नुकत्याच घडलेल्या वढू येथील गोविंद गोपाळ समाधी नासधूस प्रकरण व भिमा - कोरेगाव दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर नवबौद्ध तसेच महारांच्या पुर्वेतीहासाचा ऐतिहासिक संदर्भ साधनांच्या आधारे धांडोळा घेण्याचे प्रस्तुत लेखात योजले आहे.
हिंदू धर्म म्हणजे जातींचे कडबोळे असून या जाती संस्थेला हजारो वर्षांनी परंपरा असल्याचे सरधोपट विधान केले जाते. परंतु अलीकडेच श्री. संजय सोनवणींनी आपल्या एका लेखात कुशाण कालीन ' अंगविज्जा ' ग्रंथाच्या आधारे असे सिद्ध केले आहे कि, इ. स. च्या दुसऱ्या शतकापर्यंत या देशात जातीव्यवस्था अस्तित्वात नव्हती.
जातीसंस्थेची निर्मिती वर्णव्यवस्थेतून झाली हा देखील असाच एक तकलादू सिद्धांत. यासंदर्भातही सोनवणींनी जातींची निर्मिती श्रेणीसंस्थेतून झाल्याचे सिद्ध करत जाती या व्यवसायातून जन्मल्याचे सिद्ध केले आहे.
या दोन सिद्धांतांच्या आधारे हे स्पष्ट होते कि, समाजास उपयुक्त सेवा पुरवणाऱ्या उद्योग - व्यवसायांतून त्या त्या जातीची निर्मिती झाली असून जातीसंस्था हा वांशिक आधारावर बनलेला गट नाही. तसेच जाती अपरिवर्तनीय देखील नाहीत. अर्थात यामुळे बव्हंशी सामाजिक शास्त्रज्ञांचे सिद्धांत कोलमडून पडत असले तरी हेच सत्य आहे व वस्तुस्थिती दर्शक पुराव्यांच्या आधारे त्याचा स्वीकार करणे आवश्यक ठरते.
जातीसंस्था व्यवसायातून जन्मलेली असल्याने महार ही जात कोणत्या व्यवसायातून निर्माण झाली ? या प्रश्नाचे उत्तर श्री. सोनवणींनी आपल्या ' महार कोण होते ? ' या प्रबंधवजा ग्रंथात दिले आहे.
त्यानुसार मनुष्य वसाहती करून राहू लागला तेव्हा वस्त्यांच्या रक्षणार्थ जे सैनिक, रक्षक नेमले जात -- तोच महारांचा मुख्य व्यवसाय होता व या रक्षक संस्थेची मुळे पार सिंधू संस्कुती पर्यंत जातात.
सातवाहन काळात प्रचलित महाराष्ट्री प्राकृत भाषेत या रक्षकांस रक्ख व त्यांच्या मुख्यास महारक्ख हे पदनाम होते. विशेष म्हणजे याच काळात महारठी हे पद प्रचलित असून हि दोन पदनामेच पुढील काळात महार व मराठा या प्रचलित जातींत परावर्तीत झाली.
सातवाहन साम्राज्य सुमारे साडेचारशे वर्षे टिकून राहिल्याने व त्याचा दक्षिण भारतात -- विशेषतः महराष्ट्र - कर्नाटक प्रांती विस्तार झाल्याने याच परिसरात आपणांस महार जात प्रामुख्याने आढळून येते.
भारतावरील इस्लामी आक्रमणानंतर येथील समाजजीवनात मोठी उलथापलाथ झाली. त्याचा फटका रक्षक संस्थेलाही बसणे स्वाभाविक होते. सामान्यतः १२ व्या १३ व्या शतकात दक्षिण भारतात बलुतेदारी पद्धती अस्तित्वात आल्याचे मानले जाते. या बलुतेदारीचे तीन प्रतीत वर्गीकरण तत्कालीन समाजाने केले असून महार हा पहिल्या प्रतीचा वतनदार होता.
या काळातील त्याच्यावरील मुख्य जबाबदाऱ्या म्हणजे गावाचे रक्षण, व्यापारी तांड्याचे संरक्षण, चोरांचा बंदोबस्त इ. असून जोडीला गावात येणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर नजर ठेवणे, गावातील जमीन खरेदी - विक्री व्यवहार तसेच जमिनीविषयक तंट्यात साक्ष देणे, गोळा केलेला सरकारी महसूल मुख्य ठाण्यावर जमा करणे, गावातील जन्म - मृत्यूची नोंद ठेवणे इ.
सिंधू संस्कृती मध्ये जवळपास निमलष्करी वा पोलिसांप्रमाणे असलेली हि रक्षक संस्था देशाच्या आर्थीक, राजकीय,, सामाजिक अवनतीच्या काळात हरकामी जात बनून राहिली. परंतु या प्रवासात अजून एक मोठा टप्पा बाकी होता व तो म्हणजे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात पडलेला भीषण दुष्काळ.
या दुष्काळात घडलेल्या -- मह्रांच्या इतिहासाशी संबंधित काही घटना आजही दुर्लक्षित राहिल्या आहेत.
बहामनी सम्राट दुसरा महंमदशहाच्या काळात पडलेल्या दुष्काळात त्याचा एक अधिकारी -- दामाजीपंत याने शाही हुकुमाविरुद्ध आपल्या अखत्यारीत सरकारी गोदामातील धान्य दुष्काळग्रस्त जनतेत वाटून टाकले. परिणामी बादशहाने त्याच्यावर जबर आर्थिक दंडाची आकारणी केली. दामाजीपंतास हा दंड भरण्याचे सामर्थ्य नसल्याने त्याच्यावतीने अंबरनाक महाराने दंडाचा भरणा करून त्याबदल्यात दामाजीची सुटका व महार समजास ५२ हक्कांची सनद पदरात पडून घेतली.
उपरोक्त सनद श्री. अनिल कठारेंनी आपल्या ' शिवकाळ व पेशवेकाळातील महारांचा इतिहास ' ग्रंथात संपूर्ण स्वरूपात दिली असून तिचा अभ्यास केला असता पुढील गोष्टी स्पष्ट होतात :-
१) दामाजीपंतास झालेला जबर आर्थिक दंड भरण्याइतपत महार मंडळी श्रीमंत होती.
२) दुष्काळामुळे तत्कालीन सर्वच जातीतील लोक मृताहारी बनले होते.
३) बावन्न हक्कांच्या सनदेत त्यांनी ज्या ज्या सेवा करण्याचे काही विशिष्ट हक्कांच्या बदल्यात मान्य केले आहे, त्या सेवा महारांनी करण्यापूर्वी इतरही लोक करत होते. परंतु महारांनी त्या सेवांवर आपली एकाधिकारशाही निर्माण केली.
परंतु केवळ या सेवा स्वीकारण्याने महार अस्पृश्य बनले असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल. कारण या ५२ हक्कांतील कित्येक बाबींवर नंतरच्या काळात इतर जातींनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचे इतिहासात नमूद आहे.
महार समाजातील संत चोखामेळा या काळाच्या आसपासचा. त्याचा नमूद असलेला इतिहास पाहता महार मंडळी शिक्षणात मागे असल्याचे दिसून येत नाही. अर्थात हे अनुमान तर्कावर आधारित असून याचे खंडन, चोखोबांचे अभंग ब्राह्मणांनी लिहून ठेवले असे केले जाते.
परंतु यावरील मुख्य आक्षेप असे :- १) जर याकाळात महार अस्पृश्य होते तर ब्राह्मणांनी चोखोबांचे अभंग लिहून ठेवण्याचे कारण काय ?
२) या बदल्यात चोखोबा त्यांना फुकट सेवा देत होते असे म्हणता येत नाही. कारण खुद्द चोखोबांना आपले साहित्य लिखित स्वरूपात असावे असे -- जर ते अशिक्षित असतील तर वाटणे कितपत संभवनीय आहे ?
३) चोखोबा या बदल्यात ब्राह्मण लेखनिकास पैसे देत होते.
पैकी, पैसे देऊन अभंग लिहून घेण्याइतपत चोखोबा धनिक नव्हते हे त्यांच्या अंत कथेवरून स्पष्ट होते. सेवाचाकरीच्या बदल्यात ब्राह्मणाने त्यांचे अभंग लिहिले हेही मत अग्राह्य दिसते. मग चोखोबा व त्यांच्या कुटुंबीयांनीच आपले अभंग लिहून ठेवले हे मान्य करावे लागते.
परंतु आश्चर्याची बाब अशी कि, प्रस्थापित व महार - नवबौद्ध मंडळी चोखोबांचे अभंग ब्राह्मणांनीच लिहिले यावर विश्वास ठेवतात. असो.
शिवकाळ व पेशवाई पाहिली तर लष्करात महारांचा समावेश असल्याचे दाखले आहेत. त्याचप्रमाणे शिवकाल - पेशवाई दरम्यानच्या काळात तुरळक प्रमाणात का होईना महारांना पाटीलकी वतन असल्याकी कागदोपत्री नोंद आहे. जर महार अस्पृश्य असते तर समाजाच्या विरोधात जाऊन महारास पाटीलकी वतन देण्याचा निर्णय येथील राज्यकर्त्यांनी घेतला असता का ? याचा विचार व्हावा.
ज्या दुसऱ्या बाजीरावाच्या काळात घडलेल्या भिमा - कोरेगावच्या अनिर्णीत संग्रामावरून सध्या जातीय तेढ माजली आहे त्या बाजीरावाच्या कारकिर्दीतही महारांच्या स्थानावर फारसा फरक पडल्याचे दिसून येत नाही. गावातील तसेच लष्करातील त्यांचे स्थान पूर्ववत होते.
अपवाद फक्त वैदिकांनी बळकावलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचा. सवाई माधवराव पेशव्याच्या काळातच विठ्ठल मंदिराच्या निकट अतिशुद्रांनी येण्यास प्रतिबंध घातला होता. व तो देखील ब्राह्मण तथा वैदिकांना त्यांचा स्पर्श होतो म्हणून. पुढे बिनडोक हिंदूंनी त्याचेच मंदिरप्रवेश बंदीत रुपांतर केल्याचे अनुमान संभवते. परंतु याबाबतीत अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
पेशवाई अखेरीस रायगड लढवणाऱ्या रायनाक महारास वैदिक व वैदिकानुयायी मंडळींनी फितूर, देशद्रोही ठरवण्याचा यत्न केला असला तरी इतिहास संशोधक श्री. शांताराम विष्णु आवळसकर यांनी आपल्या ' रायगडची जीवनकथा ' या संदर्भग्रंथात याचे खंडन केले आहे. तसेच प्रास्ताविकात त्यांनी रायनाक संबंधी पुढील माहिती दिली आहे :- ' रायनाकाचे टाक करून टिपणीस, कारखानीस इत्यादी रायगडशी संबद्ध असणाऱ्या प्रभु घराण्यांनी पूजेत ठेविले आहेत, याचा काय अर्थ करायाचा ? नाते येथे रायनाकाचे एक ' मंदिर ' आहे. शेतीस प्रारंभ करण्यापूर्वी रायनाकापुढे काही बळी देण्याचा रिवाज आहे. रायगडचा रायनाईक व मंदिरातील रायनाईक एकच आहेत. ही देशद्रोहयाची पूजा मानणे सर्वथा चूक होईल. या प्रकरणी संशोधनाने सिद्ध होईपर्यंत रायनाकास देशद्रोही मानणे योग्य नव्हे, असे मत मी मांडले आहे. '
एका फितूर अस्पृश्याचा टाक स्पृश्यांनी आपल्या पूजेत का ठेवावा ? त्यास दैवत्व का प्राप्त व्हावे ? याचा विचार करणे जसे आवश्यक आहे तसेच यासंबंधी अत्याधिक संशोधन होणेही गरजेचे आहे. असो.
कल्पित सिद्धांतांपेक्षा वास्तविक ऐतिहासिक पुरावे अधिक बोलके असतात. परंतु महार समाज व अस्पृश्यता यांचा संबंध जोडण्यात व कालनिश्चतीत मात्र हे पुरावे मौन बाळगून आहेत. याविषयी सध्या अनुमानाने इतकेच म्हणता येते कि, धर्मांतरित वैदिकांनी स्पृश्य - अस्पृश्यतेचे खूळ माजवले व बिनडोक हिंदूंनी ते जसेच्या तसे स्वीकारत त्याची अत्याधिक अंमलबजावणी करण्याकडे लक्ष दिले. याचा दृश्य परिणाम म्हणजे लष्करातील स्पृश्य जातींच्या दबावामुळे ब्रिटिशांनी स. १८९५ मध्ये महारांसह इतर कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातींना पेन्शनीत काढत लष्करातून बरखास्त केले.
त्यानंतर लष्करांत महारांना पूर्ववत प्रवेश मिळावा याकरता निवृत्त महार लष्करी अधिकाऱ्यांनी कागदोपत्री सरकारदरबारी प्रयत्न केले तसेच महारांच्या लष्करी, शौर्यशाली परंपरेचेही त्यांनी गौरवगान आरंभले. यातूनच भीमा - कोरेगावच्या मिथकाची निर्मिती झाली. ज्यामध्ये महारांच्या शौर्याचे उदात्तीकरण व ब्रिटीश सरकारला त्यांच्या संकटकालीन सेवेची आठवण करून देणे या दोन्ही गोष्टी साध्या होणार होत्या व परिस्थितीनुरूप त्या घडूनही आल्या.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नव्याने निर्मित राज्यघटनेनुसार अस्पृश्यता हि कायद्याचे निर्बंध लादून दूर करण्यात आली. मात्र यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महार तसेच अनुसूचित जाती- जमातीत मोडणाऱ्या कित्येक जातींतील व्यक्तींनी बौद्ध धर्माचा आश्रय घेतला. यानंतर बौद्ध धर्मात प्रवेशलेल्या पुर्वास्पृश्यांचे -- विशेषतः महारांचे एक नवे पर्व सुरु झाले. जे मानसिकदृष्ट्या दुभंगलेले होते, आहे. या पर्वातील सहभाग्यांनी स. १९५६ पूर्वीच्या प्रत्येक श्रद्धा, परंपरेशी असलेला आपला संबंध तोडला. इतका कि, सध्या महार शब्द उच्चारणेही अनुसूचित जाती - जमाती बाहेरील व्यक्तीस शक्य न व्हावे. परंतु त्याच वेळी महारांची शौर्यगाथा समजल्या जाणाऱ्या भीमा - कोरेगावशी ते आपली नाळ तोडू शकले नाहीत. तसेच तत्पूर्वीच्या बव्हंशी कल्पित सामाजिक गुलामगिरीच्या मिथकातून ते स्वतःला मुक्त करू शकले नाहीत. अन्यथा आपला पूर्वेतिहास त्यांनी स्वतःहून शोधला असता, मांडला असता. परंतु डॉ. आंबेडकरांनी शुद्र तसेच अस्पृश्य विषयक प्रबंधवजा ग्रंथांत केलेली मांडणी अंतिम मानत त्यांनी या कार्यास पूर्णविराम दिल्याचा अद्यापही त्यांचा समज आहे. व या घातक समजातून महार तसेच नवबौद्ध मंडळी वैचारिक संघर्षाची प्रशस्त वाट सोडून सशस्त्र बंडाळीचे प्रतिक मानल्या जाणाऱ्या भीमा - कोरेगावकडे अधिक भावनिक दृष्टीकोनातून पाहताहेत. यातून सामाजिक शांतता, सलोखा भंग होण्याचा मोठा धोका आहे.
अर्थात यास केवळ तेच एक जबाबदार ठरत नसून त्यांच्या विरोधात दंड थोपटून उब्या राहणाऱ्या मराठा समाजातील मंडळींचाही तितकाच मोठा वाटा आहे. वैदिकांच्या अनुकरणाने त्यांनीही स्वतःसं अनुकूल अशा इतिहासाचे पुनर्लेखन आरंभले असून त्याचा सातत्याने प्रचार चालवला आहे. ज्यास इतिहास म्हणजे काय ? हेच मुळी माहिती नसणारे तरुण मोठ्या संख्येने बळी पडताहेत. यातून साध्य काय होणार ? मुठभरांचे हित साधले जाईल तर बहुसंख्यांकांचे संसार उध्वस्त होतील, आयुष्यं बरबाद होतील. त्याचप्रमाणे देशाच्या प्रागतिक वाटचालीवरही अनिष्ट परिणाम होईल.
सारांश, इतिहास हा प्रेरणादायी, स्फूर्तीदायी नसून ते केवळ गतकालीन सामाजिक वस्तुस्थिती दर्शवणारे एक माध्यम आहे. याचा विसर पडल्यास त्याचे विकृतीकरण होत आपला वर्मानच नव्हे तर भविष्यकाळही बरबाद होऊ शकतो.
संदर्भ ग्रंथ :-
१) अस्पृश्य मुळचे कोण ? आणि ते अस्पृश्य कसे बनले :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२) शुद्र पूर्वी कोण होते ? :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३) महार कोण होते ? :- संजय सोनवणी
४) अस्पृश्यांचा लष्करी पेशा :- चांगदेव भ. खैरमोडे
५) महार एक शूर जात :- शि. भा. गायसमुद्रे
६) रायगडची जीवनकथा :- शां. वि. आवळसकर
७) शिवकाळ व पेशवेकाळातील महारांचा इतिहास :- अनिल कठारे
२ टिप्पण्या:
महारांना नीच पातळीवर आणणारा जो कुणी खलनायक होता तो तर मातीत गेला परंतु त्याच्या 17 पिढयाही हाय हाय करून मातीत जातील!! हा इतिहास आम्हाला आमचे पूर्वज आपल्या मुखातून सांगायचे!! इतर लोक आमची टिंगल करायचे कारण पुस्तिकारुपात आमचा इतिहास कमी प्रमाणात होता!! पुढाकार घेणाऱ्या लेखकाचे धन्यवाद!!
जाती ह्या व्यवसायाच्या बनल्यात हा साधारण नियम खूप आधीपासूनच मांडला जातो आणि याला विरोध कोणाचा च नाही कारण ते खरे आहे. सुतार, लोहार, कुंभार ,सोनार, शिंपी या सर्व व्यवसाय वाचक च जाती आहेत. मूळ प्रश्न त्या बंदिस्त का झाल्या याच उत्तर धर्म शास्त्राकडे जाते. गुप्त काळापासून धर्मशास्त्राला जोर आला तेव्हापासून जाती संस्था हळू हळू बंदिस्त होत गेली. जशी जशी ती बंदिस्त होत गेली हिंदू धर्माचा उदय व बौद्ध धर्माचा र्हास होत गेला.
प्रस्थापित व महार - नवबौद्ध मंडळी चोखोबांचे अभंग ब्राह्मणांनीच लिहिले यावर विश्वास ठेवतात >>>> बौद्ध लोक चोखोबाच नावही घेत नाहीत. बौद्धातील नवीन पिढीला चोखोबा कोण होते हेही माहीत नसेल तर या गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल.
महारांना अस्पृश्यता कधी लागली ???
अस्पृश्यतेचा उगम काही प्रमाणात धर्मात आहे. पर धर्माविषयी द्वेष या भावनेतून अस्पृश्यतेचा उगम झाला असावा. अस्पृश्य हे जैन किंवा बौद्ध असल्यामुळे परधर्मीय हिंदू मंदिरात त्यांना येण्यास बंदी असावी. त्यात ते अभक्ष भक्षण करत आणि हिंदू धर्मात अभक्ष भक्षण पाप मानले आहे. पण परधर्मीय असल्याने अस्पृश्य ते खात असत त्यातून अस्पृश्यतेचा जन्म झाला असावा
टिप्पणी पोस्ट करा