ता. १५ डिसेंबर १७४९ रोजी छ. शाहूचे निधन झाले.
तत्पूर्वी आपला अंतसमय नजीक आला हे जाणून शाहूने नानासाहेब पेशव्यास स्वहस्ते दोन
याद्या लिहून दिल्या. ( स. १७४९ ऑक्टोबर )
या दोन याद्यांना सनदा असे म्हणता येत नसले तरी छत्रपती पदावरील व्यक्तीने
या स्वहस्ते लिहून दिलेल्या असल्यामुळे सनदांइतक्याच त्या महत्त्वाच्या आहेत. या
सनदांच्या / याद्यांच्या विषयी अधिक माहिती देण्यापूर्वी शाहूने पेशाव्यास लिहून
दिलेल्या याद्या या ठिकाणी प्रथम देत आहे.
परिशिष्ट
शाहूच्या दोन सनदा
सनद पहिली
श्री
राजमानरा|बालाजीप्रधानपडीतयासआज्ञातुम्हीफौजधरनेसरवासआज्ञाकेलीत्याच्यादैवनाहीमाहाराजासदुखनेजालेनाहीबरहातनाहीराजभारचालापाहीजेतरपुढेवंसबसवनेकोलापूरचेनकरनेचीटनीससाससरवसागीतलेतसेकरनेवंसहोईलत्याच्याआज्ञेतचालूनराजमडळचालबनेचीटनीसस्वामीचेइसवासूत्याच्यातुमच्याविचारेराजराखनेवंसहोईलतोतुमचीघालमेलकरनारनाहीसुदनआसा
या सनदेचा
सांप्रतच्या भाषेने अनुवाद :
राजमान्य राजश्री बाळाजी प्रधान पंडित यांस आज्ञा.
तुम्ही फौज धरणे. सर्वांस आज्ञा केली त्यांच्या दैवी नाही. माहाराजास दुखणे जाले.
नाही बरे होत नाही. राज्यभार चालला पाहीजे. तर पुढे वंश बसवणे. कोलापूरचे न करणे. चिटनिसास
सर्व सांगितले तसे करणे. वंश होईल त्याच्या आज्ञेत चालून राजमंडळ चालवणे. चिटनीस
स्वामींचे विश्वासू. त्यांच्या तुमच्या विचारे राज्य राखणे. वंश होईल तो तुमची घालमेल
करणार नाही. सुज्ञ असा.
सनद
दुसरी
श्री
राजमानरा|बालाजीपडीतप्रधानआज्ञाजेराजभारतुम्हीचालवालहाभरवसास्वामीसआहेपहिलेसागीतलेखातरजमातीचीटनीसानीआसलकलीतुमचेमसतकीहतठवीलाआहेवसहोईलतोतुमचेपदप्रधानचालवीलकरीलआतरत्तरसफत्तआसेत्याचेआज्ञेतचालूनसेवाकरनेराजराखनेबहूतकायलिहीनेसुदनआसा.
या सनदेच्या
सांप्रतच्या भाषेने अनुवाद :
राजमान्य राजश्री बाळाजी पंडित प्रधान ( यांस )
आज्ञा जे : राज्यभार तुम्ही चालवाल हा भरंवसा स्वामींस आहे. पहिले सांगितले (
त्याची ) खातरजमा ते चिटनिसांनी असेल केली तुमचे मस्तकी हात ठेविला आहे वंश होईल
तो तुमचे पद प्रधान चालविल ( यांत ) करील अंतर तर शपथ असे. त्याचे आज्ञेंत चालून
सेवा करणे ( आणि ) राज्य राखणे. बहूत काय लिहिणे ? सुज्ञ असा.
पहिली
सनद / यादी :- शाहूने स. १७४७ मध्ये
नानासाहेबास पेशवेपदावरून दूर केले होते. बाजीरावाच्या काळापासून पेशवे शाहूची
सत्ता एकप्रकारे गुंडाळत चालले होते. हा प्रकार शाहू व त्याच्या प्रधानमंडळास
स्पष्ट दिसत होता. पेशव्यांना काही प्रमाणात आळ्यात ठेवण्यासाठी शाहूला काहीतरी
उपाययोजना करणे भाग होते व ज्या व्यक्तीला पुत्र संतान नाही आणि जो छत्रपतीसारख्या
महत्त्वाच्या पदावर आहे अशा व्यक्तीला तर काही कटू निर्णय हे घ्यावेच लागतात.
त्यानुसार शाहूने नानासाहेबाला पदभ्रष्ट करून पाहिले पण नानासाहेबाने सोडलेले
पेशवेपद घेण्यास कोणी पुढे येईना. नानासाहेबाने शाहूसोबत नम्रपणाने वागून आणि आपली
सर्व राजकीय मुत्सद्देगिरी पणाला लावून आपण मोकळे केलेले पेशवेपद घेण्यास कोणी
पुढे येणार नाही याची खबरदारी घेतली होती. परिणामी फिरून शाहूला नानासाहेबासच
पेशवेपद देणे भाग पडले. स. १७४७ मधील या प्रकारची पुनरावृत्ती करण्याचा आणखी एक
अखेरचा प्रयत्न शाहूने स. १७४९ मध्ये करून पाहिला. आपला अंतसमय नजीक आला हे जाणून
त्याने प्रमुख सरदारांना राजधानीत बोलावले. परंतु रघुजी भोसलेसारखे मातबर सरदार
पेशव्याला अनुकूल असल्याने त्यांनी वेळेवर येण्याचे मुद्दाम टाळले. परिणामी,
पेशव्याखेरीज इतर कसलाच पर्याय समोर नसल्याने सरकारी फौजेवरील सर्व हुकुमत शाहूने
पहिल्या यादीनुसार पेशव्याच्या हाती दिली. आपल्या मागे सुरळीतपणे राज्यकारभार
चालवण्याची जबाबदारी त्याने पेशव्यावर सोपवली. आपल्या मागे राज्याला धनी हा हवाच
हे शाहू जाणून होता व कोल्हापूरच्या संभाजीस सातारची गादी देण्याचा पेशव्याचा
मानसही त्याच्यापासून लपला नव्हता. तेव्हा पहिल्या यादीत मुद्दाम शाहूने ताकीद
दिली कि, राज्याला वंश तर पाहिजे पण कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरकरास गादीवर
आणू नये. याविषयी गोविंदराव चिटणीस सोबत शाहूची चर्चा झाली होती आणि त्यानुसार
पेशव्याने कार्य करावे अशी शाहूची आज्ञा होती. गोविंदराव चिटणीस व शाहू यांचा
नेमका काय बेत होता याची वाचकांना या ठिकाणी मुद्दाम थोडक्यात माहिती देतो.
राजारामाची पहिली पत्नी ताराबाई, हि
यावेळी साताऱ्यास एकप्रकारे शाहूच्या नजरकैदेत होती. राजारामच्या दुसऱ्या पत्नीचा
मुलगा संभाजी यावेळी कोल्हापुरास राज्य करत होता. शाहूची वृद्धावस्था व त्याचे
निपुत्रिक असणे याचा योग्य तो अर्थ शाहू व त्याच्या मुत्सद्यांच्या लक्षात आलेला
होता. राज्यला धनी शोधण्याची चाललेली खटपट ताराबाईपासून लपून राहिली नव्हती. त्या
वृद्ध मुत्सद्दी स्त्रीने शाहूला सांगितले कि, अस्सल वंश हयात असताना गादीला धनी
म्हणून दत्तकाचा शोध का घ्यावा ? तेव्हा शाहू काहीसा गोंधळला. कारण, त्याला तर
पुत्रसंतान नव्हतेच पण कोल्हापूरच्या संभाजीला देखील मुलगा नव्हता. अशा परिस्थितीत
ताराबाई कोणत्या अस्सल वारसाविषयी बोलत आहे हे त्याला उमजेना. नंतर ताराबाईने
सांगितले कि, आपला पुत्र शिवाजी यास पुत्रसंतान होते. परंतु, कोल्हापुरात
राज्यक्रांती होऊन संभाजी गादीवर आला आणि आपण कैदेत पडलो. त्यावेळी शिवाजीच्या
मुलास मारण्याचे प्रयत्न झाले. परंतु, आपण मोठ्या शिकस्तीने नातवाचा बचाव करून
त्यास गुप्तरूपाने ठेवले आहे. ताराबाईच्या या हकीकतीवर शाहूचा भरवसा बसला नाही.
ताराबाईचा खटपटी व महत्त्वकांक्षी स्वभाव सर्वजण जाणून होते. तेव्हा या
ताराबाईच्या सांगण्यानुसार तिचा खराच नातू हयात असेल तर त्यास आपल्यामागे गादीवर
बसवावे असे शाहूने गोविंदराव चिटणीसास सांगितले. पेशव्याच्या मदतीने शाहूची सूचना
अंमलात आणली जाणार होती. अर्थात पुढील इतिहासाचा प्रस्तुत विषयाशी संबंध नसल्याने
तूर्तास इतकेच पुरे.
आपल्या मागे ताराबाईच्या नातवास -- जर तो
अस्सल वंशज असेल तर -- गादीवर बसवावे किंवा मग दत्तक आणून बसवावा पण कोणत्याही
परिस्थितीत कोल्हापूरच्या संभाजीस सातारची गादी न देण्याची शाहूची स्पष्ट आज्ञा
होती. आपल्या मागे जो राज्याचा धनी होईल त्याच्या आज्ञेत राहून राजमंडळ
सांभाळण्याची म्हणजे त्याचे अस्तित्व राखण्याची शाहूने पेशव्यास आज्ञा केली.
वस्तुतः अष्टप्रधान मंडळापैकी पेशवा हा भलताच सामर्थ्यवान झाल्याने बाकीचे प्रधान
अगदीच नामशेष झाले होते. परंतु, हा बाह्य डोलारा टिकवून ठेवणे आवश्यक होते व तसेही
महत्वाची राजकारणे पेशवेच पाहात असल्यामुळे बाकीचे राजमंडळ पगार व वतनाचे धनी
राहिले होते. तेव्हा त्यांचे पगार, पदे आणि वतने चालवणे एवढी जबाबदारी पेशव्यावर
शाहूने सोपविली. बाकी, चिटणीसाच्या सल्ल्याने राज्य राखणे याचा स्पष्ट अर्थ दिसत
आहेच. चिटणीसाच्या सल्ल्याने म्हणजे सातारचा बंदोबस्त चिटणीसाच्या सल्ल्याने करून
बाकीचे कार्य पेशव्याने स्वतःच्या तंत्राने उरकायचे असाच शाहूच्या म्हणण्याचा आशय
दिसून येतो. त्याशिवाय आपल्यामागे जो वारसा गादीवर बसेल तो पेशव्याच्या पदाची
घालमेल करणार नाही असे जे शाहूने एकप्रकारे पेशव्याला वचन दिले आहे त्याचा सरळ
अर्थ दिसतो कि, पेशवेपद एकप्रकारे भट घराण्यात आता वंशपरंपरागत झाले आहे. बाकी
पहिल्या यादीविषयी याहून फारसे काही सांगण्यासारखे नाही.
दुसरी सनद / यादी :- बहुतेक सर्व पहिल्या यादीतील मजकुराचीच यामध्ये
पुनरावृत्ती केलेली आहे. तरीही अर्थाच्या दृष्टीने दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा
वेगळी आहे. उदा. पुढील वाक्ये पहा :- “ राज्यभार तुम्ही चालवाल हा भरंवसा
स्वामींस आहे. पहिले सांगितले ( त्याची ) खातरजमा ते चिटनिसांनी असेल केली तुमचे
मस्तकी हात ठेविला आहे वंश होईल तो तुमचे पद प्रधान चालविल ( यांत ) करील अंतर तर
शपथ असे. त्याचे आज्ञेंत चालून सेवा करणे ( आणि ) राज्य राखणे. “ यातील
पहिल्या वाक्याचा अर्थ स्पष्ट आणि उघड आहे कि राज्य सांभाळण्यास आता नानासाहेब
पेशव्याखेरीज समर्थ असा कोणी नाही तेव्हा त्यासच पुढारपण देणे शाहूला एकप्रकारे
भाग पडले.
“
पहिले सांगितले ( त्याची ) खातरजमा ते चिटनिसांनी असेल केली ” हे वाक्य
मला विशेष महत्त्वाचे वाटते. यातून शाहूला नेमके काय म्हणायचे आहे ? ताराबाईचा
नातू अस्सल आहे कि नाही याविषयी हा उल्लेख आहे का ? उपलब्ध पुराव्यांवरून या
ठिकाणी ताराबाईच्या नातवास अनुलक्षून हा उल्लेख करण्यात आलेला आहे हे स्पष्ट होते.
ताराबाईचा नातू हा खरा कि खोटा याविषयी खातरजमा करण्यासाठी शाहूने गोविंदराव
चिटणीसास ताराबाईकडे पाठवले. ताराबाईच्या नातवाच्या विषयी माहिती असलेल्या बावडेकर
भगवंतराव अमात्यास गोविंदरावाने आपल्या भेटीस आणले. कृष्ण नदीच्या काठी शपथपूर्वक
भगवंतरावाने कबूल केले कि, ताराबाई ज्या वारसाविषयी बोलत आहे तो खरोखरच तिचा नातू
आहे. हा प्रकार पेशव्याला माहिती नव्हता. आणि ताराबाईच्या नातवास सातारच्या गादीवर
आणायचे असेल तर त्यासाठी पेशव्याचे पाठबळ आवश्यक असल्याने त्यास विश्वासात घेणे
गरजेचे होते व या मसलतीत पडण्यापूर्वी आपण ज्याचा पक्ष उचलून धरणार आहोत तो खरोखरच
राजपुत्र आहे कि नाही याविषयी पेशवा साशंक असणे स्वाभाविक होते. त्यामुळे
चिटणीसाच्या सांगण्यानुसार पेशव्याची खातरजमा झाली असेल असे शाहूला वाटले असावे. व
म्हणूनच त्याने हे वाक्य यादीमध्ये लिहिले आहे.
“ तुमचे मस्तकी हात ठेविला आहे वंश होईल
तो तुमचे पद प्रधान चालविल ( यांत ) करील अंतर तर शपथ असे. त्याचे आज्ञेंत चालून
सेवा करणे ( आणि ) राज्य राखणे.” बाकी या वाक्यांचा अर्थ स्पष्ट आहे. पेशवेपद भट
घराण्यात वंशपरंपरागत केल्याचे यातून सूचित होते. तसेच आपल्यामागे जो कोणी गादीवर
बसेल त्याच्या आज्ञेत राहून राज्य राखण्याचे पेशव्यास शाहूने बजावले आहे.
शाहूने लिहिलेल्या या याद्यांच्याविषयी मान्यवर
इतिहासकारांचे अभिप्राय खालीलप्रमाणे :-
गो. स. सरदेसाई :- “ या दोन यादी म्हणजे मराठशाहीच्या
सूत्रचालकत्वाची शाहूने पेशव्यास करून दिलेली सनद होय.” ( मराठी रियासत , खंड – ४,
पृष्ठ क्र. १६५ )
त्र्यं. शं. शेजवलकर
:- “ ज्या गोविंदराव चिटणीसाने मरणोन्मुख
शाहूकडून सर्वाधिकारपणाच्या सनदा लिहून घेऊन पेशव्याला दिल्या असे समजण्यात येते,
त्यावरहि नानासाहेबाचा विश्वास नसलेला दिसतो.” ( निजाम – पेशवे संबंध १८ वे शतक,
पृष्ठ क्र. ५९ )
वि. का. राजवाडे :- राजवाडे शाहूच्या यादीविषयी लिहितात कि, “ या
चिठ्ठीवरून बाळाजीवर शाहूचा फारसा विश्वास होता असे दिसत नाही. राघोजी भोसले व
दाभाडे ह्यांना बोलाविले असता ते येऊ पावले नाहीत. तेव्हा ‘ फौज धरने ‘ त्यांच्या
दैवी नाही अशी शाहूची खात्री झाली. त्यांना सामर्थ्य असते व अक्कल असती तर ते
महाराजांच्या आज्ञेबरहुकूम केव्हांच येऊन पावते. ते आले नाहीत तेव्हां बाळाजीच्या
स्वाधीन फौजेचा ( १ ) अधिकार देण्याखेरीज शाहूला गत्यंतरच राहिले नाही. बाळाजीचा
ओढा संभाजीराजाकडे विशेष. तेव्हां ( २ ) त्याला बिलकुल आणू नये असे शाहूने लिहून
ठेविले. ( ३ ) वंश आहे तोच चालवावा म्हणजे राजारामाचा पुत्र जो शिवाजी त्याचा
मुलगा रामराजा ह्याला गादीवर बसवावे ही शाहूची तिसरी आज्ञा होती. तसेच ( ४ ) सरदार
लोकांचेहि पूर्वीप्रमाणेच चालवावे अशी शाहूची चवथी आज्ञा होती. ह्या चार
आज्ञांपैकी फौजेचा अधिकार मिळविण्याकरितां बाकीच्या तीन आज्ञा मानातून नसतांहि
बाळाजीने मान्य केल्या व कोल्हापूरच्या संभाजीशी पुढील दहा वर्षे मोठे प्रेमाचे
वर्तन ठेविले. इतकेच नाही ; तर रामराजा जिवंत असतां नवा राजा करावा असा त्याने
पुढे १७६१ त घाट घातला. ( राजवाडे लेखसंग्रह, भाग एक, ऐतिहासिक प्रस्तावना, पृष्ठ
क्र. ४२ )
मराठी रियासतीच्या ४ थ्या खंडाचे संपादक
श्री. व. शं. कदम यांचे मत मात्र काहीसे वेगळे आहे. त्यांच्या मते “ ....
छत्रपती शाहूने दिलेल्या तथाकथित याद्यांमुळे त्याच्या नंतर येणाऱ्या छत्रपतीवर
कोणतेही बंधन असल्याचे स्वतः पेशवा बाळाजीरावही मानीत नव्हता. नाना पुरंदरेस
लिहिलेल्या एका पत्रात त्याने छत्रपती शाहूच्या वेळेप्रमाणे वागण्याची तयारी दर्शविली
आहे. तो स्वतः कोणत्याही सूत्रचालकत्वाचा किंवा सर्वाधिकारपणाचा दावा करीत नाही.
सनदशीरपणापेक्षा वास्तवात आपली लष्करी राजकीय सत्ता कशी कायम राहील इतकेच त्याचे
व्यवहारी धोरण होते. आणि म्हणूनच छ. शाहूचा मृत्यू आणि त्याच्या याद्या यापेक्षाही
हुजुरात फौजेचे सामर्थ्य आणि छत्रपतीला कायम स्वतःच्या बंदिवासात ठेवणे हेच
पेशवाईच्या राजकीय सामर्थ्याचे आधार होते. ( मराठी रियासत, खंड – ४, पृष्ठ क्र.
२०९ वरील संपादकाचे मनोगत, कलम ३ )
सारांश, शाहूने नानासाहेब पेशव्यास लिहून
दिलेल्या याद्यांच्याविषयी इतिहासकारांची मते भिन्न व समर्पक अशी असली तरी एका
गोष्टीकडे सर्वांचेच दुर्लक्ष झालेले आहे. शाहू हा कसाही का असेना एक राजा होता
आणि त्याने स्वहस्ते एकप्रकारे राज्यरक्षणाची जबाबदारी म्हणजेच एका राजाचे अधिकार
पेशव्याच्या हाती सोपविले होते. याचा अर्थ उघड आहे कि, पेशव्यांच्या वाढत्या
अनियंत्रित अशा सत्तेला एकप्रकारे त्याने मान्यताच दिलेली होती. या याद्यांचे
महत्त्व खुद्द नानासाहेब पेशवा किती मानत होता हा मुद्दा खरेतर गैरलागू आहे. कारण
कोणताही करार हा सैनिकी सामर्थ्यावरच अंमलात आणला जाऊ शकतो व ते सामर्थ्य नानासाहेब
पेशव्याकडे बऱ्यापैकी होते. दुसरी गोष्ट अशी कि, पुढील राजकारण कोणत्या थराला जाईल
याचा कसलाही नेम नव्हता. ताराबाईचा नातू हा जरी अस्सल राजपुत्र असला तरी तो
कर्तबगार आहे कि नाही याची कोणाला कल्पना नव्हती. त्याशिवाय तो ताराबाईचा नातू
असल्याने राज्यकारभार आता ताराबाईच्याच तंत्राने चालणार हे उघड होते आणि शाहूने
दिलेल्या याद्या मान्य करणे ताराबाईला तरी बंधनकारक नव्हते. तसे पाहिले तर ते
रामराजास तरी कुठे बंधनकारक होते ? कारण, शाहूने त्यास विधीपूर्वक दत्तक न
घेतल्याने शाहूने दिलेला शब्द त्याने पाळलाच पाहिजे असा काही निर्बंध त्यावर
नव्हता.
तात्पर्य, या याद्यांच्या रूपाने छ.
शाहूने आपल्याच नोकराच्या वाढत्या वर्चस्वाला एकप्रकारे लेखी कबुली तर दिलीच पण
त्याशिवाय काही अक्षम्य अशा चुकाही करून ठेवल्या. (१) शाहूच्या या कृतीने
पेशव्यांचे स्थान हे अष्टप्रधान मंडळातील एक प्रधान असे न राहता काहीसे उंचावले व
याचा प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष असा परिणाम इतर प्रधानांवर निश्चित असा झाला.
यापुढे त्यांच्या सर्व शेंड्या आता पेशव्याच्या हाती गेल्यामुळे पेशव्याच्या
विरोधात जाण्याचे धारिष्ट्य त्यांनी केले नाही. (२) शाहूने सर्व सत्ता पेशव्याच्या
हाती दिली पण पेशव्याचा अधिकार कुठवर चालवा आणि किती प्रमाणात तो मर्यादित राहावा
याची निश्चित अशी सीमारेषा आखली नाही. याचा परिणाम तत्कालीन राजकारणावर झाल्याचे
दिसून येते. (३) छत्रपतींच्या अधिकारांचे उदक शाहूने पेशव्याच्या हाती सोडले ते पण
केव्हा तर आपल्या अंतसमयी. आपल्यानंतर ताराबाईचा नातू राज्यावर येणार हे माहिती
असूनही व तो अस्सल राजपुत्र आहे याची खातरजमा करून देखील त्याची संमती न घेता
त्याला बंधनकारक असा करार त्याने करून ठेवला. रामराजा हा एक दुर्बल निघाला पण
त्याच्या जागी दुसरा कोणी असता आणि त्याने स्वतंत्र खटपट करण्याची काही धडपड केली
असती तर याच याद्यांच्या सहाय्याने पेशव्याने त्याचे हातपाय बांधलेच नसते असे
म्हणता येईल काय ? एकूणचं, संभाजीपुत्र शाहूचा जो काही दुबळेपणा होता तो या
याद्यांच्या रूपाने स्पष्ट झाल्याचे दिसून येते.
संदर्भ ग्रंथ
:- मल्हार रामराव चिटणीस – विरचित
थोरले शाहू महाराज यांचे चरित्र
संपादक – र. वि. हेरवाडकर
आवृत्ती पहिली : ऑगस्ट १९७६
व्हीनस प्रकाशन, पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा