषयी संशय व्यक्त केला आहे. ' मराठी दफ्तर, रुमाल दुसरा ' चे संपादक वि. ल. भावे यांनी मात्र उघडपणे आपल्या प्रास्ताविकात बाजीराव - त्रिंबकजीची बाजू घेऊन बडोदेकर मंडळींना दोषी धरले आहे.  त्यातील एक दोन महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख येथे करणे आवश्यक आहे व ते म्हणजे :- (१) गंगाधरशास्त्र्याच्या वंशजांच्या कैफियतीत बाजीरावास दोषी धरले नाही. तसेच शास्त्र्याची मुलगी यमुनाबाई देखील बाजीरावास आपल्या पित्याचा खुनी मानत नाही. (२) गंगाधरशास्त्री व प्रभाकर कवी हे लहानपणापासूनचे मित्र असून त्यांचा नातेसंबंधही होता. शास्त्र्याच्या मुलास प्रभाकरची मुलगी करण्यात आली होती. या प्रभाकरच्या कवनांत शास्त्र्याच्या खुनात बाजीरावाचा हात असल्याचा उल्लेख नाही. इतकेच नव्हे तर रावबाजींची पेशवाई दूर होऊन इंग्रजी अंमल सुरु झाल्यावर शास्त्राच्या खुनावर प्रभाकरने रचलेल्या कवनांत देखील शास्त्र्याच्या खुनात बाजीरावाचा संबंध असल्याचा तो उल्लेख करत नाही.        

    इतिहासकारांच्या मतांमध्ये विभिन्नता आढळत असल्याने सत्य नेमके काय असावे असा प्रश्न साहजिकच वाचकांच्या व अभ्यासकांच्या मनात उद्भवतो. याच प्रश्नाचा थोड्या वेगळ्या पद्धतीने उलगडा करण्याचा आपण प्रयत्न करू.

    १} पेशवे दरबार :- गंगाधरशास्त्री हा इंग्रजांचा हस्तक असून गायकवाडांचा वकील म्हणून पेशव्याकडे आला होता. पेशव्याला गायकवाडांकडून हवी असलेली खंडणी वा प्रांत देणे न देणे त्याच्या हाती नव्हते. तो केवळ एका मध्यस्थ दुव्याचे काम करत होता. त्यामुळे गायकवाडांची बोलणी फिस्कटल्याचा राग पेशव्याने त्याच्यावर काढला असे मानणे मूर्खपणाचे ठरेल. शास्त्र्याने पेशव्याच्या मेव्हणीसोबत आपल्या मुलाचा विवाह पुढे ढकलला म्हणून दुखावलेल्या रावबाजी - त्रिंबकजीने शास्त्र्याचा खून केला असे म्हणणे म्हणजे निव्वळ बालीशपणा आहे. विवाह ठरतात, मोडतात. त्यामुळे खून पडत नाहीत. या संदर्भातील थो. माधवराव पेशव्याच्या लग्नाची गोष्ट इतिहासकारांनी दुर्लक्षिल्याचे आश्चर्य वाटते. सारांश, शास्त्र्याच्या खुनाने पेशव्याचा कसलाही -- आर्थिक वा प्रादेशिक किंवा राजकीय फायदा होणार नव्हता. उलट शास्त्री जिवंत राहता तर कदाचित पेशव्याने त्यास सेवेत घेतलेही असते. दुसरे असे कि, शास्त्र्याचा खून करायचा तर तो पंढरपुरात त्रिंबकजी का करेल ? नाशिक ते पंढरपूर मार्गात ना बापू मैराळ सोबत होता ना एल्फिन्स्टन. अशा परिस्थितीत पेंढारी - लुटारू अशा सबबींचा आधार घेऊन त्यास हे कृत्य उरकता आले असते. त्यासाठी पाक पंढरपुरापर्यंत थांबण्याची गरज काय होती ? त्याशिवाय अनोळखी इसमांनी शास्त्र्याचा खून केल्याचा देखावा रचायचा होता तर शास्त्र्यासोबतच्या माणसांनाही मारण्यात मारण्यात आले असते. परंतु खुन्यांनी नेमके शास्त्र्यालाच मारले. असे का ?    

    २} गायकवाड दरबार :- गंगाधरशास्त्री हा गायकवाडांचा नोकर असून इंग्रजांचा पक्षपाती होता. इंग्रजांचे जोखड मानेवरून काढण्याचे जेवढे प्रयत्न गायकवाडांनी केले त्यातील बव्हंशी बेत हाणून पाडण्यात शास्त्र्याचा सहभाग असल्याने त्यांचा शास्त्र्यावर राग असणे स्वाभाविक आहे. शास्त्र्याला पुण्यास पाठवण्याची त्यांची इच्छा कितपत होती हे सांगण्यास साधन नाही. मात्र त्यांना तो नकोसा झाला होता हे निश्चित ! शास्त्री पुण्यास येण्यापूर्वी गोविंदराव बंधुजी व शास्त्र्याच्या पुणे आगमनानंतर भगवंतराव गायकवाड हे दोघे आले. पुणे व बडोदा दरम्यान जोवर मध्यस्थाची भूमिका इंग्रज बजावत होते तोवर पेशवा शास्त्र्यास साफ उत्तर देत नव्हता. परंतु जेव्हा एल्फिन्स्टनने वाटाघाटीतून अंग काढून घेतले तेव्हा पेशव्याने शास्त्र्यास आपल्या गोटांत वळवण्याची खटपट आरंभली व गायकवाडांशी चाललेल्या वाटाघाटीला तुलनेने कमी महत्त्व दिले. या ठिकाणी आपण बाजीराव -- गंगाधर -- गायकवाड या तिघांच्या हितसंबंधांचा अधिक विचार करू. गंगाधरशास्त्री म्हणजेच इंग्रज अशी गायकवाडांची धारणा असण्याचे काही कारण नाही. राजकारणात पक्षबदल हा सर्वसंमत असा मार्ग आहे. पेशव्याचे नातलग बनणे वा मुख्य कारभारीपद मिळवण्याच्या प्रलोभनाने गंगाधर जर पेशव्याच्या पक्षास मिळणार असेल तर गायकवाडांचे असे कोणते अहित होणार होते ? इंग्रजांच्या दडपशाहीला कंटाळून सुटकेसाठी उलट त्यांनीच बाजीरावाचा धावा केला होता. शास्त्र्याने सात लक्षांचा मुलुख तोडून देण्याची बोलणी केल्याने बडोदेकर रुष्ट झाले असे म्हणता येत नाही. कारण त्याने फक्त तोडगा सुचवला होता. मान्य करणे न करणे हि गायकवाडांची मर्जी होती. शास्त्री पेशव्याचा नातलग बनला काय किंवा कारभारी बनला काय, त्या निमित्ताने तो बडोद्यातून बाहेर पडणार असल्याने हि बाब गायकवाडांच्या पथ्यावरच पडणार होती. मग ते शास्त्र्याचा खून का करतील ? तसेही शास्त्री मूळचा पेशव्याचाच नोकर असल्याने गायकवाडांनी त्याच्यावर रुष्ट होण्याचे काही खास कारण दिसत नाही. त्रिंबकजीने ज्या दोघांचा --- सीताराम रावजी व कान्होजी गायकवाड --- संशयित म्हणून उल्लेख केला ते प्रत्यक्ष इंग्रजांच्या कैदेत होते. तेव्हा त्यातून काय अर्थ घ्यायचा तो घेणाऱ्याने घ्यावा.

    ३} इंग्रज :- गंगाधरशास्त्री हा मूळचा पेशव्यांचा नोकर असून गायकवाडांच्या पदरी रावजी आपजीच्या कृपेमुळे आला. त्याच्याच मार्फत इंग्रजांनी त्यास आपल्या जवळ केले. वरवर गायकवाडांची व आतून इंग्रजांची त्याने नोकरी इमानइतबारे केली. परंतु जेव्हा गायकवाडांच्या वतीने बोलणी करण्यास तो पेशव्याकडे पुण्यास आला तेव्हा एक वर्षाच्या पुणे मुक्कामात त्याची इंग्रजांवरील निष्ठा काहीशी डळमळू लागली. भगवंतराव गायकवाडाचे पुणे दरबारी आगमन होताच एल्फिन्स्टनने --- पर्यायाने इंग्रजांनी शास्त्र्याचा पाठिंबा व पुणे - बडोदा दरम्यानची मध्यस्थी मागे घेतली. किंबहुना शास्त्री, पेशवे व गायकवाडांना त्याची आता जरूर वाटत नव्हती. कारभारीपद व आपली मेव्हणी शास्त्र्याच्या मुलास देण्याच्या निमित्ताने पेशवा शास्त्र्याला आपल्या पक्षात ओढत असल्याचे इंग्रजांनी ताडले. पेशव्याच्या या पवित्र्याने शास्त्री संभ्रमात पडला. त्याची निष्ठा डळमळीत होऊ लागली तर इंग्रज सावध झाले. शास्त्री पेशव्याचा नातलग वा कारभारी बनला तर सर्वात जास्त फायदा इंग्रजांना होता व धोकाही ! शास्त्री इंग्रजांशी एकनिष्ठ असता तर त्याने पेशव्याचे कारभारीपद स्वीकारण्यास एल्फिन्स्टनने आनंदाने संमती दिली असती. परंतु शास्त्र्याची इंग्रजांवरील निष्ठा डळमळीत होऊ लागल्याने एल्फिन्स्टनने मानभावीपणाने नैतिकतेचा मुद्दा पुढे आणत शास्त्र्याला पेशव्याची नोकरी न स्वीकारण्याची सुचना केली. आपण कोणाची चाकरी करायची या गोंधळात शास्त्री पडलेला असल्याने त्याने इंग्रजांची सुचना मान्य करून गायकवाडांना काही काळ तरी चिटकून राहण्याचे ठरवले. पेशवा शास्त्र्यासह नाशिकला वगैरे निघाला तेव्हा एल्फिन्स्टन सोबत होताच. नाशिकमध्ये त्यांची फाटाफूट झाली. एल्फिन्स्टन वेरूळला गेला तर पेशवा शास्त्र्यासह पंढरपूरला ! पंढरपुरास जाऊन पेशवा लगेच पुण्याला मागे फिरणार होता. गायकवाडांच्या सोबत असलेल्या वादाचा निकाल न लागता शास्त्र्याची वकीलात तर फसली होती. पंढरपुरास गेल्याने तिथे काही वेगळा निकाल लागणार नव्हता. पंढरपुराहून पेशवा - शास्त्री पुण्यास आले असते तर फार करून त्यांचा नातेसंबंध जुळला असता वा नसता. त्यानंतर शास्त्री बडोद्याला जाणार होता. तिथून तो पुढे काय करील याचा अंदाज नव्हता. म्हणजे तो गायकवाडांकडेच राहील कि पेशव्याकडे येईल याचा आगाऊ तर्क बांधणे शक्य नव्हते. मात्र इंग्रजांपासून हळूहळू फारकत घेऊ लागल्याचे --- एल्फिन्स्टनच्या सूचनावजा आज्ञा धुडकावून त्याने सिद्ध केले होतेच. यावरून शास्त्र्याचे अस्तित्व इतर कोणाहीपेक्षा इंग्रजांनाच अधिक धोकादायक बनल्याचे उघड होते.

    परदरबारी वाटाघाटी करणाऱ्या व हेरगिरी करणाऱ्यांनी आपल्या मालकावरील निष्ठा सोडून इतरांच्या चरणी आपली सेवा रुजू केल्यावर अशा लोकांचे दुसरे काय होणार ? खुरशेट मोदीने इंग्रजांची सेवा करताना पेशव्याची नोकरी पकडली तेव्हा संधी मिळताच इंग्रजांनी त्याला आपल्या मार्गातून दूर केले. खुरशेट मोदीला एका मांत्रिकाने दिलेल्या प्रसादाचे भक्षण केल्याने मृत्यू आल्याचे एल्फिन्स्टन सांगतो पण, त्या प्रसादाचे विषांत रुपांतर कोणाच्या प्रेरणेने झाले ते का लपवून ठेवतो ? शास्त्र्याला इंग्रजांच्या पासून धोका पोहोचू शकतो म्हणूनच पेशव्याने शास्त्र्याच्या बंदोबस्ताची तरतूद केली होती. पंढरपुरातही पेशव्याचा बंदोबस्त चांगला होता. मात्र ता. २० जुलै रोजी शास्त्र्याचा घात झाला. मारेकरी जर गायकवाड वा पेशव्याचे असते तर आपल्यावर संशय न यावा म्हणून त्यांनी शास्त्र्यासह आणखी एक - दोन जणांची कत्तल करण्याची आज्ञा दिली असती. हटकून एकट्या शास्त्र्यालाच मारण्याची आज्ञा ते का करते ? आपल्या उपस्थितीत त्रिंबकजी वा गायकवाडांमार्फत शास्त्र्याचा खून घडवून आणण्याइतपत बाजीराव राजकारणात कच्चा नव्हता. तसेच बाजीरावच्या नकळत त्याच्या उपस्थितीत गायकवाड तरी शास्त्र्याचा खून का घडवून आणतील ? तसेच या खुनानंतरच्या इंग्रजांच्या संशयास्पद हालचाली देखील दुर्लक्षित करता येण्यासारख्या नाहीत.  

    खुनानंतरच्या घडामोडी :-
एल्फिन्स्टन पुण्याला ६ऑगस्टला आला. पाठोपाठ ९ ऑगस्टला बाजीरावाचे पुण्यात आगमन झाले. पेशवा पुण्यात येताच एल्फिन्स्टनने भेटीचा आग्रह धरला. मात्र पेशवा काही ना काही सबब सांगून भेट टाळण्याचा प्रयत्न करत होता. इकडे एल्फिन्स्टन गप्प बसला नव्हता. शास्त्र्याचा सल्लागार बापू मैराळ यांस रेसिडेन्सीत मुक्कामास बोलावले. खुनाचा आपल्या पद्धतीने तपास चालवून त्रिंबकजी हा शास्त्र्याच्या खुनाच्या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे त्याने पेशव्यास कळवून त्यास आपल्या स्वाधीन करण्याची मागणी पेशव्याकडे केली. ( दि. १५ ऑगस्ट १८१५ ) 

    पेशवा आपल्या मागण्या सहजासहजी मान्य करणार नही याची एल्फिन्स्टनला अटकळ असल्याने त्याने पुण्याच्या आसपास पलटणी जमवण्यास आरंभ केला. चारी दिशांना त्याची पत्रे खेळू लागली. इंग्रजांच्या या डावाला प्रतिशह म्हणून त्रिंबकजीनेही फौज जमवण्यास आरंभ केला. वास्तविक नेपाळ युद्धात इंग्रज अडचणीत असल्याने पेशव्यासोबत निर्णायक युद्ध खेळण्याची इंग्रजांची तयारी नव्हती. खुद्द एल्फिन्स्टनलाही याची जाणीव असल्याने युद्धाच्या धमकीवरच पेशव्याला वेसण घालण्याचा त्याचा प्रयत्न चालला होता.    

    अलीकडच्या काळात दुसरा बाजीराव इंग्रजांच्या वाढत्या अरेरावीने वैतागून गेला होता. वसई व पंढरपूरच्या तहाने इंग्रजांनी त्याचे हात - पाय पुरते बांधत आणले होते. त्यामुळे संधी मिळताच इंग्रजांचे वर्चस्व कमी करण्याच्या प्रयत्नात बाजीराव होता. नेपाळ युद्धातील इंग्रजांची हलाखी समजल्यापासून त्रिंबकजीमार्फत त्याने इंग्रजांच्या विरोधात कारस्थाने रचण्यास आरंभही केला होता. परंतु यावेळी खुद्द पेशव्याची लष्करी तयारी बिलकुल नसल्याने नेपाळ युद्धाचा फायदा घेण्याची संधी त्यास साधता आली नाही. तेव्हा राजकीय डावपेचात तो इंग्रजांना पालथे पाडायच्या प्रयत्नास लागला. यातूनच गायकवाडांशी जवळीक करण्याची त्याची धडपड सुरु झाली होती. एल्फिन्स्टनला या गोष्टींची खबर असल्याने भावी युद्धाच्या दृष्टीने पेशव्याची उपद्रव क्षमता कमी करण्याच्या प्रयत्नास तो लागला. कंपनी सरकार विरुद्धची कट - कारस्थाने जरी त्रिंबकजीच्या मार्फत बाजीराव खेळवत असला तरी थेट पेशव्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणे शक्य नसल्याने त्याने त्रिंबकजीला सावज बनवले. डेंगळ्याला ताब्यात घेतल्यास बाजीरावास जरब बसेल असा त्याचा होरा होता.

    इंग्रज फौजा पुण्याच्या आसपास येऊ लागल्याने बाजीराव विचारात पडला. इकडे गव्हर्नर जनरलनेही एल्फिन्स्टनला त्रिंबकजी प्रकरणी सर्वाधिकार दिल्याचे पत्र ता. १ सप्टेंबर १८१५ रोजी एल्फिन्स्टनकडे येऊन पोहोचले आणि हाच गंगाधर शास्त्र्याच्या खुनामध्ये इंग्रजांचा हात असल्याचा सर्वात मोठा पुरावा आहे.  दि. २० जुलै रोजी शास्त्र्याचा खून झाल्यावर ६ ऑगस्टला एल्फिन्स्टन पुण्यास आला. म्हणजे तोपर्यंत तरी त्रिंबकजीच शास्त्र्याच्या खुनामागे असल्याचा त्याला पुरावा मिळाला नव्हता. कारण खुनाची चौकशी वा तपास त्याने पुण्याला येऊन केल्याचे इतिहासकारांनी नमूद केले आहे. याचाच अर्थ असा होतो कि, ता. २० जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान गव्हर्नर जनरलला शास्त्र्याचा खून झाल्याची खबर देण्यापलीकडे एल्फिन्स्टन जवळ दुसरी बातमी नव्हती. दि. ६ ऑगस्ट नंतर एल्फिन्स्टनने खुनाची चौकशी करून त्रिंबकजी दोषी असल्याचा शोध लावला. एल्फिन्स्टनच्या या शोधाची बातमी गव्हर्नर जनरलला ऑगस्ट महिना संपायच्या आत पोहोचली आणि त्यावर विचार करून त्याने एल्फिन्स्टनला या प्रकरणी दिलेलं मुखत्यारी पत्र पुण्यास पोहोचण्यास सप्टेंबर महिन्याची पहिली तारीख उगवली. याचा अर्थ उघड आहे. दि. ६ ऑगस्टच्या आधीच त्रिंबकजी हाच गुन्हेगार असल्याचा ' दिव्य शोध ' एल्फिन्स्टनने लावून तशा आशयाची पत्रे गव्हर्नर जनरलला पाठवली होती. अथवा ता. २० जुलैच्या घटनेचे वृत्त मिळताच त्याने त्रिंबकजीला या प्रकरणी अडकावण्याचे निश्चित करून त्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या होत्या. गंगाधराचा खून होताच एल्फिन्स्टन व गव्हर्नर जनरलने ज्या तातडीने पुढची पावले उचलली ती लक्षात घेता एकतर गंगाधराचा खून होणार असल्याचा एल्फिन्स्टन वा गव्हर्नर जनरलला दृष्टांत झाला होता यावर विश्वास ठेवावा लागेल किंवा इंग्रजांनीच शास्त्र्याचा काटा काढल्याचे मान्य करावे लागेल.    
    असो, गव्हर्नर जनरलचे पत्र मिळताच एल्फिन्स्टनची भाषा उग्राट होऊ लागली. पेशव्याने याच वेळी इंग्रजांशी युद्ध पुकारण्याचा बेत आखला खरा पण, अपुऱ्या तयारीमुळे बापू गोखल्याने त्यास मोडता घातला. तेव्हा इंग्रजांची समजूत काढण्यास्तव पेशव्याने ता. ५ सप्टेंबर रोजी त्रिंबकजीला अटक केली. परंतु त्रिंबकजीच्या अटकेचा हा केवळ देखावा असल्याचे ताडून एल्फिन्स्टनने सरळसरळ त्रिंबकजीला आपल्या ताब्यात देण्याची पेशव्याकडे मागणी केली. एल्फिन्स्टनची हि मागणी योग्य / अयोग्य होती याची चर्चा करण्याची यास्थळी आवश्यकता नाही. मुळात त्याने हि मागणी कोणत्या हेतूंनी केली हे पाहणे गरजेचे आहे. 


    आज ना उद्या आपल्याला बाजीरावासोबत युद्ध करावे  लागणार याची त्यास पूर्णतः जाणीव होती. तेव्हा बाजीरावास युद्धाची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यापेक्षा आजच त्याची सर्व तयारी अपुरी असताना व त्याच्या सहाय्यकांची जूट बनलेली नसताना युद्ध पुकारलेलं काय वाईट ?  त्यातही जलदीने पुण्यावर हल्ला चढवून बाजीरावासच ताब्यात घेतले तर दीर्घकालीन संघर्षाची गरजच उरणार नाही असा एल्फिन्स्टनचा छुपा मनसुबा या सर्व घडामोडींमागे असल्याचे दिसून येते. इंग्रजांच्या चाली पेशवा व त्याचे सल्लागार ओळखून असल्याने सर्व शक्यतांचा विचार करून अखेर दि. ११ सप्टेंबर १८१५ रोजी पेशव्याने त्रिंबकजीस इंग्रजांच्या स्वाधीन केले.

    सारांश, गंगाधरशास्त्र्याच्या खुनापूर्वीचे पुणे - बडोदा - कलकत्ता दरबारांतील राजकारण पाहिले असता व शास्त्र्याच्या खुनानंतरच्या घटना लक्षात घेत गंगाधराच्या मृत्यूने एक इंग्रज अपवाद केल्यास पेशवा किंवा गायकवाड यांचा कसलाही फायदा होणार नसल्याचे स्पष्ट होते. यावरून गंगाधराच्या खुनामागे पुणे वा बडोदा दरबारऐवजी कलकत्ता दरबारची प्रेरणा असल्याचे सिद्ध होते.

                                                                                                          
                                                                                   ( समाप्त )

संदर्भ ग्रंथ :-
१) मराठी रियासत ( खंड - ६, ७ व ८ ) :- गो. स. सरदेसाई
२) एल्फिन्स्टन :- प्रमोद ओक
३) मराठे व इंग्रज :- न. चिं. केळकर
४) सरदार बापू गोखले :- सदाशिव आठवले
५) पेशवाईच्या सावलीत :- ना. गो. चापेकर
६) मराठी दफ्तर ( रुमाल दुसरा ) :- वि. ल. भावे

४ टिप्पण्या:

deom म्हणाले...

वाह!!! आपले निष्कर्ष तर अप्रतिम आहेत. कमाल केली आपण. आजवर गंगाधर शास्त्रीच्या खुनाला कोणी वाचा फोडली नव्हती … वर वर फक्त या विषयाला हात घातला जायचा बाकी सर्व अंधारात. आपण जे सडेतोड मुद्दे मांडलेत त्यावरून इंग्रज याचे खरे गुन्हेगार आहेत.

sanjay kshirsagar म्हणाले...

deom
आपल्या कमेंटरुपी प्रतिक्रियांचे कोणत्या शब्दांत आभार मानू ? फक्त एवढेच नमूद करतो कि, असाच लोभ निरंतर असावा हि विनंती !

Nilima म्हणाले...

Farch abhyaspurn lekh aahe.. Lekhan shaili uttam aahe. nawnawin vishayanwar lihit raha.. pudhil lekhachya pratikshet. :-)

sanjay kshirsagar म्हणाले...

Nilima जी, अभिप्राय व शुभेच्छांसाठी आपला आभारी आहे.