बाजीरावाने आरंभी आढेवेढे घेऊन शेवटी निजाम - भोसल्यांचे करार पूर्ण करून दिल्यावर शिंद्यांच्या मागणीचा मुद्दा पुढे आला. महाडच्या करारनुसार त्याला अहमदनगरचा किल्ला व दहा लाखांची जहागीर पेशव्याकडून मिळणे अपेक्षित होते. शिंद्याची मागणी न्याय्य असल्याने ती पूर्ण करण्यासाठी नाना वा बाजीरावाने आढेवेढे घेतले नाहीत. मात्र, नगरचा किल्ला शिंद्याच्या ताब्यात देण्यापूर्वी नानाने आपला चुलतबंधू मोरोबा यांस तेथील बंदीवासातून बाहेर काढून रतनगडावर हलवले. मोरोबा फडणीस पहिल्या इंग्रज - मराठा युद्धांत दादाचा पक्षपाती बनल्याने जो कैदेत पडला तो अद्यापही तसाच होता. आपल्या बापाचा सहाय्यकर्ता या नात्याने त्याची मुक्तता व्हावी --- किमानपक्षी तो नगरच्या किल्ल्यातच राहावा यासाठी बाजीरावाने शक्य तितके प्रयत्न केले पण नानाने त्यांस जुमानले नाही.
नाना - बाजीरावाच्या ' शीतयुद्धात ' मराठी राज्याची हानी होऊ लागली होती. याकडे उभयतांचे सारखेच लक्ष असले तरी होणारी राज्याची अधोगती थांबवण्यापेक्षा ती अधिक वेगाने घडवून आणण्याचा जणू काही चंग बांधल्याप्रमाणे दोघेही यावेळी वागत होते. बाजीरावाच्या या काळातील वर्तनासंबंधी असे म्हणता येईल कि, जन्मतः राजकीय बंदीवासात तो वाढल्याने त्याला राज्यकारभाराची, राजकारणाची माहिती नसल्याने तो अनुभवातून शिकत होता. अर्थात, यामुळे व्हायच्या त्या मोठमोठ्या घोडचुका होत राहिल्या. पण नानाच्या कृत्यांचे समर्थन कसे करणार ? नाना अनुभवी, कर्तबगार असूनही धड तो बाजीरावाला गुंडाळून छातीठोकपणे सर्व सुत्रे, सत्ता हाती घेत नव्हता कि बाजीरावाच्या ऐवजी इतर कोणाला गादीवर अणायचाही यत्न करत नव्हता. उलट आपली फडणीशी कायम राहून वर कारभारीपद आपल्याकडेच कसे राहील याचीच त्याला चिंता लागून राहिल्याचे दिसते. परिणामी, बुद्धीसागर नानाचे बुद्धीसामर्थ्य मराठी राज्याला विनाशाच्या गर्तेकडे ढकलू लागले.
तुकोजी होळकराचा मृत्यू :- स. १७९७ मध्ये दि. १५ ऑगस्ट रोजी अव्वल पेशवाई पाहिलेला, अनुभवलेला, अटक - पानिपत मोहिमांत वावरलेला पराक्रमी सेनानी तुकोजी होळकर मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर होळकरांची सरदारी कोणास मिळावी यावरून त्याच्या दोन्ही मुलांत --- काशीराव व मल्हारराव यांच्यात --- तंटा निर्माण झाला. काशीराव हा थोरला असला तरी त्याचा एक हात व पाय जन्मतः अधू असल्याने लष्करी कामकाजा विषयी तो उपयुक्त नव्हता. दुसरा मुलगा मल्हारराव हा शूर, धाडसी व पराक्रमी असला तरी विवेकबुद्धी त्यांस नव्हती. त्यामुळे तुकोजी हयात असतानाच काशीरावास मुख्य सरदारी व मल्हाररावास लष्करी प्रमुखपद देण्याचा विचार चालला होता. परंतु असे विभक्त अधिकारपद मल्हार व काशीरावास नको असल्याने तुकोजीचा तोडगाच निकाली निघाला. मल्हाररावाने तर स्पष्ट सांगितले कि, ' तुमच्या माघारी जे होईल ते होईल. ' यामुळे तुकोजीच्या मृत्यूनंतर होळकरांच्या घरात भाऊबंदकी माजणार हे उघड होते व तसेच घडले. तुकोजीला काशी व मल्हार व्यतिरिक्त विठोजी व यशवंत हे दोन उपस्त्रीपासून झालेले पुत्र होते. हे दोघे मल्हारराव प्रमाणेच पराक्रमी व साहसी असून ते नेहमी मल्हाररावाच्या सोबतच राहत असत. तुकोजीच्या निधनानंतर आपणांस प्रमुख सरदारी मिळावी यासाठी मल्हाररावाने प्रयत्न आरंभले तर जेष्ठत्वाचा मुद्दा उचलून दौलतराव शिंद्याने काशीरावाचा पक्ष स्वीकारला. या भांडणात नाना फडणीसने सहेतुक प्रवेश करून शिंदे - होळकरांच्या वैराचा वन्हि अधिक चेतवला.
मल्हारराव होळकरास शिंद्यांचा दगा :- काशीरावास तुकोजीची सरदारी मिळवून देण्यामागे दौलतरावाचा अंतस्थ हेतू होळकरांची सरदारी आपल्या अंकित करून घेण्याचा होता. मल्हाररावाने त्याचा हा डाव ओळखून काशीरावाच्या विरोधात बंडाचे निशाण उभारले. मल्हाररावाच्या या धडाडीने नानाच्या आकांक्षांना परत पालवी फुटली. वीस लाख रुपये, दहा लाखांची जहागीर व नगरचा किल्ला देऊनही दौलतराव उत्तरेत जात नाही पाहून त्याने दौलतरावाच्या नाकात काड्या घालण्यासाठी होळकर बंधूंना हातशी धरले. जवळचा पैसा त्यांना पुरवून लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी त्यांची मदत केली. परिणामी सात - आठ हजार सैन्यासह मल्हारराव हा आपल्या भावांच्या सोबत भांबुर्ड्याला तळ ठोकून राहिला. मल्हारराव काशीरावास जुमानत नाही वर छातीठोकपणे पुण्यातच स्वतंत्र छावणी ठोकून राहत असल्याचा राग दौलतरावास आला. त्याने काशीरावाकडे टोचणी लावली कि, ' मल्हाररावास पकडून कैदेत टाका ' परंतु फौजबंद मल्हाररावास पकडण्याची काशीरावाची कुवत नसल्याने त्याने ती जोखीम दौलतरावावर सोपवून याकामासाठी रोख रक्कम व काही गावे इनाम देण्याचे मान्य केले. आपल्या खजिन्याची व दौलतीची वृद्धी होण्याची संधी दवडेल तो दौलतराव कसला ? त्याने हि सुपारी स्वीकारली. प्रथम त्याने मल्हाररावास फौजेला रजा देऊन आपण सांगू त्याप्रमाणे राहण्याची सुचना केली. पण जो अहिल्याबाई, तुकोजी, नाना यांना जुमानला नाही तो मल्हारराव दौलतरावाचे काय ऐकणार ? त्याने दौलतरावाची सुचना धुडकावून लावली.
तेव्हा दि. १४ सप्टेंबर १७९७ रोजी रात्री दौलतरावाची काही पलटणे एका बाजूने व दुसऱ्या बाजूने काशीरावाची पथके मल्हाररावाच्या गोटावर चालून गेली. परंतु हल्ल्याची कुणकुण आधीच लागलेली असल्याने सावध मल्हारराव मोर्चे बांधून झुंजाच्या तयारीत राहिला. परिणामी शिंद्यांनी हल्ल्याचा बेत रद्द केल्याची हूल उठवली. पहाटेपर्यंत शिंद्याच्या आक्रमणाची वाट बघत असलेला मल्हारराव पलटणे चालून आली नाहीत म्हटल्यावर मोर्चे सोडून छावणीत परतला. सकाळची आन्हिकं आटोपून डेऱ्याच्या पुढे तो बसला असताना महापराक्रमी दौलतराव शिंदयाची पलटणे चालून आली. बेसावध क्षणी छापा पडल्याने मल्हाररावाची फौज उधळली. खुद्द मल्हारराव मात्र आपल्या निवडक अनुयायांसह शस्त्रे उपसून युद्धात उतरला. त्याला शिंद्याचा अंमलदार मुजफरखानाने ठार केले. मल्हाररावाचे साथीदार लाख्या बारगीर, रविराव शिंदे लोणीकर इ. मारले गेले तर विठोजी व यशवंतराव जीव घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. मल्हाररावाचा मृतदेह काशीरावाने आपल्या ताब्यात घेतला तर मल्हाररावाचा कबिला यावेळी पुण्यात केसोपंत कुंट्यांच्या आश्रयास राहिला. दौलतरावाच्या या भीमपराक्रमाने पुणे दरबार हादरून गेला. नानाच्या पक्षाला तर मोठा धक्काच बसला. काशीरावाची सरदारी त्यावेळी पूर्णतः निर्वेध झाली असली तरी आता होळकरशाही शिंद्यांच्या अंकित झाल्याचे जाणत्यांच्या लक्षात आले.
अमृतराव - बाजीरावात वैराची ठिणगी :- शिंद्यांच्या विरोधात मल्हारराव होळकरास फूस लावतानाच नानाने अमृतराव पेशव्यालाही चिथावणी देण्यास कमी केलं नाही. नानाच्या पाठिंब्यावर व पैशांच्या बळावर अमृतरावाने हुजुरातीवर नियंत्रण मिळवले. सरदारांची जूट आरंभली व बाजीरावाकडे थेट मागणी केली कि, ' प्रमुख कारभारीपद मला द्यावे. नानाने दुय्यम पद स्वीकारावे आणि शिंद्यांनी याउपर कारभारात हस्तक्षेप करू नये. ' अमृतरावाच्या या मागणीने बाजीराव धास्तावला. अमृतराव नानाच्या पाठींब्याने बोलत असल्याचे त्याच्या लक्षात आले. परंतु अमृतरावाची मागणी न्याय्य असल्याने त्यांस धुडकावून लावणेही त्याला शक्य नव्हते. तेव्हा त्याने हे प्रकरण तसेच लोंबकळत ठेवले. कारण, अमृतरावास कारभारीपद द्यावे तर त्याच्या मार्फत नाना शिंद्याला पुण्यातून बाहेर काढणार. कदाचित महाड प्रमाणे कारस्थान रचून आपली उचलबांगडीही करेल अशी त्यांस भीती होती. असो, या निमित्ताने अमृतराव आता त्याच्या शत्रूवर्गात मोडला जाऊ हे मात्र खरे !
अमृतरावाच्या बाबतीत बाजीराव आणि नानाचा अंदाज बव्हंशी चुकला असे माझे मत आहे. आतापर्यंत अमृतराव रघुनाथरावाचा दत्तकपुत्र असल्याने त्याला राजकारणात जितक्यास तितके महत्त्व दिले जात होते. परंतु नानाच्या पाठबळाने त्याचे राजकीय वजन एकदम वाढून त्याच्या महत्वकांक्षांना पालवी फुटू लागली. आपले प्रस्थ वाढवण्यापुरता त्याने नानाचा आधार घेतला खरा पण मनापासून तो काही नानाचा स्नेही नसून शत्रू होता. अर्थात, नानाला याची कल्पना असली तरी ' कालच्या या पोरट्यांना आपण सहज उडवून लावू ' या भ्रमात बहुधा राहिल्याने त्याचा घात झाला. बाजीरावाला अमृतरावाच्या मनातील भाव कधीच ओळखता आला नाही. त्याला फक्त आपल्या प्राणप्रिय पेशवाईची काळजी असल्याने त्याच्या व पेशवेपदाच्या मध्ये जो कोणी येई त्यास तो वैरी मानी. अर्थात यांमुळे राज्याचे अतोनात नुकसान झाले. कारण या तिघांमध्ये --- म्हणजे नाना, अमृतराव व बाजीराव यांच्यात --- एक अमृतराव अपवाद केल्यास राज्याची पर्वा फारशी कोणाला असल्याचे दिसून येत नाही. नानापासून आपला बचाव करण्यासाठी बाजीरावाने दौलतरावास पुण्यात ठेवून घेतले. त्यामुळे पुण्यास त्याच्या लष्कराचा तर दरबारास त्याचा उपद्रव होऊ लागला. नाना तर शिंद्यांना दक्षिणेतून हाकलण्यासाठी निजामाच्या गळ्यात गळे घालू लागला होता. अशा परिस्थितीत स्वबळावर राज्य सांभाळू पाहणाऱ्या अमृतरावाची अयशस्वी झालेली धडपड प्रशंनीयच मानली पाहिजे.
नानाच्या शिंदेविरुद्ध कारवाया :- मल्हारराव होळकरास दौलातराव शिंद्याच्या विरोधात फूस लावतानाच नानाने निजामाकडेही आपले संधान बांधून ठेवले होते. प्रसंग पडला तर निजामाची फौज मदतीस घेऊन तिच्या बळावर दौलतरावास पुण्यातून बाहेर काढण्याचा त्याचा विचार होता. लष्कराच्या तयारीकरता नानाने निजामाला बऱ्यापैकी सांपत्तिक रसदही पुरवली. नानाच्या या हालचाली आता गुप्त राहिल्या नव्हत्या. नानाच्या राजकारणाचे रंग बाजीराव - दौलतरावने चांगलेच पाहिले होते. त्यांनी नानावर या निमित्ताने कारवाई करण्याचा विचार चालवला.
याच सुमारास महादजीच्या स्त्रियांचा व दौलतरावाचा बेबनाव होऊन त्यांच्यात सडकून वाकडे आले. दौलतराव हा महादजीच्या भावाचा --- पानिपत प्रसिद्ध तुकोजी शिंदेचा नातू. पोटी पुत्रसंतान नसल्याने त्याचा दौलतरावास पुढे - मागे दत्तक घेण्याचा विचार असल्याने त्याने दौलतरावास भावी वारसाच्या दृष्टीने वाढवले होते पण, असे असले तरी पुत्रप्राप्तीच्या आशेने प्रयत्न करणे महादजीने सोडले नव्हते. यातूनच त्याने मृत्यूपूर्वी एक - दोन वर्षे आधी त्याने स्वतःचे लग्नही उरकून घेतले. परंतु मृत्यूने त्याची पुत्रप्राप्तीची धडपड थांबवली. अर्थात, मरणापूर्वी त्याने दौलतरावास रीतसर दत्तक घेतले नव्हते ; परंतु इतर कोणी वारस नसल्याने व महादजीच्या परिवाराचा आपण योग्य तो परामर्श घेऊ असा दौलतरावाने शब्द दिल्याने त्यालाच वारस म्हणून महादजीच्या स्त्रियांनी मान्यता दिली. परंतु विलासी वृत्तीच्या दौलतरावाने तारुण्याचा व वासनेच्या भरात जवळच्या नात्यातील एका स्त्री सोबत संबंध प्रस्थापित केले. खासगीतील हा गुप्त प्रकार आरंभी कोणालाच समजला नाही. परंतु जेव्हा तो शिंद्यांच्या परिवारात सर्वांना समजला तेव्हा महादजीच्या स्त्रियांनी अशा दुर्वर्तनी दौलतरावास दौलतीवरून बेदखल करून त्याच्याऐवजी दुसरा इसम दत्तक घेण्यासाठी पेशव्याची परवानगी घेण्याचा बेत आखला.
महादजीच्या स्त्रियांच्या विषयी शिंदेशाही लष्करांत आदरयुक्त धाकचे वजन होते. महादजीच्या कित्येक सरदारांचा --- विशेषतः शेणवी गटाचा त्यांना पाठिंबा होता. हि गोष्ट लक्षात घेऊन नाना व अमृतराव त्यांना दौलतरावाच्या विरोधात चिथावणी देऊ लागले. त्यांच्या पाठबळावर महादजीच्या स्त्रिया दौलतरावच्या विरोधात उभ्या ठाकणार अशा बातम्या दौलतरावास कळल्या तेव्हा याउपर नानाची उपेक्षा केल्यास आपल्याला सरदारीस मुकावे लागेल याची त्यांस कल्पना येउन चुकली. एकतर नानाचा पक्ष घेणे वा त्यांस कैद करणे हेच दोन पर्याय त्याच्यासमोर होते. याबद्दल तो निश्चित काही धोरण आखणार तोच त्याच्या सैन्यात बेदिली माजू लागली. फौजेच्या खर्चासाठी दौलतरावाने जो काही पैसा आजवर बाजीराव - नानाकडून उकळला होता तो त्याने सर्वच्यासर्व लष्कराच्या देण्यासाठी वापरला नव्हता. परिणामी पगारासाठी फौज अनावर होऊ लागली. आपल्यासमोरील कोंडी फोडण्यासाठी दौलतरावाने बाजीरावास कोड्यात टाकले. ' ठरल्याप्रमाणे आम्हांला तुम्ही दोन कोटी रुपये द्या. अन्यथा नानाच्या ताब्यात तुम्हांला देऊन आम्ही हिंदुस्थानात जातो. ' अशा आशयाचा निरोप शिंद्याने पेशव्याला पाठवला. यांमुळे बाजीराव अडचणीत सापडला. शिंदयाची मागणी पूर्ण करण्याची ताकद पेशव्याच्या खासगी तसेच सरकारी खजिन्यात नव्हती.
नाना फडणीस कैदेत :- नानाचे महाड कारस्थान सिद्धीस जाऊ बाजीराव पेशवा बनला तेव्हाच सरकारी खजिना जवळपास रिता असल्याचे त्यास समजले. तेव्हा द्रव्यप्राप्तीसाठी त्याने पुणे शहरात (१) कर्जपट्टी (२) सरंजामपट्टी (३) वेतनपट्टी (४) सावकारपट्टी (५) उंबरेपट्टी (६) भाडेपट्टी (७) संतोषपट्टी हे नवीन ७ कर लागू केले. बाजीरावाचे डोकं इतकं सुपीक कि पहिल्या सहा पट्ट्या जर कोणी चुकवल्या तरी सातवी त्यांस चुकवता येऊ नये ! काय होती हि संतोषपट्टी ? तर बाजीराव पेशवा बनल्याबद्दल प्रत्येकास आनंद झाला त्याबद्दलचा हा कर ! पण यातून वसूल ते काय होणार ? जे झाले त्यातून पेशव्याचा खर्च, दक्षिणा समारंभ इ. गोष्टी उरकण्यात येऊ लागल्या. बाळोबातात्याच्या कटात सहभागी होऊन परशुरामभाऊ पटवर्धनाने चिमणाजीस पेशवा केले, या गुन्ह्याबद्दल बाजीरावाने सखाराम घाटग्यामार्फत पटवर्धनांच्या मालमत्तेच्या जप्तीचा उपक्रम चालवला. त्यातून काही आर्थिक फायदा करून घेण्याचा बाजीरावाचा मानस होता. मिळून हवं ते ओरबडून घेण्याच्या वृत्तीस / नीतीस अनुसरून बाजीरावाचा कारभार सुरु झाला होता. अशा कारभारातून त्यांस आर्थिक फायदा तो काय होणार हे दिसतच होते ! अशा परिस्थितीत दौलतरावाची मागणी मान्य करण्यास त्याने असमर्थता व्यक्त केली. पेशव्याने हात वर केल्याने दौलतरावासमोर आता कसलाच पर्याय उरला नाही. बलवान नानाच्या तंत्राने कायम राहण्यापेक्षा दुबळ्या बाजीरावास हाताशी धरून नानाला ठिकाणी बसवण्यातच आपला निभाव असल्याचे त्याने ताडले व त्या दृष्टीने तो आपले डाव रचू लागला.
त्यानुसार एकीकडे फौजेचा खर्च देण्यासाठी ताबडतोब कबूल केल्याप्रमाणे रकमेचा भरणा करा नाहीतर मला दुसरा विचार करावा लागेल अशी टोचणी दौलतराव पेशव्यास लावू लागला व दुसरीकडे घाटग्यामार्फत नाना व त्याच्या पक्षातील मंडळींना कैद करून त्यांचे द्रव्य सरकारांत घेण्याची आज्ञा पेशव्याकडून मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. आरंभी बाजीराव कोणत्याच गोष्टीला अनुकूल होईना पण शिंदे निकरावर आल्याने त्याने घाटग्याच्या मागणीला मंजुरी दिली. यामागे त्याचे संधीसाधू वा ' आली वेळ मारून नेण्याचे ' राजकारण कारणीभूत असले तरी नानाचे उपद्व्यापही त्यांस कमी कारणीभूत नाहीत. आधी सांगितल्याप्रमाणे नानाने ज्या काही राजकीय उलाढाली अलीकडे चालवल्या होत्या त्यामुळे त्याच्यावर कोणाचाच विश्वास राहिलेला नव्हता. नानाला पकडण्याचा बाजीरावाचा लेखी हुकूम मिळताच दौलतराव - सखारामची टाळकी नानाला पकडण्याचा डाव रचण्यात खपू लागली.
युद्धप्रसंग करून नानाला ताब्यात घेणे तितकेसं सोपं नव्हतं. लढाईत गर्दीचा फायदा घेऊन नाना निसटून गेला व त्याला निजाम, भोसले वा इंग्रजांनी आश्रय दिला तर प्रकरण जड जाईल याची त्यांना कल्पना होती. तेव्हा विश्वासघाताने त्यांस पकडण्याचे निश्चित करण्यात आले व त्याकामी शिंद्यांचा एक युरोपियन अंमलदार Michale Philose उर्फ मुकीर साहेबाची मदत घेण्यात आली. युरोपियन लोकांच्या वचनावर नानाचा विश्वास असल्याचे सर्वांना माहिती होते. त्याच्या याच विश्वासाचा फायदा उचलण्याचे शिंदे - घाटगे जोडीने ठरवले. त्यानुसार दि. ३१ डिसेंबर १७९७ रोजी नानाला शिंद्याच्या गोटात भेटीस येण्याचे आमंत्रण पाठवण्यात आले. या भेटीत दगा होणार नाही यासाठी मुकीर साहेब जामीन राहिला व जर शिंद्याने काही वेडंवाकडा प्रकार केला तर ' आपल्या लष्करी तुकडीसह त्याची नोकरी सोडून आपण नानाच्या रक्षणास्तव उभे राहू ' अशी त्याने शपथ घेतली. नानाने अधिक खात्री करून घेण्यासाठी त्याला बायबलवर हात ठेवून शपथक्रिया करण्यास भाग पाडले व मुकीरने देखील त्याचा हा हट्ट पुरवला. तेव्हा कुठे निर्धास्त मनाने नाना शिंद्याच्या गोटात गेला व तिथे जाताच योग्य संधी पाहून मुकीरने नाना आणि त्याच्या साथीदारांना --- आबा शेलूकर, बजाबा शिरोळकर, नारायणराव वैद्य इ. ना कैद केले. दौलतरावाने नानाला पकडताच लगोलग बाजीरावाने बाबा फडके, नारोपंत चक्रदेव, गोविंदराव काळे, गोविंदराव पिंगळे या नानाच्या समर्थकांना शनिवारवाड्यात बोलावून कैदेत टाकले.
( क्रमशः )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा