शुक्रवार, ११ जानेवारी, २०१९

भीमा कोरेगाव निमित्ताने..!





    वंचित उपेक्षित समाजाला आत्मभान मिळवून देण्यासाठी इतिहासातील त्या समाजाच्या गतवैभवास, सुवर्णकाळास उजाळा द्यावा लागतो. अस्पृश्यांना स्पृश्यांच्या तुलनेत वाटणारा न्यूनगंड नाहीसा व्हावा, सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याकरता त्यांना मानसिक बळ प्राप्त व्हावे याकरता एक साधन म्हणून नजीकच्या भूतकाळात घडलेल्या भीमा कोरेगाव संग्रामाचा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उपयोग केला. भीमा कोरेगावच्या लढाईत कोण जिंकले, कोण हरले यापेक्षाही अस्पृश्य समाज हा लढवय्या होता हे सिद्ध करणारा पुरावा तिथे विजयस्तंभावरील नामावलीत तत्कालीन कंपनी सरकारने कोरून ठेवला होता, ज्याच्या सत्यतेसंबंधी स्वतःच्या लहरीखातर कोलांटउड्या मारणाऱ्या शास्त्री - पंडितांशी निरर्थक वाद घालण्याची जरुरी नव्हती. त्याचप्रमाणे खुद्द ब्रिटिश गव्हर्नमेंटलाही या गतकालीन इतिहासाची जाणीव करून देऊन अस्पृश्य समाजावर लष्करी भरतीकरता असलेली बंदी उठवण्यास भाग पाडण्याची डॉ. आंबेडकरांची इच्छा होती.
अर्थात हि एक प्रकारची इतिहासाची राबवणूक असली तरी असे करणारे -- विशेषतः भीमा कोरेगाव संबंधी --- डॉ. आंबेडकर काही प्रथम वा एकमेव नव्हते. आंबेडकरांनी भीमा कोरेगावास प्रथम भेट दिली त्याच काळात तत्कालीन प्रसिद्ध वक्ते लेखक शिवराम परांजप्यांनी ' मराठ्यांच्या लढायांचा इतिहास ' हा ग्रंथ लिहताना कोरेगाव भीमाच्या युद्ध वर्णनात, तेथील झुंज मराठी सैन्याने जिंकल्याचे नमूद केले. यामागे त्यांचाही उद्देश ब्रिटिश गुलामगिरीत आत्मभान गमावून बसलेल्या भारतीय समाजास त्याच्या गतकालीन वैभवशाली कालखंडाची आठवण करून देण्याचा होता. आणि अशा गोष्टी लढाऊ परंपरा सिद्ध केल्याशिवाय यशस्वी होत नाहीत असा समज अद्यापही प्रचलित असल्याचे दिसून येते. असो.

    ब्रिटिशांच्या लेखी या जयस्तंभाचे महत्त्व काय आणि किती असावे ? या प्रश्नाकडे बऱ्याचजणांचे दुर्लक्ष झालेले आहे. मुळात हा स्तंभ उभारण्याची प्रेरणा इंग्रजांना का व्हावी याची चर्चाच आमच्या विद्वान इतिहास संशोधकांना करावीशी वाटली नाही. माझ्या मते, प्रचलित इतिहास खरा समजून त्यावर अंध विश्वास ठेवत त्याचे उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुनर्लेखन केल्याचा हा परिणाम आहे.

    इंग्लंडमध्ये व्यापारासाठी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली, त्यावेळी पूर्वेकडील व्यापारात या कंपनीवर अनेक संकटं कोसळली. त्यातील पहिले होते आंबोयाना येथील बेटावर मसाल्याच्या व्यापारी स्पर्धेत डचांकडून झालेली इंग्रजांची कत्तल. ( स. १६२३ ) या घटनेनंतर इंग्रजांनी अंबोयाना येथील मसाल्यांचा व्यापार गुंडाळून टाकला.
    त्यानंतर कंपनीच्या नोकरांवर जी काही जीवघेणी गंडांतरे आली,ती प्रामुख्याने हिंदुस्थानातच. पैकी, कलकत्त्याला सिराजउद्दौलाच्या प्रेरणेने अंधारकोठडीचा प्रकार घडून आला. ( स.१७५६ )
बिहार पाटण्याला मीर कासीमने १५० इंग्रज कैद्यांची कत्तल केली. ( . १७६३ )
त्यानंतर इंग्रज - म्हैसूर युद्धात टिपू सुलतानने मंगळूर येथे शरणागती पत्करलेल्या इंग्रज युद्धकैद्यांपैकी काहींना बंदी बनवले तर काहींना ठार करण्यात आले. याप्रसंगी इंग्रजांच्या काही स्त्रिया त्याने आपल्या जनान्यात ओढल्याचाही इंग्रजांचा आरोप आहे. त्याच्या सत्यासत्यतेच्या चर्चेत या ठिकाणी जाण्याचे प्रयोजन नाही.

    मराठी सत्तेसोबत . शिवाजी पासून इंग्रजांचे हर्षामर्षाचे प्रसंग येतच होते. पन्हाळ्याला सिद्दीने घातलेल्या वेढ्यात इंग्रजांनी सिद्दीला केलेल्या मदतीची शिक्षा शिवाजीने त्यांना दिली होती. परंतु शिवाजीने पकडलेले कैदी हे युद्धकैदी नव्हते, तसेच त्यांना कैदेव्यतिरिक्त काही त्रास दिल्याचे नमूद नाही.

    पेशवाई अंमलात घडून आलेल्या पहिल्या इंग्रज - मराठा युद्धात तळेगाव येथे इंग्रजांना शरणागती पत्करावी लागली होती. या प्रसंगी आपल्यातील काही लोक ओलीस देऊन त्यांना आपल्या लष्कराची संभाव्य कत्तल टाळता आली. ( . १७७९ )

    त्यानंतर दुसऱ्या इंग्रज - मराठा युद्धात यशवंतराव होळकरासमोर ब्रिटिश सेनानी मॉन्सन समोरही असाच शरणागतीचा प्रसंग उद्भवला असता त्याने आपल्या तोफा गमावण्याची नामुष्की स्वीकारली, बेपर्वाईने सैनिकांचा बळी देत आपला जीव वाचवला पण शरणागती पत्करली नाही. ( . १८०४ )

      या पार्श्वभूमीवर तिसऱ्या इंग्रज - मराठा युद्धातील भीमा कोरेगावच्या लढ्याकडे आपणांस पाहायचे आहे.
भीमा कोरेगाव येथे भिडण्यापूर्वी पेशव्याच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याने खडकी आणि येरवडा येथे दोनवेळा इंग्रजांशी झुंज घेऊन पाहिली होती.
    पैकी खडकी येथे दि. नोव्हेंबर १८१७ रोजी झालेल्या संग्रामात उभय पक्षांची बरोबरीच झाली. पेशव्याच्या मानाने अत्यल्प सैन्य असूनही इंग्रजांना आपला बचाव साधता आला. पेशव्याचा कारभारी मोर दीक्षित जरी यात मारला गेला असला तरी केवळ त्याआधारे यात मराठी सैन्याचा पराभव झाल्याचा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही.
    दि. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी झालेल्या येरवड्याच्या संग्रामातही निर्णायक विजय कोणाला मिळाला नाही. परंतु या लढाईनंतर पेशव्याने आपल्या राजधानीचे शहर, राहता वाडा सोडून दिल्याने इंग्रजांना या लढाईत आपला विजय झाल्याचा डंका मिरवता आला.
    यानंतर पेशवा आणि इंग्रज यांचा पाठशिवणीचा खेळ सुरु झाला. पेशव्याचा बेत कोणत्याही परिस्थितीत शिंदे, होळकर, भोसले या त्रिवर्गासोबत किंवा एकाशी हातमिळवत इंग्रजांसोबत मोठी लढाई घेण्याचा होता. त्यामुळे पाठीवर असलेल्या ज. स्मिथच्या सैन्याला हुलकावण्या देत तो उत्तरेत किंवा नागपूराकडे सरकण्याचा बेतात असता अनपेक्षितरित्या भीमा कोरेगाव नजीक पेशव्याचा इंग्रज फौजेसोबत सामना घडून आला.  

    या संग्रामाची उपलब्ध संदर्भ साधनांवरून सिद्ध होणारी संक्षिप्त हकीकत अशी :-
दि. ३० डिसेंबर १८१७ रोजी पेशवा चाकण - फुलगाव दरम्यान मुक्कामास आला. यावेळी पेशव्याच्या पाठीवर असलेल्या ज. स्मिथच्या नेतृत्वाखालील मुख्य इंग्रजी फौजेस बाजीरावाच्या सरदारांनी  -- इतिहासकारांच्या मते त्रिंबकजी डेंगळेच्या रामोशी पथकांनी -- मार्गात अडथळे उत्पन्न करून रोखून धरले होते. बाजीराव पुण्याकडे येत असल्याची बातमी पुण्यातील संरक्षक फौजेच्या प्रमुखास -- कर्नल बर यांस मिळाली. त्याच्याकडे फारसा फौजफाटा नसल्याने पेशव्याने पुण्यावर स्वारी केल्यास शहर संरक्षणार्थ म्हणून त्याने शिरूर येथील इंग्रजी ठाण्याकडे मदत मागितली. त्यानुसार कॅप्टन स्टाँटन हा एक बटालियन, अडीचशे स्वार आणि दोन तोफा घेऊन पुण्यातील ब्रिटिश फौजेच्या मदतीस निघाला. बटालियनमध्ये साधारणतः ४०० ते ८०० पायदळ शिपायांचा समावेश असतो. हे लक्षात घेता या संग्रामातील इंग्रजी फौजेत हजार बाराशेपेक्षा अधिक लोकांचा भरणा नव्हता असे म्हणता येते.
दि. ३१ डिसेंबर १८१७ रोजी रात्री ८ वाजता शिरूरहुन निघालेली इंग्रज फौज सकाळी दहाच्या सुमारास अविश्रांत २६ - २८ मैलांची मजल मारून कोरेगावाजवळ येऊन ठेपली. यावेळी पेशवा फुलगाव सोडून साताऱ्याच्या दिशेने निघायच्या बेतात होता व त्यानुसार त्याची आघाडीची पथके पुढे निघून गेली होती. शिरूरची इंग्लिश फौज कोरेगावी सामन्यास येईल अशी त्यास बिलकुल कल्पना नव्हती. पाठीवर ज. स्मिथ कधीही येण्याची शक्यता असताना शिरूरच्या फौजेसोबत कोरेगाव जवळ लढत बसण्याची बाजीरावाची इच्छा नव्हती. त्याने सातारकर छत्रपतींना सोबत घेत पूर्वनियोजित साताऱ्याचा रस्ता धरला व पिछाडीच्या रक्षणाचा भार सेनापती बापू गोखल्यावर सोपवला. 
    या लढ्यात पेशव्याचे वीस ते तीस हजार सैन्य सहभागी झाल्याचे जरी सांगितले जात असले तरी हा आकडा मुळीच विश्वसनीय नाही. कारण पेशव्याची आघाडीची पथके आधीच रवाना झाली होती तर मुख्य फौज पेशवा आणि छत्रपती सोबत निघून गेली. त्यामुळे पिछाडी रक्षणार्थ व या संग्रामाकरता पाच सात हजारांहून अधिक सैन्य बापू गोखल्याकडे असणे संभवनीय नाही.
फुलगावाजवळ पेशव्याची फौज दिसताच कॅप्टन स्टाँटनने भीमेच्या तीरावर न जाता मागे कोरेगावातील तटबंदीचा आश्रय घेतला. पेशव्याची फौज पाय उताराने नदीपार करेल म्हणून जवळच्या दोन तोफा त्याने नदी उतार रोखण्याच्या उद्देशाने मांडल्या. परंतु त्याचा फारसा उपयोग न होता बापू गोखल्याचे अरब पायदळ नदीपार होऊन कोरेगावात शिरले. यावेळी इंग्रज सैन्याने मिळेल त्या स्थळाचा आश्रय घेत आपला बचाव साधण्याचा प्रयत्न केला. अरबांच्या या चढाईत एका तोफेवरील मुख्य अधिकारी लेफ्टनंट चिशोल्म मारला गेला व त्याचे मुंडके विजयाचे प्रतीक म्हणून पेशव्याकडे पाठवण्यात आले. याखेरीज या संघर्षात लेफ्टनंट स्वानस्टन, लेफ्टनंट कोनेलन व असिस्टंट सर्जन वुइंगेट जखमी झाल्याने त्यांना गावातील एका धर्मशाळेत ठेवण्यात आले होते. परंतु पेशव्याचे सैन्याने तिथेही हल्ला चढवून सर्जन वुइंगेटला ठार केले. बाकीच्यांचीही तीच गत झाली असती परंतु कॅ. स्टाँटनने प्रतिहल्ला करत धर्मशाळेचा कबजा घेत आपल्या सहकाऱ्यांचे जीव वाचवले.
    कोरेगावात एक गढी असून बचावार्थ तिचा ताबा घेण्याची बुद्धी इंग्रजांना झाली नाही. पेशव्याच्या सैन्याने ती गढी ताब्यात घेत तेथून इंग्रजांवर मारा केला. मात्र कोरेगावात इंग्रज सैन्याला कोंडून धरण्यापलीकडे मराठी सैन्याकडून फारशी कामगिरी घडू शकली नाही. याचे मुख्य कारण माझ्या मते, लढाईत प्रामुख्याने झालेला बंदुकांचा वापर हेच होय. यामुळे ना मराठी सैन्याला समस्त इंग्लिश बटालियन कापून काढता आली, ना इंग्रजांना मराठी फौजेस पळवून लावता आले.
    बापू गोखल्याने आपल्या प्रयत्नांची शिकस्त करून पाहिली, परंतु त्याला इंग्रजांचा चिवट प्रतिकार मोडून काढता न आल्याने रात्र पडताच कोरेगवातून आपलं सैन्य काढून घेत पेशव्याची पिछाडी सांभाळण्यास तो निघून गेला.
    मराठी सैन्य कोरेगवातून निघून गेल्यावर ती रात्र तिथे कशीबशी कंठून कॅ. स्टाँटन दुसऱ्या दिवशी पुण्याकडे न जाता शिरूरला निघून गेला. कारण, आदल्या दिवशीच्या चकमकीत त्याच्या पथकाची पुष्कळच नासाडी झाली होती. अरबांच्या लागोपाठ हल्ल्यांनी एका समयी स्टाँटन सोडता सर्वांचें मनोधैर्य कोसळून सैन्यासाहित अधिकारीही शरणागतीची भाषा करू लागले होते. अशा स्थितीतही स्टाँटनचा मनोनिग्रह कायम राहिल्याने इंग्रजांचा लाजिरवाणा पराभव टळला.

    निकालाच्या दृष्टीने पाहता याक्षणी सर्वात जास्त विजयाची गरज मराठी सैन्याला होती. खडकी, येरवड्याचे संग्राम निकाली निघाले नाहीत वर राजधानीही शत्रूहाती गेल्याने बापू गोखल्यासारख्या लढवय्या सरदारास ती आपली मानहानी वाटून कोरेगावात इंग्लिश सैन्य सरसहा कापून काढण्यासाठी त्याने प्रयत्नांची शिकस्त करून पाहिली. परंतु ब्रिटिश सैन्याचा चिवट प्रतिकार व स्टाँटनच्या अचल मनोधैर्यास त्याला तडा देता आला नाही. शेवटी या ठिकाणी अधिक गुंतून पडल्यास ज. स्मिथच्या मोठ्या सैन्यास आपल्यावर चालून येण्यास अवसर प्राप्त होऊन पेशव्याची पिछाडी उघडी पडेल या धास्तीने सांयकाळ होताच त्याने हळूहळू कोरेगवातून आपली पथके काढून घेण्यास आरंभ करत रात्रीच्या सुमारास गाव मोकळे केले.

    मनुष्यहानीचे आकडे, मृत अधिकाऱ्यांच्या कापलेल्या मुंडक्यांची संख्या, गावावर राहिलेला अंती कब्जा इ. मुद्द्यांवर इंग्रज तसेच पेशवे समर्थक सदर लढाईत आपापल्या पक्षाचा जय झाल्याचे सांगतात. परंतु अमुक ह्याच एका पक्षाचा विजय झाला असे सांगणारे एकही विजयदर्शक चिन्ह उभय पक्षांपैकी एकाही बाजूस प्राप्त झाले नाही.
    गोखल्याच्या अरबांनी चिशोल्मचे मुंडके कापले खरे पण त्यामुळे इंग्रजांचे मनोधैर्य न खचता ते निकराने लढले, हे विसरता येत नाही. शिवाय मुख्य अधिकारी चिशोल्म नव्हता. हे दृष्टीआड करता येत नाही.
    मराठी सैन्याने इंग्रजांना दिवसभर पाणी मिळू दिले नाही, असेही विजयाचे एक परिमाण सांगितले जाते. परंतु गावात कोंडलेल्या इंग्रजांना गावातील विहरी तसेच घराघरात साठवलेल्या पाण्याचा लाभ अजिबात झालाच नाही असे म्हणता येईल का ?
    इंग्रजी सैन्याच्या हानीचे आकडे देऊन आपला विजय झाल्याचे पेशवे पक्षीय सांगतात. परंतु याच लढाईतील मराठी सैन्यहानीचे विश्वसनीय आकडे कुठाहेत ?
    मराठी सैन्याचा या स्थळी विजय झाला म्हणावे तर  त्यांना इंग्लिश सैन्याची सरसकट कत्तल करता आली नाही वा त्यांना शरणागती घेण्यास भाग पाडता आले नाही. खेरीज मुख्य अधिकारी कैद वा ठार करता आले नाहीत कि सैन्याची निशाणं, तोफा, बुणगाईत लुटून घेता आली नाही.
इंग्रजी बाजूसही हेच लागू पडते.
    परंतु तरीही इंग्रजांनी या स्थळी स्मारक उभारले. यामागील मुख्य कारण म्हणजे हिंदुस्थानात राज्य कमावण्याचा उद्योग आरंभल्यापासून बिहार - पाटणा वा तळेगाव सारखे मानहानीकारक प्रसंग इंग्रजांवर ओढवले होते. कोरेगाव भीमा येथे जवळजवळ याचीच पुनरावृत्ती होण्याची वेळ उद्भवली असता तेथील सैन्याने आपलं मनोधैर्य खचू न देता शत्रूचा अप्रतिहत मुकाबला करत आपला यशस्वी बचाव साधल्याने असे स्मारक उभारण्याची इंग्रजांना प्रेरणा न व्हावी हेच मुळी अनैसर्गिक म्हणता येईल !
    

    त्यामुळेच कोरेगाव येथे स्मारकावरील इंग्रजी मजकुराच्या पाटीवरच्या मथळ्याखालील पहिल्या ओळीत ' THE COLUMN IS ERECTED TO COMMEMORATE THE DEFENCE OF CORIGAUM ' अर्थात ' कोरेगावचा बचाव ' हे शब्द कोरले आहेत. तसेच याच पाटीवरील एका मजकुरात ' triomphs ' या सद्यकालात संदिग्ध वाटणाऱ्या शब्दाची योजना केली आहे. सद्यकालीन संदिग्ध अशाकरता कि या शब्दाचे victory, win, conquest, success, achievement, ascendancy, mastery इ. अर्थ होतात व सध्या यांपैकी victory, win, success हे जयसूचक शब्द ग्राह्य धरले जातात. परंतु प्रश्न इथेच उदभवतो कि, इंग्रजी मातृभाषा असलेल्या इंग्रजांनी अशा संदिग्ध शब्दाची योजना मुळात करावीच का ?
    जर मजकुराच्या आरंभीच्या ओळीतच डिफेन्स शब्द वापरला आहे तर मजकुरातील खालील एका ओळीत triomphs शब्दाची योजना करण्याचे काहीच कारण नव्हते.
    याच स्मारकावरील मराठी मजकूर जर पाहिला तर आरंभापासून शेवटापर्यंत यास जयस्तंभच म्हटलेलं आहे. तिथे असा काही शाब्दिक छल वा गोंधळ निर्माण होत नाही.
    याचे मुख्य कारण माझ्या मते हेच आहे कि, इंग्रजी मजकूर बनवताना किंवा हे स्मारक उभारतानाच मुळी इंग्रजांना हे पक्के ठाऊक होते कि, प्रस्तुत स्मारक आपल्या विजयाचे नसून यशस्वी बचावाचे प्रतीक आहे. त्यामुळेच त्यांनी इंग्रजी मजकुरात आरंभीच डिफेन्स शब्दाची योजना केली व सध्या ज्या triomphs शब्दावरून गोंधळ माजवला जातोय त्याचा त्यांनी achievement अर्थी वापर केला आहे. कारण '... AT LENCTH ACHIEVED THE SIONAL DISCOMEITURE OF THE ENEMY AND ACCOMPLISHED ONE OF THE PROUDEST TRIOMPHS OF THE BRITISH ARMY IN THE EAST.. ' यावरून स्पष्ट होते कि, एकाच वाक्यात achive शब्दाची द्विरुक्ती टाळण्याकरता triomphs या समानार्थी शब्दाची योजना केली आहे.

    सध्या या स्मारकावरून महाराष्ट्रीयन समाजात कित्येक गैरसमज प्रचलित आहेत वा केले जात आहेत त्यांचा येथे थोडक्यात आढावा घेऊ.
१) या लढाईत पेशव्याचा दारुण पराभव होऊन पेशवाईचा अंत झाला.
उत्तर :- हि एक अनिर्णित लढाई होती. पेशव्याचा निर्णायक पराभव खुद्द पेशव्याने खडकी - येरवड्याच्या संग्रामादरम्यानचा काळ निष्क्रियपणे वाया घालवल्याने करून घेतला होता.
२) अस्पृश्य समाजाने तत्कालीन सामाजिक गुलामगिरी विरुद्ध पुकारलेलं बंड होतं.
उत्तर :- याचा कसलाही पुरावा उपलब्ध नाही. बॉम्बे इन्फन्ट्रीच्या या बटालियनमध्ये महार, मराठा जसे आहेत तसेच उत्तर भारतीय देखील असल्याचे स्तंभावरील जखमी - मृतांच्या यादीवरून स्पष्ट होते. तसेच बाजीराव पदभ्रष्ट व्हावा याकरता कित्येक हिंदू, वैदिक मंडळी -- ज्यामध्ये पेशव्याचे दरबारी मुत्सद्दी, सरदार, आप्त देखील इंग्रजांना अंतस्थ मिलाफी होते.
३) दुसरा बाजीराव हा स्वातंत्र्ययोद्धा तर त्याच्या विरुद्ध लढणारे देशद्रोही होते.
उत्तर :- बिलकुल नाही. या न्यायाने मग सातारकर छत्रपती प्रतापसिंह, खुद्द बाजीरावाचा धाकटा भाऊ दु. चिमणाजी देशद्रोही ठरतात, हे इतिहास अभ्यासकांनी लक्षात घ्यावे. हा लढा फक्त पेशवा आणि कंपनी सरकार किंवा इंग्रजांच्या दरम्यान होता.
४) हा झगडा धार्मिक स्वरूपाचा होता का ?
उत्तर :- याचेही उत्तर नकारार्थीच मिळते. इंग्रजांनी हिंदू, वैदिक वा मुस्लिमांच्या धार्मिक बाबीत कोणताही हस्तक्षेप केला नव्हता. उलट खडकी, येरवडा आणि कोरेगाव या तिन्ही ठिकाणी पेशव्याच्या वतीने जितकं शौर्य, मर्दुमकी अरब आणि गोसाव्यांनी गाजवली तितकी कोणी केली नसेल. या तिन्ही ठिकाणी ब्रिटिशांच्या तोफखान्यावर, पायदळ पलटणींवर ते बेलाशक तुटून पडल्याचे इंग्रजी इतिहासकारांनीही नमूद केलं आहे.
५) शरणागती न स्वीकारता यशस्वी बचाव साधला, केवळ याकरता असे स्मारक उभारले जाते का ?
उत्तर :- स. १८८० मध्ये अफगाणिस्तानातील Dubro या लष्करी ठाण्यावर शत्रूने हल्ला चढवला. ठाण्यातील इंग्रजांचे सैन्य मारले गेले व फक्त मेजर सिडने जेम्स वॉडबी, इलाही बक्ष आणि प्रायव्हेट सोननाक ताननाक हे  तिघेच उरले. तेव्हा शरणागती न स्वीकारता या तिघांनी जवळपास तीन तास सुमारे तीनशे शत्रू सैनिकांचा सामना केला. जवळचा दारुगोळा संपल्यावर हातातील बंदुकांचा लाठीसारखा उपयोग करत ते शत्रूवर तुटून पडले, मारले गेले. 
    या तिघांच्या स्मरणार्थ तत्कालीन ब्रिटिश सरकारने मुंबईतील युरोपियन जिमखान्यानजीकच्या एका रस्त्याला वॉडबी रोड हे नाव दिले तसेच या तिघांच्या पराक्रमाचे वर्णन करणारा एक शिलालेख मुंबईतील अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कुलमध्ये ठेवण्यात आला.
     
    एका विशिष्ट सामाजिक स्थितीत कोरेगाव भीमा येथील स्मारकाचा केवळ वंचित समाजास आत्मबलाचा प्रत्यय यावा याकरता इतर साधनांच्या जोडीने वापर करण्यात आला.**  
 कार्यभाग साधल्यानंतर पराक्रमाची नवीन क्षेत्रं नव्या रूपात स्वरूपात उपलब्ध झाल्यावर अशा प्रतीकांची जरुरीही राहिली नव्हती. परंतु हे भान समाजाला तसेच स्वतंत्र भारत सरकारलाही राहिले नाही.

    शौर्यगाथांची भुरळ समाजमनास नेहमीच पडत आली आहे. विशेषतः भारतासारख्या विविध जातीत विभागलेल्या देशात जातीय इतिहासाचे खूळ माजल्याने अशा शौर्यगाथांना जातीचे लेबल लागणे स्वाभाविक होते. आणि तसे घडलेही. हि अनिष्ट बाब टाळण्यासाठी भारत सरकारने स्वातंत्र्योत्तर काळात घडून आलेल्या भारत - पाक, भारत - चीन तसेच प्रसंगोत्पात इतरत्र देशांत जाऊन भारतीय सैन्याने बजावलेल्या कामगिरीचा विस्तृत आणि साधार इतिहास उपलब्ध करून देणे आवश्यक होते. जेणेकरून सामाजिक शांततेचा भंग करण्यासाठी जातीय कंड सुटलेल्या विषवल्ली मूलतः खुडल्या असत्या. परंतु अद्यापि जरी असे घडले नसले तरी नजीकच्या काळात असा इतिहास उपलब्ध होऊन सामाजिक शांतता सलोखा जपला जाईल अशी आशा आहे.   

** यासंबंधी विस्तृत चर्चा श्री. चांगदेव . खैरमोडे यांनी ' अस्पृश्यांचा लष्करी पेशा ' या संदर्भ ग्रंथात केली असून सर्वच अभ्यासूंनी ती वाचावी अशी मी शिफारस करतो

{  हा लेख कोलाज ( kolaj.in ) या वेबसाइटवर दि. १ जानेवारी २०१९ रोजी प्रकाशित झाला आहे. }

४ टिप्पण्या:

आकाश म्हणाले...

अप्रतिम विश्लेषण. यासंबंधी एक लेख गेल्यावर्षी वाचनात आला होता.

भीमा - कोरेगाव लढाई : विजय कुणाचा?

https://prasannavadane.blogspot.com/2018/01/

आपण त्यापुढे जात जयस्तंभा(?)विषयीची आपल्या इतिहासकारांची अनास्था दाखवलीत, ती खरीच आहे. जातीय नकारात्मक अस्मिता पोसण्याचे राजकारण इतिहास बिघडवतं आणि भविष्य नासवतं.

Dadasaheb Pol म्हणाले...

आपल्या विश्लेषणात ऐतिहासिक संदर्भ दिले असते तर ते विश्वसनीय वाटले असते. जातीयता संपली पाहिजे याबद्दल आमचे दुमत नाही परंतू इतिहास लेखन किंवा विश्लेषण हे भौतिक, लिखित, मौखिक पुराव्यानिशी केले जावे ही मूलभूत अपेक्षा आहे. दादासाहेब पोळ, व्हाटसप फोन नंबर 9220410376

Dadasaheb Pol म्हणाले...

आपल्या शिफारसीनंतर मी सुद्धा सदर लेख वाचला आहे. आपल्या मताशी मी ही सहमत आहे.

सत्यशोधक म्हणाले...

इतिहासकार कर्नल टॉड ने या लढाईचे वर्णन "थर्मोपिलाईची लढाई" अश्या गौरवपूर्ण शब्दात केले आहे. ह्या लढाईवर 300 सिनेमा आधारित आहे. ह्या लढाईला त्यांच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. तर तशाच लढाईला मात्र सैनिक दलित असल्यामुळे येथे महत्व दिल जात नाही.

बाजीरावाला पुणे मिळवून न देणं हा चांगला डिफेन्स असून ब्रिटिशांच्या दृष्टीने तोच महत्वपूर्ण विजय आहे.