शनिवार, १५ ऑगस्ट, २०१५

शिव – पेशवेकालीन राज्यनिष्ठा, राजनिष्ठा व फितुरी : एक चिंतन ( भाग – ३ )




    बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशव्याच्या जवळपास २० - २१ वर्षांच्या कारकिर्दीतील आरंभीची सुमारे दहा वर्षे शाहूच्या हाताखाली आणि नंतरची त्याने स्वतंत्र सत्ताधीशाप्रमाणे उपभोगली. याच पेशव्याच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात मराठी राज्याचे पेशवाईत रुपांतर होत गेले. पुढे थोरल्या माधवरावाने समस्त मराठी राज्य पेशवाईच्या छत्राखाली आणले.

    नानासाहेबाने पेशवेपद हाती घेताच बापाच्या अपुऱ्या इच्छा पूर्ण करण्यास आरंभ केला. त्यानुसार त्याने माळव्याच्या सनदा मिळवण्याचा उद्योग हाती घेतला. चिमाजी आपा व सरदारांच्या प्रयत्नांनी स. १७४३ च्या उत्तरार्धात नानासाहेबास माळव्याची नायब सुभेदारी प्राप्त झाली. या सुभेदारीपाठोपाठ बादशाही चाकरीची जबाबदारीही त्याच्या गळ्यात पडून त्याचा व रघुजीचा झगडा जुंपण्याची चिन्हं दिसू लागली.

    नानासाहेब माळव्याच्या सुभेदारीसाठी प्रयत्नशील असताना याच काळात रघुजी भोसले बंगाल मोहिमेत गुंतला होता. बंगालचा नवाब अलीवर्दीखान भोसल्याच्या स्वाऱ्यांनी हैराण झाला व त्याने बादशाहकडे तसेच परस्पर पेशव्याकडे मदतीची याचना केली. मोगल बादशाहाने माळव्याच्या सुभेदारी बदल्यात पेशव्याला माळवा व्यतिरिक्त इतर प्रांतांत मराठी फौजा शिरल्यास त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सोपवल्याने पेशव्याला बंगालमध्ये जाऊन रघुजीला पायबंद घालणे आवश्यक होते. त्यानुसार बुंदेलखंडातून त्याने आपला मोर्चा बंगालकडे वळवला. वस्तुतः राज्यविस्ताराचे पेशव्यांचे कधीच आगाऊ निश्चित असं धोरण आखलेलं नसल्याने जसा त्यांचा राज्यविस्तार झपाट्याने झाला तसाच संकोचही !

    बाजीरावाच्या काळात मराठी सैन्याची घोडदौड माळवा – बुंदेलखंडी पोहोचली खरी परंतु त्यानंतर त्यांचे पाऊल पुढे पडले नाही. सरंजाम विस्तार अर्थात स्वलाभासाठी शिंदे – होळकर आसपासच्या प्रदेशांत --- विशेषतः राजपुतान्यात हात – पाय पसरू लागले. अर्थात बाजीरावाच्या वेळी हे ठीक होते पण नानासाहेब पेशवा बनल्यावर सरदार – पेशव्यांत मतभेद निर्माण झाले. सरदारांचे प्रांत माळव्यात असल्याने त्यांनी शक्यतो आपल्या सरंजामी प्रदेशाला सलग येईल असे प्रदेश कब्जात घेण्याकडे विशेष लक्ष पुरवले तर बुंदेलखंडी बाजीरावास जहागीर मिळाल्याने नानासाहेब पेशव्याने बुंदेलखंडातून पुढे बिहार – बंगालकडे हात – पाय पसरण्यास आरंभ केला व त्यावेळी बिहार – बंगालसारख्या संपन्न प्रदेशात त्याचे पाऊल पडल्यावर अखेरपर्यंत त्याच्या डोक्यात – मनात बंगाल घर करून राहिले ते राहिलेच !

    मोगल बादशाहच्या आज्ञेने व अलीवर्दीखानाच्या विनवणीमुळे नानासाहेब बंगालमध्ये गेला व त्याने रघुजीला तेथून हुसकून लावले. या बातम्या शाहूला मिळताच त्याने उभयतांना साताऱ्यास बोलावून परस्परांच्या कार्यक्षेत्रांत लुडबुड न करण्याची सक्त ताकीद दिली. पेशव्याने ती वरकरणी मानली तर भोसल्याचाही जवळपास तोच भाव होता.

    इकडे नागपूरच्या सत्तेला पायबंद घालण्याचा प्रयत्न करत असताना पेशव्याने खुद्द सातारचेही महत्त्व कमी करण्यास मागे – पुढे पाहिले नाही. नानाला पेशवाई मिळाली त्यानंतर काही दिवसांनी कोल्हापूरचा संभाजी शाहूच्या भेटीला आला. त्यावेळी नानाने संभाजीची भेट घेऊन शाहूच्या पश्चात संभाजीला सातारच्या गादीवर बसवण्याचे मान्य केले. इतिहासकारांच्या मते, पेशवा यात राज्याचे हित बघत होता. दुहीच्या दुष्परिणामांची त्यांस चांगलीच जाणीव होती वगैरे वगैरे. परंतु, ज्याने नानाला पेशवेपद दिले तो शाहू हयात होता ना ? कोल्हापूरच्या संभाजीशी त्याचा कितपत प्रेमभाव होता नव्हता हे नानाला माहिती नव्हते का ? संभाजीचे कर्तुत्व पाहता त्याला पुढे करून छत्रपतींची समस्त सत्ताच हस्तगत करण्याचा त्याचा बेत होता असे का म्हणू नये ? राज्याचे हित कशात आहे व कशात नाही हे राज्य कमावणाऱ्या मालकाऐवजी नोकर ठरवणार असे म्हणणाऱ्या इतिहासकारांच्या अकलेची तारीफ करावी तितकी थोडीच आहे.

    पेशव्याचे आपली सत्ता व राज्यविस्ताराचे प्रयत्न चालू असताना इतर मराठी सरदारही आपापल्या भूप्रदेशांचे --- पर्यायाने मराठी राज्यविस्ताराचे कार्य करीतच होते. पेशव्याशी समझोता केल्यावर अलीवर्दीखानास रगडण्याचे कार्य रघुजीने हाती घेतले. त्याचा सरदार भास्करपंत कोल्हटकर त्या कामी झटत होता. स. १७४४ मध्ये भास्करपंताच्या स्वाऱ्यांनी हैराण झालेल्या अलीवर्दीने भास्करला भेटीस बोलावून त्याचा खून केला. त्यामुळे रघुजीची तात्पुरती पीछेहाट झाली खरी परंतु हातातील उद्योग तसाच चिकाटीने पुढे चालवत स. १७५१ पर्यंत त्याने अलीवर्दीला गुडघ्यावर आणलेच. त्यावेळी भोसल्यांना ओरिसा प्रांत देऊन तसेच बंगाल – बिहारकरता बारा लाख रुपये चौथाई देण्याचे अलीवर्दीखानाने कबूल केले. वऱ्हाडपासून ओरिसापर्यंत पूर्व दिशेने रघुजी भोसल्याने केलेला राज्यविस्तार हा शिंदे – होळकर – पेशवे या त्रिवर्गाच्या तोडीचाच मानला पाहिजे.

    तिकडे गुजरातमध्ये मोगल सरदार, पेशव्याचे हस्तक व बाबूजी नाईक सारख्यांच्या उपद्रवी स्वाऱ्यांना तोंड देत दमाजी गायकवाड दाभाड्यांच्या वतीने आपला निभाव करत होता. त्याचे मुख्य धनी दाभाडे राज्यकारभारात लक्ष घालत नसल्याने स्वतःची काहीतरी सोय लावून घेण्याच्या खटपटीत दमाजी होता. यासाठी त्याने शाहूचा विश्वासू गोविंदराव चिटणीस मार्फत प्रयत्न चालवले होते. दरम्यान स. १७४७ – ४८ मध्ये केव्हातरी निजाम गुजरातवर चालून जाणार असल्याची भूमका उठली. त्यावेळी नुकताच निजाम – पेशव्याचा तह घडून आला होता. या पार्श्वभूमीवर गोविंदराव चिटणीसाने पेशव्यास सल्ला दिला कि, लाख रुपये व चार – पाच परगणे घेऊन पेशव्याने गुजरात राखावी. परंतु पेशव्याने पाच लक्ष रोख व पाच लाख उत्पन्नाच्या परगण्यांची मागणी केली. अर्थात, उमाबाई दाभाडे यांस तयार होणे शक्य नसल्याने हि गोष्ट इथवरचं राहिली. पुढे निजामाची स्वारी तकडे जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर पेशव्याच्या मदतीची आवश्यकता राहिली नाही. परंतु निजामच्या निमित्ताने निम्मी गुजरात ताब्यात घेण्याचा पेशव्याचा बेत मात्र सर्वांच्या लक्षात आला.

    स. १७४० – ४१ मधील रघुजी भोसल्याच्या कर्नाटक स्वारीनंतर त्या प्रांती निजामाने मोठी चढाई करून रघुजीच्या कार्यावर पाणी फिरवले. सबब त्या प्रांती परत एकदा मोहिम काढण्याचा शाहूचा विचार होता. परंतु रघुजी बंगालमध्ये अडकल्याने त्याने मुरारराव घोरपडे, फत्तेसिंग भोसले व बाबूजी नाईक यांना हाताशी धरून तिकडचे राजकारण खेळण्याचा यत्न केला. पैकी, मुरारराव कर्नाटकातील संस्थानिक असल्याने त्याने जितक्यास तितका मैत्रीभाव दर्शविला तर फत्तेसिंग हा विशेष कर्तुत्ववान नसल्याने त्याच्याकडून फार काही झाले नाही. राहता राहिला बाबूजी नाईक. हा सावकार असून पेशव्याचा नातलगही होता. परंतु नेहमी पेशवाविरोधी गटात असल्याने पेशव्याचे त्याचे फारसे सख्यही नव्हते. बाबुजीने भोसल्यासोबत कर्नाटक प्रांती मोहीमेत सहभाग घेतल्याने त्याने कर्नाटकची मोहीम स्वतःकडे मागून घेतली. रघुजी भोसले बाबुजीचा पक्षपाती असल्याने, शाहूची राणी सकवारबाईने बाबूजी नायकास कर्ज दिल्याने व शाहूची दुसरी पत्नी सगुणाबाई रघुजी भोसल्याची नातलग असल्यानेअखेर कर्नाटक बाबूजी नायकास मिळाले परंतु, पेशव्याला तो प्रांत हवा असल्याने त्याने निजाम प्रभूतींना अंतस्थ उत्तेजन देऊन बाबुजीचा कर्नाटकांत बिलकुल जम बसू दिला नाही. बाबुजीची कर्नाटक स्वारी अपयशी ठरून, कर्जबाजारी  होऊन तो परत साताऱ्यास आला. पेशव्याच्या या कारवाया शाहूपासून लपून राहिल्या असे नाही. ( स. १७४५ – ४६ )

    स. १७४६ अखेर शाहूची शारीरिक व मानसिक स्थिती खालावत चालली. वाढते वय, आजारपण व प्रिय व्यक्तींचे वियोग यांमुळे राज्याच्या पुढील व्यवस्थेसंबंधी त्याने गंभीरपणे विचार करण्यास सुरवात केली. दाभाडे – गायकवाडांचा गुजरातमधील पराक्रम, भोसल्याची बंगालपर्यंतची भरारी व पेशव्याची माळवा – बुंदेलखंडापर्यंतची झेप लक्षात घेता आपल्या पाठी जो गादीवर येईल त्यांस या तिघांवर दाब ठेवून वा तिघांपैकी एकाच्या तंत्राने राहूनच कारभार उरकावा लागेल हे त्याला स्पष्टपणे दिसत होते. दाभाडे – भोसल्यांपेक्षा पेशव्याचे आक्रमण व सत्तालालसा त्यांस स्पष्टपणे दिसून येत असल्याने स. १७४६ अखेर वा स. १७४७ आरंभी नानासाहेबास पदावरून बडतर्फ केलं. जवळपास दोन – तीन महिने नानासाहेबाने पदाशिवाय काढले खरे परंतु, नानासाहेबा ऐवजी हा व्याप हाती घेण्यास इतर कोणी पुढे न सरसावल्याने शाहूने फिरून त्यांस पेशवेपद दिली. अर्थात, बडतर्फीच्या काळात नानाही गप्प बसला नव्हता. गोविंदरावामार्फात शाहूची मर्जी प्रसन्न करून घेण्याचे त्याने भरपूर प्रयत्न केले व शेवटी निर्वाणीचा इशारा देऊन एकप्रकारे छत्रपतीलाही दहशत घातली. या सर्वांचा परिणाम म्हणजे नानाची परत एकदा पेशवेपदी स्थापना झाली.

    फिरून पेशवेपद बहाल झाल्यावर नानाने आपल्या महत्वकांक्षांना थोडा लगाम घालून पुढील व्यवस्थेसाठी राजकीय --- विशेषतः सातार दरबारच्या कट – कारस्थानांत सक्रीय सहभाग घेतला. सर्व साधक – बाधक विचार करून शाहूने विठोजी वा शरीफजीच्या वंशातील एखाद्या मुलास दत्तक घेऊन त्यांस आपला वारस म्हणून नेमण्याचे निश्चित केले. परंतु आपल्या या निर्णयास सरदारांची मंजुरी अत्यावश्यक असल्याने त्याने हा प्रस्ताव सर्वांसमोर मांडला. त्याचप्रमाणे चुलती ताराबाई व पत्नी सकवारबाई सोबतही यासंबंधी सल्लामसलत केली. पैकी सरदार मंडळ शाहूला अनुकूल होते. या काळात शाहूचा प्रमुख सल्लागार गोविंदराव चिटणीस असून पेशव्याने त्याच्याशी गोडीगुलाबीचे वर्तन ठेवून त्यांस आपल्या पक्षास अंशतः वळवून घेतले होते. दरबारातील दुसरा बलिष्ठ सरदार रघुजी भोसले असून जरी त्यांस पेशव्याचे वाढते प्रस्थ, वर्चस्व सहन होत नसले तरी त्याच्या कार्यक्षेत्रांत बिलकुल हस्तक्षेप न करण्याचे पेशव्याने मान्य केल्याने सातारच्या भानगडींपासून रघुजी अलिप्त राहिला. राहता राहिला दाभाडे व त्याचा मुख्य सरदार गायकवाड. तर दाभाड्याचे यावेळी केवळ नाव उरले असून सर्व सहकारी शक्ती गायकवाडाकडे होती. परंतु गुजरात सोडून भौगोलिकदृष्ट्या लांब असलेल्या सातारमध्ये आपले वर्चस्व वाढवण्याची त्यांस फारशी हौस नव्हती. एकूण वातावरण पेशव्याला सर्वथा अनुकूल असले तरी नव्याने काही पेचप्रसंग उद्भवल्यास हेच सरदार आपल्या विरोधात उभं राहण्यास चुकणार नाहीत याची त्यांस जाणीव होती. त्यामुळे शक्य तितकी फौज पुण्या – साताऱ्याच्या आसपास गोळा करून त्याने लष्करीदृष्ट्या आपली बळकटी चालवली.

    शाहू व त्याच्या सरदारांनी पुढील व्यवस्थेचा उपक्रम ठरवून त्यानुसार हालचाली सुरु केल्या. त्याचवेळी त्याची पत्नी व चुलती अनुक्रमे सकवार आणि ताराबाईने सवता सुभा मांडण्यास सुरवात केली. सकवारबाईचे याकालातील बेत, वर्तन उघड होते. शाहूच्या पश्चात जो छत्रपती बनेल त्याची सत्ता संकुचित होणार हे उघड असल्याने आपल्या पसंतीचा मनुष्य गादीवर आणून राजमाता या नात्याने आपले महत्त्व, सत्ता, अधिकार कायम राखण्याचा तिचा विचार असून यासाठी तिने आपल्या पक्षाची बळकटी चालवली. प्रतिनिधी व पेशव्याचे कधीच न पटल्याने जगजीवनराव उर्फ दादोबा यांस आपल्या पक्षात वळवून घेतले. पेशवा विरोध केवळ याच एका मुद्द्यावर दमाजी गायकवाड व रघुजी भोसल्यानेही सकवारबाईस आपला संदिग्ध पाठिंबा दर्शवला. सकवार तितकीशी राजकारणी नसल्याने गायकवाड, भोसले व प्रतिनिधीच्या बळावर आपण पेशव्यावर मात करू अशी तिला भलतीच उमेद होती. सकवारबाईचे बेत शाहूला समजून त्याने तिला त्यापासून परावृत्त करण्याचे बरेच प्रयत्न करूनही तिने आपला हेका सोडला नाही.

    तिकडे ताराबाईने सर्व रागरंग पाहून आपला सक्तीचा राजकीय संन्यास सोडण्याची हीच एक संधी असल्याचे जाणून शाहूस कळवले कि, ‘ बाहेरचा दत्तक घेऊ नये, माझा नातू हयात आहे. ‘ ताराबाई वयोवृद्ध असली तरी तिचा महत्त्वाकांक्षी  उपद्व्यापी स्वभाव शाहूच्या परिचयाचा असल्याने त्याने ताराबाईवर विश्वास ठेवला नाही. तेव्हा तिने याचे साक्षीदार म्हणून करवीरकर भगवंतराव अमात्याचे नाव सांगितले. ( भगवंतराव हा सुप्रसिद्ध मुत्सद्दी रामचंद्रपंत अमात्याचा मुलगा ) शाहूने त्यांस शपथक्रिया करून सदर गोष्ट सत्य कि मिथ्या असल्याचे सांगण्यास सांगितले असता त्याने ताराबाईच्या वृत्तास दुजोरा दिला. तेव्हा सारासार विचार करून शाहूने ताराबाईच्या नातवास आपल्या पश्चात गादीवर बसवण्याचे निश्चित केले. 

    ताराबाईचा नातू राजाराम उर्फ रामराजा याचे नाव भावी वारस म्हणून निश्चित होताच राजकारणाने निराळाच रंग पकडला. शाहुचा या काळात विश्वास गोविंदराव चिटणीसावर असल्याने पेशव्याने चिटणीसाबरोबर गोडीगुलाबीचे धोरण स्वीकारून राम्राजाची मसलत सिद्धीस नेण्याचे ठरवले. रामराजा शाहूचा पुतण्या असल्याने नागपूरकर भोसल्यांनी सातारच्या दरबारी भानगडींत भाग घेण्याचे टाळले. रघुजी भोसल्याने यासमयी इतकी अलिप्तता स्वीकारली कि, रामराजाची मसलत शेवटास नेण्याकरता शाहूने त्यांस वारंवार निरोप पाठवूनही रघुजी साताऱ्यास फिरकला नाही. गायकवाडांनी प्रसंग पाहून सकवार व ताराबाईकडे आपले पाठिंबा देऊ केला पण ...... या निमित्ताने अल्पकाळ का होईना सकवार – ताराबाई असा राजकीय झगडा साताऱ्यास निर्माण झाला. ताराबाईचा नातू गादीवर बसल्यास सत्ता ताराबाईकडे जाणार हे ओळखून सकवारने ताराबाईच्या मसलतीला विरोध करत विठोजी व शरीफजीच्या वंशातील मुलास दत्तक घेण्याचे किंवा कोल्हापूरकर संभाजीस सातारची गादी देण्याचे निश्चित केले.

    सकवारबाईच्या बेतांची कुणकुण शाहूला लागली. तेव्हा त्याने कोल्हापूरचे राजकारण न करण्याचा सल्ला देत संभाजीला निरोप पाठवून साताऱ्यास न येण्याची सूचना केली. तसेच सकवारचा ताराबाईस असलेलां विरोध लक्षात घेऊन आपल्या हयातीत रामराजास दत्तक घेण्याचे वा साताऱ्यास आणण्याचे त्याने टाळून हि जबाबदारी आपल्या पश्चात पार पडण्याची सूचना चिटणीस – पेशव्याला केली.

    इकडे संभाजीची पत्नी जिजाबाई हिने देखील नवऱ्याला साताऱ्यास न जाण्याची विनंती केली. कारण त्यामुळे ताराबाईबरोबर संघर्षाची स्थिती उद्भवून सातार व कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी तिचे वर्चस्व स्थापित होण्याचा जिजाबाईस धोका दिसत होता. या वारसाच्या प्रश्नात रामराजाची स्थिती मात्र विचित्र झाली होती. कोल्हापूर गादीचा वारस म्हणून संभाजी – जिजाबाई तर सातारचा दावेदार म्हणून सकवारबाई त्याचे वैरी बनल्याने त्याच्या जीवितास धोका निर्माण झाला. 

    ताराबाईच्या या खेळीमुळे असा विचित्र प्रसंग उद्भवला असता नानासाहेबाने मात्र आपला बेत न बदलता रामराजासचं गादीवर बसवण्याचे निश्चित केले. यासमयी ताराबाईपेक्षा त्यांस वस्तुस्थितीची अधिक जाणीव असल्याचे दिसून येते. सत्ता, संपत्ती, लष्कराच्या बळावर आपण ताराबाईचा बंदोबस्त सहज करू अशी त्यांस उमेद व घमेंड होती. शिवाय ज्याप्रमाणे त्याने नम्रभावाने वागून शाहूस थोडेबहुत वश केले होते तोच प्रयोग ताराबाईवर करण्यासही तो उत्सुक होता. ताराबाईनेही प्रसंगावर नजर देत जशास तसे म्हणून पेशव्याशी गोडीगुलाबीने वागण्याचे धोरण आखले. या सर्वांचा परिणाम म्हणजे म्हणजे दि. १५ डिसेंबर १७४९ रोजी शाहूचा मृत्यू झाल्यावर सर्वांनी मिळून एकविचाराने सकवारबाईस सती घालवले. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर सकवारबाईचा राजकीय खून करण्यात आला व या खुनांत ताराबाई, सकवारबाईचा भाऊ, नानासाहेब पेशवा व इतर दरबारी मंडळी समप्रमाणात सहभागी होते.

    सकवारबाईच्या सती प्रकरणाची चर्चा करताना रियासतकार सरदेसाईंचा भलताच गोंधळ उडाला असून नेमक्या निष्कर्षापर्यंत जाणे त्यांस जमले नाही वा सत्य मांडण्याचे धैर्य त्यांस झाले नाही तर वा लेखसंग्रहकर्त्या खऱ्यांनीही बोटचेपी भूमिका घेत या प्रकरणी हातचे राखून मत प्रदर्शित केले आहे. वस्तुतः ग्रँट डफने आपल्या लेखनात या प्रकरणी नानासाहेब पेशव्यास मुख्य दोषी मानून त्यांस ठपका दिल्याने सरदेसाई व खऱ्यांनी पेशव्याच्या बचावास्तव या प्रकरणाकडे पाहिले असले तरी त्यांनी एक गोष्ट पूर्णतः दुर्लक्षित केली व ती म्हणजे --- जी स्त्री आपल्या पतीच्या हयातीत दत्तक घेऊन राज्यकारभार हाती घेण्याचे मनसुबे आखते, प्रयत्न करते ती आपल्या पतीच्या पश्चात सती जाण्यास सहजासहजी तयार झालीच कशी ? त्याखेरीज महत्त्वाची बाब म्हणजे अखेरच्या काळांत शाहूची खालावत जाणारी प्रकृती लक्षात घेऊनच सकवारने दत्तकाचे राजकारण केल्याचे उपरोक्त इतिहासकार द्वयीने तसेच इतरांनीही दुर्लक्षित केले.

    शाहुच्या पश्चात दि. ४ जानेवारी १७५० रोजी रामराजास छत्रपती पदी स्थापण्यात आले. स. १७५० पासून दोन – तीन वर्षे दक्षिणेत विशेष धामधुमीची गेल्याने नानासाहेबाचे उत्तरेकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. या काळात अब्दालीचा उदय होऊन त्याने दिल्ली पर्यंत आपले अप्रत्यक्षपणे वर्चस्व बसवले होते. याच काळात राज्यविस्ताराच्या भरात शिंदे – होळकरांनी पेशव्याच्या वतीने बादशाही संरक्षणाचा करार करून पंजाब, सिंध व अंतर्वेदची चौथाई तसेच अजमेर – आग्ऱ्याची सुभेदारी पदरात पाडून घेतली. परिणामी त्यांचा अब्दाली, राजपूत, जाट, पठाण – रोहिल्यांशी जो झगडा जुंपला त्याची परिणती पानिपतच्या संग्रामात घडून आली. अर्थात, हा विषय प्रस्तुत लेखाच्या मर्यादेत येत नसल्याने तूर्तास इतकेच पुरे.

    शाहूने आपल्या मृत्यूपूर्वी दोन लेखी आज्ञा / सनदा पेशव्यास लिहून दिल्या गेल्या होत्या. त्यानुसार चिटणीसाच्या सल्ल्याने शाहूच्या पश्चात जो गादीवर येईल त्याच्या आज्ञेत राहून राजमंडळ, राज्यकारभार चालवायचा होता. अर्थात, चिटणीस – पेशव्याने एकविचाराने वर्तून रामराजास हाताशी धरून राज्याचा गाडा हाकायचा होता. यावेळपर्यंत रामराजाची कर्तबगारी माहिती नसल्याने त्याविषयी एक अनुकूल ग्रह मनाशी ठेवूनच शाहूने सनदांची रचना केली. त्याखेरीज राजमंडळ – अष्टप्रधान व त्याव्यतिरिक्त सातार दरबारचे जे सरदार आहेत ते --- जसेच्या तसे राखण्याचेही त्याने पेशव्यास बजावले. अर्थात, जरी या सनदा पेशव्याने न जुमानल्या तरी यांच्या बळावर विरोधकांना आपले हक्क राखता येणे शक्य होणार होते. हे लक्षात घेऊनच बहुतेक शाहूने हा खटाटोप केला होता.

    अर्थात, पेशव्याने शाहूची आज्ञा प्रमाण मानून त्यानुसार वागण्याचे ठरवले. रामराजा जरी ताराबाईचा नातू असला तरी व्यवहारात तिला महत्त्व न देता छत्रपतीस हाताशी धरून सर्व सत्तेचा आटोप करण्याची मसलत नानाने आखली. त्यानुसार त्याने चिटणीसा मार्फत रामराजास अनुकूल करून घेतले. यामुळेच ताराबाई पेशव्याच्या विरोधात गेली. ज्या भगवंत अमात्याने रामराजाची खातरजमा शाहूकडे केली होती, त्यासही रामराजाचे पेशव्याच्या कह्यात जाणे आवडले नाही. त्यानेही याबाबतीत छत्रपतीस पुष्कळ उपदेश केला खरा, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण, या वेळी सर्व सत्ता पेशव्याच्या हाती असल्याने  त्याच्या तंत्राने वागणे अनुभवशून्य रामराजास अत्यावश्यक होते. जर शाहूचे स्वतःचे भक्कम लष्कर तयार असते व रामराजाही राज्यकारभारात पारंगत असता तर त्याने पेशव्यालाही जुमानले नसते. परंतु, वस्तुस्थितीच तशी नसल्याने रामराजाचे तरी काय चुकले ? पुढे ताराबाईही लष्करी दुर्बलतेमुळेच पेशव्यापुढे हतबल झाल्याचे विसरून चालता येत नाही.

    रामराजास राज्याभिषेक झाला त्यावेळी रघुजी भोसले साताऱ्यास हजर असून त्याचे व पेशव्याचे रहस्य जुळून त्याने सातार दरबारातील भानगडीत हस्तक्षेप न करण्याचे ठरवले. बदल्यात त्याच्या प्रदेशांत लष्करी, राजकीय हस्तक्षेप न करण्याचे पेशव्याने मान्य केले. तसेच वऱ्हाड प्रांती प्रतिनिधीला निजामाकडून काही प्रदेश जहागीर म्हणून मिळाला होता, त्यावर रघुजीची नजर असल्याचे हेरून पेशव्याने तो भाग भोसल्यांना मिळवून दिला. जेणेकरून रघुजी पेशव्यास मिळून त्याची एक बाजू निर्वेध झाली.* 

    भोसल्यांची समजूत निघताच पेशव्याने प्रतिनिधीचे प्रकरण हाती घेतले. प्रतिनिधी व पेशव्याचे फारसे सख्य असे कधीच नव्हते. अशातच प्रस्तुत प्रतिनिधी जगजीवनराव उर्फ दादोबा पदावर येण्यापूर्वी त्याचा भाऊ श्रीनिवासराव हा पदावर कार्यरत असून तो शाहूच्या विश्वासातील होता. श्रीनिवासराव निपुत्रिक मरण पावल्याने दादोबाची प्रतिनिधीपदी वर्णी लागली असली तरी तो विशेष कर्तुत्ववान नव्हता. पण त्याचा मुतालिक यमाजी शिवदेव कर्तबगार, उपद्व्यापी गृहस्थ असून तो सकवारबाईचा पक्षपाती तर पेशव्याचा विरोधक होता. त्यामुळे प्रतिनिधीपदावर आपल्या पक्षाचा मनुष्य स्थापण्याचे काम पेशव्याने हाती घेत दादोबास पकडून कैदेत टाकले व भवानरावास प्रतिनिधीपदी स्थापले. पेशव्याच्या या कृत्यास ताराबाईचा पाठिंबा होता. कारण, सकवारबाईचा पक्ष मोडण्यासाठी तिला पेशव्याची गरज होती. परंतु, प्रतिनिधी जाग्यावर बसताच पेशव्याने आपला मोर्चा सचिवाकडे वळवत त्याच्याकडून सिंहगड ताब्यात घेण्याची खटपट आरंभली.

    सत्ताप्राप्तीसाठी आपला अखेरचा संघर्ष ताराबाईशी होणार हे पेशवा जसा ओळखून होता तद्वत ताराबाईदेखील हे जाणून होती. छ. राजारामाची समाधी सिंहगडावर असल्याने ताराबाई तिकडे कधीही जाऊ शकत होती व सिंहगड म्हणजे पुण्याचे मर्मस्थळ ! तेव्हा ताराबाईकडे असे स्थळ न राहावे, किमान त्या स्थळी आपला कब्जा असावा या हेतूने पेशव्याने सचिवाकडे सिंहगडाची मागणी करत बदल्यात दुसरा किल्ला देण्याचे मान्य केले. आपल्या मागणीस कायदेशीर जोर यावा याकरता पेशव्याने रामराजाची सचिवास उद्देशून लेखी आज्ञाही मागून घेतली. पेशव्याची हि दंडेली छत्रपतीस न आवडल्याने व ताराबाईचा अनुकूल सल्ला मिळाल्याने रामराजाने अंतस्थरीत्या सचिवास सिंहगड न सोडण्याची भर दिली. परंतु खासा छत्रपती यासमयी पुण्यात असल्याने व ताराबाईलाही पेशव्याने सचिवासोबत पुण्यात आणल्याने या प्रकरणी पेशव्याचा पक्ष वरचढ ठरून त्याने रामराजा व ताराबाईवर मात करत लष्करी बळावर सिंहगड ताब्यात घेतला. सचिवाचे प्रकरण उलगडल्यावर पेशव्याने प्रतिनिधीचा प्रदेश ताब्यात घेण्याची खटपट आरंभली.
दादोबा प्रतिनिधी यावेळी कैदेत असून त्याचा मुतालिक यमाजी शिवदेव सांगोला, मंगळवेढा हि प्रतिनिधीची ठाणी बळकावून बसला होता. तेव्हा त्याच्या ताब्यातून हि ठाणी घेण्याकरता सदाशिवरावभाऊ छ. रामराजास सोबत घेऊन स. १७५० च्या उत्तरार्धात सांगोल्यास गेला. आपल्या स्वारीस जोर यावा याकरता त्याने भवानराव प्रतिनिधीस देखील मोहिमेत आणले पण यमाजी नमला नाही. तेव्हा त्याच्या मागणीनुसार दादोबा प्रतिनिधीस पुरंदरावरील कैदेतून काढून सांगोल्यास आणल्यावर यमाजी शरण आला.

    सांगोला येथे छ. रामराजा ताराबाईच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे पाहून पेशव्याच्या सुचनेनुसार व रामचंद्र मल्हारच्या सल्ल्यानुसार भाऊने छत्रपतींशी तह करून राज्याची कुलमुखत्यारी पेशव्यास मिळवून दिली. या तहानुसार (१) भवानराव प्रतिनिधीपदी राहून यमाजी शिवदेवचा पुतण्या त्याचा मुतालिक झाला. (२) दाभाड्यास निर्वाहापुरता खर्च देऊन गायकवाडाकडे निम्मी गुजरात देऊन उर्वरित पेशव्याकडे आली. (३) कर्नाटक सुभा बाबूजी नाईकच्या नावे होता, तो जास्ती रसद कबूल करून पेशव्याकडे घेतला. (४) गोविंदराव चिटणीसाने छ्त्रपतीजवळ कारभार करावा तर त्याचा भाऊ बापुजी खंडेरावने लष्करासह छत्रपतीजवळ राहवे. याकरता प्रतिनिधीचा काही प्रांत व इतर प्रदेश मिळून चार लाखांचा सरंजाम त्यांना देण्यात आला. (५) यशवंतराव पोतनीसला कारखाने व खासगी कारभार देत पोतनिशी व चाळीस हजारांचा सरंजाम दिला. (६) छ्त्रपतीच्या खर्चाकरता शाहूच्या वेळी जी व्यवस्था होती तीच कायम राहावी.

    सांगोल्याचा करार अतिशय महत्त्वाचा असून छत्रपतीभोवती पेशव्याने आपली पकड घट्ट बसवत मराठी राज्यसंघावरही आपले नियंत्रण आणण्याचा उपक्रम चालवला. दाभाड्यांची निम्मी गुजरात पदरात पडून घेताना त्यांना नामधारी सेनापती बनवत त्यांच्याच पदरच्या गायकवाडास कुल मुखत्यारी दिली. आपली अशीच काहीतरी सोय लावून घेण्यासाठी गायकवाड याच काळात प्रयत्नशील असल्याने त्यालाही या उपक्रमाने काही वाईट वाटणार नाही असा पेशव्याचा हिशोब असावा. चिटणीसाला खुश करून त्याच्या मार्फत छत्रपती आपणांस अनुकूल राहील अशीही सोय केली. कर्नाटकांत बाबूजी मार्फत नागपूरकर भोसले शिरकाव करू पाहत होता. त्यासंही पेशव्याने असा पायबंद घालून कर्नाटक आपल्याकडे घेतले. एकूण पेशव्याची सत्ता यावेळी कागदावर तरी निश्चित विस्तारली होती. 

    सांगोल्याच्या कराराची वार्ता सर्वत्र पसरताच ज्या काही प्रतिक्रिया उमटल्या त्यांचा पुढील राजकारणावर अतिशय दूरगामी परिणाम झाला. हा करार नानाच्या सूचनेवरून झाला असला तरी याकामी सदोबाला आलेल्या यशाने नानाही साशंक झाला.  नाना – भाऊचा जो रुसवा इतिहासात प्रसिद्ध आहे त्यांस सांगोला कराराची पार्श्वभूमी वा काळ कारणीभूत असल्याचे फारच थोड्क्यांना ठाऊक आहे. ताराबाईस पेशव्याचे खेळ उमजून तिने आपली सर्व पत, अक्कल, प्रतिष्ठा पणास लावून पेशव्याला नामोहरम करण्यास्तव मराठा सरदारांच्या एकजुटीचा प्रयत्न चालवला.  प्रचलित पद्धातीनुसार शेजारच्या सत्तांचीही मदत घेण्याचा यत्न आरंभला. याहीउपर सदोबा तसेच शिंदे – होळकरांनाही फूस लावण्याचे तिने प्रयत्न केला. या काळात पेशव्याची त्रेधातिरपीट उडून भाऊ, होळकर विषयी त्याचे मन साशंक बनले. ज्या चिटणीसाने त्यांस साथ दिली तो शत्रुवत बनला. दोन – तीन पिढ्यांचे पुरंदरे घराणेही मर्जीतून उतरले. एकूण, हा काळ जसा अब्दाली – रोहील्यांमुळे उत्तरेत राज्यक्रांतीचा / आणीबाणीचा बनला होता तसाच दख्खनमध्येही बनला होता.

    याच सुमारास निजामाच्या मुलांमध्ये वारसा कलह चालला असून निजामाचा मोठा मुलगा --- गाजीउद्दिन यावेळी दिल्ली दरबारी निजामाचा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होता. त्यांस निजामाच्या पदी स्थापून ती सत्ताही गुंडाळण्याचा पेशव्याचा मनोदय होता. तशा सूचनाही त्याने शिंदे – होळकरांना दिल्या होत्या पेशव्याच्या या कारवायांना ताराबाईच्या कारस्थानाने मर्यादा आल्याचे कित्येक इतिहासकार सांगतात परंतु अधिक अभ्यासांती त्यात फारसे तथ्य नसल्याचे दिसून येते. कारण, सत्ताविस्ताराच्या लोभाने पेशव्याने जे आततायी चढाईचे धोरण स्वीकारले होते ते कोणालाच पसंत नसून त्यांस विरोध होणे स्वाभाविक होते. अपेक्षित होते. जर हि भूमिका ताराबाईने निभावली नसती तर इतर असंतुष्ट लोक होतेच कि ! खेरीज गाजीउद्दिन जर निजामपदी आला असता तर त्याने पेशव्याशी सलोखाच राखला असता हे कशावरून गृहीत धरले जाते ? तसेच याच काळात दक्षिणेत फ्रेंचांचे वजन वाढून कवायती फौजांच्या सहाय्याने निजामशाहीत त्यांनी आपले हात – पाय पसरायला आरंभ केल्याचे दुर्लक्षित करून चालत नाही.

    सांगोला प्रकरण आटोपल्यावर रामराजा साताऱ्यास निघाला. यावेळी त्याने ताराबाईच्या भेटीसाठी सातारच्या किल्ल्यावर जाऊ नये असाच सर्वांचा अभिप्राय पडला असता रामराजाने सर्वांना धुडकावून गडावर आजीच्या भेटीसाठी गेला असता दि. २४ – ११ - १७५० रोजी ताराबाईने त्यांस कैद केले. छत्रपतीची हि विपरीत वार्ता समजताच पेशवा गडबडून गेला. याच सुमारास गुजरातमधून दाभाडे – गायकवाड जोडीही पेशव्याच्या विरोधात कारवाया करू लागली. वास्तविक पेशव्याने सांगोला प्रकरणास हात घातला तेव्हाच ताराबाईने आपली खेळी खेळण्यास आरंभ केला. पुण्यात पेशव्याच्या निकट मुक्काम असतानाच तिने दाभाड्यांशी संधान जुळवून त्यांना आपल्या गटात घेतले. स्वपराक्रमाने अर्जित केलेल्या प्रदेशातील काही भाग पेशव्याला द्यायचे जीवावर आल्याने गायकवाडही दाभाड्यांसह ताराबाईच्या पक्षात वळला. परिणामी गुजरातमधील आपल्या वाट्याचा प्रदेश सोडवून घ्यायला व गायकवाडास जरब देण्याकरता पेशव्यास सैन्य पाठवावे लागले व आणखी एका गृहयुद्धास तोंड फुटले.

    याच काळात सदशिवाने रामचंद्रबाबा महादोबा पुरंदरेच्या सल्ल्याने कोल्हापूरची पेशवाई मिळवण्याची  खटपट चालवली. तेव्हा नानासाहेबाने महादोबा पुरंदरेस निवृत्त करून कारभारीपद भाऊस देऊन त्यांस कारभारात सामील करून घेतले व पुढे प्रसंग पाहून कोल्हापूरची पेशवाईही स्वतःस मिळवून घेत दोन्ही संस्थानात आपलाच शह राखण्याचा प्रयत्न केला. पानिपतनंतर पेशवे कुटुंबात भाऊबंदकी निर्माण झाल्याचे मानणाऱ्यांनी या गोष्टीची दखल घेणे अत्यावश्यक आहे.

    सदाशिवरावास कारभारीपद देऊन पेशव्याने आपले हस्तक गुजरातमध्ये रवाना केले व भाऊला घेऊन तो कर्नाटकांत गेला. छत्रपती कैद झाला असला तरी ताराबाईच्या कैदेतून त्यांस बाहेर काढण्याकरता तिच्याशी लढाई करण्याची ताकद जरी पेशाव्यात असली तरी तसे साहस मात्र त्यांस झाले नाही व गडाभोवती जुजबी चौक्या बसवण्यात त्याने समाधान मानले.

    इकडे दमाजी गायकवाडाने गुजरातमध्ये उतरणाऱ्या पेशव्याच्या हस्तकांना पिटून लावले व तो पुण्याकडे वेगाने येऊ लागला. यावेळी पेशवा कर्नाटक मोहिमेत गुरफटला असून पुण्याजवळ मातबर असे सरदारही नव्हते. गायकवाडाची स्वारी येणार या आवईने पुणे शहरात गोंधळ उडाला. पेशव्याच्या कुटुंबियांनाही पुणे सोडून सिंहगडाचा आश्रय घ्यावा लागला. यावेळी पुरंदरे मंडळी पेशव्याच्या गैरमर्जीत असली तरी त्यांनी दमाजीला पुण्याकडे येण्यापासून परावृत्त केले. तेव्हा गायकवाड साताऱ्यास गेला. सातारच्या किल्ल्यावर असलेल्या ताराबाईशी हातमिळवणी करण्याचा त्याच बेत होता. परंतु साताऱ्याजवळील पेशव्याची पथके, पुण्यातील फौजा घेऊन आलेले त्रिंबकराव पेठे, नाना पुरंदरे यांनी दमाजीला ताराबाईसोबत हातमिळवणी करू न देता लढाई देऊन पराभूत केले व त्याच्या तळाभोवती चौक्या बसवून त्यांस कोंडून धरले. गायकवाडाच्या चढाईची बातमी मिळताच पेशवाही त्वरेने मागे फिरला व आपण येईपर्यंत दमाजीस कोंडून ठेवण्याचा इशारा त्याने सरदारांस दिला.

    पुढे स. १७५१ च्या एप्रिल अखेर पेशवा साताऱ्याजवळ आला. आल्याबरोबर गायकवाड व गुजरात प्रकरण निकाली काढण्याच्या दृष्टीने त्याने दमाजी व दाभाडे मंडळींना आपल्या गोटाशेजारी वेण्येवर येण्यास सांगितले. पेशव्याच्या शब्दावर विसंबून गायकवाड दाभाड्यांसह पेशव्याच्या तळावर आला अन् पेशव्याने आपला शब्द फिरवून गायकवाड, दाभाड्यास कैद केले व गायकवाडाची फौज लुटली व निम्मा गुजरात लिहून देण्याची मागणी केली. नाईलाजाने दाभाडे व गायकवाड मंडळींनी पेशव्यास जे हवं ते लिहून दिलं. त्यानंतर सर्वांना नजरकैदेत टाकून पेशव्याने आपले हस्तक गुजरातमध्ये फिरून रवाना केले. परंतु, दमाजीच्या लोकांनी त्यांना दाद दिली नाही. तेव्हा रामचंद्रबाबाच्या मध्यस्थीने पेशव्याने दमाजीशी बोलणी करून तडजोड केली.

    त्यान्वये (१) सेनापती व सेनाखासखेल या दाभाड्यांच्या दोन पदांपैकी सेनापतीपद दाभाद्यांकडे तर सेनाखासखेल गायकवाडास मिळाले. (२) सुटकेकरता १५ लाखांचा दंड (३) जरूरसमयी दहा हजार फौजेसह चाकरीस येणे (४) दाभाड्यास खर्चाकरता सालीना सव्वा पाच लाख रुपये देणे (५) पेशव्याच्या पक्षात वागणे. या अटींवर स. १७५२ च्या पूर्वार्धात पेशवे – गायकवाड तह होऊन गुजरातसह दाभाडे – गायकवाड पेशव्याच्या नियंत्रणात आले.

    दमाजीचा पराभव व कैदेमुळे ताराबाईच्या पक्षाला मोठाच हादरा बसला. परंतु, आपला हेका न सोडता तिने रामराजाची कैद तशीच चालू ठेवली. तेव्हा पूर्वीप्रमाणेच सातार किल्ल्याभोवती बंदोबस्त ठेवून पेशव्याने बाह्य राजकारणाशी ताराबाईचा फारसा संबंध येऊ न देता तिचे महत्त्व मर्यादित ठेवले. अखेर सर्व उपाय हरल्यावर तिने स. १७५१ च्या ऑक्टोबरमध्ये पेशव्यासोबत जुळवून घेतले. परंतु छत्रपती मात्र अखेरपर्यंत तिच्याच ताब्यात राहिल अशी तिची अट पेशव्याने मान्य केल्याने उभयतांचा समेट झाला. यावेळी पेशव्याने जे काही सांगोला प्रकरणी व दमाजीशी लढाई करून जबरीने बळकावले होते त्यांस ताराबाईकडून कायदेशीररीत्या मान्यता मिळवून घेण्याचे कार्य उरकून घेतले.

    ताराबाईने रामराजास कैद करून पेशव्यासोबत जो वर्ष दोन वर्षे संघर्ष केला त्याचे अतिशय दूरगामी परिणाम घडून आले. त्याचे प्रत्यंतर लगेच तसेच नंतरच्या काळातही वारंवार येत गेले परंतु, मुत्सद्द्यांनी तिकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने अंती मराठी राज्याचा विनाश झाला.

    छत्रपतीस हाती घेऊन त्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न पेशवा अथवा इतर सरदारांनी केला असता तर यादवी युद्धास प्रारंभ झाला असता. परंतु, खुद्द ताराबाईनेच हा उपक्रम केल्याने छत्रपतींचे महत्त्व, सत्ता, अधिकारांचा संकोच घडून आला. यामुळे पुढे ताराबाईच्या पश्चात छत्रपती संबंधी पेशव्यास नवीन काही व्यवस्था करण्याची गरजच पडली नाही.

    दुसरे असे कि, रामराजा कैदेत पडल्यावरही जेव्हा ताराबाईस अनुकूल होईना तेव्हा, ‘ हा आपला नातू नसल्याचे ‘ ताराबाईने जाहीर केले. परिणामी ज्यांनी रामराजाची मसलत उचलून धरली ते सर्व तोंडघशी तर पडलेच परंतु, ज्यांनी रामराजाचा विवाह आपल्या मुलींशी केला होता त्या मराठा सरदारांचेही पित्त खवळले. या संपूर्ण प्रकरणात ताराबाईने जो गोंधळ व धरसोडपणा केला त्याचा अंती परिणाम असा झाला कि, रामराजास छत्रपतीपदावरून काढून त्या जागी दुसऱ्या व्यक्तीस बसवणे अथवा त्यांस फक्त पद देऊन त्याचे अधिकार काढून घेणे हेच दोन पर्याय यावेळी मुत्साद्द्यांसमोर होते. पैकी, रामराजास पदावरून काढणे म्हणजे ताराबाईच्या कटांत सामील असल्याचे सिद्ध करण्यासारखे होते. तेव्हा त्यांस पदावर ठेवून त्याचे अधिकार काढून घेण्याचा पर्याय ताराबाईच्या पश्चात पेशव्याने अवलंबला.

    सारांश, ताराबाईच्या या राजकारणाने तिचा फायदा तर झाला नाही परंतु अप्रत्यक्षरीत्या पेशव्याचे मनोरथ पूर्ण करण्यास तिचा जरुरीपेक्षाही जास्त हातभार लागल्याचे दिसून येते. राज्यशास्त्राच्या दृष्टीने या घटनेकडे पाहिले असता असे लक्षात येते कि, प्रथम छत्रपती नामशेष होऊन नंतर अष्टप्रधान मंडळही निष्प्रभ होऊन अष्टप्रधानांतील एक असा पेशवाच सर्वाधिकारी झाल्याने राजकारणाला वेगळीच कलाटणी लाभून जे हित पेशव्याचे तेच राज्याचे असे सूत्र बनून पेशवा हाच मराठी राज्याचा अप्रत्यक्षरीत्या प्रमुख बनला. मराठी इतिहासकारांनी मराठी राज्याच्या यापुढील कालखंडास ‘ पेशवाई ‘ हे नाव याकरताच दिलं आहे.  

    यासंदर्भात तत्कालीन मुत्सद्दी नाना पुरंदरेने नाना – भाऊला जो सल्ला दिला होता त्याची चर्चा करणे अनावश्यक होणार नाही. ज्यावेळी ताराबाई – पेशव्याचा समेट झाला नव्हता व दमाजी पुण्याकडे येत होता तेव्हा नाना पुरंदऱ्याने पेशव्यास पत्र लिहून प्राप्त स्थितीवर तोडगा म्हणून चार पर्याय सुचवले ते खालीलप्रमाणे :-
(१) ताराबाई खावंद. सबब त्या फार्मावातील त्याप्रमाणे सर्व कारभार करणे.
(२) रामराजा बाईच्या अटकेतून निघण्यास उत्सुक असल्यामुळे बाईस निकर्ष करून राजाचे तंत्राने कारभार चालविणे.
(३) आपणच सर्व सत्ता चालवून कारभार करावा. म्हणजे बाई अल्पावकाशांत नरम येईल.
(४) कोल्हापूरकर संभाजीस साताऱ्यास आणण्याचा सकवारबाईच्या सतीच्या तोंडचा प्रयोग अंमलात आणावा. ताराबाई तरी रामराजास काढून संभाजीस आणण्याच्या उद्योगांत आहे, तो तिच्या हातांतला डाव आपणच का न पुरा करावा ! ( संदर्भ :- मराठी रियासत – खंड ४ )  

    नाना पुरंदरेचा पहिला पर्याय अंमलात आणणे पेशव्याला शक्य नव्हते. कारण, ताराबाईला मुळात सत्तेत भागीदार नको असल्याने हे घडणं शक्य नव्हतं. दुसरा पर्याय अंमलात आणण्यासाठी ताराबाईसोबत उघड युद्ध करण्याची गरज होती व हा उपद्व्याप अंगावर घेण्याची पेशव्याची बिलकुल इच्छा नव्हती. पुरंदरेची तिसरी सूचना यापूर्वीच पेशव्याने अंमलात आणलेली असल्याने त्याविषयी अधिक चर्चा न केलेली बरे. चौथ्या पर्यायाविषयी मात्र थोडं तपशीलवार लिहावंच लागेल.

    रामराजा कैदेत पडल्यावर किल्ल्याभोवती पेशव्याने चौक्या बसवल्यावर दमाजी गायकवाड साताऱ्यास यायला निघाला. तेव्हा मधल्या काळात ताराबाईने रामराजा खोटा असल्याचे जाहीर करून कोल्हापूरच्या संभाजीला साताऱ्यास येऊन राज्यपद सांभाळण्याची सूचना केली. संभाजी देखील यासाठी तयार झाला होता परंतु पेशव्याने आपले फौजबंद सरदार कोल्हापूर सरहद्दीवर नेमल्याने संभाजीस पुढे येता आले नाही. त्याचप्रमाणे त्याच्या पत्नीचाही साताऱ्यास न जाण्याचा फिरून सल्ला आल्याने त्यानेही निकड केली नाही.

     संभाजीला साताऱ्यास आणल्याने ताराबाईच्या हाती सातार – कोल्हापूर या दोन्ही गाद्यांची सत्ता, अधिकार एकवटणार असून संभाजी स्वतः राज्यकारभार केलेला मनुष्य असल्याने पेशवाही परस्पर निष्प्रभ होणार होता.

    संभाजीचा हेतू या प्रकरणी थोडा वेगळा होता. राज्यसंस्थापक शिवाजीच्या राज्याचे आपणच मुख्य वारस हि त्याची भूमिका कायम असून यानिमित्ताने त्यांस राज्यपद मिळणार असेल तर त्यांस ते नको होते असे नाही. तसेच ताराबाई वृद्ध असल्याने तशीही ती किती काळ राजकारण करेल याचा थोडाबहुत अंदाज मनाशी बांधून हे आमंत्रण स्वीकारले असावे. मात्र, त्याच्या पत्नीला ताराबाईच्या उपद्व्यापी स्वभाव – कर्तबगारी माहिती असल्याने तिने नवऱ्यास रोखून धरले. अर्थात, संभाजीची पत्नी जिजाबाई हि देखील ताराबाईचीच सुधारित आवृत्ती होती !

    पेशव्याचा दृष्टीकोन या प्रकरणी वेगळा होता. रामराजा कैदेत टाकल्याने ताराबाईची प्रतिष्ठा तशीही खालावली होती. तसेच तिने आपणहून गडावर कोंडून घेतल्याने बाह्य राजकारणाशी देखील तिचा संपर्क तुटल्याने पेशव्याचे महत्त्व वाढीस लागले होते. कोल्हापूरकर संभाजी जर साताऱ्यास आला असता तर पेशव्याचे महत्त्व पूर्णतः कमी होऊन भोसले वा इतरांना वर येण्याची संधी मिळणार होती व तेच पेशव्याला नको होते. त्यामुळे त्याने संभाजीला रोखून धरण्यात धन्यता मानली.

    नाना पुरंदरेची दृष्टी व पेशव्याचा दृष्टीकोन पूर्णतः भिन्न होते. पुरंदरे प्रथम छत्रपती व नंतर पेशव्याचे सेवक असल्याने त्यांचे लक्ष छत्रपतीचे महत्त्व रक्षण्याकडे होते. उलट पेशवा राज्यकर्ता असल्याने सत्ता, प्रदेशविस्ताराची संधी त्यांस खुणावत होती व ती दवडण्याइतपत तो मूर्खही नव्हता. 

    ताराबाई – पेशव्याचा समेट झाल्यावर स. १७५२ अखेर ताराबाईने रामराजा आपला नातू नसल्याचे पेशव्यास शपथपूर्वक सांगितले. त्यानंतर जसं चाललंय तसंच पुढे चालवण्याचे पेशव्याने मनोमन ठरवले परंतु यासंबंधी ताराबाई – पेशव्याचा लेखी करार स. १७५८ – ५९ मध्ये होऊन राजारामच्या जीवास अपाय न करता फत्तेसिंग वा येसाजी प्रमाणे ठेवण्याचे निश्चित झाले. फत्तेसिंग हा शाहूचा पालक पुत्र असून येसाजी दासीपुत्र होता. यावरून रामराजाचे --- पर्यायाने छत्रपतीचे महत्त्व कसे लयास गेले याची वाचकांना कल्पना यावी.

    सातारचे प्रकरण निकाली निघाल्यावर पेशव्याने आपल्या राज्य – सत्ताविस्ताराचे धोरण नव्या जोमाने हाती घेतले. वास्तविक, ताराबाई – पेशवा समेट हा बाळाजी बाजीरावच्या राजकीय कारकीर्दीचा उत्कर्षबिंदू असून यापुढे त्यांस उतरती कळा लागल्याचे पुढील घटनाक्रमांवरून लक्षात येईल. यानंतर पेशव्याने जो काही उपक्रम केला तो या ना त्या प्रकारे त्याच्या अंगाशीच आल्याचे दिसून येईल.

    स. १७३४ पासून बाजीराव पेशवा आंगऱ्यांच्या विरोधात इंग्रज – पोर्तुगीजांकडे मदत मागत होता परंतु अनेक कारणांनी पेशव्याची इच्छा त्यावेळी पुरी होऊ शकली नाही. बापाची अपुरी इच्छा पुरी करण्याचे यावेळी नानासाहेबाने मनावर घेत आंगऱ्याच्या विरोधात इंग्रजांशी हातमिळवणी करून स. १७५५ – ५६ मध्ये आखलेल्या मोहिमेत दर्यावरील आंगऱ्यांचे वर्चस्व साफ मोडीत काढून आंगऱ्यांची बलिष्ठ नाविक सत्ता धुळीस मिळाली. यांमुळे पेशव्याचे आरमार आंगऱ्याच्या दहशतीतून मोकळे झाले असले तरी आंगऱ्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची असलेली इंग्रजांची सत्ता यांमुळे वरचढ बनून समुद्रावरील मराठी सत्ता निष्प्रभ बनली. परंतु कोकणातील बव्हंशी भूप्रदेश मात्र पेशव्याच्या राज्यात समाविष्ट झाला.

    सातार दरबारचा पेशव्याइतकाच बलिष्ठ असा सरदार म्हणजे नागपूरचा रघुजी भोसले. सातारच्या भानगडीत लक्ष न घालण्याचे रघुजीने निश्चित केल्याने पेशव्याला सातारचे प्रकरण निकाली काढणे सुलभ झाले. बदल्यात रघुजीच्या कार्यक्षेत्रांत दखल न देण्याचे पेशव्याने मान्य केले होते परंतु संधी मिळताच पेशव्याने आपला शब्द फिरवण्यास मागे पुढे पाहिले नाही. स. १७५० – ५१ मध्ये मोगल वजीर सफदरजंगचा रोहिले – पठाणांशी झगडा जुंपला. त्यावेळी शिंदे – होळकरांना मदतीस घेऊन वजीराने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. यासमयी वजीराच्या ताब्यातील काशी – प्रयाग रघुजीच्या कार्यक्षेत्रांत येत होते. परंतु पेशव्याने मुद्दाम दांडगाईचे धोरण स्वीकारले. पेशव्याचे बेत याचसमयी भोसल्यास कळून चुकले. अर्थात, यावेळी पेशव्याचे सरदार दुआबातून मागे फिरल्याने रघुजीला सध्या तरी काळजी करण्यासारखे कारण नव्हते.
पुढे स. १७५५ च्या फेब्रुवारीत रघुजी भोसले मरण पावला. तत्पूर्वी आपल्या राज्याची चार पुत्रांत विभागणी करून आपल्या पश्चात हीच व्यवस्था पेशव्याने कायम राखावी असे त्याने नानासाहेबास कळवले. अर्थात, रघुजीच्या मुलांमध्ये वाटणी वरून झगडा होणे स्वाभाविक असल्याने गृहकलहास तोंड फुटण्यास फार वेळ न लागता त्यांनी आपापल्या न्याय्य मागण्या पेशव्यास कळवल्या. गेली कित्येक वर्षे पेशवा नागपूरकरांवर आपला शह बसवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या हाती हि सुवर्णसंधी चालून आल्यावर तिचा अव्हेर तो करणे शक्यच नव्हते. त्याने भोसले बंधूंची समजूत काढून त्यांची यथायोग्य वाटणी करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु मालमत्ता व सत्ता यांची सारख्याच पद्धतीने वाटणी करणे शक्य नसल्याने भोसलेबंधूंचे आपसांत कधीच जमले नाही. पर्यायाने भाऊबंदकीत ती सत्ता उतरणीला लागली. भोसल्यांच्या या गृहकलहाने पेशव्यास त्यांनाही आपल्या वर्चस्वाखाली आणता आले व खऱ्या अर्थाने आता तो मराठी सत्तेचा प्रमुख बनला.

    रघुजी मरण पावल्यावर पेशव्याने आपले लक्ष बिहार – बंगालकडे वळवले. रघुनाथरावाने लाहोर – अटक कडे जाणे पेशव्यास मंजूर नसून त्याच्यामते दादाने तातडीने बंगालकडे जाऊन तो प्रांत हाताखाली घ्यावा असे होते. परंतु, दिल्लीतील राजकारण पुण्यात बसून खेळण्याची पेशव्याची चाल अंगलट आली. प्राप्ती स्थितीचा रेटा पडून रघुनाथास लाहोरकडे जावे लागले. पुढे दादाच्या अटक स्वारीनंतर शिंदे उत्तरेत गेले तेव्हा पेशव्याने त्यांना लाहोरचा बंदोबस्त करून बंगालकडे जाण्याची आज्ञा केली. त्यातून शुक्रतालचा प्रसंग उद्भवून बुराडीवर दत्ताजी जीवानिशी गेला. त्यानंतर सदाशिवराव उत्तरेत गेला. तेव्हा अब्दालीचे प्रकरण तह वा युद्धाने मिटल्यावर दिल्लीचा बंदोबस्त करून बंगालमध्ये जाण्याचा वा नव्याने येणाऱ्या सरदाराला अथवा पेशवे कुटुंबातील खाशास तिकडे पाठवण्याचा विचार असल्याचे दिसून येते. अर्थात, पानिपत युद्धातील पराभवाने सर्व बेत जागच्या जागी जिरले. पश्चात स. १७६१ च्या जूनमध्ये नानासाहेब पेशवा मरण पावला.

    मृत्यूपूर्वी पेशव्याने सातारचा प्रकार सुधारण्याची खटपट केली होती. रामराजास गादीवरून काढून त्या जागी भोसले वंशातील दुसऱ्या इसमास बसवण्याचा त्याचा विचार होता. परंतु ते झाले नाही. तसेच स. १७६० च्या डिसेंबर उत्तरार्धात कोल्हापूरचा संभाजी निपुत्रिक वारल्याने नानासाहेबाने राज्यास धनी म्हणून मुंगीकर भोसले घराण्यातील उमाजी यांस नेमण्याची खटपट आरंभली व जिजाबाईस तैनात तोडून देण्याचे मान्य केले. पेशव्याचा उद्देश यावेळी कोल्हापूरचे राज्य आपल्या नियंत्रणात आणण्याचा होता. परंतु जिजाबाई यांमुळे चिडली. तिने नाना खटपटी – लटपटी करून आपल्या राज्याची साताऱ्यासारखी दुर्दशा होऊ न देता संस्थान कायम राखले. मृत संभाजीची एक पत्नी गरोदर असून ती प्रसूत होऊन तिला कन्या झाली. परंतु जिजाबाईने यावेळी मुलगा झाल्याचे सर्वत्र जाहीर करून मुलांची अदलाबदल केली. अर्थात, हा प्रकार लवकरच उघडकीस आला खरा परंतु, पेशव्याच्या राज्यतृष्णेस आळा घालण्यासाठी जिजाबाईला जे योग्य वाटले ते केल्याने तिला यासंदर्भात दोष देता येत नाही. कोल्हापूरची भानगड पेशव्याच्या मृत्यूनंतर स. १७६३ मध्ये मिटली. माधवराव पेशव्याने जिजाबाईला तिच्यापासंतीचा दत्तक घेण्याची परवानगी देऊन कोल्हापूरचे प्रकरण निकाली काढले.

    एकूण बाळाजी बाजीरावची राज्यतृष्णा, औरंगजेबाच्या तोडीची असल्याने त्याच्या काळात मराठी --- पेशव्याच्या सत्तेचा विस्तार झाला तरी अल्पावधीत संकोचही झाला. घडल्या गोष्टींचा, घटनांचा उपयोग पेशव्याने आपल्या स्वार्थाकडे केला असला तरी त्याने हा उपक्रम केला नसता तर दाभाडे, गायकवाड वा भोसले हा खटाटोप करणारच होते. तेव्हा याबाबतीत पेशव्यास दोष का द्यावा ? परंतु त्याबरोबर हे देखील लक्षात घ्यावे कि, पेशव्याप्रमेच भोसले – दाभाडे / गायकवाड – आंग्रे इ. ची भावना असल्याने त्यांना फितूर, राज्यद्रोही का म्हणावे ? त्यांनी छत्रपती विरोधात कट – कारस्थाने, बंड केले असे का म्हणावे ? आपला अधिकार, सत्ता राखण्यासाठी ताराबाई – जिजाबाई यांनी जो काही खटाटोप केला त्यांस दूषणं का द्यावी ? या सर्वांचा शांत चित्ताने विचार होणे आवश्यक आहे.
                                   ( क्रमशः )

संदर्भ ग्रंथ :-
१)      छत्रपती शिवरायांची अस्सल पत्रे :- डॉ. नभा अनिल काकडे
२)      ऐतिहासिक पत्रबोध :- गो. स. सरदेसाई
३)      काव्येतिहास संग्रहांत प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे लेख :- संपादक – गो. स. सादेसाई, या. मा. काळे, वि. स. वाकस्कर
४)      मराठी रियासत ( खंड १ ते ८ ) :- गो. स. सरदेसाई
५)      मराठ्यांची लष्करी व्यवस्था :- डॉ. एस. एन. सेन – मराठी अनुवाद :- डॉ. सदाशिव शिवदे
६)      मराठेशाहीतील वेचक – वेधक :- य. न. केळकर
७)      भूतावर भ्रमण : ऐतिहासिक लेखसंग्रह :- य. न. केळकर
८)      काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे :- य. न. केळकर
९)      नाना फडनवीस यांचे चरित्र :- वा. वा. खरे
१०)  मराठ्यांच्या इतिहासाची साधने ( खंड १३, १४ ) :- वि. का. राजवाडे
११)  मराठी दफ्तर रुमाल पहिला (१) :- वि. ल. भावे
१२)  मराठी दफ्तर ( रुमाल २ ) :- वि. ल. भावे
१३)  फार्शी – मराठी कोश :- प्रो. माधव त्रिंबक पटवर्धन
१४)  मराठ्यांच्या इतिहासाची साधने ( खंड ८ ) :- वि. का. राजवाडे
१५)  दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास :- मराठी अनुवाद – भ. ग. कुंटे
१६)  छत्रपती शिवाजी :- सेतू माधवराव पगडी
१७)  ताराबाई – संभाजी ( १७३८ – १७६१ ) :- गो. स. सरदेसाई
१८)  ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर ( चरित्र व पत्रव्यवहार ) :- द. ब. पारसनीस
१९)  पुरंदरे दफ्तर भाग ३ रा :- कृ. वा. पुरंदरे
२०)  नागपूर प्रांताचा इतिहास :- या. मा. काळे
२१)  सरदेसाई स्मारक ग्रंथ :- श्रीपाद रामचंद्र टिकेकर
२२)  मराठी सत्तेचा उत्कर्ष :- न्या. महादेव गोविंद रानडे
२३)  शिंदेशाही इतिहासाची साधने, भाग ३ रा :- आनंदराव भाऊ फाळके 
२४)  मराठ्यांची बखर :- ग्रँट डफ लिखित व कॅप्टन डेविड केपन अनुवादित ( आवृत्ती ६ वी )     



(*) खुलासा :- हा मुद्दा आमचे मित्र श्री. शिवराम कार्लेकर यांनी माझ्या लक्षात आणून दिला. याबाबत मी त्यांचा आभारी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: