अब्दाली हिंदुस्थानात आला त्यावेळी दत्ताजी शिंदे एकटाच त्याच्या
नजीक होता,
परंतु
लष्करीदृष्ट्या त्याचे सैनिकी सामर्थ्य जास्त असल्याने त्याच्यासोबत एक लहानशी
झुंज देऊन अब्दालीने रोहिल्यांशी हातमिळवणी करत दत्ताजीवर प्रथम मात केली.
होळकर आणि शिंद्यांमध्ये समजुतीचा घोटाळा झाल्याने होळकर वेळेवर
दिल्लीस येऊन दाखल झाला नाही. मात्र, होळकर येईपर्यंत दिल्लीच्या मागे येण्याची
दत्ताजीलाही बुद्धी झाली नाही. शत्रूपक्षाच्या या ढिलाईचा फायदा घेत अब्दालीने
बुराडी घाटावर एक लढाई घेण्याचा प्रयत्न केला. तिथे प्रत्यक्ष युद्धास तोंड लागले
नाही, परंतु गोळीबारात दत्ताजी ठार व जनकोजी
जखमी झाल्याने शिंद्यांच्या फौजेस दिल्लीतून माघार घ्यावी लागली.
बाकी, दत्ताजीचे " बचेंगे तो और भी लढेंगे " वगैरे उद्गार आणि
कुतुबखानाने त्याचे मुंडके कापणे सर्व भाकडकथा होत. याबद्दल गरजूंनी शेजवलकरांच्या
मराठी भाषेतील पानिपतचा अभ्यास करावा.
बुराडी घाटावर प्रत्यक्ष युद्धच न झाल्याने शिंद्यांचे सैन्य मोडले
हा देशी इतिहासकारांचा अपप्रचार व उरबडवेपणा आहे. बुराडी नंतर होळकराच्या
नेतृत्वाखाली अब्दालीसोबत शिंद्यांनी अनेक ठिकाणी झुंजी घेतल्या, ज्यामुळे टेकीस येऊन अब्दालीने दि. १३
मार्च १७६० रोजी होळकर - शिंद्यांसोबत तह करून मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला.
मात्र पेशव्याने हा तह अमान्य केल्याने व सदाशिवराव हिंदुस्थानात आल्याने
निकालासाठी अब्दालीला इथेच मुक्काम करून राहणे भाग पडले.
अब्दालीच्या बंदोबस्तासाठी सदाशिवरावाची हिंदुस्थान मोहिमेवर मुळी
नियुक्तीच झालेली नव्हती. सदाशिवराव हा प्रशासकीय कामात मुरलेला असल्याने
हिंदुस्थानातील प्रशासकीय कारभारात आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी व पेशव्याची
फसलेली राजकारणं दुरुस्त करण्यासाठी त्याला पाठवण्यात आले होते. त्यामुळेच हिंदुस्थान
स्वारीस नियुक्ती झाल्यापासून ते ऑगस्ट महिन्यात दिल्ली गाठेपर्यंत तो रेंगाळतच
आला. जर खरोखर अब्दालीशी गाठ घालण्याचा त्याचा हेतू असता तर तीन महिन्यात तो
यमुनापार अब्दालीच्या पाठीवर उतरला असता किंवा जवळपास पोहोचला असता.
बाकी, लवकर पावसाळा सुरु झाला किंवा अहिरांचे बंड वगैरे सर्व रडकथा आहेत.
दिल्ली ताब्यात घेऊन तिथेच मुक्काम ठोकणे हि एक मोठी चूक
सदाशिवरावाने केली. मुळात मथुरेवरून दिल्ली जाणेच धोक्याचे होते. कारण, मूळ मराठी सरदारांचा प्रदेश दूर राहून
त्याच्या लष्कराचा पुरवठा मार्ग लांबत होता व रसदेकरता इतरांवर -- जाट राजा --
अवलंबून राहणे भाग होते. लष्करी मोहिमा अशा मेहरबानीच्या तुकड्यांवर चालत नसतात.
किमान अब्दालीसारख्या लढवय्या विरुद्ध नक्कीच नाही !
कारण नसताना ऑक्टोबर महिन्यापर्यंत भाऊचा दिल्लीत झालेला मुक्काम एक
अपयशाचे कारण बनला. या अवधीत राजकीयदृष्ट्या त्याच्या हालचाली तरी काय झाल्या ? शहा आलमला त्याने तुर्की बादशहा म्हणून
जाहीर करत अब्दालीच्या गोटात बसलेल्या सुजाउद्दौलाला त्याचा वजीर म्हणून घोषित
केले. सदाशिवराव राजनीतीतज्ञ होता,
या
गैरसमजाला छेद देणारी हि एक वस्तुस्थिती आहे.
मुळात सुजा, मराठी सरदारांच्या संभाव्य लखनौ -
बंगाल स्वारीला घाबरून अब्दालीच्या गोटात दाखल झाला होता. त्यामुळे भाऊने त्याला
कितीही वचने, आमिषे दाखवली तरी मराठी सरदारांवर
त्याचा विश्वास बसने शक्य नव्हते. खेरीज, अब्दालीचीही त्याच्यावर गैरमर्जी ओढवणे
शक्य नव्हते. कारण, सुजाच्या मध्यस्थीने जर उभयपक्षांत तह
बनत असेल, तर तो त्याला हवाच होता. मात्र,
उभयपक्षांना
मान्य होईल असा तोडगा काढण्यास सुजालाही अपयश आले.
दिल्लीहून कुंजपुऱ्याला जाण्याचा निर्णय घेण्यात भाऊने खूप उशीर
केला. जी मोहीम ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात होणे आवश्यक होते, ती ऑक्टोबर अखेरीस आखण्यात आली.
यामागील मुख्य कारण म्हणजे, अब्दालीसोबत लढाई द्यावी लागेल हे दिल्ली मुक्कामी भाऊला कळून चुकले
व तेव्हापासून तो त्या दृष्टीने आपली रणनीती आखू लागला.
उदगीर मोहिमेत सदाशिवरावाने जे डावपेच आखले होते, त्यांचाच वापर त्याने कुंजपुरा मोहिमेत
केल्याचे दिसून येते.
कुंजपुरा येथे अब्दालीची रसद व राखीव सैन्य आहे. आपण ते वेढण्यास वा
नष्ट करण्यास तिकडे गेल्यास अब्दालीही त्याच अनुरोधाने पैलतीराने येईल व आपण
त्याला नदीपात्रातच बुडवू, इतकी साधी सरळ रणनीती भाऊने आखली होती.
त्यानुसार तो कुंजपुऱ्यास आला व त्याने कुंजपुरा घेतलाही.
अब्दालीच्या बाबतीत भाऊची पूर्णतः निराशा झाली नाही. मराठी सैन्य
दिल्लीहून कुंजपुऱ्यास जातंय म्हटल्यावर अब्दालीने आपली काही पथकं पैलतीराने
कुंजपुऱ्याच्या मदतीस पाठवली खरी, परंतु तो स्वतः वा त्याचे मुख्य सैन्य मात्र
जाग्याहून हलले नाही. कुंजपुरा पडल्याची पक्की बातमी आल्यावर मात्र अब्दालीने आपली
कर्तबगारी भाऊला दाखवून दिली.
आकस्मिकपणे शत्रूच्या पाठीवर येत त्याची सप्लाय लाईन वा रसदपुरवठा
मार्ग तोडण्याचे अब्दालीचे एक अत्यंत आवडते असे युद्धतंत्र होते. याच तंत्राचा
वापर करत अब्दाली बागपतवर यमुना पार करून मराठी सैन्याच्या पाठीवर आला व त्याने
दिल्लीसोबत असलेला मराठी सैन्याचा संपर्क तोडून टाकला.
अब्दाली बागपतवर आल्यानंतर भाऊच्या सर्व चाली शत्रूच्या तंत्राने होत
गेल्या. पानिपतची निवड करत तिथे खंदक खोदून बसने वगैरे,
सर्व
काही तो शत्रूच्या तंत्राने करत होता. यामागे कसलेही आगाऊ आखलेले धोरण नव्हते.
फक्त छावणी सोडण्याचा किंवा युद्धाचा दिवस निवडणे त्याच्या हाती होते व त्यानुसार
त्याने दिवस निश्चित केला, दि. १४ जानेवारी १७६१.
नाना फडणवीसचे आत्मचरित्र पाहिलं तर त्यात स्पष्ट दिसून येतं कि,
भाऊला
त्या दिवशी युद्ध करायचंच नव्हतं. सैन्याचा गोल बांधून त्याला यमुना नदी गाठायची
होती व मग सोयीनुसार अंतिम युद्धाचा निर्णय घ्यायचा होता. त्याउलट भाऊला
पानिपतच्या बंदिस्त छावणीतून बाहेर येण्यास भाग पाडणं,
हा
अब्दालीचा हेतू असून त्यात तो यशस्वी झाल्याचे आपणास दिसून येते.
लढाई टाळणे व गोलाच्या साहाय्याने आपल्या बुणगे - कबिल्याचा बचाव
करणे हा जरी भाऊचा हेतू असला तरी गोलाची लढाई खेळण्यासाठी आवश्यक ते बंदूकधारी
पायदळ त्याच्याजवळ नव्हते. त्यामुळेच शत्रूसैन्य प्रत्यक्ष गोलाजवळ येण्यापूर्वीच
गोलातून बाहेर पडून मराठी सरदारांनी त्यांना मारून पिटाळायचे व पार्ट आपल्या जागी
येऊन उभे राहायचे, असा कबड्डीतल्या चढाईचा प्रकार भाऊने
अवलंबला. यामुळेच विंचूरकर, गायकवाड,
खुद्द
भाऊच्या नेतृत्वाखालील हुजुरात गोलातून बाहेर पडली.
ज्या इतिहासकारांना या रणनीतीचे आकलन झाले नाही त्यांनी,
मराठी
सरदारांनी गोल फोडल्याने पानिपत झाल्याचे ठोकून दिले.
पानिपतचं संपूर्ण युद्ध होईपर्यंत अब्दालीला मराठी सैन्याचा रोख
नेमका कोणत्या दिशेला आहे, हेच मुळी समजले नाही. त्याच्या मते,
मराठी
सैन्य हरप्रयत्ने दिल्लीकडे जाण्याचा प्रयत्न करेल,
म्हणून
त्याने बचावाच्या दृष्टीने आपल्या लष्कराची रचना करत सैन्याच्या तीन फळ्या केल्या.
ज्यातील पहिल्या फळीने सकाळचे पहिले सत्र लढून काढले. दुपारच्या सत्रात पहिल्या व
दुसऱ्या फळ्या एकवटून त्यांनी फिरून मराठी सैन्यावर हल्ला चढवला व शेवटची चढाई
तिसऱ्या फळीने केली.
त्याउलट पहिल्या चढाईत गारद्यांची निम्मी फौज मारली गेली. हुजुरात व
इतर सरदारांच्या पथकांची दमछाक झाल्याने दुपार व सायंकाळच्या सत्रात त्यांना
गोलानजीकच झुंज खेळणे भाग पडले.
शत्रू युद्ध निकाली काढण्याच्या ईर्ष्येने लढतोय हे सकाळच्या
सत्रातील झुंजीने भाऊच्या लक्षात यायला हवं होतं. परंतु उदगीरला जसं निजामाने
मराठी सैन्याचे हल्ले मोडून काढत वाटचाल केली होती,
तद्वत
आपणही करू या भ्रमात भाऊ राहिल्याने त्याने गोलाच्या पिछाडीस उभे केलेलं सैन्य
आघाडीवर आणलेच नाही. त्यामुळे आघाडीच्या पथकांवर कमालीचा ताण पडून एका वेळी
त्यांचा धीर खचून त्यांनी माघार घेतली तर पिछाडीची पथके संध्याकाळी पराभवानंतर पळत
सुटली.
गारदी सैन्य नष्ट झाल्याने, गारद्यांजवळ तैनात केलेले सरदार रणभूमीतून
निघून जाऊ लागल्यामुळे मराठी सैन्याची डावी बाजू निकाली निघत तिकडून शत्रू
सैन्याने मराठी लष्कराची आघाडी गुंडाळण्यास आरंभ केला.
विश्वासरावाचा मृत्यू झाल्यामुळे मध्यभागातील मराठी सैन्य - बुणग्यात
गोंधळ माजून सदाशिवरावाने रणभूमीवरून निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तो
काही सरदारांसह गोलाच्या पिछाडीकडे सरकू लागला. त्यावेळी झालेल्या रेटारेटीत
केव्हातरी तो मारला गेला.
सदाशिवरावाने लढाई सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळेच नाना पुरंदरे, समशेरबहाद्दर, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर वगैरे सरदार लढाईतून
बाहेर पडले.
पानिपतच्या प्रत्यक्ष लढाईत मराठी सैन्याची फार मोठी संख्या कापली
गेली हा केवळ प्रवाद आहे. यासंदर्भात पानिपत युद्धानंतर नाना पुरंदरेने आपल्या आईस
लिहिलेल्या पत्रातील पुढील ओळी अतिशय महत्वपूर्ण आहेत :- " आता मल्हारबा व
आम्ही येका जागा आहो. सरकारची फौज दाहा हजार आम्हाबरोबर आहे. " ( संदर्भ :- पुरंदरे दप्तर भाग ३, ले. २०९ )
यावरून पानिपतावर नेमके किती सैन्य मारले गेले,
हे
अद्यापि न संशोधल्याचे लक्षात यावे.
विश्वासरावाच्या मृत्यूनंतर सैन्य व सरदार पळत सुटले नसून मुख्य
सेनापतीच्या -- सदाशिवरावाच्या -- आज्ञेनेच त्यांनी माघार घेण्यास आरंभ केल्याचे
दि. इ. १३ फेब्रुवारी १७६१ रोजी नाना पुरंदरेने आपल्या आईस लिहिलेल्या पत्रावरून
सिद्ध होते. या पत्रानुसार पानिपतावरून नाना पुरंदरेचे काही बुणगे ग्वाल्हेर
मुक्कामी येऊन पोहोचल्याचे स्पष्ट होते. ( संदर्भ :- पुरंदरे दप्तर भाग - १, ले. ३९७ )
पार्वतीबाईला मारून टाकण्याची सदाशिवरावाने योजना केल्याचे भाऊची
कैफियत आणि नानाचे आत्मचरित्र सांगते. परंतु सटवोजी जाधवाने दि. १९ जानेवारी १७६१
रोजी कुंभेरी मुक्कामाहून आपल्या भावास -- सुभाना -- लिहिलेय पत्रात "
राजश्री मल्हारबावा हजार दोन हजार फौजेनशी निघाले. रा|| नारो शंकर दिल्लीत होते. त्याजपाशी
पांच सात हजार होती. तितक्यानशी निघोन सौभाग्यवती पार्वतीबाई दोन चारशे स्वारानशी
निघाली होती. त्याची राजश्री मलारबाची गांठ वाटेस पडली. त्याजला ते संभाळून घेऊन
चमेलीपार भदावरच्या मुलकांत गेले. " अशी माहिती मिळते. ( संदर्भ :- राजवाडे खंड ६, ले. ४०६ )
तात्पर्य, भाऊने माघारीचा निर्णय घेताच पार्वतीबाई देखील आपल्या अंगरक्षकांसह
रणभूमीतून बाहेर पडली होती. जर हे शुद्ध पलायन असते तर विश्वास पाटलांच्या
कपोलकल्पित कादंबरी प्रमाणे ती आटिंग्या रानात भरकटली असती. असो.
बाकी, होळकर दुपारीच पळून गेला वगैरे मिथकांचा यापूर्वीच मी माझ्या ' पानिपत असे घडले ' ग्रंथात व वेळोवेळी लिहिलेल्या
प्रासंगिक लेखांत साधार समाचार घेतल्याने, तत्संबंधी कसलेही विवेचन येथे करीत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा