इतिहास
लेखन हे पूर्वग्रहदूषित नसावं असा एक दंडक आहे. परंतु कित्येकदा असं आढळून आलं आहे कि, या नियमाचा विसर भल्या भल्या नामवंत इतिहासकारांना प्रसंगोत्पात पडला आहे. याबाबतीत अनेक उदाहरणांपैकी एक म्हणजे कुंभेरीचा वेढा व खंडेराव होळकराचा मृत्यू !
नानासाहेब पेशव्याचा धाकटा भाऊ रघुनाथराव उर्फ दादासाहेबाची पहिली हिंदुस्थान सवाई कुंभेरीच्या वेढ्यामुळे इतिहासात प्रसिद्ध आहे. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट, प्रयोजन आणि तिचा फलितार्थ याविषयी सरदेसाई, शेजवलकर इ. मराठी तसेच जदुनाथ सरकार सारखे अमराठी इतिहासकार लेखन करताना कुठेतरी प्राप्त पुरावे नाकारून सर्वसामान्यतः रघुनाथराव, मल्हारराव इ. विषयी प्रचलित गैरसमजांच्या आहारी गेल्याचे दिसून येते. परिणामी, कुंभेर स्वारी अथवा दादासाहेबाची प्रथम हिंदुस्थान मोहीमच नव्हे तर पुढे घडून आलेल्या पानिपतच्या आकलनातही हि दिग्गज मंडळी कमी पडतात व यांच्या मळलेल्या वाटेने जाणाऱ्या तरुण इतिहास संशोधक, अभ्यासकांचीही हटकून फसगत होऊन ते देखील तोंडघशी पडतात !
प्रस्तुत लेखामध्ये आपणांस कुंभेरी मोहीम उद्भवण्याचे कारण व खंडेराव होळकराच्या मृत्यूची, प्रकाशित परंतु दुर्लक्षित संदर्भ साधनांच्या आधारे चर्चा करायची आहे.
स. १७५२ मध्ये बादशाह व पेशव्यातर्फे शिंदे - होळकरांत घडून आलेल्या तहानुसार पेशव्याला तुर्की बादशाहकडून अजमेर व आग्रा या दोन सुभ्यांची सुभेदारी प्राप्त झाली होती. पेशव्याने आपल्यावतीने शिंद्यास अजमेर तर होळकरास आग्रा देऊ केले. पैकी शिंद्यास मिळालेल्या अजमेरात मारवाडकर बिजेसिंग ठाण मांडून बसला होता तर आग्ऱ्यास जाट प्रबळ होता. अशा स्थितीत हे दोन सुभे आपल्या ताब्यात घेण्यासाठी पेशव्याने रघुनाथरावासह शिंदे - होळकरांना हिंदुस्थान प्रांती रवाना केलं व त्यातून कुंभेरीची मोहीम उद्भवली अशी एक सामान्यतः मांडणी आजवर मराठी इतिहासकारांनी केली आहे, करत आहेत, ज्याला ' पानिपत असे घडले ' चे लेखन करतेवेळी मी देखील अपवाद नव्हतो.
जदुनाथ
सरकार लिखित व ग. श्री. अनुवादित ' मुघल साम्राज्याचा ऱ्हास, भाग - १ ' या ग्रंथात कुंभेरी स्वारीची खरी कारणे स्पष्टपणे नमूद केली असून त्यान्वये :- अयोध्येचा नवाब सफदरजंग आणि दिल्लीचा तुर्की बादशाह अहमदशहा यांच्यात स. १७५३ च्या मार्च ते नोव्हेंबर मध्ये प्रथम राजकीय व त्यानंतर सशस्त्र संघर्ष उद्भवून त्यात सफदरजंगास जाट राजा सुरजमलने मदत केली तर हिंदुस्थानातील उर्वरित संस्थनिक तटस्थ राहिले वा बादशाही पक्षास मिळाले. पुढे जयपूरच्या माधोसिंगास मध्यस्थीस आणून बादशहा - सफदरजंग यांच्यात समझोता घडवून आणण्यात आला. परंतु बादशाहचा मीरबक्षी इमादउल्मुल्क यास हा तह मान्य नसून त्याला सफदरजंग आणि त्याचा मित्र सुरजमल यांचा पुरता नाश घडवून आणायचा होता. सबब त्याने मराठी सरदार शिंदे - होळकर आणि त्यांचा सेनापती रघुनाथराव यांच्याशी संधान बांधून त्यांना कुंभेरीवर स्वारी करण्यास उद्युक्त केले. त्याबदल्यात त्यांना जाटाकडून मिळणाऱ्या संपत्तीतील निश्चित एक वाटा देण्याचे मान्य केले.
रघुनाथरावास पेशव्याचे कर्ज फेडण्याकरता तसेच सैन्याचा खर्च भागवण्यासाठी पैशांची निकड असल्याने त्याने हि मोहीम स्वीकारली. शिवाय इमादउल्मुक उर्फ धाकटा गाजीउद्दीन हा दख्खनमधील हैद्राबादच्या निजामाचा वंशज असल्याने दक्षिणेत पेशव्याला नडणाऱ्या निजामबंधूंवर दाब ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होणार होता. सारांश, बादशाही मदतीच्या नावाखाली इमाद आणि रघुनाथरावाने संगनमताने हे कुंभेरीचे राजकारण शिजवले.
याला आणखीही काही बाजू आहेत. स. १७५२ मध्ये तत्कालीन वजीर व अयोध्येचा नवाब सफदरजंग याच्या विद्यमाने दिल्लीचा तुर्की बादशहा व पेशव्यातर्फे शिंदे - होळकरांच्या दरम्यान एक तह घडून आला, ज्यानुसार तुर्की बादशाहीचे अंतर्बाह्य शत्रूंपासून रक्षण करण्याचे मराठी सरदारांनी मान्य केले. याबदल्यात पेशव्याला अजमेर आणि आग्रा सुभ्याची सुभेदारी प्राप्त झाली. पैकी, पेशव्याने आग्रा होळकरास तर अजमेर शिंद्याला देऊन टाकले. आता आग्र्याच्या सुभ्यातच जाटांचे बलवान राज्य उदयास आल्याने होळकरास, पर्यायाने पेशव्याला त्याच्यावर शस्त्र उचलणे भाग होते.
आता या राजकारणाची तिसरी बाजू म्हणजे बादशहा अहमदशाह व त्याचा विद्यमान वजीर इंतिजामउद्दौला. पैकी, इंतिजाम हा मीरबक्षी इमादचा नातलग -- चुलत चुलता असून त्याचे आणि इमादचे आपसांत काहीतरी कारणावरून वैमनस्य होते आणि या दोन वजनदार उमरावांतील वैरामुळेच पुढील राजकारणास निराळे वळण लाभत गेले.
इंतिजामउद्दौलाचे बादशाहवर विशेष वजन असून स्वतः बादशाह आपल्या अधिकारांच्या बाबतीत जागरूक असला तरी निर्णयक्षमतेच्या बाबतीत तो दुर्बल होता. त्यामुळे दिल्ली दरबारातील राजकारणाची दिशा उमरावांच्या चलतीनुसार बदलत जाऊन त्यास स्थिरता कधीच आली नाही.
इंतिजामउद्दौला आपल्या वडिलांचे, माजी वजीर कमरुद्दीनखानाचे धोरण -- मराठी सैन्याला नर्मदेपार हाकलून लावण्याचे, कधीच विसरला नाही. त्यामुळे सफदरजंगच्या पश्चात त्याच्याकडे वजिरी येताच त्याने हिंदुस्थानातील सत्ताधीशांचा एक संघ उभारून त्यांच्याद्वारे मराठी सरदारांना नर्मदापार हाकलण्याची योजना बनवली. त्याच्या या योजनेत राजपूत राजांचा महत्त्वपूर्ण सहभाग असून जाट राजा सुरजमल तसेच माजी वजीर सफदरजंगही त्यात सामील होते.
या राजकारणापैकी आपणांस कुंभेरीचा वेढा व खंडेराव होळकराच्या मृत्यूपर्यंतचाच भाग बघायचा
आहे.
स. १७५३ च्या सप्टेंबर अखेर रघुनाथरावाच्या नेतृत्वाखाली मराठी फौजा नर्मदापार झाल्या. रघुनाथरावाची हि पहिली हिंदुस्थान स्वारी असून कागदोपत्री हिचे प्रयोजन दिल्लीत सुरु असलेल्या सफदर - बादशाह झगड्यात बादशाहची बाजू घेण्याचे असले तरी पेशव्याने आपल्या भावास या संघर्षातून अलिप्त राहण्याचा कानमंत्र दिल्याचे पुढील घटनाक्रमावरून दिसून येते.
रघुनाथास खरोखर बादशाही पक्षाचा बचाव करायचा असता तर तो लगोलग दिल्लीच्या वाटेला लागला असता किंवा दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या व बादशाह विरुद्ध लढणाऱ्या सुरजमल जाटाच्या राज्यावर चालून गेला असता. परंतु यातील काहीएक न करता तो मार्गाने खंडण्या वसूल करत परस्पर राजपुतान्यात निघून गेला.
राजपुतान्यात खंडण्या गोळा करून आणि दिल्लीतील लढा मिटल्याचे पाहून दादासाहेब राजपुतान्यातून पुढे येऊ लागला. यावेळी त्याचा नेमका रोख कुठे होता याची कागदोपत्री स्पष्टता होत नसली तरी माझ्या मते, यावेळी तो पेशव्याच्या आज्ञेने कर्जफेडीसाठी द्रव्य गोळा करणे किंवा बंगाल - बिहार प्रांती स्वारी करण्याच्या इराद्याने पुढे येत होता.
रघुनाथरावाचे उद्दिष्ट काहीही असले तरी त्याला उद्दिष्टपूर्तीकरता आपल्या सरदारांवर, विशेष करून शिंद्यांवर अधिक विसंबून राहणे भाग होते. याचे मुख्य कारण म्हणजे, छ. शाहूच्या मृत्यूनंतर दौलतीच्या कर्जाचा बोजा पेशव्याच्या बोकांडी बसल्याने त्याने आपल्या सैन्यात बरीच घट केली होती. त्याउलट शिंद्याने आपल्या सैन्याची सुमारे तीस हजारांवर भरती नेली असून होळकराकडे दहा पंधरा हजाराच्यावर सेना नव्हती. तात्पर्य, पेशवेबंधूंना शिंद्यांविषयी इतके ममत्व का, या प्रश्नाच्या अनेक उत्तरांपैकी एक म्हणजे लष्करी बाबतीतील पेशव्यांचे दौर्बल्य होय. तसेच व्यक्तिशः पाहिले तर रघुनाथरावाची जयाजी, दत्ताजी शिंदे बंधूंवर जितकी खुशमर्जी होती तितकी मल्हारराव होळकरावर नव्हती. ज्याला याविषयी आक्षेप असेल त्याने शिंदेशाही इतिहासाची साधने, खंड ३ चे वाचन करावे. असो.
दक्षिणेतील निजाम बंधूंना दाबात ठेवण्यासाठी दिल्लीतील इमादउल्मुल्कला राजी राखणे आवश्यक असल्याने रघुनाथास त्यालाही एकदम टाळता येत नव्हते. त्याचप्रमाणे संभाव्य बंगाल - बिहार स्वारीकरता बादशाही मदतीचीही आवश्यकता होती. अन्यथा केवळ स्वबळावर आखलेली मोहीम अंगाशी येण्याचीही शक्यता होती. त्यामुळे इमादची मर्जी राखणे ओघाने आले आणि त्याच इमादने जेव्हा समोरून जाट राजावर स्वारीचा प्रस्ताव मांडत त्या मोहिमेत प्राप्त द्रव्यातील निश्चित एक हिस्सा देऊ करताच रघुनाथास हि मसलत स्वीकारण्याखेरीज कोणताच पर्याय उरला नाही.
रघुनाथरावाच्या आदेशानव्ये मल्हारराव होळकराने आपला पुत्र खंडेराव यास चार हजार स्वारांसह नोव्हेंबर महिन्यात दिल्लीस पाठवले. तिथे त्याने दि. २१ नोव्हें. रोजी किशनदासच्या तळ्याजवळ आपला मुक्काम ठोकला.
खंडेराव
होळकर दिल्लीस आला त्यावेळी बादशहा आणि मीरबक्षी इमाद यांच्यात राजकीय संघर्ष सुरु होता. त्यामुळे खंडेराव होळकरास आपाल्या पक्षात खेचण्याची बादशाही सल्लागारांची धडपड सुरु झाली. परंतु मुख्य छावणीतून निघतेसमयीच मल्हाररावाने त्यास इमादच्या पक्षास चिटकून राहण्याची आज्ञा केल्याने खंडेराव बादशाही पक्षास अजिबात बधला नाही.
याप्रसंगी वजीर इंतिजामच्या सल्ल्यावरून बादशाहने त्यास देऊ केलेल्या २२००० सोन्याची नाणी, पोशाख व अन्य देणग्यांचा खंडेरावने स्वीकार केला नाही. तसेच बादशाही भेटीचा प्रसंग आला तेव्हा त्याने औपचारिक रितीरिवाजही नीटसे पाळले नाहीत. शिवाय बादशहाने त्यास मानाच्या पोशाखासोबत तलवार देऊ केली असता, ती बादशाहने स्वहस्ते आपणास द्यावी असा हट्ट धरला होता.
खंडेरावचे याप्रसंगीचे वर्तन निश्चितच बाणेदारपणाचे होते. त्याने रिवाजाप्रमाणे चार ऐवजी दोनदा सलाम करणे, भेटीच्या वेळी नजर करण्यास जवळ पैसे किंवा देणगी दाखल वस्तू नसण्याचे सांगणे इ. गोष्टी त्याचा स्वातंत्र्यप्रिय बाणेदारपणाच व्यक्त करणाऱ्या होत. कारण, रूढार्थाने तो किंवा त्याचा पिता बादशाही नोकर नव्हते. त्यामुळे शाही रिवाज त्यांच्याकडून जसेच्या तसे पाळले जाण्याची अपेक्षा करणे मुळी चुकीचे आहे, आणि ते देखील तुर्की सत्ता अखेरच्या घटका मोजत असताना. परंतु जदुनाथ सरकार सारखे इतिहासकार यास दारूच्या नशेत वर्तन म्हणतात आणि आमचे देशी इतिहासकारही त्यांचीच री ओढतात, या कर्मास काय म्हणावे !
खंडेराव होळकर दिल्लीस दाखल झाल्यावर तेथील राजकारणास वेग आला. इमादने लष्कराच्या पगाराकरता बादशाहकडे पैशांची मागणी केली असता, बादशहाने त्यास मीरबक्षी पदाकरिता दिलेल्या जहागिरीतून सैन्याच्या काही तुकड्यांचे पगार भागवण्याची आज्ञा केली. तसेच जहागिरीतून वसूल गोळा करताना प्रजेला त्रास न देण्याची सूचनाही केली.
पैकी, प्रजेच्या छळाची बाब बाजूला ठेवली तरी जहागिरीतून वसूल गोळा करण्याची आज्ञा इमादला जाटांच्या विरुद्ध युद्ध पुकारण्यास पुरेशी होती. कारण त्याला जहागिरीदाखल मिळालेल्या फरिदाबाद जिल्ह्यातील बव्हंशी भाग जाटांनी व्यापलेला होता. इथे लक्षात घेण्याची महत्त्वाची बाब म्हणजे भरतपुरचा बदनसिंग, फरिदाबादेत स्थिरावलेला बल्लू / बाळू
तसेच गोहदकर वगैरे जाट सत्ता वेगवेगळ्या, स्वतंत्र असल्या तरी वेळप्रसंगी त्या एकत्र येण्याचा धोका होताच. शिवाय जाटांनी अलीकडे केलेली दिल्ली आणि आसपासच्या प्रदेशाची लूटमार लक्षात घेता त्यांच्याकडून मिळणाऱ्या संपत्तीचा लोभ त्या सर्वांवर स्वारी करण्यास इमादला उद्युक्त करत होताच.
बादशहाची परवानगी मिळताच इमादने आपला हस्तक अकिबत महंमदखान यास फरिदाबाद जिल्हा ताब्यात घेण्यास पाठवले. त्याने बल्लू / बाळू जाटास ठार करून फरिदाबाद ताब्यात घेत आपली चढाई तशीच पुढे चालू ठेवली. दरम्यान डिसेंबर महिन्यात अकिबत दिल्लीस आला त्यावेळी इमाद आणि रघुनाथरावातील जाट मोहिमेचा मनसुबा पक्का झाला असून मल्हाररावाच्या आज्ञेने खंडेराव होळकर अकिबत सोबत जाटांच्या प्रदेशावर चालून गेला.
खंडेरावाने आपला तळ पलवलच्या दक्षिणेस १७ मैलांवर होडाळ येथे ठेवून आसमंतातील बरसान, नंदगाव हि सुरजमलच्या ताब्यातील ठाणी जिंकून घेतली. दरम्यान स्वतः इमाद देखील या मोहिमेत सहभागी झाला असून त्याने घासेरा किल्ल्यावरील स्वारीत खंडोजीला मदतीसाठी बोलावले. या जोडगोळीने हा किल्ला अल्पवधीत जिंकून घेतला.
दरम्यान
रघुनाथराव आणि सुरजमल या दुसऱ्या आघाडीवर वेगळेच नाट्य सुरु झाले होते. रघुनाथराव नर्मदेच्या पुढे - मागे असतानाच सुरजमलने जयपूरच्या माधोसिंगासोबत संरक्षणाचा गुप्त करार केला होता. परंतु मराठी फौज राजपुतान्यात आल्यावर सुरजमलने आपला वकील रूपराम कोठारे यास दादासाहेबाकडे रवाना करत तहाची वाटाघाट आरंभली. त्यानुसार जाट मराठी सेनापतीस चार लाख रुपये तसेच बादशाहकडून जाटांच्या बंदोबस्ताकरता जितकी रक्कम बादशाही संरक्षण करारानुसार मिळणार होती, तितकी देण्याचे मान्य केले. परंतु सुरजमलसोबत समझोता न करता त्याच्याकडून कोट्यवधी द्रव्य उकळण्याची दादा आणि इमादची मसलत यापूर्वीच शिजल्याने जाटाच्या अटी अमान्य करण्यात आल्या व तह करायचाच असेल तर जाटाने आपणांस दोन कोट रुपये द्यावे अशी नवी मागणी पुढे करण्यात आली. अर्थात, जाटाकडून यास नकार मिळणे स्वाभाविक होते. पर्यायाने जाट आणि मराठी सरदारांचे युद्ध अटळ होते.
स. १७५४ च्या डिसेंबर - जानेवारीत रघुनाथरावाची सुरजमल जाटाविरुद्धची मोहीम सुरु झाली. मैदानी संघर्षात निभाव न लागल्याने सुरजमलने कुंभेरीचा आसरा घेतला तेव्हा रघुनाथरावाने त्या किल्ल्यास वेढा घातला. किल्ल्याची संपूर्ण नाकेबंदी करणे दादासाहेबास शक्य नव्हते. तसेच किल्ल्याची तटबंदी फोडण्यासारखा तोफखानाही लष्करासोबत नव्हता. अशात मल्हाररावाने आपल्या मुलास कुंभेरीच्या मोर्च्यावर येण्यास सांगत इमादकडे बादशाही तोफखान्यातील तोफांची मागणी करत त्यास कुंभेरीच्या वेढ्यात बोलावले. त्यानुसार इमाद
व त्याचा लष्करी अधिकारी अकिबत कुंभेरीस येऊन दाखल झाले. ( मार्च १७५४ )
मल्हाररावाचा मदतीस येण्याचा निरोप मिळाला त्यावेळी खंडेराव मेवात कडील प्रदेशातील जाटांची उठवण्याच्या कामात गर्क होता. बापाचा आदेश मिळताच मेवातमधून तो कुंभेरीस रवाना झाला. तिथे येऊन त्याने किल्ल्याच्या मोर्चेबंदीचे काम हाती घेतले. त्याच्या नेतृत्वाखाली किल्ल्याच्या तटापर्यंत जाणारे भुयारासारखे वरून आच्छादलेले खंदक खोदण्यात आले. असेच एके दिवशी खंदकांची पाहणी करत असता किल्ल्यावरून झालेल्या तोफा - बंदुकांच्या मारगिरीत खंडेराव मानेस गोळी लागून ठार झाला. ( स. १७५४ मधील फाल्गुन वद्य एकादशी रोजी )
त्यावेळी तीन विवाहित स्त्रिया, दोन कलावंतिणी, पाच रक्षा मिळून दहा स्त्रिया खंडेराव सोबत सती गेल्या. त्यासमयी अहिल्याबाई देखील सती जाणार होती परंतु मल्हाररावाने तिला सती जाण्यापासून रोखत पुत्रवत लेखले.
खंडेराव
होळकराच्या मृत्यूबद्दल सुरजमल जाटाने खेद व्यक्त होळकरांकडे दुखवट्याची वस्त्रे पाठवून दिली. इमादनेही मल्हाररावाची भेट घेत त्याचे सांत्वन करताना ' मी तुमचा पुत्र आहे ' अशा आशयाचे उद्गार काढले.
खंडेरावच्या मृत्यू नंतर काही दिवसांनी जाटांनी छापा घालून मुख्य मराठी सैन्यापासून आठ कोसांवर जाऊन राहिलेल्या धारकर पवारांच्या कारभाऱ्यास -- रंगराव शिवदेव ओढेकर यास ठार करून त्याचे लष्कर लुटले. ( चैत्र शुद्ध चतुर्दर्शी नंतर )
सारांश,
प्रभावी तोफखान्याअभावी जाटांना पराभूत करणे मराठी सरदारांना शक्य होईना आणि केवळ याच कारणाकरता वजीर इंतिजामच्या सल्ल्याने बादशहा अहमदशहा, इमादने वारंवार मागणी करूनही शाही तोफा कुंभेरीस रवाना करेना. उलट इंतिजामच्या सल्ल्यानुसार बादशहा मार्च - एप्रिल दरम्यान केव्हातरी शिकारीनिमित्त दिल्लीतून बाहेर पडला व मे च्या सुमारास सिकंदराबादेस जाऊन पोहोचला. या स्वारीत त्याने शाही तोफखाना सोबत बाळगला असून वरकरणी जरी शिकारीचे निमित्त सांगितले जात असले तरी वजिराच्या गुप्त कटानुसार बादशाही संरक्षणासाठी सफदरजंग आणि सुरजमल यांच्याशी हातमिळवणी करून इमाद आणि त्याचे मराठी मित्र यांच्या नाशासाठी आघाडी उभारण्याचा मुख्य हेतू होता.
दरम्यान
खंडेराव होळकराच्या मृत्यूची बातमी मिळाल्यावर बादशाहने बापूराव हिंगणे या तुर्की दरबारातील पेशव्याच्या वकिलामार्फत आपला शोक व्यक्त करत दुखवट्याची वस्त्रे व अलंकार मल्हारराव होळकर व त्याच्या
पत्नीस पाठवून दिले.
इकडे कुंभेरीचा वेढा रेंगाळत चालला होता. अखेर उभयपक्षी बोलाचाली होऊन मे च्या मध्यावर पुढील अटींवर तह घडून आला :- (१) तीन वर्षांच्या हप्त्याने मराठ्यांना तीस लाख रुपये देणे. (२ ) जाट राजाने पेशकस म्हणून दोन कोट रुपये बादशाहस द्यावे अशी इमादने पुरी सुरजमलकडे मागणी केली होती. ते दोन कोट रुपये देण्याचे सुरजमलचा वकील रूपराम याने कबूल केले. परंतु यात आता बदल घडून हे दोन कोट रुपये बादशाह ऐवजी मराठे आणि इमाद यांना देण्यात यावे असे ठरले.
तहाच्या
अटी ठरल्यावर दि. १८ मे रोजी इमाद तर २२ मे रोजी रघुनाथाने कुंभेरीतून आपला तळ हलवत मथुरेस मुक्काम ठोकला.
अस्सल संदर्भ साधनांच्या आधारे कुंभेरीचा वेढा आणि खंडेरावाच्या मृत्यूची हकीकत उपरोक्तपणे जुळवता येते. याउलट प्रकार भाऊ बखरीत वर्णिला आहे. मुळात या बखरकारास दिल्लीतील सफदर - बादशाह झगड्याची कल्पना नाही. इमादउल्मुल्कच्या सांगण्यानुसार रघुनाथराव जाटावर चालून गेल्याचे त्याला ठाऊक नाही. कुंभेरीच्या वेढ्यात तोफांचा अभाव असल्याचे स्पष्ट असतानाही बखरकार मात्र किल्ल्याच्या डोक्यावरून पलीकडे गोळे फेकणाऱ्या मराठी सैन्यातील तोफांची माहिती देत बसतो. तहामध्ये पेशव्याला तीस लाख रुपये मिळाल्याचा उल्लेख असला तरी हा साठ लाखांचा आकडा देतो. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, खंडेराव होळकराच्या मृत्यूचे वर्णन करताना, " तो एके दिवशी राजश्री मल्हारराव होळकर यांचा पुत्र, खंडेराव होळकर, केवळ बेहोष होता ; त्याची आयुष्यमर्यादा सरली. म्हणोन त्यास मुंगीस पक्ष फुटतात तैसा प्रकार जाहला. भोजन करून मोर्चियांत निशाणापाशी आला. तो एकाएकीच प्रळय-वीज पडते तैसे होऊन, जेजालेची गोळी अकस्मात लागून मोर्च्यांत ठार जाहाला. शुभ्रवर्ण चक्षु होऊन गतप्राण जाहाला... .. " असे वर्णन देतो.
त्याउलट
शिंद्यांच्याच छावणीतून दि. १८ एप्रिल १७५४ रोजी लिहिलेल्या पत्रात खंडेरावच्या मृत्यूबद्दल पुढील माहिती मिळते :- " फालगुण वद्य ११ येकादशीस राजश्री खंडेराव होलकर यास गोली मानेस लागोन मृत्यू पावले. .. " पत्रलेखक चिंतो कृष्ण वळे हा शिंद्यांचा आश्रित असून जयाजी, जनकोजी, दत्ताजी व महादजीचा लेखक म्हणून त्याने काम पाहिले आहे.
विश्वास
कोणाच्या वृत्तांतावर ठेवायचा ? भाऊ बखरीचा लेखक शिंद्यांचा पक्षपाती आहे या समजुतीवर कि प्रत्यक्ष शिंद्यांच्या लेखकाने लिहिलेल्या पत्रातील मजकुरावर ! ज्यामध्ये खंडेराव बेहोष वगैरे असल्याचा अजिबात उल्लेख नाही.
विशेष म्हणजे शिंदेशाही इतिहासाची साधने खंड ३ मधील उपरोक्त पत्र सर्वच इतिहासकारांच्या नजरेखालून जाऊनही त्यांनी बखरीतील केवळ एक ' बेहोष ' शब्द प्रमाण मानून खंडेराव मद्याच्या धुंदीत असल्याच्या थापा ठोकल्या आहेत. इतिहासाची, एका ऐतिहासिक चरित्राची अशी हानी करण्याच्या पापापासून रियासतकार सरदेसाई पासून फॉल ऑफ मुघल एम्पायरचे जदुनाथ सरकारही मुक्त नाहीत.
संदर्भ
ग्रंथ :-
१) शिंदेशाही इतिहासाची साधने ( खंड ३ ) :- संपादक - आनंदराव भाऊ फाळके
२) भाऊ साहेबांची बखर :- संपादक - र. वि. हेरवाडकर
३) मुघल साम्राज्याचा ऱ्हास ( भाग १ ) :- ( मूळ लेखक - जदुनाथ सरकार ) मराठी अनुवाद :- ग. श्री. देशपांडे
४) मराठी रियासत ( खंड ४ ) :- गो. स. सरदेसाई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा