सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

शिवकालीन वतनाचा तंटा

 
        जगदाळे यांच्या मसूर, कराड येथील देशमुखी वतनाचा तिढा 

    हकीकत माहादजी वलद सुलतानजी जगदळे देसमुख. परगणे मजकूर कदीम देशमुखी प्र|| कऱ्हाडाबाद व प|| मसूर एथील देसमुखी कदीम होती. वडील भाऊ जगदेराऊ याचे वाटणीचे कऱ्हाड व धाकटा भाऊ रामोजी याचे वाटणीचे मसूर. दो हि परगण्याची देशमुखी दोघे भाऊ करीत असतां वडील भाऊ जगदेराऊ यामध्ये व कऱ्हाडीचा नैबामधे कांही बोलाचाली होऊन कुसर पडला. त्याने जगदेरायास दंड बांधला. ते देवयास ताकती नाही. मग जगदेराऊ पळोन गेला. नैबाने कुल बिसादी लुटून खालसा केली. जगदेरायास हरामखोरी लावून देसमुखी अमानत केली. बखेर पादशाहास लेहून अमानत करून, नेगोजी थोरात उंबराव याचे दुमाला केली. हा वजीर पादशाही चाकर होता. याच्या तनख्यांत दिल्ही. मसूर परगणाची देसमुखी देह सत्तावन आपले वडील करीत होते. जगदेराऊ बाहीर दावे करितां मरोन गेला. त्याचे पोटी संतान नाही. मग आपला वडील रामोजी व त्याचा लेक दयाजी हे बादूर पादशाहापाशी फिराद जाहाले. हजरत पादशाहानी हकीकत मनास आणिली. तेव्हां पेसकसी दाहा हजार होन माथां ठेऊन कऱ्हाडीची देसमुखी कदीम होती ऐसे मनास आणून दुमाला केली. पेसकसीचे पैसे द्यावयास मौसर नाही. म्हणऊन आऊंध तरफेचे देहे २७ सत्तावीस लुखजी कुकजी यादव पादशाही मनसफदार होते त्यांस सत्तावीस गावीची देसमुखी देऊन, त्यापासी पैसे घेऊन, पेसकसी फेडिली. त्यावरी थोरातामध्ये व आपल्या वडिलामध्ये दावा लागला. तेव्हां मागती आपले वडील हजूर विज्यापुरास गेले. हुजूर नागोजी व बहिरजी नाहवी याचे अडिनाव यादव हे होते. यावरी पादशाहाची मेहेरबानी होती. मग त्याची पाठी करून च्यारी गावीची त्यास देशमुखी दिल्ही. कडेगाऊ, कोरेगाऊ, टेंबू, गोवारे, ऐसे च्यारी गांव प्र|| मजकुरीचे देऊन, त्याची पाठी करून, थोराताचा दावा दूर केला. त्याउपरी रताजी रुपाजी यादव यांनी आऊंधीची देसमुखी करून पुंडावे केले. वणगोजी मुधोजीस मिळोन मुलखामध्ये राजीक केले. आणि वणगोजी मुधोजीस आणून कऱ्हाडीचा कोट त्यास घेऊन दिल्हा. मोठमोठे सावकार लुटिले. पनाळापावेतो राजीक केले. ते वख्ती वणगोजी मुधोजी पुंड जाहाले होते. त्यांची सनद कऱ्हाडीचे देसमुखीची करून घेतली. तेव्हां यादवांमध्ये व आमच्या वडिलांमध्ये दावा पडला. मग आपला आजा बादूर पादशहापासी फिराद जहाला. पादशाहानी रताजी रुपाजी बहुत तलब केला. ते हजूर न येत. मग त्यावेरी नामजादी करून रताजी रुपाजी जिवे मारिले. ते वख्ती देसमुखी अमानत करून रणदुल्लाखान याचे हवाला केली. मसूर परगणाची देसमुखी देहे सत्तावन गावींची चालत होती. याउपरी निजामशाहीतून शहाजी राजे भोसले हे विज्यापुरास आले, पादशाहानी मनसफ दिल्ही. ते वख्ती यादवाचे भाऊबंद शहाजीराजाकडे चाकर होते. त्यांनी शाहाजीराजास मिळोन देसमुखीचा करीना सांगितला जे, " जगदाळाच्या घरामध्ये कोणी नाही, जगदाळाचे घर मोडिले आहे, कऱ्हाडची देसमुखी आपल्याकडे केली पाहिजे, त्याचा आमचा दावा आहे. " ऐसे सांगितले. मग शाहाजीराजांनी पादशहास अर्ज करून दौलतेचे भरीस देसमुखी कऱ्हाडची मागोन घेतली. मग आपला आजा नरसोजी हा मसूर परगणाची देसमुखी व कसबाची पटेलगी आपला वडील करीत असतां, शाहाजीराजे भोसले यांस यादव मिळोन देसमुखी कऱ्हाडीची शाहाजीराजाकडे केली. हे वर्तमान आयकोन करनाटकमध्ये बेंगरुळास आपला आजा नरसोजी जगदळा गेला. तेथे शाहाजीराजाची भेटी घेतली त्यास कऱ्हाडीचे देसमुखीची हकीकती सांगितली. ते वख्ती यादव व शाहाजीराजे यांनी विचार करून दगा देऊन आपला आजा नरसोजी जगदाळा मारिला. आपला बाप व आपला चुलता होता. याउपरी शाहाजीराजांनी पिसळे म्हणून एक महराटे चाकरीस ठेविले होते, त्यास लावून देऊन मसुरीचे मोकदमीवरी दावा करविला आणि मसूर परगणा शहाजीराजाने जहागीर घेतली. आणि मसुरीच्या कोटामधे आपले ठाणे ठेविले. ते वख्ती पिसळ्यास लावून देऊन मसुरीची पटेलगी व देसमुखी अमानत केली आणि दादाजी कोंडदेव शहाजीराजाकडील सुभेदार त्यास सांगोन पिसळ्यास व आम्हांस गोत लावून दिल्हे जे परगणे पाटणीचे स्थळी खाने अजम लाडीखान हवालदार कऱ्हाडीचा व पाटणीचा एकच होता त्याने मसूर परगणाचे पाटील व हक्कजवारीचे गोत व कसबे मसूरीचे बैते बलूते ऐसे मेळवून पिसळे व आपला चुलता व आपला बाप यापासी जमान घेऊन गोताने निवाडा केला की, ' जगदळेयाची मसूर परगणाची देसमुखी व कसबाची पटेलगी खरी असे ' म्हणोन गोही दिल्ही. व कदीम भोगवट्याचे कागदपत्र फर्मान होते ते मनास आणून पिसळे खोटे केले. तेव्हां पिसळे बोलिले की, आम्हास भोसल्यांनी व घोरपड्यांनी स्थळी उभे केले, आपण भोसल्याचे चाकर असो, आपल्यास मोकदमीसी कांही समंध नाही. ' ऐसे यजितपत्र लेहून दिल्हे. तेणेप्रमाणे लाडीखान हवालदाराने हक्कजवारीचे साक्षीनसी माहजर करून दिल्हे. ते वख्ती देसमुखी व पटेलगी पनाळा अमानत होती. मग आपला चुलता तानाजी हा सुलतान महमूद पादशाह यासी जाऊन दुमाला फर्मान करून घेतले. पनाळाच्या किल्लेदारास ताकीद घेतली. त्याउपरी भोसल्यांनी ठाणांतील लोक काढून पिसळयाचे नांव सारून आपला चुलता तानाजी जगदाळा जिवें मारिला आणि मागती देसमुखी शाहाजीराजानी आपल्याकडे घेतली. आपला बाप पटेलगी करून होता. आपला जीव वाचवून देसमुखीचे नांव काढिले नाही. त्याउपरि भोसल्याची जबरदस्ती देखोन आपला जीव वांचवून होते. त्याउपरि शाहाजीराजाचा लेक शिवाजीराजा जाहाला. त्याने पुंडावा करून पादशहासी बिघाड केला. ते वख्ती आपला बाप पादशाही फौजेस मिळोन देसमुखीचा मजकूर करून देसमुखीचा हक्क घेऊं लागला. अबदुलखान हा जाउलीत बुडविला, तेथे भोसल्याच्या सरदारांनी पाळत करून वसंतगडीहुन स्वारी जाऊन, ते ठाणे घेरून, आपला बाप दस्त करून, वसंतगडास आणिला, आणि त्याची गर्दन मारिला. ते समयी आपले नेणतपण होते. आपण धाकुट होतो मग आपली आई व आपण पळोन सातारास गेलो. तेथून आपली आई राजगडास जिजाई आवा, शिवाजीराजाची आई, तापासी गेली, की माझे च वतन घेऊन आपले तीन खून केले, आपले पोटी एक मूल आहे, त्यास कौल दिल्हा पाहिजे. ते वख्ती शिवाजीराजे बोलिले की, ' देसमुखी गोष्टी न करावी, कौल च आहे, ' ' देसमुखी गोष्टी न काढावी. ' ऐसे लिहिले आपले आईपासून घेतले की, ' पटेलगी करून असावे. ' ऐसा कौल घेऊन, मग आपले आईने नेऊन शिवाजीराजास भेटविले. त्यांनी वेंकाजी दत्तो याचे हाती देऊन, पटेलगी दुमाला करून, मसुरास पाठविले. मसुरीची पटेलगी करीत होतो. तों पुढे कितेक दिवसा शिवाजीराजे मृत्यु पावले. त्यांचे लेक संभाजीराजे राज्य करुं लागले. त्यांस भेटोन अर्ज केला की, ' साहेबी कऱ्हाडची देसमुखी घेतली, मसूरीचे तरी देसमुखीचे वतन आपले आपले दुमाला करणे, बाज गुन्हाई माझे वतन घेऊन तीन खून केले आहेत, तरी त्या खुनांचा वाटा तरी मसूरीचे वतन तरी तेवढे दुमाला करणे. कऱ्हाडची नांवगोष्टी काढणार नाही. ' ऐसे लेहून दिल्हे. मग संभाजीराजे मेहरबान होऊन मसूरपरगणाची देसमुखी दुमाला करावी ऐसे केले. काम होऊन यावे. तो एसजी फर्जंद याचे हवाला देसमुखी केली. मग त्याचे आर्जव करून, मग एसजी फर्जंदाने अर्ज करून देसमुखी दुमाला करविली. तो सवेच संभाजीराजा धरून नेला. राजाराम पळोन चंदीस गेला. त्याचे सरदार संताजी घोरपडा व धनाजी जाधव यांनी मागती इकडे ढोहणा केला. मग आपण वाईस जाऊन नवाब न्याहरखान साहेबास भेटलो. त्यापासून पन्नास स्वार व पन्नास प्यादे मागून घेतले व आपण कांही स्वार - प्यादे ठेविले आणि मसूरीचे ठाणे बळाविले. ते वख्ती हजरत शाहाजादे अजमशाहा पनाळेवरी मसलतीस चालिले. त्यांस भेटोन इलतमेस गुदरे अर्ज केला. त्यांनी हि आपले निशान - फर्मान करून दिल्हा. नवाब रोहिलाखान यांनी हि आपला परवाना करून दिल्हा. तुळापुरी ज्याहांपन्हास अर्ज करून जानसारखान फौजदार प|| खटाऊ यावरी हुकूम घेतला. याउपरि सातारचे मसलतीवरी सर्जाखान आले. त्यांनी सातारास वेढा घातला. न्याहारखानाचे वाईचे ठाणे तहगीर जहाले. तेव्हां मसूरीचे हि रहमतपुरी होते ते हि उठोन गेले. मग सर्जाखानास जाऊन भेटोन, सर्जाखानाचे पन्नास स्वार व पन्नास प्यादे व त्यापासी शेख अजमतुला, म्हणौन ठाणेदार मागोन घेतला. ते वख्ती संताजी घोरपडा व धनाजी जाधव येऊन सातारचा वेढा उठविला. सर्जाखान सुटोन आले. गनीमाने मसुरास वेढा घातला. ठाणेदार राती करून निघोन गेला. वाई, बुध, व खटाऊ ऐसी ठाणी टाकून गेले. कोठे आसिरा नाहीसारखा जाहाला. बिन आसिराविण आठ रोज गांव भांडविला. मग त्यांचा कौल घेऊन त्यांस भेटलो. त्यांनी धरून वसंतगडास नेले. नागवण बांधिली. मग आपला लेक सुभानजी हा त्यांपासी कौल ठेवून आलो. पैका ठेवयास थारा नाही म्हणोन चंदीस राजारामापाशी गेलो. त्याचे आर्जव करून देसमुखी दुमाला करून घेतली. फिरोन माघारी आलो. आपली देसमुखी करीत असतां, धनाजी जाधव याचे निसबतीचे पदाजी व पिराजी यादव याचे लेक व हे पंचहजारी चाकर होते यांनी व धनाजी जाधवाने मागती आपणासी कथळा केला. मग आपण नवाब हमीदुद्दिखान याकडे खटावास जाऊन अर्ज केला. त्यांनी हजूर लेहून र|| मंबाजीपंत राजे याचे ठाणे दिल्हे. इत्यादि.


कठीण शब्दांचे अर्थ :-
कदीम - प्राचीन, कुसर - वाकडे पडले, बिसादी - जिनगी, अमानत - जप्त, बखेर - हकीकत, दुमाला - स्वाधीन, देह - गाव, पेसकसी - नजर, मौसर - ताकद, राजीक - दंगा, तलब - बोलावले, नामजादी - धरणे किंवा शिपाई पाठवून, गोही - साक्ष, फर्मान - आज्ञापत्र / राजपत्र, यजितपत्र - राजीनामा, कौल - अभयपत्र, बाज - पूर्वी, ज्याहांपन्हा - औरंगजेब, गनीम - मराठे / शत्रू.

संदर्भ ग्रंथ
१) महराष्ट्र इतिहास मंजिरी :- श्री. द. वि. आपटे