रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

शिव – पेशवेकालीन राज्यनिष्ठा, राजनिष्ठा व फितुरी : एक चिंतन ( भाग – ५ )





    अधिकारपदावरील व्यक्ती हयात असेपर्यंत तसेच अधिकारपदावर असेपर्यंतच तिच्या शब्दाला मान असतो. एकदा व्यक्ती अधिकारपदावरून पायउतार झाली वा मृत्यू पावली तर त्या व्यक्तीच्या शब्दांना कवडीचीही किंमत नसते. जागतिक व्यवहाराचा हा न्याय इतिहासात पदोपदी आढळून येतो, त्यास थोरल्या माधवराव पेशव्याचा मृत्यूलेख वा मृत्यूपत्रही या नियमास अपवाद निघाला नाही यात आश्चर्य ते काय !

    मृत्यूपूर्वी माधवरावाने आपल्या पाठी राज्याची व्यवस्था लेखी लिहून ठेवली होती. त्यास मुलबाळ नसल्याने पेशवाई नानासाहेबाच्या वंशातील पुरुषास --- अर्थात माधवाच्या धाकट्या भावास --- नारायणाला मिळणे स्वाभाविक होते व त्याविषयी कोणाचा आक्षेपही नव्हता.

    माधवरावाच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात नजरकैदेत असलेल्या दादाची पेशव्याच्या अंतसमयी मुक्तता झाली असली तरी त्यांस पेशवे घराण्यातील एक सदस्य म्हणून जास्तीत जास्त पाच ते सात लाखांची जहागीर लावून देण्यापलीकडे काहीही न देण्याची पेशव्याची सक्त आज्ञा होती.  परंतु हि व्यवस्था दादाला थोडी मानवणार होती ? पेशव्याच्या मृत्यूनंतर त्याने आपला मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणत २५ लाखांच्या जहागीरीची व चाकरीची मागणी केली. त्यावेळी नारायणास पेशवाईची वस्त्रे मिळाली नव्हती व विना जहागीर दादा काही नारायणासोबत साताऱ्यास वस्त्रे घ्यायला जात नव्हता. परंतु शेवटी आनंदीबाईसह बऱ्याच जणांचे मत दादाच्या विरोधात पडल्याने माघार घेत त्याने नारायणासोबत साताऱ्यास जाणे मान्य केले.
ता. १३ डिसेंबर १७७२ रोजी नारायणास पेशवाईची वस्त्रे मिळून दिवाणगिरी सखारामबापूला तर फडणीशी मोरोबा – नानाला प्राप्त झाली. त्यानंतर स्वारी पुण्यास परतली. मधल्या काळात दादा – नारायणाचे सुत चांगलेच जुळले होते परंतु पुण्यास परतल्यावर उभयतांचे बिनसत चालल्याचा उल्लेख इतिहासकार करतात.

    माधवरावाने नारायणास ता. २८ ऑगस्ट १७७१ रोजी जो नऊ कलमी उपदेश केला होता, तो पाहता नारायणाचा स्वभाव हा टोकाचा असल्याचे दिसून येते. उदासीनता व क्रोध किंचित कार्यकारण धरण्याचा जो सल्ला माधवाने नारायणास दिलाय त्यावरून तरी हेच सूचित होते. खेरीज याच काळात माधवाने नारायणास नाना फडणीसबरोबर सख्य ठेवण्याचा उपदेश केला होता. यावरून राज्यकर्त्यास आवश्यक असलेल्या गुणांची मुळातच नारायणाकडे उणीव असल्याचे दिसून येते. परंतु त्यातून नारायणराव अगदीच पोरकट अथवा पदास नालायक असल्याचे सिद्ध होत नाही. पानिपतच्या पराभवानंतर घरातील एकापाठोपाठ एक कर्ती माणसं निघून गेल्याने त्याच्यापुढे थोरल्या भावाचा --- माधवरावाचाच काय तो आदर्श असून त्याच्या गुणांचे तो अनुकरण करे. परंतु, आधी म्हटल्यानुसार राज्यकर्त्यास आवश्यक अशा गुणांची मुळातच वानवा असल्याने अशा अनुकरणाने नारायणचा टिकाव लागणे शक्य नव्हते व झालेही तसेच.

    नारायणाच्या कारकिर्दीला सुरवात होताच पेशव्यांचा कारभार आता पेशवे स्वतःच्या नव्हे तर कारभाऱ्यांच्या तंत्राने उलगडणार असल्याचा मुत्सद्द्यांचा अंदाज तत्कालीन पत्रांतून आढळून येतो. माधवरावाने आपल्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी नारायणास दिवाणगिरी देऊन बापूस त्याची मुतालिकी दिल्याने व नारायणास पेशवाई मिळाल्यावर बापूस कारभाऱ्याची वस्त्रे मिळाल्याने नारायणाने त्याच्याच तंत्राने बव्हंशी कारभार केल्याचे दिसून येते. अर्थात, कित्येक प्रसंगी त्याने बापूलाही धुडकावून लावले असले तरी बापूला त्याने  दुखावल्याचे दिसून येत नाही. उलट विसाजीपंत लेले प्रकरणी बापूच्या विरोधात विसाजीपंतास नारायणाने आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली. यावेळी नाना फडणीस विसाजीचा विरोधक असून या प्रकरणी नाना – बापूत झालेल्या वादामुळे नाना फडणीस कारभारात फारसा सक्रीय राहिला नसल्याचे इतिहासकारांनी नमूद केले आहे.

    नारायणरावाची कारकीर्द तशी उण्यापुऱ्या आठ महिन्यांची. या आठ महिन्यांच्या कारकिर्दीत नागपूरकर भोसल्यांचा गृहकलह, दादाच्या मदतीकरता हैदरने केलेली कारस्थाने, विसाजीपंत लेल्याचे प्रकरण व प्रभूंचे ग्रामण्य हि मुख्य प्रकरणं असून यातील सहभागी व झळ पोचलेल्या इसमांचा नारायणरावास कैद कारस्थानांत सहभाग असल्याचे दिसून येते. वस्तुतः हि सर्व प्रकरणे वा करणे तात्कालिक होती. क्षणिक होती. प्रत्यक्षात थेऊरला जेव्हा माधवराव अखेरचा काळ व्यतीत करत होता तेव्हाच रघुनाथरावाने कैदेतून निघून पुन्हा राज्यप्राप्तीचे प्रयत्न करण्याचे बेत आखले होते. तात्पर्य, दादा आपल्या हक्कांसाठी जागरूक असून कोणत्याही परिस्थितीत ते मिळवल्याखेरीज शांत बसायचे नाही हा त्याने निश्चयचं आखला होता.

    नारायणाच्या आठ महिन्यांच्या कारकिर्दीत शक्य त्या प्रकारे दादाने पुण्यातून निघून जाण्याची खटपट केली. वेळोवेळी ती उघडकीस येऊन त्यावरील कैद आणखी कडक झाली. परिणामी दादा अधिकाधिक निकरावर येऊ लागला. नारायणाची सत्ता उलथवण्याची कारस्थाने आखू लागला. यांपासून काहीसा बेपर्वा असलेला नारायण पूर्वील संप्रदायानुसार कर्नाटकांत स्वारी करता जाण्याच्या बेतात असून त्याने उत्तरेतील सरदारांना दक्षिणेत परतण्याची आज्ञापत्रे रवाना केली होती. या दरम्यान नागपूरकरांच्या वारसा युद्धाचा गोंधळ सुरूच होता.

    जानोजी भोसल्याने मृत्यूसमयी भावाच्या मुलास --- मुधोजी पुत्र रघुजीला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु माधवरावास ते नामंजूर होते. कारण मुधोजी दादाचा पक्षपाती होता. इकडे मुधोजीचा भाऊ साबाजीने, मुधोजीच्या विरोधात कारस्थाने रचण्यास सुरवात केली. मृत जानोजीची पत्नी दर्याबाईस आपल्या कटांत मिळवून घेत तिला गरोदर असल्याचे नाटक करण्याची व तशी अफवा पसरवण्याची सूचना केली. त्यानुसार दर्याबाईने तसा पुकारा केल्याने दत्तकाचे राजकारण बंद होऊन साबाजी – मुधोजीचा संघर्ष हातघाईवर येण्याची चिन्हं दिसू लागली. तेव्हा पेशव्याने प्रसंगावर नजर देत साबाजीचा पक्ष स्वीकारला तर साबाजीच्या विनंतीनुसार निजामही त्याच्या पक्षाला मिळाला. वारसा युद्धात निजामाची मदत घेणे हे कनकापूरच्या तहाचे उल्लंघन होते कि काय याविषयी सबळ पुराव्याअभावी काही लिहिता येत नाही. असो.
मुधोजी – साबाजीचा लढा रंगात येऊ लागला व जरी माधवराव पेशवा साबाजीचा पक्षपाती असला तरी उभयतांत तडजोड व्हावी अशी त्याची मनोमन इच्छा असून त्यानुसार त्याची खटपटही चालली होती. परंतु त्याचे अखेरचे दिवस, नंतर मृत्यू व नारायणास पेशवाई मिळेपर्यंत हे प्रकरण आणखी चिघळत गेले. पुढे पेशवाई मिळताच नारायणाने साबाजीच्या मदतीला फौज पाठवून मुधोजीचा पाडाव करण्याची मसलत आखली. नारायणाचे हे कृत्य दादाला आवडले नाही हे नमूद करण्याची अर्थातच गरज नाही.

    पेशवा, निजाम, साबाजीच्या संयुक्त सैन्यापुढे मुधोजीचा टिकाव फार काळ लागणे शक्यच नव्हते. परंतु एका संग्रामात भोसले घराण्यातील जिजाजी भोसले मारला गेल्यावर उभय पक्षीय मुत्सद्द्यांनी संघर्ष टाळून सामोपचाराने प्रकरण निकाली काढण्याची शिकस्त केली. परिणामी उभय बंधूंचा तात्पुरता समेट होऊन भोसल्यांचा गृहकलह शांत झाला. परंतु अल्पावधीत फिरून प्रकरण मूळपदी आले. दरम्यानच्या काळात मुधोजीने पाठवलेले व्यंकटराव व लक्ष्मणराव काशी हे वकील पेशव्याच्या प्रभु ग्रामण्य प्रकरणात अडकले होते. साबाजी सोबत झालेला तात्पुरता समेट फिस्कटताच मुधोजीने पुण्यातील आपल्या वकिलांना हरप्रयत्ने दादाच्या मार्फत आपले राजकारण सिद्धीस नेण्याची आज्ञा केली.

    त्यानुसार एके रात्री लक्ष्मण काशीचा हात धरून दादा शनिवारवाड्यातून बाहेर पळून जात असताना पहारेकऱ्यांनी त्यांस पकडून नेले. लक्ष्मण कशी मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. दादाच्या या वारंवारच्या पलायन नाट्याने वैतागून गेलेल्या नारायणाने त्याची नजरकैद आणखी सक्त केली. त्यामुळे दादाने उपोषणाचे शस्त्र उगारले. नवरा उपाशी म्हटल्यावर आनंदीबाईनेही अन्न टाकले. अर्थात, प्रकरण अशा प्रकारे चीडीस पेटू लागले तेव्हा सल्लागारांनी नारायणास समजुतीने घेण्याचा सल्ला दिला. परंतु त्याने तो जुमानला नाही. अशातच प्रभूंच्या ग्रामण्याची भर पडल्याने राज्यातील एक मोठा अधिकारी वर्ग पेशव्यावर रुष्ट झाला. प्रभूंच्या ग्रामण्याव ज्या प्रमुख प्रभू व्यक्तींच्या सह्या होत्या, त्या त्यांनी आपखुशीने केल्या नव्हत्या हे उघड आहे. मिळून नारायणरावाने स्वहस्ते अराजकाला, क्रांतीला आमंत्रण देऊ केले होते. आता फक्त कट – कारस्थानं रचून ती प्रत्यक्ष अंमलात आणणे बाकी होते.

    रघुनाथरावाला मानणारा एक मुत्सद्दी वर्ग अजून पुणे दरबारी बऱ्यापैकी आपलं वजन राखून होता. त्या वर्गाने दादाच्या संमतीने नारायणास कैद करून दादाला पेशवाईवर आणायचे कारस्थान रचण्यास आरंभ केला. याकामी लष्करी मदतीची आवश्यकता असल्याने हैदर, भोसले यांच्याकडे दादाच्या हस्त्कांची राजकारणे खेळू लागली. या संदर्भात निजामाशी काही पत्रव्यवहार झाला होता / नव्हता याची स्पष्टता होत नाही. नारायणास कैद करण्याच्या कारस्थानात मुधोजी भोसल्याच्या हस्तकांचा – लक्ष्मण व व्यंकट काशी यांचा दुहेरी संबंध आला. एक प्रभूंच्या ग्रामाण्यामुळे व दुसरा मुधोजी भोसले दादाचा पक्षपाती असल्याने. 

    हैदरला पुण्यातील घडामोडींशी तसंही काही देणं घेणं नव्हतं. कृष्णा नदी त्याने आपल्या राज्याची हद्द मानल्याने तिथपर्यंतचा प्रदेश ताब्यात घेण्याची त्याची अभिलाषा होती. अर्थात, नारायण काय अन् दादा काय, दोघेही हैदरला हा प्रदेश सुखासुखी देणार नव्हते. म्हणून पेशव्याच्या गृहकलहाचा फायदा उचलण्याचे त्याने योजले. नारायणास कैद करण्याच्या कारस्थानात जसजशी अधिकाधिक मंडळी सहभागी होऊ लागली तसतसा कटाचा मुख्य उद्देशही बाजूला पडून कारस्थानास वेगळाच रंग चढत गेला.

    दादाच्या सेवेतील शागीर्द, हुजरे तसेच त्याच्या समर्थक मुत्सद्द्यांनी सरकार सेवेतून नुकत्या मुक्त केलेल्या गारदी पथकांपैकी काही पथक प्रमुखांना फितूर केले. मात्र, गारद्यांनी नारायणास कैद करून रघुनाथरावास बंदीतून मोकळे करण्याची जोखीम उचलली खरी परंतु पकडायच्या वेळी जर नारायणास काही दगाफटका झाला तर त्याचा ठपका गाराद्यांवर ठेवला जाणार नाही अशा आशयाचा त्यांनी दादाकडून अभयलेखही लिहून घेतला.

    नारायणास पकडण्याच्या मसलतीत नाना फडणीस, हरिपंत फडके व त्रिंबकराव पेठे नसल्याचा कबुली जबाब महंमद इसफ या गारदी सरदाराने नंतर दिला आहे. तर नारायणास ठार करण्याचे कृत्य सुमेरसिंगाने आयत्या वेळी केल्याचे इसफचे म्हणणे आहे.
तुळाजी / तुळया पवाराच्या साक्षीनुसार, नारायणास धरून दादाला बाहेर काढण्याचा कट महंमद इसफणेच त्यांस कळवला. तसेच यात सहभागी होण्याची गळही घातली.

    पाच लाख रुपये व नगर, साष्टी, पुरंदर किल्ल्याच्या प्राप्तीसाठी सुमेरसिंग, खरकसिंग, बहादूरसिंग व महंमद इसफ या चार गारदी अंमलदारांनी नारायणराव पेशव्यास पकडण्याची सुपारी घेतली. परंतु तत्पूर्वीचा थोडा इतिहासही पाहणे आवश्यक ठरेल.

    पेशव्यांच्या काळात त्यांच्या सैन्याला नियमित पगार कधीच मिळत नसे. गारदीही त्यास अपवाद नव्हते. बहादूरसिंग व्यतिरिक्त उपरोक्त तीन अंमलदार मुजफ्फरखानाच्या हाताखालील असून पेशव्यांच्या चाकरीत येऊन त्यांना सुमारे पंधरा काळ लोटला होता असे रियासतकार सरदेसाई सांगतात.

    इसफ, सुमेरसिंग यांच्यावर पेशव्याची मर्जी असून खुनापूर्वी काही दिवस आधी सुमेरसिंग आपल्या लग्नासाठी चांदवडला गेला असता त्यांस लग्नाचे साहित्य पुरवण्याचा नारायणराव पेशव्याने चांदवडच्या कमाविसदारास हुकुमही दिला होता. परंतु असे असले तरी, प्रस्तुत घटनेच्या काही महिने आधी आर्थिक चणचणीमुळे पेशव्याने काही गारदी पथके सेवेतून कमी केली होती. अर्थात, परत त्यांना चाकरीवर घेण्याचे आश्वासनही देण्यात आले होतेचं. शिवाय त्यांचा थकीत पगारही शक्य तितक्या लवकर देण्याचे आश्वासन देण्यात आले. पेशवाईतील लष्कराच्या देण्याचा हा नेहमीचा भाग असल्याने यात विशेष असं म्हत्त्वाचा वा संशयास्पद असं काहीच नाही. तसेच नारायणाचा खून व्हायच्या दहा दिवस आधीचं गारद्यांना थकलेल्या पगारापैकी तीस हजार रुपये दिल्याचा उल्लेख आहे.

    खुनाच्या काही दिवस आधी शिवाजी कान्होने मोरोबा फडणीस कडून सतराशे पुतळ्या व सदाशिव रामचंद्र कडून दीड हजार मोहोरा महंमद इसफला दिल्या.

    पेशव्याला कैद करण्याच्या कटात पुणे दरबारातील बव्हंशी प्रमुख मुत्सद्दी – सरदार सहभागी होते. त्यापैकी काहींची नावे पुढीलप्रमाणे :- सखारामबापू , मोरोबा फडणीस, चिंतो विठ्ठल, आबाजी महादेव सोवनी, हरि भिडे, विठ्ठल विश्राम, मालोजी घोरपडे, सदाशिव रामचंद्र, सखाराम हरी गुप्ते, विसाजी दाते इ. शिवाय गोविंदराव गायकवाड, मुधोजी भोसल्याचे हस्तक व्यंकट व लक्ष्मण काशी, भवानराव प्रतिनिधी यांचा देखील कैद कारस्थानात सहभाग होता. मात्र, मानाजी फाकडे, बजाबा पुरंदरे दादाचे पक्षपाती असूनही यात सहभागी झाले नाहीत. इंग्रजांचा पुण्यातील वकील मॉस्टीनलाही या बेताची कल्पना असून त्यात त्याचाही थोडाफार सहभाग होताच. सारांश,  एवढी मोठमोठी मुत्सद्दी मंडळी ज्या कैद कारस्थानात गुंतली होती त्यांनी पेशव्यास पकडण्याची जबाबदारी गारद्यांवर सोपवत त्याकरता पाच लाख रुपये कबूल करूनही निम्म्याचा देखील आगाऊ भरणा न करावा हे आश्चर्य ! त्याहूनही विशेष म्हणजे गारद्यांनी देखील पुरेशी रक्कम हाती पडण्यापूर्वीच मसलत सिद्धीस नेली. एकूण प्रकरण तितकेसे साधे – सरळ नाही हे निश्चित !

    दि. ३० ऑगस्ट १७७३ रोजी नारायणराव रघुजी आंगऱ्यास भेटण्याकरता पर्वतीला गेला. तेथील भेटीत आंगऱ्याने पेशव्यास कटाची कल्पना दिली. आंगऱ्याची भेट झाल्यावर पर्वतीवरील भोजनाचा समारंभ होऊन पेशवा वाड्यात परतला. आंगऱ्याने सांगितलेली वार्ता त्याने हरीपंताच्या कानी घालून त्यांस कटवाल्यांचा बंदोबस्त करण्याची आज्ञा केली. हरीपंतास त्यावेळी एके ठिकाणी भोजनास जायचे असल्याने त्याने, ‘ नंतर पाहता येईल ‘ अशा भावनेने पेशव्याच्या आज्ञेकडे थोडे दुर्लक्ष केले. आपली जबाबदारी फडक्यावर सोपवून पेशवा महाली जाऊन निजला. घडल्या प्रकाराची बातमी तुळाजी पवारला समजली. तसेही पेशव्यावर नजर ठेवण्याची त्याकडे जबाबदारी असल्याचे इतिहासकार सांगतात. 

    पवाराने गारद्यांना घाई करण्याची सूचना केली तेव्हा अर्ध्या एक घटकेत सुमेरसिंग व महंमद इसफ सुमारे पाऊण हजार शिपायांसह शनिवारवाड्यात शिरू लागले. तेव्हा दरवाजावरील बुधसिंग जमादार त्यांना रोखू लागला. त्यासमयी बुधसिंगला ठार करून व नंतर दिसेल त्यावर वार करत वा बडवत शिपायांचा घोळका आत शिरला. आत गेल्यावर त्यांनी प्रथम वाड्याचे दरवाजे लावून घेतले व मग पेशव्याचा शोध घेण्यास आरंभ केला.

    सुमारे हजारभर लोकांच्या जमावाचा गोंधळ, वाड्यातील नोकर – चाकारांचा कालवा यांमुळे पेशवा जागा झाला. प्रसंगाचं यथाशक्ती आकलन होताच त्याने बचावासाठी रघुनाथाकडे धाव घेतली. पाठोपाठ गारदीही होतेच. पुढील घटनाक्रम सर्वांच्या परिचयाचाच आहे तेव्हा तो देत नाही. परंतु या ठिकाणी एक शंका उपस्थित होते व ती म्हणजे रघुनाथाच्या महाली नारायण गारद्यांच्या व दादाच्या तावडीत सापडला असता त्यांस आजन्म कैदेत टाकायचं सोडून दादाने त्यांस गारद्यांकरवी का मरू दिले असावे ?

    मृत्यूपूर्वी दादाने या कृत्याचे प्रायश्चित्त घेताना जी साक्ष दिली त्यानुसार, दादाने गारद्यांना नारायणास कैद करण्याचा जो लेखी हुकुमनामा दिला त्यामध्येच जर पेशव्याला कैद करतेसमयी दगाफटका झाल्यास गारद्यांना जबाबदार धरले जाणार नसल्याचा खुलासाही त्याने गारद्यांच्या आग्रहानुसार केला. तसेच घटनेच्या प्रसंगी नारायणास ठार मारू नये म्हणून गारद्यांना रोखीत असतानाही गारद्यांनी दादास धुडकावून नारायणावर घाव घातला.
पेशव्याचा खून करण्याचे कृत्य सुमेरसिंगाने आयत्या वेळी केले असे महंमद इसफचे म्हणणे व दादाची प्रायश्चित्त समयीची साक्ष यातून नारायणाच्या खून प्रकरणाचा थोडाफार उलगडा होऊ शकतो.
दादाप्रमाणेचं आनंदीबाईनेही प्रायश्चित्त घेताना जी साक्ष दिली, त्याव्वरून नारायणास पकडण्याच्या कटाची तिला वार्ता असल्याचे समजते. मात्र पेशव्याच्या खुनाच्या मसलतीची खबर नसल्याची कबुलीही तिने दिली आहे.

    नारायणरावाच्या खून व कैद कारस्थानात सहभागी असणाऱ्या इसमांना प्रसंग व अपराधानुसार शिक्षा देण्यात आल्या. पेशव्यावर हात टाकणाऱ्या गारद्यांचे तर निर्वंश करण्यात आल्याचे सरदेसाई नमूद करतात. परंतु नारायणरावास धरण्याच्या कटास कलाटणी देऊन त्यावर शस्त्र चालवणाऱ्या सुमेरसिंगाला मात्र अटक करता आली नाही. स. १७७४ च्या जुलैमध्येच तो इंदूर येथे मरण पावला.
नारायणाला पकडण्याचे जे कारस्थान रचण्यात आले व त्यांस पूर्णत्वास नेण्याच्या कामी ज्यांनी – ज्यांनी मदत केली त्या सर्वांचीच नावे वा कटाचे तपशील संपूर्णतः उघड झाले असावेत असे वाटत नाही.

    नारायणराव खून प्रकरणातील काही प्रमुख शंकास्थळे :- (१) महंमद इसफ खेरीज सुमेरसिंग, खरकसिंग व बहादूरसिंग हे यावेळी पेशव्याच्या सेवेत होते वा नव्हते ? (२) महंमद इसफ व त्याचे पथक सेवेत नसल्याने विना परवाना ते सहजगत्या आत कसे शिरले ? दरवाजावरील बुधसिंग जमादार घुसखोरांना अडवताना मारला जातो. पण त्याच्या हाताखालील सैनिकांचे काय झाले याची स्पष्टता होत नाही. (३) शनिवारवाड्यातील कत्तलीत १ पेशवा, ९ पुरुष सेवक, २ कुणबिणी मिळून १२ व्यक्ती मारले गेले. स. १७७३ सालच्या पेशवाईचे हिंदुस्थानच्या राजकारणातील महत्त्व लक्षात घेता पेशवाईचा चालक इतक्या सहजासहजी मारला जावा अन् त्याच्या वतीने शस्त्र उपसण्यास कोणीच न यावे हे थोडं विलक्षणचं आहे.

    बाकी कटाची माहिती मिळूनही हरिपंताने त्याकडे दुर्लक्ष करणे, घटनेच्या काही दिवस आधी नाना फडणीस पुण्यात नसणे या गोष्टीही विचारात घेतल्या पाहिजेत. खेरीज दादाने गारद्यांना दिलेल्या हुकुमातील ‘ धरावे ‘ शब्दाचे  ‘ मारावे ‘ कोणी व कसे केले याचाही थोडाफार विचार करणे आवश्यक आहे. कारण, फरक एका अक्षराचा नसून शब्दाचा आहे व याकामी जिचे नाव घेतले जाते ती आनंदीबाई दोषी असल्याचे तत्कालीन पत्रांत तरी दिसून येत नाही.

    शनिवारवाड्यातील गोंधळाची वार्ता पुण्यात पसरून गडबड उडाली. शहरातील पेशव्यांचे सरदार, पथके वाड्याकडे धावले. परंतु वाड्याचे दरवाजे बंद असल्याने व आतील घटनांची कसलीच कल्पना असल्याने त्यांनी वाड्याभोवती चौक्या पेरण्यापलीकडे काही केले नाही. आतमधला गोंधळ शांत झाल्यावर दादाने वाड्याबाहेर थांबलेल्या मुत्सद्द्यांना आत बोलावले असता बजाबा पुरंदरे, भवानराव प्रतिनिधी, सखारामबापू, मालोजी घोरपडे हि मंडळी आत गेली. वाड्यात गेल्यार घडला प्रकार कळताच सर्वांनी दादाचा निषेध केला. हि गोष्टही विचारात घेण्यासारखी आहे.  

    त्यानंतर दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आले. गंगाबाईने यावेळी आकांत मांडून सती जाण्याचा हट्ट धरला तेव्हा तिला खोलीत कोंडून ठेवण्यात आल्याचे इतिहासकार नमूद करतात. तसेच या समयी ती तत्कालीन समजुतीनुसार अस्पर्श असून तिला दिवस गेल्याचे वाड्यातील मंडळींना समजले न समजले याची स्पष्टता होत नाही. गंगाबाईला सती जाऊ न देण्यामागे वाड्यातील वर्तमान फुटून जनमत विरोधात जाण्याचा धोका असल्याने दादाने हा प्रकार घडू दिला नाही असा एक अंदाज वर्तवला जातो. असो, पेशव्याच्या देहाचे गुपचूप दहन करण्यात आले. 

    दुसरा महत्त्वाचा प्रश्न गारद्यांचा होता. वाड्यावर त्यांचाच कब्जा असून दादही एकप्रकारे त्यांच्याच छत्रछायेत होता. आपले सर्व पैसे, किल्ले कबूल केल्याप्रमाणे देण्याचा गारद्यांनी तगादा लावला. अर्थात, दादाच्या भेटीस आलेल्या मंडळींनी त्यांची समजूत पाडून आधीचे पाच लक्ष व किल्ल्यांच्या बदल्यात तीन लाख मिळून आठ लक्ष रुपये देण्याचे मान्य केले. यासंबंधी एका पत्रात पुढील आशयाचा मजकूर आढळतो कि, ‘ गारद्यांनी निम्म्या राज्याची मागणी केली ; त्यांच्या मागण्या अमान्य केल्यास अलीबहाद्दरला गादीवर बसवण्याचा धाक घातला ; शहरातील कित्येक मुस्लीम शस्त्र घेऊन गारद्यांना मिळत आहेत. ‘

    मसनदी वरील पेशवा बदलणे हा शिपायांचा नव्हे तर मुत्सद्द्यांचा खेळ होता. बाजीराव – मस्तानीच्या वंशजांना पेशवाई मिळणे शक्य नव्हते व निम्म्या राज्याची मागणी गारद्यांनी करणे संभवत नाही. बारकाईने पाहिले तर गारदीच आता मराठी सरदारांच्या कचाट्यात सापडल्याने त्यांना दादाला विरोध न करता त्याच्याच कलाने घेणे भाग होते व ते तसेच करत होते. मग अशा वार्ता तत्कलीन लेखांत का आढळतात ?

    नारायणाचा खून झाल्यावर दादाने लगोलग पेशवाईची वस्त्रे घेतली नाहीत. आरंभी पुत्र अमृतरावाच्या नावे वस्त्रे घेण्याचा त्याचा विचार होता व त्याने अमृतरावास साताऱ्याला रवानाही केले. परंतु, नंतर आनंदीबाईच्या सल्ल्याने त्याने हा बेत बदलून अमृतरावास वस्त्रे आपल्या नावे आणण्याची आज्ञा केली असे सरदेसाई नमूद करतात. ऑक्टोबर महिन्यात आळेगाव मुक्कामी दादाने पेशवाईची वस्त्रे घेतली व शिका बनवताना त्यात विद्यमान छत्रपती रामराजाचे नाव न टाकता मृत शाहूचेच नाव ठेवले.

    यावेळी रघुनाथराव स्वारीकरता बाहेर पडला असून सोबत दरबारचे बव्हंशी मुत्सद्दी – सरदार होते. स्वारीचे उद्दिष्ट होते निजाम - साबाजीचा पाडाव करून मुधोजी भोसल्याचा जम बसवून देणे.
मृत नारायणरावाने साबाजीचा पक्ष उचलून धरला होता. नारायणाचा खून झाल्यावर मुधोजीचे बळ वाढले तेव्हा साबाजीने निजामाला मदतीस बोलावले. पर्यायाने मुधोजीच्या रक्षणाकरता दादाला निजामावर शस्त्र उपसणे भाग होते. याच सुमारास माधवराव पेशव्याच्या काळात उत्तरेत गेलेला विसाजी कृष्ण बिनीवाले नारायणरावाच्या आज्ञेने दक्षिणेत परतला होता. तो दादाला स्वारीतच भेटला व खजिना वगैरे त्याच्या हवाली करून नव्या मोहिमेत सहभागी झाला.

    दरम्यान प्रसंग पाहून माधवराव – नारायणरावाच्या पक्षातील सर्व मंडळी दादाच्या सेवेत दाखल झाली होती. यामागे स्वसंरक्षण, हितसंरक्षण असे उद्देश होतेच. पण याच काळात दादाचा कट्टा अभिमानी म्हणून इतिहासकारांनी बदनाम केलेल्या सखारामबापूने दादालाच पेशवाईवरून काढण्याचा डाव रचण्यास आरंभ केला होता.
या ठिकाणी बारभाई कारस्थानाच्या उत्पादकांची थोडीफार तरी चर्चा करणे आवश्यक आहे. बारभाई कट किंवा दादाला पदच्युत करून गंगाबाईच्या नावे कारभार हाती घेण्याचा नेमका डाव कोणाचा ? बापूचा कि नानाचा ? इतिहासकारांत याविषयी मतभेद आहेत. नाना समर्थक याचे श्रेय फडणीसला देतात तर बापू समर्थक सखारामास ! यात सत्य ते नेमकं काय ?

    नारायणाच्या कैदेच्या कटात जी मंडळी सहभागी होती त्यातील बव्हंशी मंडळी बारभाई कारस्थानात सहभागी झाली. नारायणास धरण्याच्या कटाचा उद्देश, हेतू सरळ – स्पष्ट होता व तो म्हणजे दादाला पेशवाई देऊन नारायणास आजन्म बंदीत ठेवणे. परंतु नारायणाचा खून होऊन कटाला वेगळेच वळण मिळाले असले तरी दादाला पेशवाई मिळाली होतीच ना ? मग तरीही बापू प्रभूती मुत्सद्दी त्यांस पदच्युत करण्याच्या उद्योगाला का लागले ?

    नाना फडणीस हा माधवरावाचा पक्षपाती असला तरी नारायणच्या कारकिर्दीत मात्र तो कारभारात असून नसल्यात जमा होता. यामागील कारण लक्षात येत नाही. इतिहासकारांच्या मते, नारायण नानापेक्षा बापूच्या तंत्राने अधिक कारभार करत असल्याने नानाचे तेज मावळले होते. परंतु या युक्तिवादात दम नाही. कारण, नारायण बापूलाही जितक्यास तितकेच महत्त्व देत असल्याचे इतिहासकारांनीच नमूद केले आहे. अशा स्थितीत उपरोक्त कारणास महत्त्व देता येत नाही.

    नारायणास कैद करण्याचे जे कारस्थान रचले जात होते त्याची दरबारातील सर्वच प्रमुख मुत्सद्दी – सरदारांना कल्पना असताना व नाना फडणीसचा भाऊ मोरोबा देखील त्या कटात सहभागी असताना नानाला त्याची अजिबात वार्ता नसावी हे संभवत नाही. कदाचित या भानगडीत न पडण्याचे त्याचे धोरणही, त्याच्या तटस्थतेला कारणीभूत ठरले असावे. परंतु या तर्कांना काही अर्थ नाही. पुण्यात जवळपास सर्व मुत्सद्दी – सरदार मंडळाला माहिती झालेलं कारस्थान नाना फडणीस, हरिपंत फडके व पेठे यांना माहिती नसावे हे काही पटत नाही, इतकेच इथे नमूद करतो.

    नारायणाचा खून झाल्यावर दादा पेशवा बनला. तख्तावरील धनी बदलला तरी लगोलग त्याने कोणाच्याही पदांच्या घालमेली केल्याचे दिसत नाही. हरिपंत फडके तेवढा या काळात दादापासून लांब राहिल्याचे उल्लेख मिळतात. यामागील कारण समजत नाही.
 मृत नारायणाची पत्नी गंगाबाई या काळात गर्भवती असल्या – नसल्याची बातमी उघड झाली होती वा नव्हती याविषयीचा स्पष्ट उल्लेख अजून मला आढळलेला नाही. तेव्हा दादाला पेशवाई मिळताच लगोलग नाना फडणीस कट कारस्थान रचण्यात गुंतला असे म्हणता येत नाही.

    बारभाई कारस्थानास नक्की कधी सुरवात झाली याची स्पष्टता होत नसली तरी दादाच्या निजाम – हैदर स्वारीतच हा कट शिजून कार्यान्वित झाला हे नक्की ! म्हणजे कटाच्या उत्पादकांना गंगाबाई गर्भवती असल्याचे माहिती असून सत्तालोलुप दादा वा राक्षसी महत्त्वकांक्षा असलेल्या आनंदीबाईस याची कल्पना नव्हती असे म्हणायचे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. गंगाबाईला शनिवारवाड्यातून नाना – बापूने स. १७७४ च्या जानेवारीत बाहेर काढले.

    तत्पूर्वी स्वारीसाठी दादासोबत बाहेर आलेल्या मंडळींपैकी प्रथम बापू ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्येच मागे फिरला. पाठोपाठ काही ना काही निमित्ताने कटात सहभागी असलेले मुत्सद्दी बाहेर पडले. मात्र कटवाल्यांचे कित्येक फौजबंद सरदार दादाचा पक्ष पोखरण्यासाठी त्याच्या सोबतच राहिले. नाना फडणीस डिसेंबरात स्वारीतून निघून आला. म्हणजेच ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान बापू – नाना प्रभूती मुत्सद्द्यांना गंगाबाई गर्भवती असल्याचे समजताच त्यांनी कारस्थान उभारणीस आरंभ केला असे तरी म्हणावे लागेल किंवा सप्टेंबर – ऑक्टोबर मध्येच याची वाच्यता होऊन कटाच्या आखाणीस आरंभ झाला असे म्हणावे लागेल. पण तरीही या कामी पहिले पुढारपण कोणी घेतले ? बापूविषयी चर्चा आधीच झाली आहे. नानाने या कटाची निर्मिती केली म्हणावे तर मग बापू त्याला सामील का झाला याचे उत्तर मिळत नाही. बापू सोडा पण, दादाचे जे पक्षपाती व नानाचे मोरोबासारखे प्रतिस्पर्धीही नानाला कसे अनुकूल झाले हा प्रश्नही उद्भवतोच. तात्पर्य, बारभाई कारस्थानाचा निर्माता आजही अज्ञात आहे असे म्हाणावे लागेल.

    दादा निजामाच्या स्वारीत दंग असता बापू – नानाच्या सोबत दादाविरोधी कटात गुंतलेली मंडळी हळूहळू त्याच्या तळावरून बाहेर पडली. इकडे दादाने निजामाशी किरकोळ झुंज घेत स. १७७३ च्या अखेरीस त्याच्याशी तह केला. त्यानुसार वीस लाखांचा प्रदेश व औरंगाबाद शहर त्याने पेशव्याला देण्याचे मान्य केले. परंतु नंतर दादाने या अटी माफ करून माधवरावाच्या वेळेस जे करारमदार झाले त्यानुसार चालण्याचे निजामाकडून कबूल करून घेतले. परंतु तहातील अटींची माफी दादाने बारभाई कारस्थानाचा उलगडा झाल्यावर दिली कि त्यापूर्वी याची नोंद मला मिळाली नाही.
बेदरला निजामाशी समेट झाल्यावर दादा कर्नाटकांत अर्काटकडे निघाला.

    स. १७७३ च्या सप्टेंबर मध्ये इंग्रजांनी अर्काटकर महंमदअलीच्या मदतीकरता फौज पाठवण्याच्या निमित्ताने तंजावरचा किल्ला व शहर जिंकून घेतले होते. इंग्रजांच्या या आगळीकीमुळे दादा संतप्त होऊन तिकडे निघाला. दरम्यान दादाच्या कर्नाटक स्वारीत सहभागी होण्यासाठी गुत्तीचा मुरारराव घोरपडेही तळावर येऊन दाखल झाला.

    दरम्यान नारायणाच्या खुनानंतरच्या राजकीय गोंधळाचा फायदा घेण्याची सल्ला पुण्यातील हैदरच्या वकिलाने दिली. त्यानुसार हैदरअलीने माधवरावाच्या काळात गमावलेला मुलुख परत जिंकून घेण्यास आरंभ केला. तेव्हा बेदरहून अर्काटकडे निघालेल्या दादाला हैदरकडे आपला मोर्चा वळवणे भाग पडले.

    इकडे पाठीमागे ता. १७ जानेवारी १७७४ रोजी नाना – बापूने गंगाबाईस शनिवारवाड्यातून बाहेर काढून पुरंदरास नेले. याकामी महादेव सदाशिव गोडसेचे सहाय्य मिळाल्याने त्यांस नंतर इनामही देण्यात आले. दादाला या बनावाची वार्ता लगोलग लागली नाही. रायदुर्ग जवळ हयग्रीवा नदी किनारी मुक्कामात भवानराव प्रतिनिधीचे व त्याचे वितुष्ट आले. तेव्हा दादाने प्रतिनिधीचा गोट लुटून त्यांस ताब्यात घेण्याची आज्ञा केली. परंतु ती आज्ञा कोणी जुमानेना. शेवटी हुजुरात व गारद्यांना हि कामगिरी सांगितली. आठवडाभर दादा – प्रतिनिधी आपापल्या जागी मोर्चे बांधून राहिले. प्रतिनिधी जीवावर उदार झाल्याचे पाहून दादाने आपला हात आवरता घेतला.

    दरम्यान हस्ते परहस्ते दादाला पुण्याची खबर मिळताच त्याने स. १७७४ च्या फेब्रुवारी मध्ये कृष्णा – तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील प्रदेश हैदरला देऊन त्याच्याशी तह केला. बदल्यात हैदरने वार्षिक सहा लक्ष खंडणीचा भरणा व दादा खेरीज कोणासही पेशवा न मानण्याचे मान्य केले.

    दादाला सरदारांची दगाबाजी लक्षात आल्यावर त्याने प्रतिनधी व रामचंद्र गणेशला कैद केले व कर्नाटकातील पटवर्धन, रास्त्यांच्या प्रदेशाची धूळदाण करत तो मिरजेकडे येऊ लागला. इकडे बारभाईंच्या सरदारांच्या फौजाही चहू बाजूंनी दादाला वेढण्यास येत होत्या. रणांगणातील हे तपशील कितीही मनोरंजक असले तरी प्रस्तुत विषयाच्या मर्यादेत बसत नसल्याने आपण यावेळच्या राजकीय हालचाली संक्षेपाने पाहू.

    गंगाबाईला पुरंदरी आणल्यावर मुत्सद्द्यांनी प्रथम तिच्या व गडाच्या संरक्षणाची तरतूद करून हरिपंत फडक्यास साताऱ्याला पाठवले व छत्रपतीकडून दादाला पेशवेपदावरून बडतर्फ केल्याचा हुकुम मिळवण्यात आला. दि. २७ फेब्रुवारी १७७४ रोजी छत्रपतींनी राज्यातील मुख्य अडतीस इसमांना उद्देशून काढलेल्या या आज्ञापत्राने दादा बंडखोर ठरला. खेरीज गंगाबाईच्या नावे वस्त्रे घेण्याचाही मुत्सद्द्यांचा विचार होता. परंतु तो अंमलात आणला गेला नाही. पुढे दादा व बारभाई सरदारांच्या जागोजागी चकमकी घडत असताना ता. १८ एप्रिल १७७४ रोजी गंगाबाई प्रसूत होऊन पुत्र झाला. त्याचे नाव सवाई माधवराव ठेवण्यात येऊन वयाच्या अवघ्या चाळीसाव्या दिवशी त्यांस पेशवेपदाची वस्त्रे बहाल करण्यात येऊन व बापू – नाना पेशव्याचे मुख्य कारभारीपद प्राप्त झाले. ( दि. २८ मे १७७४ )

    सवाई माधवरावाच्या जन्मामुळे दादाचे पारडे हलके पडून बारभाईंचा जोर वाढला व इतउत्तर राजकारणास निराळेच वळण लागत गेले.
                                 ( क्रमशः ) 

संदर्भ ग्रंथ :-
१)      छत्रपती शिवरायांची अस्सल पत्रे :- डॉ. नभा अनिल काकडे
२)      ऐतिहासिक पत्रबोध :- गो. स. सरदेसाई
३)      काव्येतिहास संग्रहांत प्रसिद्ध झालेले ऐतिहासिक पत्रे यादी वगैरे लेख :- संपादक – गो. स. सादेसाई, या. मा. काळे, वि. स. वाकस्कर
४)      मराठी रियासत ( खंड १ ते ८ ) :- गो. स. सरदेसाई
५)      मराठ्यांची लष्करी व्यवस्था :- डॉ. एस. एन. सेन – मराठी अनुवाद :- डॉ. सदाशिव शिवदे
६)      मराठेशाहीतील वेचक – वेधक :- य. न. केळकर
७)      भूतावर भ्रमण : ऐतिहासिक लेखसंग्रह :- य. न. केळकर
८)      काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे :- य. न. केळकर
९)      नाना फडनवीस यांचे चरित्र :- वा. वा. खरे
१०)  मराठ्यांच्या इतिहासाची साधने ( खंड १३, १४ ) :- वि. का. राजवाडे
११)  मराठी दफ्तर रुमाल पहिला (१) :- वि. ल. भावे
१२)  मराठी दफ्तर ( रुमाल २ ) :- वि. ल. भावे
१३)  फार्शी – मराठी कोश :- प्रो. माधव त्रिंबक पटवर्धन
१४)  मराठ्यांच्या इतिहासाची साधने ( खंड ८ ) :- वि. का. राजवाडे
१५)  दिल्लीच्या शहाजहानचा इतिहास :- मराठी अनुवाद – भ. ग. कुंटे
१६)  छत्रपती शिवाजी :- सेतू माधवराव पगडी
१७)  ताराबाई – संभाजी ( १७३८ – १७६१ ) :- गो. स. सरदेसाई
१८)  ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकर ( चरित्र व पत्रव्यवहार ) :- द. ब. पारसनीस
१९)  पुरंदरे दफ्तर भाग ३ रा :- कृ. वा. पुरंदरे
२०)  नागपूर प्रांताचा इतिहास :- या. मा. काळे
२१)  सरदेसाई स्मारक ग्रंथ :- श्रीपाद रामचंद्र टिकेकर
२२)  मराठी सत्तेचा उत्कर्ष :- न्या. महादेव गोविंद रानडे
२३)  शिंदेशाही इतिहासाची साधने, भाग ३ रा :- आनंदराव भाऊ फाळके 
२४)  मराठ्यांची बखर :- ग्रँट डफ लिखित व कॅप्टन डेविड केपन अनुवादित ( आवृत्ती ६ वी )      
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: