शनिवार, १४ मार्च, २०१५

इतिहास लेखनाविषयी चार शब्द ....! ( भाग – १ )




    
    इतिहासलेखन म्हणजे एकप्रकारे इतिहासाचे पुनर्लेखन असते. या पुनर्लेखनात नव्याने उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या - संदर्भ साधनांच्या आधारे ऐतिहासिक घटनांचा नव्याने अन्वयार्थ लावण्याची जबाबदारी इतिहासलेखकावर - इतिहासकरावर असते. परंतु दुर्दैवाने कित्येक इतिहासकार या जबाबदारीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दृष्टीस पडते. यांमुळे इतिहासाच्या पुनर्लेखनाचे कार्य अव्याहतपणे सुरु असूनही एकाच पद्धतीचा इतिहास वाचकांच्या समोर मांडला जाऊन त्यांची एक विशिष्ट विचारसरणी बनून जाते. अर्थात, इतिहासकार हे विशिष्ट लोकमत तयार करतात असेही आपण म्हणू शकतो व याची कित्येक उदाहरणे देता येतील. त्याचप्रमाणे प्रस्थापित लोकमताला धक्का देणारे निष्कर्ष योग्य पुराव्यांसह वाचकांसमोर मांडण्याचेही कित्येक इतिहासकार टाळतात. यांपैकी कोणतीही पद्धती इतिहासलेखनाच्या दृष्टीने योग्य असूनही इतिहासशास्त्राच्या दृष्टीने अयोग्यच आहे.
  

    आपल्याकडे इतिहासलेखनाची अगदी प्राचीन परंपरा आहे. विविध दरबारी पंडितांनी आपापल्या राजाच्या स्तुतीपर रचलेली काव्यं, बखरी हे याचं उत्तम उदाहरण आहे. प्रतीक आहे. त्यावेळी शास्त्रशुद्ध लेखनाची --- इतिहासलेखन शास्त्राची माहिती नसल्याने, तोंडओळख नसल्याने जो आश्रय देतो, उदरनिर्वाहाची सोय करतो त्याचं गुणगान करणं स्वाभाविकच म्हटलं पाहिजे. त्यामुळे या पद्धतीच्या लेखन परंपरेची वृद्धी होत जाऊन हिंदुस्थानावरील ब्रिटीश अंमलात तिचा ऱ्हास झाला. इंग्रजांच्या निकट सहवासाने आपल्याला इतिहासशास्त्राची खऱ्या अर्थाने ओळख झाली खरी परंतु, पूर्वीची जी पद्धती होती ती काही आपल्यातून लुप्त झाली नाही. यांमुळे आधुनिक इतिहासलेखनावर देखील एकांगी, विशिष्ट उद्दिष्ट / हेतू नजरेसमोर ठेवून केलेल्या लेखनाची छाप राहिली. अर्थात हे विधान सरसकट सर्वच इतिहासकारांच्या इतिहासलेखनास लागू नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी. 


    जेव्हा शास्त्र म्हणून तुम्ही इतिहासाकडे पाहता त्यावेळी इतिहासलेखनात तुमच्याकडून काही विशिष्ट अपेक्षाही बाळगल्या जातात. त्यांपैकी एक महत्त्वाची अपेक्षा / आशा म्हणजे जे पुरावे तुमच्यासमोर येतात त्यांचा योग्य तो अन्वयार्थ लावून घटनांची मांडणी वा विश्लेषण करून वाचकांच्या समोर मांडणे. परंतु, आपल्यात इतिहासाकडे शास्त्र म्हणून पाहताना बव्हंशीवेळा या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलंय. हि वस्तुस्थिती असली तरी तिला शोकांतिका म्हणायचे कि नाही हा ज्याच्या त्याच्या विवेकबुद्धीचा प्रश्न आहे. 


    विज्ञान वा गणितात ज्याप्रमाणे प्रयोगाने प्रमेय वा सिद्धांत मांडण्याची, तपासून घेण्याची सोय आहे तशी इतिहासात नाही असे म्हटले जाते. परंतु, मग न्यायशास्त्र अथवा राज्यशास्त्राचे काय ? तिथे हि अडचण का उद्भवत नाही ? माझ्या मते, न्याय, राज्यशास्त्रात ज्याप्रमाणे व्यक्तिगत विकार बाजूला ठेवून, पूर्वग्रह बाजूला सारून लेखन केलं जाते, प्रमेय – सिद्धांतांची मांडणी केली जाते त्याप्रमाणे इतिहासलेखनात होत नाही. यामागील कारणपरंपरा काय असावी ? 


    सामान्यतः गणित वा विज्ञानातील सिद्धांतांशी लोकांचे भावनिक संबंध जुळलेले नसतात. या शास्त्रांशी त्यांचा व्यावहारिक संबंध येत असल्याने यांत भावनातिरेक वा भावनांवर आधारित लेखनास, सिद्धांतास स्थान नसते. त्याउलट सामाजिकशास्त्रांचे आहे. सामाजिकशास्त्रे थेट लोकजीवनालाच स्पर्शिली जात असल्याने त्यामध्ये व्यक्तीची भावनिक गुंतागुंत असणे स्वाभाविक आहे. परंतु या भावनिकतेची तीव्रता कितपत असावी ?    


    राज्यशास्त्राच्या मर्यादेत एखादी संकल्पना मांडताना लोकभावनेचा फारसा विचार केला जात नाही तितका न्यायशास्त्रात करावा लागतो. कारण, न्याय वा कायदेशास्त्र हे थेट मनुष्यजीवनाचे नियमन करत असल्याने त्यांस अनन्यसाधारण असे महत्त्व असणे स्वाभाविक आहे. परंतु, आपल्याकडे या बाबतीतील चित्र थोडसं वेगळं असल्याचे माझे मत आहे. आपण न्यायविषयक संकल्पनांच्या बाबतीत असंवेदनशील असून इतिहासातील संकल्पनांविषयी अधिक संवेदनशील आहोत. 


    ज्या शास्त्राचा आपल्या दैनंदिन व भविष्यकालीन जीवनाशी निकटचा संबंध आहे त्याच्याविषयीची उदासीनता व ज्या शास्त्रात केवळ गतकाळातील घटनांचा उल्लेख आहे त्याविषयीची कमालीची आत्मीयता हा आपल्या वर्तणुकीतला विरोधाभास तर नाही ना ? माझ्या मते आपण वर्तमानात जगतो, भविष्यातील स्वप्नं पाहतो आणि भूतकाळात रमतो. यांतील वर्तमान अपवाद केला तर भूत व भविष्यातच आपण अधिक रमणारे आहोत. समाजाच्या या विचारसरणीचा --- स्वभावाचा परिणाम स्वाभाविकच इतिहासकारावरही होतो. कारण, तो देखील या समाजाचा सदस्यच असतो. अर्थात, समाजाच्या विचारांचे त्याच्यावर बंधन नसले तरी प्रभाव मात्र असतो. अर्थात याची व्याप्ती कितपत असते वा असावी हाच खरा प्रश्न आहे. मुद्दा आहे.


    या संदर्भात आपण पेशवाईच्या इतिहासाचे उदाहरण घेऊ. अर्थात, प्रस्तुत लेखक याच इतिहासकालखंडाचा अभ्यासक असल्याने विषय स्पष्टीकरणासाठी याच कालखंडाचा उपयोग करणे आम्हांस सोईचे वाटते. असो, पेशवाईच्या इतिहासाला जरी बाळाजी विश्वनाथ भटापासून आरंभ होत असला तरी त्याचा ( पेशवाईच्या कालखंडासंदर्भात ) खरा जनक थोरला बाजीरावच मानला जातो आणि या वैभवशाली कालखंडाचा शेवट सवाई माधवरावाच्या निधनासोबत होतो अशी सामान्यतः एक समजूत आहे. या समजुतीशी या ठिकाणी आपणांस काही देणं – घेणं नाही. आपल्याला फक्त हेच बघायचं आहे कि, नव्याने मिळत जाणाऱ्या संदर्भ साधनांचा योग्य तो उपयोग करून घेण्यात आपले इतिहासकार कुठे व कसे कमी पडतात. 


    पेशवाईच्या इतिहासाविषयी आपल्या इतिहासकारांत आणि वाचकवर्गात अनेक भेद आहेत. त्यातील एक गट मराठा छत्रपतीचे प्रतिनिधित्व करतो तर दुसरा ब्राम्हणी पेशवाईचे. तिसरा या उभयतांचा हिंदुत्व रक्षणास्तव लढणारे वीर म्हणून गौरव करतो तर चौथा या दोन जातीं व्यतिरिक्त बहुजन समाजातील म्हणजे ब्राम्हण – मराठेतर जातीतील लोकांच्या पराक्रमगाथांचा गौरव करण्यात धन्यता मानतो. वाचकांना हि वर्गवारी जातीय स्वरुपाची वाटेल परंतु वस्तुस्थितीच तशी असल्याने आम्हांस हि मांडणी करावी लागत आहे याची कृपया नोंद घ्यावी. उपरोक्त गटांशिवाय जाती – धर्मापलीकडे पाहणारा आणि ऐतिहासिक पुरुषांच्या भव्य दिव्य पराक्रमांनी भारावलेलाही एक वर्ग आहे. ज्यांना आपापला प्रिय इतिहास नायक हा त्याच्या समकालीनांपेक्षाही थोर वाटतो.

सारांश, आपले इतिहासलेखन इतके विशिष्ट आणि विविध वर्गांत विभागले गेले आहे कि, त्यातून वाचकांना खऱ्या इतिहासाची तोंडओळख फार क्वचित होते.  


    आधी नमूद केल्याप्रमाणे आपल्याकडे ज्याप्रमाणे काव्यं, बखरी इ. साहित्यप्रकारातून तत्कालीन घटनांची नोंद केली जायची त्याचप्रमाणे मध्ययुगीन कालखंडातील आढळणारी तत्कलीन पत्रे, दरबारी नोंदी, रोजनिशा, शकावल्या यांचाही इतिहास लेखनात अंतर्भाव होतो. मध्ययुगीन कालखंडातील पत्रांमधून तत्कालीन राजकीय घटनांचे स्वरूप जसे कळून येते तसे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक स्वरूप अजूनही परिपूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. याशिवाय तत्कालीन कालखंडात होऊन गेलेल्या संतमंडळींच्या अभंग – श्लोकांमधूनही त्यावेळची सामाजिक परिस्थिती सुस्पष्ट होत नाही किंवा आम्हांला ती समजावून घेता आली नाही. 


    अशा स्थितीत जो काही आपल्यापुढे पूर्णतः राजकीय स्वरूपाचा इतिहास आहे त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे ? मध्ययुगीन कालखंडातील आर्थिक परिस्थिती --- ज्यात समाजातील खरेदी – विक्रीचे व्यवहार कोणत्या पद्धतीने प्रामुख्याने होते असत ? रोख पैशांच्या स्वरूपात व्यवहार होत असेल तर समाजातील प्रत्येक घटकाकडे कोणकोणत्या स्वरूपाचे चलन उपलब्ध असायचे ? सर्वत्र चाललेल्या युद्धांमुळे समाजजीवनाच्या आर्थिक अंगावर कसे परिणाम होत ? त्यातून काही नव्या आर्थिक व सामाजिक परंपरा निर्माण झाल्या अथवा जुन्या परंपरांचा लोप झाला कि त्यांची उत्क्रांती झाली ? इ. ; सामाजिक परिस्थिती --- हिंदुस्थानातील समाजजीवन हे विविध जातींत विभागलेलं आहे. या जातींच्या आपापसांतील संबंधांचे चित्र नेमके कसे होते ? खान – पान तसेच पेहराव, विविध चालीरीती या कशा होत्या ? जातींचे जे काळेकुट्ट चित्र आज रंगवलं जातंय ते खरोखर तितकं गडद काळं होतं का ? विविध जातींची व जाती नियमांची निर्मिती आणि लोप कसा झाला ? स्त्रियांचे समाजातील स्थान व त्याचे नेमके स्वरूप कसे होते आणि त्यांचे अधिकार काय होते ? इ. गोष्टी पुरेशा स्पष्ट झाल्या आहेत का ? ; सांस्कृतिक इतिहास --- ज्यात या देशातील मूळ धर्मीयांची संस्कृती व त्यानंतर बाहेरून आलेल्या व इथेच स्थायिक झालेल्यांच्या सांस्कृतिक मिलनानंतरचे स्वरूप, संक्रमण काळातील सामाजिक जीवनावर झालेले दृश्य – अदृश्य परिणाम इ. ची पुरेशी चर्चा अद्याप झाली आहे का ? मला नाही वाटत याचं उत्तर कोणताही इतिहास अभ्यासक होकारार्थी देईल म्हणून. मग अशा सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक इतिहासाच्या अभावी निव्वळ राजकीय स्वरुपाचं झालेलं इतिहास लेखन म्हणजेच परिपूर्ण इतिहास लेखन आहे का ? 


    सर्व उणीवा जमेस धरून, मान्य करून आहे त्या स्वरूपातील राजकीय इतिहासाकडे पाहिलं तर काय चित्र दिसते ? आधीच्या कलमांत म्हटल्याप्रमाणे आता प्रत्येक गटाचा, समुदायाचा, जातीचा स्वतंत्र इतिहास बनला आहे. अर्थात, जातीनिर्मितीचा इतिहास असता तर एक वेळ चालण्यासारखे होते पण, ‘ आमच्या जातीत हे हे नररत्न / स्त्रीरत्न जन्माला आले ‘ अशा आशयाची इतिहासलेखनं हल्ली जोर धरत आहेत. आता याचा अर्थ असा होत नाही कि, यापूर्वी असे लेखन झालेच नाही. कोणतीही गोष्ट वा घटना अकस्मातपणे घडून येत नाही. त्याची बीजं नजीकच्याच काळात रुजलेली असतात. मुद्दाम पेरलेलीही असतात. जातवार लिहिल्या जाणाऱ्या इतिहासलेखनामागेही तिच पार्श्वभूमी आहे. याचं आपल्या परिचयाचं सर्वसाधारण उदाहरण म्हणजे शिवाजी आणि त्याचे गुरु – दादोजी, रामदास, तुकाराम कि जिजाबाई ?   


    उपरोक्त उदाहरण विशिष्ट समुदाय, गट वा जातीवर आधारित इतिहासलेखनाचे एक आदर्श उदाहरण आहे. आता विशिष्ट व्यक्तीविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेमुळे इतिहासलेखनावर कसा परिणाम होत जातो याचे काही नमुने थोडक्यात पाहू.


    रियासतकार सरदेसायांनी सर्वप्रथम मराठी सत्तेचा अव्वल ते अखेर समग्र इतिहास लिहिला. कालौघात त्यांच्या मराठी रियासती कित्येक प्रकरणी निरुपयोगी वाटत असल्या तरी मार्गदर्शक जरूर आहेत. या रियासतींच्या अखेरच्या भागात सरदेसायांनी नाना – महादजी या दुकलीपैकी नानाच्या तुलनेने महादजी श्रेष्ठ असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप य. न. केळकरांनी केला होता. यासंदर्भातील रियासतींची त्यांनी तसेच दत्तोपंत आपटेंनी  केलेली समीक्षा केलेली समीक्षा वाचनीय आहे.




    नाना फडणीसचा विषय निघालाच आहे तर एका प्रख्यात इतिहास संशोधकाने नानाच्या रक्षांच्या नावांची नोंद असलेला अस्सल दस्तऐवज खाऊन कसा फस्त केला याचे वर्णन आचार्य अत्र्यांनी आपल्या आत्मचरित्रात केलेलं आहे. वास्तविक नानाच्या अंगवस्त्रांची यादी प्रसिद्ध झाली असती तर त्याच्या राजकीय कारकीर्दीवर वा बुद्धीमत्तेवर कसलाही ठपका ठेवला जाणार नव्हता कि दोषारोप केले जाणार नव्हते. ती एक त्यावेळची सर्वमान्य प्रथा होती. परंतु, त्या सत्यवचनी, प्रामाणिक इतिहाससंशोधकास इतका विवेक थोडी होता ? विचारांचे खाद्य बुद्धीला लागते अशा आशयाच्या उक्तीला स्मरून त्याने त्या दुर्मिळ कागदास जठराग्नीत झोकून एका संदर्भाचे तर दहन केलेच पण यांमुळे समस्त इतिहाससंशोधक जमातीच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे घोर पातकही केले !


    इतिहासकारांच्या आवडी- निवडीतला आणखी एक भाग म्हणजे दुसरा बाजीराव ! काही वर्षांमागे संभाजी हा व्यसनी, दुर्वर्तनी, राज्य चालवण्यास नालायक इसम असल्याचा समज होता. काही इतिहास संशोधकांच्या व इतिहासकारांच्या अथक प्रयत्नांनी संभाजीचा विकृत इतिहास बाजूला पडून काही प्रमाणात स्वच्छ आणि खरा इतिहास उजेडात आला. जे संभाजीच्या बाबतीत झालं तेच दुसऱ्या बाजीरावाच्याही संदर्भात घडून आलं. बाजीराव पेशवाईवर येण्यापूर्वीच कितीतरी आधी पेशवाई आणि समस्त मराठी सत्ता ऱ्हासाकडे, अवनतीकडे वाटचाल करत होती. परंतु, अपयशाचे –-- पापाचे खापर फोडण्यासाठी बाजीरावाइतका भरगच्च बळीचा बकरा कुठे भेटणार ? मग बाजीराव कसा लंपट होता, नालायक होता याची रसभरीत वर्णने रचण्यात आली. त्याने केलेल्या – न केलेल्या लीलांचे किस्से रंगवण्यात येऊ लागले. आता दुसरा बाजीराव हा काही सद्गुणांचा पुतळा नसला तरी त्याच्या अंगी जे दुर्गुण चिटकवण्यात आले त्यापासून अलिप्त असं त्यावेळी कोणी होतं का ? परंतु इतका विचार करण्यात आला नाही. बाजीरावाच्या विकृतीकरणाची लाट जशी ओसल्री तशी त्याच्या ‘ तथकथित उदात्तीकरणाची ‘ लाट आली. ज्या हिरीरीने प्रथम बाजीराव विरोधकांनी आरोप केले त्याच उत्साहाने त्यांचे निवारण करून नवीन तर्काची – सिद्धांतांची मांडणी करण्यात आली. त्यांपैकी महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे बाजीरावाने जेव्हा इंग्रजांशी स. १८१८ मध्ये तह करून पेशवेपद आणि राज्यावरील आपला अधिकार सोडला त्यापूर्वीच छत्रपतींनी त्यांस बडतर्फ केलेलं असल्याने राज्यनाशास बाजीराव जबाबदार नाही. उलट इंग्रजांपासून राज्याचं रक्षण करण्यासाठी, स्वातंत्र्य रक्षणासाठी तो झगडत असताना त्याच्या मालकाने --- छत्रपतीने इंग्रजांशी हातमिळवणी करून पेशव्याला बडतर्फ केल्याने त्याचा पर्याय खुंटला व राज्यनाश झाला. अर्थात पापाचे धनी छत्रपती !   


    या सिद्धांताची मांडणी व समर्थन वि. ल. भाव्यांनी केलं. सिद्धांत योग्य. पण पाया भरपूर कच्चा. बाजीरावाचे पक्षपाती बनल्याने भाव्यांना तत्कालीन स्थितीचे पुरेसे भानही राहिले नाही. दुसरा बाजीराव हा पेशवा असून छत्रपती प्रतापसिंह त्याचा धनी होता. थोरल्या शाहूच्या पश्चात छत्रपतीला न विचारता पेशव्यांनी आजवर राजकारणं केली त्याच धर्तीवर बाजीरावाने वसईचा तह केला. पण तो छत्रपतीला बंधनकारक नव्हता. त्यानंतर स. १८१८ मध्ये बाजीरावाने शरणागती पत्करण्यापूर्वीच छत्रपतीने त्यांस नोकरीतून बडतर्फ केल्याने बाजीरावाच्या शरणागतीने मराठी राज्याची इतिश्री झाल्याचा दावा कोसळून पडत असला तरी मराठी राज्याचे स्वातंत्र्य नेमके कधी लोपले याची चर्चा भाव्यांनी केलीच नाही. हा त्यांच्या आत्यंतिक बाजीराव प्रेमाचा अप्रत्यक्ष पुरावाच आहे. अन्यथा, पेशव्याच्या इंग्रज विरोधी कारवायांना छत्रपतीने पाठिंबा न दिल्याबद्दल व पेशव्यास बडतर्फ केल्याबद्दल त्यांनी प्रतापसिंहास ठपका दिला नसता. असो, एक विधान – सिद्धांत खोडून काढताना त्यांनी दुसरा सिद्धांत मांडला परंतु मराठी सत्तेचा नाश नेमका कधी झाला वा मराठी सत्तेचे स्वातंत्र्य नेमके कधी लुप्त झाले याची चर्चा त्यांनी न करताच बाजीरावाची बडतर्फी आणि शरणागती म्हणजेच मराठी सत्तेच्या स्वातंत्र्यलोप अशी विचित्र मांडणी करून टाकली. आता यातून वाचकांनी काय बोध घ्यायचा ? वस्तुस्थिती अशी आहे की, सातारच्या प्रतापसिंहाशी इंग्रजांनी जो काही तह केला तोच मुळी स. १८१९ मध्ये ! म्हणजेच बाजीरावची शरणागती वा स. १८१८ मध्ये मराठी राज्याचे स्वातंत्र्य लोपले या विधानास – सिद्धांतास कसलाही अर्थ – महत्त्व राहात नाही. वास्तविक हे कार्य भाव्यांनीच करायला पाहिजे होते पण बाजीरावावरील अतिरिक्त प्रेमामुळे ते त्यांना शक्य झालं नाही. 
                                
                                            ( क्रमशः )
     

२ टिप्पण्या:

Santosh म्हणाले...

Atyanta chan lekh .....

sanjay kshirsagar म्हणाले...

Santosh जी, धन्यवाद !