प्रस्तुत लेखमालिकेतील
प्रकरण ५ मध्ये शहाजी संदर्भात मी पुढील विधान केलं होतं कि, ' दि. १६ मे १६४९ रोजी आदिलशहाने
शहाजीची सुटका करत शाही कृपा दर्शवण्यासाठी बंगळूर प्रांताची जहागीर काही स्थळे
वजा करून त्याच्या ताब्यात दिल्याचे जेधे शकावली - करीन्यावरून दिसून येते. यावेळी
बहुतेक त्याला ' महाराज
' हि पदवी देण्यात आली असावी असा माझा तर्क आहे. कारण या
घटनेपूर्वी कोणत्याही सरकारी पत्रात शहाजीच्या नावाआधी महाराज पदवी लावल्याचे
दिसून येत नाही. ' परंतु शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड ३ मधील पत्र क्र. २५३६ नुकतेच
माझ्या अवलोकनात आले ज्यात महमंद आदिलशहाने शहाजीचा उल्लेख ' महाराज फर्जंद शहाजी
भोसले ' असा केलाय. सदर पत्राची तारीख दि. ११ जानेवारी १६४८ असल्याने ते शहाजीच्या
अटकेपूर्वीचे असल्याचे स्पष्ट होते. तेव्हा अनवधानाने चुकीची माहिती / विधान
केल्याबद्दल मी वाचकांची माफी मागत आहे.
मागील
प्रकरणांत आपण शहाजीच्या कैद - सुटकेची तपशीलवार चर्चा केली. त्यानुसार स. १६५४ पर्यंत
तरी शहाजी - शिवाजी या पिता - पुत्रांना इच्छा असूनही विजापूरकरांविरोधात उघड
कारवाया करता येत नव्हत्या. परंतु परिस्थिती अनुकूल नसल्यास उद्योगी, कर्तबगार
व्यक्ती स्थितीला अनुकूल करतात व या काळातील विविध राजकीय दरबारांतील घडामोडी
पाहता, ऐतिहासिक व्यक्तींची कर्मे पाहता या विधानाची सत्यता पटून येते.
उदाहरणार्थ, स. १६५३ मध्ये कंदाहार मोहिमेत मार खाल्लेल्या औरंगजेबाची दख्खनच्या
सुभ्यावर नेमणुक होणं. मीर जुम्लाचे याच काळात गोवळकोंड्याच्या सेवेतून मुक्त होऊन
कर्नाटकात स्वतंत्र सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु होणे. दरबारांतर्गत
भांडणे, कौटुंबिक कलह, आजारपण, सीमेवरील शत्रू तसेच सरदारांची बंडखोरी या सर्व
कटकटींना तोंड देत महंमद आदिलशहाचे आपले राज्य कायम राखणे इ. गोष्टी त्या त्या
व्यक्तीच्या पराक्रमाचे, कर्तबगारीचे द्योतकच आहेत.
उपरोक्त
परिच्छेदात उल्लेखलेल्या प्रत्येक व्यक्तीचा, घटनेचा स्वतंत्र व मनोवेधक इतिहास
आहे परंतु विषय मर्यादेस्तव आपणांस त्या चर्चेत खोलवर जाता येत नाही. परंतु
उपरोक्त घटना ज्यावेळी घडत होत्या, त्यावेळी शहाजी - शिवाजी हे पिता - पुत्र त्या
घटनांचा, घटना घडण्यास कारणीभूत व्यक्तींचा आपापल्या राजकारणाकडे सोयीस्कररित्या
कसा उपयोग करून घेत होते, हे पाहणे योग्य ठरेल.
आदिलशहाने
शहाजीवर लाख निर्बंध लादले तरी शहाजीचे अंतस्थ राजकारण काही थांबले नव्हते. शिवाजी
- औरंगजेबचा स. १६५७ चा जो काही पत्रव्यवहार उपलब्ध आहे त्यानुसार औरंगजेब दख्खनचा
सुभेदार म्हणून नियुक्त झाल्यापासून त्याचा व शिवाजी वा शहाजीशी पत्रव्यवहार सुरु
झाल्याचे दिसून येते. कंदाहार मोहिमेतील अपयशामुळे औरंगवर जरी शहाजहानची गैरमर्जी
झाली असली व दख्खनमधील त्याची नियुक्ती प्रामुख्याने तेथील सुभ्याचा आर्थिक कारभार
सुधारण्यासाठी झाली असली तरी केवळ हाच या नियुक्तीमागील प्रधान हेतू होता असे
नाही. शहाजहानच्या मुलांमधील अंतस्थ कलह --- विशेषतः दारा व औरंगजेब, तसेच मोगलांचे
दक्षिणेतील राज्यविस्ताराचे धोरण या गोष्टी देखील त्यांस तितक्याच कारणीभूत
असल्याचे उपलब्ध माहितीवरून दिसून येते.
दख्खनला
आल्यावर औरंगने प्रथम येथील महसूल व्यवस्था सुधारणा संबंधात तसेच लष्कराचा दर्जा
उंचावण्याच्या दृष्टीने जसे उपाय योजले त्याचप्रमाणे विजापूर, गोवळकोंडा हि राज्ये
जिंकण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न चालवले. त्यानुसार उपरोक्त दरबारातील असंतुष्ट
सरदारांना फोडणे, बंडखोरांना चिथावणी देणे, इ. प्रकार त्याने आरंभले. मोगलांच्या
प्रदेशाला लागूनच शिवाजीची नव्याने उदयास येणारी सत्ता असल्याने औरंगजेबाने थेट
शिवाजीशी पत्रव्यवहार केला कि पूर्वसंबंध पाहता शहाजी सोबत अथवा शहाजीने प्रथम
औरंगजेबाशी पत्रव्यवहार आरंभला याचा निर्णय करणे पुराव्याअभावी शक्य नसले तरी या
पिता - पुत्रांना विजापूर विरोधात चिथावण्याचे औरंगने शक्य तितके प्रयत्न केले यात
शंका नाही.
यावेळी
मोगलांशी अंतस्थ संधान जोडून शहाजीला नेमकं काय साध्य करून घ्यायचं होतं हे जरी
समजायला मार्ग नसला तरी याकाळात शिवाजीही स्वस्थ बसलेला नव्हता. मोगलांच्या
चिथावणीमुळे म्हणा वा स्वयंप्रेरणेने, शिवाजीने जावळीच्या मोऱ्यांना उकसवण्याचे
प्रयत्न सुरूच ठेवले होते. उभयतांचा पत्रव्यवहार उत्तरोत्तर अधिकच तिखट होत गेला.
यासंबंधी जी माहिती मिळते ती लक्षात घेता मोऱ्यांना डिवचून त्यांना आपल्यावर चालून
येण्यास --- अर्थात प्रथम आगळीक करण्यास भाग पाडण्याचा शिवाजीचा डाव होता, असा
संशय येतो. कारण शहाजी यावेळपर्यंत पूर्णतः बंधमुक्त झाला नव्हता. परंतु शिवाजीवर
उघड चालून येण्याची बुद्धी मोऱ्यांना झाली नाही व स. १६५५ मध्ये शहाजीही
विजापूरकरांच्या निर्बंधातून मोकळा झाला तेव्हा शिवाजीने त्वरा करून झपाट्याने
जावळी मारली. आपल्या राज्याच्या सीमेवर झालेल्या या घटनेकडे विजापूरकरांना लक्ष देण्यास
वा त्यावर उपाययोजना करण्यास वेळ मिळाला नाही. याचं मुख्य कारण म्हणजे महंमद
आदिलशहाचं आजारपण व औरंगजेबाची गोवळकोंड्यावरील चढाई !
औरंगजेबाची
तडफ व कामाचा उरक पाहता कंदाहार मोहिमेतून दख्खनला रवाना होतानाच त्याने विजापूर,
गोवळकोंडा बुडवण्याची तयारी आरंभली होती कि काय अशी शंका मनात येते. कारण इथली
सूत्रे हाती घेताच ज्या त्वरेने त्याने येथील मोगली प्रशासन, लष्कराची स्थिती
सुधारली व ज्या तडफेने त्याने प्रथम गोवळकोंडा व नंतर विजापुरावर आक्रमण केले, ते
पाहता त्याच्या उद्योगशीलतेचे, पराक्रमाचे कौतुक करावे, थोडेच आहे !
या संदर्भातील
उपलब्ध माहिती पाहता स. १६५५ मध्येच औरंगजेब मीर जुम्लाच्या निमित्ताने विजापूर वा
गोवळकोंड्यात घुसण्यास आतुर झाला होता. परंतु हे वर्ष मीर जुम्लाच्या धरसोडीने
वाया गेले. त्यामुळे औरंगला काही काळ गप्प बसावे लागले इतकेच.
इथे मीर
जुम्लाविषयी वाचकांना थोडी माहिती देऊ इच्छितो. मीर जुम्लाचे नाव महंमद सईद. तो
पर्शियातील आर्दीस्तानमधल्या एका तेल व्यापाऱ्याचा मुलगा. इतरांप्रमाणेच नशीब
आजमावण्यास हिंदुस्थानात आला व अंगच्या गुणांनी प्रथम हिऱ्यांचा व्यापारी व नंतर
गोवळकोंड्याच्या बादशहाचा मुख्य सेनापती व प्रधान बनला. मीर जुम्ला हे त्याचे पद
असले तरी त्याची राहणी, वर्तन हे बादशहा सारखेच होते व महत्त्वाकांक्षेला
पराक्रमाची जोड असल्याने कर्नाटकात कुतुबशाहीचा विस्तार करता करता त्याने स्वतःचे
एक प्रबळ सैन्यदल --- ज्यात सुसज्ज तोफखान्याचा समावेश होता --- व सुमारे ३०० मैल
लांब व ५० मैल रुंदीचा भूप्रदेश जहागिरीदाखल मिळवला. आपल्या या जहागिरीचे रुपांतर
त्याला स्वतंत्र राजसत्तेत करायचे होते व त्यानुषंगाने त्याने प्रयत्नही करून
पाहिले. त्यातूनच मोगलांशी त्याचा संबंध येऊन औरंगजेबला गोवळकोंड्यावर चालून
जाण्याची सबब प्राप्त झाली. तात्पर्य, जी महत्त्वाकांक्षा महंमद सईद सारखा उपरा
मनुष्य इथे येऊन धारण करतो व प्रत्यक्षात आणू पाहतो तर मूळ येथील निवासी असलेल्या
शहाजी - शिवाजीने तीच आकांक्षा धरल्यास त्यात गैर ते काय !
मोगल,
विजापूरकर गोवळकोंडा प्रकरणात गुंतल्याचे पाहून शिवाजीने जावळीसह कोकणातील रायगडापर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतला. तसेच
ऐतिहासिक फारसी साहित्य खंड ३ मधील लेखांक क्र. १८, ७६ वरून असे दिसून येते कि, स.
१६५६ च्या अखेरीस शिवाजीने कर्नाटकात धारवाडकडे एक स्वारी पाठवली होती. या मोहिमेत
त्याचे सैन्य धारवाडच्या दक्षिणेस असलेल्या मासूर ( म्हैसूर नव्हे ) पर्यंत
पोहोचले. परंतु विजापुरी सरदारांनी त्यांचा पराभव केल्याने त्यांना माघार घ्यावी
लागली.
या
मोहिमेसंदर्भात अधिक तपशीलवार माहिती मिळत नाही. तसेच या संदर्भात इतिहासकारांनी
विविध अनुमाने काढली असली तरी त्यांनी दोन गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून
येते. पहिली म्हणजे, स. १६५६ मध्ये पुण्यापासून अगदीच दूर अंतरावर असलेल्या धारवाड
- मासूर पर्यंत स्वारी करण्याइतपत शिवाजीकडे लष्करी बळ होते तसेच या मोहिमेला
प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष शहाजीचाही पाठिंबा असावा. कारण, मार्गातील विजापुरी सरदार
व इतर संस्थानिकांना झोडपत एवढ्या दूरवर सैन्य पाठवणे, स्वबळावर निदान शिवाजीला
यावेळी तरी शक्य नव्हते.
याच
अनुषंगाने काही गोष्टींचा उल्लेख येथे करणे योग्य ठरेल. ज्ञात माहितीनुसार स. १६५४
मध्ये शिवाजीच्या मोठ्या भावाचा, संभाजीचा झालेला मृत्यू व स. १६५७ च्या एप्रिलात
शिवाजीने तिरूमल रायला दिलेली सनद.
संभाजीच्या
मृत्यूपूर्वी शिवाजीला कर्नाटकातील जहागिरीत शहाजीने काही वाटा दिला होता का ?
तसेच संभाजीचा पुणे जहागिरीत काही हक्क होता का ? तिरूमल रायला शिवाजीने दिलेली
सनद / रौप्यपट कोणत्या अधिकाराने दिला होता ? शहाजीचा मुलगा म्हणून कि एक स्वतंत्र
सत्ताधीश म्हणून ? जर शिवाजी याचवेळेस एक प्रबळ, स्वतंत्र सत्ताधीश म्हणून उदयास
आला असेल व कर्नाटक प्रांतातही त्याचा दबदबा निर्माण झाला असेल तसेच
राज्यविस्तारही तर उपरोक्त कोड्याची उकल होऊ शकते. परंतु उपलब्ध पुरावे तसे सांगत
नाहीत. त्याउलट कर्नाटकात शिवाजीचं बस्तान बसण्यास स. १६७८ साल उगवावं लागल्याचं
सर्वमान्य, सर्वज्ञात आहेच. तेव्हा कर्नाटक प्रांतातील शहाजी भोसलेच्या जहागिरीचा
एक वारसदार या नात्यानेच शिवाजीने उपरोक्त सनद दिली असावी, असा एक तर्क करता येतो.
किंवा विजापुरी चाकरीत राहूनही आपला सवता सुभा स्थापन करण्याचा जो शहाजीचा
प्रयत्न चालला होता, त्याचाही हा एक परिणाम असून शकतो. परंतु रौप्यपटातील मजकूर
पाहता तिरूमल शहाजीकडे न जाता थेट शिवाजीकडे येतो, याचा काहीतरी वेगळा अर्थ
निश्चितच असू शकतो. परंतु प्रत्यंतर पुराव्यांच्या अनुपलब्धतेमुळे अधिक काही
लिहिणे शक्य नाही. असो.
औरंगजेबाची
गोवळकोंड्यावरची स्वारी स. १६५५ च्या डिसेंबर अखेर सुरु होऊन स. १६५६ च्या मार्च
अखेर संपुष्टात आली. खासा औरंगजेब कर्नाटक भागात उतरल्याने व इतर कारणांमुळे वाईचा
मुख्य अधिकार अफझलखानही तिकडेच अडकून पडल्याचे दिसून येते व याच काळात म्हणजे स.
१६५६ च्या जानेवारी पासून ते मे पर्यंत शिवाजीने जावळीचे प्रकरण निकाली काढल्याचे
दिसून येते. औरंगजेबाची गोवळकोंडा मोहीम समाप्त झाल्यावर विजापूरकरांनी मनात आणलं
असतं तरी त्यांना शिवाजीचा बंदोबस्त करणे लगोलग शक्य नव्हते. कारण पावसाळा तोंडावर
आला होता व मोहिमेचे दिवस सुरु होत असतानाच त्यांना शिवाजी - औरंगजेबच्या संयुक्त
चढाईस तोंड देण्याची वेळ आली.
या
संदर्भात इतकेच नमूद करता येईल कि, दख्खन मध्ये मोगल बादशाहीचा विस्तार करण्याची
अनुवांशिक मन्शा शहाजहान तसेच औरंगच्या मनात वसत होती. त्यानुषंगाने पिता -
पुत्रांच्या हालचाली सुरु होत्या परंतु त्यासोबत शाही परिवारातील मतभेद,
वैमनस्यंही असल्यामुळे त्यांचा हा हेतू निदान याक्षणी तरी सिद्धीस गेला नाही.
औरंगजेबच्या
विजापूर स्वारीची उपलब्ध माहिती पाहता असे दिसून येते कि, दख्खनच्या सुभेदारीवर
दाखल होताच त्याचा प्रथम हेतू विजापुरी सत्ता पालथी घालण्याचाच होता व
त्यादृष्टीने त्याने तेव्हापासूनच तयारी चालवली होती. प्रतिपक्षाच्या शत्रूंना,
असंतुष्ट सरदारांना चिथावणी देणे वगैरे प्रकार आधीच सुरु झाले होते. त्यांस यावेळी
विशेष बळ लाभले इतकेच. मात्र शहजाद्याची इच्छा काहीही असली तरी येथील शिवाजी सारखे
संस्थानिक तसेच शहाजी सारखे असंतुष्ट सरदारही काही कमी धूर्त नव्हते. सत्तेच्या
राजकारणात ते औरंगजेबाइतकेच तुल्यबळ असून दख्खनचा सत्तासमतोल कशा प्रकारे
राहिल्यास आपला निभाव लागेल याची त्यांस पूर्ण जाणीव होती. यांमुळेच महंमद आदिलशहा
मरण पावताच मोगली आक्रमणाचा झपाटा सुरु झाला व आरंभी अपयश येत गेले तरी
विजापूरकरांनी आपला चिवट प्रतिकार अजिबात थांबवला नाही. दरम्यान याच काळात उत्तरेत
शहाजहान आजारी पडून मोगलांचे अंर्तगत राजकारण व गृहकलह उफाळून आल्याने त्यांचा बचाव
झाला.
या
स्थळी आपणांस शिवाजीचे राजकीय धोरण प्रामुख्याने समजावून घ्यायचे आहे. पण
तत्पूर्वी विजापूर स्वारीमागे मोगलांचे हेतू काय होते हे प्रथम अभ्यासणे योग्य
ठरेल. विजापूरवरील चढाईमागे मोगलांचे कमाल उद्दिष्ट ते राज्य पूर्णतः नष्ट करणे हे
असून किमान उद्दिष्ट स. १६३६ च्या तहान्वये निजामशाहीचा जो प्रदेश विजापूरकरांना
मिळाला होता तो परत मिळवून घेणे हे होते. जर स. १६३६ च्या तहान्वये विजापूरला
मिळालेला भूप्रदेश जिंकून घेतला गेला तर विजापूरचे राज्य कायम ठेवण्याच्या अटीवर
दीड कोट खंडणी व मोगलांचे मांडलिकत्व मान्य करण्याची तयारी दर्शवल्यास औरंगने
गोवळकोंडा जिंकून घेण्यासाठी मोहीम काढावी अशी शहाजहानची आज्ञा होती. निव्वळ
लष्करी बळाचा विचार करता औरंगजेबाकडे समस्त विजापुरी राज्य नष्ट करण्याइतपत
सैन्यदल कधीच नव्हतं. परंतु अशाच समयी राजकारणी व्यक्तीचा कस लागत असतो. कोणत्याही
सत्तेचं बळ तिच्या लष्करी सामर्थ्यात असते व तेच बळ खच्ची करण्याच्या प्रयत्नास तो
लागला. विजापूरवरील चढाई संदर्भात त्याने शहाजीसोबत काय बोलणी केली हे कळण्यास
मार्ग नसला तरी शिवाजीसोबत त्याचा जो काही पत्रव्यवहार झाला व आज जो उपलब्ध आहे,
त्यावरून त्याच्या धोरणांचा काहीसा अंदाज करता येतो. या संदर्भात जदुनाथ सरकार
लिखित व डॉ. भ. ग. कुंटे अनुवादित ' औरंगजेबाचा इतिहास ' या ग्रंथातील पृ. क्र.
१६० ते १६३ वर छापलेली पत्रे विशेष अभ्यासनीय आहेत.
त्यानुसार
स्पष्ट होणाऱ्या बाबी अशा :- (१) स. १६५६ पासून मीर जुम्लाच्या मार्फत औरंगजेब
शहाजीच्या निमित्ताने विजापुरी राजकारणात हस्तक्षेप करून ते राज्य पालथं
घालण्यासाठी धडपडत होता. याप्रकरणी त्याचा व शहाजीचा पत्रव्यवहार सुरु असला तरी
शहाजीच्या मागण्यांची पुरेशी स्पष्टता होत नाही. (२) याच काळात औरंगचा शिवाजीशीही
पत्रव्यवहार सुरु असावा किंवा शहाजी - शिवाजी एकविचाराने वर्तत असून शिवाजी
शहाजीच्याच तंत्राने मोगलांशी आपला व्यवहार उलगडत असावा असा तर्क करता येतो.
यासंदर्भात
स. १६५७ मधील शिवाजी - औरंगजेब दरम्यानचा पत्रव्यवहार अधिक उपयुक्त ठरतो.
त्यानुसार :- (१) शिवाजीने आजवर जो काही आदिलशाही भूप्रदेश, किल्ले ताब्यात घेतले
होते व जे तो घेऊ पाहत होता त्यासही मोगलांनी मान्यता द्यावी अशी शिवाजीची इच्छा
होती. शिवाजीच्या या दोन्ही अटींना औरंगने सशर्त मान्यता दिली खरी परंतु त्याच्या
अटी व त्यावरील शिवाजीची लेखी प्रतिक्रिया काय होती, हे समजायला सध्या माझ्याकडे
पुरेशी साधनं नाहीत. मात्र औरंग - शिवाजी दरम्यान जी काही बोलाचाली झाली ती औरंगने
शहाजीसही कळवल्याचे त्याच्याच एका पत्रात नमूद आहे. परंतु त्यासंदर्भात शहाजीचे
म्हणणे काय होते, हेही समजायला सध्या माझ्याकडे साधनं नाहीत. (२) औरंगजेबाशी
सलोख्याची बोलणी करत असतानाच शिवाजीने मोगल अंमलाखालील प्रदेशात चढाई आरंभली. यावेळी
औरंगजेबाने बेदरचा किल्ला जिंकून कल्याणीला वेढा घातला होता. रणांगणावर विजापुरी
सैन्याला मोगलांवर विजय प्राप्त होत नव्हता. अशा स्थितीत शिवाजीने मोगलांची मैत्री
तोडून अप्रत्यक्षरीत्या विजापूरकरांचा बचाव केल्याचे इतिहासकारांचे मत आहे. परंतु
याच संदर्भात मला थोडं अधिक स्पष्टीकरण करायचं आहे.
विजापुरी
सत्ता कायम राहावी हे स. १६५७ - ५८ मध्ये शिवाजी किंवा शहाजीचं मत होतं, नव्हतं
यावर मर्यादित साधनांच्या आधारे वाद घालत बसण्यापेक्षा मोगल - आदिल झगड्यात
शिवाजीने आपल्या पदरी नेमकं काय पाडून घेतलं हे पाहणं आवश्यक ठरेल. याकरता प्रथम
आपण शिवाजीच्या या काळातील प्रमुख हालचालींच्या नोंदी पाहू.
दि. १५
जानेवारी १६५६ :- जावळीचे खोरे काबीज.
एप्रिल
- मे १६५६ :- रायगड घेतला.
ऑगस्ट -
सप्टेंबर १६५६ :- चंद्रराव मोरेला ठार केले.
दि. ४
नोव्हेंबर १६५६ :- महंमद आदिलशहा मृत.
स. १६५६
नोव्हेंबर ते स. १६५७ जानेवारी :- शिवाजीचे सैन्य धारवाडच्या दक्षिणेस
मासूरपर्यंत.
स. १६५७
एप्रिल अखेर :- अहमदनगर, जुन्नर, चांभारगोंदे या मोगली प्रदेशावर शिवाजीचे आक्रमण.
दि. ३१
जुलै १६५७ :- दंडाराजपुरी काबीज.
दि. २४
ऑक्टोबर १६५७ :- कल्याण - भिवंडी जिंकले.
दि. ९
जानेवारी १६५८ :- कोकणातील माहुली किल्ला घेतला.
दि. ५
फेब्रुवारी १६५८ :- कांगोरी, तुंग, तिकोना, भोरप इ. किल्ले जिंकले.
आता याच
काळातील औरंगजेबाच्या हालचालींची नोंद पाहू.
दि. ४
नोव्हेंबर १६५६ :- महंमद आदिलशहा मृत.
दि. २६
नोव्हेंबर १६५६ :- औरंगजेबला विजापुरावर स्वारी करण्यासाठी शहाजहानची परवानगी
मिळाली.
दि. १८
जानेवारी १६५७ :- मीर जुम्ला उत्तरेतून औरंगच्या मदतीकरता औरंगाबादला येऊन दाखल
झाला व त्याच दिवशी औरंगने मोहिमेसाठी प्रस्थान ठेवले.
दि. २
मार्च १६५७ :- औरंगने बेदरला वेढा घालून याच महिन्याच्या अखेरीस किल्ला जिंकून
घेतला.
स. १६५७
एप्रिल ते दि. १ ऑगस्ट १६५६ :- औरंगचा कल्याणीला वेढा व विजय.
कल्याणीच्या
पाडावानंतर विजापूरकरांचा धीर खचून त्यांनी तहाची वाटाघाट आरंभली. याच समयी
त्यांचे दिल्ली दरबारातील वकीलही याकरता प्रयत्नशील होते व विजापूरवरील औरंगच्या
चढाईने त्याचं पारडं जड होण्याची शक्यता लक्षात घेत दारा शुकोहने विजापूरकरांतर्फे
शहाजहानकडे मध्यस्थी केली. तेव्हा आदिलशहाने कल्याणी, बेदर, परिंडा हे किल्ले व
त्या अंमलाखालील भूप्रदेश मोगलांना देणे तसेच युद्धखर्च म्हणून एक कोटी रुपये
देण्याच्या शर्तीवर तह करण्याची शहाजहानने औरंगला आज्ञा केली. या धक्क्यातून औरंग
सावरतो न सावरतो तोच दि. ६ सप्टेंबर १६५७ रोजी शहाजहान आजारी पडला व दाराच्या
अतिसावधगिरीच्या वर्तनामुळे संपूर्ण साम्राज्यात शहाजहानच्या मृत्यूची वार्ता
पसरून राजकारणाचे सर्व रंग, संदर्भ बदलून गेले. त्यामुळे विजापूरकरांशी तहाची
वाटाघाट करत औरंगने दि. ४ ऑक्टोबर १६५७ पासून कल्याणीमधून माघार घेण्यास आरंभ
केला.
या
पार्श्वभूमीवर शिवाजी - औरंगजेब यांच्या राजकारणाचे बदलणारे संदर्भ पाहू. स. १६५६
च्या अखेरीस औरंगची नियोजित विजापूर मोहीम सुरु होण्यापूर्वीच शिवाजीचे आदिलशाहीवर
आक्रमण सुरु झाले होते. त्यानंतर स. १६५७ च्या एप्रिलपर्यंत त्याचे मोगलांशी
मैत्रीचेच संबंध होते. या काळात म्हणजे -- दि. २३ एप्रिल १६५७ रोजीच्या पत्रात शिवाजीच्या
मागण्यांवर मोगल बादशाहीचा प्रतिनिधी म्हणून औरंगने दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे :- "
... सांप्रत जे किल्ले व मुलूख विजापुराकडील तुमचे हाती होते ते पेशजीप्रमाणे होऊन
तुमचे मनोगतान्वये बंदर दाभोळ व त्याजखालील मुलूख तुम्हांस दिला असे. ऐशियास इकडील
दौलतीची किफायत मदत जी करणे असेल तिचा समय हाच आहे. जाणोन करण्यात आणावे. आणि
हुजूर भेटीस यावे. याखेरीज जे मतलब तुमचे मनात असतील ते सर्व घडोन येतील. हाली तुमचे
वकील यांस परत जाण्याची जलदी होती, सबब निरोप दिल्हा आहे. ... "
(
संदर्भ ग्रंथ :- जदुनाथ सरकार लिखित व डॉ. भ. ग. कुंटे अनुवादित औरंगजेबाचा इतिहास
)
याच
सुमाराचे औरंगने आपल्या अधिकाऱ्यास लिहिलेलं पत्र खालीलप्रमाणे :-
फरुकीकृत
औरंगजेब चरित्र पृ. ३५४ {(२६१६
) { श. १५७९ वैशाख
आदबमधील
उतारा. { {
इ. १६५७ एप्रिल
औरंगजेब
-- ( मोगल अधिकारी ).
शाहूच्या
मुलाने ( शिवाजीने ) या दरबारकडे एका वकीलामार्फत असे विनंतीपत्र पाठविले आहे की,
" विजापूरकरांच्या मुलखा पैकी जो प्रांत माझ्या ताब्यांत आहे तो मजकडे ठेऊन मला
जर मनसब देण्यांत येईल तर राजनिष्ठा व आज्ञाधारकत्व यास अनुसरून तो प्रांत मी
बादशाही राज्यांस देईन. " या पत्रास मी जे उत्तर पाठविले आहे त्यांत काही अटी
लिहिल्या आहेत व शाहूसहि ( = शहाजीस ) याविषयी कळविले आहे. ( शिवाजीकडून ) उत्तर
आले म्हणजे मी तुम्हांस कळवीन. त्याने माझ्या हुकमातील अटी मान्य केल्या तर ठीक
आहे. नाहीतर आमची सैन्ये त्याला तुडवून टाकतील( trample him ).
( संदर्भ
ग्रंथ :- शिवकालीन पत्रसारसंग्रह खंड ३ )
पैकी
दुसऱ्या पत्राच्या लेखनाची नेमकी तारीख उपलब्ध नाही परंतु दि. २३ एप्रिल १६५७ च्या
पत्रानंतर शिवाजीने याच महिन्याच्या अखेरीस मोगली प्रदेशावर चढाई आरंभली. याम्गे
त्याचा विजापूरच्या बचावाचा हेतू असला तरी तो दुय्यम वा तिय्यमच गणावा लागेल. कारण,
आजवर त्याने जो काही भूप्रदेश जिंकून घेतला होता त्यांस एका सार्वभौम सत्तेची
मान्यता व्यवहारात अत्यंत आवश्यक होती. जी औरंगजेबाच्या पत्रान्वये मिळाली. दुसरे असे
कि, मोगली मदतीचे निमित्त करत शिवाजी त्याच्या नवराज्यविस्ताराकरता सलग भूप्रदेश,
किल्ले ज्याप्रमाणे जिंकून घेत होता, त्याचप्रमाणे निजामशाहीच्या उभारणीकरता
शहाजीने जो भूभाग, किल्ले ताब्यात घेतले होते त्यांनाही जिंकून घेण्याचा सपाटा
लावला होता व यासही मोगलांची मान्यता मिळावी अशी त्याची इच्छा असून औरंगनेही
त्यांस अंशतः मान्यता दिली होती हे त्याच्या दि. २३ एप्रिलच्या पत्रांतील " सांप्रत
जे किल्ले व मुलूख विजापुराकडील तुमचे हाती होते ते पेशजीप्रमाणे होऊन " या
ओळींवरून स्पष्ट होते. परंतु याच सुमाराचे त्याने आपल्या अधिकाऱ्यास लिहिलेल्या
पत्राचा विचार केला असता असे दिसून येते कि, औरंगने शिवाजीच्या मागण्यांना सशर्त
संमती दिली होती. परंतु त्या शर्तींची स्पष्टता मात्र या दोन्ही पत्रांत होत नाही.
असो.
एप्रिल
अखेर शिवाजीने मोगली प्रदेशात चढाई आरंभताच औरंगजेबानेही त्याच्याविरोधात कारवाई
आरंभली. परंतु उभयतांचा संघर्ष जास्त काळ चालला नाही. कारण पावसाळाही लगेच सुरु
झाला व विजापूरकरांनीही मोगलांशी समझोत्याचे प्रयत्न आरंभले. अशातच शहाजहान आजारी
पडल्याची वा मृत झाल्याची वार्ता पसरली. याचा फायदा उचलण्याचा पुरेपूर प्रयत्न
शिवाजी तसेच विजापूरकरांनी केला. या दोघांना आवरण्याची निरर्थक, केविलवाणी धडपड
करण्यापलीकडे औरंगजेब काही करू शकला नाही.
उदाहरणार्थ,
वारसा युद्धांत सहभागी होण्याचा निर्णय घेत त्याने आपली पिछाडी तसेच भविष्यात आश्रयाची
जागा रहावी या उद्देशांनी आदिल व कुतुबशी मैत्री जोडण्याचा प्रयत्न केला. कुतुबला
थकीत खंडणीचा भरणा करण्याबद्दल ताकीदपत्रे रवाना केली तर त्या दरबारातील मोगल
वकिलास सबुरीचे धोरण स्वीकारण्याची सूचना केली. यामागील मुख्य कारण म्हणजे कुतुबचा
नेभळटपणा !
परंतु आदिलशाही बाबत मात्र त्यांस नरमाई बाळगावी लागली. मयत महंमद
शहाच्या पत्नीला -- बडी बेगमची मर्जी राखण्यासाठी गोडीची पत्रे, भेटवस्तू रवाना
करण्यात येऊन आदिलशहाला राजी राखण्यासाठी त्याने आपल्या अधिकारात असा प्रस्ताव
मांडला कि, " तुम्ही आमच्याशी एकनिष्ठ रहावे आणि आपली वचने पाळावी. मी असे कबूल
करतो की - (१) परेंड्याचा किल्ला आणि किल्ल्याच्या बंदोबस्ताखालील प्रदेश, कोकण
साम्राज्याला पूर्वी जोडण्यात आलेला वांगीचा महाल आणि त्याशिवाय मरहूम आदिलशहाला
तोडून देण्यात आलेला कर्नाटकचा भाग पूर्वीप्रमाणेच तुमच्याकडे राहू देऊ आणि (२)
तुम्ही तहात वचन दिल्याप्रमाणे तुम्हाकडून येणाऱ्या १ कोटीच्या युद्धखर्चापैकी तीस
लाख रुपये तुम्हाला माफ करू. ह्या प्रदेशाचे संरक्षण करा, त्याचा राज्यकारभार
सुधारा, या प्रदेशातील काही किल्ल्यांचा ताबा चोरून शिवाजीने घेतलेला आहे, त्याची
हकालपट्टी करा. माझ्याकडे तुम्ही कमीतकमी १०,००० घोडदळाची रवानगी करा. तुम्हाला
बाणगंगेच्या काठापर्यंतचा असलेला सर्व प्रदेश मी तोडून देईन. "
याच काळात
शिवाजीने एक सावधगिरीचा उपाय व भविष्याची तरतूद म्हणून औरंगजेबला खुश करण्यासाठी
वकीलासोबत पत्र पाठवले. त्यांस उत्तर देताना दि. २४ फेब्रुवारी १६५८ रोजी औरंग
लिहितो कि, " .... तुमची अर्जदास्त कृष्णाजी भास्कर पंडित याचे पत्रासुद्धा
रघुनाथपंत वकील यांबरोबर पाठवून ( दिलेली पाहून ) मजकूर ध्यानास आला. यद्यपि
तुमच्या पेशजीच्या गोष्टी विसरावया जोग्या नाहीत, तथापि तुम्ही आपले कृतकृत्यांचा
पश्चाताप केला आणि हा दरबार उपेक्षेचा नाही जाणोन, वडिलांचे लक्ष निभ्रंत इकडे आहे
असे समजोन, तुमचे पूर्व कृत्य मनात आणीत नाही. याविषयीचा संतोष मानून, इकडील
दौलतीविषयी कोशिष करीत जावी. आपले वतनी महाल, किल्ले व कोकण देशसुद्धा नगरवाले
खेरीज विजापूरकर आदिलखानाचे इलाख्यात जे आहेत ते त्यांजकडून मुलूख हस्तगत
झाल्यानंतर बंदोबस्त होण्याविषयी वचन असावे, म्हणजे सोनोपंत यांस हुजूर पाठवितो
आणि इकडील लक्षात वागून सरकारी मुलुखाची सरहद्द रक्षण करून कामदारांशी षरीक होतो
की ज्यायोगे बंड वगैरे बखेडे न होवोत, म्हणोन लिहिले. त्यास तुम्ही लिहिल्या
अन्वये वर्तून हा फर्मान पाहताच आपले मजकुराची अर्जी लेहून सोनोपंतांबरोबर पाठवून
देणे. म्हणजे त्याप्रमाणे केले जाईल. जाणोन लक्षात वागोन आमचे लोभाची पूर्णता
समजावी. छ १ माहे जमादिलाखर सन १०६८ हिजरी. "
(
संदर्भ ग्रंथ :- जदुनाथ सरकार लिखित व डॉ. भ. ग. कुंटे अनुवादित औरंगजेबाचा इतिहास
)
या दोन
पत्रांतील मजकूर अभ्यासनीय आहे. औरंगने विजापूर - शिवाजी युती तोडण्यासाठी व
त्यांच्यात भांडणं जुंपावीत व मोगली प्रदेशास त्यांचा उपद्रव होऊ नये म्हणून वरील आश्वासनांची
उभयपक्षी खैरात केली. आदिलला पाठवलेल्या पत्रान्वये त्याने कोकणचा मुलूख विजापूरकरांना
देऊ करत त्या भागात हातपाय पसरु लागलेल्या शिवाजीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी
त्यांच्यावरच सोपवली. वास्तविक औरंगला असं आश्वासन देण्याचा वा अंतस्थ तह करण्याचा
काहीच अधिकार उरला नव्हता. कारण तोपर्यंत शहाजहान आजारी वा मृत झाल्याबद्दल साशंकता
असून सुजा व मुरादने स्वतःला बादशाही पदाचे दावेदार तथा बादशाह म्हणून घोषित केले
होते तर दारा शुकोहने शहाजहानच्या प्रकृतीविषयी वर्तमान जाहीर न करता व बादशाही पद
धारण न करता अधिकार हाती ठेवून भावांच्या बंदोबस्ताचे प्रयत्न चालवले होते. अशा
स्थितीत औरंगची वचनं, आश्वासनं म्हणजे वारसा युद्धांत उतरणाऱ्या शहजाद्याचे शब्द
होते --- जर औरंग हे वारसा युद्ध जिंकला तरच त्यांस किंमत अन्यथा काहीच नाही. कारण
जहांगीरच्या जमान्यापासून मोगली वारसा युद्धाचे एक समीकरणच बनून गेले होते. बादशहा
होणाऱ्याने इतर दावेदारांची कत्तल उडवणे. त्यामुळे या खाटिकखान्यातून कोणता शहजादा
सलामत बाहेर येऊन बादशाह बनेल याविषयी अनिश्चितताच होती. अशा स्थितीत औरंगच्या
वचनांची, आश्वासनांची किंमत ती काय ! परंतु यदाकदाचित औरंग जिंकलाच तर हीच वचनं, आश्वसनं
उपयुक्त ठरण्याचीही शक्यता होती. सारांश, राजकारणाचे एक नाही अनेक संदर्भ असतात व
त्यात निर्णायक, स्थिर असे काहीच नसते. औरंगच्या कृत्याचा परिणाम इतकाच झाला कि,
विजापूरकरांनी मोगली प्रदेशावर चढाई न करता शहजाद्याने दिलेला भूप्रदेश काबीज
करण्यासाठी शिवाजीवर चढाई करण्याचे धोरण आखले. ज्यातून पुढे अफझलखानाची स्वारी उद्भवली.
असो.
औरंग
बादशहा बनल्यावर शिवाजीने आपला वकील त्याच्या दरबारी अभिनंदनपर संदेश घेऊन रवाना केला
असता प्रत्युत्तरादाखल औरंगने दि. १४ जुलै १६५९ रोजी पुढील पत्र पाठवले :-
"
सह्हल वसलसमकालीन व बरोबरीच्या लोकांत श्रेष्ठ, उमराव मंडळात अग्रेसर, कृपेस
पात्र, इस्लामचा आज्ञांकित, बादशहाचा कृपाकांषी, शिवाजी याने जाणावे की, सर्वात श्रेष्ठ
व अतुल असा जो सर्वशक्तीमान परमेश्वर त्याने सत्कृत्ये व दानशूरता यांचा प्रसार
करण्याकरीता, न्यायाचा स्तंभ उभारण्याकरीता व जुलुमाचा पाया खणून काढण्याकरीता
आमच्या राज्याची ध्वजा विजयाच्या अवतंसाने सुशोभित करून शनीच्या कळसास पोहोचविली ;
व आमचे करवी सामर्थ्यवान शत्रूंचे व ज्यांच्या डोक्यात स्वातंत्र्याचे वेड शिरले
होते व जुलुमाचे वारे भणाणत होते असे जे धर्माचे व राज्याचे द्वेष्टे त्यांचे
निर्दालन केले. आपल्या पूर्वीच्या मेहरबानीस अनुसरून आम्ही शुभ रमजानच्या २४ व्या
तारखेस आदितवारी ( ५ जून १६५९ ) खलीफाच्या सिंहासनाला आपल्या बसण्याने अलंकृत केले
व सुखाचे दरवाजे सर्वास खुले केले. तुम्ही या सुखसमयी आपल्या नोकराबरोबर अर्जदास्ती
पाठविली ती खलीफाच्या सिंहासनाच्या पायथ्याशी उभे राहणाऱ्या आमच्या नोकराचे द्वारा
आमच्या पवित्र व उच्च नजरेखालून जाऊन त्यातील आशय जगाला सुशोभित करणाऱ्या आमच्या
मनाला विदीत जाला. गगनाचा भेद करणाऱ्या आमच्या या दरबारच्या उंबरठ्यावर राजनिष्ठा
व सेवा याही निश्चयपूर्वक पायरव करून श्रेष्ठ अशा या राज्याच्या आधारस्तंभ, विश्वासपात्र,
ईश्वराचे भजन करणरा, सुखाची चिन्हे असणारा असा सरदारश्रेष्ठ उमदतुल्मुलुक ज्यास
दक्षिणेची सुभेदारी देण्यात आली आहे व ज्याला पूर्णाधिकार देण्यात आल्यामुळे जो
उच्चपदाला पोहोचला आहे त्याच्या मर्जीनुरूप तो मला सला देईल. त्याप्रमाणे तुम्ही
काम करावे. आमच्या कृपाछत्राखाली असणार्यात्या अंमलदाराच्या सल्ल्याबाहेर तुम्ही
वागू नये. जी जी कामे तुमचेकडे येतील त्यांचा तुम्ही उत्तमरितीने फडशा पाडावा आणि
अर्जाचा निकाल करण्यात न्यायाचे परिपालन करावे. अदृश्य सृष्टीचे पूर्णत्वाने अवलोकन
करणाऱ्या आमच्या अंतःकरणापुढे जी जी कामे आम्ही ठेविली होती ती ती चांगल्याप्रकारे
पार पाडून राज्याची इमारत भरभक्कम उभारली गेली. ईशकृपेने व नशिबाने आमच्या अभागी
शत्रूस केल्या कर्माचे फळ मिळाले व ते मुलांबाळांसह भक्करच्या सरहद्दीवर पकडले
गेले. कृतघ्न सुजाची पाळमुळे लवकरच खणली जातील. आमची अतिश्रेष्ठ अशी मेहेरबानी
तुमचेवर आहे, असे जाणून योग्य ती नोकरी बजावून आमच्या वांछा धरून असावे. तुमचा
दर्जा वाढविण्याकरीता तुम्हास पोशाख पाठविला आहे. ता. ४ जिल्काद सन १०६९ हिजरी (
२४ जुलै १६५९ ) "
(
संदर्भ ग्रंथ :- जदुनाथ सरकार लिखित व डॉ. भ. ग. कुंटे अनुवादित औरंगजेबाचा इतिहास
)
शिवाजी
व औरंगजेब जशास तसे होते असं म्हटलं जातं ते उगीच नाही !
(
क्रमशः )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा