शनिवार, १४ डिसेंबर, २०१९

पुन्हा पानिपत...!




अब्दाली हिंदुस्थानात आला त्यावेळी दत्ताजी शिंदे एकटाच त्याच्या नजीक होता, परंतु लष्करीदृष्ट्या त्याचे सैनिकी सामर्थ्य जास्त असल्याने त्याच्यासोबत एक लहानशी झुंज देऊन अब्दालीने रोहिल्यांशी हातमिळवणी करत दत्ताजीवर प्रथम मात केली.

होळकर आणि शिंद्यांमध्ये समजुतीचा घोटाळा झाल्याने होळकर वेळेवर दिल्लीस येऊन दाखल झाला नाही. मात्र, होळकर येईपर्यंत दिल्लीच्या मागे येण्याची दत्ताजीलाही बुद्धी झाली नाही. शत्रूपक्षाच्या या ढिलाईचा फायदा घेत अब्दालीने बुराडी घाटावर एक लढाई घेण्याचा प्रयत्न केला. तिथे प्रत्यक्ष युद्धास तोंड लागले नाही, परंतु गोळीबारात दत्ताजी ठार व जनकोजी जखमी झाल्याने शिंद्यांच्या फौजेस दिल्लीतून माघार घ्यावी लागली.
बाकी, दत्ताजीचे " बचेंगे तो और भी लढेंगे " वगैरे उद्गार आणि कुतुबखानाने त्याचे मुंडके कापणे सर्व भाकडकथा होत. याबद्दल गरजूंनी शेजवलकरांच्या मराठी भाषेतील पानिपतचा अभ्यास करावा.

बुराडी घाटावर प्रत्यक्ष युद्धच न झाल्याने शिंद्यांचे सैन्य मोडले हा देशी इतिहासकारांचा अपप्रचार व उरबडवेपणा आहे. बुराडी नंतर होळकराच्या नेतृत्वाखाली अब्दालीसोबत शिंद्यांनी अनेक ठिकाणी झुंजी घेतल्या, ज्यामुळे टेकीस येऊन अब्दालीने दि. १३ मार्च १७६० रोजी होळकर - शिंद्यांसोबत तह करून मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र पेशव्याने हा तह अमान्य केल्याने व सदाशिवराव हिंदुस्थानात आल्याने निकालासाठी अब्दालीला इथेच मुक्काम करून राहणे भाग पडले.

अब्दालीच्या बंदोबस्तासाठी सदाशिवरावाची हिंदुस्थान मोहिमेवर मुळी नियुक्तीच झालेली नव्हती. सदाशिवराव हा प्रशासकीय कामात मुरलेला असल्याने हिंदुस्थानातील प्रशासकीय कारभारात आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी व पेशव्याची फसलेली राजकारणं दुरुस्त करण्यासाठी त्याला पाठवण्यात आले होते. त्यामुळेच हिंदुस्थान स्वारीस नियुक्ती झाल्यापासून ते ऑगस्ट महिन्यात दिल्ली गाठेपर्यंत तो रेंगाळतच आला. जर खरोखर अब्दालीशी गाठ घालण्याचा त्याचा हेतू असता तर तीन महिन्यात तो यमुनापार अब्दालीच्या पाठीवर उतरला असता किंवा जवळपास पोहोचला असता.
बाकी, लवकर पावसाळा सुरु झाला किंवा अहिरांचे बंड वगैरे सर्व रडकथा आहेत.

दिल्ली ताब्यात घेऊन तिथेच मुक्काम ठोकणे हि एक मोठी चूक सदाशिवरावाने केली. मुळात मथुरेवरून दिल्ली जाणेच धोक्याचे होते. कारण, मूळ मराठी सरदारांचा प्रदेश दूर राहून त्याच्या लष्कराचा पुरवठा मार्ग लांबत होता व रसदेकरता इतरांवर -- जाट राजा -- अवलंबून राहणे भाग होते. लष्करी मोहिमा अशा मेहरबानीच्या तुकड्यांवर चालत नसतात. किमान अब्दालीसारख्या लढवय्या विरुद्ध नक्कीच नाही !

कारण नसताना ऑक्टोबर महिन्यापर्यंत भाऊचा दिल्लीत झालेला मुक्काम एक अपयशाचे कारण बनला. या अवधीत राजकीयदृष्ट्या त्याच्या हालचाली तरी काय झाल्या ? शहा आलमला त्याने तुर्की बादशहा म्हणून जाहीर करत अब्दालीच्या गोटात बसलेल्या सुजाउद्दौलाला त्याचा वजीर म्हणून घोषित केले. सदाशिवराव राजनीतीतज्ञ होता, या गैरसमजाला छेद देणारी हि एक वस्तुस्थिती आहे.
मुळात सुजा, मराठी सरदारांच्या संभाव्य लखनौ - बंगाल स्वारीला घाबरून अब्दालीच्या गोटात दाखल झाला होता. त्यामुळे भाऊने त्याला कितीही वचने, आमिषे दाखवली तरी मराठी सरदारांवर त्याचा विश्वास बसने शक्य नव्हते. खेरीज, अब्दालीचीही त्याच्यावर गैरमर्जी ओढवणे शक्य नव्हते. कारण, सुजाच्या मध्यस्थीने जर उभयपक्षांत तह बनत असेल, तर तो त्याला हवाच होता. मात्र, उभयपक्षांना मान्य होईल असा तोडगा काढण्यास सुजालाही अपयश आले.

दिल्लीहून कुंजपुऱ्याला जाण्याचा निर्णय घेण्यात भाऊने खूप उशीर केला. जी मोहीम ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होणे आवश्यक होते, ती ऑक्टोबर अखेरीस आखण्यात आली. यामागील मुख्य कारण म्हणजे, अब्दालीसोबत लढाई द्यावी लागेल हे दिल्ली मुक्कामी भाऊला कळून चुकले व तेव्हापासून तो त्या दृष्टीने आपली रणनीती आखू लागला.

उदगीर मोहिमेत सदाशिवरावाने जे डावपेच आखले होते, त्यांचाच वापर त्याने कुंजपुरा मोहिमेत केल्याचे दिसून येते.
कुंजपुरा येथे अब्दालीची रसद व राखीव सैन्य आहे. आपण ते वेढण्यास वा नष्ट करण्यास तिकडे गेल्यास अब्दालीही त्याच अनुरोधाने पैलतीराने येईल व आपण त्याला नदीपात्रातच बुडवू, इतकी साधी सरळ रणनीती भाऊने आखली होती.
त्यानुसार तो कुंजपुऱ्यास आला व त्याने कुंजपुरा घेतलाही.
अब्दालीच्या बाबतीत भाऊची पूर्णतः निराशा झाली नाही. मराठी सैन्य दिल्लीहून कुंजपुऱ्यास जातंय म्हटल्यावर अब्दालीने आपली काही पथकं पैलतीराने कुंजपुऱ्याच्या मदतीस पाठवली खरी, परंतु तो स्वतः वा त्याचे मुख्य सैन्य मात्र जाग्याहून हलले नाही. कुंजपुरा पडल्याची पक्की बातमी आल्यावर मात्र अब्दालीने आपली कर्तबगारी भाऊला दाखवून दिली. 
आकस्मिकपणे शत्रूच्या पाठीवर येत त्याची सप्लाय लाईन वा रसदपुरवठा मार्ग तोडण्याचे अब्दालीचे एक अत्यंत आवडते असे युद्धतंत्र होते. याच तंत्राचा वापर करत अब्दाली बागपतवर यमुना पार करून मराठी सैन्याच्या पाठीवर आला व त्याने दिल्लीसोबत असलेला मराठी सैन्याचा संपर्क तोडून टाकला.

अब्दाली बागपतवर आल्यानंतर भाऊच्या सर्व चाली शत्रूच्या तंत्राने होत गेल्या. पानिपतची निवड करत तिथे खंदक खोदून बसने वगैरे, सर्व काही तो शत्रूच्या तंत्राने करत होता. यामागे कसलेही आगाऊ आखलेले धोरण नव्हते. फक्त छावणी सोडण्याचा किंवा युद्धाचा दिवस निवडणे त्याच्या हाती होते व त्यानुसार त्याने दिवस निश्चित केला, दि. १४ जानेवारी १७६१.

नाना फडणवीसचे आत्मचरित्र पाहिलं तर त्यात स्पष्ट दिसून येतं कि, भाऊला त्या दिवशी युद्ध करायचंच नव्हतं. सैन्याचा गोल बांधून त्याला यमुना नदी गाठायची होती व मग सोयीनुसार अंतिम युद्धाचा निर्णय घ्यायचा होता. त्याउलट भाऊला पानिपतच्या बंदिस्त छावणीतून बाहेर येण्यास भाग पाडणं, हा अब्दालीचा हेतू असून त्यात तो यशस्वी झाल्याचे आपणास दिसून येते.

लढाई टाळणे व गोलाच्या साहाय्याने आपल्या बुणगे - कबिल्याचा बचाव करणे हा जरी भाऊचा हेतू असला तरी गोलाची लढाई खेळण्यासाठी आवश्यक ते बंदूकधारी पायदळ त्याच्याजवळ नव्हते. त्यामुळेच शत्रूसैन्य प्रत्यक्ष गोलाजवळ येण्यापूर्वीच गोलातून बाहेर पडून मराठी सरदारांनी त्यांना मारून पिटाळायचे व पार्ट आपल्या जागी येऊन उभे राहायचे, असा कबड्डीतल्या चढाईचा प्रकार भाऊने अवलंबला. यामुळेच विंचूरकर, गायकवाड, खुद्द भाऊच्या नेतृत्वाखालील हुजुरात गोलातून बाहेर पडली.
ज्या इतिहासकारांना या रणनीतीचे आकलन झाले नाही त्यांनी, मराठी सरदारांनी गोल फोडल्याने पानिपत झाल्याचे ठोकून दिले.

पानिपतचं संपूर्ण युद्ध होईपर्यंत अब्दालीला मराठी सैन्याचा रोख नेमका कोणत्या दिशेला आहे, हेच मुळी समजले नाही. त्याच्या मते, मराठी सैन्य हरप्रयत्ने दिल्लीकडे जाण्याचा प्रयत्न करेल, म्हणून त्याने बचावाच्या दृष्टीने आपल्या लष्कराची रचना करत सैन्याच्या तीन फळ्या केल्या. ज्यातील पहिल्या फळीने सकाळचे पहिले सत्र लढून काढले. दुपारच्या सत्रात पहिल्या व दुसऱ्या फळ्या एकवटून त्यांनी फिरून मराठी सैन्यावर हल्ला चढवला व शेवटची चढाई तिसऱ्या फळीने केली.
त्याउलट पहिल्या चढाईत गारद्यांची निम्मी फौज मारली गेली. हुजुरात व इतर सरदारांच्या पथकांची दमछाक झाल्याने दुपार व सायंकाळच्या सत्रात त्यांना गोलानजीकच झुंज खेळणे भाग पडले.
शत्रू युद्ध निकाली काढण्याच्या ईर्ष्येने लढतोय हे सकाळच्या सत्रातील झुंजीने भाऊच्या लक्षात यायला हवं होतं. परंतु उदगीरला जसं निजामाने मराठी सैन्याचे हल्ले मोडून काढत वाटचाल केली होती, तद्वत आपणही करू या भ्रमात भाऊ राहिल्याने त्याने गोलाच्या पिछाडीस उभे केलेलं सैन्य आघाडीवर आणलेच नाही. त्यामुळे आघाडीच्या पथकांवर कमालीचा ताण पडून एका वेळी त्यांचा धीर खचून त्यांनी माघार घेतली तर पिछाडीची पथके संध्याकाळी पराभवानंतर पळत सुटली.
गारदी सैन्य नष्ट झाल्याने, गारद्यांजवळ तैनात केलेले सरदार रणभूमीतून निघून जाऊ लागल्यामुळे मराठी सैन्याची डावी बाजू निकाली निघत तिकडून शत्रू सैन्याने मराठी लष्कराची आघाडी गुंडाळण्यास आरंभ केला.
विश्वासरावाचा मृत्यू झाल्यामुळे मध्यभागातील मराठी सैन्य - बुणग्यात गोंधळ माजून सदाशिवरावाने रणभूमीवरून निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तो काही सरदारांसह गोलाच्या पिछाडीकडे सरकू लागला. त्यावेळी झालेल्या रेटारेटीत केव्हातरी तो मारला गेला.
सदाशिवरावाने लढाई सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळेच नाना पुरंदरे, समशेरबहाद्दर, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर वगैरे सरदार लढाईतून बाहेर पडले.

पानिपतच्या प्रत्यक्ष लढाईत मराठी सैन्याची फार मोठी संख्या कापली गेली हा केवळ प्रवाद आहे. यासंदर्भात पानिपत युद्धानंतर नाना पुरंदरेने आपल्या आईस लिहिलेल्या पत्रातील पुढील ओळी अतिशय महत्वपूर्ण आहेत :- " आता मल्हारबा व आम्ही येका जागा आहो. सरकारची फौज दाहा हजार आम्हाबरोबर आहे. "  ( संदर्भ :- पुरंदरे दप्तर भाग ३, ले. २०९ )
यावरून पानिपतावर नेमके किती सैन्य मारले गेले, हे अद्यापि न संशोधल्याचे लक्षात यावे.

विश्वासरावाच्या मृत्यूनंतर सैन्य व सरदार पळत सुटले नसून मुख्य सेनापतीच्या -- सदाशिवरावाच्या -- आज्ञेनेच त्यांनी माघार घेण्यास आरंभ केल्याचे दि. इ. १३ फेब्रुवारी १७६१ रोजी नाना पुरंदरेने आपल्या आईस लिहिलेल्या पत्रावरून सिद्ध होते. या पत्रानुसार पानिपतावरून नाना पुरंदरेचे काही बुणगे ग्वाल्हेर मुक्कामी येऊन पोहोचल्याचे स्पष्ट होते. ( संदर्भ :- पुरंदरे दप्तर भाग - १, ले. ३९७ ) 

पार्वतीबाईला मारून टाकण्याची सदाशिवरावाने योजना केल्याचे भाऊची कैफियत आणि नानाचे आत्मचरित्र सांगते. परंतु सटवोजी जाधवाने दि. १९ जानेवारी १७६१ रोजी कुंभेरी मुक्कामाहून आपल्या भावास -- सुभाना -- लिहिलेय पत्रात " राजश्री मल्हारबावा हजार दोन हजार फौजेनशी निघाले. रा|| नारो शंकर दिल्लीत होते. त्याजपाशी पांच सात हजार होती. तितक्यानशी निघोन सौभाग्यवती पार्वतीबाई दोन चारशे स्वारानशी निघाली होती. त्याची राजश्री मलारबाची गांठ वाटेस पडली. त्याजला ते संभाळून घेऊन चमेलीपार भदावरच्या मुलकांत गेले. " अशी माहिती मिळते. ( संदर्भ :-  राजवाडे खंड ६, ले. ४०६ )
तात्पर्य, भाऊने माघारीचा निर्णय घेताच पार्वतीबाई देखील आपल्या अंगरक्षकांसह रणभूमीतून बाहेर पडली होती. जर हे शुद्ध पलायन असते तर विश्वास पाटलांच्या कपोलकल्पित कादंबरी प्रमाणे ती आटिंग्या रानात भरकटली असती. असो.

बाकी, होळकर दुपारीच पळून गेला वगैरे मिथकांचा यापूर्वीच मी माझ्या ' पानिपत असे घडले ' ग्रंथात व वेळोवेळी लिहिलेल्या प्रासंगिक लेखांत साधार समाचार घेतल्याने, तत्संबंधी कसलेही विवेचन येथे करीत नाही.

बुधवार, ३ एप्रिल, २०१९

पानिपत ( भाग ४ )




    दत्ताजी शिंदे बुराडी घाटावर मारला गेल्याची बातमी दख्खनमध्ये पेशव्याला समजली त्यावेळी निजामासोबतचा उदगीरचा संग्राम संपून तहाच्या वाटाघाटीही संपुष्टात आल्या होत्या. तह होताच रघुनाथरावास हिंदुस्थानच्या मोहिमेस पाठवण्याचे यापूर्वीच निश्चित झाले होते, परंतु दत्ताजीच्या वर्तमानाने राजकारण बदलले.
    पेशव्याने आपल्या दोन्ही भावांशी -- रघुनाथ व सदाशिव -- तसेच इतर सरदार, मुत्सद्द्यांशी सल्लामसलत करून हिंदुस्थानची मोहीम सदाशिवरावाचा हाती सोपवली.
    पानिपत मोहिमेच्या गूढ रहस्यास खरा आरंभ इथूनच होतो. नेमकं असं काय घडलं कि, ज्यामुळे रघुनाथरावास हिंदुस्थानच्या मोहिमेस पाठवण्याचे दि. १९ फेब्रुवारी १७६० रोजी पर्यंत निश्चित असताना, ता. १४ मार्च रोजी त्याजागी सदाशिवरावाची नेमणूक व्हावी ?

    भाऊची कैफियत, बखर वगैरे प्रकार रघुनाथाच्या अटक स्वारीतील कर्जाकडे निर्देश करतात. परंतु असं कर्ज झाल्याचं क्षणभर मान्य जरी केलं तरी दि. १९ फेब्रुवारी पर्यंत नाना - भाऊ दादालाच हिंदुस्थानात पाठवणार असल्याचे म्हणतात त्याची वाट काय ? म्हणजेच येथे मुलूखगिरीतील कर्ज हा मुळात मुद्दाच नाही.
    बखरकारांना कदाचित सत्य कारणांचे ज्ञान असावे अथवा असूनही त्यांना ते उघड करता येत नव्हते किंवा मग मुळातच त्यांना याबाबतीत काहीच माहिती नव्हते असेच म्हणावे लागते.
    ' पानिपत : १७६१ ' कर्ते शेजवलकरांनी, आपल्या ग्रंथात आलमगीर दुसरा याचा भाऊच्या नावे पाठवलेल्या खलित्याच्या मराठी सारांश दिला आहे. त्यानुसार खासा बादशाह पेशव्यास आपला मुख्य कारभारी म्हणून नेमण्यास उत्सुक असून वजीर गाजीउद्दीन विषयीची आपली नाराजी त्याने त्यात स्पष्ट दर्शवली आहे.
     दि. ८ ऑगस्ट १७५९ चा हा खलिता तत्कालीन दिल्ली दरबारच्या अंतर्गत राजकारणाचे पदर उलगडून दाखवणारा असला तरी हा खलिता पुण्यास नेमका केव्हा पोहोचला याची स्पष्टता होत नाही. त्याचप्रमाणे फर्मान पाठवणाऱ्या आलमगीरास गाजीउद्दीनने केव्हाच ढगात पाठवल्याने या फर्मानास काडीचीही किंमत उरली नव्हती.
    दि. १५ मार्च १७६० रोजी भाऊने गोविंदपंतास लिहिलेल्या पत्रात ' त्यास चिरजीव राजश्री दादानी यावे, परंतु तीर्थरुपांची आज्ञा आह्मीच जावे ही जाहाली. ' असे वाक्य आहे. यावरून पानिपत स्वारीस भाऊनेच जावे अशी पेशव्याचीच इच्छा असल्याचे स्पष्ट होते. मात्र यामुळे पेशव्याने रघुनाथाऐवजी सदाशिवाच्या हाती हिंदुस्थानच्या मोहिमेची सूत्रे का सोपवली याचा उलगडा होत नाही. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर आपणांस वेगळ्या मार्गाने शोधणे भाग आहे.

    पानिपत मोहिमेचे नेमके उद्दिष्ट काय होते ? या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळाल्यास दादा ऐवजी भाऊची निवड का झाली, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते असे माझे मत आहे. तेव्हा प्रथम आपण पानिपत मोहिमेच्या उद्दिष्टांची चर्चा करू. 
    आजपर्यंत, पानिपत मोहीम अब्दालीच्या बंदोबस्ताकरता आखण्यात आली होती, हा इतिहासकारांनी प्रचलित केलेला गैरसमज आपण पानिपत मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट म्हणून मानत होतो. परंतु प्रत्यक्ष मोहिमेतील सदाशिवरावाचे वर्तन व त्याने पाठवलेली, त्याला आलेली उपलब्ध पत्रे पाहता पानिपत मोहिमेची मुख्य उद्दिष्टं म्हणजे (१) दिल्ली दरबारच्या मुख्य कारभाराची सूत्रे हाती घेणे, (२) रघुनाथरावाने आधीच्या स्वाऱ्यांत जी जी राजकारणं बिघडवली होती, ती दुरुस्त करणे, (३) शक्य झाल्यास बंगाल - बिहार प्रांती स्वारी करणे वा तशी तरतूद करून ठेवणे. यामध्ये कुठेही अब्दालीच्या बंदोबस्ताचा -- जरी अस्सल पत्रांत उल्लेख असला तरीही -- हेतू अजिबात नव्हता. याची साक्ष स्वारीतील भाऊच्या वर्तनातून मिळते.
     मोहिमेस निघाल्यापासून दिल्ली तसेच कुंजपुरा गाठेपर्यंत कुठेही त्याने आपल्या हालचालीत तडफ दाखवली नाही. उलट ज्या ढिलाईने तो दिल्ली तसेच कुंजपुऱ्यापर्यंत गेला ती पाहता अब्दालीच काय, दख्खनचा निजाम जरी असता तरी त्याने पानिपतावर भाऊला तसाच कोंडला असता, याबाबतीत माझ्या मनी अजिबात शंका नाही.

    हिंदुस्थान स्वारीस निघाल्यापासून भाऊने गोविंदपंताप्रमाणेच हिंदुस्थानात ठिकठिकाणी तैनात असलेल्या आपल्या कमावीसदारांना प्रस्तावित मोहिमेकरता रसद पुरवण्यासाठी आज्ञापत्रे पाठवण्याचा सपाटा लावला. पैकी, गोविंदपंताच्या नावची तेवढी इतिहास संशोधकांस प्राप्त झाली असून त्यावरून निघणारे मुख्य निष्कर्ष म्हणजे :- (१) भाऊसोबत पुरसे पायदळ नव्हते. त्याचप्रमाणे दारूगोळाही म्हणावा तितका नव्हता असे दिसते. (२) अब्दालीच्या गोटातील माहिती तो मागवतो, त्याच्याशी तहाच्या वाटाघाटी करतो, त्याच्यासोबत युद्ध करायची भाषा करतो परंतु याकरता मोहिमेचा वेग वाढवणे आवश्यक होते, ते मात्र प्रत्यक्षात दिसून येत नाही. (३) गोविंदपंताला त्याने इटाव्याजवळ नवा गोळा करून ठेवायला सांगितले. परंतु स्वतः वेगाने त्या प्रांताकडे तो कूच करताना दिसत नाही. (४) पावसाळा आरंभ होण्याची, तत्पूर्वी अब्दाली मायदेशी परतण्याची वाट बघत शक्य तितकी मोहीम रेंगाळत चालवण्याची तो खटपट करतो.
    तात्पर्य, स. १७५७ मध्ये रघुनाथाने अब्दालीसंबंधी स्वबुद्धीने म्हणा वा होळकराच्या शिकवणुकीने, जे धोरण स्वीकारलं होतं, त्याच धोरणाचा सदशिवाने यावेळी अंगीकार केला होता.

    भाऊच्या या वर्तनाची कारणमीमांसा नानासाहेब पेशव्याच्या राजकीय धोरणात मिळते. छ. शाहूच्या हयातीत नानासाहेब एकदा बंगालमध्ये फेरी मारून आला होता व त्याच वेळी बंगालची संपन्न, सुपीकता त्याच्या मनात भरली होती. परंतु बंगालचा प्रांत नागपूरकर रघुजी भोसल्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने व याच काळात रघुजीच्या त्या भागात मोहिमा सुरु असल्याने पेशव्याला आपला हात आवरावा लागला होता.
    पुढे शाहू व रघुजीच्या निधनानंतर बंगालमध्ये हात घालण्याची पेशव्यास संधी प्राप्त झाली. शिवाय, त्याच्या माथी जो राज्याच्या कर्जाचा बोजा होता, तो हलका करण्यासाठी अमाप द्रव्याची आवश्यकता असून याक्षणी बंगालकडून याची जितकी प्राप्ती होईल तितकी अन्य ठिकाणांहून होणार नाही, याची त्यांस कल्पना होती. यामुळेच स. १७५० नंतर तो दरवर्षी शिंदे, होळकर व रघुनाथास बंगाल्यात उतरण्याची आज्ञा करताना दिसून येतो.
    राजकीयदृष्ट्या पाहता पेशव्याच्या बेतांना अनुकूल अशीच तेथील परिस्थिती होती.
याच काळात इंग्रजांनी व्यापार सांभाळत राज्य कमावण्यास आरंभ केला होता. त्यांच्या व स्थानिक बादशाही अंमलदारांचा तंटा माजला होता. बादशाही अंमलदारांना यापूर्वीच नागपूरकरांनी वारंवार स्वाऱ्या करून खिळखिळे करत चौथाईच्या कक्षेत आणले होते. परंतु रघुजीच्या पश्चात त्याच्या मुलांमध्ये वारसा हक्क संघर्ष उद्भवल्याने त्यांना बंगालकडे लक्ष देण्यास फुरसत नव्हती. अशा स्थितीत एक मोठी फौज, प्रशासकीय कामकाजात मुरलेला अधिकारी व प्रसंगी इंग्रजांशी लढू शकेल अशी कवायती फौज.. हा सर्व जामानिमा बंगालकरता होता, नाहीतर आणिक कशासाठी !
     शिंदे - होळकरांनी केलेला बादशाही संरक्षक करार, होळकर - रघुनाथने केलेली पंजाब स्वारी या गोष्टी पेशव्याच्या मनाविरुद्ध घडून आल्या होत्या. त्याचा जीव बंगाल, काशी, प्रयागसाठी जितका झुरत होता तितका पंजाबसाठी नाही. यामुळेच त्याने सदाशिवाची या मोहिमेकरता निवड केली होती. अब्दालीसोबत झुंजण्याची खुद्द पेशव्याचीही इच्छा नव्हती.

    काही वर्षांपूर्वी नादीरशहा कदाचित दख्खनमध्ये उतरेल या भीतीने बाजीराव मोठी फौज घेऊन नर्मदेपर्यंत गेला होता. परंतु नानासाहेब बापाइतका उतावीळ, मूर्ख नव्हता. अब्दालीचे हितसंबंध पंजाबपुरतेच मर्यादित असल्याने त्याने त्या भागाकडे थोडेबहुत दुर्लक्षच केले. याबाबतीत त्याने सर्व जबाबदारी परस्पर सरदारांवरच सोपवलेली दिसते. दिल्ली दरबारातील घडामोडींकडेही त्याचे म्हणावे तसे लक्ष असल्याचे दिसून येत नाही. अन्यथा स. १७८४ मध्ये महादजी शिंद्याने मिळवलेली वकील इ मुतलकी त्याला रघुनाथाच्या अटक स्वारीत किंवा तत्पूर्वीच प्राप्त झाली असती व त्यायोगे हिंदुस्थानातील समस्त सत्तांवर त्याचा शहही बसली असता. असो.
                                                                  ( क्रमशः )       

मंगळवार, २६ मार्च, २०१९

पानिपत ( भाग ३ )





    बुराडीच्या संग्रामानंतर हिंदुस्थानचे राजकारण बदललं. जे संस्थानिक दखनी कि अब्दाली असे डळमळीत होते, त्यांच्या मनाचा कल अब्दालीच्या पक्षाकडे झुकू लागला. दत्ताजीने ज्या प्रकारे बुरडीचा घाट स्वतःवर ओढवून घेतला, त्याचे हे फलित होय.

    बुराडीनंतर कोटपुतळी येथे शिंदे होळकरांच्या फौजा एकत्र आल्या. त्यानंतर अब्दाली विरोधी लढ्याची सूत्रे मल्हारराव होळकराच्या हाती जाऊन राजकारणास वेगळाच रंग चढला.  

भाऊ बखरीच्या आधारे किंवा कसल्याही समकालीन पुराव्याशिवाय होळकर अब्दालीच्या सामन्यास घाबरत होता अशी बालिश विधानं करणाऱ्या निर्बुद्ध इतिहासकारांची थोबाडं फोडण्याजोगी कामगिरी यावेळी होळकराच्या हातून घडल्याची नोंद इतिहासाने केली आहे.

    शिंदे होळकरांच्या फौजा एकवटल्यावर प्रथमतः कबिले - बुणगे सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले. जाट अब्दालीचा विरोधक, शिंद्यांचा पगडभाई असला तरी होळकराने त्यावरही अविश्वास दाखवला, यावरून त्याची राजकीय परिपक्वता व योग्यतेचा अंदाज यावा.

    बुणगे कबिले स्वमुलखांत सुरक्षित पोहचताच होळकर -शिंद्यांच्या फौजांनी अफगाण - रोहिल्यांविरुद्धचा लढा नेटाने चालू ठेवला. यातूनच सिकंदऱ्याचे प्रकरण घडले. या लढाईत होळकराचा मोठा पराभव तथा पोळजत्रा झाल्याचे म्हटले असले तरी या पराभवानंतरसुद्धा धावपळीच्या युद्धांत होळकराने अब्दालीला इतके दमवले कि, दि. १३ मार्च १७६० रोजी त्याने होळकरासोबत तह करून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. दुदैवाने या संग्रामाचे तसेच तहाचे तपशील आज उपलब्ध नाहीत. आहेत, त्या फक्त नोंदी. परंतु या नोंदीच पुरेशा बोलक्या आहेत. जगाच्या पाठीवर कोणताही विजयी सेनानी आपल्या पराक्रमाची, विजयाची पुरेपूर किंमत वसूल केल्याखेरीज मागे जात नाही. हे लक्षात घेता केवळ नजीबखानाच्या ताब्यातील प्रदेश त्याच्याकडेच कायम ठेवायच्या बोलीवर होळकराने अब्दालीसोबत तह करून केवढा मोठा राजनैतिक विजय मिळवला होता, याची कल्पना यावी.

इतिहासात जर तर या शब्दांना स्थान नाही. कारण यामुळे प्रत्यक्ष वस्तुस्थितीत फरक पडत नसतो तरीही, कित्येकदा अपरिहार्य परिस्थितीत या संज्ञांचा आधार घ्यावाच लागतो. दि. १३ मार्च १७६० रोजीच्या होळकर - अब्दाली तहासंबंधी असेच म्हणावे लागते.

    दि. १३ मार्च रोजी होळकराने अब्दालीसोबत तह करून त्याला मायदेशी जाण्यास प्रवृत्त केले खरे परंतु दुसऱ्याच दिवशी इकडे दख्खनमधून सदाशिवराव मोठ्या फौजेनिशी हिंदुस्थान प्रांती येण्यास परतूडहुन निघाल्याने होळकराने केलेल्या तहाचा परिणाम काय होतो हे पाहण्यासाठी अब्दाली काही काळ इथेच थांबला. पुढे पेशव्याने होळकराचा तह बहुधा नामंजूर केल्याने किंवा नजीबला मराठी सरदार व पेशव्याच्या हेतूंविषयी संशय वाटल्याने होळकराने घडवून आणलेला तह बाजूला राहून उभय पक्षांची पावलं युद्धाच्या दिशेने पडू लागली.

                                                                                           ( क्रमशः )