पानिपतावर सदाशिव मारला गेला कि नाही, हा तसा अद्यापही विवादास्पद,अनुत्तरीत
असलेला प्रश्न आहे. परंतु एवढं मात्र निश्चित कि, त्या युद्धात भलेही त्याने
आडमुठेपणाचे डावपेच वापरून का होईना ज्या तऱ्हेने अब्दालीसोबत झुंज दिली, ती खरोखर
कौतुकास्पद आहे. पेशव्याचा एक पार्ट टाईम सेनानीही अब्दालीला खडे चारू शकतो,
त्याच्या तोंडचे पाणी पळवू शकतो हि उघड दिसणारी बाब देखील मान्य करण्याचे धाडस
आमच्या इतिहासकारांस झाले नाही. हि म्हटले तर खेदाची बाब आहे.
एखाद्याचं लढाईतील संशयास्पद वीरमरण त्यांस इतिहासात अजरामर करून सोडते,
या विधानाची प्रचीती सदाशिवरावभाऊच्या चरित्रावरून येते.
थो. बाजीरावाचा धाकटा भाऊ चिमणाजी याचा हा एकुलता एक मुलगा. जो
वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी पानिपतच्या रणभूमीवर गारद झाला. याच्या मृत्यूनंतर
त्याचे तोतये निर्माण झाले व त्यांनी देखील पेशवाईच्या इतिहासात स्थान प्राप्त
करून घेतले. परंतु या तोतयांचा तपास तेव्हाही व आजही पूर्णपणे न केल्याने या
तोतायांतील एक खरोखर सदाशिवराव होता का ? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. अर्थात,
प्रस्तुत लेखात या प्रश्नाची चर्चा करायची नसल्याने व पानिपतोत्तर काळात भाऊला
तितकेसे व्यावहारिक महत्त्व न राहिल्याने आपणांस फक्त पानिपत पुरताच त्याच्या चरित्राचा
धावता आढावा घ्यायचा आहे.
वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी भाऊला पितृ - मातृ शोक सहन करावा लागला.
त्यानंतर त्याचे शिक्षण, संगोपन आजी राधाबी व थोरला चुलत भाऊ नानासाहेब
पेशव्याच्या देखरेखीखाली झाले. पेशव्याच्या कुटुंबात त्यावेळी भाऊखेरीज जनार्दन,
रघुनाथ हे सख्खे तसेच सावत्र बंधू समशेरबहाद्दर अशी पोरसवदा पुरुषमंडळी होती. पैकी
एक भाऊ वयाने मोठा असल्याने त्यातल्यात्यात पेशव्याला त्याचाच आधार मिळण्यासारखा
होता. परंतु पेशव्याचे तरुण वय व आरंभीची तडफ यामुळे त्यांस आपल्या भावांची
व्यवहारात मदत घेण्याचे प्रयोजनच पडले नाही. मात्र यामुळे त्याने त्यांच्या
व्यावहारिक - राजकीय शिक्षणाची हेळसांड होऊ दिली नाही.
थो. बाजीरावापासून पेशव्याच्या घरची खाशी व्यक्ती सातारकर छत्रपतीच्या
दरबारी राहण्याचा प्रघात होता. त्यांस अनुसरून नानासाहेब पेशवा बनल्यावर हि
जबाबदारी कधी भाऊ तर कधी रघुनाथ यांच्यावर येई.
घरात वडीलधाऱ्यांचा म्हणावा तसा धाक नसल्याने तसेच पेशवे पदास
महत्त्व, वलय, सत्ता प्राप्त झाल्याने पेशवे घराण्यातील या सख्ख्या, चुलत, सावत्र
भावांचा परस्परांशी सामान्यतः असावा तसा बंधुभाव असला तरी परस्परांविषयी मत्सर, संशय
इ. भावना यांचा उद्गम बालपणातच झाल्याचे उपलब्ध पत्रव्यवहारावरून दिसून येते. भाऊ
दादापेक्षा मोठा असला तरी दादा त्याच्यापासून थोडा फटकून वागायचा त्याचप्रमाणे
जनार्दन हा दादाचा सख्खा मोठा भाऊ. त्याच्याशीही या पठ्ठ्याचे पटत नसल्याचे उपलब्ध
पत्रव्यवहारातून दिसून येते.
पुढे जनार्दन अल्पायुषी झाला व घरात नाना खेरीज भाऊ व दादा हेच कर्ते
पुरुष उरले. समशेरबहाद्दर हा जरी पेशव्याचा औरस पुत्र व बुंदेलखंडातील
बाजीरावाच्या खासगत जहागिरीचा वारस असला तरी नानासाहेब पेशव्याने त्यांस त्याच्या
जहागिरीच्या कारभारावर न पाठवता किंवा दादा, भाऊ प्रमाणे स्वतंत्र मोहिमा न देता
सरदाराप्रमाणेच वागणूक दिली. पेशवे दरबारचा सरदार, वकील या भूमिका समशेरने बजावल्याचे
आपणांस या काळातील घटनांवरून दिसून येते.
पेशवाई प्राप्त झाल्यावर नानासाहेबाने सुमारे एक दशकभर एकहाती कारभार
केला. या काळात राजकारण, मोहिमांत भाग घेण्याइतपत भाऊचे वय झाले खरे, परंतु
पेशव्याने त्याच्यावर स्वतंत्र मोहिमा न सोपवता नेहमी त्यांस आपल्या अधिकाराखाली वागवल्याचे
दिसून येते.
कर्नाटक प्रांती काही वेळा भाऊने स्वतंत्रपणे स्वाऱ्या केल्याचे जरी
इतिहासात नमूद असले तरी या मोहिमांचा खरा सेनापती, सूत्रधार पेशवाच होय. त्याच्या
आदेशाखेरीज भाऊला कोणताही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य कधीच मिळाले नाही व हि
स्थिती प्रत्यक्ष पानिपत युद्धाच्या दिवसापर्यंत कायम होती.
पेशव्याच्या फडावरील अधिकारी, सरदार म्हणून भाऊने भूमिका पार पाडल्या
असल्या तरी या जबाबदाऱ्या पार पाडण्यास तो मनापासून राजी असल्याचे दिसून येत नाही.
उलट त्याच्या बापाला जे पेशवाईत स्थान, पद होते ते प्राप्त करण्याचा त्याचा उद्देश
होता. पेशव्याला याची थोडीबहुत जाणीव असल्यामुळे बहुतेक त्याने भाऊला याकाळात
आपल्या दाबाखाली ठेवले असावे असाही तर्क करता येतो.
छ. शाहू मरण पावल्यावर ताराबाईने उभा केलेल्या रामराजास छत्रपतीपदी
बसवण्यात आले. या नामधारी छत्रपतीस हाताशी धरून सातारकर राजमंडळ निष्प्रभ करत
पेशव्यांची सत्ता लौकिक व व्यवहारात वाढवण्याचे कार्य भाऊने रामचंद्र सुखठणकरच्या
सल्ल्याने केले. इतिहासात स्वतन्त्रपणे म्हणता येईल अशी त्याची हि एकमेव कामगिरी
असावी.
भाऊच्या या कर्तबगारीमुळे पेशवाही पुढील काळात त्याच्या विषयी साशंक
राहू लागला. पण उभयतांतील वैर, द्वेष भाव ताराबाईने रामराजास कैद केल्यावर निर्माण
झालेल्या राजकीय गोंधळाच्या स्थितीत लोकचर्चेत उघड झाला. याच काळात जयाजी शिंद्यास
लिहिलेल्या एका पत्रात पेशवा नमूद करतो कि, सदाशिवास ' जर भाऊ असेल तर पत्र दर्शनी
येणे ' अशा आशयाचा निरोप पाठवला आहे.
याच काळात भाऊने कोल्हापूरची पेशवाई प्राप्त करून घेण्याची खटपट केली
होती. परंतु पेशव्याने त्याची समजूत घालून आपले कारभारीपद त्यांस सोपवले व
कोल्हापूरची पेशवाई आपल्या पदरात पाडून घेतली. भाऊ पेशव्याचा मुख्य दिवाण झाल्याने
पेशव्यांचा तीन पिढ्यांचा कारभारी पुरंदरे घरी बसला. ज्याचा परिणाम छत्रपती -
पेशवे तसेच हिंदुस्थान - दख्खनच्या राजकारणावर घडून आला. ज्याची अद्याप कोणत्याही
इतिहासकाराने चिकित्सा केलेली नाही.
स. १७५० नंतरचा कालखंड हा जसा बाहेरील तसाच पेशव्याच्या कौटुंबिक
राजकारणामुळे राजकीय इतिहास अभ्यासकास अतिशय गोंधळात टाकणारा विषय बनला आहे.
या काळात घरगुती, दरबारी स्पर्धेने पेशवा गोंधळून जाऊन त्याने ऐन वेळी
अनेक घातकी निर्णय घेतले ज्याचे पर्यवसान पेशवाईच्या इतिश्रीत झाले.
भाऊला त्याने आपल्या दिवाणीवर घेत दादाकडे सेनापतीपद सोपवले. परिणामी
या त्रिवर्गांत राजकीय वर्चस्वासाठी शीतयुद्ध सुरु झाले. जमेची बाब हीच कि, भाऊ व
दादा या वेळी पेशवेपदासाठी नव्हे तर पेशव्याच्या मुख्य कारभारीपदासाठी आपसांत
स्पर्धा करत होते. नानासाहेब या काळात थोडाफार विलासात मग्न झाला असला व अधूनमधून
आजारी पडू लागला तरी तुर्की बादशहा प्रमाणे भोगविलासात पूर्णपणे न बुडाल्याने
सरदार मंडळी, मुत्सद्दी यांवर त्याचा वचक असून सैन्यावरही हुकुमत असल्याने भाऊ -
दादाची स्पर्धा कागदावरच राहिली.
पेशव्याच्या या घरगुती राजकारणात आणखी एका व्यक्तीची याच काळात
एन्ट्री झाली व ती म्हणजे गोपिकाबाई ! गोपिकाबाईला घराबाहेरचे राजकारण कितपत समजत
होते हा वादाचा मुद्दा होऊ शकतो परंतु घरगुती राजकारणात मात्र तिचा हात कोणीही धरू
शकत नव्हते. अगदी इतिहासकारांनी बदनाम केलेली आनंदीबाईही ! आपल्या नवऱ्याची स्थिती
व दिरांची चलती पाहून तिने आपल्या जेष्ठ पुत्रास --- विश्वासरावास व्यवहारात पुढे
केले. सिंदखेड, उदगीर, पानिपत मोहिमांत विश्वासराव येतो तो यामुळेच.
स. १७५० नंतर दिल्ली दरबारचे राजकारण पूर्णतः बदलले. या बदलत्या
राजकारणात पेशव्याचा हिंदुस्थानातील मुतालिक --- जयाजी शिंदे, मल्हारराव होळकरासह
सहभागी झाल्याने पेशवाही यात ओढला गेला. विशेष म्हणजे दिल्लीची ब्याद अंगावर
घेण्यापेक्षा शाहू छत्रपतीपासून वाटणीस आलेला प्रयागचा सुभा ताब्यात घेण्याची
पेश्व्यास विशेष उत्कंठा होती. तसेच यानिमिताने साधल्यास काशी वगैरे तीर्थक्षेत्रेही
सोडवण्याची त्याची खटपट होती. पैकी, हा सर्व प्रदेश अयोध्येच्या नवाबाच्या --- प्रथम
सादतखान, सफदरजंग व नंतर सुजाउद्दौला --- ताब्यात असल्याने पेशवा त्यांच्याशी कधी
गोडीगुलाबीने तर कधी शस्त्रबळाच्या धाकाने वाटाघाटी करत राहिला.
स. १७४२ मध्ये ज्ञानवापी मशीद पाडून तिथे पुन्हा विश्वेश्वराचे मंदिर
उभारण्याची मल्हारराव होळकराची इच्छा होती. परंतु त्या क्षेत्री मुस्लिमांचे
वर्चस्व असल्याने पंच द्रविड ब्राह्मणांनी यास मोडता घातला. खेरीज हिय्या करून
एकदम हा सर्वच प्रदेश जिंकून घेण्याची होळकर वा पेशव्याची या वेळी तयारी नसल्याने
प्रकरण इतक्यावरच मर्यादीत राहिले.
काशी - प्रयाग संबंधी एवढी चर्चा करण्याचे कारण म्हणजे, या प्रयाग
तसेच बंगाल - बिहार प्रान्तावरील स्वारीपोटीच पेशव्याने पानिपतला एकप्रकारे जन्म
दिल्याचे ऐतिहासिक पत्रांवरून आता सिद्ध होत आहे.
यमुनेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले रोहिलखंडातील रोहिले, पठाण, नजीबखान
व सुजा यांच्यातील परस्पर संबंध, भेद व दिल्लीतील त्यांचे हितसंबंध आणि शाही परिवाराचा
यांपैकी कोणत्या मंडळींकडे ओढा आहे - नाही व अब्दालीशी तह करण्यास वा त्याचे हल्ले
थांबवण्यास कोण उपयुक्त - अनुपयुक्त याची पेशव्यास बिलकुल उमज पडली नाही.
स. १७५० नंतर पेशवा एकदाही हिंदुस्थानात न गेल्याने असे झाले म्हणावे
तर दोन वेळा हिंदुस्थान स्वारी करणाऱ्या दादालाही याचे साधे आकलन न व्हावे याचे आश्चर्य
वाटून राहते. परंतु पेशव्यांची एकंदर कार्यपद्धती पाहता राजकारण जरी त्यांस
थोडेफार करता आले तरी राज्यकारभार करणे त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसून
येते. राज्यकर्त्यास जी दृष्टी लागते ती पेशव्यांकडे बिलकुल नव्हती. हा त्यांच्या
धर्मशिक्षणाचा -- वैदिक धर्माचाच प्रभाव होता. त्यामुळे हिंदुस्थानात मराठी
सत्तेला जे थोडेफार महत्त्व प्राप्त झाले
ते शिंदे - होळकर या दोन हिंदू सरदारांमुळेच असे माझे मत बनले आहे.
रघुनाथरावची इतिहासप्रसिद्ध अटक स्वारी झाली व अब्दालीशी तंटा उद्भवून
त्याची आणखी एक स्वारी होण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी पेशव्याचा आग्रह --
रघुनाथरावास -- साधल्यास पटणे - बिहारकडे जाण्याचाच होता. जो दादाने युक्तीने दुसऱ्यावर
--- म्हणजे शिंद्यांवर ढकलला.
शिंद्यांकडे पेशव्याची मुतालकी असल्याने त्यांस आपल्या पदास अनुसरून बळकट
सैन्य पदरी ठेवणे भाग होते व त्यामुळेच एकहाती मोहिमा पार पाडण्याचे त्यांस सामर्थ्यही
प्राप्त झाले होते. यामुळे स. १७५० नंतर हिंदुस्थान वा दख्खनमधील प्रत्येक मोहिमेत
शिंद्यांचा सहभाग हि एक अनिवार्य बाब बनल्याचे दिसून येते.
यामुळेच दादा दिल्लीहून परत येताना व शिंदे दख्खनमधून हिंदुस्थानात
जात असताना पेशव्याने शिंद्यांवर पंजाबच्या बंदोबस्ताची व बंगाल स्वारीची जबाबदारी
टाकून दिली. या कामगिरीत अपयश येऊन दत्ताजी बुराडी घाटावर अब्दाली, सुजा व नजीब या
त्रिवर्गाच्या हल्ल्यात मारला गेला तर जनकोजी जखमी झाला. शिंद्यांच्या या वाताहतीस
बव्हंशी इतिहासकार होळकरास जबाबदार मानत असले तरी उपलब्ध माहितीवरून शिंद्यांना
मुळी तिथले राज्कारांचे आकलनच न झाल्याने त्याच्यावर हि आपत्ती ओढवल्याचे दिसून
येते.
यानंतर होळकराचे अब्दाली व त्याच्या मित्रांशी युद्ध झाले. यात उभयपक्षी
बरोबरी होऊन अखेर दि. १३ मार्च १७६० रोजी शांतता करार झाला. परंतु याच्या दुसऱ्याच
दिवशी सदाशिवरावाची हिंदुस्थान प्रांती नियुक्ती झाल्याने उपरोक्त करार फिस्कटून
प्रकरण मूळ पदावर आले.
पानिपत मोहिमेआधी भाऊने सिंदखेड, उदगीर येथे निजामाविरुद्ध जय मिळवला
होता. हि त्याची अब्दाली विरुद्ध लढण्याकरता निवड करण्यासाठीची पात्रता मानण्यात
आली. परंतु या मोहिमांचे विश्लेषण करू पाहता एक सेनानी म्हणून त्याचा फार मोठा रोल
असल्याचे यात दिसून येत नाही. सिंदखेडला दत्ताजी शिंदे तर उदगीरला दादा यांनी
निजामाला चेपल्याचे उपलब्ध पुराव्यांवरून स्पष्ट होते. यावरून भाऊ हा पेशव्याहून
सरस तर दादापेक्षा कमी प्रतीचा सेनानी असल्याचे सिद्ध होते. तरीही पेशव्याने
त्याची हिंदुस्थान प्रांती जाण्याकरता निवड केली. ती अब्दालीशी भिडण्याकरता नव्हे
तर बंगाल - बिहार वा प्रयागकडे जाण्यासाठी !
पानिपत मोहिमेत भाऊने इतरांना
पाठवलेली पत्रे उपलब्ध असली तरी भाऊला इतरांनी पाठवलेली पत्रे तितकीशी उपलब्ध वा
प्रसिद्ध नाहीत. त्यामुळे वरील विधान साधार सिद्ध करणे अवघड असले तरी अशक्य मात्र
नाही.
आगऱ्यापर्यंतच्या त्याच्या प्रवासाचा मार्ग व गोविंदपंत तसेच इतरांना
पाठवलेली पत्रे पाहता भाऊचा प्रथम बेत इटावा अथवा त्या आसपास यमुना पार करून
जाण्याचा होता, ते अब्दालीला नव्हे तर सुजाला दबवण्यासाठी. परंतु अब्दाली
आरंभापासून यमुनेच्या पूर्व किनाऱ्यावर तळ ठोकून राहिल्याने त्यास हे साधता आले
नाही व तो तसाच पश्चिम किनाऱ्याने दिल्लीला गेला.
इथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे, आग्ऱ्यास येईपर्यंत
अब्दालीशी सामना करावा लागेल अशी भाऊ वा त्याच्या सल्लागारांची बिलकुलही कल्पना
नव्हती. त्यांच्या मते नेहमीसारखा अब्दाली उन्हाळ्यात मायदेशी रवाना होईल व
त्याच्या गैरहजेरीत आपला कार्यभाग साधून घेता येईल.
आगऱ्याहून दिल्ली व दिल्ली मुक्कामातील त्याच्या सर्व राजकीय हालचाली
या बव्हंशी पेशव्याच्या आज्ञेने झाल्याचे दिसून येते. अतिरिक्त सैन्य ठेवणे न ठेवणे
तसेच तह - करारमदार व दरबारातील महत्त्वाची पडे कोणास द्यायची, न द्यायची हे सर्व
निर्णय तातडीने घ्यायचे असले तरी पेशव्याच्या संमतीविना घेणे शक्य नव्हते व याचाच
फायदा शत्रूपक्षाने अचूक घेतला.
नांसाहेब पेशव्याची अदूरदर्शीता अशी कि, त्याने सुजला वजिरी देण्याचा
भाऊला आदेश दिला. ज्याचा परिणाम मराठी पक्षाच्या दृष्टीने हानीकारकच ठरला. सुजाकडे
वजिरी गेल्याने ना त्याच्यात व अब्दालीत तंटे झाले, ना त्याने उभयपक्षांत तह घडवून
आणला. उलट असा तह घडून येणे त्याच्याकरता हानिकारक होते. कारण अब्दालीकडून पेशवा न
मोडला गेल्यास मराठी सैन्याची टोळधाड त्याच्या राज्यावर येणार हे उघड दिसत होते.
परंतु राजकारणातील हि बाब जशी पेशव्याला कळली नाही तशीच इतिहासकारांनाही. व ते नजीबला
बडवत सुटले.
वस्तुस्थिती अशी होती कि, याक्षणी मराठी पक्ष मोडल्यास त्याचा सर्वधिक
फायदा फक्त सुजालाच होणार होता.
इकडे सुजाकडे वजिरी गेल्याने आधीचा वजीर गाजीउद्दिन नाराज होऊन जाट
राजाकडे आश्रयार्थ निघून गेला. खेरीज दिल्ली सोडून पानिपतला जाताना भाऊने स्वतःहून
वा पेशव्याच्या आज्ञेने केलेली अक्षम्य चूक म्हणजे ज्या तुर्की बादशाही रक्षणासाठी
तो हिंदुस्थानात आला होता त्या तुर्की बादशाही परिवारातील एकही प्रतिनिधी त्याने
स्वारीत सोबत घेतला नाही. म्हणजे लौकिकात हे युद्ध पेशवा व अब्दाली यांच्यात झाले.
बादशाही संरक्षक पेशवे व अफगाण लुटारू यांच्यात नव्हे !
दिल्लीहून भाऊ कुंजपुऱ्यास गेला. तिथल्या गढीला ताब्यात घेऊन
गोविंदपंतास पत्रात लिहिल्याप्रमाणे तिथून यमुनापार न होता, तो तसाच पुढे
कुरुक्षेत्राकडे निघाला. यामागे शिखांची मदत मिळवण्याचा त्याचा हेतू असला तरी
पलीकडच्या काठावर शत्रू प्रबळ असून तो तसाच किनाऱ्याने वर पुढे आल्यास शिखांची मदत
कितपत प्राप्त होईल याविषयी कसलीच शंका त्याच्या मनात आली नाही.
येथे तुलनेकरता दादाची अटकस्वारी पाहिली तर त्यात पठाण, रोहिले,
तुर्क, शीख या सर्वांची त्यात मराठी पक्षास सक्रीय मदत होती. भाऊच्या वेळी कोणीच
नाही. असे का व्हावे ? हा प्रश्न अद्याप एकाही इतिहास अभ्यासकास पडलेला नाही.
कुंजपुरा ते कुरुक्षेत्राच्या निम्म्या वाटेवरून अबाउट टर्न करून
पानिपत. असा भाऊचा प्रवास झाला. कारण कुरुक्षेत्राच्या नजीक पोहोचल्यावर बागपत
येथे अब्दाली यमुनापार झाल्याची बातमी आली. तेव्हा योजलेले सगळे बेत जागच्याजागी राहून
आता शत्रूच्या तंत्राने वागणे भाग पडले !
यानंतरचा इतिहास सर्वांच्या परिचयाचा आहे. यापुढील घटनांच्या अधिक
विवेचनाकरता इच्छुकांनी माझे ' पानिपत असे घडले ' वाचून बघावे अशी मी शिफारस करतो.
फक्त त्यामध्ये न आलेला, पाच - सहा वर्षांपूर्वी मला ज्ञात नसलेला तसेच अनावश्यक
वाटलेला भाग मी इथे मांडत आहे.
नाना फडणवीस आपल्या आत्मवृत्तात भाऊ हा शहनवाजखान व भवानीशंकर या दोन
सल्लागारांच्या तंत्राने चालत असल्याची माहिती मिळते. पैकी, शहानवाजखान कोण हे जरी
समजले नसले तरी एका उल्लेखावरून भवानी शंकर हा सुजाचा वकील असल्याचे कळते. जर हा
उल्लेख खरा असेल तर मग भाऊच्या एकूण शहाणपणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते. असो.
पानिपतच्या तळावर अडकल्यानंतर सुटकेचे शक्य ते प्रयत्न भाऊने करून
पाहिले. तहाची देखील जोरदार वाटाघाट करून पाहिली. परंतु हि सगळी धडपड त्याने
सुजासारख्या विश्वासघाती मित्रावर विसंबून केल्याने व्यर्थ गेली.
मला एक समजत नाही कि, आपल्या इतिहासकारांनी -- विशेषतः मराठी --
सुजाचे एवढे लाड, कोडकौतुक का केले आहे ? केवळ तो इराणी, शिया पंथी मुसलमान म्हणून
? कि ऋग्वैदिक कालीन वैदिक धर्मीय टोळीचा वंशज म्हणून ? सुजा वारंवार दगाबाजी
करतोय हे स्पष्टपणे दिसत असूनही इतिहासकार त्याच्या गुणवर्णनात मग्न ! असो.
सदाशिवरावची राजकीय व लष्करी आघाडीवरील कामगिरी पाहता त्याची योग्यता
फारतर समशेरबहाद्दरच्या एवढी असल्याचे म्हणता येते. कारण त्याला दिलेला
निर्णयस्वातंत्र्याचा अभाव. ज्यामुळे त्याचे यश - अपयश हे कधीच धवल राहू शकले
नाही.
महसूल विभागात त्याची कामगिरी उत्तम असल्याचे सांगितले जाते परंतु
पेशव्याच्या कर्जाची रड मात्र त्याच्या करड्या कारभारातही मिटली नसल्याचे दिसून
येते. अर्थात, पेशव्याचे कर्जप्रकरण ऐच्छिक किती व अनैच्छिक किती हा वेगळ्या
विषयाचा मुद्दा आहे.
पेशव्याचा दिवाण व सल्लागार म्हणून त्याने पेशव्याच्या आदेशाने
इब्राहीमखान गारदीस आपल्या लष्करात दाखल करून घेतले खरे पण या फ्रेंच प्रशिक्षित
पथकाच्या उणीवा त्याच्या लक्षात आल्या नाहीत. अर्थात हा दोष त्याला फारसा देता येत
नाही. कारण, फ्रेंच युद्धतंत्र सदोष असल्याचे पुढील काळात महादजी शिंदे सारख्या
लढवय्यास जिथे उमगले नाही तिथे भाऊसारख्या पार्टटाईम सेनानीस दोष का द्यावा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा